गुंता !

Submitted by कवठीचाफा on 20 June, 2011 - 00:59

नाव;- यशवंत प्रभाकर कुलकर्णी.
व्यवसाय :- एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी.
सध्याचा पत्ता :- दिलेला नाही.

तर अश्या या सरळमार्गी सामान्य माणसाच्या आयुष्यात सगळेच नेहमीसारखे चाललेले, किमान त्याला तरी तसेच वाटत होते. तीच नेहमीची नोकरी, त्याच त्या बेरीज वजाबाक्या, तीच ती मस्टर्स आणि अंगवळणी पडलेल्या बदल्या. एकटा जीव असल्याने त्याला कसली काळजी वाटत नव्हती.

यशवंत हातात बदलीची ऑर्डर पडताच दोनच दिवसात त्या छोट्याशा गावाकडे रवाना झाला . गावाचे नाव (नाव मुद्दाम देत नाही कारण काही काही गोष्टी तिथे अजुनही अस्तित्वात आहेत) असलेल्या पाटीजवळ एस.टी. तुन उतरल्या उतरल्या नजरेत जे काही ठळकपणे भरलं असेल तर आजुबाजुला पसरलेली हिरवीगार झाडं त्यांच्यावर सापासारख्या चढत गेलेल्या त्या अमरवेलींच्या जाळ्या, एका बाजुला वळणे घेत जाणारा तो काळाभोर डांबरी रस्ता तर समोरच असलेली झुडपांमधे लपाछपी खेळत जाणारी मातकट गाडीवाट. यशवंतला तर या समृध्द निसर्गाने मोहून टाकले. शहरात अगदीच न सापडणारी गोष्ट, नुसत्या कृत्रीम बागा वेगळ्या आणि आपल्याच धुंदीत फ़ोफ़ावणारी रानझाडी वेगळी. अर्थात तो इथे काही निसर्गाच्या सहवासासाठी आलेला नव्हता. मनात कामाचे विचार येताच त्याने घाईने पावलं उचलली त्याला अजुन गावाबद्दल नीट माहीती मिळाली नव्हती तिथे रहाण्याची जेवणाची काय सोय आहे हे अद्याप त्याला कळले नव्हते. त्यासाठीच त्याला दिवसाढवळ्याच गावात पोहोचणे गरजेचे होते. तिन- चार मैल तंगडतोड करत तो गावात पोहोचला. अर्थातच गावात येण्यासाठी गाडीवाट होती पण गाड्या बहुदा नसाव्यात नाहीतर एखादी गाडी तरी त्याला वाटेत भेटली असती. शहरी वातावरणातल्या आरामाला सरावलेल्या शरीराला एकदम इतके चालणे म्हणजे कष्टच म्हणायला हवेत. मनातल्या निसर्गाच्या संपन्नतेच्या कल्पना पार पुसल्या गेल्या आणि त्यांची जागा घेतली वैताग आणि चिडचीड यांनी. गावात पाउल टाकल्या टाकल्या ते ही ते ही दुपटीने वाढले. जेमतेम साडेतीनशे चारशे उंबरठा असलेलं ते एक खेडं होतं. या असल्या गावात रहाण्या जेवण्याची सोय करणारे लॉज असण्याची कल्पनासुध्दा करणं हास्यास्पद होतं. जेमतेम त्याने बँक गाठली, तिथेल्या मॅनेजरला भेटून त्याने आपले नेमणुकपत्र सादर केले. मॅनेजरही जरा हसतमुख वाटले त्यांनी त्याला बसायला सांगुन चहा मागवला.
या असल्या ठीकाणी चहा देणारे हॉटेल आहे? यशवंतच्या मनात डोकावणार्‍या प्रश्नाला जणु ओळखल्यासारखे हसत मॅनेजर म्हणाले.
" ईथे हॉटेल वगैरे काही नाही बरं का !, चहा आता आपला गणु तयार करुन आणेल, इथेच एका अडगळीच्या खोलीत स्टोव्ह वगैरे ठेवलाय " त्यांच्या या वाक्यावर यशवंत कसंनुसं हसला फ़क्त.
थोड्या औपचारीक गप्पा मारल्यावर त्यांचा विषय अपसुकच त्याच्या रहाण्याच्या सोईकडे वळला.
" माझं ऐका कुलकर्णी, इथे गावात घरं इतकी मोठी आहेत की एखाद्या घरात सहज भाडेकरु म्हणुन रहाता येईल आणि जमलं तर तिथेच तुम्हाला जेवणाचीही सोय करुन घेता येईल, थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं तर पेईंग गेस्ट. फ़क्त आपण त्यांच्या कुठल्याही भानगडीत पडायचं नाही इतकंच. नाहीतरं गावातली माणसं जितकी साधी तितकीच वाईट, काय ? गावच्या सरपंचांना भेटा ते उत्तम सोय लाऊन देतील तुमची. "

मॅनेजर देसाईंकडून सरपंचांच्या घरचा पत्ता घेतल्यावर त्यांचा निरोप घेउन यशवंत सरपंचांच्या घराकडे चालायला लागला.

शहरात जशी घरांची गर्दी असते आगदी पायात पाय नाहीतर निदान डोक्याला डोकं लाउन तरी घरं उभी असतात पण खेड्यातली ही घरं म्हणजे व्वा ..... सगळ्यांना आजुबाजुला थोडीफ़ार का होइना मोकळी जागा दिसत होती. रस्ता अगदी डांबरी नसला तरी किमान सपाट होता त्यामुळे यशवंतला आजुबाजुचे निरीक्षण करता येत होते. वाटेतच दोन घरांच्यामधे खुपच जास्त अंतर पडलेलं दिसल्यावर त्याची उत्सुकता चाळवल्या गेली. बारकाईने बघितल्यावर लक्षात येत होतं की तिथुनच आतवर गेलेल्या मळवाटेवर एक कमान असुन त्याला लोखंडी फ़ाटक आहे.
‘इतक्या मागास गावात आणि लोखंडी फ़ाटक?' नकळत मनात प्रश्नचिन्ह उभं राहीलंच. इतक्यात दुरवर सरपंचांचं घर दिसायला लागलं आणि यशवंतने मनातले प्रश्न झटकत आपला वेग वाढवला.

यशवंत गावात येउन जवळपास महीना होवुन गेला सरपंचांच्या शिफ़ारशीमुळे त्याची रहाण्याजेवण्याची सोय गावातल्या एकमेव ब्राह्मण घरात झाली, आणि त्याचे आयुष्य रोजच्या चाकोरीतुन चालायला लागले. त्याच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावरच त्याला नेहमी ते लोखंडी फ़ाटक दिसत असे आणि नकळत त्याची उत्सुकता चाळवली जात असे. एकदोनदा त्याने तिकडे जायचा प्रयत्नही केला पण तो त्या रस्त्यावर पाउल ठेवायच्या आतच त्याला कुणी ना कुणी हटकले असे आणि नाईलाजास्तव त्याला परत फ़िरावे लागले, ‘कधीतरी तिथे जाउन बघायलाच हवे’ मनाने नोंद घेतली. आणि एक दिवस त्याला तशी संधी मिळाली देखील.

तो रवीवार होता, पावसाळा जवळ आल्यामुळे गावातली माणसे शेतीच्या कामात गुरफ़टून गेलेली, नेहमी ओसरीवर खोकत बसलेली म्हातारी कोतारी मंडळीही कुठे दिसत नव्हती. यशवंतने पायात चपला सरकवल्या आणि सरळ त्या लोखंडी फ़ाटकाचा मार्ग धरला.

दुरुन दिसताना जरी नुसतेच लोखंडी फ़ाटक दिसत असले तरी त्याच्या आजुबाजुला असलेल्या दगडी कंपाउंड वॉलचे अवशेष अजुनही बाकी होते. फ़ाटक उघडण्याची तसदी न घेता बाजुच्या मोडक्या दगडी कुंपणावरुन सहज आत जाता येउ शकले असते. यशवंतने तोच मार्ग पत्करला. आत एकेकाळी संपन्न असु शकेल पण सध्या तण माजुन नासाडी झालेली बाग वाटत होती. समोरच ओळीने लावलेल्या झाडांच्या मधुन अपसुकच तयार झाल्यासारखी असणारी खुरटे गवत माजलेली वाट होती. यशवंताने त्या वाटेवरुन चालायला सुरुवात केली, जेमतेम दहा पंधरा मिटर चालल्यावर समोरची वाट एकदम उजवीकडे वळली आणि वाटेबरोबर वळताना समोर दिसलेल्या दृष्याने यशवंत चांगलाच चकीत झाला. समोर चक्क दोन मजली सी टाईप बांधकाम केलेला डोक्यावर मंगलोरी कौले मिरवणारा आलीशान बंगलाच दिसत होता. आजुबाजुच्या मोठमोठाल्या वृक्षांमुळे आजपर्यंत तो कधी त्याच्या नजरेस पडला नव्हता. पुढे जाउन कदाचीत त्याने त्या बंगल्यात प्रवेशही केला असता पण ते शक्य दिसत नव्हते. कारण बंगल्याच्या बाहेर अजुन एक दगडी भिंत सुस्थितीत होती आणि तिला असलेल्या एकमेव दरवाजाला भलेमोठे कुलुप दिसत होते. आजुबाजुला कदाचीत आत शिरण्यासाठी एखादी जागा असु शकत होती पण यशवंतच्या मनाला ते प्रशस्त वाटे ना ! म्हणुन तो परत फ़िरला. एव्हाना दिवस सरायला लागलेला होता, आणि शेताकडे गेलेली माणसे परत यायच्या आत त्याला मुख्य रस्त्याकडे परतणे भाग होते.

दिवसामागुन दिवस गेले तरी यशवंतच्या मनात त्या बंगल्याबद्दलचे आकर्षण अजुनही टीकुन होते. इतका सुंदर बंगला असा ओसाड सोडून कोण बरं गेलं असावं ? त्याच्या मनाला सतत प्रश्न पडत असे. शेवटी एकदा मनाचा हिय्या करुन त्याने तो प्रश्न आपल्या घरमालकांना विचारलाच एव्हाना त्यांच्यातले व्यवहारीक संबंध बाजुस पडून त्यांच्यात आपलेपणा आला होताच, पण यशवंतच्या प्रश्नाने अण्णा म्हणजे त्याचे घरमालक आणि काकु म्हणजे त्यांच्या पत्नी एकदम सावध झालेले दिसले.

" तो प्रभुंचा वाडा आहे बर, आणि तुला कसे बरे जाउ दिले कुणी तिकडे? त्याची किर्ती फ़ारशी चांगली नाही हो ! " आपल्या खास कोकणस्थ शैलीत अण्णा म्हणाले.
" काही नाही असाच सहज फ़िरत फ़िरत गेलो होतो तिकडे इतकी सुंदर वास्तु पण ओसाड पडलेली पहावलं नाही मला" यशवंतने उत्तर दिले.
" वास्तु जरी दिसावयास चांगली असली तरी तिचा इतीहास मात्र एकदम वाईट आहे हो"
" पण त्यात जे कुणी रहात होते ते नक्कीच संपन्न घराणे असावे नाही का ?"
" त्या वाड्याचे ( त्या वास्तुला बंगल्या ऐवजी वाडा म्हणणे हे यशवंतला खटकलेच) शेवटचे मालक काशीनाथ प्रभु एकंदरीत घराणे फ़ारच मोठे पण........

यानंतर अण्णा बराचवेळ बोलत होते त्याचा नेमका सारांश असा की

कोणे एके काळी या गावची वतनदारी गंगाधरपंत प्रभु यांना मिळाली होती, त्यामुळे प्रभु हे पंचक्रोशीतले समृध्द घराणे होते. घरात दुधदुभत्याची रेलचेल असे, स्त्रि पुरुष दागीन्यांनी मढलेले असतं. प्रभु तसे मनानेही उदार होते त्यामुळे त्यांच्याकडे अश्रितांची संख्या फ़ार असे, पण याला कुठेतरी एक काळा डाग लागला, गंगाधरपंतांचा एकुलता एक पुत्र केशवराव याला मुलबाळ नव्हते. वैद्य झाले, यज्ञ- याग झाले पण घरात पाळणा काही हलेना ! यावर उपाय म्हणुन अखेरीस गंगाधरपंतांनी केशवरावांचे दुसरे लग्न लाउन द्यायचा बेत केला, पण आपल्या पत्नीवरच्या प्रचंड प्रेमामुळे केशवराव लग्नाला तयार होत नव्हते. अखेरीस त्यांच्यात अंतर्गत काही करारमदार झाले असतील, परंतु केशवरावांनी दुसरे लग्न केले. यासाठी त्यांनी वधु निवडली ती मात्र एकदम गरीब घरातली. वास्तवीक प्रभु घराण्याशी सोयरीक करण्यासाठी अनेक नामांकीत घराणी उत्सुक होती तरी त्यांनी तसा निर्णय का घेतला हे कुणालाच कळले नाही.

यथावकाश केशवरावांचे लग्न झाले, त्यांना पुत्ररत्नही झाले परंतु त्या पुत्राच्या नशिबी मात्र मातृयोग नसावा. केशवरावांची दुसरी पत्नी बाळंतरोगाने गेली. तीचे असे भरल्या घरातुन उठून जाणे अपशकुनी ठरले की काय कोण जाणे पण नंतर वर्षभरातच प्रभु घराण्याला उतरती कळा लागली. एकदीवस पहाटेसच गंगाधरपंत प्रभुंच्या अकस्मिक निधनाची बातमी आली, केशवरावांवर जणु आभाळ कोसळले.
त्यानंतर ते कधी कुणाला आनंदी असे दिसलेच नाहीत सदैव कसल्यातरी काळजीत असल्यासारखे वावरत असत. प्रभु घराण्याची उतरण चालुच राहीली.

प्रभुंच्या वाड्यात त्यानंतर होणारे उत्सवही कमी होत गेले आणि केशवरावांच्या शेवटी शेवटी तर ते पार बंदच झाले. एकेदिवशी हे केशवरावही पहाटेसच त्यांच्या बिछान्यात मृतावस्थेत आढळले.

केशवरावांचा मुलगा हा पुढचा प्रभु पण त्याच्या काळात तर घरातले अश्रीतही घरात थांबण्यास तयार नव्हते, कारण वाड्यात आताश्या दाढीमीश्यांचे जंजाळ असलेली, जटा वाढलेली, अंगाला भस्म फ़ासलेली माणसे रात्री अपरात्री दिसु लागलेली. काही अर्वाच्य घटनाही घडल्या असतील पण त्या बाहेर पसरल्या नाहीत, मात्र प्रभु घराणे एकटे पडले हे नक्की. लोकांच्या मते त्यांना वेड लागलेले असावे.
पिढ्या दर पिढ्या प्रभु घराण्यात हे वेड वाढतच गेल्याचे दिसते, त्यांच्या काही न उच्चारण्याजोग्या कारवायाही असतील पण गावातले लोकही त्यांचा तिरस्कार करु लागले. आणि प्रभु घराणे काळाच्या पडद्याआड नाहीसे झाले ते त्यांचा काहीही माग न लागता. यातल्या उल्लेखनीय बाबी अश्या की प्रत्येक प्रभुंना केवळ एकच आपत्य झाले मुलगा, आणि दुसरी म्हणजे त्या घरात अपमृत्युंचे प्रमाण शंभर टक्के इतके होते. जणु प्रभु घराण्याला निर्वंश होण्याचा शाप मिळाल्यासारखे.

अर्थात ही कहाणी फ़ार पुर्वीची पिढ्या दर पिढ्या पुढे सांगोवांगी चालत आलेली यात काही मनातले भाग टाकल्या गेलेही असतील पण एकुणच त्या वाडयाला एक कहाणी होती खरी. ती ऐकुन यशवंतची करमणुक मात्र झाली, असो तो वाडा कसाही असला तरी ती वास्तु सुंदर होती हे निश्चीत आणि सुंदर होती म्हणजेच महागडी असणार, त्यातुन ती एका नामशेष झालेल्या घराण्याच्या मालकीची म्हणजे कदाचीत ती सरकारजमा असु शकेल, थोडक्यात ती यशवंतच्या आटोक्याबाहेरची होती खरी. किमान तेंव्हा तरी त्याला तसे वाटले.

पण कदाचित काळाच्या मनात काही वेगळे असावे,
यशवंतच्या शाखेच्या मॅनेजर देसाईंनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने अचानक राजिनामा दिला, आणि यशवंतची बढती होउन तो ब्रँच मॅनेजर झाला, यात वेगळे असे काहीच दिसत नव्हते, नाहीतरी या असल्या मागासलेल्या गावात येउन रहायला दुसरे कुणी तयार झाले नसावे.
यशवंतची बढती झाली ओघानेच त्याचा पगार वाढला, सुविधाही बर्‍याच प्रमाणात वाढल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे आता त्याला अत्यल्प व्याजदराने जास्तित जास्त कर्ज बँकेकडुनच उपलब्ध होणार होते, सहाजिकच आता त्याच्या मनात त्या वास्तुबद्दलचे विचार डोकावायला लागले.

कितीही मनात असलं तरी सहजासहजी सगळ्याच गोष्टी साध्य होत नाहीत. त्या वास्तुच्या मालकांचे तपशील सध्या त्यावर असणार्‍या मालकीहक्कांची चौकशी या सगळ्या बाबी आल्याच. इथे गावात राहुन तरी या सगळ्या गोष्टी करणं यशवंतला शक्य वाटत नव्हतं त्या साठी कुणाचीतरी मदत घ्यावीच लागणार होती. अश्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर नाव आलं ` पद्माकर', यशवंतचा एकमेव मित्र, अर्थात यशवंतच्या आयुष्याची सुरुवातीची हालाखीची परीस्थीती पहाता त्याला मित्र असे जमवता आलेच नाहीत त्यातल्यात्यात पद्माकर हा एकच जवळचा असा मित्र. आगदी आता आठवणारही नाही इतक्या लहानपणापासुनचा .पद्माकरची परीस्थितीही फारशी वेगळी नव्हती तो ही खस्ता खातच लहानाचा मोठा झालेला, वेळेला प्रभाकरपंत म्हणजे यशवंतचे वडील त्याला मदत करत होते. पद्माकरच्या शिक्षणाचा खर्चही त्यांनीच केला असावा इथपत शंका घ्यायला जागा होती. दोघांच्यातला हाच एक समान धागा कदाचीत त्यांच्या दाट मैत्रीचं कारणही असेल. पद्माकर एक होतकरु लेखक होता आणि पोटापाण्याचा उद्योग म्हणुन तात्पुरता तरी एका लहानश्या वृत्तपत्रात काम करत होता, त्याच्या ओळखीचा काही फायदा होवु शकेल म्हणुन यशवंतने त्याला फोन केला.

यशवंतच्या आमंत्रणावरुन पद्माकर त्या गावात आला खरा पण तिथल्या निसर्गानं त्याच्याही मनावर आपली मोहीनी घातली. यथावकाश त्याने तो बंगलाही पाहीला, जशी यशवंतची झाली होती तशीच पद्माकरचीही भारावल्यासारखी अवस्था ती वास्तु पाहुन झाली, मग त्याने यशवंतला मदत नसती केली तरच नवल.

दोन्ही बाजुंनी धडपड सुरु झाली, यशवंतची बँकेच्या कर्जासाठी आणि पद्माकरची बंगल्याच्या खरेदीसाठी आवश्यक गोष्टी पुर्ण करण्याची अर्थात महत्वाचं काम पद्माकरचंच होतं. दिवसागणीक प्रगती होत राहीली त्या बेवारस पडलेल्या बंगल्याचे दुर कुठेतरी असलेले मालक सापडले त्यांनाही आपल्या इस्टेटीत फारसा उत्साह नव्हताच किंबहुना ते त्या इस्टेटीबद्दल विसरुनही गेले होते. कदाचित त्यामुळेच त्यांनी अपेक्षेपेक्षा फार कमीच किंमत घेतली. सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पडुन तो बंगला यशवंतच्या ताब्यात मिळायला नाही म्हंटलं तरी सहा महीने गेले.
एव्हाना इकडे बर्‍याच घडामोडी झाल्या होत्या यशवंत मॅनेजर झाल्यावर त्याची जागा भरण्यासाठी गिरीष म्हणुन कुणीतरी एक नविनच असलेला कॅशियर बँकेत रुजु झाला. समवयस्कर असल्याने त्याच्याशीही यशवंताच्या तारा सहज जुळल्या.
यशवंत सध्या ज्यांच्याकडे रहात होता ते अण्णा आणि काकु यांना कुठुनशी यशवंतच्या या खरेदीची कुणकुण लागली आणि त्यांनी त्याला त्यापासुन परावृत्त करण्याचे प्रयत्न सुरु केलेले.
अखेरीस या सगळ्या गोष्टी मार्गी लागुन यशवंत त्या बंगल्याचा मालक झाला.

बर्‍याच खटपटीनंतर शक्य त्या पध्दतीने यशवंतने गिरीष आणि पद्माकरच्या मदतीने बंगल्याचे सुशोभिकरण केले. चांगलासा मुहुर्त काढुन अण्णांकडुन वास्तुशांतीही करुन घेतली अर्थात त्याला यासाठी त्यांची बरीच मनधरणी करवी लागली पण शेवटी सगळे यथासांग पार पडलेच.

इतक्या सगळ्या खटपटी लटपटी करुन यशवंत त्या बंगल्यात रहायला आला खरा,पण इतके दिवसांच्या मानसिक थकव्यामुळे असेल किंवा मनात कुठेतरी आण्णांनी सांगीतलेल्या गोष्टी अडकलेल्या असतील, त्याला तिथे फारसं उत्साही वाटत नव्हतं. त्यातल्यात्यात वास्तुशांतीचा समारंभ म्हणुन काही दिवस राहीलेला पद्माकर परत गेल्यावर जरा जास्तच अस्वस्थ वाटायला लागलेलं. घरच्या काही कामांमुळे परत गेलेला गिरीष परत यायला अद्याप वेळ होता.
बंगला खरेदी करण्याआधीचा उत्साह आता मावळल्यात जमा होता. एकतर इतका मोठा पसारा आणि त्यात असलेला यशवंत एकटाच, मग एकटेपणा खायला उठत असायचा. तशी अजुनही बंगल्याबद्दल त्याची काहीच तक्रार नव्हती आणि राहीलीही नसती जर त्याला ती स्वप्न पडायला सुरुवात झाली नसती तर..

त्या रात्रीच्या एकाच घटनेनं यशवंतच्या आयुष्यात वादळ निर्माण केलं. रात्रीची वेळ, दिवाणखान्यातल्या आरामखुर्चीत यशवंत बसुन काहीतरी हलकंफुलकं वाचत होता. आणि...
एक लहानशी खोली, त्यात असलेली एक बाज काहीतरी नविनच दिसतं होतं नजरेला. यशवंत तटस्थतेनं समोर पहायला लागला. समोरच्या बाजेवर लहानशीच पण हलचाल झाल्याची त्याच्या नजरेतुन सुटली नाही. डोळ्याला आणखी ताण दिल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्या बाजेवर एक स्त्री, बहुदा बाळांतिण आपल्या आपल्या मुलाला हातानं चाचपडत आहे ( नक्की ती आपलं मुलंच शोधत आहे आणि ते मुल म्हणजे मुलगाच आहे हे त्याला कसं माहीत याचं स्पष्टीकरण यशवंत कधीच देउ शकला नसता ). तीची ती असह्य तगमग.. कुणीतरी खोलीचा दरवाजा उघडुन आत येतं. ते कोण आणि कसं दिसतं हे ही त्याला कळलं नाही एकंदर वस्त्रालंकारावरुन तो कुणीतरी इतिहासकालीन श्रीमंत आहे एवढं कळत होतं पण तरी काहीतरी खटकत होतं, नेमकं काहीतरी वेगळं असं या देखाव्यात होतं..
याच क्षणी मनातली कुठलीतरी सुप्त कळ दाबल्या गेली असली पाहीजे, यशवंतला जाग आली, घामानं भिजलेल्या अवस्थेत आपण अवघडुन आरामखुर्चीतच झोपलो याची त्याला जाणिव झाली. कधीकधी दिवसभराच्या रिकामेपणानेही थकवा येतो म्हणतात, कदाचित ते खरं असावं.

जागं आली खरी तरी मनातलं स्वप्न काही पुसल्या गेलं नाही, त्यातला वेगळेपणा अजुनही यशवंतला हैराण करत होता.. आणि अचानक यशवंतला जाणवलं, ते दृष्य फार जुन्या काळातलं होतं कदाचीत दोनएकशे वर्षापुर्वीचं असेल, पण ते त्यालाच का दिसावं? प्रश्न अनुत्तरीत राहीला.

दुसरा संपुर्ण दिवस यशवंत त्याच स्वप्नाचा विचार करत होता, त्याला ही घटना पुर्वी कधीतरी पाहील्यासारखी जाणिव होत राहीली. दिवसभर कामात त्याचं लक्ष लागायला तयार नव्हतं. कशीबशी कामं संपवुन तो घरी परतला. आज तर जेवणाची इच्छाही मरुन गेलेली. ग्लासभर दुध घेउन तो आपल्या बिछान्यावर पडला.

तो गृहस्थ आता आत आला होता त्याच्या हातातही काहीतरी होतं, कदाचीत लहान मुलं असावं ते, समोरची अगतीक स्त्री आक्रंदुन ते परत मागत असावी तीच्या त्या आक्रंदनाचे पडसाद यशवंतला इतक्या दुर जाणवत होते. त्या गृहस्थाचा नक्की काय विचार असावा याचा अंदाज येत नव्हता पण एक नक्की तो ते मुलं तिला परत देणार नव्हता. अखेरीस हतबल होउन ती स्त्री पुन्हा बाजेवर कलंडली, आणि तो गृहस्थ मुलं घेउन बाहेर जायला निघाला. त्यानं दरवाजा उघडताच झालेल्या कर्रर्रर्र आवाजानं यशवंतला पुन्हा जाग आली.
तेच स्वप्न, तीच जागा, त्याच्या पहाण्याचा कोनही तोच परंतु घटना आगदी मागच्या स्वप्नाला जोडुन असल्यासारखी पुढे चालु झालेली. उरलेली रात्र यशवंतने जागृतावस्थेत काढली.

गेल्या दोन दिवसांच्या स्वप्नांचा त्याच्या मनावर जसा परीणाम झाला होता तसा शरीरावरही कुठेतरी दिसत असावा, दुपारी जेवायला गेला असताना काकुंनी त्याच्यातला फरक टिपलाच.
" यशवंता, तुझं सगळं ठीक चाललेय ना ? नाही तुझं जेवणात लक्ष नसते आजकाल म्हणुन विचारतेय हो " काकुंनी शेवटी विचारलंच. मग त्यानंही जास्त खळखळ न करता गेल्या दोन दिवसातली स्वप्नं अण्णा, काकुंना सांगुन टाकली.
" तरी मी सांगत होतो बरें, ती जागा चांगली नाही म्हणुन पण अखेर तु तुझ्या मनासारखेच केलेस."अण्णांनी प्रतिक्रीया दिली " चांगले नव्हे हो यशवंता तेथे रहाणे, काही झालं तरी एका लेकुरवाळीचा तळतळाट लागलाय त्या घराला एका प्रकारे शापच तो, तुला वाटत असेल तर तु पुन्हा इथे रहायला येउ शकतोस हो "
या नंतरही अण्णा बरंच काही सांगत होते, पण यशवंतचं तिकडे लक्ष नव्हतं मात्र त्यांच्या बोलण्यातुन कुणालातरी सोबतीला बोलावण्याची सुचना मात्र त्याच्या लक्षात राहीली. त्याच दिवशी त्याने पद्माकरला फोन करुन बोलावले आता फक्त एकच रात्र त्याला एकट्यानं काढायची होती, त्यानंतर काही दिवस पद्माकर राहीला असता आणि मग त्याच्या नव्या कॅशियर गिरीषला सोबतीला घेता आलं असतं.

रात्री झोप लागु नये म्हणुन यशवंतने दिवाणखान्यात येरझार्‍या घालायला सुरुवात केली पण तरीही थकल्यानं म्हणा किंवा आणखी कशान म्हणा तो बसताक्षणीच त्याला झोप लागली असावी नाहीतर त्याला पुढचं स्वप्नं कसं पडलं असतं?
आज त्या गृहस्थांसोबत कुणी स्त्रीही होती, ती त्या बाजेवर पडलेली नव्हे दुसरीच कुणीतरी. आज ते बाळ तीच्या जवळ होतं, त्या बाजेवर असलेल्या मातेच्या आक्रोशात आज भर पडली होती. अनेक विनवण्या करुनही तीला तीचं मुलं परत देण्याचा दोघांचाही मानस नसावा. मग आक्रोशाची जागा कदाचीत संतापानं घेतली असेल, काही अपशब्द उच्चारले गेले असतील, एकाएकी समोरची दोघं त्या खोलीबाहेर निघुन गेली. यावेळी मात्र दरवाजा न कुरकुरता उघडला. यशवंतला आता फक्त समोरची बाज दिसत होती, तिच्यावर पडलेल्या त्या अभागी स्त्रीच्या असहाय्यपणे केलेल्या आर्जवांची जाणिव होत होती.
एव्हाना तिच्या डोळ्यातल्या अश्रुंची जागा संतापाच्या स्फुल्लिंगांनी घेतली होती, संताप.. उभं जगं जळुन जाईल असा संताप. अगतिकतेची परिसीमा झाल्यावर उरलेला संताप. यशवंतच्या नजरेला ती तिरस्काराची जहरी लाट सहन झाली नाही खाडकन त्याचे डोळे उघडले. पुन्हा एकदा दिवाणखान्यातल्या त्या आरामखुर्चीवर तो अवघडलेल्या अवस्थेत बसलेला होता, यावेळी मात्र त्याचा श्वास धपापलेला होता, छाती भात्यासारखी उडत होती. मनाची संभ्रमीत अवस्था फार काळ टिकली.
हे सगळं त्याच्याच बाबतीत का घडत होतं? त्याचा या सार्‍या घटनाचक्राशी काय संबंध फक्त एकच शक्यता होती ती म्हणजे......
सकाळी मात्र एका ठाम निश्चयानंच तो घराबाहेर पडला, त्याला ताबडतोब शहरातल्या त्याच्या जुन्या घरी जायलाच हवे होते. काही जुनी कागदपत्र तपासायला हवी होती, अर्थात आता ती अस्तित्वात असली तर. आपल्या भुतकाळाबद्दल त्याचं मनं थोडंसं सांशक होतं.
दिवसभर त्याने बरीच धावपळ केली पण समाधानकारक असं काही हाती लागलं नाही, प्रभाकर कुलकर्ण्यांनी मुल दत्तक घेतले असल्याची कुजबुज मात्र कानावर येत होती, ते तर रास्तच होतं कारण तो शोधत असलेली गोष्ट नेमकी हीच होती. दिवसभराच्या थकावटीमुळे त्याला पुन्हा आपल्या नव्या गावाकडे जाणारी एस.टी. मात्र चुकली. रात्रभर एस.टी.स्टँडवर काढुन तो सकाळच्या पहील्या गाडीनं आपल्या नव्या निवासस्थानाकडे निघाला.
संपुर्ण प्रवासभर त्याच्या डोक्यात एकच विचार चाललेला, डोळ्यासमोर तीच तिव्र आम्लासारखी दाहक नजर येत होती.
एक असाहाय्य स्त्री जिचे मुलं हिरावुन घेतल्या गेलेय, कल्पनातीत दुखा:चा पहाड कोसळला असेल तिच्यावर. तीच्या मनाचा कोपरा न कोपरा अक्रोश करत असेल आणि आपल्या असाहाय्यतेची जाणिव झाल्यावर तोच अक्रोश संतापात बदलल्या गेला, तिव्र संताप. आपल्या उरलेल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तीने असाच संतापलेल्या अवस्थेत काढला असेल. अशीच जळत्या नजरेनं ती समोरच्या भिंतीकडे पहात असेल तिच्या मनातला तो संताप, ती दाहकता तीच्याखाली खोलीतला एक एक अणु भारल्या जात असेल, तो जहरी संताप आपला दाहक वारसा त्या वास्तुतल्या प्रत्येक वस्तुवर ठेवत असेल. एखाद्या विशीष्ठवेळी कदाचीत त्यांची संरचनाही बदलली असेल. प्रभुंच्या वंशावळीतले ते अपमृत्यु विसरुन चालणार नव्हते,याच दाहकतेचा प्रत्यय त्यांना आला असेल आणि त्याचा प्रतीकार करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्यापरीनं केलाही असेल पण त्यांच्या कोणत्याच प्रयत्नांना यश आलेलं दिसत नव्हतं. अश्या जहरी आणि घातकी वास्तुने जर त्याचे आगमन नोंदवले असेल तर.......? पण का .....?
यशवंतच्या ह्दयातुन एक जिवघेणी कळ निघुन गेली, डोळ्यासमोर एकच जाणिव अंधार.....अंधार..
.
.
.
.
.

गाडीतल्या प्रवाश्यांच्या जागरुकतेमुळेच यशवंत सुखरुप राहु शकला, त्या बेशुध्दीतच जर तो तसाच पडून राहीला असता तर ? खालमानेने यशवंतने आपली पावले गावाकडे वळवली.

दुरुन पाहुन त्याला निट कळलं नाही पण जवळ जाताच आपल्या बंगल्याभोवती असलेल्या माणसांच्या गर्दीची त्याला जाणिव झाली. शक्य तितक्या वेगात पावले उचलत तो बंगल्याजवळ गेला. समोरच पहीली दिसलेली व्यक्ती म्हणजे गावात क्वचीतच असणारे सरकारी डॉक्टर...
" आय एम सॉरी, मेजर हार्ट अ‍ॅटेक असावा, पेशंटला हालचाल करायलाही संधी मिळालेली दिसत नाहीये." त्यांच्या स्वरात निर्विकारता होती.
यशवंतला पहाताच गर्दी आपोआप बाजुला होत गेली आणि त्याला `ते' दिसले, त्याच्या प्रिय मित्राचे पद्माकरचे निर्जीव शरीर.

*******

बंगल्याकडे शेवटचा कटाक्ष टाकुन यशवंत मागे वळला.
पद्माकरच्या मृत्युचं कारण सरकारी डॉक्टरने जरी हदयक्रीया बंद पडून असे दिलं असलं, तरी नक्की तिथे काय झालं असावं याचा अंदाज तो लावु शकत होता. जो विखारी संताप सुप्तपणे त्या वास्तुत भरुन राहीलेला, त्याला जाग आणण्याचं काम यशवंतच्या येण्यामुळे झालं होतं. त्या रात्री त्या वास्तुतल्या विखाराला मुर्त स्वरुप आलं असेल, अचानक आलेल्या त्या चेतनेमुळे नक्की कोणता आकार पद्माकरसमोर साकारला असेल, हे कुणाला कळणार? मात्र अघोरी जागृतीमुळे घातकी बनलेली ती वास्तु घास नक्की घेणार होती, पण कुणाचा ? प्रभुंच्या हरवलेल्या वंशवेलीचा, की समोर दिसेल त्याचा ?

याचीच तर त्याला खात्री करायची होती नाहीतर पद्माकरची आणि त्याची त्या दिवशी चुकामुक झालीच नसती.
हातातल्या कागदांचे कपटे त्याने हवेत भिरकावले हवेच्या थपडांबरोबर ते हेलकावे खात खाली येत होते.. ते दत्तकविधानाचे कागदपत्र होते..

पद्माकरच्या ..

गुलमोहर: 

जमली नाही... एकदमच सिम्पल..

चाफ्या कडून... याहून दर्जेदार भयकथा वाचायची सवय झाल्याने , हि कथा एकदमच गुळमुळीत वाटली

अत्यंतीक धन्यवाद मंडळी,
पुन्हा लिहीताना भुतांना काहीकाळ मधे आणायचं नाही असं म्हणतोय Happy
जाईजुई कसला गुंता सोडवुन हवाय ?

पुन्हा लिहीताना भुतांना काहीकाळ मधे आणायचं नाही असं म्हणतोय

ह्यां अस कधी होत काय...
एकतर हल्ली भयकथा कोण लिहित नाही..
मग आमच्यासारख्या भूतांवर प्रेम असलेल्या लोकांनी कुठे जायचं Happy

मग आमच्यासारख्या भूतांवर प्रेम असलेल्या लोकांनी कुठे जायचं >> Rofl
अगदी अगदी!

काही काही बाबी, गोष्ट इथे आणून सोडायची म्हणून आणल्यासारख्या वाटताहेत..आणि काही ठिकाणी धारपांचा भास...
पण एकूण आवडली..

पुन्हा लिहीताना भुतांना काहीकाळ मधे आणायचं नाही असं म्हणतोय

ह्यां अस कधी होत काय...
एकतर हल्ली भयकथा कोण लिहित नाही..
मग आमच्यासारख्या भूतांवर प्रेम असलेल्या लोकांनी कुठे जायचं >>>>>>> अनुमोदन!
वाट पाहतेय नवीन भयकथेची!

देवा रे, किती हे भुतप्रेम Happy

काही काही बाबी, गोष्ट इथे आणून सोडायची म्हणून आणल्यासारख्या वाटताहेत..आणि काही ठिकाणी धारपांचा भास...
>>> धारपांचा भास ? बाप रे Happy

झकास Happy

चाफ्या आवडली कथा+कथाबिज!

जास्त हॉरर नाहीय्.....पण एक प्रकारे 'मॉडर्न' भयकथा जशी असायला हवी तशी नक्कीच आहे.... Happy

पुन्हा लिहीताना भुतांना काहीकाळ मधे आणायचं नाही असं म्हणतोय
>>>> चाफा, कृपया असं मनातही आणू नये... Happy
तुमच्या भयकथांचा मंतरलेला काळ परत आलाय !! हु हा हा हा

जुई भुतांना मधे आणायचं नाही म्हणतोय, बाकी विषयही आहेतच की छानछान Happy
दक्षे परत एकदा यशवंताच्या शहरप्रवासापासुन परत वाच !

प्रसन्न तुम्हाला मोदक...
मग आमच्यासारख्या भूतांवर प्रेम असलेल्या लोकांनी कुठे जायचं >>>>>
जुई भुतांना मधे आणायचं नाही म्हणतोय, बाकी विषयही आहेतच की छानछान >>>

बाकी विषय पण तुम्ही छान हाताळता.. पण मी काय म्हणते... असं झालं तर बिच्यार्‍या भुतांनी कुठे जायचं ??? Happy
तेंव्हा बाकी सर्वांसोबत त्यांनाही येउद्यात बाजुबाजुने..!!

Pages