बाळ

Submitted by बेफ़िकीर on 24 June, 2011 - 08:21

लिमये प्रसूती गृहातील एका गूढ खोलीच्या बाहेर एक माणूस अस्वस्थपणे येरझारा घालत आहे. बाहेर येणार्‍या आणि आत जाणार्‍या अशा सर्व नर्सेस प्रचंड वेगात धावत असल्यामुळे आत नेमके काय चालले आहे हा प्रश्न विचारण्याची त्याची छातीच होत नाही आहे. या माणसाची म्हातारी आई जपाची माळ हातात घेऊन वर आढ्याकडे बघत काहीबाही पुटपुटत आहे. या माणसाचा म्हातारा बाप या माणसाला सांगत आहे की तुझ्यावेळेस इतका वेळ लागलेला नव्हता, तू लगेच झाला होतास. त्यावर तो माणूस 'त्याचा आत्ता काय संबंध' अशा अर्थाचा चेहरा करत आहे तर त्याची आई माळ नसलेला दुसरा हात ओवाळल्यासारखा करून नवर्‍याची अक्कल काढत आहे व पुटपुटतानाच म्हणत आहे की तुम्हाला त्यातले काय कळते?

त्यातच डॉक्टर बाहेर येतात. त्यांच्या चेहर्‍यावरील गांभीर्य हिटलर ताब्यात आल्यासारखे आहे.

माणूस - काय झालं?

डॉ - व्हायचंय

माणूस - हो पण काय होणार आहे?

डॉ - झाल्यावर कळेल

माणूस - पण कधी होणार आहे?

डॉ - होईल तेव्हा होईल

माणूस - याला काय अर्थंय??

डॉ - ती काय माझी जबाबदारीय?? आत्ताशिक कळा येतायत

माणूस - मी तिला भेटू शकतो का?

डॉ - नाही.

माणूस - का?

डॉ - आत्ता ऑपरेशन टेबलवर आहे ती तुमची बायको नाही आहे.

माणूस - मग कोण आहे?

डॉ - ती माझी बायको आहे.

माणूस - मग माझी बायको कुठे आहे?

डॉ - त्या प्रसूत झाल्या.

माणूस - अहो मग मी माझ्याच बायकोचं विचारतोय.

डॉ - झाल्या की त्या प्रसूत

माणूस - अहो... मग काय झालं?

डॉक्टरांनी चष्मा काढला. आर्मीतला अधिकारी मेल्यावर बाकीचे टोप्या काढतात तसा काढला. गांभीर्याची परिसीमा आणली चेहर्‍यावर! त्या माणसाकडे उदासीच्या पराकोटीने पाहून खिशातल्या रुमालाने स्वतःचे डोळे पुसले.

माणूस - गेली??

डॉ - नाही

माणूस - प्लच! पण मग तुम्ही का उदास?

डॉ - जे झाले आहे ते भयंकर आहे

माणूस - नावही ठेवलं मुलाचं? भयंकर?

डॉ - नाही, ते एक विशेषण आहे. भयंकर प्रकार झालेला आहे.

माणूस - ही माझी आई, हे माझे वडील, आणि यांना हा मी झालो आहे. याहून काय भयंकर घडलंय आत?

डॉ - तुमच्या पत्नीच्या पोटी जन्माला आलेल्या मुलासारखे एकही मूल मी आजतागायत पाहिलेले नाही.

माणूस - कोणतीच दोन माणसे एकसारखी नसतात

डॉ - हे ज्ञान चुलीत घाला

माणूस - म्हणजे?

डॉ - अहो, ते मूल बोलतंय

माणूस - बोलतंय म्हणजे?

डॉ - चक्क मराठी बोलतंय! मगाशी नर्सची चौकशी केली, म्हणे नीट उचलता येत नाही का मला? ही कसली घिसाडघाई?

माणूस - ऑ?? मग काय झालं??

डॉ - ती नर्स बेशुद्ध पडलेली आहे. तिलाही अ‍ॅडमीट केलंय!

माणूस - हे, हे माझ्या बायकोला माहीत आहे का?

डॉ - त्यांना पोस्ट प्रेग्नन्सी सोनोग्राफीसाठी पाठवलंय

माणूस - का?

डॉ - तुमचा मुलगा जन्माला आल्यावर त्यांना म्हणाला 'फार त्रास नाही ना झाला तुला'! त्यांनाही फिट आली निजल्या निजल्याच!

माणूस - डॉक्टर, हा काय प्रकार हो?

डॉ - मी जन्माच्या दाखल्यावर सही करू शकत नाही

माणूस - का?

डॉ - असे बालक जन्माला येऊ शकत नाही

माणूस - अहो पण आलंय ना?

डॉ - पण अशी तरतूदच नाही ना? वजन लिहावं लागतं, डिलीव्हरीची वेळ, बालक ठीकठाक आहे किंवा नाही, बालकाचे लिंग, रडले की नाही वगैरे नोंदी असतात. बालक जन्माला आल्यावर बोलत होते की नाही असा प्रश्नच नसतो त्या फॉर्मवर!

माणूस - हो पण ते बालक बोलले हे लिहायचेच नाही

डॉ - असे कसे? उद्या ते इथून गेल्यावर जर कुणाला उद्देशून जातीवाचक वगैरे बोलले आणि दंगाबिंगा झाला तर आमच्या प्रसूतीगृहाचे काय?

माणूस - थोबाड फोडीन की मी त्याचं?

डॉ - त्याच थोबाड फोडाल हो, आमचं काय पण?

माणूस - मग तुमचं म्हणणं काय आहे?

डॉ - तुम्ही हे बालक आणि त्याच्या मातेला घेऊन घरी जा

माणूस - हो मग आम्ही काय त्यांना इथेच ठेवणार होतो काय जन्मभर?

डॉ - तसं नाही, आणि आयुष्यात कधीही सांगू नका की हे बालक आमच्याकडे जन्माला आले

माणूस - तुमच्याशी काही बोलले का ते बालक?

डॉ - मला म्हणाले अशी भुल देतात होय? म्हणे मलाही बेशुद्ध पडल्यासारखे वाटले

माणूस - मग तुम्ही काय म्हणालात?

डॉ - काय म्हणणार? सॉरी म्हणालो

माणूस - तुम्हाला काहीच वाटलं नाही ते बाळ बोलतंय हे पाहून??

डॉ - घेरी आली होती घेरी, म्हणून तर बाहेर आलोय जरा वेळ

माणूस - मी जाऊ का आत?

डॉ - इतक्यात नको

माणूस - का?

डॉ - ते एका आयाशी भारतातील वाढती लोकसंख्या आणि निर्मुलनाचे उपाय यावर चर्चा करतंय

माणूस - आणि ती आया काय करतीय?

डॉ - ती रामाचा जप करतीय, भीतीने गारठलीय, बहुधा आत्तापर्यंत कोसळली असेल

माणूस - आणि अशा परिस्थितीत तुम्ही बाहेर आलात?

डॉ - मी माझं बघू का त्या आयाचं?

माणूस - डॉक्टर?? ओ डॉक्टर... हे असं कसं झालं हो??

डॉ - मी काय सांगणार हो! तुम्ही नेमकं काय केलं होतंत ते मला कसं कळणार?

माणूस - मी हे बालक घरी न्यायला नकार देत आहे

डॉ - ते बालक म्हणजे काय बांग्लादेशी घुसखोर आहे का काय? म्हणे नकार देत आहे.

माणूस - कशावरून तुम्ही तुम्हाला झालेलं बालक माझ्या बालकाबरोबर बदललेलं नाहीत?

डॉ - माझी बायको अजून अवघडलेल्या अवस्थेत आहे हे आत येऊन पाहू शकता

माणूस - कशावरून ती तुमचीच बायको असून माझी बाय... सॉरी...

डॉ - हे पहा, पेराल ते उगवणार

माणूस - म्हणजे?

डॉ - हे तुमचं बालक आहे आणि ते तुम्ही घरी नेलंच पाहिजेत

माणूस - आई, अगं हे बघ काय म्हणतायत, तुझा नातू बोलतोय

आजी - पण डोळे उघडलेत का?

डॉक्टर - अहो तोंड उघडलंय तिथे डोळ्यांचं काय घेऊन बसलात?

आजी - सूनच असली आणलीयस करून, एक सेकंद तोंड बंद करत नाही

डॉक्टर - ओ, तुमची भांडणं तुमच्या घरात करा, आधी डिसचार्ज घ्या

माणूस - एक मिनिट, मला आधी ते बालक पाहूदेत

वरात आतमध्ये गेली.

बेशुद्ध आईशेजारी ते बालक निवांत पहुडून मुठी चोखत होते. एका बाजूला एका खुर्चीवर बसलेली आया खुर्चीवरून खाली कोसळलेली तशीच पडलेली होती. तिच्यावर याक्षणी कुणाचेही कॉनसन्ट्रेशन नव्हते.

एका कोपर्‍यात दोन नर्सेस थरथरत उभ्या होत्या.

माणूस बेडपाशी गेला.

बाळ - आले... आले पैलवान, काय हो? बाहेर फेर्‍या काय मारताय?

माणूस - तू, तू बोलतोयस कसा काय?

बाळ - मग अशा अवस्थेत दुसरं काय करणार? धडधाकट असतो तर पहिला या डॉक्टरला धुतला असता.

माणूस - का?

बाळ - परवाच तारीख उलटून गेली माझी, अगदी पार कळा येईपर्यंत कशाला थांबायचं? वैताग आला आतमध्ये नुसता

माणूस - मी तुझा बाप आहे

बाळ - आणि मी तुमचा

माणूस - ते कसे?

बाळ - बघा आयुष्यभर माझे संगोपन करता की नाही

माणूस - तुझा जन्मदाखला द्यायला हे नकार देत आहेत

बाळ - माझं फक्त बोलणं दिसतं ह्यांना

माणूस - तू आता घरी येतोस का?

बाळ - किती खोल्या आहेत?

माणूस - तीन

बाळ - आपल्याला सेपरेट पाहिजे, कटकट नकोय कसलीही

माणूस - देईन बाळ

बाळ - आणि दातबित येईपर्यंत मला तांबडा आणि पांढरा रस्सा फ्री द्यायचा, त्याचा चार्ज नाही लावायचा

माणूस - हे रंगीत रस्से कुठे मिळतात?

बाळ - आधीच्या जन्मी मी होतो तेव्हा बोकड कापला की तयार व्हायचे

माणूस - आपण असलं खात नाही बाळ

बाळ - तुमचं तुम्ही ठरवा, माझं मला ठरवू देत, लॅपटॉप आहे का घरात?

माणूस - नाही

बाळ - मग मला चालता येईपर्यंत रोज सायबर कॅफेत नेलं पाहिजे

माणूस - पण तू त्या खुर्चीवर बसणार कसा?

बाळ - बसायला लागलो की तर न्याल का नाही?

माणूस - नक्कीच

बाळ - आणि फिरता पलंग लागेल

माणूस - फिरता पलंग म्हणजे?

बाळ - जो आपोआप उजवी डावीकडे होतो असा

माणूस - का?

बाळ - कुशीवर वळेपर्यंत मी काय उताणं पडायचं क्काय??

माणूस - पण आई करेल की तुला उजवी डावीकडे

बाळ - ती अजून पंधरा दिवस उठत नाही बघा

माणूस - हे भविष्य कसं काय वर्तवतोस बाळा?

बाळ - मी केलेल्या पक्षत्यागामुळे तिला धक्का बसलेला आहे

माणूस - तू कसला पक्षत्याग केलास?

बाळ - तिची डिलीव्हरी नाही का झाली?

माणूस - बरं तू आत्ता चलतोयस का एक दोन चार दिवस थांबणार आहेस?

बाळ - उद्या जाऊ, आज माझं व्याख्यान आहे

माणूस - कुठे?

बाळ - हे काय इथंच

माणूस - कसलं व्याख्यान?

बाळ - गेल्या महिन्याभरात जन्मलेल्या मुलांना आईच्या दुधाचे महत्व सांगणार आहे मी

माणूस - पण ते तुला पटलंय का?

बाळ - ज्या क्षेत्रातील काहीही माहिती नाही त्याच्यावरच व्याख्यान देणार्‍या देशातच तर जन्माला आलोय मी

माणूस - आणि महिन्यापुर्वी जन्माला आलेल्या बाळांना व्याख्यान का नाही?

बाळ - ती इथे कुठेयत बाळं? ती गेली की घरी?

माणूस - डॉक्टर, ही केस कसलीय?

डॉक्टर - भुताटकीची

बाळ - भूत तुझा बाप! ओ, मला उठवून बसवा जरा! ही का अशी पडलीय आया? चांगली बोलत होती की?

माणूस - इथल्या नर्स घाबरतायत तुला

बाळ - त्यांची लायकीच ती आहे

माणूस - का?

बाळ - हा डॉक्टर बाहेर गेला की टाईमपास करत बसतात, परवा तर एकीने एक बाळ दहा वेळा बुचकळून काढलं पाण्यात, कसलं रडलं बिचारं!

माणूस - परवाचं तुला कसं कळलं?

बाळ - ऐकू येणारच ना? दिसत नसलं म्हणून काय झालं?

माणूस - म्हणजे तुला गेल्या नऊ महिन्यात काय काय झालं ते सगळं ऐकू आलंय?

बाळ - अर्थातच! आईने त्या दिवशी शेजारच्या काकांना बोलावलं होतं

माणूस - कशाला?

बाळ - ते काय कळलं नाही, पण काहीतरी खुसुरफुसुर चालली होती खरी

माणूस - मी कुठे होतो तेव्हा?

बाळ - मला काय दिसणार?

माणूस - पण आजी आजोबा?

बाळ - ते झोपलेले होते म्हणून तर बोलावलं

माणूस - आणि हे तू मला आत्ता सांगतोस??

बाळ - मग कधी सांगणार?

माणूस - तो नालायक काय म्हणाला आईला??

बाळ - तो म्हणाला आता दिड एक वर्ष तर काही तू भेटणार नाहीस

माणूस - मग ती काय म्हणाली?

बाळ - ती रडली तरी असावी किंवा हासली तरी असावी

माणूस - कशावरून??

बाळ - हादरत होतो ना मी??

माणूस - माझं.. माझं तुला काय काय माहीत आहे?

बाळ - टोटल माहितीय मल तुमचं!

माणूस - काय टोटल माहितीय??

बाळ - इथे बोलण्यासारखं नाहीये

माणूस - मग कुठे बोलण्यासारखंय?

बाळ - कुठेच नाही. डायपर बिपर आणलेत का?

माणूस - जाताना घेऊ

बाळ - हे प्रसूतीगृह कुठे आहे?

माणूस - डेक्कनवर

बाळ - मग काय! प्रभात रोडला लागलं की लगेच केमिस्ट आहे, त्याच्याकडून घेऊन टाकू

माणूस - तू घरी गेल्यावर काय करणार आहेस?

बाळ - हातपाय मोकळे करीन म्हणतो! अंग आखडलं होतं किती दिवस!

माणूस - तुझं नांव काय ठेवायचंय? नॉर्मली असं विचारावं लागत नाही बाळाला

बाळ - काहीही ठेवा, आय अ‍ॅम नॉट सो.. काय म्हणतात त्याला?

माणूस - तू एक विनंती मान्य करशील का?

बाळ - बोला बोला, मनात ठेवू नका काहीही

माणूस - आजपासून बोलता येईपर्यंत बोलणं बंद

बाळ - हो पण बोलता येतंय ना?

माणूस - हो पण येत नाही असं दाखवायचं..आणि रात्री मला एकांतात ऐकवायचं, कोण कुणाशी काय बोललं ते!

बाळ - हा एकतर्फी व्यवहार आहे, माझं काय??

माणूस - तुला मी संध्याकाळी फिरवून आणत जाईन

बाळ - चालेल, मलाही जरा जग बघायचंच आहे

माणूस - मग ठरलं तर?

बाळ - ठरलं! आता तुम्हाला एक बातमी सांगू का?

माणूस - काय?

बाळ - सांगू का सगळ्यांसमोर??

माणूस - नको नको, हं, आता मी तुझ्यापाशी कान आणलाय, कानात सांग कुजबुजत

बाळ - तुम्ही ... मागे एकदा... पंधरा वीस दिवस कुठे गेला होतात का??

माणूस - म्हणजे??

बाळ - एकटेच??

माणूस - त्याला बरेच दिवस झाले... दिल्लीला होतो कामानिमित्त... का??

बाळ - तेव्हाचाच आहे मी...

गुलमोहर: 

Rofl

बाळ - ज्या क्षेत्रातील काहीही माहिती नाही त्याच्यावरच व्याख्यान देणार्‍या देशातच तर जन्माला आलोय मी
>>>>>>> तुफान हसलो!!! मज्जा आली..

भ न्ना ट! तुफान जमलय, बेफिकीर. (शेवट... अं... तितकासा आवडला नाही. पण बाकीचं अफाट आहे)

डॉ - तुमचा मुलगा जन्माला आल्यावर त्यांना म्हणाला 'फार त्रास नाही ना झाला तुला'! त्यांनाही फिट आली निजल्या निजल्याच! >>>> ह. ह. पु. वा.
बाकीचे विनोदही भन्नाट झाले आहेत.
पण शेवट फारसा जमला नाही.

शेवटच्या पाच ओळी अनावश्यक वाटल्या.
उर्वरित लेख भन्नाट झाला आहे.
मजा आली. बरेच दिवसानंतर एवढं हसलो.

Lol Rofl

भयंकर हसलो मि...... मजा आलि ...
आज जवळ जवळ १ महिना झाला मायबोलिवर यायला जमल नाहि. पण आल्या आल्या जे वाचल ते एकदम सहि हित, Happy

शेवट वेगळा हवा होता.

बेफिजी
अफलातून लिहीलं आहे तुम्ही! Rofl
विनोदामागचे काही टोले तर फार उत्तम
<ज्या क्षेत्रातील काहीही माहिती नाही त्याच्यावरच व्याख्यान देणार्‍या देशातच तर जन्माला आलोय मी>

मस्त लिहिलेय.....

असा शेवट फक्त आणि फक्त बेफिकीर लिहू शकतात... Proud टिपिकल बेफी टच.

खर तर शेवटच आधी वाचायला हवा होता Wink

डॉ - जे झाले आहे ते भयंकर आहे
माणूस - नावही ठेवलं मुलाचं? भयंकर?
डॉ - नाही, ते एक विशेषण आहे. भयंकर प्रकार झालेला आहे.
माणूस - ही माझी आई, हे माझे वडील, आणि यांना हा मी झालो आहे. याहून काय भयंकर घडलंय आत?

भयंकर लिहिणं... भयंकर हसणं... दुसरं कुठलं तरी भयंकर आठवलं खरं...!

विनोदी एकांकिकेसाठी छान बाळ जन्माला घातलय ख्ररं !

शेवट अपेक्षे पेक्षा वेगळा असायला हवा होता.

अन हो आणखी एक ठळक मिष्टेक म्हणजे इतके बोलणारे ते बाळ मुलगी च असु शकते Lol या साध्या गोष्टीचा लेखका ला कसा काय विसर पडला बॉ? ( माबो वरील सर्व काका मला वाचवा आता )

Pages