Coming सून..!

Submitted by A M I T on 6 June, 2011 - 02:32

संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर थेट घरी आलो. हो.. म्हणजे एरवीही मी ऑफीस सुटल्यावर थेटच घरी येतो. "नाकासमोर चालणारा" की काय म्हणतात ना? त्या प्रकारात मोडणारा मी.
घरी आलो पाहतो तर काय?....
कुटूंबीय दोन बोटचं स्वर्ग उरलयं असल्या स्वर्गीय आनंदात...
त्यांच्या चेहर्‍यावर आनंद मावत नव्हता, तरी शेजारचे भिंगार्डेकाका आपल्या तुडूंब सुटलेल्या पोटाला न जुमानता जसे शर्ट इन करताना आपल्या पँटीत शर्ट अक्षरश: कोंबतात, अगदी तसाच कुटूंबीयांनी मला अज्ञात अशा आनंदाला आपल्या चेहर्‍यात कोंबून टाकला होता. माझ्या छातीत धस्स झालं. कारण जेव्हा जेव्हा माझ्या कुटूंबीयांना आनंद होतो, तेव्हा तेव्हा माझी मनस्थिती प्राईम मिनिस्टर दणकून आपटल्यानंतरच्या देव आनंदसारखी होते.
आता काय वाढून ठेवलयं? याचा विचार करताना माझ्या मेंदूची होणारी ओढाताण आणि देव-दानवांनी समुद्रमंथनावेळी मेरू पर्वताची केलेली ओढाताण यात बरचसं साम्य असावं. बरेच अंदाज बांधून पाहीले, पण छे..! सारेच अंदाज पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे क्षणात कोसळले. यातलं "छे..!" म्हणताना मराठी सिनेमात महेश कोठारे 'डॅम इट' म्हणताना जसं उजव्या तळहातावर डाव्या हाताची मुठ आपटतो, तशी मीही आपटून घेतली.

"काय झालं?" मी प्रसंगाचं गांभिर्य ओळखून प्रश्न केला.
यावर माझी धाकली बहीण तोंड उघडणार तोच आईने तिला नजरेनेच चुप केले. माझी नजर अ‍ॅवॉर्ड फंक्शनच्यावेळी स्टेजवर फिरणार्‍या स्पॉटप्रमाणे कुटूंबीयांवर झरझर फिरत होती.
"अरे हल्ली ना... मला घरातली कामं करताना थकायला होतं." कोणतीही गोष्ट कमालीची फिरवून सांगण्यात आईचा 'हातखंडा' आहे. याबाबतीत तिचा 'हात' या 'खंडा'त कुणी धरू शकत नाही. मी बाबांकडे न उमजून पाहीलं. त्यांनी नुसतेच आपले डोळे मिचकावून मंद स्मित केलं. बाबा शत्रूपक्षात सामील झाल्याचा इशारा मिळाला होता.
"अगं मग एखादी बाई ठेवायची ना घरातली कामं करण्यासाठी." मी तोडगा सुचवला.
"काही नकोय बाई वगैरे.." आई वसकन अंगावर आली.
"मग मी घरी राहू म्हणतेस?" यावर बाबा फिसकन हसले. आईने त्यांच्यावर हिंदी मालिकेतल्या कजाग सासूसारखे डोळे वटारले. मला शंका आली, आता ही तीन-तीनदा मान वळवून बाबांकडे पाहते की काय?
"तू कशाला करायला हवीस कामं?" आईची माया की काय म्हणतात? ती हीच असावी.
"नाही म्हणजे.. बाबांना घरातली चार कामं करताना पाहीलयं बरं मी." बाबांकडे तिरका कटाक्ष टाकत मी.
बाबांचा चेहरा फरशीवर डाळ 'पडते' तसा 'पडला' होता आणि आईच्या चेहर्‍यावर अपराधीपणाचे भाव दाटले होते. आता तीला भडभडून वगैरे येईल, असं मला वाटू लागलं.
"म्हणजे अरे कुणीतरी आपलं माणूस हवयं." 'आपलं' या शब्दावर जोर देत बहीणीने आईचे संवाद चोरले. मागे कुठल्याश्या एकांकिकेत हीने सहकलाकाराची वाक्ये आपलीच वाक्ये आहेत, असं समजून म्हटली होती आणि त्या एकांकिकेस सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका म्हणून गौरवण्यातही आलं होतं. त्याचाच हा प्रभाव होता बहूधा.
"आपलं?" मला आता यातली गोम लक्षात येवू लागली होती. पण तरीही ती मला त्यांच्या तोंडून ऐकायची होती.
"अरे म्हणजे घरात सून आणण्याच्या विचारात आहोत आम्ही." इतका वेळ केवळ मुद्राभिनय करणार्‍या बाबांना अचानक कंठ फुटला.
बाबांचं एक बरयं... ते सरळ विषयालाच हात घालतात.
बाबांनी चांदोबातला एखादा 'चुटकुला' ऐकवला असावा, अशा थाटात मी सोडून घरातली सारी मंडळी हसली.
"सुनेविना घर कसं सुनंसुनं वाटतं." बहीणीने कुठल्याश्या कौटूंबिक नाटकातलं प्रेमळ सासूच्या तोंडचं एक वाक्य साभिनय बोलण्याची संधी दवडली नाही.
"बर्वे सांगत होते, मुलगी अगदी नक्षत्रासारखी आहे." आईने न पाहीलेल्या सुनेचे गोडवे गाण्यास सुरूवातही केली होती.
"मग मी यांना धूमकेतू दिसतो की काय?" मी अर्थात मनात.
मी विचार करू लागलो, आता ही सुनेचे कोण कौतूक करतेय. एकदा घरी आल्यावर घरात 'चार दिवस सासूचे'चा प्रयोग रंगू नये, म्हणजे मिळवली.
"बर्वे अगदी विठ्ठलासारखे धावून आले." बाबांच्या या कोटीवर मात्र सर्वांसह मीही हसलो.
हे स्थळ विठ्ठल बर्वे नावाच्या आमच्या दूरच्या नातेवाईकांनी आणले होते. त्यांचा माझ्याच वयाचा मुलगा माधवला मी नेहमीच

तो हा विठ्ठल बर्वा
तो हा माधव बर्वा

असं चिडवत असे.
कधीकाळी आमची ही चेष्टा हमरा-तुमरीत रूपांतरीत झालीच तर, मी 'बर्वा'च्या जागी 'भड*' ही अक्षरे जोडून मोकळा होत असे. त्याचाच तर विठठल बर्वे बदला घेत नसावेत? या शंकारूपी पालीने माझ्या मनात घोरपडीएवढं रूप धारण केलं.

माझ्या स्वातंत्र्यावर (बायकोरूपी..!) गदा आणली होती... घाला घातला होता. 'हे करा.. ते करू नका' अशा सुचना (की ऑर्डर्स?) मला वारंवार ऐकाव्या लागणार. म्हणजेच डू अँन्ड डोन्ट्स चे सगळे नियम मला लक्षात ठेवावे लागणार.
एकंदरीत एक श्वास घेणं सोडलं, तर माझं जगणचं बायकोच्या हाती असणार होतं.

काही दिवसांनी त्या नक्षात्राचा फोटो मला दाखवण्यात आला. लग्नाआधी सगळ्याच मुली सर्रास अशीच पोझ असलेला फोटो का काढत असाव्यात? हा यक्षप्रश्न आहे. मान थोडीशी कलती केलेली आणि हनुवटीवर उजव्या हाताची बोटे टेकवून काढलेला तो नक्षत्राचा फोटो मी पाहत असताना मी त्या "नक्षत्राचे देणे" लागतो, अशा अविर्भावात कुटूंबीय माझ्याकडे आणि मग एकमेकांकडे आळीपाळीने पाहत होते.

मी अवाक्षरही न बोलता माझा होकार गृहीत धरून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला.

*

माझे कुटूंब आणि काही आप्त असा गोतावळा त्या नक्षत्राच्या घरी अवतीर्ण झाला. अर्थात विठ्ठल बर्वेदेखील आपण या दोन कुटूंबांमधील कसे 'दुवा' आहोत, या खुशामतीत आमच्यासह आले होतेच. तिचे हितचिंतक आणि माझे अजात शत्रू यांच्यात जुजबी गप्पा झाल्या. सोफ्यावर इतकी ऐसपैस जागा असूनदेखील मी लोकलमध्ये चौथ्या सीटवर बसल्यासारखा अंग चोरून बसलो होतो. फासावर जाण्यापुर्वी कैद्याच्या छातीत जशी धाकधूक असते, तशी धाकधूक याक्षणी माझ्याही छातीत होत होती. माझं आणि तिचं कुटूंब हास्यकल्लोळात बुडाले होते. तेव्हा मला 'अनुरोध' चित्रपटातल्या त्या गाण्याच्या ओळी आठवल्या..

ना हसना मेरे गम पे
इन्साफ करना

पण 'मेरे दिल की आवाज' ऐकायला इथं कोण तयार होतं?

माझं हे विचारचक्र चालू असताना अधुनमधून बर्वे लोकसभेत विधेयक संमत की असंमत झाल्यावर उपस्थित सदस्य जशी बाके बडवतात, तशी माझ्या पाठीत आपल्या आखुड हाताची थाप मारून माझी पाठ बडवत होते.

इतक्यात तिच्या वडीलांकडून तिला हजर करण्याची आज्ञा सुटली आणि माजघरात उपस्थित महीलावर्गाची एकच हालचाल सुरू झाल्याचं लक्षात आलं. काही क्षणांत नक्षत्र आमच्यासमोर दाखल झालं. मी किंचीत मान वर करून ब्युटी पार्लरमधून मॉडीफाय केलेला तिचा चेहरा न्याहाळला. ही नक्की फोटोतलीच आहे ना? असा संशय मनी आला होता पण इतक्यात तिनेही माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. तेव्हा मला त्या नजरेत 'अगं बाई..! असा आहे होय माझा स्वप्नांतला राजकुमार..!' आणि 'थांब.. आता बघतेच तुझ्याकडे..!' असे दोन भाव जाणवले.

आई आणि बहीण तिला साडी, इअरींग्ज, मॅचिंग लिपस्टिक, बांगड्या इ. 'शृंगारा'सह पाहण्यात कोण मग्न होत्या.

विठठल बर्व्यांनी "काही विचारायचे असेल, तर विचारून घ्या." असा आदेश दिला आणि आईने अ‍ॅडमिशन घेण्यासाठी आलेल्या पालकांना प्रश्न विचारताना प्राध्यापक घेतात, तशी पोज घेतली. प्रश्नांचा भडीमार सुरू झाला.

आई तिला "तूला कोणती मालिका सर्वात जास्त आवडते?, अमक्या-तमक्या मालिकेचे आतापर्यंत किती भाग पुर्ण झालेत?, गौरीचं काही चुकलं का?, आर्यनची स्मृती परत येईल का?, आशालताने अनुराधाला थप्पड मारली, ते योग्य होतं की अयोग्य?, मिहीरच्या अनैतिक संबंधाने त्रस्त झालेली रिया कोणता निर्णय घेईल?" असले प्रश्न विचारतेय, असा मला भास झाला.

मी वेगळ्याच तंद्रीत होतो, त्यामुळे तो प्रश्नोत्तरांचा तो तास माझ्या कानावरून हवा गेल्यासारखा गेला. मला विचारलेल्याही बहुतेक प्रश्नांची उत्तरे 'आपल्याला या प्रसंगात एकही संवाद मिळाला नाही, हे शल्य सहन न झाल्याने माझ्या बहीणीनेच दिली होती.

यात माझे बाबा मात्र चूप होते. त्यांना त्यांचे 'ते' दिवस आठवत असणार. मला सहानुभूती दाखवण्याची ते संधी शोधीत होते.

समोरील टिपॉयवर कांदापोहे आणि चहा लवकर तोंड उघडून आम्हाला पोटात घ्या, ह्या आशेने आमच्याकडे पाहात होते. तिकडच्या पक्षाचा आग्रह झाला तेव्हा आम्ही प्लेटी हातात घेतल्या.

"बर्वेकाका, कांदापोह्यात कांदाच दिसत नाहीए." मी माझ्या प्लेटीतील पोह्यांत कांद्याची गैरहजेरी पाहून बर्वेकाकांना हलकेच कोपर मारत जमेल तितक्या हळू आवाजात म्हणालो.

"अरे, व्हेज कोल्हापुरीत कधी कोल्हापूर दिसतं का? तू पण ना कमालच करतोस." बर्वेकाकांनी मला अपेक्षित नसलेला संता-बंताचा एक विनोद माझ्या अक्षरश: तोंडावर मारला होता आणि स्वतः आपल्या हातातील प्लेटीवर तुटून पडले.

आमच्या कुटूंबातील सदस्यांनीही एकमेकांच्या प्लेटीत डोकावून कांदा नसल्याची खात्री करून घेतली. पुढे-मागे भांडण झालचं तर, आईला भांडायला आता एक 'पॉईंट' मिळाला होता.

.... आणि एकदाची पसंती झाली.
काही दिवसांतच लग्नाच्या तयारीला भलताच उतही आला.
महीन्याभरात लग्नही उरकलं. लग्नांत आई आता आपल्याला वर्चस्व गाजवायला आणखी एक (म्हणजे आधी बाबा होतेच..!) माणुस मिळाला, या खुशीत मिरवत होती. सगळे सुटले होते. मी अडकलो होतो.
मला 'आजन्म कारावासाची' शिक्षा जी मिळाली होती.

लग्नानंतर शत्रूसमवेत समेट घडवून आणण्याच्या उद्देशाने आम्ही एका हॉटेलात मधूचंद्रासाठी रवाना झालो.
आम्ही ज्या रूममध्ये होतो, त्या रूममधील एका भिंतीवरील एक (आगावू..!) सुचना वाचून मी अवाक झालो.

सुचना होती...

कृपया खिडकी पर पडदा डाल दे
आपका प्यार अंधा हो सकता है
लेकीन हमारा स्टाफ नही...!

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

तु आता जाऊ आईला कामाचा त्रास होतो आहे. यातुन ती नविन सुन घेऊन ये असेच म्हणते आहे तेव्हा लगे रहो.

बाकी लिखान मस्त रे

चांगलं आहे Happy

पण जरा घाई घाईत उरकल्यासारख वाटल << मलाही.. लग्नाच्या घडामोडी अजुन खुलवल्या असत्या तर???

अमित, तुझे लग्न झाले का???? वा वा वा!! अभिनंदन!!! Happy

छान लिहिलेयस! मज्जा आली वाचायला. नेहमीप्रमाणेच मस्त कोट्या!!!! Happy

भन्नाट..

<आता ही तीन-तीनदा मान वळवून बाबांकडे पाहते की काय?>
Lol हे भारीच होतं अरे... अगदी कपूर न फॅमिली सिरीअल्स इष्टाईल Wink

"नक्षत्राचे देणे" पण भारीच.... मज्जा आली

मस्त मस्त. पंचेस जमलेत. ( मायबोलीकरांनो, पंचेसला काही पर्यायी मराठी शब्द आहे का ? )

पहिला परिच्छेद खूपच लांबलाय. पुढे वाचताना मस्त मजा येत होती. पण लग्नाअगोदर निवेदकाला `मुलीला दाखवायचा' अत्यंत महत्त्वपूर्ण अर्ध्या वाक्यात गुंडाळला? फासावर, आपलं बोहल्यावर चढण्याचंही वर्णन नाही?
आणि डायरेक्ट हनीमून? चालणार नाही. पुन्यांदा लिवा.

देव आनंदची मनःस्थिती काय त्याचे चित्रपट आपटले तर बिघडते का? काहीतरीच.

आभार Happy

@ दिनेशदा, अथक, चिमण, लाजो, नानबा, भरत लेख पुन्यांदा संपादीत केलाय.

सुचनेबद्दल वेगळे आभार. Wink

Pages