'पाय'चीत.

Submitted by A M I T on 10 June, 2011 - 02:17

"अरे काय करून घेतलसं हे?" वसंत ऊर्फ वश्या गोपाळसह धावत येवून माझ्या कॉटवरील उरलेल्या जागेवर बसून धापा टाकीत म्हणाला. गोपाळनेही मुंबईमधील लोकलच्या सवयीनुसार सराईतपणे जागा पटकावली.
मी केविळवाण्या नजरेने एकवार आपल्या पायाकडे पाहीले. एका उंचशा स्टँडला 'टांग'लेला माझा बँडेजधारक पाय गरम चहातून बुडवून काढलेल्या ब्रेडसारखा सुजल्यामुळे मला तो सफेद हत्तीच्या पायासारखा भासू लागला. लोकं मला 'पांढर्‍या पायाचा' तर म्हणणार नाहीत ना? या चिंतेत असतानाच माझ्या उजवीकडून कारूण्यमय हुंदका माझ्या कानी आला. या आमच्या सौ होत्या.
"अहो आहे म्हटलं मी अजून..!" का कुणास ठावूक? माझ्या या टोमणेवजा विधानानंतर सौ. नी तडक 'काळी पाच' पकडली. तेव्हा इतर कॉटांवरील पेशंट्सनी उगाचच सुतकी चेहरे केले.
वास्तविक सौ. ना मनातून आनंद झाला असावा, असा माझा निकष आहे.
'आता कसे माझ्या प्रत्येक गोष्टीत टांग अडवता तेच पाहते..!' असे म्हणताना कमरेत पदर खोचणारी सौ माझ्या डोळ्यासमोर आली.
"आवरा. वहीनी आवरा. पैर सलामत तो जुते पचास..!" गोपाळ या गृहस्थाला प्रसंगातलं गांभीर्य अजिबात कळत नाही. माझा पाय याक्षणी जर 'सलामत' असता, तर गोपाळच्या ढुंगणालाच 'सलाम' केला असता.
"अरे पण तुझ्या पायांना हा हॉस्पीटलचा रस्ता सापडलाच कसा?" वश्यापण कधीकधी ही असली शाब्दीक कसरत करतो.
"मला का हौस आहे इथं येण्याची..! खड्डा..." मी पायाची दुर्दशा होण्याची घटना सांगणार तोच..
"काही विचारू नकोस रे बाबा..! मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बघितले की, हेच कळत नाही... रस्त्यांत खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते. इतके खड्डे चंद्रावरपण नसतील बायगॉड..!" या स्वत:च्याच विनोदावर गोपाळ गालावर कृष्णविवराइतके खड्डे पाडून मनसोक्त हसला, त्यावेळी माझी कॉट धरणीकंप झाल्यासारखी हलत होती.
लोकं 'खड्यात गेलास' असं का म्हणत असावेत? ते मला तेव्हा कळलं.
"खड्डा..." मी टेपरेकॉर्डरमध्ये कॅसेट अडकल्यासारखा या एकाच शब्दावर अडकलो. ठणठण गोपाळ पुन्हा ठणाणा करू लागला.
"खड्ड्यावरून आठवलं. मागच्या पावसाळ्यात आमचे निरंजनकाका असेच रस्त्याने चालले होते. रस्ता केवळ एवढ्यासाठीच म्हणायचा कारण, महानगरपालिकेने रस्त्याच्या तोंडाशी अमुक अमुक मार्ग असा फलक लावला होता म्हणून. मुळात त्या रस्त्यावर प्रदर्शनाला मांडल्यासारखे असंख्य खड्डे आपली 'खोली' बाळगून होते. आता अशा भररस्त्यात काका अचानक गायब..! गुरूत्वाकर्षणाचा नियम खड्ड्यांत टाकून ते वर जाणे तर अशक्यच. मग गेले कुठे? असा विचार करत असताना 'खड्ड्यातच गेले असावेत' असा तर्क करून आमच्या सोसायटीने महानगरपालीकेवर खड्डे बुजवण्यासाठी मोर्चा नेला. आणि काय आश्चर्य पहा..! दोनच दिवसांत खड्डे बुजून रस्ता अगदी गुळगुळीत झाला, पण गुळगुळीत टक्कल असलेले आमचे काका मात्र 'गूळ' आयमीन गूल झाले. तिसर्‍या दिवशी काका स्वगृही परतले असता त्यांनी सांगितले, की ते गटाराचं झाकण उघडं असल्यामुळे त्यात पडले होते." गोपाळने 'पंचतंत्रा'मधली एखादी गोष्ट सांगावी, अशा रितीने तो प्रसंग कथन केला. तो प्रसंग ऐकत असताना आमच्या सौ. चे रडू पळून जावून चेहर्‍यावरचे भाव सेन्सेक्समधील चढ-उतारासारखे भरभर बदलत होते.
"आणि कहर म्हणजे ज्या दिवशी काका गटारात पडले, त्या दिवशी गटारी अमावास्या होती." यावर मी व वश्या हसलो, पण गोपाळच्या चेहर्‍यावर ऑपरेशन थिएटरमधून गुंतागुंतीचं ऑपरेशन करून बाहेर आलेल्या डॉक्टरासारखी गंभीरता होती.
"माझाही पाय खड्ड्यातच मुरगाळला." मी एवढं म्हणेपर्यंत इकडे सौ. ने आपल्या डोळ्यांना पदर लावलादेखील. माझा पाय बरा होईपर्यंत सौ. च्या डोळ्यांतील अश्रू संपून नुसत्याच कवड्या शिल्लक राहतील की काय? अशी शंका येवून माझेही डोळे जरासे पानावले.
"तुझा पाय काल मुरगाळला ना?" गोपाळच्या प्रश्नाचा रोख मला कळला होता. तो आता ग्रहांसोबत खो-खो खेळत होता.
"ए गप रे..! काल अमावास्या होती, पण ती दूपारी २ वाजताच संपली. आणि याचा पाय ऑफीस सुटल्यावर म्हणजे संध्याकाळी सहाच्या सुमारास मुरगाळला." वश्याने गोपाळलाच खो दिला.
"रस्त्यातले उंचवटे बघताना खड्ड्यांकडे दूर्लक्ष व्हायचेच." 'उंचवटे' या शब्दावर जोर देत गोपाळने मला खराखूरा कोपर मारत ही 'कोपरखळी' मारली.
तरी बरं सौ. ला ही असली 'अलंकारीक' भाषा कळत नाही म्हणून.
मी गोपाळला एक चिमटा काढला. चिमट्याची भाषा त्याला कळत असावी, त्याने विषय बदलला.
"किती सुजलाय रे पाय..!" गोपाळ माझ्या सुजलेल्या पायाकडे पाहून म्हणाला.
"हम्म..!" असं म्हणून वश्याने नुसतीच मान हलवली.
"आता मला कळलं, हिंदीत पायाला 'पाव' का म्हणतात ते..!" इति गोपाळ.
"उगाच पुलंची कोटी आपल्या नावावार खपवू नकोस." मी त्याच्या विनोदातली हवाच काढली.
आणखी बराच वेळ आमच्या अशा गप्पा रंगल्या. मग सौ. वगळता दोघांनी काढता 'पाय' घेतला.

*

दोन-चार दिवसांतच मी इस्पितळातळातून डिस्चार्ज घेवून घरी आलो. माझे दोनाचे चार पाय झाले होते. हाती कुबड्या आल्या होत्या. कुबड्यांच्या आधारे आता मी घर फीरत होतो. अन्यथा सोफ्यावर बसून दिवसभर एकाच मासिकाची असंख्य पारायणे करीत होतो.
कधी एफ. एम लावलाच तर...
'आज कल पाँव जमीन पर नही पडते मेरे..'
चॅनल बदलला तरी..
'पप्पू कान्ट डान्स साला. पप्पू नाच नही सकता..'
ही असली गाणी माझ्या अपंगत्वाची खिल्ली उडवत होते.

त्यादिवशी असाच पेपर वाचत बसलो होतो, तोच हॉलमधून सौ. चे काही शब्द कानावर आले.
ती मुलाला सांगत होती,"त्याचा पाय मोड. त्याचा पाय मोड."
माझ्या छातीत धडकीच भरली. दूसरा पाय सुजलेल्या पायासह थरथर कापू लागला. म्हणजे सौ. माझ्या पायावर उठलीय. तीला मला कायमचं घरीच बसवून ठेवायचयं. गोगलगायसारखे पाय पोटात घेता आले असते, तर किती बरं झालं असतं, असला काल्पनिक विचार करत मी कुबड्या घेवून हॉलमधे गेलो.
पाहतो तर काय...
सौ मुलाला जोडाक्षरे कशी काढावीत? हे शिकवीत होती. साहजिकच जोडाक्षरे काढताना त्या शब्दांतल्या कुठल्यातरी अक्षराचा 'पाय मोडावाच' लागतो.
हुश्श..! म्हणून मी सुटकेचा निश्वास सोडला.

*

परवा आमच्या ऑफीसातील 'सुंदर' रिसेप्शनिस्ट रोमा मला (सुजलेल्या पायांसकट) पाहायला आली. माझ्या रोमरोमावर रोमांच उभे राहीले. सौ. घरी नव्हती. मुलाच्या हातावर काही नाणी डकवून त्याला बाहेर पिटाळले.
"सर, पक्या सांगत होता की, तुम्ही कोमात आहात म्हणून.." रोमा आपला मेकअप केलेला चेहरा उगाचच वाईट्ट करून म्हणाली.
मी पक्याचे मनात आभार मानले. एरवी त्याचं असं खोटं बोलणं मी खपवून घेतलं नसतं.
पाय बरा झाल्यावर ऑफीसात जाईन, तेव्हा पक्याला ऑफीससमोरच्या उडप्याच्या हॉटेलात भजी-चहा नक्की चारेन, असा निश्चय मी तेव्हाच करून टाकला.
"इतकं काही नाही. फक्त पाय मुरगाळलाय." मी पायाला ठेच लागली असावी, इतक्या सहजतेने म्हणालो.
"ओह..!" हे म्हणताना तिच्या लिपस्टीकने रंगलेल्या नाजूक ओठांचा झालेला चुंबनासारखा आकार पाहून मी घायाळ झालो.
"फार दुखतयं का?" तिने माझ्या सुजलेल्या पायावर आपल्या कोमल हातांची बोटे फिरवित विचारले.
"दर्द वहाँ नही. दर्द तो यहाँ है. दिल में.." यश चोप्रांच्या चित्रपटातील नायकाप्रमाणे मी हे वाक्य म्हटले पण अर्थात मनात.
"नाही.. तुझा स्पर्श झाला नि माझं निम्मं दुखणं पळालं." मी शेवटी धाडस करून म्हणालोच.
"काही म्हणालात" ती.
बोंबला..! म्हणजे हीने काही ऐकलच नाही.
"वहीनी कुठं दिसत नाहीत त्या?"
"ती बाजारात गेलीय. तू बैस ना." ती सोफ्यावर माझ्यापासून दोन ध्रुवांइतकं अंतर ठेवून बसली.
काही वेळ असाच गेला.
"रोमा, जरा मला आधार देशील त्या कोपर्‍यातल्या टेबलापर्यंत जाण्यासाठी." मी कुबड्या बेडरूमध्येच विसरलोय, हे लक्षात येताच माझ्या अपंगत्वाचा फायदा घ्यायचे ठरवले.
"कशाला? काही हवयं का आपल्याला?"
"तिथे एक मासिक आहे. ते हवं होतं."
"मग तुम्ही कशाला त्रास घेताय? मी आहे ना. थांबा, मी देते." असं म्हणून तीने त्या टेबलावरील मासिक आणून माझ्या हाती दिले.
ज्या अर्थी मासिक मागून घेतलयं, त्याअर्थी ते वाचणं क्रमप्राप्त होतं. मी मधलं कुठलंतरी पान उघडून नुसताच वाचण्याचा अभिनय करू लागलो.
आता काय करायचं? तिच्या एका स्पर्शासाठी मी आतूर झालो होतो.
हां..! माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.
चहा करायला सांगू या. म्हणजे काय होईल? साखर आणि चहापावडरचा डबा कुठे आहे? ते सांगण्याच्या निमित्ताने ती मला स्वयंपाकघरापर्यंत नेण्यासाठी आधार देईल.
"रोमा, थांब मी तुझ्यासाठी चहा टाकतो." उभं राहण्याची व्यर्थ धडपड करत मी.
"तुम्हांला सांगितलं ना त्रास घेवू नका म्हणून. मला नकोय चहा."
"असं कसं..! तू काय रोज येणारेस होय आमच्या घरी?" मी हट्टाला पेटलो होतो.
"बरं. पण चहा मी करणार." हे ऐकून जंगली चित्रपटातील शम्मी कपूरसारखी 'याहू' म्हणून उडी मारण्याचे माझ्या मनी आले.
"चल मी तुला साखर आणि चहापावडरचे डबे दाखवतो."
मी तिच्या खांद्यावर हात टाकून लंगडत लंगडत स्वयंपाकघराकडे जाऊ लागलो. असं वाटतं होतं, स्वयंपाकघर पार काश्मिरपर्यंत असतं तर काय बहार होती..!

आणि अचानक...

पौराणिक हिंदी मालिकेत जसे राक्षस अचानक कुठेही कुठल्याही रूपात प्रकट होतात, तशा सौ. दारात प्रकट झाल्या. माझं सारं अवसान गळून पडलं.
रोमा आणि माझ्यातलं हे दृश्य पाहून सौ भलत्याच चेकाळल्या होत्या, हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नव्हती. तीचा चेहराच बोलत होता.
"पाय घसरलाच ना शेवटी..!" सौ. माझ्यावरच घसरल्या.
नंतर तीने माहेरून आंदण मिळालेल्या ठेवणीतल्या सटवी, नटवी या आणि अशा सारख्या शिव्या देवून रोमाला घरातून हाकलवून लावले. झिंज्या उपटणंच तेवढं बाकी होतं.
आणि शेवटी स्वत:च्या कपाळावर हात मारत बराच वेळ आपल्या नशिबाला दोष देत बसली होती. त्या घटनेनंतर सौ. ने माझ्याशी काही दिवसांपुरता अबोला धरला.

*

दिवस औषधपाणी घेत, पायाचे व्यायाम करत जात होते. पायांत सुधारणा होत होती.

एके दिवशी मी कुबड्या न घेता आपल्या पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न केला.
आणि काय आश्चर्य..! मी उभा राहीलो. माझा आनंद गगनात मावेना. कधी एकदा जावून सौ. ला सांगतो, असे झाले.
मी जमेल त्या वेगाने पळतच स्वयंपाकघराकडे धाव घेतली. आणि..

पायाखालची जमीन सरकावी, तसा मी धाडकन फरशीवर पडलो. सौ. ने फरशी धुण्यासाठी फरशीवर कपडे धुण्याच्या पावडरीचं फेसाळ पाणी टाकलं होतं. माझा बरा झालेला पाय पुन्हा दुखावला.
काय झालं? पाहण्यासाठी सौ. स्वयंपाकघरातून लगबगीने बाहेर आली. द्रव पदार्थावर पडलेला माझा स्थायूरूपी मांसल गोळा पाहून तीने आपली जीभ चावली.
माझा चेहरा ९९ धावांवर 'पाय'चीत झालेल्या खेळाडूसारखा झाला होता.

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

लैच भारी जमलाय. शाब्दीक विनोदाच वरदान खेचुन आणलत तर पुलंची आठवण विसरण्याइतके कौशल्य आपण नक्कीच आत्मसात करु शकाल.
( यावर विनोद नको. मी अत्यंत गंभीरपणे लिहल आहे. )

छान

Happy चांगलं जमलंय रे. आवडलं.

प्रसंग चांगले लिहिले आहेत पण ते एकत्र गुंफले नाहीत नीट असे वाटले. तरी वाचायला मजा आली.

अमित, मस्त लिहीलयस. काही कोट्या सुरेख आहेत. फक्त सलग वाटलं नाही. ती गुंफण सरावाने जमेल यात शंका नाही.

आभार Happy

नितीनचंद्रजी, प्रोत्साहनाबद्द्ल धन्यवाद.
ऋयाम, आपल्या सुचनेबरहूकूम अतिकोट्यांचा मोह टाळेन.

Pages