एक बोचरी आठवण (पूर्वार्ध)

Submitted by प्रज्ञा९ on 3 June, 2011 - 11:38

३१ मे २००१. वेळ सकाळ उलटून दुपार होतानाची, पण माझ्या नशीबातली अगदीच काळोखी. त्या दिवशी माझा १२वीचा रिझल्ट होता. मी मजेत होते, की ८५% च्या आसपास गृपला तरी मिळतील. त्याहून जास्त अपेक्षा नव्हती, कारण २ पेपर जरा कठीण गेले होते.

पण मार्कशिट बघून मी बेशुद्ध पडायची बाकी होते. Maths -35, Phy- under 45, Chem- under 45, Bio- under 45. English- 68, Sanskrit- 78. हे नक्की माझे मार्क्स होते?? माझा विश्वासच बसेना. मी कितीतरी वेळा वर नाव तपासलं. माझंच नाव, माझाच सीट नंबर. माझ्या बरोबर ताई आली होती, तिलाही काही सुचेना. माझी मैत्रिणही हैराण.
मला एकदम रडूच फुटलं. ८५ ची अपेक्षा आणि ५०% सुद्धा नाहीत?? असं कसं झालं? आणि गणितात ३५ मार्क???? नक्कीच काहीतरी घोळ होता. आम्ही घरी फोन लावून कळवलं सगळं. (मी ११-१२वी पुण्यात स प कॉलजमधून करत होते. आई-बाबा रत्नागिरीला. ताई आर्किटेक्चरच्या तिसर्‍या वर्षाला, आणि मोठी ताई मुंबईत आयुर्वेद शिकायला होती.)

मी फोनवर खूप खूप खूप रडले. आई-बाबासुद्धा काही बोलू शकत नव्हते. एकच अतिशय महत्त्वाची गोष्ट ही, की सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता, की मी पेपर कसेचतरी लिहून मग आता खोटं काही रडत नाहिये! बाबांनी लगेच हालचाल करायला सुरुवात केली. त्यांनी काही वर्ष कोल्हापूर बोर्डात पेपर सेटर, पेपर चेकर पासून अगदी महत्त्वाचं असं बोर्ड मेंबर हे पद.....इतकं काम केलं होतं. कॉपी केसमधे पुरावे गोळा करून निकाल देणं, ज्यूरी, वगैरे कामं केली होती, त्यामुळे काहीतरी मेजर घोळ आहे हे त्यांच्या लगेच लक्षात आलं होतं. त्यांच्यातला तत्त्वनिष्ठ शिक्षक कामाला लागला होता.
इकडे ताईने कशीबशी समजूत घालून मला मामाकडे आणलं. मामाचं घर नव्यानेच झालं होतं सहकारनगरात. आमचा मुक्काम तिथेच असे सुटीत. तिथे गेल्यावर, चार घास पोटात गेल्यावर मामीने वगैरे समजूत घातली खूप. बरीच फोनाफोनी चालू होती. दुसर्‍या दिवशी आम्ही शिवाजीनगरला जाऊन बोर्डाच्या ऑफिसमधून पुनर्तपासणीचे फॉर्म घेतले, पैसे भरले आणि फॉर्म सबमिट केले. सामान्यपणे काहीही बदल होत नाही हे माहिती होतं, त्यामुळे आलेला रिझल्ट स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पुढे काय हा मोठ्ठा प्रश्न होता.

मी सपमधेच प्रोव्हिजनल अ‍ॅडमिशन घेतली बीएस्सीला. मला Electronics and Telecom करायचं होतं. ८५% च्या आसपास मार्क असतान अ‍ॅड्मिशन कुठे मिळेल वगैरे अंदाज घेतला होता. ते पुरेसे मार्क्स नव्हते, पण अगदी कमिन्स/ व्हीआयटी नाही, तरी एखाद्या बर्‍या कॉलजला तरी मिळेल असं वाटत होतं. किंबहुना ती सगळी माहिती आधीच गोळा केली होती पण सगळंच वाया!

हो-नाही करता करता परत रत्नागिरीतच येऊन, १०वीच्या मार्कांवर डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घ्यायचं ठरलं. हा निर्णय घेणं खूप जड जात होतं. कारण एकतर ११वी-१२वी ची दोन्ही वर्ष एकदमच फुली मारल्यासारखी वाया जात होती. दुसरं म्हणजे खूप स्वप्न रंगवून, चांगले मार्क्स मिळवून पुण्यात शिकायची इच्छा होती, त्यावर पाणी फिरत होतं. बरं डिप्लोमा हा स्टेट बोर्ड मधे येतो, युनिवर्सिटी चं बंधन नाही, तर मग पुणं काय नि रत्नागिरी काय...सारखंच! अ‍ॅन्युअल/ सेमिस्टर चा फरक होता, पण पुढे अभियांत्रिकीसाठी अ‍ॅन्युअल च्या मुलांना जास्त सीट्स असतात ही माहिती मावसभावाने दिली, आणि रत्नागिरीत, शासकीय तंत्रनिकेतन (GPR) ला अ‍ॅन्युअल आहे, ते कॉलेजपण तसं ठीक आहे वगैरेही सांगितलं होतं.

स्वतः मांडलेला डाव असा मोडून जायचा फार त्रास होत होता. २ वर्षांत जुळलेले मैत्रीचे धागे सोडायचे होते, कारण परत रत्नागिरीत गेल्यावर कधी भेट होईल माहिती नव्हतं. जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहिले त्या मावशी, काका, मेसचे काका-काकू-ज्यांनी मला मानसकन्या म्हटलं होतं, अनेक मैत्रिणी...
पेठेतल्या गल्ल्या, पुणे मराठी ग्रंथालय अभ्यासिका...सगळं एकदा मनात साठवून ठेवलं, तो कप्पा घट्ट्ट बंद केला, आणि पुन्हा इतके मार्क्स मिळवेन, की माझ्या मेरिटवर जशी ११वीत अ‍ॅडमिशन मिळवली तशीच अभियांत्रिकीला मिळवेन अशी जिद्द मनात ठेवून, खोलीतलं सामान आवरून पुण्यनगरीचा निरोप घेतला.

रत्नागिरीत आले आणि डिप्लोमाला प्रवेश घेतला. १०वीत उत्तम मार्क्स होते, त्यामुळे पहिल्या दिवशी पहिल्या राऊंडला पहिल्या पाचांत प्रवेश झाला आणि मी बाबांबरोबर वेळेवर घरी आले. बाबा माझ्या मार्कांच्या घोळाच्या अगदी मागे लागले होते. जरी मी पुणे बोर्डातून १२वी केली असली तरी बाबांनी कोल्हापुरात काम केल्यामुळे (रत्नागिरी कोल्हापूर मंडळाच्या अखत्यारीत येतं) त्यांचे हितचिंतक होते तिथे. आणि बाबांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि प्रामणिकपणामुळे एकूणातच अविश्वसनीय वाटणार्‍या या बाबतीत त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मदत करायचं वचन दिलं आणि ते करतही होते.

जुलै-ऑगस्टच्या दरम्यान "No Change in your marks" असं लिहिलेलं पुणे बोर्डाचं एक चिठोरं आमच्या पत्यावर थडकलं. अपेक्षितच होतं. बाबा मात्र कोल्हापुरात, पुण्यात फोनाफोनी करत होते. शेवटी सप्टेंबरात समजलं ते असं, की माझ्या आणि कुणा 'क्ष' मुलाच्या/ मुलीच्या उत्तरपत्रिकांच्या पहिल्या पानाची अदलाबदल केली गेली होती. अर्थातच मुद्दाम. फक्त पहिल्याच पानाची अदलाबदल, जिथे आपण आपला सीट नंबर लिहितो. त्यामुळे माझ्या सीट नं. च्या पानाखाली क्ष ची उत्तरपत्रिका, आणि क्ष च्या सीट नं च्या पानाखाली माझी. त्यामुळे मी लिहिलेल्या उत्तरांचे सगळे मार्क्स क्ष ला आणि क्ष चे मला. त्यामुळे माझे खरे मार्क्स मला समजलेच नाहीत. जे होते ते माझे नव्हते. बरं एवढं करूनही, उपयोग काहीच होणार नाही हेही समजलं. कारण कोर्टकेस जरी केली तरी तेव्हा नियम इतके विचित्र होते, की हस्ताक्षरतज्ञ वगैरे बोलवून फेरतपासणी होत नाही, तशी परवानगी नाही असं बाबांना समजलं होतं. तरीही एक प्रयत्न म्हणून माझ्या २-३ वह्या त्यांनी काही संबंधित लोकांकडे दिल्या होत्या. त्यांनी स्वतः माझे पेपर बघितले म्हणे. म्हणजे खरे पेपर, पण नियमांच्या बंधनामुळे ते काहीच करू शकले नव्हते. त्यांनी जी मदत केली तीही चाकोरीबाहेर जाऊन, बाबांच्या साठी कोल्हापुरात कोणीतरी शब्द टाकला म्हणून केली होती.

त्यातल्यात्यात समाधान एकच, की निदान मी पेपर नीट लिहिले होते हे पुन्हा एकदा समजलं. तसा अविश्वास कुणीच नाही दाखवला. पण ते अभद्र मार्क्शिट बघून माझाच आत्मविश्वास पूर्ण डळमळला होता, त्यावर जरा मलमपट्टी झाली. पुढे त्याबाबतीत अशी सविस्तर माहिती मिळाली, की, माझ्या शास्त्र विषयाच्याच पेपर्स ना असं ट्रीट केलं. आणि ते उघड होतं. इंग्रजी-संस्कृत मार्कांमधे काही घोळ नव्हता. त्याचं कारण असं, की शास्त्र शाखेच्या मुलांचे भाषा विषयाचे पेपर तपासणीच्या प्राध्यापकांना घरी नेण्याची परवानगी असते. पण शास्त्र विषयाचे पेपर कॉलजमधेच तपासले जाणं अनिवार्य असतं. आणि कॉलजमधे हजारो पेपरांत हा घोळ घालायला सोपा गेला 'क्ष' च्या संबंधितांना. त्यांनी काही प्राध्यापकांना पैसे देऊन मार्क बदलतील अशी सोय केली. कारण क्ष ला पुढे जेव्हा कमी मार्क मिळतील(ज्याची त्यांना परीक्षा झाल्यावरच कल्पना आली असणार!) तेव्हा लाखो रुपये भरून पेमेंट सीट घेण्यापेक्षा इथे काही हजार दिले की अ‍ॅडमिशन सहज मिळेल असेच मार्क पाडता/ आणता येतील.

ही सगळी माहिती आम्हाला अगदी आतल्या गोटांतून समजली. 'क्ष' चा शोध नाही लागला, पण ज्यांनी ही माहिती सांगितली त्यांनी स्वतःचं नाव आमच्यापर्यंत येणार नाही याची काळजी घेतली. बाबांना हे सगळं कोल्हापुरात मुद्दाम बोलावून सांगितलं तिकडच्या लोकांनी. तेही केवळ गुडविल म्हणून, आणि खुद्द बाबांनी बर्‍याच कॉपी केसेस किंवा अशी प्रकरणं हाताळली होती म्हणून. दुसरा एखादा असता तर तेही नसतं केलं म्हणाले. बाबा अगदीच खनपटीला बसले होते, आणि कोल्हापुरातले लोक भले होते. अन्यथा अशी पैसे खाऊन केलेली प्रकरणं कधीच त्या चार भिंतींबाहेर येत नाहीत.

एकूण जे सगळं झालं ते खरं सगळं कळूनही खोटंच वाटत होतं. मी बाबांना म्हटलं, "फक्त एकदा, एकदाच, ज्या कोण 'क्ष' ने माझे मार्क्स घेतले आहेत, त्याचं मार्कशिट बघून माझे खरे मार्क्स किती होते हे मला कळेल का हो? आता काही उपयोग नाहे हे खरं, पण वर्षभर जीव आटवून केलेल्या मेहेनतीला किती चांगलं फळ आलं होतं, जे दुसर्‍याला माझ्याकडून हिसकावून घ्यावंसं वाटलं ते तरी कळूदेत मला!"
हे ऐकून इतके दिवस, महिने खंबीरपणे याचा छडा लावणारे बाबा आणि माझी समजुत काढणारी आई- दोघंही बांध फुटल्यासारखी रडली होती.

मधल्या काळात मी इतकी खचले होते, की "बाई गं आता गप्प बसायला काय घेशील" असं मला रागवायला लागत असे, ती आता "काहीतरी बोल गं" असं म्हणण्याइतकी शांत झाले होते. आतल्या आत दु:ख करत होते. त्या काळात आई-बाबा आणि तायांनी खूप समजून घेतलं, सावरलं.....

स्वतःवर संकट आलं तर न डरणारे आई-बाप लेकरावर संकट आलं की कसे हळवे होतात ते बघितलं मी. अजिबात अंधश्रद्ध नसलेल्या दोघांनीही हल्लक झालेल्या मनाला आधार म्हणून माझी पत्रिका वगैरे दाखवली होती. प्रयत्न न सोडता, दैववादी न होता, केवळ एक उपाय म्हणूनच, पण त्यांना गरज वाटली. "तू जेव्हा ३१ तारखेला रिझल्ट कळवलास तेव्हा बाबांचा चेहरा बघवेना इतका काळाठिक्कर पडला होता आणि ते तडक आजोबांकडे गेले होते. आजोबांनी त्यांना समजावलं होतं" असं आई म्हणाली मग मला. मी जेव्हा आजोबांना नंतर भेटले तेव्हा "अज्ञ, जित्ती आलीस हेच खूप हो पोरी!" असं, डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाले होते.

कदचित आत्ता हे सगळं जरा अति वाटेल, पण स्वतःची काही चूक नसताना, केलेल्या मेहेनतीवर असा कोणी येऊन परस्पर पाणी फिरवतो आणि आपली झोळी रिकामीच रहाते तेव्हा काय अवस्था होते ते ज्याचं त्यालाच ठाऊक. कधी कधी वाटतं, की सगळं खरं समजलं नसतं तर 'नशिबाचे खेळ' म्हणून सोडून दिलं असतं. पण कुणाच्यातरी लाचखाऊपणामुळे माझं नुकसान झालं ही चीड, बोच अजूनही आहे मनात.

हे सगळं आत्ता लिहायचं कारण, की नुकतेच काही दिवसांपूर्वी १२वीचे निकाल लागले. आता एकूण सिस्टीममधे बदल झालाय, सीट नं च्या ऐवजी बार कोड आणि गुण द्यायच्या पद्धतीतही बदल झालाय जरा. त्यामुळे अशा केसेस घडतील असं नाही. पण कुणाच्या माहितीत, प्रामाणिक आणि मेहेनती मुलाच्या बाबतीत असं घडलेलं दिसलं तर लगेच मत नका बनवू कोणी Sad

बाबा म्हणाले होते, की एखाद्याचा अपघाती मृत्यू व्हावा तसं झालं होतं घरातलं वातावरण माझ्या या रिझल्टनंतर. सावरायला वेळ लागला होता. पुढचे मार्ग दिसू नयेत इतकं सगळं धूसर झालं होतं!

आता सगळं अर्थातच निवळलंय. मी खरोखरीची B.E. झाले तेव्हाही तीच ताई (आणि मधल्या काळात तिचंही लग्न झालं, त्यामुळे जिजाजींबरोबर) बरोबर होती. तिच्याबरोबर असतानाच नाशिकहून मैत्रिणीचा फोन आला आणि तिने मला डिस्टिन्क्शन मिळाल्याचं सांगितलं. ताई आणि मी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून मनसोक्त रडलो. एक चक्र पूर्ण झालं होतं.
त्यावेळी तिच्याबरोबर जाउन रिचेकिंगचा फॉर्म भरला होता, यावेळी हलवायाकडे जाऊन मलई पेढे आणले!
रत्नागिरीला फोनवर कळवलं. दोन्ही रिझल्ट्च्या वेळी पुण्यातच होते मी, दोन्ही रिझल्ट भर दुपारीच समजले, जेवणाच्या आधी!
एकाने भूक करपली होती, दुसर्‍याने पोट तुडुंब भरलं होतं!
एकाने सगळे रस्ते अडवले होते, दुसर्‍याने हाताला धरून नवा रस्ता दाखवला होता. बाबांनी तर तिकडे दिवाळी साजरी केली. लगोलग दोघंही पुण्यात निघून आली. तेच घर, मामाकडे.

काही वर्षांपूर्वी कसेबसे चार घास खाउ शकलेली मी, या वेळी मामीने केलेले गोड घास घेत होते.
जे घडत होतं ते नक्की स्वप्न नाही ना....माझा हा आनंद आता कोणी हिसकावून घेणार नाही ना....माझं मार्कशिट नक्की माझंच आहे ना... हजार शंका होत्या, पण नेटवर मी स्वतः माझा नंबर डिस्टि. च्या यादीत बघितला. तीपण टायपो असेल असं वाटून, नाशिकला कॉलजमधे फोन करून खात्री करून घेतली लगेच, आणि मगच रत्नागिरीला कळवलं! आणि पुढे सगळं चांगलं घडलं!

आयुष्यात खूप चढ्-उतार येतात...अगदी आपण मुळापासून उखडले जातोय असं वाटण्याइतके प्रसंग येतात, पण घरातल्यांचा आधार आणि आपला आत्मविश्वास, जिद्द असेल तर आयुष्यात काहीही कमी पडत नाही हे हळूहळू समजतंय आता मला!

खरंतर ही कहाणी एवढयात नाही संपलेली, पण आत्ता इथेच थांबते. हे लिहून मला कोणाचीही सहानुभूती नाही मिळवायची, किंवा माझ्या बाबतीत अगदी काहीतरी जगावेगळं घडलंय असंही नाही.

पण जे घडलं त्याने मला एक नवी नजर दिली हे खरं. कुठलाही भला-बुरा प्रसंगा आला तरी खंबीर रहायचं हे मी यातून शिकले.

एक बोचरी आठवण (उत्तरार्ध)

गुलमोहर: 

Sad वाचुन खरेच वाईट वाटले. असे काहीना काहीतरी झोल होतच राहतात.. यु आर नॉट द ओन्ली वन ..

पण तुम्ही तुमच्या मेहनतीने आणी जिद्दीने ईंजी पुर्ण केले ना.. तो "क्ष" विद्यार्थी तसेच करेल का? Happy
आणी तुम्हाला जेवढा आनंद झाला तेवढा त्याला होणार का Happy ?? त्याने कितीही पैसे मोजले तरी त्याला तो विकत नाही घेता येणार...

वाईट वाटलं. एखाद्याच्या मेहनतीचे आयते फळ घ्यायचे अशी प्रवृत्ती आपल्या आयुष्यात आडवी आली की खरेच खूप दु:ख होते. असो. पुढील वाटचालीला शुभेच्छा

वाईट तर वाटलच. पण चीड आली शिक्षणक्षेत्रात असलेली लाचलुचपत वाचून.

प्रज्ञा, एवढ्या धक्क्यातून बाहेर येऊन स्वप्न पुरं केल्याबद्दल अभिनंदन आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाच्या आधाराचपण कौतुक.

आईग्ग! प्रज्ञा, खरेच अशा घोळांमुळे आयुष्य वाया जातात. तू खंबीरपणे निभावलस.
स्वतःवर संकट आलं तर न डरणारे आई-बाप लेकरावर संकट आलं की कसे हळवे होतात ते बघितलं मी>> हे अगदी खरं. मी ही अनुभवलयं.

फार सुरेख लिहीलेत आपण. आणि मॅटर ऑफ फॅक्ट तरीही डोळ्यातून पाणी काढणारे. एका छोट्या मुलीला अचानक अकाली प्रौढ केले असणार या धडधडीत अन्यायाने.
आपण आणि आपले कुटुंबीय सगळ्यांचेच कौतुक वाटले.

प्रज्ञा, छान लिहीलं आहेस. सगळी तगमग, तडफड, निराशा पोचतेय. यातून बाहेर पडणं किती कठिण गेलं असेल याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. पण माझ्यालेखी (आणि कालांतरानं तुझ्याही लेखी) महत्वाचं म्हणजे यातून तू तावून सुलाखून लखलखीतपणे बाहेर पडलीस. काही काही वेदना, शल्य आयुष्यभराचे असतात, कालांतराने बोथट होतात पण एखाद्या हळव्या क्षणी लख्खपणे ती वेदना जाणवते. पुढच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक शुभेच्छा.

काय बोलू! वाचताना क्ष व्यक्तीबद्दल प्रचंड राग आला. वर आवळा यांनी लिहिलेल्याशी सहमत आहे.
तुझ्या जिद्दीला खरोखर दंडवत. फिनीक्स पक्षी आहेस तू.

तुमच्या जिद्दीचे कौतुक वाटते. माझ्या माहितीत एका मुलाला बारावीला असाच नापासाचा शिक्का बसला होता. चौथी,सातवीची स्कॉलरशिप, १०वी ला उत्तम मार्क, बारावीला झटून अभ्यास केला होता त्याने! पण....
त्या मुलाने शिक्षणच सोडले. Sad

माझ्या बाबतीतही असेच झाले होते तेही अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात! त्यामुळे दहावी बारावीला बोर्डात आलेला मी.. माझी एकाही कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड झाली नाही.. माझा तर एक पेपर अनुपस्थित म्हणून आला होता.. मी रि-चेकिंग करवले पण तो पेपर उपस्थित म्हणून आला आणि त्यात उत्तम मार्क होते.. पण बाकीच्या पेपरना तसेच खराब मार्क.. मला तेव्हा ती केस कोर्टात वगैरे नेण्याचे अजिबात सुचले नाही.. नुसता माझी काहीही चूक नसताना आणि पेपर्स चांगले लिहिले असताना निराश होऊन बसलो. नन्तर हळूहळू नोकरी वगैरे चांगली लागून गाडी रुळावर आली...

हे असे होते मला पण बरावीला खुप कमी मिळाले १९९२ मध्ये म्हणजे ९० % PCM पण प्रिलिमला पार्ले कॉलेज मधुन पहिल्या ५ मध्ये होते. अग्रुज च्या प्रिलिमला ९८%, ९८.६६% दुसर्या प्रिलिमला आणि फायनलला एकही चुक वाटत नव्हती आणि ९०% .
सर्वात वाईट वाटले की जी आपली मित्रमंडळी असतात त्यांना मिस करताना पण फायनल एंजिनीरींग्मध्ये
डिस्टिन्क्शन मिळवले त्यात पण माय्क्रोप्रोसेसर चा रिझल्ट शॉडी होता. लागोपाठ २०-२५ जणांना ४० मार्क (ज्यात मिही होते) दिलेले प्रत्यक्शात १०४ मार्काचा पेपर सोडवला होता (असे पेपर असत) आणि एवढा चांगला गेलेला की १०४ चे ४ मार्क कसे कापणार असे मला वाटत होते जे मी घरी पण बोलले होते.
रीचेक रीव्हॅल फ्रॉड असते. काही वेळेला खरोखरचे कमी मार्क्स मिळाले आहेत इंजिनियरिंग फर्स्ट इयरला त्याचे वाइट वाटत नाही पण अशी सल कायम मनात रहाते.
तुमच्यावर तर प्रचंड अन्याय झाला, अशा डिप्रेशन ला कसे तुम्ही तोंड दिले ते कौतुकास्पद आहे मी ज्यांनी हे पेपर तपासले त्यांआ अजुन माफ करु शकत नाही.

सुन्न करून टाकणारा आणि एकूणच शिक्षण पध्द्तीवरील विश्वासाला तडाच जाणारा लेखिकेचा हा अनुभव. तुम्हाला हे प्रकरण टंकायला ३० मिनिटे लागली असतील, नसतील; पण किमान ३० महिने तरी तुम्ही यामुळे उन्हाचे चटके सहन केले असणार यात दुमत नाही.

समाजात अशावेळी 'सहानुभूती' दाखविणारी एक जमात असते. त्यातील खरे किती आणि खोटे किती हाही एक संशोधनाचाच विषय असतो. काहीजण मनातल्या मनात खुशही असतात. पण असो, ही वृत्ती-प्रवृत्ती अनेक प्रसंगी आपल्यासमोर ठाण मांडून येते...प्रश्न असतो तो व्यक्ती अशा प्रसंगाला धैर्याने तोंड कसे देते ते महत्वाचे...जे प्रज्ञा यानी करून दाखविले....बी.ई. तील त्यांचे धवल यशच दाखविण्यास समर्थ आहे की, त्यानी आणि त्यांच्या वडिलांनी अन्याय दूर होण्यासाठी त्या वर्षी जी धावपळ केली ती अनाठायी नव्हती.

आपल्या लेखातील "कुठलाही भला-बुरा प्रसंग आला तरी खंबीर रहायचं हे मी यातून शिकले."....हे सार फार फार महत्वाचे आहे....सार्‍याच प्रसंगी उपयोगी पडणारे आहे.

की नुकतेच काही दिवसांपूर्वी १२वीचे निकाल लागले. आता एकूण सिस्टीममधे बदल झालाय, सीट नं च्या ऐवजी बार कोड आणि गुण द्यायच्या पद्धतीतही बदल झालाय जरा. त्यामुळे अशा केसेस घडतील असं नाही. पण कुणाच्या माहितीत, प्रामाणिक आणि मेहेनती मुलाच्या बाबतीत असं घडलेलं दिसलं तर लगेच मत नका बनवू कोणी

>> एकदम बरोबर

बाप रे, काय भयानक ग् प्रज्ञा!
माझीच इतकी चिडचिड झाली हे वाचून.. सलाम तुझ्या खंबीर अ‍ॅटिट्युड ला आणि B.E. यशस्वी होण्याच्या जिद्दीला !

बापरे.. रैना म्हणतेय तसे आयुष्य वाया जाते स्वतःची काहीही चूक नसतांना. अगदी शेजारच्या मुलाची काय वाताहत झाली ते बघीतलय. आज परत तेच सगळे आठवले. १०वीला बोर्डात आलेल्या मुलाला १२ वीला ३५% मार्क. त्यांनी तर कोर्ट केस वगैरे सगळे केले होते. कोर्टात त्याच्या बहुतेक सगळ्या पेपरवर लाल रंगाने काट मारलेली सिद्ध झाली आणि त्यामुळे त्याने सगळे लिहीलेले असूनही त्याला अगदी पासिंग मार्क मिळाले.
तुझ खूप कौतुक अश्या धक्क्यातून तू कच न खाता परत लढा दिलास. माझ्या ओळखीच्या केस मधे मुलगा इतका हताश झाला की त्याने बी कॉमला अ‍ॅडमिशन घेतली पण ते पण पूर्ण केले नाही/करू शकला नाही. त्यापेक्षा आता सीईटी आणि इतर एन्ट्रन्स असतात ती पद्धत खूप चांगली आहे असे वाटते. एकदा वाईट निकाल आला तर परत परत परीक्षा देण्याची संधी आहे हे खूप दिलासादायक आहे.

प्रतिक्रियेसाठी सगळ्यांना धन्यवाद.
@शैलजा, अनुभवलं म्हणून सांगते, होईल सगळं नीट. कदाचित एखादं वळण जास्त घ्यावं लागेल, पण मार्ग नक्की निघेल.

हे सगळं घडत असताना आई-बाबा ज्या खंबीरपणे माझ्या पाठीशी होते त्याला तोड नाही. खरंतर हा प्रसंग ही सुरुवात होती. मी पास आउट होइतो माझ्या मागे मार्कांची साडेसातीच होती म्हणायला हरकत नाही. हा प्रसंग बरा म्हणावं बरंच काही घडलं मी इंजिनीअरिंग शिकत असताना. अगदी शिक्षण सोडून, मिळालेल्या डिप्लोमावर नोकरी करावी इतकं डिप्रेशन आलं होतं. (तेही इथे लिहायला घेतलं होतं, पण मग मीच डिलिटून टाकलं) त्यातूनही आई-बाबा-ताई यांनीच बाहेर काढलं मला. इतका विश्वास त्यांनी कसा ठेवला माझ्यावर हाच प्रश्न पडतो कधीकधी. म्हणजे राग वगैरे नाही, पण एखाद्या कुणी काळजीनेही म्हटलं असतं, की जाऊदेत गं, दुसरा मार्ग बघू... पण यांनी मला कुठेही डिस्ट्रॅक्ट नाही होऊ दिलं.
त्या ७ वर्षांतला एक एक दिवस आठव्तो अजूनही. मी आज जी काही आहे ती केवळ त्यांच्यामुळेच आहे. कधी कधी वाटतं, की मी त्यांना आनंद द्यायच्या वयात तेच मला सावरत होते... काय वाटलं असेल त्यांना!
गेल्या जन्मी काय पुण्य केलं म्हणून असे आई-बाप मिळाले ते देवच जाणे!

पुन्हा एकदा सगळ्यांची मनापासून आभारी आहे मी.

प्रज्ञा, तुझ्या हिंमतीला सलाम ! प्रश्न दहावी-बारावी, मार्कांना दिलं जाणारं महत्व ह्याचा नाहीये. ताकावरचं लोणी अलगद पळवावं तितक्या सहजतेने कुणी तुझे सगळे कष्ट ... नव्हे स्वत्व मातीमोल करु शकतं हे प्रचंड चीड आणणारं आहे. हा अनुभव वाचतावाचता सुद्धा संतापायला झालं, एकीकडे असहाय्य वाटलं. तू आणि घरच्यांनी हा अन्याय कसा सहन कसा केला असेल !
पण तेव्हा जिद्द दाखवलीस म्हणून तर ... ! बीई होईपर्यंत ती आठवण राग, निराशा असं कायकाय बरोबर घेऊन येत असेल. आता मात्र त्या आठवणीबरोबर अभिमान आणि आत्मविश्वास असेल की मी ह्या अन्यायाला पुरुन उरु शकले.
मनःपूर्वक शुभेच्छा !

प्रज्ञा ग्रेट. तुझ्या जिद्दीला तोड नाही. स्वतःची काही चुक नसते तेव्हा आपण नशीबावर सगळ खापर फोडुन हताश होतो. पण तु जी हिंमत दाखवलीस ती कौतुकास्पद आहे. तुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. Happy

एका क्षणात होत्याचं नव्हतं होणं म्हणजे काय हे दाखवणारा अनुभव.

वरचा अगोचा प्रतिसाद छान आहे. तो वाचूनच मम म्हणावंसं वाटलं.

खूप कौतुक वाटलं तुझं आणि तुझ्या घरच्यांचं आणि चीड आली असले प्रकार करणार्‍या लोकांची.
मनःपूर्वक शुभेच्छा तुला.

बापरे..
तुझ्या जिद्दीला, अ‍ॅटिट्युडला सलाम आणि तुझ्या घरच्यांनाही.. ग्रेट.

बाकी शिक्षणव्यवस्थेवर,त्यातल्या पळवाटांवर आणि त्या पळवाटांच्या राखणदारांवर बोलण्यात तर काही अर्थच नाहीये..

सुन्न करुन टाकणारा लेख!
खरच वाचल्यावरच इतकी चिडचीड झाली माझी आणि तु तर त्यातुन गेलीयेस..पण यातुनही सावरुन, आलेल्या परिस्थितीच्या नाकावर टिच्चून तु यश मिळवलस..तुझ्या जिद्दीचं कौतुक आहे!

Pages