पुण्याची वाट

Submitted by चिमण on 15 July, 2008 - 08:16

काही शब्दांचा किंवा वाक्प्रचारांचा अर्थ समजलेला असतो पण अनुभवाची जोड मिळाल्याशिवाय उमजत नाही. पोटात गोळा येणे याचा अर्थ उमगायला जायंट व्हील किंवा रोलरकोस्टर मधे एकदा तरी बसायला लागतं. असंच एकदा २५-३० वर्षांपूर्वीचं जुनं पुणं डोळ्यासमोर तरळलं आणि आमूलाग्र बदल होण्याचा अर्थ तत्काळ उमगला.

जुनं पुणं एक शांत, छोटं व सुंदर असं आटपाट नगर होतं. इतकं की लोकं, विशेषतः मुंबईकर, पुण्याला पेन्शनरांचं गाव म्हणून हिणवायचे. पण पुणेकरांना त्याची फिकीर नव्ह्ती. निवांतपणा त्यांच्या नसानसात भिनलेला होता. इथली दुकानं सकाळी ४ तास आणि संध्याकाळी ४ तास उघडी असायची, ती सुध्दा लोकांवर उपकार म्हणून. गिर्‍हाईक आलंच तर दुकानदार पेपरात खुपसलेली मान वर करण्याची सुध्दा तसदी घेत नसत. वरती एखाद्या गिर्‍हाईकानं चुकून अमुक एक वस्तू दाखवता का असं विचारलच तर 'विकत घेणार असाल तर दाखवतो' असं म्हणण्याचा माज फक्त पुणेरी दुकानदारच करू शकत.

तेंव्हा पुण्याच्या पोलीसांना 'ट्रॅफिक जॅम' याचा अर्थ उमगलेला नव्हता. स्कूटर ही वस्तू दुर्मिळ होती कारण ती नंबर लावून मिळायला १०-१० वर्ष लागायची. चारचाकी बहुतेकांच्या आवाक्याबाहेरच होती. तमाम पुणं सायकलवर चालायचं. अर्ध्या तासात सायकलवर अख्खं पुणं पालथं घालता यायचं. पोलीस (म्हणजे मामा) चिरीमिरीसाठी बिचार्‍या सायकलस्वारांना कधी दिवा नाही म्हणून तर कधी डबलसीट घेतलं म्हणून पकडायचे. ओव्हरब्रीज लांब राहीले, पुण्यात सिग्नलसुध्दा फार नव्हते.

शांतता तर इतकी होती की पेशवेपार्क मधल्या सिंहांना आपण जंगलातच आहोत असे वाटायचे. त्यांच्या गर्जना आणि त्या पाठोपाठ कोल्हे, माकडं मोर अशा प्राण्यांचा भेदरलेल्या स्वरातील आरडाओरडा रोज रात्री पार टिळक रोड पर्यंत ऐकू यायचा.

आता या आटपाट नगराचं झटपट नगर झालं आहे. पुणेकरांनी त्यांचा प्राणप्रिय निवांतपणा हरवला आहे. हल्ली दुकानं सकाळी ६ पासून रात्री ११ पर्यंत उघडी असतात. दुकानदार पेपर वाचत बसायाच्या ऐवजी रस्त्यात उभं राहून गिर्‍हाईकांना दुकानात यायची गळ घालतात. ट्रॅफिक जॅम कुठे होत नाही हे शोधण्यासाठी पोलीसांनी खुद्द CID ला पाचारण केलं आहे असं ऐकून आहे. पुण्यात काम शोधायला आलेले अती गरीब लोकच फक्त आता सायकल चालवतात. पण तेही वर्षा दोन वर्षात स्कूटर घेतात. मामा तर सायकलवाल्यांकडे ढुंकून देखील बघत नाहीत कारण त्यांच्या गळाला हल्ली बडी बडी धेंड लागतात.

बिचार्‍या सिंहांची तर वाचाच गेली आहे. त्यांच्या गर्जना त्यांनाच ऐकू येत नाहीत म्हणून ते हवालदील झाले आहेत व त्यांनी मौनव्रत धारण केलं आहे. पिंजर्‍याच्या एका कोपर्‍यात शेपूट पायात घालून ते निपचीत पडलेले असतात. मूकबधीर शाळेसारखं या प्राण्यांसाठी काय करता येईल यावर नगरपालीकेत चर्चा सुरू आहेत.

लहानपणी मी पुणं विद्येचे माहेरघर आहे असं ऐकलं होतं. मी शाळेत जायला लागेपर्यंत विद्येचे कुणीतरी अपहरण केलं आणि ती पुण्यातून नाहीशी झाली होती. आतातर ती मानहानीला कंटाळून तुकारामासारखी सदेह वैकुंठाला गेल्याची वदंता आहे.

पुणं महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी होती. सगळ्यात शुध्द मराठी पुण्यात बोलली जाते अशी ख्याती होती. इथले दैनंदिन व्यवहार मराठीतूनच चालायचे. अगदी परप्रांतीयसुध्दा मराठी बोलायचे. आता मराठी बोलणारा माणूस पुण्यातून नामशेष झाला आहे. सर्व व्यवहार हिंदीतून चालतात. रिक्षावाले, बस कंडक्टर यांच्याशीसुध्दा हिंदीतून बोलायला लागतं म्हणजे फारच झालं. आता खुद्द लो. टिळकांना पुनर्जन्म घेऊन 'निवांतपणा माझा जन्मसिध्द हक्क आहे' असं पुणेकरांना बजावायला लागणार आहे.

थोडक्यात, आमूलाग्र बदल आणि पुण्याची वाट हे निगडीत (पुण्याजवळच्या निगडी गावांत नव्हे) आहेत. आणि मला 'आमूलाग्र बदला'चा उमजला तो अर्थ असा - आमूलाग्र बदल करणे म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीची पूर्ण वाट लावणे!

गुलमोहर: 

गंमत म्हणून वाचायला लेख फार मस्त आहे!
पण...
गांभीर्याने घ्यायचा झाला तर फारच एकांगी आहे असं वाटतं.. या सगळ्या सुधारणा आपल्या पुण्यात झाल्या नसत्या तर आपण कुठल्या तरी गावात किंवा खेड्यात राहतोय की काय असं वाटलं असतं. उलट बदलत्या काळनुसार स्वतःला बदलवून पुणेकरांनी पर्यायाने पुण्याने आपला सदैव सगळ्यात वरचढ असा "पुणेरी बाणा" च टिकविला आहे!!
लहानपणी मी पुणं विद्येचे माहेरघर आहे असं ऐकलं होतं. मी शाळेत जायला लागेपर्यंत विद्येचे कुणीतरी अपहरण केलं आणि ती पुण्यातून नाहीशी झाली होती. आतातर ती मानहानीला कंटाळून तुकारामासारखी सदेह वैकुंठाला गेल्याची वदंता आहे. >> या विधानाशी मी अजिबात सहमत नाही. विद्या नाहीशी झाली म्हणजे काय्??तसे असते तर आज १० वी-१२वीच्या बोर्डात पुण्याच्या शाळांची इतकी मुले आलीच नसती.एकूणच सगळीकडेच शिक्षणाचा दर्जा खालवलाय. फक्त पुण्यात नाही.
आज पुण्याला "आय टी चे माहेरघर" म्हणतात ते तुम्ही विसरलात का?

Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

चिन्मय, लेख फारच छान आहे पण इतकी वाईट परीस्थिती नाही म्हणजे आमूलाग्र बदल वगैरे जरा जास्तच....

खर तर अजुनही पुण्यनगरीत निवांतपणा टिकुन आहे... अस्सल पुणेरी (पु. ल.) कायते पुण्यात आल्यावरच कळतं.
बाकी, आशुचं म्हणणं बरोबर आहे... विद्येचे माहेरघर, आय टी हब ई.

आता खुद्द लो. टिळकांना पुनर्जन्म घेऊन 'निवांतपणा माझा जन्मसिध्द हक्क आहे'.. हे आवडलं बाकी, छान
पद्धत चांगली आहे फक्त अतिशयोक्ति अलंकार कमी करा....
फुडल्या लिखाणास शुभेच्छा

समीर - मालवणी वारा

अगदि शब्द न शब्द नव्हे पण खालील कविता मी पुण्यातल्या आमुलाग्र बदलालाच डोळ्यासमोर ठेउन लिहली होती....
-स्वरूप

http://www.maayboli.com/node/2538

>> सर्व व्यवहार हिंदीतून चालतात
मराठी माणसाची चूक आहे त्यात. बाकी कुठल्याही राज्यात जा... विशेषतः दक्षिणेकडच्या. ते राजभाषेत बोलणं सोडत नाहीत.
मी मूळचा पुण्याचाच आहे. रिक्षावाल्यांशी हल्ली ज्या सर्रासपणे हिंदी बोललं जातं ते पाहिलं की चीड येतेच !!!

चिन्मय, तुम्ही लेख छान लिहीलायंत. मला तरी आवडला. काही चांगल्या गोष्टी ही तुम्ही मांडल्या आहेत, पण त्यात नकारात्मक भाव जास्ती आहे. म्हणजे चांगले बदल ही झालेत ते तितक्याच ताकदीने मांडले जायला हवे होते, जितक्या ताकदीने तुम्ही खटकलेले बदल लिहीले आहेत.

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

दक्षिणा...

दक्षिणा, तू म्हणतेस ते बरोबर आहे. चांगले बदल लिहायचे राहीलेत. खरं सांगायचं तर मला आणखी लिहायचा कंटाळा आला.

आशु_डी, मी हा लेख विनोदी लेखन खाली टाकला आहे. गांभीर्यानं घ्यायचं कारण नाही. तरी तुझ्या आक्षेपांबद्दलचं माझं मत -

>>विद्या नाहीशी झाली म्हणजे काय्??तसे असते तर आज १० वी-१२वीच्या बोर्डात पुण्याच्या शाळांची इतकी मुले आलीच नसती.

माझा निकष फक्त १०-१२वीच्या बोर्डात पुण्याच्या शाळांची किती मुले येतात असा नाहीये. पुण्यात शिकलेल्यांपैकी किती जणांचं जगभर नाव झालं? जगभर नाहीतर भारतभर, भारतभर नाहीतर महाराष्ट्रभर, महाराष्ट्रभर नाहीतर पुणेभर? अशी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढीच माणसं सापडतील. तेवढ्यानं पुणं माहेरघर होतं असं मला वाटत नाही.

>> आज पुण्याला "आय टी चे माहेरघर" म्हणतात ते तुम्ही विसरलात का?
आय टी चे कसलं माहेरघर? पुण्यात खूप IT ची दुकान आहेत एवढच! बहुतेक सगळे परदेशी कंपन्यांची कामं करत असतात. स्वतःची जगभर खपणारी products असणार्‍या फारच थोड्या कंपन्या पुण्यात आहेत. समीर म्हणतो तसं आय टी हब म्हणता येईल.

तेवढ्यानं पुणं माहेरघर होतं असं मला वाटत नाही. >> पुण्यात शिकून जगभर नाव झालेली कितीतरी नावं आहेत्...त्याची इथे लिस्ट देत बसत नाही.. पण पुण्यात शिक्षणाचा जो दर्जा आणि ज्या सुविधा आहेत त्यामानाने इतरत्र त्या नसाव्यात्..नाहीतर शिक्षणासाठी परगावहून इथे येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या इतकी मोठी दिसलीच नसती..
मला ते विद्या सदेह वैकुंठाला गेली.. वगैरे फारच अतिशयोक्तीचं वाटलं म्हणून हे सारं लिहिले.. तसा तुमच्या वैयक्तिक मतांवर आक्षेप घेण्याचं मला तरी काही कारण नाही!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
The only thing bad about Holiday is it is followed by a Non Holiday..
Happy

इनोदी आहे खर! पण हे पुण अन् मी आत्ताच गेलेल्या पुण्यात अवश्य येणे करावे! Happy

आज वाचलं. छान आहे लेख Happy एका अस्सल पुणेकराच्या मनातली तळमळ ...

~~~
पकाक पॅक पॅक पॅक पॅक

पुणे आय टी चे माहेर घर आहेच. या आय टी मुळेच तर पुण्याचा कायापालाट झाला आहे. आय टी मुळेच तर विदेशातला पैसा पुण्यात येत आहे. हे विसरुन चालणार नाही.

अहो तुम्ही वीस पंचवीस वर्षांपूर्वीचे पुणे म्हणताहात, मी ५३ वर्षांपूर्वी पुण्यात आलो नि ४८ वर्षांपूर्वी पुणे सोडले. मला तर किती फरक जाणवला. २००५ साली मी पुण्यात, आय टी च्या माहेरघरातील खास आतले दालन, म्हणजे हिंजेवडी, इथे सहा महिने राहिलो, नि थोडाफार पुण्यात भटकलो. जास्त भटकू शकलो नाही, कारण तशी माझ्यात अजून 'सुधारणा' झाली नाहीये. पुण्यातल्या लोकांसारखी मराठी, किंवा हिंदी किंवा इंग्रजी भाषा मला बोलता येत नाही. या तिन्ही भाषा एकत्र करून जी नवीन भाषा तयार केली आहे, ती समजायला वेळ लागतो, नि बोलता तर येतच नाही. तसेच रहदारीत झालेल्या 'सुधारणा' पाहून मला भीति वाटते. या सर्वाचे वर्णन मी २००५ सालीच मायबोलीवर केले होते.

आय टी च्या पैशाने सत्यम च्या राजूचा कितीतरी फायदा झाला आहे. शिवाय आता लोक बरिस्टा त कॉफी पितात नि मॅक्डोनॉल्ड, के एफ सी मधे खातात. केव्हढी ही प्रगति!

जुन्या पुण्यात नव्हते बुवा असले काही. आम्ही आपले देशी लोकांची (टाटा, किर्लोस्कर, बिर्ला इ.) नोकरी करत असू, सकाळी ९ ते ६ नोकरी नि मग सुट्टी.

आता एकदम फॉरेनच्या मालकांची नोकरी! इथल्या ज्या नोकर्‍या हाय स्कूलमधले लोक करतात, त्या तिथले ग्रॅज्यूएट झालेले करतात. रात्री बेरात्री जागायला नको म्हणून इथले लोक ज्या नोकर्‍या घेत नाहीत, त्या तिथले हुष्षार नि ग्रॅज्यूएट लोक आनंदाने घेतात नि रात्री ९ ते सकाळी ६ ची शिफ्ट म्हणजे तर किती चांगली. तेंव्हा सगळे अमेरिकन कष्टमर!
जाम 'सुधारले' हो पुणे. निदान 'बदलले' तरी. चांगले की वाईट हा ज्याचा त्याचा प्रश्न.

चिन्मय, मला तर आवडला लेख ! मीही शिक्षणाने पुणेकरच आहे. तरी तुमच्याशी सहमत. पुणे विद्येचे माहेरघर आहे हे मान्य, पण पुण्याची किती मुले उच्चशिक्षणासाठी पुण्याची निवड करतात. सद्ध्या तर बाहेरच्या राज्यातुन आलेली धनदांडग्यांची मुलेच जास्त भरली आहेत तिथे.
एकमात्र नक्की कितीही अगदी अमुलाग्र वगैरे बदल झाला असला तरी पुणेकर मात्र तोच आहे.
"आमच्या पुण्यात..........." अजुन सगळं तसंच आहे ! Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

चिमण्या, मलाही आवडला लेख. मस्त लिहिलायस.
विशालला मोदक... Happy
--------------------------------------------
कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांसी आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा!!!

लेख छान पण इतर चिमण्या स्टाईल लेखांपुढे फिका आहे बर्‍यापैकी
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,