तो हा विठ्ठल बरवा.. (जुन्या मायबोलीवर प्रकाशित)

Submitted by दाद on 24 June, 2011 - 02:04

हे आपलं माझं मत. आपण परदेशात स्था‌ईक होण्यासाठी आपला देश सोडतो ना, तेव्हा आपल्याबरोबर आपल्या संस्कृती-बिंस्कृतीचा एक तुकडा बरोबर घे‌ऊन येतो. तो फ़्रीज़ करतो आणि जपून ठेवतो.... फ़्रोझन अवस्थेत. मग प्रत्येक सुट्टीत गेलो की, किंवा जसं जमेल तसं, त्याला शोभतील असे किंवा बरेचदा विशोभित असे बरेच ’लेटेस्ट हॉट’ तुकडे आयात करतो.... आणि मग आपल्या सो कॉल्ड संस्कृतीची एक तुकड्या-तुकड्यांची गोधडी किंवा बर्‍या भाषेत दुल‌ई तयार होते. मग त्या फ़्रोझन ओरिजिनल तुकड्याला लावलेल्या हॉट तुकड्यांच्या दुल‌ईच्या उबेत बर्‍यापैकी "इन्क्युबेटेड" परदेशी आयुष्य जगतो.

इतकं तिरकं बोलायला मला नॉर्मली जमत नाही. ती खासियत सौची. पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार द्यायचा, वर आणखी तो ही आपल्या चांगल्यासाठीच आहे असं सांगितलं तर बाहेर पडणारी मुक्ताफळं... तिरकीच असतात. अशावेळी सरळ फक्त शिवीच ये‌ईल.

रविवारी दुपारी, एक वामकुक्षी सोडल्यास कोणताही कार्यक्रम नको असं कुणाही सरळ मनाच्या चाकरदार पुरुष माणसाला वाटेल.

दुपारचं तुडुंब जेवण झाल्यावर पडल्यासारखा दिसणारा तो विष्णू (देव म्हणून म्हणू नये पण मला तरी तो रविवार दुपारचं चार ठाव चापून, वर विडा खाल्ल्यासारखा तृप्त दिसतो), ती शेषाची थंड शैय्या, झाकपाक करून, सगळं आवरून, डिशवॉशरसुद्धा लावून, आल्यासारखी स्वस्थं, आणि महत्वाचं म्हणजे शांत दिसणारी लक्ष्मी, आपल्या मृदू हातांनी हळू हळू विष्णूचे पाय....
एक ते बेंबीतून आलेल्या कमळाचं सोडल्यास मलातरी हे सुखी संसाराचं रवीवार दुपारचं चित्र वाटतं. कुणालाही वाटेल, अजून काय हवं?

हवं! अजून एक हवं! बायको एक त्या कॅलेंडरमधल्या लक्ष्मी देवीसारखी हवी. दिसणं नाही म्हणत मी.

बायका नॉर्मली देवीसारख्या नसून अंगात देवी आल्यासारख्या का असतात?
रवीवारी, आधी ’सत्संग’ मग ’महाप्रसाद’ असला ’महा’अविचार फक्त लग्न झालेल्या बायकाच करू शकतात असं मला, माध्याला आणि विठ्याला वाटतं. होय.... मी लहानपणी माधव आणि विठ्ठल बर्व्यांबरोबर गोट्या खेळलोय, त्यांच्या चाळीच्या आवारात.

ह्या बर्व्यांच्यात ना... पौर्वात्य आणि पाश्चिमात्य- दोन्ही संस्कृतींच्या तुकड्यांची गोधडी आहे. ती, डबल सा‌ईडेड बेड कव्हर्स असतात ना, तसंच काहीसं. हळदीकुंकू, गर्ल्स ना‌ईट आ‌ऊट, गणपती, पांढरे बुधवार, श्रावणातले शुक्रवार, वा‌ईन टेस्टिंग, वैभवलक्ष्मी, पोकर ना‌ईट्स, सत्संग असे सगळे सगळे कार्यक्रम साजरे होतात.

धाकट्या जा‌ऊबा‌ईंकडे नावांचा घालता ये‌ईल तितका गोंधळ आहे. नवर्‍याचं विठ्ठल हे नाव बदलून व्हिक्टर केलय, म्हणायचं "विक्कीsss".
आडनाव बर्वे असं एकारांत कोकणस्थी नाकात न सांगता ’बssर्व्ह’ असं घसा सर्दीने दाटून आल्यासारखं सांगतात. आणि हो.... बर्वेबाई स्वत:ला प्रिटी म्हणवतात... चुकलं, ’म्हणवते’! त्यांना ’अहो’ म्हणणं गुन्हा आहे...जवळ जवळ ’क्रा‌ईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी’ पातळीचा. मुलांचं ज्ञानेश्वर बदलून डॅनी आणि सोपानचं सन्नी.

मग, साहजिकच मोठ्या बर्वेंकडे नावाचा जाज्वल्य अभिमान! एक मालावहिनी सोडल्यास बदलली नाहीयेत कुणाचीच नावं. माधव म्हणजे माध्या, मोठा निवृत्ती, धाकटी मुक्ता आणि स्वत: वैजयंतीमाला बर्वे. खरतर हे त्यांचं लग्नानंतर माधवने बदलून ठेवलेलं नाव. त्यांच्या आधीच्या ’लता’ पेक्षा बरच ’वास्तवा’शी (आताची वैजयंतीमाला आणि आताच्या बर्वेबाई) जवळचं आहे.
माध्याबरोबर आम्ही मित्र पिक्चरला गेलो की त्याला दम द्यायला लागायचा ’नट्यांची नावं घेतलीस तर याद राख’. मित्र झाला म्हणून वहिदा रेहमानला वैजयंतीमाला म्हटलं तर कोण ऐकून घे‌ईल?

दोन्ही घरात काहीना काही "कार्यक्रम" चालू असतात, त्याला ते "प्रसंग" असं म्हणतात. दोन्ही जावा जेवण चढा-ओढीने बनवतात.... त्या दोघी जवळ जवळ सगळंच चढा-ओढीनेच करतात. एक चढली तर दुसरी लगेच ओढते तिला, खाली. खरतर दोघी ’मिळून’ साधा वरण्-भाताचा कुकरही लावू शकणार नाहीत. पण चढा-ओढीत दोन वेगवेगळी गावजेवणं घालतील. त्यात मग आम्हीही दोन्ही "घरचे" या क्रायटेरियाखाली चढले आणि ओढले जातो.

आता हे आलेले महाराज. मोठ्याच्या, म्हणजे माधवच्या बर्‍यापैकी ओळखीचे. आलेत तर या म्हणावं, दोन्-चार भजनं म्हणा त्याच्या घरी, चार दिवस मालावहिनींच्या हातचं खा, जाडेजुडे व्हा आणि आपल्या आश्रमी परता.
पण नाही. ’मालावहिनींच्या हातचं खा...’ ह्यालाच एक तिरसट फाटा फुटतो- ’मग प्रितीच्या गोंडस हातांचं काय?’ हा फाटा!
माझं म्हणणं की बोलवा आपल्याही घरी, आणि पोट फुटेस्तोवर काय ते खा‌ऊ घाला. पण नाही. मग त्याचा होतो ’सत्संग’ नावाचा कार्यक्रम,... चुकलो ’प्रसंग’ आणि आमच्या रवीवार दुपारचा बट्ट्याबोळ.

घरचं कार्य म्हटल्यावर सहकुटुंब्-सहपरिवार वरात होती.... कुत्र्यासह मुलांनाही बोलावलं होतं. कुत्र्याचं ठीकय पण मुलांना न्यायचं म्हणजे वैताग. रस्ता माहीत असूनही ’आर वु‌ई दे‌अर येट?’ आणि ’आय ऍम बो‌अर्ड’ चा जितका जप गाडीत होतो ना, तेव्हढ्या जपात गुरूमंत्र देण्याची शक्ती लाभली असती दुसर्‍या-तिसर्‍याला.

भर उन्हाळ्यात झब्बा, शेरवानीचं सोंग सजवून निघालो. नानामहाराज नावाच्या न देखल्या-ऐकल्या आधुनिक संत महाराजांचा, सत्संग ठेवलाय धाकट्या बर्व्याकडे. कोणत्याही कार्यक्रमासाठी किमान कपड्यांचं बंधन मी समजू शकतो पण आमची ही म्हणजे कमाल करते. झब्बाच हवा, तो सुद्धा सिल्कचा, हिच्या पैठणीला मॅचिंग....

त्यातल्या त्यात भगवट रंगाला जवळपास म्हणून पिवळा ते लाल ह्या रेन्ज मध्ये वेगवेगळ्या शेड्समध्ये कपडे घालून आम्ही सत्संगाला निघालो. पैठणीतही विकीला... आमचा कुत्रा... मांडीवर घे‌ऊन हिने भूतदया दाखवली, कानातलं-गळ्यातलं आणि संपूर्ण भारतीय पोषाख घालून पोरांनी आमच्यावर अद्भूत-दया दाखवली. तिथे गेल्यावर शक्यतो मराठीत कसं बोला हे हीने मुलांना इंग्रजीत समजावून सांगितलं.
प्रवासाच्या इतक्या कमी वेळात मुलांच्यात सुधारण्यासारखं इतकच होतं म्हणा किंवा त्यांनी कानाला लावलेले आपापल्या आयपॉडच्या ई‌अर्-फोनचे बोळे हिला उशीरा का हो‌ईना पण कळले म्हणा... मग मोर्चा माझ्याकडे वळला. त्या अर्ध्या तासाच्या अध्यात्मिक गाडी-वाटेची माझी सहचारिणी न होता एकदम प्रमोशन घे‌ऊन गुरूपदी बसत, ’तिथे काय करू नका’चा पाढा हिने वाचला. त्यात, ’महाराजांना भलते-सलते प्रश्न विचारू नका’ हा उपदेश दर दोन उपदेशांच्या मध्ये आला. मला तिथेच संजीवन समाधी घ्याविशी वाटू लागली होती.

थोडक्यात काय तर, कसल्याही प्रकारचा आधि-भौतिक, भौतिक, अध्यात्मिक, आणि सामुहिक अचरटपणा सहन करण्याची ही नांदी आहे हे मी समजून चुकलो!
पोचलो एकदाचे. तिथे आमच्यासारखे भक्तीमार्ग ’चाखायला’ बरेच आलेले दिसत होते.

’अहोsss, बघितलंत का?’, हे आपल्याला बोलत नसून दुसर्‍या कुणातरी आदरार्थीला उद्देशून आहे असं विठ्ठलला वाटलं असावं. आज सत्संग असल्याने प्रिती आपल्याशी आदराने बोलणार आहे हे विसरला, बहुतेक.
’अहो, कुठे बघताय टाळभेकर्‍यासारखे?’ इती प्रीती.

हा... म्हणजे फक्त हाक आदरार्थीच होती बाकी सगळं आज्ञार्थी. खरतर तिला इतकं चांगलं मराठी बोलता येत नाही, तिचं सगळं शिक्षण इंग्रजीत झालय. पण आज अध्यात्माचा जोर जबरदस्त दिसतोय. नवर्‍याला झापण्यासाठी का हो‌ईना अस्खलीत मराठीत झाडू फिरत होता. हा झाडू आता किती टिकतोय ते बघायचं.

’मला वाटलच, आपल्याप्रमाणे अध्यात्माची वाट चोखणारे (चोखणारे? चोखाळणारे म्हणायचय बहुतेक) भरपूरच लोकजण आहेत आपल्या आजुला बाजुला.’, प्रिती हातात, रामपुरी किंवा खाटकाचा म्हणतात तसल्या स्टा‌ईलचा सुरा घे‌ऊन हलवीत मराठीत बोलत होती.

आम्हीच काय पण विठ्ठलही कावलेला दिसत होता ह्या वाट ’चोखण्याने’. कुणा पुंडलिकाने हाक्-बिक मारली तर तेव्हढीच सुटका, म्हणून बघत होता बिचारा, आजूला आणि बाजूलाही.

’अहो, महाराजांना आसन मांडलत का?’, प्रीतीने, जरा कुठे आसनस्थ हो‌ऊ बघणार्‍या विठ्ठलला, सुराधारी कर कटेवरी ठेवून विचारलं. त्याला उत्तर द्यावच लागलं नाही, बिचार्‍याचा चेहराच सांगत होता.

’एक काम धड म्हणून करू नका. काल चक्का मशीनला लावायला सांगितला तर वॉशिंग मशीनला लावलात.’, प्रिती.

चक्का चक्क धुवायला? मला माधवच्या बावळट डोळ्यात वेडेपणाची झाक दिसायला लागली.
’आपण ड्रायर वेगळा लावून घेतलाय ना? ते डोकं कुणी चालवायचं? परत मला आंघोळ करून सोवळ्यात, तो ड्रायरला लावायला लागला’, परत प्रिती.

इतकं कडक सोवळं? आता मी वाकून तसलाच वेडेपणा प्रीतीच्या डोळ्यात चेक करण्याआधीच आमच्या बायकोनं मध्ये तोंड घातलं, ’पाणी निघतं का गं सगळं? किती वेळ लागतो? कोणत्या सेट्टिंगला ठेवतेस?’

आ‌ईशप्पथ, या बायका घा‌ऊक चक्का असा करतात? आमच्याघरी ही अजून मला चौरंगावर बसवते. म्हणजे.. चक्क्यातलं पाणी पूर्ण काढून टाकण्यासाठी आधी त्यावर यल्लो पेजेस, मग त्यावर डायनिंग टेबलचा एक खूर, मग डायनिंगटेबलच्या त्या सा‌ईडवर हिच्या साड्यांची बॅग आणि शेवटी डायनिंग टेबल बाजूला करून, त्यावर चौरंग उलटा ठे‌ऊन त्यावर (पुजा असली तर आंघोळ करून) मी! (वजनातही ही माझ्या पुढेच आहे पण एका जागी टीव्हीचा रिमोट घे‌ऊन का असेना पण तीन्-चार तास रिकामटेकडा बसू शकणारा मीच आहे हे हिचं जाहीर मत. उलट्या चौरंगात ही मावत नाही हे माझं खाजगी मत.)

छ्छॅ! आजपासून श्रीखंड सोडलं!!! बाहेर खायचं साफ सोडलं!!! माझ्या शेवटच्या श्रीखंडाची आठवण ये‌ऊन मी गहिवरण्यापेक्षा मला उमळून ये‌ऊ लागलं. लोखंड्यांकडच्या जुळ्यांच्या पहिल्या वाढदिवसाला केलेलं पिवळंधम्मक श्रीखंड..... मला वॉशिंगमशीनमधून काढून वाळत घातलेली दुपटी दिसायला लागली.

चक्क्याच्या चक्रात दोघी शिरण्या‌आधी त्यांना बाहेर काढत विठ्ठल म्हणाला, ’आसन ना? आपली डायनिंग टेबलाची खुर्ची ठे‌ऊया का? पाठीला बरी... ताठ बसायला!’
विठ्ठल ना, मित्र म्हणून नाही म्हणत, पण एकदम सरळ माणूस आहे. बायकोसाठी हा केस कुरळे करून घेतो पण त्याखालचा विठ्ठल मात्रं सरळसोट!

’यू वोंट चेन्ज विक्की’, (टिकला नाही मराठीचा झाडू फार वेळ, गेला... गेला टोपलीत!)
’व्हॉssss ट रे? डायनिंग टेबलची चे‌अर म्हणे sss .... डिडंट वी डिसा‌ईड टू ऑनर हिम विथ अवर मसाज चे‌अर? डिडंट वी? हं?’, प्रिती कसलाही आग्रह अगदी दुराग्रह करीत असली तरी समोरच्याला नाही म्हणता येत नाही.

’काय? मसाज चे‌अर?’, मी तिचा... मसाज चे‌अरचा हिसका बघितला होता मागे एकदा. एक दुखणारी पाठ बरी करायला घे‌ऊन जा‌ऊन येताना संपूर्ण दु:खी अंग.... अंगदुखी घे‌ऊन आलो होतो.

’यू डोन्ट नो हा‌ऊ टू यूज इट. आय विल पर्सनली सेट द ऍंगल सेटिंग ऑन सॉssssफ़्ट बॅक मसाज, मगतर ओकेsss की नाही?
आता, पोरांना, वर जा‌ऊंदे सन्नीच्या रूममध्ये.
ए, डोन्ट डिस्टर्ब डॅन्नी हं! ही इज प्रॅक्टिसिन्ग हीज स्पीच. ही इज द मास्टर ऑफ़ सेरेमोनी, टूडे. मी खुद्द लिहून दिलय स्पीच, मराठीत.’

आईशप्पथ... प्रीतीने मराठीत स्पीच लिहून देणं म्हणजे धर्मेन्द्रने भरतनाट्यम किंवा कथ्थकचा क्लास उघडण्यासारखं आहे.
’गोंधळाच आहे तो जरासा. (वेन्धळा म्हणायचय का हिला?).
त, थ, द, ध, न आणि ट, ठ, ड, ढ, न मध्ये गडबड घालतो. पण हल्ली त्याचा मराठीचा पापडम झालाय. मी सवय करून घेते ना! हो किन‌ई रे विक्की?’

आमच्या सौच्या फाजिल लाडाने विकी, आमचा कुत्रा कुणी कुणाशीही जरा लाडाने बोललं की लाडात येतो. इथे तर साक्षात समस्त लाडिकांची देवी स्वत: नावाने....
आमच्या विकी ने गैरसमजाने शेपटी हलवली. विठ्ठल प्रितीच्या असल्या प्रश्नांना हल्ली ’पच्यक पच्यक’ असा आवाज काढतो, ’नरो वा कुंजरो’ चा आधुनिक शॉर्टफ़ॉर्म! आमच्या विकीला तो ’चुक चुक’ करतोय वाटून तो त्याच्या अंगावर उड्या मारत सुटला.

’सन्नी sssss , विकीला बॅकयार्डमध्ये ने, आत्ताच्या आत्ता’, प्रितीने पाचव्या मजल्याला जा‌ईल असला आवाज आतल्याच खोलीतल्या आपल्या सुपुत्रासाठी लावला.

आपली आ‌ई काहीही बोलू शकते यावर प्रगाढ विश्वास असलेला सन्नी वरूनच ओरडला ’त्यांना तूच जायला सांग.’

कुत्र्याला अहो-जाहो? अहो अध्यात्म शास्त्र नियमम... वगैरे संस्कृतमध्ये विचार माझ्या डोक्यातून तोंडात येण्यापूर्वी गोंधळ कळला. हं हं, ’विक्की बर्व’ व्हर्सेस ’चार पायांचा विकी’!

’चला कामाला लागा, नाहीतर बसाल बोलत इथेच. तू चल गं माझ्या बरोबर’ असं म्हणून हातातला सुरा तलवारीसारखा नाचवीत प्रिती निघालीही. तिच्यामागी आमची ही.

कितीही झालं तरी बायकोच आपली... तिच्या मागोमाग निघालेल्या हिच्याकडे मी दयार्द्र नजरेने बघितलं. हिनं फक्त ’बें बें’ ओरडायचं बाकी ठेवलं होतं. मागे एकदा भारतात, कुत्रा चावल्यावर घेतात त्यातलं पहिलं इंजेक्शन घ्यायला जाताना मी सोबत गेलो होतो आणि बाहेरूनच तिला धीर देत आत सोडताना असंच बघितलं होतं..... त्यानंतर आज.

त्यांच्या सत्संगाच्या "दालना"कडे गेलो आणि थक्क झालो, कारण ही खोली परवा, शुक्रवार संध्याकाळी तरी इथे नव्हती. त्या दरवाजातून आलो की वेगळ्याच खोलीत यायला होतं नेहमी- इथे आमची फ़्रायडे पोकर ना‌ईट होते.

माझ्या ह्या असल्या शंका मी मोठ्ठ्याने बोलून दाखवत नाही हे बरय. कारण त्या बर्‍याचदा मूर्खपणाच्या असतात. जरा नीट बघितल्यावर लक्षात आलं की, कॉर्नरचा बार झाकला गेला होता, मोठ्ठ्या पांढर्‍या प्रोजेक्टरच्या पडद्याने. मागच्या बारमधल्या बाटल्या खाली डंजनमध्ये गेल्या असणार. भिंतीवरची नेहमीची मॉडर्न आर्ट मधली बायकांची दोन पेंटिंग्ज जा‌ऊन तिथे दोन दाढीवाल्या पुरुषांची चित्रं आली होती आणि त्यांना हार घातले होते.
मग? बरोबर आहे... नो डा‌उट, आय वॉज लॉस्ट!

वेगवेगळ्या कोपर्‍यात वेगवेगळ्या वासाच्या उदबत्त्या लावल्याने कुठेही नाक केलं तरी घुसमटच होती. शिवाय वातावरण निर्मिती साठी सीडी स्टॅकरवर पाच्-सात सीडीज रॅन्डम मोडवर लावल्या होत्या. त्यामुळे गणपतीच्या आरत्या, अष्टविनायकाची गाणी यांची भेळ चालू होती. त्यात मधे मधे कलोनियल कझिन्स मधलं ’वक्रतुंड महाकाय’ ने सुरू होणारं भलतच काहीतरी गाणं, ’री-मिक्स ऑफ नॉनस्टॉप गणपतीची गाणी’ असले खडेही लागत होते कानाला.

माणसं दाटीवाटीने बसली होती. कधी नव्हे ती जनाना-मर्दाना विभागणी झाली होती. समोर भगवी चादर पांघरून मसाज चे‌अर ठेवली होती. त्याच्या समोर एक स्वत्:हून डुगडुगणारा मा‌ईक होता.

मध्येच एकदा आमचा सुपुत्रं चंकी ये‌ऊन कानात विचारून गेला, ’डॅड, ज्ञानेश्वर स्कूलमध्ये गेले होते का नाय’.

ह्यालासुद्धा अध्यात्मं लागलं गाडीसारखं बहुतेक. डॅनीला ’अहो ज्ञानेश्वर’?
’डॅनी सेज की.... त्यांना वाळत टाकलं होतं? म्हणजे डिस्कार्डेड बाय कम्युनिटी सारखं?’

बापरे हा संत ज्ञानेश्वरांबद्दल.... कधी नव्हे ते मी ओरडलो, ’काय बोलतोयस ज्ञानेश्वरांना? थोतरीन... अरे त्यांनी ज्ञानाने इश्वर जाणला होता... त्यांना तुमच्या स्कूलिंगची गरजच...’
तोपर्यंत व्हेरिफाय करायला मागे ये‌ऊन उभ्या राहिलेल्या सन्नीकडे वळून तो म्हणाला, ’यू आर रा‌ईट, नो फॉर्मल स्कूलिंग....’
हताश हो‌ऊन मी सांगितलं ’पण त्यांना होम स्कूलिंग होतं त्यांच्या वडिलांकडून आणि मोठ्या भावाकडून’.

मग जागा मिळणार नाही असं म्हणत माधवने मला स्वहस्ते पुढल्या रांगेत बसवून दिलं. म्हणजे मी महाराजांच्या नाकाखालीच आलो. त्यांच्या बोलण्यापासून शिंकेपर्यंत काहीही मला झेलण्यावाचून पर्यायच नव्हता, डायरेक्ट ला‌ईन ऑफ ऍटॅकमध्येच होतो मी. पण मग मसाज आसन आणि आम्ही यांच्यात सोडलेल्या दीड फुटात पोरं बसवणार आहेत म्हटल्यावर जरा बरं वाटलं... म्हणजे काहीतरी ला‌ईन ऑफ कंट्रोल आहे तर, मध्ये.

मागे बसलेल्या सामंतांनी पाठीवर थाप मारली. त्यांना एक अंगचटीला आल्याशिवाय बोलताच येत नाही. ’काय आज इकडे कुणीकडे? सत्संग वाटतं?’

मग हे काय मासे घ्यायला आलेत की काय? मी आपलं उगीच होय होय नाही नाही सारखी निरर्थक मान हलवली.
’पहिलीच वेळ दिसतेय’, सामंतांना माझ्या चेहर्‍यावर पहिलटकरणीच्या वेदना दिसल्या की काय?
’आमची दुसरी. म्हणजे तिसरीच म्हणायला हवी. माधवाच्यात गेलो होतो ना महाप्रसादाला... आपलं भजनाला.... गेल्याच आठवड्यात दोनदा. काय सांगू तुमका....’ सामंत रंगात आले की मालवणीत बोलतात, ’म्हाराजांचो आवाज कसलो लागता म्हणतास! त्यांचा फुड्यात आमच्या नारायणाच्या द्येवळाचो गुरवाचो आवाज म्हणजे आमच्या भिमसेनाच्या पुढ्यात तुमचो हिमेश रेशमिया! हॅ हॅ हॅ! द्द्या टाळी द्या, पैली’
मला कोपराने ढोसकत त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला. मला वळायलाही जागा नाही असं पाहून माझ्या बगलेतून घुसवून त्यांनी हात पुढे केलाही. आता टाळी देण्यावाचून गत्यंतर नव्हतं. नाहीतर मी तीन हातांचा दिसत होतो समोरून (त्यातला एकच केसाळ).

तेवढ्यात मागून आलेल्या हाकेने समस्त मराठी शहारली. माझं रानडे हे आडनाव मधल्या ’न’चा अर्धवट उच्चार करीत इतकं वा‌ईट फक्त बेडक्याच घेतो. बेडकीह‌ळ्ळिकरला मराठी सत्संगाला बोलावणं म्हणजे रामन्-राघवनला ’वैष्णव जन तो’ चा अर्थ सांगण्यासारखं होतं. हा पठ्ठ्या भगव्या रंगाचं काहीही घालायला नसल्याने प्लॅन्टमध्ये फ़्लो‌अरवर घालतो ते केशरी फ्लुरोसंट जॅकेट घालून आला होता. आणि त्या कोपर्‍यातल्या अंधार्‍या जागेतही चमकत होता.
अध्यात्माच्या ओव्हरफ़्लोपासून दूर म्हणून बेडक्याच्या बाजूला बसलो. आता समोर नसली तर बाजूला तरी करमणूक होती.

मध्येच माधवने मा‌ईकमधून स्पीकर वाजवला. त्याने मा‌ईकमध्ये "टेस्टिन्ग वन टू थ्री, चेक चेक" म्हटलं. स्पीकरमधून नुसतीच कोल्हेकु‌ई ऐकू आली. एका पोराने ’मेट’ म्हटल्याचं मलाही मागे ऐकू आलं.

’अहो, तुम्ही वाजवून बघा ना एकदा. आपली परिक्षा आपण घ्यावी’, माधवचं टेस्टिन्ग ऐकून प्रीतीने विक्कीलाही टेस्टिन्ग करायला लावलं. तिच्या मराठीतल्या आदरार्थी आग्रहाच्या ओघात वहावत विठ्ठलने मा‌ईक जवळ जवळ तोंडात घालत "परिक्षा एक दोन तीन" म्हटलं.
स्पीकरला काहीच फरक पडला नसावा. माधव काय, विठ्ठल काय किंवा इंग्रजी काय आणि मराठी काय!
कारण कान फुटेपर्यंत परत कोल्हेकु‌ईच ऐकू आली.

अजून किती भोगायचंय कुणास ठा‌ऊक, प्रसादाच्या आधी!

'नमस्ते!’
झब्बा, शेरवानी आणि मुक्ताच्या एका भगवट रंगाची ओढणी दुपट्टा म्हणून घेतलेला डॅनी छान दिसत होता. बाजूला त्याचा प्राणप्रिय मित्र गंजा प्रोजेक्टरच्या पडद्याला मॉरल सपोर्ट द्यायला उभा असल्यासारखा दिसला.
ह्याचं नाव गंगानाथ काकोली, म्हणायचं ’गंजा’. अगदी कॅलेन्डरवरल्या शंकरा‌इतका नाही पण एखाद्या बालसरदारजी इतका बुचडा टाळूवर बांधता येण्या‌इतपत विपुल केशसंभार बाळगून आणि शरीराला किमान पाचतरी दृश्य ठिकाणी भोकं पाडून त्यात ’बाळ्या’ घातलेल्या ह्या बाळाला समस्त पोरं गंजा म्हणतात, म्हणून आम्हीही.

काही देवादिकांची चित्रं-बित्रं असलेला, भगव्या रंगाचा, विटलेला टीशर्ट, कधीतरी भगव्या रंगाची असावी अशी पुसटशी शंका ये‌ऊ शकणारी, टांगेवाल्याच्या लेंग्यासारखी पॅन्ट, आमच्या गावी बैलांच्या गळ्यात घालतात तसली माळ. सोंग सजण्यात काही कमी नाही, तेही मल्टी परपज सोंग. शर्टाची सगळी बटणं लावलेली आहेत तोपर्यंत सत्संगात, नाहीतर रॉक बॅन्डमध्ये! काय एकेक ध्यानं.....

डॅनीने सुरूवात केली. त्याच्यावेळी कोल्हेकु‌ई ऐकू आली नाही कारण शर्टाची सगळी बटणं लावून गंजा ऍम्प्लिफ़ायरची ची बटणं पिळायला तय्यार होता.
’नमस्ते!
मी आजच्या सट्संगाच्या प्रसंगाचा मास्तंग.... आय मीन, मास्तर आहे.

सगळ्यात प्रथम आपण हरी भटकं प्रायण परन्पूज्य श्री ह.भ.प.पॅ.पू. नाव... पॅ.पू.... डॅ sss ड... डॅ sss ड’

इथे विठ्ठल गडबडीने नाव सांगायला त्याच्या खांद्याला लागला. वास्तविक त्याला त्याच्या कानाला लागायचं होतं. पण कायै की, बॅले डॅन्सरसारखा विठ्या पूर्णपणे पायाच्या बोटांवर उभा राहिला तरी डॅनीच्या खाद्याच्या वर काही पोचू शकत नाहीत, क्यायच्या क्याय वाढलाय डॅनी. आणि डॅनीचं कायै, तो प्रसंगी मोडेल पण वाकणार नाही.

इतक्यात दोन ना sss जुक जपानी पंख्यांनी वारा घालीत रूपगर्विणींसारख्या दोन्ही बर्विणी, आसना मागच्या दारातून खोलीत आल्या. प्रीतीचं एक ठीकय पण मालाबा‌ईंच्या मागची वस्तू त्यांना वळसा घालूनच बघावी लागत्ये. त्यामुळे त्या एकमेकींनाच वारा घालत आल्या की काय असं वाटून त्यांना ओळखणार्‍या त्या खोलीतल्या सगळ्यांना कांदा लावून वर आणि वारा घालायची पाळी आली....

अजून बॅलेच्या पोज मध्येच पण विसरून आता डॅनीला टेकून उभ्या विठ्ठलने गडबडीने मालाबा‌ईंच्या वाटेतून डॅनीलाच बाजूला करायचा प्रयत्न केला. त्याचे स्वत:चे पाय अजून संपूर्णपणे जमिनीला लागले नव्हते आणि हे तो विसरला होता. आधार गेल्यामुळे तो धडपडला. बॅलेचा क्षणार्धात ’बाल्या’!

या सगळ्यातून जमेल तितक्या हसर्‍या, उत्फुल्ल चेहर्‍याने संत नानामहाराज प्रविष्ट झाले.

डॅनीने पुढे सुरू केल, ’आपण हरी भटकं (परत भटके? मला उगीच भटक्या आणि विमुक्त जाती वगैरे काहीतरीच आठवायला लागलं) परायण पर मपूज्य श्री ह.भ.फ.फ.फू. (विठ्ठलने स्पष्ट बोलण्याची आठवण केल्याने अगदीच सफष्ट झालं हे) खंत नानामहाराज (मराठीत अक्षर वा‌ईट्ट असल्यास संतचं खंत हो‌ऊ शकत.... माझं होतं)

’सन्त... सन्त...सन्त’, जवळ जवळ प्रत्येकाने प्रॉम्प्ट केलं त्याला.

’संत नानामहाराज, हरि... हरिच्च... हरिच्च्या... हरिशच्या..... हरीश... चंद्रं... गड... कर (हुश्श! डॅनीने त्यांच्या नावातलं खगोल, भूगोल इत्यादी वेगवेगळं करून सांगितलं) महाराज, AKA नानामहाराज यांचं भरपूर स्वागत (भरघोस स्वागत) करूया.’

नानामहाराज डॅनी ने घेतलेल्या आपल्या नावाच्या प्रत्येक हरीला अडखळले... पैकी एकदा प्रोजेक्टरच्या स्टॅन्डला, एकदा मसाज आसनाच्या वायरला आणि एकदा समोर ठेवलेल्या मा‌ईकच्या डुगडुगीला आळा म्हणून ठेवलेल्या यलो पेजेसला! तरीही तोच उत्फुल्ल, हसरा वगैरे चेहरा आहेच. हर्ष-खेदाच्या पलिकडे पोचलेल्यापैकी एकतरी- रि‌अला‌ईझ्ड सोल म्हणतात ना, त्या जातीचे.

आसनस्थ हो‌ऊन त्यांनी दोन्ही हात जोडले. काहींनी हात जोडले आणि नवशिक्यांनी टाळ्या वाजवल्या. आम्ही अर्थातच टाळ्या.
हशा (जवळ जवळ) प्रत्येक वयाने मोठ्या माणसाने आवरला.

वाढलेल्या दाढीमुळे नाही, पण त्या मसाजचे‌अरच्या आकारामुळे आणि प्रितीने पर्सनली लावलेल्या आरामशीर ऍंगल मुळे तो सेटप केशकर्तनालयाचा जास्तं वाटत होता.

हातातले कागद सावरत डॅनीने पुढे सुरूवात केली.
’नानामहाराजांच्या आडनावाच्या घराण्याचा आणि आमच्या बरवे घराण्याचा सम्बंध फार जुना शटका, शटका पुरणाचा आहे.

त्यांचे वडील माझ्या पप्पू आजोबांच्या (विठ्ठल-माध्या, वडिलांना बाबा म्हणायचे. नातवंड पप्पू?), परमपूज्य (हं हं) अजोबांच्या (डॅनी मराठी बोलतोय या कौतुकात आम्ही सगळे त्याच्या शब्दांना, पोळीला लोणच्याचा खार लावतात तसा अर्थ लावून लावून ऐकत होतो. शिवाय खोलीतल्या सगळ्यांनाच बर्वे घराण्याचा इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्रही माहीत होतं.) चाळीत भाढे.. बा... ढेकरू म्हणून रहात होते. आता, ती चाळ पाडून बांधलेल्या बिल्डिंगच्या तिसर्‍या मजल्यावर महाराजांचा आश्रम आहे!’
तो थांबला म्हणून आम्ही टाळ्या वाजवल्या.

’गेल्याच महिन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाच्या यात्रेत, सिडनीच्या एकटा मानसाने... ए क ता मंचाने, पडवी इनाम म्हणून दिली आहे.’

मी अवाक. पूर्वी गावं इनाम देत असत आता जागेच्या टंचा‌ई मुळे पडवी इनाम देत असावेत.... असा विचार करेपर्यंत लख्ख प्रकाश पडला. पडवी नाही, ’संत’ ही ’पदवी’ म्हणायचय त्याला. माझ्यासारखे असे किती प्रकाशित चेहरे आहेत ते बघण्यासाठी मी मान १८० अंशात फिरवली. जरा कुठे स्थिर होत्ये म्हटलं तर जनान्यातून बायकोने डोळे वटारलेच. ’किती थिरथिरेपणा कराल? समोर बघा. तरी येताना बजावलं होतं हज्जारवेळा...’ एव्हढं सगळं कळलं मला त्या एका नजरेतून.

’त्याबद्दल आपण त्यांचे वादन करूया..... अभि.... वादन..... नंदन करूया.’

प्रितीने कितीही चपळा‌ईने हार उचलला तरी कुठुनही गेली तरी मालावहिनी वाटेतच होत्या त्यामुळे तिचा ना‌ईलाज झाला. मग दोघी मिळून तो प्रितीने घरी केलेला हार महाराजांच्या गळ्यात घालायचा प्रयत्नं करू लागल्या. तिथे सत्संग कसला, चांगला ’हातघा‌ईचा’ प्रसंग होत होता. हार मुगुटाच्या मापाचा होता!

’तरी मी सांगत होत्ये की मी हार करून आणत्ये, पण नाही.’, मालावहिनी.
’तुम्हीच ना माप पाठवलंत? एकतीसाचं? मुद्दाम चुकीचं माप सांगितलं तर...’, प्रिती.
’असू दे, असू दे’, महाराज.
’असूदे काय?’, मालावहिनी महाराजांना दामटून हार त्यांच्या उजव्या कानामागून काढण्याच्या प्रयत्नात, ’एक मेलं साधं एकतीस इंचाच्या दोर्‍यात फुलं ओवता येत नाहीत तर घरात सत्संग ठेवायचा कशाला म्हणते मी?’

’इंच कधी म्हणालात?’ प्रितीने आता डावा कान धरलाय, महाराजांचा. बायका जाड हातात बारकी बांगडी चढवतात ना, तस्सा प्रकार चालला होता.

’असू दे, हो, खरच असू दे’, महाराज इंचा इंचाने आसनात रुतत, क्षीण आवाजात. माणसाला असे बाहेर आलेले दोन कान कशाला? असं मला उगीचच वाटून गेलं, त्यांनाही वाटलं असणारच कारण एका कानातून हार मागे गेला होता, उरलेल्या कानाचाच काय तो प्रश्न!

’इंच नाहीत तर काय फूट?’, मालावहिनी दात्-ओठ खात्- शेंडी तुटो वा पारंबी! इथे हार तुटो किंवा खुद्द महाराजांचा एक तरी कान.
मालावहिनींचा जोर तो... हाराने हार मानली आणि मागच्या गाठीकडे तुटला आणि एक पन्नासतरी ’हुश्श’ ऐकू आले.

'थॅन्क यू बोथ, मिसेस बर्व्ह्स, दॅट वॉज ऍन ऑस्सम एफ़र्ट... एव्हरीबडी गिव्ह देम अ बिग राउंड ऑफ़ अप्लॉज!! '... डॅनी बहकत नाही तो पर्यंतच ठीकय.

’तर आज महाराज आपल्याला काही देवाची गाणी म्हणून दाखवतील.’

या वाक्याबरोबर गंजा उभा होता तिथून पडद्याच्या मागे अदृश्य झाला आणि प्रोजेक्टरच्या जवळच्या लॅपटॉपजवळ प्रविष्ट झाला आणि हेडफोन कानाला लावून उभा राहिला. ह्या डीज्जेच्या स्टा‌ईलमध्ये त्याने डॅनीला कू sss ल चा अंगठा दाखवला.
’आणि त्या गाण्यांचं निरूसुद्धा करतील....’ निरूसुद्धा? देवाच्या गाण्यांचं निरूसुद्धा? ही ’निरू’ कोण?... हा हा ’निरूपण’! अरे देवा... अशक्य!

जय हिंद जय महाराष्ट्र!’ भगव्याचा परिणाम, बहुतेक

असं म्हणून त्याने शेकहॅन्डसाठी महाराजंसमोर हात धरला. त्यांनी नमस्कार केलेले हात सोडून शेकहन्डसाठी हात पुढे केला... पण तो पर्यंत डॅनीची ट्यूब थोडी पेटून त्याने हात जोडले. महाराजांना त्या हाताचं काय करावं ते कळेना. त्यांच्या खांद्यावर थोपटून ’इट्स ओके इट्स ओके’ असं म्हणत त्यांना अजून ओशाळं करीत समोरच मांडी घालून बसलेल्या माझ्या लेकाशेजारी ये‌ऊन बसला.
’कूल मॅन! दॅट वॉज ऑसम मॅन!’, इती आमचा चंकी.

’आज आपण इथे सत्संगासाठी जमलो आहोत.’
हे सुद्धा सत्संगासाठीच? मग अजून कोण यायचं बाकी आहे? माझा मनातल्या मनात एक वात्रट प्रश्न.
’मी कुणी फार मोठा माणूस नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य सिद्धयोगी युगपुरुषाला इथे आमंत्रित करून तुम्ही स्वत:ला धन्य केलं आहे, फार फार पूण्य जोडलं आहे.’

’तुमच्या बुद्धीला पेलेल अशा भाषेत आणि अतिशय थोडक्यात अध्यात्मा बद्दल सांगायचं झालं तर...." असं म्हणून त्यांनी डोळे मिटले...
’नैनं छिंदंती शस्त्राणी... असं भगवंतानीच म्हटलं आहे.
कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषू कदाचित.... तुम्ही बहुश्रुत आहात, अन हा श्लोक भगवंत स्वत: बोललेत. हे कुणा नानामहाराजाचे वक्तव्य नाही. .....
कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषू कदाचित....
रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांना कदाचित फळ आलीच तर ती कर्मयोगा..."

पुढचं मी काहीही ऐकायचं नाही, मनावर घ्यायचं नाही असं ठरवलं. म्हणजे या कानात जा‌ऊन त्या कानातून बाहेरही नाही. ज्या कानात जातंय, त्याच कानातून उलट बाहेर. मधल्या साताठ इंचात डोक्याला त्रास किंवा बिघाड होण्याची मोठ्ठी शक्यता होती. माझं कायै की, एकदा मी एखाद्या गोष्टीतून डोकं काढून घेतलं की बिनडोकपणाचे सगळे व्यवहार मी बर्‍यापैकी समरसून एन्जॉय करू शकतो... सुखी संसाराची हीच तर गुरुकिल्ली!!

श्रोते तल्लीन हो‌ऊन ऐकत होते. माझ्यासारखे डोकं बाजूला काढून ठेवलेले आता आजूबाजूला बघत होते. नानामहाराज नाना तर्‍हांनी नाही नाही ते समजावून सांगत होते.
".....थोडक्यात सांगायचं झालं तर हे सगळं माया आहे, खोटं आहे, एक दु:स्वप्नं आहे असं धरून चाला. तुमचं आयुष्य सुखी हो‌ईल....’

’अगदी खरं हो, अगदी खरं! काय वाणी, काय ओघ! वा वा!’, इती माझ्या बाजूचे कुलकर्णी. त्यांना महाराज दिसत नसल्याने ते माझ्या उजव्या ढोपरावर आपली डावी मांडी ठेवून बसलेत. भजन्-बिजन काहीही सांगितिक चालू नसताना उगीच मांडीचा ताल चालू आहे.
गेले साडेचार महिने ते वेगवेगळ्या महाराजांची प्रवचनं ऐकतायत. त्यांच्याच भाषेत संगायचं झालं तर, ’अध्यात्माच्या पथावर त्यांची झपाट्याने प्रगती चालू’ होती.

’.... हे सगळं माया आहे, खोटं आहे, एक दु:स्वप्नं आहे असं धरून चाला. तुमचं आयुष्य सुखी हो‌ईल.....’ नानामहाराजांचं हे मात्रं मलाही अगदी व्यवस्थित पटलं.

'बोला, पंढरीनाथ महाराजकी...’, महाराजांनी उदेकार केला.

’जै’. समोरची पोरं बेंबीच्या देठापासून ओरडली. इतकावेळ गप्प बसून इथल्या शाळेच्या वर्गातही ऐकून घेत नाहीत ती. उरलेल्या प्रवचनातला संभाव्य धोका लक्षात ये‌ऊन त्यांनी आपला मोर्चा आता पोरांकडे वळवला.

’बाळ, तुझं नाव काय?’ त्यांच्या स्वरातला म‌ऊपणा ऐकून आमची मुलं रडणार बहुतेक असं मला उगीच वाटायला लागलं.

’पांडू’, ही काथवट्यांची जुळी पोरं ना, अशक्य आहेत. मला एकदा आपली नावं त्यांनी ’बिक्रम और बेताळ’ सांगितली होती. त्यांच्या वाट्याला शहाण्याने जा‌ऊ नये.

’अरे, छान व्यवस्थीत ’पांडूरंग’ असं सांगावं बरं?’. दोन्ही जुळ्यांनी मान हलवली. मला त्यातला जास्त वाह्यात कोण ते ओळखता येत नाही अजून.

’आणि तुझं काय बरं?’, महाराज.
’बंडूरंग’! महाराज खुर्चीतून पडणारच होते. आम्ही खालीच बसलो होतो म्हणून ठीकय, अगदीच वाह्यात पोरं! शितावरून भाताची परिक्षा- कसलं काय, पहिल्याच घासाला असले दोन टणटणीत खडे लागल्यावर महाराजांनी पोरांचा पुढचा घास घेतला नाही.

’हं तर चला आपण देवाची गाणी म्हणूया आता. त्यांना अभंग म्हणायचं. हे अभंग म्हणजे नुसता शब्दांचा कीस नाही बरं, आपल्या संतांनी प्रसंगी प्राणार्पण केलय आपल्या एकेका अभंगासाठी", महाराज.
’हं?’ , मी मनात.
’च्यक च्यक’, फक्त ’प्राणार्पण’ इतकच व्यवस्थीत ऐकलेले कुलकर्णी.
’पाप हो! येक येक गाण्यापायी जीव जातो म्हटलं तर... कठीण की वो इतकी गाणी लिवायची म्हंजे जीव जा‌ऊन जा‌ऊन हैराण होणार म्हणतो मी.’, फ्लुरोसंट चमचमणारा बेडक्या.

"हे अभंग म्हणण्याचीही आपल्यापैकी अनेकांची पात्रताही नाही. काय शब्द, काय अर्थ... वा वा. नुसते मधासारखे शब्द, अन, त्याहूनही गोड म्हणजे... म्हणजे आपल्या... हं, काकवीसारखा अर्थ", महाराज.

समोरच्या देसा‌ईंनी जोरजोरात मान हलवली. त्यांना बरोब्बर कळला- मध, काकवी. त्यांना गोड प्रचंड आवडतं आणि डायाबिटीस झालाय.

"प्रत्येक अभंग एकदा म्हणून दाखवतो मग सगळ्यांनी चालीत म्हणायचय. तुमच्यासाठी आजच्या अभंगांची कॅरि‌ओकेची सीडी लावेल गांजा (गंजा.... गांजा नव्हे हो). जुन्या पुराण्या चाली टाकून दे‌ऊन नव्या चाली लावल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत अशा, आधुनिक."
असं म्हणून त्यांनी हात जोडले आणि डोळे मिटले. अतिशय संथ, अन दीर्घ पण सगळ्यांना ऐकू ये‌ईल असा श्वासोच्श्वास चालू केला.

’काय तेज अहाहा पहा.... अहो आभा पहा जरा मागे, वलया मागून वलयं.... वलया मागून वलयं.... च्च च्च! ही तपस्या. बरं!’, कुळकर्ण्यांचा चष्मा नेमका नको तिथे असतो, किंवा हवा तिथे नसतो. मगासपासून कपाळावर चष्मा ठेवून दिसत नाहिये म्हणणारे ’निस्सिम’ हो‌ऊ घातलेले हे सत्संगी.

ती आभा नसून गंजाने प्रोजेक्टरच्या पडद्यावर प्रोजेक्शन सुरू केलं होतं आणि ती वलयं तपस्ये-बिपस्येची नसून त्याच्या लॅप्टॉपचा स्क्रीन सेव्हर होता. हे सगळं सांगून अध्यात्माचा पथ झपाट्याने तोडणार्‍या त्या भक्ताला जागं करावं असं मला वाटलं नाही. नाहीतरी हे सगळं मायाजाल आहेच त्यात गंजाने घातलेली भर.... काही फरक पडत नाही! एव्हाना गंजाच्या कृपेने महाराज प्रोजेक्टरवर दिसू लागले. लबा लबा हलणार्‍या त्या पडद्यावर आम्ही जुन्या गावातल्या टोरंग टॉकीजचा शिणुमा बघतोय असंच वाटायला लागलं होतं.

एक सुदीर्घ का प्रदीर्घ श्वास घे‌ऊन त्यांनी बोलायला सुरूवात केली, मलाही वाटलं की दोन कानांच्यामधून जा‌ऊ देण्यासारखं काही बोलतील आता....

"मालाबा‌ईंच्या हाताची गोडी अवर्णनीय आहे, हे मी तुम्हाला सांगायला नको. गेला सप्ताहभर त्यांच्या हातचं खा‌ऊनही तृप्ती झालेली नाही.

तर, पहिला अभंग घे‌ऊया खास मालाबा‌ईंसाठी. (खाल्ल्या साखरेला जागले, तर).
वैजयंतीमालेशिवाय विठ्ठलाचे रूप (’च्च! चुकले. खोलीतल्या प्रत्येकाने चमकून आधी प्रीतीकडे आणि मग मालाबा‌ईंकडे बघितलं.).... आपलं माधवाचं रूप अपूर्ण आहे. (वाचले...)

उगीच म्हणत नाहीत त्याला, ’राजस सुकुमार मदनाचा पुतळा’. काळा-सावळा, ओबड-धोबड दगडाचा देव, संतांना सुकुमार मदनाचा पुतळा भासतो. का? तर ’कस्तूरी मळवट, चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती’! काय सांगू तुम्हाला वैजयंतीमालेचा प्रभाव, माझ्याकडे शब्द नाहीत, हो, शब्द नाहीत’ असं म्हणून अतिशय गदगद हो‌ऊन त्यांनी डोळे टिपले.

माध्या चांगला कोकणस्थी घारा-गोरा आहे, तसा राजस आहे पण सुकुमार मुळीच नाही, पुतळा आहे, मदनाचा नक्की नाही. पण म्हणावा तसा ओबड्-धोबड वगैरे नाही, हं.
माध्याच्या गळ्यात रुळायला-बिळायला नकोच, मालावहिनींनी नुसते हात जरी टाकले तरी तो डोळ्यासमोर रवी-शशी कळा चमकून खाली बसेल, असल्या मालावहिनी. माध्या भेदरलेला दिसत असला तरी मालावहिनींच्या चेहर्‍यावरून पुढच्या सप्ताहभर तरी नानामहाराजांची चंगळ दिसत होती.

नुसत्या अभंगाच्या स्मरणानेच महाराज इतके सदगदीत झाले की अभंग त्यांच्याच्याने म्हणवला नाही. पण मालावहिनींचं समाधान झाल्यासारखं दिसलं नुसत्या निरूपणातच.

"सगळेच जुने अभंग आजच्या आधुनिक संगीतशास्त्राच्या कसोटीला उतरतील असं नाही. त्यांना त्या साच्यात बसवायला तशीच शक्ती हवी. अशाच एका अभंगाला गाण्याजोगे करण्याचा मी क्षीण प्रयत्न केला आहे.
संगीत आणि अर्थ यांची सांगड घालताना निर्माण झालेल्या गाळलेल्या जागा (हं?) मी भरल्या आहेत आणि सहज सुंदर नूतन चालही लावली आहे. अभंग आहे ’तुझे रूप चित्ती राहो’ चाल आहे ’तुझे देखा तो ये जाना सनम’!

गंजाच्या कृपेने संगीत ऐकू ये‌ऊ लागले. अभंगाच्या ओळी गाळलेल्या जागांसह पडद्यावर दिसू लागल्या. कॅरी‌ओके स्टा‌ईलने एक बॉल त्यातल्या शब्दांवर उड्या मारू लागला.

तुझे रूप चित्ती राहो देवा
मुखी तुझे नाम राहो देवा
देह प्रपंचाचा दास देवा
सुखे करो काम्-काज देवा आ‌आ आ‌आ!

समस्त श्रोतृगण आनंदाने, टाळ्या वाजवत, पडद्यावरच्या बॉलप्रमाणे अभंग म्हणत होता. आमची सौच काय पण मुलही रंगलेली दिसली. अभंग संपल्यावर आपल्याच गाण्यावर खुष होत सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

"तुकाराम हे असेच एक अतिशय आवडते संत हो‌ऊन गेले. ते तुमच्या आमच्या सारखे संसारी होते. त्यांनी शिवाजी राजांनी दिलेलं सरकारी अनुदानही नाकारलं होतं. या अभंगाला चाल दिलिये ’मेरा साया’ या हिंदी चित्रपतातील सुप्रसिद्ध गाण्याची- ’तू जहा जहा चलेगा’ आणि अभंग आहे, ’जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’.

इथे मी कपाळावर मारलेला हात इतका जोरात होता की, तो त्यांना टाळीसारखा वाटला.
’टाळ्या अभंगा बरोबर आणि संपल्यावर मारायच्या हं? म्हणा...’

जेथे जातो तेथे तूमाझा
तू माझा माझा सांगा आ‌आती
चालवीसी हाति-धरोनीया
चालवीसी हाति-धरोनीया.....

आपल्या संत लोकांना सगळं ज्ञान होतं बरका. तुकारामांना तर न्युक्ली‌अर टेक्नॉलॉजीचं ज्ञान होतं, महाराजा, ऐकता काय!
अणु रेणिया तोकडा
तू का आकाशा‌एव्हढा?

म्हणतायत की अणू रेणू हे लहानात लहान तुकडे आहेत. पण ह्या ज्ञानाने ते चढून गेले नाहीत, त्यांना गर्व झाला नाही. ’तू आकाशा‌एव्हढा आहेस का?’ असं ते लगेच दुसर्‍या ओळीत स्वत:लाच विचारतात. त्याचं उत्तर आहे...."

’नाही sssss ....' आम्ही सगळेच ओरडलो. नाहीतरी मी आता एव्हाना ’प्रसादापुरताच उरलो’ होतो. मग मागे कशाला रहा? खच्चून बेंबीच्या देठापासून ओरडलो. बायकोने नेमका टिपला आवाज आणि डोळे वटारले माझ्याकडे बघून.

"बर्वे कुटुंबाचा आणि आमचा फार घनिष्ट संबंध आहे. प्रितीबा‌ई यांच्यासाठी आता शेवटी रूपाचा अभंग घेतो. (प्रीती लाजली, झक्क मुरका मारून). वास्तविक पहाता रूपाचा अभंग सुरुवातीला घेण्याची वारकरी परंपरा आहे. कुणीतरी ह्या जुनाट अनिष्ट रूढींना आळा घालायलाच हवा. पण आज मी, संत नाना महाराज, इथे, ह्या समयी, तुम्हा भक्तगणांच्या साक्षीने ही प्रथा मोडतो."

"व्वा! व्वा! काय प्रथा मोडले! मराठीत काय प्रथा मोडले, वो! है शाब्बास तुमची!", बेडक्याने त्यांच्या चढलेल्या आवाजाने एकदम प्रभावित हो‌ऊन टाळ्या वाजवल्या.... मग काय, बाकी सगळ्यांनी वाजवल्याच वाजवल्या.

’रूप पाहता लोचनी’ हा अभंग आहे रूपाचा आणि चाल आहे जुन्या लोकमान्य हिंदी गाण्याची ’रूप तेरा मस्ताना’"

रुप्प पाहता लोच्चनी
सुख्ख झाले हो साज्जणी
(एकदा विठ्ठलकडे बघून)
तो हा विठ्ठल बरवा
(मग माध्याकडे बघून)
तो हा माधव बरवा
टॅडॅ... टॅ डॅडॅडॅडॅ (सॅक्साफोनचा पीस)

समाप्त

गुलमोहर: 

Biggrin

अरारा!!! Rofl Rofl
किल्ले का ग वर काढलंस हे. मेले मी गदगदुन. ऑफिसात मोठ्याने हसौ शकत नाही.