घरोघरी मातीच्या चुली - २

Submitted by ललिता-प्रीति on 22 June, 2011 - 02:45

घरोघरी मातीच्या चुली - १ (http://www.maayboli.com/node/18367)

----------

"अहो, काय हे...!"
".........."
"तुम्हाला करण्यासारखं दुसरं काही नव्हतं काऽऽ?"
"(काहीच न कळून) नाही ना! हातातलं लेटेस्ट प्रोजेक्ट संपलंय. आणि आता मी काही पूर्वीसारखा बिझी राहिलेलो नाही या प्रोजेक्टवरून लगेच पुढच्या प्रोजेक्टवर उडी मारायला..."
"(हात झटकत) तुमच्या प्रोजेक्टची कौतुकं मला नका सांगू! पूर्वपुण्याईवर अजूनही लोकं तुम्हाला बोलावतायत. नाहीतर काही खरं नव्हतं."
"ते काही का असेना! पण आपला एकुलता एक मुलगा अजूनही स्थिरस्थावर होण्यासाठी धडपडतोय. तोपर्यंत एक बाप म्हणून आर्थिक भार उचलणं माझं कर्तव्य नाहीये का?"
"कोण म्हणेल तो अजून स्थिरस्थावर झालेला नाहीये?"
"का? मीच म्हणतोय! तुझ्यामाझ्यात काय लपवालपवी करायची? अभिषेक अजूनही हातपायच मारतोय हे सत्य नाहीये का?"
"हातपायच मारत असता, तर हे... हे शक्य झालं असतं का?"
"काऽऽय शक्य झालं असतं का?"
"(हातातला पेपर नाचवत) हेच... आज सकाळी जे मी वाचलंय ते..."
"(समजुतीच्या सुरात) या वयात असा त्रागा बरा नव्हे! तू आत्ता नक्की कुणावर आणि कश्यावर चिडलीयेस ते सांग पाहू आधी."
"(त्रागा पुढे चालू ठेवत) कुणाकुणाची आणि कश्याकश्याची नावं घेऊ? माझ्याच घरात मी उपरी ठरलेय या प्रकरणात"
"(अजूनही काहीच न कळून) प्रकरणात?? कुठल्या?? कसल्या??"
"माझ्याच घरातल्या गोष्टी आता बाहेरून कळतात मला... कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाही."
"असं कसं! नुकतंच त्या कुठल्याश्या महिला कमिटीच्या सभेच्या अध्यक्षपदावरून तुझं तोंड दिसलं की पुढ्यातल्या तमाम महिलांना. बातम्यांमध्ये दाखवलं. मी पण बघितलं."
"हो! कारण त्या सभेला जातेय हे मीच तुम्हाला सांगून गेले होते. तुम्हाला अंधारात ठेवून मी कधीच काहीच करत नाही."
"तू मला अंधारात ठेवतेस असं मी एका शब्दानं तरी म्हटलं का?"
"(आवाज चढवत)तुम्ही तसं म्हणत नाही, पण स्वतः काही करताना मात्र मला अंधारात ठेवता!"
"तुला अंधारात ठेवून काही करण्यासारखं वय राहिलंय का आता माझं?"
"उगीच नसते विनोद करू नका या वयात!"
"बरं राहिलं! तू बोल, मी ऐकतो!"
"(चरफडत)आता जाईन तिथे लोकांच्या चौकश्या सुरू होतील."
".........."
"चॅनलवाले त्रास देतील..."
".........."
"मलाच जिथे अजून काही माहिती नाही, तिथे त्यांच्या प्रश्नांना काय उत्तरं देऊ मी?"
".........."
"गोष्टी जगजाहीर करण्यापूर्वी आधी मला येऊन सांगणं कुणाचं कर्तव्य नव्हतं??"
".........."
"आणि तुम्हीही त्यांनाच सामिल..."
".........."
"लग्नाच्या बायकोपेक्षा तुम्हाला तीन-चार वर्षांपूर्वी घरात आलेली सून जास्त जवळची वाटते. आणि तिला तुम्ही! पण दोघांनाही मला येऊन काही सांगावंसं वाटत नाही. चिरंजीवही तसलेच! (पुन्हा हातातला पेपर नाचवत) ‘ही’ अक्कल आलीये, पण आईला विसरलेत..."
".........."
"अहो, नुसते गप्प काय बसलात? बोला ना आताऽऽ"
"(चेहरा शक्यतो गंभीर ठेवत) नेमका विषय कळला तर बरं होईल."
"नेमका विषय कसला डोंबलाचा! हेच... सकाळी सकाळी जे मी वाचलंय ते..."
"हां! आता तू मूळपदावर आलीस पुन्हा... काय वाचलंस तू सकाळी सकाळी? आणि कुठे?"
"कुठे काय? सगळ्या पेपरांमध्ये आलंय... अगदी पहिल्या पानावर! रंगीत चौकटीत! ट्विटरवर तुम्ही काल जी मुक्ताफळं झाडलीयत त्याबद्दल!"
"(प्रचंड आश्चर्यानं) रात्री किती उशीरा लिहिलं होतं मी ते! छापून पण आलं आज लगेच? या पेपरवाल्यांचं भारी लक्ष असतं सगळीकडे!"
"का? तुम्हाला काय वाटलं तुम्ही गुपचूप ट्विटून आलात म्हणजे मला कळणार नाही? भिंतींनाही कान असतात म्हटलं!"
"तुला कळू नये असा उद्देश नव्हता गं माझा..."
"तसाच होता! तुमचाही आणि आपल्या सूनबाईंचाही! वेगळा संसार मांडलाय म्हटल्यावर मला आवर्जून काही सांगायला ती बांधील नाही ना..."
"अगं ऐक! तसं काही नाही. गेले काही दिवस ऐश्वर्याच्या डॉक्टरला ट्विटरवर मी फॉलो करत होतो. त्यांनी काल रात्री ट्विट केलेलं मी वाचलं. मलाही तेव्हा माहीत नव्हतं. पण म्हटलं आपल्याला माहीत नाही हे बाहेरच्या लोकांना कळलं तर केवढी नाचक्की! शिवाय तुलाही किती वाईट वाटलं असतं! म्हणून मी ही लगेच ट्विटून टाकलं. तुला सांगणार होतो पण शटडाऊन घेऊन झोपायला येईपर्यंत तू झोपून गेलेली होतीस!"
".........."
"आता आलं का लक्षात सगळं?"
"हो! आलं"
"गेला का माझ्यावरचा राग?"
"(हसून) हो गेला! तसे तुम्ही माझी समजूत काढण्यात पटाईत आहातच. लोकांनाही ठाऊक आहे ते! अगदी पार जंजीर, अभिमानपासून सिलसिला पर्यंत... (जरा चिंतेनं) पण आपला अभिषेक अजून स्थिरस्थावर झालेला नाहीये. मग ही नवीन जबाबदारी कशी पेलवणार हो त्याला?"
"जाऊ दे गं! निराळा संसार मांडलाय ना त्यांनी? तो आणि ऐश्वर्या बघून घेतील त्यांचं ते. तू तयारीला लाग. आपल्याला आज ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’च्या स्पेशल स्क्रीनिंगला जायचंय. इतर लोकांनी पाहण्याआधी तू पाहून घे तो सिनेमा. चल."

गुलमोहर: 

पहिल्या ओळीपासून 'बीग बी' अगदी लगेच डोळ्यासमोर येतोय, (जंजीर, अभिमान, सिलसिला चा उल्लेख केला नसतास तरी चाललं असतं)
धन्य आहेस तू ________/\_______ !!! Lol

>> पहिल्या ओळीपासून 'बीग बी' अगदी लगेच डोळ्यासमोर येतोय, (जंजीर, अभिमान, सिलसिला चा उल्लेख केला नसतास तरी चाललं असतं)
केला ते बरं झालं. मला काहीच पत्ता लागला नसता. लेखावरून काय बातमी असेल याचा अंदाज शेवटी आजचा सकाळ उघडून कन्फर्म करावा लागला. Happy

'अभिषेक अजून हातपाय मारतोय' यावरून लक्षात आला प्लॉट! पण ललितादेवी, तुमच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे. बारीक सारीक बारकावे (ट्विटिंग प्रोसेस अपडेट डीले) मस्तपैकी टिपले आहेत. मला हसायला फारसं आलं नाही कारण प्लॉट कळत गेला. पण बारकावे टिपण्याचं मात्र खूप कौतुक वाटतं. हे अवघड कार्य आहे.

मस्त मस्त मस्त.. भन्नाट कल्पनाशक्ती आहे तुमची..

पहिला भाग मी वाचला नव्हता. आत्ता वाचला. दोन्ही भाग भारी आहेत.

म हा न Biggrin

का? तुम्हाला काय वाटलं तुम्ही गुपचूप ट्विटून आलात म्हणजे मला कळणार नाही? >>>> Rofl

Pages