आमची शेवटची भेट.

Submitted by दिनेश. on 5 May, 2011 - 10:09

खरं तर हे काम मला करायचं नव्हतं, पण नकार द्यायला काही कारणच नव्हतं. शिवाय
सुलभा, माझ्याच डिपार्टमेंटला होती. त्यामूळे मला जबाबदारी टाळताही आली नसती.
आजवर बहुदा इमेलने आणि फोनवरच संपर्कात होतो आम्ही. वसई ब्रांचला तसा सेल्सही
जास्त नव्हता. आणि जी काहि थोडीफ़ार ऑपरेशन्स तिथे होती, त्याचे अचूक रिपोर्ट्स मला
अगदी वेळच्या वेळी, सुलभाकडून येत असत. एक मोठी केस सोडली, तर डेटर्स लिस्ट पण
मोठी नव्हती. त्या पार्टि बद्दलहि वेळोवेळी मला ती अपडेट करत असे.

पण ती ब्रांच बंद करण्याचा कंपनीचा निर्णय झाला होता. जागेला मोठी किंमत मिळत होती.
आणि सेल्स वर तसा फ़ारसा परिणाम झाला नसता. कॉस्ट सेंटर म्हणून ती ब्रांच तितकिशी
फायद्यात नव्हती, असा रिपोर्ट मीच तर दिला होता.

शेवटी, ते लेटर आल्यावर मीच सुलभाला फ़ोन केला. म्हणलं," काय सुलभा, उद्या येऊ का
सरप्राइज व्हीजीट द्यायला ?"

ती म्हणाली, " काय पण हो तूम्ही सर. असे सांगून येतात का सरप्राइज व्हीजीटला. पण खरंच येताय का ?"

मी म्हणालो, "हो येतोय. लंच टाईमपर्यंत पोहोचेन तिथे."

ती म्हणाली. " मग जेवायलाच या. मी डबा घेऊन येते. काय करु स्पेशल ?"

मी म्हणालो, " अगं खरंच नको, मी जेऊनच येईन बाहेरुन."

ती म्हणाली "सर, पहिल्यांदा येताय आमच्या ब्रांचला, जेवायलाच या हो. मी काही खात नाही
तूम्हाला."

मी म्हणालो, "ठिक आहे. आपण बाहेरच जाउ जेवायला. चालेल ना ?"

ती म्हणाली, " सर. लंचला बाहेर बोलावणारे तूम्ही पहिलेच. बाकी सर्वजण डिनरलाच बोलावतात."

मी म्हणालो, "तर भेटु उद्या."
*******

सुलभाबद्दल मी फार ऐकले होते. पण एकूणच स्टाफ़ तिला वचकून असायचा. एक नंबरची
फटकळ म्हणून फ़ेमस होती ती. कुणाचा एक शब्द जास्तीचा म्हणून कधी ऐकून घ्यायची नाही.
पण तिच्या कामात नाव ठेवायला जागा नव्हती. बाकिच्या ब्रांचेसचे लोक, तिच्या रिपोर्टसना
घाबरुन असायचे, कारण रिमाइंडर्स इमेलमधे तिचे नाव कधीच नसायचे.
मी माझ्या कलीगला सहज सांगितले कि उद्या वसई ब्रांचला चाललोय, आणि सुलभा बरोबर
लंच घेणार आहे, तर त्याच्या चेहर्‍यावर विचित्र भाव दिसले.

मी दहीसरचा ट्राफ़िक पार करुन वेळेवर तिथे पोहोचलो. सुलभाला प्रथमच प्रत्यक्ष भेटत होतो.
साधाच ड्रेस असला तरी तिचे व्यक्तीमत्व छाप पाडणारे होते. तिने बहुतेक माझा फ़ोटो बघितला
होता. मला लगेच ओळखले तिने.

गेल्या गेल्या तिने चहा मागवला, मी नको म्हणालो, तसा रद्दही केला, मी म्हणालो, "लंचची
वेळ झालीय, आता नको चहा."

त्यावर ती म्हणाली, "बघा हं सर, नाहीतर उद्या म्हणाल, सुलभाने चहा देखील विचारला नाही."

मी नुसताच हसलो.

मग तीच म्हणाली, "कॅश वगैरे बघणार आहात का, मी अपडेट केलेय."

मी म्हणालो, "नको. त्याची गरज नाही. आपण जेवून तर घेऊ आधी."

मला तिथे बोलायचे नव्हते तिच्याशी. हॉटेल कुठले चांगले ते तिलाच विचारले. ब्रांचच्या जवळच
होते, म्हणून चालतच निघालो. तिने रिसेप्शनवर तसे सांगताच, रिसेप्शनिस्टची नजर पण
बदललीच. सुलभाच्या चेहर्‍यावरचे हास्यही मी टिपलेच.

हॉटेलमधे पोहोचल्यावर आम्ही कोपर्‍यातले टेबल निवडले. आमच्या मागोमाग सेल्सचे दोघे
आल्याचे मी बघितले. पण ते मुद्दाम आमच्यापासून दूर, पण आम्ही दिसू असे टेबल पकडून
बसले. मी सुलभाला खूण केली, तर तिने हातानेच, मला खूण करुन त्यांना इग्नोर करायला
सांगितले.

मी तिला मेन्यू निवडायला सांगितले. नाही म्हंटल तरी तिच्याकडे निरखून बघतच होतो. एक
करारीपणा तिच्या चेहर्‍यावर होता. पण ती तुसडी नक्कीच वाटत नव्हती. निदान आमच्या
ऑफ़िसला चर्चा होत असे, तितकी तुसडी ती नक्कीच दिसत नव्हती.

तिने मनाशी मेन्यू ठरवून माझ्याकडे बघितले, व माझी संमति विचारली. माझी रोखलेली
नजर तिच्या लक्षात आली नसावी, असे मला वाटले. मी होकार दर्शवताच तिने वेटरला
बोलावले. तिच्या ओळखीचाच दिसत होता तो.

"बोला सर. काय म्हणतय हेड ऑफ़िस ?" तिनेच सुरवात केली.

"नेहमीचंच. पण आज ऑफ़िसची चर्चा नको इथे." मी म्हणालो." तूमची छोकरी काय म्हणतेय ?
नव्या बाईकडे राहते का नीट ?" सुलभाची आई गावाला निघून गेल्यावर तिला नवीन बाई
शोधायला त्रास झाला होता. दोन दिवस तिने रजा टाकली होती, ते लक्षात होते माझ्या.

" गुणी आहे हो माझी पोर. तिने कधीच त्रास नाही दिला मला. घरी एकटी रहायची पण तयारी
होती तिची. पण दहा वर्षांच्या मूलीला एकटीला कसे ठेऊ हो ? " ती म्हणाली.

"एकटी का ? बाबा असतात ना घरात तिचे ?" मी विचारले पण मग वाटले, उगाचच विचारले.

"त्यांचा काय उपयोग, आणि घरी थोडेच थांबतात ते ?" ती उत्तरली. पण त्यात कुठलीच खिन्नता
वगैरे नव्हती.

"सॉरी, मी फार पर्सनल विचारलं का ?" मी विचारले.

"नाही हो सर. मी कुणापासून काही लपवत नाही. उगाच चर्चा होण्यापेक्षा आपणच काय ते
सांगितलेलं बरं. नाही का ? मला माहिती आहे हेड ऑफ़िसमधे माझ्याबद्दल काय काय
बोलतात ते. तूमच्याही कानावर आलेच असेल. हो ना ?" तिने सहज विचारले.

"हो तसे बोलतात खरे. पण तसे ते सगळ्या ऑफ़िसेस मधे असतेच." मी जरा सावरुन
घ्यायचा प्रयत्न केला.

" नाही हो सर, मी नाही तूम्हाला विचारत, काय बोलतात ते. पण बोलतात ते काही
प्रमाणात खरेही आहे. माझा नवरा गेली ८ वर्षे घरीच आहे. काहिही जॉब करत नाही."
ती उत्तरली.

"पण का ? काही प्रॉब्लेम आहे का ?" मी विचारले.

" प्रॉब्लेम म्हणजे, होते पालघरला एका कंपनीत. अफ़रातफ़रीचा आळ आला. मग ती केस
चालली बरीच वर्षे. निर्दोष सुटले, पण सगळा पैसा त्यातच गेला. कामावर घ्या म्हणून ऑर्डर
निघाली होती, पण हेच गेले नाहीत. आता घरबसल्या कुणी पगार देणार होतं का ?" ती
म्हणाली.

"मग सध्या काय करतात ?" मी विचारले.

"कोण जाणे ? मी नाही विचारत. दोन वेळा जेवायला घालते. अंगावर धड कपडे असतील
असे बघते. सुदैवाने कसली व्यसनं नाहीत आणि असती तरी मी पैसा दिला नसता. " ती
उत्तरली.

"तूम्ही खरेच फ़ार स्ट्रॉंग आहात." मी काहीतरी म्हणायचो म्हणून म्हणालो.

" अंगावर जबाबदारी पडली, कि होतोच हो कुणीही स्ट्रॉंग. मी लग्नापुर्वी करत होते नोकरी.
एम कॉम करता करता एका सी ए फ़र्ममधे पण जॉब करत होते. जवळजवळ आर्टीकलशिप
पूर्ण केली म्हणा ना. " ती उत्तरली.

"नो वंडर, तूमचा अकाउंटस चा बेस खुप मजबूत आहे. बाकीच्या ब्रांचेसचा घोळ निस्तरताना
नाकी नऊ येतात माझ्या" मी म्हणालो.

"पण लग्न झाल्यावर सोडायला लावली ना.अर्थात ते शहर लांब होते. इथे जॉब शोधते
म्हणाले तर बायकोची कमाई खायला, मी काय इतका नादान झालो नाही, असे म्हणाले.
पण मग परिस्थितीच अशी आली, कि जॉब करावाच लागला" ती म्हणाली.

"हं" मी उत्तरलो.

"त्याच दरम्यान इथे ब्रांच सुरु झाली ना. माझ्या घराजवळच. पिंकी लहान होती, मग
आईला बोलावले. तरी मी जेवायला घरी जात होते. आईला इथली सवय नव्हती.
पण शेजार्‍यांची खूप मदत झाली मला. इथला स्टाफ़ पण गावातलाच त्यामूळे मला
कधी काही प्रॉब्लेम नाही आला" ती म्हणाली.

"बरीच वर्षे झाली न इथे ?" मी विचारले.

" हो ना, मार्चमधे आठ झाली. आता पिंकी एकटी पण राहू शकेल." ती म्हणाली.

तेवढ्यात जेवण आलेच. साधे पण रुचकर जेवण होते ते. उठताना मी सहज बघितले तर
सेल्सचे दोघे आमच्याकडेच बघत होते.

" सर, या आठ वर्षात खूप शिकले मी इथे. तूमची पण खूप मदत झाली. आता
एकटीने ऑडीट, फ़ायनलायझेशन हॅंडल करु शकेन, असा कॉन्फ़िडन्स आलाय.
मागच्यावेळी मला जरा जास्तच इन्क्रीमेंट दिलीत म्हणून तिथे बरंच तणातणी
झाली म्हणे. पण मला ग्रॅच्यूईटी त्या स्केलने मिळेल ना आता ?" ती म्हणाली.

बिल पे करुन आम्ही ब्रांचला आलो. तिथेहि जरा गप्पा झाल्याच. मग एकदम ती
म्हणाली, "पण सर तूम्ही जे लेटर द्यायला आला होतात, ते अजून दिलेच नाहीत."

मी एकदम चपापलोच. तर ती म्हणाली, "सर, तूमच्यापेक्षा जास्त वर्षे काढलीत इथे.
तिथे जी एम साहेबांनी काय लेटरवर सह्या केल्या ते मला, इथे बसून कळतं."
तिच्या चेहर्‍यावरचे हास्य कायम होते.

"सुलभा, आय ऍम सॉरी. पण धिस इज कॉर्पोरेट डिसीजन. आम्ही ट्राय केले, इतर
ब्रांचमधे.." मी चाचरत बोललो.

"पण कुणालाच मी नको होते. हो ना ? सर इथल्या बाकिच्या स्टाफ़ने काय काय केले.
ते पण मला माहितीय. पण तूम्ही म्हणाला असतात तरी मी इतर कुठे जाऊ शकले
नसते. प्रवासात घालवायला वेळ नाही माझ्याकडे. पिंकीला तेवढा वेळ देऊ शकते ना
मी" ती म्हणाली..

"तसा ३ महिन्याचा नोटीस पे देणार आहोत. आणि मी विचारुन बघतो माझ्या कॉन्टॅक्ट्सना."
मी म्हणालो.

"थॅंक्स. मी लगेच एफ़ डी करुन टाकेन त्याची." ती म्हणाली.

"दुसर्‍या जॉबचे काहि जमले का कुठे ?" मला काळजी वाटत होती.

"ओ, ते सांगायचेच राहिले. तूम्ही नका कुणाकडे शब्द टाकू नका. आमच्या इथे एक
कोचिंग क्लास उघडलाय. खरे तर मोठ्या चेनची ब्रांच आहे ती. त्यांनीच मला अप्रोच
केले होते. मी हो म्हणालेय. ते तर माझ्या घराजवळच आहे. वेळा पण मला सोयीच्या
आहेत. आणि कमाईपण जास्त आहे." ती हसत म्हणाली.

" मग तर छानच झाले की." मी म्हणालो.

" हो ना. जे होतं ते चांगल्यासाठीच. पण सर, कुठेही असलो तरी टच मधे राहूच
बरं का. तारीख कुठली आहे लेटरमधे ? मी आवरुन ठेवते सगळे इथले." ती म्हणाली.

"ऑल द बेस्ट" असे म्हणत, मी तिचा निरोप घेतला.

=============

एक साधीशीच कथा. पण नाव सोडल्यास पूर्ण सत्य. बरीच वर्षे झाली या प्रसंगाला. माझा
तसा संपर्क नव्हता. पण काल तिची इमेल आली. अगदी मजेत आहे. मला अजून गुरु मानते.
लेकीची दहावी आहे आता. तर हे ललित तिला अर्पण. ती नक्की वाचणार आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान लिहलंय दिनेशदा..!
'ति' मजेत आहे हे ही छानच.

पण "मी विचारले, ति म्हणाली" हे वाक्य वाचतान जरा जास्त वेळ घेतात.

दिनेशदा,
जिद्दीने जगणार्‍या एका स्त्रीचं
सहजतेने व्यक्तीचित्र उभं केलंत..... आवडलं.
----------------------------------------------------------------------
तिच्याबद्दल काहीच बोलायला न सापडणे,
हे कारण सुद्धा पुरेसे आहे तिच्याबद्दल बोलणार्‍यांना >>>>
वर्षूनील, अगदी बरोबर बोललात.

तिच्याबद्दल काहीच बोलायला न सापडणे .हे कारण सुद्धा पुरेसे आहे तिच्याबद्दल बोलणार्‍यांना>>> अनुमोदन, वर्षू !!!! Happy

एखादी स्त्री स्वाभिमानाने जगू शकते, हेच अनेकांना सहन होत नाही.>>> खरे आहे दिनेशदा. Sad

स्पष्टवक्तेपणाची शिक्षा का ही ?>>> १०००० मोदक सांजसंध्याला... बरोब्बर ओळखलेस... Happy

फार साधे, सोपे आणि सुंदर पद्धतीने लिहिलेय... Happy

दिनेशदा, तुमच्या पुढच्या ललित लेखनाच्या प्रतिक्षेत... Happy

<<<<एखादी स्त्री स्वाभिमानाने जगू शकते, हेच अनेकांना सहन होत नाही.>>>>>>
आणि अशा स्त्रीबद्द्ल प्रचंड असूया सुद्धा असते. दिनेशदा, खूप छान ललित आहे. आशयपूर्ण!!

आवडली दिनेशदा. काही काही लोकं एकदम धडाडीचे असतात, त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून आपल्यालाच हुरुप येतो. Happy

छानच कथा!

बिल पे करुन आम्ही ब्रांचला आलो. तिथेहि जरा गप्पा झाल्याच. मग एकदम ती
म्हणाली, "पण सर तूम्ही जे लेटर द्यायला आला होतात, ते अजून दिलेच नाहीत.">>>

येथे खेचलो गेलो एकदम कथेत!

छानच लिहीलयं दिनेशदा!
सुलभासारख्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्य स्त्रीयांबद्दल मला नेहमीच कुतुहल आणि आदर वाटतो! सुलभाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!! Happy

रच्याकने, पुर्वी मी जिथे काम करायचे तिथेही अशीच एक सुलभा होती. पण ती खुप कमी वयात विधवा झाली होती. पदरात दोन मुले! पण तिने सगळे समर्थपणे निभावुन नेले आहे (तिच्या अनेक अडचणींची मी साक्षीदार आहे). आता तिचा मोठा लेक एम बी ए होऊन हाताशी पण आला आहे! लहानापण बारावीला आहे.

तिच्याबद्दल काहीच बोलायला न सापडणे .हे कारण सुद्धा पुरेसे आहे तिच्याबद्दल बोलणार्‍यांना>>> +१११११

एखादी स्त्री स्वाभिमानाने जगू शकते, हेच अनेकांना सहन होत नाही.>>>अगदी खर.

स्पष्टवक्तेपणाची शिक्षा का ही ?>>> आजकाल असच चालत सगळीकडे Sad

दिनेश,
लेखन आवडलं, पण फार त्रोटक लिहिलंत असं वाटलं... फोनवरच्या संपर्कातून ती प्रथम तुम्हाला कशी जाणवली, प्रत्यक्ष भेटल्यावर दोन्हीत काही फरक जाणवला का.. ते हि लिहायला हवं होतंत...
पण ती स्वाभिमानी होती तर तिने टर्मिनेशनचं कारण विचारलं नाही? Uhoh
बाकी पण काही अपुर्ण रेफरन्सेस वाटले लेखनात.. ते पुर्ण असते तर ललित अर्धवट वाटलं नसतं...

पुलेशु!!!

छान लिहिलंय.
इथे जवळजवळ सगळ्यांनीच लिहिलंय कि स्वाभिमानी, फटकळ, कर्तुत्ववान इ.इ. स्त्रियांविषयी लोक कारण नसताना बोलतात वगैरे वगैरे....सहमत आहेच...पण जर तुमच्या कोणाच्या जवळपास अशी व्यक्ती / स्त्री असती/ असेल तर तुमचे वागणे कसे असेल/ आहे?

दक्षिणा, माझी कुठलीही मतं न देता, रिडींग इनबिटवीन द लाईन्स, असे तिला सादर करायचे होते. या एका भेटीतून ती पुरेशी भेटलीच.
आणि ती खरेच असेच बोलली.
टर्मिनेशनचे कारण, पहिल्या पॅरात आले आहे.
त्या काळातही आम्ही एकमेकांना खुप मानायचो. पण प्रत्यक्ष भेट हि एवढीच.
आणि स्वाभिमानी स्त्रीचा, स्वाभिमान इतरांनी जपणे, यापेक्षा जास्त काही करूच नये तिच्यासाठी.

Pages