तापते म्हणून खुपते

Submitted by SHANKAR_DEO on 6 June, 2011 - 01:45

या देशात वाट्टेल ते खपते
साले, आमचेच डोके तापते
किती सांगायचे तुम्हाला
काय आणि कुठे कुठे खुपते..

हाताला झालय घड्याळ जड
निळ्याने घेतली भगव्याची कड
आत्ताच कसे सा-यांना आठवले
आमचेच डोके का तापते
आम्हालाच का खुपते..

हा पुतळा फोडून टाका
त्याचे नाव बदलून टाका
नदी वळवून बांधा बंगले
लोकशाही माळ जपते
आमचेच डोके तापते
आम्हालाच का खुपते..

अण्णा बिचारा साधाभोळा
झूल चढवून करतील पोळा
त्यांचाच मोरु करतील नेते
आमचेच डोके का तापते
आम्हालाच हे खुपते..

बारामतीचा आगळा तोरा
तोंड गोड मागे सुरा
हळूच टाकतील नवे पत्ते
आमचेच डोके का तापते
आम्हालाच हे का खुपते..

निळ्यानंतर हिरवा पत्ता
त्यांचाच न्याय त्यांचीच सत्ता
कोण कोणाला इथे झापते
आमचेच डोके का तापते
आम्हालाच का खुपते..

नशिबाचे आमचेच भोग
काय करील बाबांचा योग
तोंड आमचे खाकी दाबते
आमचे डोके मग तापते
आम्हाला हे का खुपते..

सत्ता हाती भरपूर खाऊ
स्वीस बॅंकेत नेऊन ठेऊ
आंधळा न्याय कायदा हाकते
आमचेच डोके का तापते
मनात असे खुप खुपते..

- शंकर पु. देव

गुलमोहर: