एका वाक्यातलं आर्ट ऑफ लिव्हिंग

Submitted by ललिता-प्रीति on 12 May, 2011 - 05:35

शाळेत असताना ‘सुविचार’ हा एक छळवाद मागे लागलेला असायचा. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच्या सूचनाफलकावर आणि नंतर वर्गातल्या फळ्यावर रोज एक नवा सुविचार लिहिण्याचं काम आळीपाळीने करावं लागायचं. सहावी-सातवीत असेपर्यंत त्या सुविचारांचा पुरवठा न चुकता मराठीच्या बाईंकडून व्हायचा. आठवीपासून ती ही अतिरिक्त जबाबदारी अंगावर येऊन पडली. बर्‍याच वेळेला असंही व्हायचं की जी वाक्यं आम्ही ‘सुविचार!’ म्हणून निवडायचो ती बाईंच्या मते अगदीच साधी ठरायची. पुन्हा, ‘अति तिथे माती’सारखी घासून गुळगुळीत झालेली वाक्यं लिहायची म्हणजे शान के खिलाफ! त्यातूनच कधीतरी सुविचाराच्या जागी एखादं संस्कृत सुभाषितही चालतं हे कळलं. कळल्यावर बर्‍यापैकी हायसं वाटल्याचं मला अजूनही आठवतंय. मग, वर्गात सर्वांसमक्ष ज्यांचा अर्थ सांगणं त्यातल्या त्यात सोपं जाईल अशी सुभाषितं संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातून शोधून आम्ही फळ्यावर लिहायचो.
सुविचारांचा अन्वयार्थ लावण्याच्या दृष्टीनं मराठी (आणि काही अंशी संस्कृत) त्यातल्या त्यात बरं पडायचं. इंग्रजीची मात्र त्या आघाडीवर जरा कठीणच अवस्था होती. काहीकाही इंग्रजी सुविचार तर एखाद्या अत्यंत अवघड कोड्याप्रमाणे वाटायचे. त्यातला एक माझ्या चांगला लक्षात राहिलेला म्हणजे To know what we know that we know, what we don't know that we don't know, is knowledge हा सुविचार. आपल्याला जे माहीत आहे ते आपल्याला माहीत आहे हे माहीत असणे, तसेच जे माहीत नाही ते आपल्याला माहीत नाही हे(ही) माहीत असणे म्हणजेच खरे ज्ञान! `that' या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग, प्रयोगाची पध्दत इ. शिकवण्याचा एक भाग म्हणून हा सुविचार आमच्या बाईंनी आम्हाला लिहायला सांगितला होता. आता, कुठलीही चांगली गोष्ट, मग ते एखादं प्रेरक वाक्य असो वा पानभर कथा, त्याचा अभ्यासात समावेश केला की त्याचं काय होतं ते नव्यानं सांगायला नको. या सुविचाराचंही तसंच काहीसं झालं. त्याचा योग्य तो अर्थ लावण्यात आणि तो अर्थ मेंदूपर्यंत पोहोचण्यात आमचे इयत्ता आठवीतले इंग्रजीचे अनेक तास खर्ची पडले होते. म्हणजे, झापडं लावून आम्ही त्यावर आधारीत असलेला व्याकरणाचा प्रश्न अचूक सोडवायचो, नाही असं नाही, पण ते आम्ही समजून उमजून करायचो असं मी आजही म्हणणार नाही! (त्याचदरम्यान एकदा बाईंनी आम्हाला त्या सुविचाराचं मराठीत भाषांतरही करायला सांगितलं. त्यावेळी वर्गातल्या एकानं त्याचा दुसरा भाग ‘...तसेच जे माहीत नाही ते माहीत नाही हे माहीत नसणे’ असा भाषांतरीत केला होता. त्यावर आम्ही लगेच तोंड लपवत खुसफुसत हसून घेतलं होतं. सहाध्यायींच्या भरवर्गातल्या फजितीवर हसायला मजा येते हे आम्हाला माहिती असल्याचं नक्की माहीत होतं.)
असलाच अजून एक सुविचार - The more we know, we know how less we knew. आपण जसजसं अधिकाधिक ज्ञान मिळवत जातो तसतसं आपल्या लक्षात येतं की आधी आपल्याला किती कमी गोष्टी ठाऊक होत्या.(या सुविचारात शेवटी ‘know’ लिहायचं की ‘knew’ त्यावर आम्ही मैत्रिणींनी बराच खल केलेला होता!) पहा ना, मातृभाषेत समजायला किती सोपं गेलं असतं; पण ते परकीय भाषेत आल्यामुळे आम्हाला तेव्हा त्याच्याशी नीटशी नाळ जुळवताच आली नाही. असो.

शाळा संपली तसा असल्या सुविचारांशी असलेला संबंधही संपला. शिवाय, कानावर पडलेल्या अथवा वाचनात आलेल्या सुविचारांचा योग्य तो अर्थ लक्षात घेऊन ते आचरणात आणायचे असतात, किंबहुना ते आचरणातही आणता येतात हे उमगण्याचं ते वय नव्हतं. पण काही वर्षांपूर्वी अचानक कानावर पडलेला एक सुविचार, जो निदान मी तरी तेव्हा प्रथमच ऐकला होता, तो मला अतिशय उद्‌बोधक, प्रेरक वाटला. तो ऐकल्यापासून आजवर अनेकदा मी आचरणात आणला आहे. जितक्या जास्त वेळा मी त्याचा वापर करते तितका तो जास्तच आनंददायी, आवडीचा, लाडका वाटतो.
खरंतर तो इंग्रजी भाषेतला एक साधासुधा, एका ओळीचा प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःलाच विचारायचा आहे; त्याचं खरंखुरं, प्रामाणिक उत्तर स्वतःलाच द्यायचं आहे आणि त्या उत्तरावरून स्वतःशीच काही निष्कर्ष काढायचे आहेत. हा प्रश्न दिवसा, रात्री, काम करताना, विश्रांती घेताना, प्रवासात, घरात, कुठेही आणि कधीही आपण स्वतःला विचारू शकतो आणि दरवेळी त्याची निरनिराळी उत्तरं मिळवू शकतो. त्याला काळवेळेचं, वयाचं बंधन नाही! ती दरवेळची निरनिराळी उत्तरं मनाला तजेला देऊन जातात. आपला कंटाळा अचानक, एका क्षणात दूर करू शकतात. आपलं आयुष्य किती एकसुरी आहे, त्यात वैविध्य कसं ते नाहीच हे मनावर वेळप्रसंगी मळभ दाटवणारे विचार एका झटक्यात दूर सारले जातात. निदान मला तरी तसाच अनुभव येतो दरवेळी.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ अशा गोंडस नावाखाली भरणारी शिबिरं, तिथे होणारी लाखो रुपयांची उलाढाल, तमाम बाबा, माता इ.चं प्रस्थ, सगळं सगळं उधळून लावण्याची क्षमता त्या एका प्रश्नात आहे आणि तो प्रश्न म्हणजे ‘When was the last time you did something for the first time?’

एक दिवस फावल्या वेळात इकडची तिकडची टी.व्ही.चॅनल्स्‌ पाहत असताना हे प्रश्नार्थक वाक्य मी प्रथम ऐकलं होतं. ‘डिस्कवरी’ चॅनलच्या काही वर्षांपूर्वी दाखवण्यात येणार्‍या जाहिरातीची ही ‘कॅचलाईन’ होती. (डिस्कवरी चॅनल‘ची’ जाहिरात, चॅनलवरच्या एखाद्या कार्यक्रमाची नव्हे.) हा प्रश्न स्वतःलाच विचारा आणि त्याचं उत्तर जर नजीकच्या भूतकाळातलं नसेल तर अजून नवनवीन गोष्टी शिकत रहा, करत रहा, शोधत रहा किंवा हे सगळं करणारे डिस्कवरीवरचे कार्यक्रम बघत रहा असा काहीसा त्या जाहिरातीचा सूर होता. अर्थात, त्यादिवशी प्रथम ऐकताना हे सगळं काही मला कळलेलं नव्हतं. त्या वाक्याचा सारांश माझ्या मेंदूपर्यंत पोहोचेपर्यंत मी २-३ चॅनल्स्‌ पुढे निघूनही गेले होते. लग्नाच्या पंगतीत वाढपी ‘चटणी, चटणी’ करत समोर येतो. आपण त्याला ‘वाढ’ अशी खूण करेपर्यंत तो चार ताटं पुढे निघून गेलेला असतो. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. काही सेकंदांनी त्या वाक्यातला गहिरा अर्थ मला प्रथम जाणवला. हे काहीतरी वेगळं आहे हे लक्षात आलं. मी पुन्हा मागे वळून डिस्कवरी चॅनलकडे गेले. तोपर्यंत अर्थातच ती जाहिरात संपलेली होती. पण त्या एका वाक्यानं मात्र माझ्या मनात घर केलं ते कायमचंच. When was the last time you did something for the first time? तुम्ही एखादी गोष्ट आयुष्यात प्रथमच केली आहेत असं यापूर्वी शेवटचं कधी घडलं होतं?
मी विचार करायला लागले. आधी पटकन काही उत्तरच मिळेना. या साध्याश्या प्रश्नाचंही उत्तर आपल्याला मिळू नये? या विचारानं मी हताश झाले. मग अनेक वर्षं जपून ठेवलेलं आणि नंतर विस्मृतीत गेलेलं पहिल्यावहिल्या विमानप्रवासाचं तिकीट वगैरे अचानक सापडावं तसं उत्तर मनात आलं ते म्हणजे लग्न! हे उत्तर नजीकच्या भूतकाळातलं नक्कीच नव्हतं. मग फारच उदास उदास वाटायला लागलं. आपण आपले साधेसुधे मध्यमवर्गीय; ‘आयुष्यात प्रथमच’ असली बिरुदं चिकटवता येतील असं काही जगावेगळं, भव्य दिव्य आपण कुठे काय करतो? हा प्रश्न आपल्यासारख्यांसाठी नाहीच्चे, तो आपण वाचलाच नसता तर बरं झालं असतं असंच मग वाटायला लागलं. असं कुठलंतरी आगापिछा नसलेलं वाक्य वाचून त्यावर विचार करत, स्वतःशीच कुढत मी बसले आहे असं त्याआधी कधीच झालेलं नव्हतं. या विचारासरशी मला एकदम ‘युरेका!’ झालं. कारण त्या प्रश्नाचं उत्तरच मला मिळालं होतं. काही मिनिटांपूर्वीच मी अशी एक गोष्ट केली होती जी मी त्यापूर्वी कधीच केलेली नव्हती! तेव्हापासून मग मला एका अर्थाने नादच लागला. दिवसभरात एकदा तरी हा प्रश्न मी स्वतःला विचारायला लागले.
या प्रश्नाची अक्षरशः अगणित उत्तरं आपल्याला मिळू शकतात. अगदी ‘आज प्रथमच असं घडलं की बाजारातून आणलेली मेथीची पेंडी लगेच निवडून लगेच त्याची संध्याकाळी भाजीही केली!’ इथपासून ‘यावेळी प्रथमच न्यूयॉर्कला जायला नॉनस्टॉप फ्लाईट मिळाली’ इथपर्यंत.
मेथी निवडणे हे किती किचकट आणि कंटाळवाणं काम असतं यावर समस्त गृहिणीवर्गाचं एकमत होईलच. तरीही समजा एखादा दिवस ‘आणली, निवडली, चिरली, भाजी केली’ असं घडलंच तर? त्या प्रश्नाचं एक नवीन उत्तर आपल्याला मिळालेलं असतं आणि स्वतःचीच पाठ मग थोपटून घ्यावीशी वाटते.
तीच गत न्यूयॉर्कच्या नॉनस्टॉप फ्लाईटची. मुंबई-न्यूयॉर्क हा प्रवास वारंवार करावा लागणारा एखादा त्या प्रवासाला विटलेला असतो. पण नॉनस्टॉप फ्लाईट म्हटल्यावर त्या १४-१५ तासांच्या कंटाळवाण्या, सलग प्रवासाचा विचार करत बसण्याऐवजी त्यानं असं थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहिलं तर... ?

जरा विचार केलात तर दररोजच्या दिनक्रमात अश्या कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो हे तुमच्याही लक्षात येईल.
सकाळी कामं उरकून घरातून निघायला उशीर होतो; धापा टाकत कश्याबश्या तुम्ही स्टेशनवर पोचता; ८:११ची फास्ट सुदैवानेच पकडता. डब्यात उभं रहायला थोडीफार जागा मिळाल्यावर हातातल्या नॅपकिननं घाम पुसता पुसता दिवसाची सुरूवातच वाईट झाली या विचाराने स्वतःवर, नशिबावर, रोजच्या जीवघेण्या धावपळीवर चरफडता. पण एखादा दिवस अश्या प्रसंगी तो प्रश्न स्वतःला विचारा - When was the last time I did something for the first time? त्याचं उत्तर असेल - ‘A few minutes ago! घरातून निघायला उशीर होऊनसुध्दा १४ मिनिटांत स्टेशन गाठून रोजची ट्रेन आज मी पकडली. असं आज मी प्रथमच केलंय!’ स्वतःशीच बरं वाटतं या विचारानं!
ऑफिसमधून परतल्यावर बिल्डिंगची लिफ्ट नादुरूस्त असल्याचं कळल्यामुळे पाच-सहा मजले चढावे लागल्यावर मेंटेनन्सच्या नावाने खडे फोडण्याऐवजी तो प्रश्न स्वत:ला विचारा. ‘आज प्रथमच लिफ्टकडे पाठ फिरवून मी जिने चढून आलो’ असा विचार करा. तुम्हाला खूप तरतरीत, ताजंतवानं वाटेल.
रस्त्यावरचा ट्रॅफिक कधीकधी सहनशीलतेचा अंत बघतो. कामांचं वेळापत्रक पार कोलमडून जातं. पण त्याचदिवशी कदाचित प्रथमच असंही घडलेलं असतं की तुम्ही रस्त्यात कुठेही करकचून ब्रेक न मारता गाडी चालवलेली असते. पण ट्रॅफिकच्या कचाट्यात सापडल्यामुळे ही गोष्ट तुमच्या ध्यानातही आलेली नसते. अश्या वेळेला तो प्रश्न स्वतःला विचारा. ‘आज प्रथमच तब्बल दीड तास ट्रॅफिकमध्ये अडकलो’ या उत्तराऐवजी सरावाने ते दुसरं उत्तर आपणच मिळवतो आणि जादू घडते. आपला वैताग काही प्रमाणात तरी नक्कीच कमी झाल्याचं आपल्यालाच लक्षात येतं.
या प्रश्नोत्तराच्या खेळात खरंच जादू आहे. या खेळाच्या सरावाने डब्यातली नवलकोलाची भाजी चविष्ट वाटू शकते; बॉसच्या खडूसपणाकडे यशस्वीपणे दुर्लक्ष करता येऊ शकतं, दहा टक्के पगारवाढही भरपूर वाटू शकते, नवर्‍याशी किंवा बायकोशी झालेलं भांडण चुटकीसरशी विसरता येऊ शकतं...
स्वतःवरच हसता येतं, गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने बघता येतं, छोट्याछोट्या गोष्टींचा आनंद घेता येतो...
चाकोरीबध्द आयुष्य, एकसुरी दिनक्रम, त्या त्या वेळेला ती ती कामं करण्याचं रोजचं बंधन या सगळ्याचं फारसं काही वाटेनासं होतं...
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची शिबीरं तरी याहून वेगळं काय शिकवतात?

गुलमोहर: 

ललितादेवी माताजी _/\_ आप महान हो Happy

फारच अप्रतिम लेख.. आणि When was the last time you did something for the first time? हे वाक्य तर भारी आवडतं आहेच Happy

आवडलं. Happy

एखाद्या वाक्याकडे आपण कधीतरी दुर्लक्ष करतो. कधी अतिपरिचयात् म्हणून, तर कधी वेळ नाही...काय आहे त्यात एवढं म्हणून..
आणि मग कधीतरी तेच वाक्य आपल्याकडे हळूच दाराआडून बघावं तसं बघतं आणि "काय, कसं काय! बरंय ना?" असं मिश्किलपणे विचारतं..आणि एकदम भेटतंच येऊन आपल्याला. आणि हा "युरेक्का!" चा क्षणच पुढच्या अनेक प्रश्नांची सहजसोपी उत्तरं देऊन जातो!

आज मी पहिल्यांदा "When was the last time I did something for the first time" हे वाक्य वाचलं. >> मी सुद्धा ! खूप आवडला लेख. Happy

लले, सकाळी शीर्षक वाचलं आणि माझं सध्याचं लाडक वाक्यच आठवलं एकदम. मला वाटलं की आयुष्याला दिशा वगैरे देणारी वाक्य ह्यावर काही लिहित्येस, पण हे वेगळच आहे थोडसं

बाकी ते फर्स्ट टाईमचं म्हणशील तर उचापत्या हे बिरुद गेले कित्येक वर्षं मिरवतोच्चै. Proud

जाता जाता... ते सध्याचं आवडीचं वाक्य.

Everything will be fine in the end Happy

If its not fine, its not the end. Wink

सुरेख!!!
प्रत्येक वेळी तीच घटना वेगळ्या अन्वयात पहायचा थोडा फार छंद मला ही आहे.आता या लेखनाने त्याला बरीच दिशा मिळलीये.

वॉव!!
मी पहिल्यांदा कुठलातरी लेख माझ्या जवळच्या लोकांना फॉर्वर्ड केलाय(हाच तो लेख, अर्थात तुझ्या नावा-लिंकेसकट)

अशक्य सही लिहीले आहेस. परत फेबुवर तुझे कौतुक समारंभ आयोजित करतीय मी!!

ललिता, सुंदर... खरच एकदम वेगळ्याच विश्वात नेणारा प्रश्नं आहे. आपण नेहमीचं नेहमीचं म्हणतो त्या आयुष्यात किती वेगवेगळ्या कसरती हरघडी करतो... असला प्रश्नं विचारेपर्यंत निरस असलेलं एकदम "रसभरित" होऊ शकतं...
मजा आया..... मजा आया, ललिता.

हा लेख ८-१० महिन्यांपूर्वीच लिहिलेला होता. पोस्ट करू की नको ते ठरत नव्हतं. म्हटलं उगीच ढुढ्ढाचार्याचा आव आणलाय असं नको वाटायला. शेवटी काल काही चेंजेस करून केलाच पोस्ट. पण २४ तासांच्या आत इतके भरघोस प्रतिसाद येतील असं मुळीच वाटलं नव्हतं !!

सर्वांना खूप खूप धन्यवाद. Happy

पण २४ तासांच्या आत इतके भरघोस प्रतिसाद येतील असं मुळीच वाटलं नव्हतं !! >> लले तुझ्या आजच्या दिवसाची "फर्स्ट थिंग" झाली की इथेच Happy

Pages