राजाराम सीताराम एक, राजाराम सीताराम दो। .... भाग १

Submitted by रणजित चितळे on 28 May, 2011 - 22:54

इंडियन मिलिटरी एकॅडमी – भारतीय सैन्य प्रबोधिनी. डेहराडून स्थित भारताची प्रमुख सैनिकी शिक्षण देणारी व थलसैन्यातले आधीकारी देणारी संस्था. त्या संस्थे बद्दल व तेथल्या अनुभवांवर बांधलेली एक कथा.

प्रवेश

गाडी डेहराडून स्टेशनावर थांबली. मी एसी फर्स्ट क्लास मधून पाय उतार झालो. मला घ्यायला सैन्यातला एक सुभेदार आला होता. मला बघितल्या बरोबर सावधान होऊन कडक सॅल्यूट ठोकून त्याने राम राम साब असे मला संबोधले. राम राम, रामचरणसाब, कैसे हो। त्याच्या गणवेशावर लावलेल्या नावाची पाटी वाचत मी म्हणालो. ठिक हैं साब। असे म्हणत सुभेदार रामचरणसाब माझ्या बरोबर स्टेशनाबाहेर पडला. माझे सामान तोपर्यंत मला घ्यायला आलेल्या गाडीत ठेवले गेले होते. मी काळ्या अंब्यासॅडर मध्ये बसून, गाडीच्या सिटवर माझ्यासाठी ठेवलेली फाइल चाळायला घेतली. त्या फाइलच अनुसार पुढचे काही दिवस इंडियन मिलिटरी एकॅडमी म्हणजे आयएमए मधल्या ऑफिसर मेस मधली शिवालीक नावाची रूम माझ्यासाठी राखीव ठेवली होती. फाइल मध्ये माझा तेथला कार्यक्रम दिला होता तो न्याहाळत असतानाच माझ्या गाडीने आयएमएच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्या घेतल्या समोर भव्य चेटवोड बिल्डिंगचे विहंगम दृश्य बघायला मिळाले. लाल छोट्या छोट्या विटांनी बांधलेली ती पूर्विची भली मोठी इमारत, गेरुच्या लाल रंगांच्या भिंती, मध्ये मध्ये गोल पांढ-या खांबांचा उठावदार आधार, मोठ्या मोठ्या शिसवीच्या लाकडी खिडक्या, मजल्याची उंची आजच्या दोन मजल्यांएवढी भरेल अशी व छत म्हणून नवीनंच शाकारणी केलेली काळपट रंगाची डौलदार कौलांनी सजलेली ती इंग्रजकाळीन सरंजामी ब्रिटिश थाटाची इमारत १९३० साली रसेल साहेबांच्या देखरेखीखाली बांधली गेली होती. ही इमारत भारतीय सैन्य प्रबोधीकेचे गर्भगृह आहे. ह्या इमारतीचे नाव फील्ड मार्शल सर फिलिप चेटवोड ह्या आयएमएच्या संस्थापकांचे स्मरण राहावे म्हणून ठेवले गेले आहे. चेटवोड साहेबांनी त्या वेळची इंडियन मिलिटरी एकॅडमी वाढवली. १९३० साला पासून ह्या इमारतीच्या मध्यभागी असलेल्या उंच मनो-यावरचे मोठे घड्याळ पासिंग आऊट परेड बघत आले आहे. ह्याच चेटवोड हॉलच्या पुढच्या भल्या थोरल्या ड्रिलस्क्वेअरवरून फील्डमार्शल मानेकशॉ ह्यांचा पाहिला कोर्स पास आऊट झाला होता. ह्या हॉलच्या मुख्य द्वारावर फील्ड मार्शल सर फिलीप चेटवोड ह्यांचे वाक्य कोरले आहे जे प्रत्येक पासआऊट होणा-या जंटलमन कॅडेटच्या छातीवर कोरले जावे अशी आशा आयएमएचा प्रत्येक कमांडंट करत असतो. ते हे आयएमएचे व भारतीय सेनेचे ब्रीद वाक्य

“The safety, honour and welfare of our Nation comes first, always and every time.

The honour, welfare and comfort of the family you belong to come next.

Your own ease, comfort and safety come last, always and every time. ”

माझी गाडी ऑफिसर्स मेस मधल्या माझ्या शिवालीक ह्या खोली जवळ पोहोचली तसे लागलीच कोणीतरी दार उघडायला पुढे झाले. सामान रूम मध्ये ठेवले गेले. माझा येथला पहिलाच दिवस असल्या कारणाने मी गणवेश चढवला व चेटवोड हॉल मधल्या एडज्युटंटच्या आलिशान ऑफिसमध्ये दाखल झालो. एडज्युटंटने चहा बोलावला व माझ्या प्रवासा बद्दल चौकशी केली.....

मी त्या दिवशीचे काम आटोपून माझ्या रूमवर संध्याकाळी दाखल झालो. १३१ व्या कोर्सच्या पासिंग आऊट परेड जिला थोडक्यात पिओपी असे संबोधले जाते त्या पिओपी साठी मी आलो होतो. २० वर्षांपूर्वी मी ८४ व्या कोर्समधून पास आऊट झालो होतो. वीस वर्षांपूर्वीची आयएमए व माझे जंटलमन कॅडेट म्हणून तेथील वास्तव्य क्षणार्धात माझ्या मनःपटलावर उमटले. असे वाटत होते की मी अजून जंटलमन कॅडेटच आहे व माझीच पिओपी आहे.

गाडी डेहराडून स्टेशनावर थांबली. मी जेव्हा प्रवास सुरू केला होता नेमके तेव्हाच माझ्या कडे आरक्षण नव्हते. त्या वर्षी आमच्या कॉलेजचा निकाल नेमका उशीरा लागला होता त्यांतच आयएमए मध्ये निवड झाल्यामुळे मला तडका फडकी रुजू व्हायचे पत्र आले होते. त्यावेळी तत्काळ बुकींग सेवा किंवा इंटरनेट बुकींग असल्या काहीच सुविधा नव्हत्या. डोंबिवलीला रेल्वेची आरक्षण सुविधा नव्हती. कल्याण स्थानकावर जावे लागायचे. मला दादर स्थानका पर्यंत सोडण्यासाठी वडील आले होते. डेहराडून एक्प्रेसच्या जनरल बोगी मध्ये हमालाला पैसे देऊन सगळ्यात वरचा बर्थ पटकावला होता. त्याच बर्थ वर माझी ट्रंक व एक सुटकेस चढवली गेली. वडलांना सांगितल्या नुसार मी पुढचे ३६ तास त्या बर्थवरून हालणार नव्हतो, नाहीतर त्या जनरल बोगीत कोणीतरी माझ्या जागेवर बसले असते.

३६ तासांनी रात्री ८ वाजता डेहराडून आले व मी पायउतार झालो. हमाल शोधला व ट्रंक व बॅग घेऊन स्थानका बाहेर पडलो. आयएमएच्या प्रवेश सूचनांप्रमाणे आम्हाला घ्यायला गाडी येणार होती, त्यामुळे तिला शोधण्याचा पुढचा कार्यक्रम हाती घेतला. बाहेर चांगलाच अंधार पडला होता. नवीन स्थानक व रात्र. स्थानका बाहेर इकडे तिकडे बघितले व हरवलेले चेहरे घेऊन विशीतली काही मुले एके ठिकाणी उभी होती तेथे जाऊन धडकलो. सेनेची हिरव्यारंगाची एक बस उभी होती व एक सेनेतला एक गणवेशधारी, स्वतःच्या डायरीमध्ये आलेल्या मुलांची नावे लिहीत होता. माझे नाव डायरीमध्ये दाखल होतच होते तेवढ्यात एक रुबाबदार सरदारजी आला. गणवेशात नव्हता पण बोलण्या वागण्यावरून कोणी सैन्य आधीकारी असावा असे वाटले. पुढे येऊन आम्हाला म्हणतो –

गाइज,
वेलकम टू द ग्राईंड.
यु ऑल, गेट पॅक्ड इन दॅट बस क्युकली एंड लेटस गो.

आयएमए जॉईन होण्या आधी ब-याच जणांकडून तिथल्या रॅगिंग बद्दल ऐकले होते. त्यामुळे मनात त्याची सुप्त भीती बाळगून होतो. रॅगिंग होतेच हे माहीत असल्या कारणाने ते कधी सुरू होणार ह्या बद्दलची अटकळ लावत बस मध्ये बसलो. रॅगिंग गेल्या गेल्या सुरू होणार की कसे असे हजार प्रश्न. बस मध्ये कोणीच एक दुस-याशी बोलत नव्हते. सगळेच बहुतेक घरच्या विचारात असावेत. मी तरी होतो. त्या वेळेला अजून
एस टी डी दूरध्वनी सुरू झाले नव्हते. मोबाईल्स हे नाव सुद्धा अस्तित्वात नव्हते. घरच्यांना माझे पत्र पोहचल्यावरच कळणार होते माझे सुखरूप पोहोचणे. मी प्रवेश सूचनांचे पुस्तक नजरे समोर न्याहाळत उगाचच बसलो होतो. बाहेरचे बघण्यात काही स्वारस्य नव्हते. आमच्या बसने आयएमएच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश घेतला. रात्र झाली होती व आयएमए बद्दल काहीच माहिती नसल्याने त्या अंधारात आम्हाला कोठे नेत होते ते काही समजत नव्हते. बस थांबली तसे मी जड मनाने खाली उतरलो. सामान उतरवले. आम्ही अंगणात उभे होतो. अंगण चौरस आकाराचे होते. त्याच्या चहू बाजूने, बैठ्या कौलारू चाळे सारख्या छोट्या छोट्या खोल्या होत्या. वरून बघितले तर कोणाला मध्ये चौकोनी अंगण व भोवताली चारी बाजूने असलेली बैठी चाळ दिसेल. चौरसाची एकेक बाजू, दहा दहा स्वतंत्र खोल्यांची होती. चौरसाच्या प्रत्येक कोप-या मध्ये सार्वजनिक स्नानगृह. आमच्या सिनियर्सने आमचे स्वागत केले. प्रवास कसा झाला विचारले. प्रत्येकाला त्याची त्याची खोली दाखवली. आमच्या साठी अंगणा मध्ये गरम चहाचे स्टीलचे पिप ठेवले गेले होते व बिस्किटे होती. आम्ही चहा प्यायलो व तेथेच थोड्या वेळाने एका टेबलावर जेवण मांडून ठेवले होते ते उभ्या उभ्या पटकन जेवलो व आपआपले सामान घेऊन प्रत्येकाच्या नेमून दिलेल्या खोल्यांत जाऊन आडवे पडलो. घरच्या आठवणीने घशात हुंदक्याची गाठ निर्माण झाली होती. रामाचे नाव घेत घट्ट डोळे मिटून पडून राहिलो. झोप कधी लागली कळलेच नाही. सकाळ झाल्यावर जेव्हा उमगले की आपण कोठे आहोत तेव्हा तर दुःख अनावर झाले, घरची मंडळी आता पुढचे वर्ष भर दिसणार नाहीत म्हणून. वर्षभर सुट्टी नाही असे आमच्या जॉयनिंग इन्स्ट्रक्शन्स मध्येच लिहिले होते.

(क्रमशः)

http://rashtravrat.blogspot.com
http://bolghevda.blogspot.com

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चितळे सर,
माझे वडील Defence Accounts ला होते. भारतात बऱ्याच वेगवेगळ्या defence च्या units ला होते. but last 10 years of his service he was working at Airforce unit at lohgaon out of which few years as ACDA . Sorry for writing candidates....i wanted to write cadets but by mistake wrote wrong spelling.

Pages