आनंदी आनंद गडे......

Submitted by जुई on 19 June, 2011 - 10:18

ओरिजनल
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे...... आनंदी आनंद गडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे...... आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कूजीत रे, कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे...... आनंदी आनंद गडे
- बालकवी
-----------------------------------------
विडंबन: Happy

आनंदी आनंद गड़े.... पाऊसच पाऊस चोहिकडे
चाक गाडीचे गर गर फिरे, भुरभुर भुरभुर चिखल उड़े
खड्ड्यात भरला, बुटात शिरला, रस्त्यात उरला..
चिखल विहरतो चोहिकडे...आनंदी आनंद गड़े

मळली माझी साडी रे, सगळे त्यावर हसती रे..
धुतली साड़ी बाई ने, डाग तयावर गाती गाणे
टाळके दंगले, होते चांगले, कपडे रंगले,
करावे काय सुटेना कोड़े...आनंदी आनंद गड़े

वाहती ट्राफिक मंदगती, डोलती इंडिका अन स्कूटी
मामा शिट्ट्या फुंकतो रे, कोणालाही धरतो रे..
गाडीस ठोकले, काका खेकसले, मामा वदले..
गोंधळ चौका मध्ये रे....आनंदी आनंद गड़े

गुलमोहर: