अण्णा सानेंना त्यांच्या नेहमीच्या आरामखुर्चीत बसूनही दरदरून घाम फुटलेला होता. इतके टेन्शन यापुर्वी कधीच सोसले नव्हते त्यांनी त्यांच्या आयुष्यात!
त्यांच्या पत्नी मालविकाबाई या पासष्टीत पोचल्या होत्या व त्यांना अनेक खुळे लागलेली होती. त्यातूनच आजचा दिवस निर्माण झालेला होता. त्या घरातल्यांनाच विविध 'डेज' साजरे करायला लावायच्या. मदर्स डे, फादर्स डे, हसबंड्स डे, वाईफ्स डे, किड्स डे, सारी डे, व्हॅलेन्टाईन्स डे इथपर्यंत ठीक होते.
कारण व्हॅलेन्टाईन डे अण्णा आणि त्यांचे चिरंजीव अथर्व यांना रोजच साजरे केल्याचे सिद्ध करावे लागे. आपापल्या पत्नीवर प्रेम आहे हे सिद्ध केल्याशिवाय राखुंडीही बोटावर घ्यायचे नाहीत ते! एक सुखद झुळुक म्हणजे वर्षातून एकदा हसबंड्स डे यायचा. त्या दिवशी कमी शिव्या मिळायच्या हा मोठा फायदा होता.
अण्णा, मालविकाबाई, अथर्व, स्मिता आणि त्या दोघांचा दहा वर्षांचा किरण!
अथर्व बॅन्केत नोकरीला होता. या व्यतिरिक्त अथर्वचे काही वर्णन करणे हे बॅन्कांमधील कर्मचार्यांची घरासमोर निदर्शने घडवून आणण्यासारखे आहे.
अण्णा इतिहासाचे मास्तर म्हणून रिटायर्ड होणे आता इतिहासजमा झालेले होते. मात्र शिक्षकी पेशामुळे येणारा नैसर्गीक उपदेशक स्वभाव तसाच राहिला होता. समोर दिसेल त्याला ते त्याच्या भल्याचे सांगायचे. त्या माणसाला ते भल्याचे वाटायचे नाही हा भाग वेगळा होता. या शिवाय ते आरामखुर्चीवर बसून मालविकाबाई व सुनेला हळुवार टोमणेही मारायचे.
मालविकाबाई 'सहज स्त्री मुक्ती', कौटुंबिक वातावरण, बाळाचे आरोग्य (कुणाच्याही), वाड्यातल्या बायकांचे अंदाजाने स्वस्तात ब्लाऊझ शिवणे व त्यावरचे वाद मिटवणे, सून स्मिता हिच्या माहेरचे कसे भिक्कारडे आहेत हे सौम्यपणे सुचवणे, अण्णांना त्यांनी आयुष्यात काहीही केले नाही हे येताजाता प्रभावीपणे पटवणे, देवळातल्या एका म्हातार्या बुवाला शंकराचा अवतार मानणे व दिवसातून दोन वेळा हमखास भांडणे याचे कोर्सेस यशस्वीरीत्या पार करून आता वर्षातील प्रत्येक दिवशी एक 'डे' साजरा करणे या खुळाशी पोचल्या होत्या.
स्मिता आपल्या सासूशी वाद घालणे हे प्राथमिक कर्तव्य सोडले तर अण्णा, अथर्व व किरणशी वाद घालत होती व घरकाम हे तिय्यम कामही स्वीकारत होती. तिच्यामते तिला एक मुंबईचे स्थळ आले होते ते अधिक चांगले होते. हा मुद्दा ती लग्नानंतर बारा वर्षांनीही ठामपणे मांडत होती.
एकंदर चौघेही भांडकुदळ होते. त्यातल्यात्यात मालविकाबाई प्रमुख मानल्या जात होत्या.
मात्र आज कुचंबणा होत होती सगळ्यांचीच! कारण आज मालविकाबाईंनी उठल्या उठल्या 'आज गांधी डे आहे' असे जाहीर केले होते व तत्क्षणीच अण्णांना चक्क 'पडा अजून पडायचं असलं तर' असे ऐतिहासिक वाक्य ऐकवून अण्णांच्या छातीत कळ आणली होती. त्या वाक्याने नव्हे तर त्या भीषण बदलामुळे अण्णा तात्काळ पलंगावर मागच्यामागे आडवे झाले व काही काळ पडून राहिले. पण ते दृष्य पाहून मालविकाबाईंनी आज केवळ एक हलकेसे स्मित केले होते. पंचेचाळीस वर्षांपुर्वी एकदा अण्णांनी स्वतःच्या आई वडिलांची नजर चुकवून मालविकाबाईंना एक फुलाची वेणी आणून दिली होती त्यावेळेस त्या तशा हासल्या होत्या. हे आजही अण्णांना त्याही परिस्थितीत आठवले.
किरण नावाचा दहा वर्षांचा एक उपेक्षित जीव चिवचिवला.
"गांधी डे म्हणजे काय?"
"गांधी होते ना तुम्हाला तिसरीत??"
मालविकाबाईंनी नातवाशी बोलताना हा स्वर त्याच्या जन्मापासून तरी पहिल्यांदाच वापरला होता. त्यामुळे त्यांना लगेचच खोकल्याची उबळही आली. त्यावर स्मिताने त्यांच्या पाठीवरून हात फिरवून 'पाणी आणू का' असे विचारलेले पाहून अण्णा 'अणुस्फोटाची नांदी' अनुभवल्यासारखे स्तब्धपणे पडून राहिले.
"छ्छ्छे??... आम्हाला प्रभुणे होते तिसरीत"
किरणने तिसरीतील शिक्षकांचे आडनाव गांधी नसल्याची ग्वाही दिली.
"शिक्षक नव्हेत रे... महात्मा गांधी... "
जाहिरातीतल्या आईसारखी हासत स्मिताने आपल्या मुलाला माहिती सांगीतली. तो या पाचजणात एकटाच निरागस होता.
"आई.. तू अन आजी आज अशा हासताय का?? मला भीती वाटतीय..."
त्यावर 'त्यात काय घाबरायचंय बेटा' असे म्हणून स्मिताने त्याला बाथरूमकडे पिटाळले.
"गांधी डे म्हणजे काय करायचे?"
किरणचा बाप अथर्व दहशत बसल्याच्या आवाजात म्हणाला.
"अय्या गांधी डे म्हणजे नाही माहिती??" - स्मिता
"नाही"
"मला पहाटेच आईंनी सांगितले गांधी डे म्हणजे काय ते... "
"काय??"
"आज सगळ्यांनी खरे बोलायचे. नम्रपणे वागायचे. हिंसा करायची नाही. स्वावलंबन करायचे"
"पण सकाळचा चहा टाकतोच की मी रोज.. "
"छे छे... तुम्ही फक्त तुमचाच चहा टाकायचात... माझा मी.. आईंचा आईंनी... अण्णांचा अण्णांनी.."
येथे क्षणभर मालविकाबाईंचा चेहरा हिंस्त्र झाला असावा असे बाकीच्या तिघांनाही वाटले. पण लग्गेच बदलला तो चेहरा. आता त्यावर एक अध्यात्मिक स्माईल आले. स्मिताकडे वळून त्या म्हणाल्या..
"पण मग गॅस चार वेळा लावाला लागेल नाही?? अपव्यय करू नये हे गांधींचे एक तत्व होते"
"अय्या हो?? अशी परस्परविरोधी तत्वे बाणून कसे काय स्वातंत्र्य मिळवले बाई त्यांनी?? स्वावलंबन केले तर अपव्यय आणि अपव्यय टाळला तर परावलंबन!"
'फार बोलतीयस' हे दोन नाजूक शब्द घशातच गाडून मालविकाबाई म्हणाल्या...
"गांधी ते गांधीच! ते चहाच प्यायचे नाहीत.. "
हे वाक्य ऐकून थिजून पडलेल्या अण्णांमध्ये जीव आला वे ते घुसमटत्या आवाजात उद्गारले.
"अहोSSSSSSS.. मला चहा लागतो..."
परिवहन महामंडळाचा लाल डबा 'लागावा' तसे आविर्भाव करून त्यांनी ते वाक्य उद्गारले होते.
'आयुष्यात दुसरं काय लागलं तुम्हाला' हे दैनिक विधान टाळून मालविकाबाई म्हणाल्या..
"इश्श तुमच्यासाठी करणार नाही का स्मिता चहा??"
या वाक्याने धीर आलेले अण्णा आता उठून बसले. पण त्यांचा अजूनही विश्वास नव्हता की गांधी डे सकाळी नऊपर्यंत तरी ताणला जाईल यावर! त्यांनी राखुंडी घेतली व स्वतःचे मुख गांधीवादासाठी शुद्ध करायला घेतले. राखुंडीने दात घासणे हे खरे पांढर्यावर काळे करणे! आणि गांधीवाद म्हणजे काळ्याला पांढरे म्हणणे!
"आज आपण दोघी मिळून स्वैपाक करुयात??"
सासुचे हे वाक्य ऐकून स्मिताच्या मनात 'एकदा तरी स्वतः एकटीने कर की भवाने' ही प्रतिक्रिया उमटली. पण ती चेहर्यापर्यंत पोचवली नाही तिने!
"तुम्ही कशाला? मी एक तासात सगळे करते.. बसा जरा... किती दगदग करता.."
'रोज गांधी डे' यावा असे अथर्व व अण्णांना वाटेल असे ते विधान होते. शक्य झाले असते तर त्यांनी आज स्मिताचा सत्कारही केला असता भर वाड्यात!
"हो चालेल की?? आणि मला कसली ग दगदग?.. पण भात सांडू देऊ नकोस हां कूकरमध्ये?"
'आमच्या माहेरचा कूकर म्हणून शिव्या देतायत... स्वतःच्या संसारात कायम सासरचाच कूकर वापरत आल्या की या' हे विधान आज ऐकू आले नाही. आता अण्णा बाहेर आरामखुर्चीवर येऊन पेपर वाचायला लागले. मधूनमधून ते स्वैपाकघराकडे नजर वळवत होते. नेहमी ते 'चहा झालाSSSSय का' असे विचारायचे व तेथेच आदळआपट सुरू व्हायची. पण गांधी चहाच पीत नसल्यामुळे तो प्रश्न आज विचारावा की नाही ही आंधी त्यांच्या मनात होती.
तेवढ्यात समोरच्या वत्सलाबाई त्यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून इकडे बघत पचकल्या.
"आज इतकं शांत शांत कसं बाई सान्यांकडे?? भूतबाधाच म्हणायची... "
तावातावाने मालविकाबाई व्हरांड्यात आल्या. वर स्वर्गात महात्मा गांधींना आपली या घरातली सद्दी आता संपली हे कळले असेल. डोळे ताणून आणि एक हात आकाशाकडे आणि दुसर्या हाताची मूठ वळवलेली अशा आविर्भावात मालविकाबाई वत्सलाबाईंच्या दोन चार पिढ्यांचा भुतांशी जवळचा संबंध असल्याचे पेपर आऊट करणार तेवढ्यात अण्णा म्हणाले..
"गांधी डे आहे हां?"
खट्टकन मालविकाबाईंचा आकाशाकडचा हात खाली आला व ताणलेले डोळे सौम्य होतानाच चेहर्यावर एक दार्शनिकाचे स्मितहास्य आले.
"आमच्या घरातील परिस्थितीची नोंद घेण्याची जाणीव ठेवण्याच्या तुमच्या स्वभावाचे कौतुक करावे तेवढे कमीच वत्सलाबाई! वेळ मिळाला की मागच्या महिन्यात शिवलेल्या ब्लाऊझचे सहा रुपये द्याल का?"
"मोलकरणीला दिला तो मी... तिच्याकडून घ्या... काम येत नाही अन पैसे मागतायत..."
वत्सलाबाईंकडे गांधी डे नव्हता.
गांधीझमचं एक आहे. तो तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा सगळे गांधीवादी होतात.
वत्सलाबाईंच्या या विधानावर 'तुझं अख्खं खानदान कंजुष आहे, तुझी मोलकरींण तुझ्यापेक्षा आणि तुझ्या मुलीपेक्षाही सुंदर दिसते आणि महिन्यात तीन किलो वजन वाढतं तुझं त्यात माझा काय दोष' या प्रतिक्रिया आज आल्या नाहीत. त्या ऐवजी हे वाक्य आलं..
"माफ करा हं?? काही चुकलं असलं माझं तर नका देऊ राहिलेले पैसे... "
हे वाक्य ऐकून वाड्यातील जगे असलेले यच्चयावत पब्लिक सान्यांच्या घरासमोर जमा झाले. इतकेच काय तर वाड्यालगत असलेल्या वडावरच्या कावळ्यांची कावकावही थांबली. ओंकारेश्वरावर सनईचे मंगल सूर ऐकू आल्यासारखा प्रत्येकाचा चेहरा झाला होता.
आता अण्णा उठले आणि सर्वांसमोर हात जोडून म्हणाले..
"आज गांधीदिन आहे यांचा.. माफ करा..."
मालविकाबाईंनी सौम्य बोलणे हे वाड्याचा घटनाभंग झाल्याप्रमाणे असावे. लोक हळहळत निघून गेले. अण्णा मागे वळले तर झटक्यात त्यांना मालविकाबाईंचा हिंस्त्र चेहरा सौम्य झाल्यासारखा भास झाला.
"सगळ्यांचाच गांधीदिन आहे ना?? हो की नाही???"
" हो हो.. सॉरी चुकलं..."
अण्णा या क्षणी मात्र प्युअर गांधी झालेले होते.
तेवढ्यात आत काहीतरी फुटल्याचा आवाज आला आणि दोघेही आत धावले. किरण या जीवाने एक पाण्याने भरलेला तांब्या खाली पाडून घराच्या आतमध्ये सडा घालता येतो हे सप्रमाण सिद्ध केले होते. त्यावर गांधींची क्षणभरही आठवण न येऊन स्मिताने त्याच्या मृदू व कोमल गालांवर आपला पंजा आपटून 'एव्हरी अॅक्शन हॅज अॅन इक्वल अॅन्ड अपोझिट रिअॅक्शन' हे तत्व सिद्ध करून दाखवले होते.
मालविकाबाईंना गांधीवादाचा तो सत्यानाश न आवडल्यामुळे त्या धावल्या व त्यांनी सुनेला आवळून धरले.
"अगं असं मारतात का?? हिंसा?? हिंसा तर मुळीच करायची नाही... "
आईच्या थपडीने घाबरला नसेल इतका किरण आजीच्या त्या भिन्न रुपाने घाबरला व थिजून उभा राहिला.
स्मिताला आता गांधीवादाचे दुसरे एक तत्व आठवले व तिने ते तात्काळ सासूला सांगीतले.
"गांधीवादात लोक आपल्या एका गालावर कुणी मारली की दुसरा पुढे गाल करायचे...."
हेही मालविकाबाईंना पटले. त्यांनी सुनेला सोडून किरणला धरले आणि सुनेसमोर उभे केले आणी नातवाला म्हणाल्या..
"म्हण.. हा बघ आई माझा दुसरा गाल.. "
"का?"
किरणला अजून गांधीदिन ही संकल्पना नीटशी समजलेली नव्हती.
"आज गांधीदिन आहे ना??.. म्हणून... "
"हा बघ आई माझा दुसरा गाSSSSSल.. "
खण्ण! किरणने ते वाक्य उद्गारताच त्याचा तो गाल सुजला! आता किरण आजीकडेच पाहून ओरडला.
"म्हणजे काय?? आपणच आपला गाल पुढे करायचा??.. गांधीदिन म्हणजे मार खायचा असतो का??"
"हे काय चाललंय काय?? गांधीदिनाच्या नावाखाली एका दुबळ्या लहानग्याला क्रूरपणे ठोकताय तुम्ही??"
अथर्वला आपल्या चिमण्या किरणची कीव आलेली होती. ती जाणीव होऊन दोघींनी किरणच्या गालावर चुचकारले व स्वतः सांडलेले पाणी पुसून घेतले. तेवढ्यात गॅसवर ठेवलेले दूध वर आले व ते उतू गेले.
ते पाहून तीव्र भडका उडालेल्या मालविकाबाईंनी नियंत्रण सुटल्यासारखे अचानक स्फोटक विधान केले.
"माहेरी जर्सी गायी होत्या काय?? लक्ष देता येत नाही दुधाकडे??"
दोन हिंस्त्र स्त्री चेहरे आता गांधीदिनाचा तकलादू बुरखा फोडणार तेवढ्यात अण्णा उद्गारले...
"गांधीदिन.. गांधीदिन..."
महात्मा गांधींना त्या घरात एकमेव आधार म्हणजे अण्णा! गांधी व अण्णा यांच्यात खूप साम्य होते.
दोघांनाही हिंसा सहन करावी लागायची, काही करायचेच नसल्यामुळे फक्त खरे बोलणे शक्य व्हायचे आणि अण्णांचीही गरीबीच असल्यामुळे साधी राहणी सहज जमायची.
"उद्या कुठला दिन आहे?"
अथर्वचा तो प्रश्न अत्यंत अर्थपूर्ण होता. कारण उद्या जर टिपू सुल्तान दिन किंवा औरंगजेब दिन काढला तर आजचं सगळं उट्टं उद्या पहाटेच निघणार हे त्याला समजलेलं होतं!
"का? उद्याच्या दिनाची चौकशी आत्ता करतोस बाळ?"
'बाळ' ही हाक मालविकाबाईंनी अथर्व बाळ असतानाही मारलेली नव्हती.
"नाही नाही.. माझं असं मत आहे की गांधीदिनापासून ग्रॅज्युअली आपण वल्लभभाई पटेल दिनाकडे जाऊयात.. आधी विनोबा भावे.. मग ज्ञानेश्वर माउली असे करतानाच हळूच एकदा 'यशवंती घोरपड' दिन साजरा करून बघू.. मग हळूहळू नेताजी.. तानाजी.. असे दिन करत मग वल्लभभाई पटेल दिन करू..."
"का? असं रे का??"
"बदलायला जरा सोपं जातं गं आई..."
"ठीक आहे.. पण तू नाश्ता केलास का??"
"झालाय कुठे तयार अजून??"
अथर्वच्या त्या तक्रारयुक्त बोलण्यावर स्मिताने उडवता उडवता नाक जागच्याजागी रोखले.
"लग्गेच टाकते पोहे.. "
तिची लगबग एखाद्या नववधू सारखी होती हे पाहून अथर्वच्या डोळ्यात पाणी जमा झाले.
"चहाची काही... आहे का प्रगती???"
अण्णांनी चितेवर तेल ओतले.
"भिजवलेस का पण पोहे??"
मालविकाबाईंनी सुनेची अक्कल सौम्यपणे काढली. स्मिताने त्यावर तितक्याच सौम्यपणे सांगितले.
"खर तर ना सासूबाई? अहो मला माहीत आहे की पोहे करण्याआधी भिजवावे लागतात.. तुम्हाला उगाच त्रास झाला बोलण्याचा.. जबडा दुखत तर नाही ना?? "
'आता गप्प बसा नाही तर गांधीदिन उलथवून टाकीन' हे वाक्य स्मिताने वेगळ्या शब्दात उच्चारले होते.
"आहेत का मालविकाबाई?" बाहेरच्या खोलीतून जोशी बाईंचा आवाज आला.
सान्यांचे अख्खे घर हादरले. स्वर्गात गांधींनी निराशेने या घरातून आपले डोके काढून घेतले. जोशी बाई आल्या म्हणजे गांधीदिन संपला!
जोशी बाई मालविकाबाईंपेक्षा चक्क तीन महिन्यांनी मोठ्या असूनही मालविकाबाईंना बाई म्हणतात हा मालविकाबाईंचा जुना संताप होता. नुसते मालविका म्हणायला पाहिजे कारण मी तिच्याहून तरुण आहे हे वाक्य त्या आजही बोलत होत्या. जोशी आणि साने यांची काही ऐतिहासिक भांडणे त्या वाड्याने पाहिलेली होती. पानशेतच्या पुराप्रमाणेच यांच्या भांडणांच्या काही कटू आठवणी अनेक जुन्यांच्या मनात अजूनही राहिलेल्या होत्या. या दोघी भांडायला लागल्यावर वाड्यालगत असलेल्या एका वडावरचे कावळेही 'खाली कुणाचातरी दहावा आहे' अशा आविर्भावात चूपचाप बसायचे.
पण या भांडणाचे मूळ कारण वेगळे होते. जोशी बाई अण्णांना आवडतात असा मालविकाबाईंचा समज होता व तो अनेकदा बोलून दाखवताना त्यांनी पूर्ण दोष जोशी बाईंच्या कॅरॅक्टरवर ढकलला होता. तुंबळ युद्ध झाले होते यावरून एक दोनदा! जोशीबाईंचा नवरा हा इतका साधा होता की गांधींनीच जोशीदिन साजरा करावा. तो यात पडायचा नाही. आकांडतांडव करून आपली बायको घरी आली की तो सौम्य आवाजात 'काय झालं हो' असं विचारायचा! त्यामुळे नुकतेच रामायण आटोपलेल्या जोशी बाई घरात महाभारत सुरू करायच्या. 'तुमच्या बायकोबद्दल आज समाज काय म्हणतोय हे तुम्ही बघतच नाही' हा महाभारताचा मूळ मुद्दा असायचा. वाड्याला त्या समाज म्हणायच्या. जोशी काका त्यावर 'बरं जाउदे आता चहा टाक' असे म्हणाले की जोशी बाई शरपंजरी अडकल्यासारख्या तळमळायच्या.
मात्र एक नक्की होते! त्या अण्णांना अधूनमधून भजी वगैरे केली की घेऊन यायच्या खर्या!
आणि आज त्यांच्या हातात ओल्या नारळाच्या करंज्या दिसत होत्या.
मालविकाबाईंच्या चेहर्यावर स्मितहास्य बघून त्या दचकल्या व धसका घेतल्याच्य आवाजात म्हणाल्या..
"काय झालं हो??"
हा आविर्भाव प्रयाग हॉस्पीटलच्या आय सी यू बाहेर अनेकांच्या चेहर्यावर दिसतो. हे लक्षात आले तरीही सौम्यच चेहरा ठेवत हसून मालविकाबाई म्हणाल्या..
"कुठे काय?? या ना.. बसा??"
जत्रेतल्या पाळण्यावर जपून बसावे तशा जोशी बाई इकडे तिकडे बघत एका खुर्चीवर टेकल्या.
त्या आत येत असताना काहींनी पाहिलेले होते की आज जोशी बाई करंज्या घेऊन सान्यांच्या घरात घुसलेल्या आहेत. ते लोक आपली सगळी कामे सोडून सान्यांच्या दाराबाहेर स्तब्धपणे उभी होती. कोणत्याही क्षणी विनाशकारी स्फोट होईल ही त्यांची अटकळ!
जोशी बाईंच्या हातातील करंज्या पाहून मालविकाबाईंचे टेम्परेचर गांधिदिनाला चटके देऊ लागलेले होते.
"करंज्या आणल्यात.. "
"इश्श कशाला त्रास घेतलात इतक्या सकाळी?? "
या प्रश्नाऐवजी जोशी बाईंना 'सटवे, स्वतःच्या नवर्याला तरी घातल्यास का खायला' हा तारसप्तकातील प्रश्न अपेक्षित होता. तो ऐकू न आल्यामुळे त्या आणखीनच दचकल्या. आज काही खरे नाही हे त्यांना कळले.
मग त्यांनी हळूच पुटपुटत ते वाक्य टाकले.
"अण्णांना आवडतात ना.. म्हणून...."
ही ठिणगी होती. वरून गांधी आपल्या विचारांचा आता खातमा होणार या कल्पनेने वाकून निराश होऊन बघत होते. फाळणीचेही त्यांना इतके दु:ख झाले नसेल.
"खूप आवडतात यांना.. "
मालविकाबाईंच्या या विधानावर अण्णांच्या मणक्यांमधून एक तीव्र धक्का खाली गेला. 'उद्या काय होणार' हा प्रश्न आज पहाटेपासूनच त्यांना छळत होता. माणसाला उद्याची आशा असते. अण्णांना धास्ती होती. त्यंनी त्यातल्या करंज्या उद्याचा दिवस उजाडल्याशिवाय हातातही घ्यायचा नाहीत हे आत्ताच ठरवलेले होते.
इकडे जोशी बाई 'अण्णांना आवडतो तो पदार्थ आपण आणून दिला आणि खुद्द अण्णांच्या बायकोनेही तो पदार्थ त्यांना आवडतो हे मान्य केले' या आनंदात, त्या वयात जमेल तसे मोहरून अण्णांकडे लाजून पाहात होत्या.
त्यातच त्यांनी डिश पुढे केली अण्णांच्या आणि म्हणाल्या..
"घ्या ना.. आवडतात ना??"
मालविकाबाईंचा आता आगीचा लोळ झालेला होता. पण अजून मोह सुटत नव्हता गांधीवादाचा! जोशी बाई टपकली नसती तर दुपारपर्यंत गांधीदिन खेचण्याची त्यांची तयारी होती. तरी उरलासुरला धीर एकवटून त्या म्हणाल्या..
"खातील हो हे?? तुम्ही ठेवा इथे ती डिश... धन्यवाद हं.. आम्हाला करंज्या आणून दिल्याबद्दल??"
असे म्हणून मालविकाबाई एकदम उठून उभ्याच राहिल्या. आपल्या कृतीतून त्यांनी 'जा ग बये आता' हा संदेश दिला व देहबोलीला गांधीवाद अॅप्लाय होत नसल्याचा फायदा मिळवला. भयातिरेकाने अण्णाही उठून उभे राहिले.
आता खरे तर जोशी बाईंनी निघून जायला काय हरकत होती?
पण नाही.
"नाही.. तसं काही नाही.. मागल्या वेळेस मी भजी आणून दिली तेव्हा तमाशा केलात.. म्हंटलं द्याव्यात की नाही करंज्या आज नेऊन.. "
अत्यंत अनावश्यक विधान! मात्र तितकेच स्फोटक!
"हहहहहह.. नाही हो.. तमाशा बिमाशा कसला.. आपण सगळे एकच ना.. या हं परत???"
जोशी बाईंना शांततेच्या मार्गाने निघण्याची ही शेवटची संधी होती. ती त्यांनी फेटाळली. म्हणाल्या..
"कारण काय आहे.. आपण करावं एखाद्याचं बरं.. तर तो म्हणतो माझंच खरं... "
संतापाने थरथर कापत मालविकाबाई म्हणाल्या..
"एक काम करा.. आत्ता निघा... आणि रात्री बारा वाजता या... मग सांगते... "
"ई.. रात्री बारा?? म्हणजे सरळ माझे नैतिक अधःपतन झाल्याचा आरोपच करताय की तुम्ही... तरी म्हंतले आज इतके सगळे शांत कसे... "
आता अण्णांना जाणीव झाली. हे आत्ताच थांबवले नाही तर तीन दिवस आग आग होईल वाड्यात!
ते पुढे झाले व नम्रपणे जोशी बाईंना म्हणाले..
"वहिनी... आज आमच्याकडे गांधीदिन आहे.. आज घालून पाडून बोलायला बंदी आहे आमच्याकडे..."
जोशी बाईंनी कडवट चेहरा करत मालविकाबाईंकडे पाहात अण्णांना सांगितले..
"म्हणजे तुम्हालाही मान्य आहे तर.. की याच घालून पाडून बोलतात.. ठीक आहे.. निघते मी..."
संपला!
गांधीदिन संपला!
सकाळी साडे सातलाच आटोपला गांधीदिन!
"काय गं ए कैदाशिणे... कोण तू उपटसुंभ?? आं?? घरातून सकाळची बाहेर पडतेस दुसर्यांची घरं नासवायला?? आं?? नवरा काही बोलत नाही तुला?? करंज्या सकाळी करतात?? यांच्या आवडीनिवडी गेल्या पन्नास वर्षात मला कळल्या नाहीत त्या तुला बर्या गं माहीत?? "
अण्णांनी मालविकाबाईंना धरले. जोशी बाई सुरू झाल्या..
"अगं जा?? त्या बुवाच्या नादी लागलीय.. ते दिसत नाही का कुणाला?? चांगल्या मनाने काही करून आणावे तर यांची लक्षणेच मेली मसणातली... हा माणूस स्वभावाने चांगलाय आणि तुझ्याशी लग्न करून बिचारा फसलाय म्हणून मी माणुसकीने काही काही आणून देते.. तर मलाच वाट्टेल ते बोलतेस??"
"मी नाही हो फसलेलो बिसलेलो.. मी आनंदात आहे.. "
अण्णांनी निरुपद्रवी भूमिका बजावली. पण त्यांच्या त्या विधानाचा मालविकाबाईंना काहीही आनंद झालेला नव्हता.
तोवर स्मिता बाहेर आली.
कचाकचा बोलू लागली अण्णांना!
"आता का?? आता का?? सासूबाईंनी गांधीदिन सोडला तर चालते का?? आम्ही मात्र पाळायचा.. "
"स्मिता.. तू गप्प बस..."
अण्णांनीही गांधीदिन सोडला.
घराबाहेर आता वाडा जमला. अथर्व त्यांना हात जोडून आपापल्या घरी जायला सांगू लागला. मधेच आत येऊन स्वतःच्या बायकोला, स्मिताला गप्प बसवू लागला. जोशी बाई आणि मालविकाबाई एकमेकींच्या झिंज्या ओढू लागल्या होत्या. त्यांच्या एकत्रित आवाजामुळे वाड्याबाहेरून चाललेला एक भंगारवाला घाबरून आपली गाडी पटकन ओढत उलट्या दिशेला निघून गेला. वडावरचे कावळे फ्रीजमध्ये ठेवलेले असावेत तसे थिजलेले होते.
सान्यांच्या घरात झाशीच्या दोन राण्या एकमेकींशी लढत होत्या. त्यामुळे गांधीवादाचे काही चालत नव्हते.
गांधींची एक तस्वीर तेवढी भिंतीवर होती. तोच चष्मा, तेच टक्कल, तेच निष्पाप हासणे.. आणि खाली तीच ओळ..
देदी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल
साबरमती के संत तुने करदिया कमाल
"आई.. तू अन आजी आज अशा हासताय
"आई.. तू अन आजी आज अशा हासताय का?? मला भीती वाटतीय..." >>
त्यांच्या एकत्रित आवाजामुळे वाड्याबाहेरून चाललेला एक भंगारवाला घाबरून आपली गाडी पटकन ओढत उलट्या दिशेला निघून गेला. >>
एकदम खुसखुशीत लेख आहे, आवडला.
धन्यवाद!*
:-D
लय भारी.. पडलो पडलो... गांधी
लय भारी.. पडलो पडलो...:हाहा:
गांधी से आंधी तक अस नाव ठेवा या लेखाच... 
(No subject)
(No subject)
दोघांनाही हिंसा सहन करावी
दोघांनाही हिंसा सहन करावी लागायची, काही करायचेच नसल्यामुळे फक्त खरे बोलणे शक्य व्हायचे आणि अण्णांचीही गरीबीच असल्यामुळे साधी राहणी सहज जमायची.
महात्मा गांधींच्या आयुष्याचे एका वाक्यात वर्णन!
गांधीझमचं एक आहे. तो तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा सगळे गांधीवादी होतात.
एक कटु सत्य!
>> गांधीझमचं एक आहे. तो
>> गांधीझमचं एक आहे. तो तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा सगळे गांधीवादी होतात.
व्वा!! या एका वाक्यातच गांधीवादाचं यशापयश सगळंच आलं!
(No subject)
त्यांच्या एकत्रित आवाजामुळे
त्यांच्या एकत्रित आवाजामुळे वाड्याबाहेरून चाललेला एक भंगारवाला घाबरून आपली गाडी पटकन ओढत उलट्या दिशेला निघून गेला. वडावरचे कावळे फ्रीजमध्ये ठेवलेले असावेत तसे थिजलेले होते. >>> क्लायमॅक्स.....
कसला भारी लेख आहे
गांधीझमचं एक आहे. तो तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा सगळे गांधीवादी होतात.>>> अगदी खरं....
मनापासुन हसलो बेफिकीर, लेख
मनापासुन हसलो बेफिकीर,
लेख खरोखरच खुप विनोदी झालाय.
गांधीझमचं एक आहे. तो तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा सगळे गांधीवादी होतात.>>> मनापासुन अनुमोदन
खूप आवडलं.. अजून लिहा !!!
मस्त आवडला लेख...
मस्त आवडला लेख...
आज प्रथम कादंबरी सोडुन,
आज प्रथम कादंबरी सोडुन, बेफिकीरजीनचे नाव वाचुन, ह लेख वाचला. करंजी सारखा खुसखुशीत आहे बर का. आपण विनोदी लेखन पण करता, माहित नव्ह्ते. लिहित रहा असेच.
(No subject)
चातकराव, अवनी, सत्यजीत, मंदार
चातकराव, अवनी, सत्यजीत, मंदार व स्वाती - मनापासून अनेक आभार आपले सर्वांचे!
झक्कीसाहेब - आपल्याला ती दोन वाक्ये आवडली याचा खूप आनंद झाला. आभार!
झाड - आपल्यालाही ते पटले याचा आनंद झाला. धन्यवाद!
अमित, सानी, प्रफुल्ल, वर्षू,सनि व लालू - खूप आभार!
चैत्रा - काही वेळा लिहितो आपलं! आभारी आहे आपला. लोभ असावा.
-'बेफिकीर'!
मस्त खुसखुशीत. जोशी बाई, जरा
मस्त खुसखुशीत. जोशी बाई, जरा दुपारी आल्या असत्या, तर गांधी दीन झाले नसते, इतक्या लवकर.
हे भारीच लिहलयं.... मजा
हे भारीच लिहलयं.... मजा आली.....
दिनेशराव, निवांत, आभारी आहे.
दिनेशराव, निवांत,
आभारी आहे.
-'बेफिकीर'!
(No subject)
(No subject)
(No subject)
काही काही वाक्ये जबरी आहेत.
काही काही वाक्ये जबरी आहेत. आवडले लिखान.
(पण काही विनोद ओढून ताणून पण वाटले)
वाचताना तुमच्या विविधतेचे अन
वाचताना तुमच्या विविधतेचे अन विनोदबुद्धीचे खूप कौतुक वातले.
आज शनिवार खूप छान जातोय या वाचनाने!!
जियो!!
हा! हा!.. खुप मजा आली वाचून..
हा! हा!.. खुप मजा आली वाचून.. हसून हसून पुरेवाट ..
इतके दिवस वाचलाच नव्हता. कसे
इतके दिवस वाचलाच नव्हता. कसे मिसल मि. हसून हसून पुरेवाट झालि. सहि !
गांधीझमचं एक आहे. तो तेव्हाच
गांधीझमचं एक आहे. तो तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा सगळे गांधीवादी होतात.
मस्त आवडला लेख... बोक्या
मस्त आवडला लेख... बोक्या कुठंय ??
लय भारी!
लय भारी!
आवडले..
आवडले..
छान
छान
Pages