मामाची बायको सुगरण,
रोज रोज पोळी शिकरण..
माझ्या वयातील बहुतेक मूलांचा लहानपणीचा आवडता प्रकार म्हणजे शिकरण. शाळेतून आल्यावर
किंवा शाळेत जाताना. संध्याकाळी मधेच भूक लागली कि, भाजी तिखट असली, नावडती असली
वा झालेली नसली, कि शिकरण चपाती पुढे ठेवली जायची.
घरात केळी असायचीच. त्यापैकी एखादे कुस्करुन त्यात दूध साखर घातले कि झाले, शिकरण तयार. केळी बारा महिने उपलब्ध असायची, घरोघरी ती असायची देखील. खरे तर बाकी फळे सामान्य लोकांच्या आवाक्यातली क्वचितच असायची, पण केळी मात्र प्रत्येकाला परवडायची.
अगदी डझनानी नाही तर नगावर ती विकत घेता यायची आणि दोन तीन केळी खाउन अनेक कामगारांचे दुपारचे जेवण भागायचे. मुंबईची केळेवाली, हि त्यानेच तर फ़ेमस झाली.
मी या मालिकेत केळ्याचा समावेश केलाय खरा, पण एक तांत्रिक अडचण आहे. कारण केळे हे तांत्रिकदृष्ट्या फळ नाही कारण त्याचे झाड, हे ही तांत्रिकदृष्ट्या झाड नाही.
थोड्या सोप्या शब्दात सांगायचे तर केळीच्या झाडाची गणना, हर्ब या प्रकारात होते. याचे कुळ म्हणजे, आले, हळदीचे. पण या वर्गात भरभक्कम "खोड" असणारा हा एकमेव वाण.
केळ्याचे झाड तसे सर्वांच्या परिचयाचेच. जमिनीखाली असलेल्या गड्ड्यातून हे झाड उगवते
याचा हिरवागार आणि पुष्ट बुंधा खूप मजबूत दिसतो. पण तो म्हणजे आतील पांढर्या गाभ्यावर असलेला अनेक आवरणांचा थर असतो. ही आवरणे तंतूमय असतात.
या बुंध्यातून सभोवार पाने तयार होतात. पानांच्या मधोमध तंतूमय तरीही मजबूत असलेला दांडा असतो. पान आठ ते दहा फूट देखील लांब होऊ शकते. पण तरीही ते संयुक्त पान नसून एकसंध असते.
यथावकाश, त्याच्या मधल्या भागातून किरमिजी रंगाचे केळफ़ूल बाहेर पडून जमिनीच्या दिशेने वाढू लागते. (काही जंगली प्रकारात, केळफ़ूल वरच्या दिशेनेही वाढते. असा वाण मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. पण विकिपिडियावर सर्वच केळी अशी वरच्या दिशेने वाढतात, असा चुकिचा उल्लेख आहे. )
या केळफूलाची एकेक फणी उकलत जाते व आतील पांढरी फूले दिसू लागतात. अश्या काही
फण्या उकलल्यानंतर केळफ़ूल नूसतेच खाली घसरू लागते.
त्या फूलांचे परागीवहन पाकोळ्या, खारी वगैरे करतात आणि यथावकास त्यापासून छोटी केळी तयार होतात. एका फ़णीत बारा ते वीस केळी असू शकतात, आणि अशा अनेक फण्यांचा एक घड होतो.पहिल्यांदा केळे हे साधारण त्रिकोणी असते मग ते गोल होत जाते.
बाजारात पाठवण्यासाठी, केळ्यांचा घड या अवस्थेत उतरवला जातो. एकदा घड येऊन गेल्यावर त्या झाडाला दुसरा घड येत नाही, आणि ते झाड मरुन जाते. म्हणून घड काढताना, आधी झाडच तोडले जाते. असे तोडले गेले तरी, जमिनीखालच्या कंदापासून नवीन रोपे उगवतातच.
केळ्याचे अनेक प्रकार आकारावरुन आणि रंगावरुन पडलेले आहेत. पण केळ्याचे दोन मुख्य गट म्हणजे साधी केळी (बनाना) आणी राजेळी केळी (प्लांटेन). या दोघातला मुख्य फरक म्हणजे राजेळी केळी हि शिजवूनच खावी लागतात. त्यातला स्टार्च हा त्याशिवाय पचण्याजोगा नसतो. पण साधी केळी मात्र पिकल्यावर तशीच खाता येतात. प्लांटेनचे झाड काहि वेगळे नसते. तसेच त्याच्याही केलफूलाची भाजी होते.
आपल्याकडे साधारण मिळतात ती हिरव्या सालीची. पण आता पिवळ्या सालीची देखील मिळू लागली आहेत. त्यापेक्षा जरा लहान आकाराची पिवळी मिळतात पण ती चवीला जरा आंबट असतात. आणि त्याहून लहान, ती वेलची केळी. यांची साल फिक्कट पिवळी असते. आणि पातळही असते. आता दुर्मिळ झाली असली तरी वसईची लाल सालीची, लोखंडी केळी पण पुर्वी प्रसिद्ध होती. पुर्वी वसई केळ्यासाठी खुप प्रसिद्ध होते. तिथली माती केळीसाठी अत्यंत पोषक होती. पण अतिबांधकामामूळे त्या बागा आता बर्याच कमी झाल्या आहेत.
बाकी जगभरात मात्र, जरा जाड सालीची, पिवळी धम्मक पण देठाकडे हिरवी असलेली, केळीच जास्त लोकप्रिय आहेत.
आपल्याकडे जळगावची केळी देखील प्रसिद्ध आहेत. बाहेरील देशांत चाखलेली पण तरीही अप्रतिम चवीची अशी काही केळी म्हणजे, युगांडातल्या मबाले गावची. तिथे फ़ूटभर लांब केळी मिळतात. आपल्यासारख्याला एक संपवणे कठीण जाते.
केनयाच्या किसुमू गावात पण खास केळी होतात. त्यांना तिथे स्वीट बनाना म्हणतात. अगदी बोटभर आकाराची पण खुपच गोड असतात हि केळी. अगदी आठ दहा देखील सहज खाऊ शकतो आपण एका वेळी. तिथे या केळ्यांपासून बियर करतात.
ओमानमधल्या सलालाह गावात पण उत्तम केळी होतात.
राजेळी केळी आपल्याकडे कमी वापरली जातात. पण गोव्यातली रसबाळी केळी (हि फक्त तिथेच मिळतात) खासच. त्याचा हलवा केला जातो. केरळमधील केळ्यांचे चिप्स, तेसुद्धा खोबरेल तेलातील असले तर, मस्तच.
ही प्लांटेन मध्य आफ़्रिकेत आवडीने खातात. थेट निखार्यावर भाजून, तळून वा उकडून खातात. इथल्या बहुतेक तान्ह्या बाळांचा तो पहिला घन आहार असतो.
सध्या आपण जी केळी खातो, त्या बहुतेक सर्व विकसित केलेल्या जाती आहेत. त्यातल्या बिया जवळजवळ नष्टच झाल्या आहेत. त्यामूळे या जातींची लागवड मानवी हस्तक्षेपाशिवाय शक्यच नाही.
निसर्गात मात्र जी केळी आढळतात, त्या फळात मोठ्या बिया असतात, आणि त्यांचा प्रसार बियांमार्फ़तच होतो.
आपल्याकडे सह्याद्रीत चवईची अनेक झाडे पावसाळ्यात उगवतात. याची पाने जरा जाड असतात आणि गरज वाटल्यास पावसापासून संरक्षण देऊ शकतात. याचे केळफूलही मोठे असते पण केळी मात्र आकाराने लहान असतात. ती पिकल्यावर मधुर लागतात. पण ती आपल्या हाती सहजासहजी पडत नाहीत. कारण ती एकतर निसरड्या कड्यांवर उगवलेली असतात आणि माकडांना ती फार आवडतात.
त्यात बिया असतात आणि त्यांचा प्रसार बियांमार्फतच होतो.
केळ्याच्या काही शोभिवंत जाती आता तयार करण्यात आलेल्या आहेत. बंगळुरुच्या लालबागेत, अशी झाडे बघितली होती. मुंबई विमानतळाच्या बाहेरही काही लाल देठ असलेल्या, पानांच्या जाती लावलेल्या आहेत.
केळ्यातील पोषक द्रव्ये.
केळ्यामधे २३ % पिष्टमय पदार्थ आणि २ टक्के प्रथिने असतात. ३ टक्के चोथा असतो.
जीवनस्त्वांपैकी फ़ोलेट, नायसीन, पॅंटोथेनिक ऍसिड, पायरीडॉक्सीन, रिबोफ्लेवीन, थायमीन, ए, ई, सी व के असतात. सोडीयम नगण्य असून पोटॅशियम मात्र भरपूर असते. खनिजांपैकी चुना, तांबे, लोह, जस्त, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फोरस, सेलेनियम यांच्या मात्रा समाधानकारक असतात.
केळे अगदी सूक्ष्म प्रमाणात किरणोत्सार करते. पण ते प्रमाण अजिबात धोकादायक नसते.
या सर्व घटकामूळे पोटभरीचा तरीहि पोषक असा आहार आहे तो. शिवाय केळी हि निसर्गत:च एका खास आवरणात येतात. त्यामूळे स्वच्छतेच्या दृष्टीने पण ती सुरक्षित असतात.
केळ्याची पावडर हि पण फार पोषक असते. अनेक बालान्नात ती वापरतात तसेच केचप्सना दाटपणा येण्यासाठी पण वापरतात.
केळ्याचे पदार्थ.
वर काही उल्लेख आलेले आहेतच. तरीपण यादी आणखी वाढवायची तर, भरली केळी, केळ्याची उंबरे (राजेळी केळी उकडून त्यात सारण भरुन तळलेले.) केळ्याची पुरणपोळी, केळ्याचे बन्स, बनाना केक, कच्च्या केळ्याची भाजी, उकड, काचर्या, कापे, पाकातल्या काचर्या असे अनेक प्रकार करतात.
अनारसा व मालपुवा करताना पण पिकलेले केळे घालतात, गोडाचे आप्पे करताना पण केळे वापरतात. सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद तर केळ्याशिवाय होऊच शकत नाही.
कच्च्या केळ्याच्या भाजीप्रमाणे, सालाचीही भाजी करतात. केळीच्या मधला गाभा,(सोप) वापरुन पण भाजी करतात. हि भाजी बंगाल आणि कर्नाटक भागात आवडीने खातात.
केळीच्या काल्याचे पाणी वापरुन, पापडाचे पिठ भिजवतात. असे पापड जास्त हलके होतात. केळफूलाची भाजी तर डेलिकसी असते. ती काळजीपूर्वक निवडावी लागते.
केळफ़ूलाचे तूरीची डाळ घालून वडे करतात तसेच भरितही करतात. ही फूले सुकवूनही ठेवता येतात.
केळीच्या गड्ड्यात भरपूर पाणी असते आणि ते तहान भागवण्यासाठी वापरताही येते.
केळीच्या पानाचा थेट खाण्यासाठी नसला तरी इतर खाद्यपदार्थ करताना छान उपयोग होतो. पानगी करण्यासाठी केळीचे पान लागते. मोदकासारखे पदार्थ करताना, केळीचे पान वापरता येते. वडे थापण्यासाठी पण त्याचा छान उपयोग होतो. पानपोळी हा दक्षिणी पदार्थ करायला पण केळीचे पान लागते. त्या पदार्थाला, या पानाचा छान स्वाद येतो.
पुर्वी वसई अर्नाळा भागात, सुकेळी करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालायचा. बांबूच्या खास सांगाड्यावर हि केली रचून वाळवत असत. अशी केळी सुकवताना, त्यातून मधासारखा स्त्राव गळत असे. याच मधात रात्रभर हि केळी बूडवून ठेवत असत. अशी सुकवलेली केळी, चवीला अप्रतिम लागतात. आता ती शोधावी लागतात.
झाडाचे इतर उपयोग.
केळीच्या पानाचा पुर्वापार पत्रावळीसारखा वापर होतो. प्रसाद देण्यासाठी, खास करुन चैत्रातली आंबाडाळ देण्यासाठी केळ्याचे पान वापरले जाते.
पुर्वी भाजलेल्या व्यक्तीला झोपवण्यासाठी व झाकण्यासाठी केळीची पाने वापरत असत.
आपल्याकडे डोंगरावर केळ्याची आणखी एक जात उगवते. त्याला चवई असे म्हणतात. या चवईची पाने जास्त जाड व मजबूत असतात. या पानांचा आदीवासींना पावसापासून संरक्षण करण्यासाठी छान उपयोग होतो.
केळीच्या सालापासून मजबूत धागा निघतो. पालेभाज्या बांधण्यासाठी, गजरे वळण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. केळीच्या ओल्या व सुकलेल्या पानांचाही, पॅकिंग मटेरियल म्हणून छान उपयोग होतो. विड्याची पाने खास करुन केळीच्या पानातच बांधली जातात.
कोकोच्या बिया आंबवण्यासाठी पण केळीची पाने वापरतात.
केळीच्या झाडाचे बाकिचे भाग, गुरांना खाद्य म्हणून देता येतात. केळ्याच्या सालीतही बरेच पोटॅशियम असते, त्यामूळे त्यापासून झाडांना उत्तम खत मिळते.
सांस्कृतिक महत्व
केळीचे झाड हे तसे काही खास निगा न घेता, सांडपाण्यावर पण वाढू शकते, त्यामूळे पुर्वी घरोघर परसदारी केळीचे बन असायचे. केळीपासून निघणारे केळफूल आणि त्याचा मोहक आकार, याचा सबंध सृजनाशी लावण्यात आला आहे.
लग्नादी शुभकार्यात प्रवेशद्वारी दोन लेकुरवाळी केळीची झाडे रोवण्याचा प्रघात आहे. त्यनारायणासारख्या पूजेतही चौरंगाच्या चारी बाजूने, केळीचे लहान खांब रोवतात. मोठ्या केळीच्या खोडापासूनच पुर्वी कोकणात पूजेची सजावट केली जात असे. थर्मोकोल वापरण्यापेक्षा ते कधीही योग्य.
मधुबनी चित्रांमधे, रागमालिकांमधे, शिल्पात, कपड्यावरील भरतकामातही केळीच्या झाडाचे आकार वापरले जातातच.
शिल्पकलेतील स्त्री सौष्ठवाचे जे मानदंड आहेत त्यापैकी पायांसाठी, केळीच्या बुंध्याचा मानदंड वापरला जातो.
(आणखी माहिती येतेय.)


वा सॅम, मी तेच उतर द्यायला
वा सॅम, मी तेच उतर द्यायला आलो होतो. बाकी सगळे आपलेच, त्यामूळे आभाराचा उपचार मी पाळत नाही. पण लक्ष्मणसाहेबांना सविस्तर उत्तर द्यावे म्हणतोय.
तर लक्ष्मणसाहेब,
आपल्या गावातले अप्पासाहेब किंवा इतर कुणीही शेतकरी, यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांचे अनुभवसिद्ध ज्ञान आणि माझे पुस्तकी तूट्पुंजे ज्ञान यांची तुलनाच होऊ शकत नाही. मला त्यांना भेटायला नक्कीच आवडेल.
पण होतं काय, त्यांचे अमूल्य ज्ञान त्यांच्याकडेच राहते. तूमच्यासारखे त्यांच्या संपर्कात असणारे लोक याबाबतीत नक्कीच काहितरी करु शकतील.
न खाणारी फळे, असा छान विषय आपण सूचवला आहात. संदर्भाने मी अशा काही फळांबद्दल लिहिलेही असेन, पण अर्थातच त्याला अनुभवाची जोड नसणारच. माझा अगदी आग्रह आहे, अशी एखादी मालिका आपण अवश्य लिहा. मी वाट बघतोय.
आपलाच,
दिनेश
मला कुणीतरी सांगितलं होतं की
मला कुणीतरी सांगितलं होतं की केळं खाताना त्यात अगदी बारीक (मोहरीपेक्षा लहान) काळं काळं दिसतं ते त्याचं बी. (रानकेळी ज्याला कोकणात 'चवय' (चवई) म्हणतात त्याच्या बिया थोड्या मोठ्या असतात). केळ्याचं बी काढणं कठिण असल्याने पिकलेली केळी काथ्याच्या दोरखंडावर घासतात. त्यामुळे ते बी दोरीच्या धाग्यात अडकते आणि दोरखंड वाळवतात. मग हा दोर॑खंड जमीनीत पुरतात लागवडी साठी..
(ऐकीव माहीती आहे... अप्पांकडून ऐकायला आवडेल)..
केळं खाल्याने वजन वाढतं आणि कॉन्स्टीपेशन होतं हा अनुभव... पण घानामधे काही खायला मिळालं नाही तर दुपारी २ केळी खाल्ली की संध्याकाळपर्यंत चिंता नसायची.
दिनेश.. केळं आणि प्लँटीन मधे नक्की फरक काय? आफ्रिकेत प्लँटीनचे तळलेले चिप्स बघितले आहेत..
(बाकी माहीती छान आहे).
नेहमी प्रमाणेच अत्यत
नेहमी प्रमाणेच अत्यत अभ्यासपुर्ण आणि प्रचंड माहीती देणारा लेख...
धन्यवाद सॅम. परदेसाई,
धन्यवाद सॅम.
परदेसाई, दोरखंडाची माहिती नवलाची. मस्त.
भाजी तिखट असली, नावडती
भाजी तिखट असली, नावडती असली
अगदी अगदी.. अजुनही हेच चालतं.. !
वा झालेली नसली, कि शिकरण चपाती पुढे ठेवली जायची. >>>>>>>
फक्त वरच्या फोटोतली शिकरण इतके व्यवस्थित काप करून आणि केशर वगैरे घालून जास्तच sophisticated दिसते आहे..
मस्त फोटो आणि लेख..
विठाईच्या लेखात होत्या तश्या नेहेमीच्या नसलेल्या रेसिप्या ह्या लेखांमध्ये पण घाला..
<< केळं खाल्याने वजन वाढतं
<< केळं खाल्याने वजन वाढतं आणि कॉन्स्टीपेशन होतं हा अनुभव... >> कांही खेळांच्या [ बॉक्सिंग, वेटलिफ्टींग इ.] स्पर्धेत स्पर्धकांची त्यांच्या वजनानुसार वर्गवारी असते. आयत्या वेळी जर एखाद्या स्पर्धकाचं वजन तो ज्या वजन गटात स्पर्धेत उतरला आहे त्यापेक्षा थोडं कमी भरतंय असं वाटलं, तर प्रशिक्षक त्याला स्पर्धेआधीच्या वजनवारीसाठी केळीं खायला सांगत ! [ वजन थोडं जास्त भरेल असं वाटलं, तर स्पर्धक बाहेरच्या एखाद्या मैदानाला धांवत दोन फेर्या मारून यायचा !]
<< अशी एखादी मालिका आपण अवश्य लिहा. >>" निष्फळ " शीर्षक छान दिसेल अशा मालिकेला !
दिनेशदा, सुंदर लेख.
दिनेशदा, सुंदर लेख. केळ्यासारखं रोजचं फळ... पण किती अल्पं माहिती आहे मला... हे ध्यानात आलं.
(ज्या "निगुतीनं" लिहिताय, दिनेशदा... त्यासाठी बहोत खूब)
कारण केळे हे तांत्रिकदृष्ट्या
कारण केळे हे तांत्रिकदृष्ट्या फळ नाही कारण त्याचे झाड, हे ही तांत्रिकदृष्ट्या झाड नाही.
थोड्या सोप्या शब्दात सांगायचे तर केळीच्या झाडाची गणना, हर्ब या प्रकारात होते. याचे कुळ म्हणजे, आले, हळदीचे. पण या वर्गात भरभक्कम "खोड" असणारा हा एकमेव वाण.>>> हे नवीनच समजले!
छान माहिती. धन्यवाद दिनेशदा!
केळफुलाची भाजी मला फार फार आवडायची/आवडते (पण अनेक वर्षांत नाही खाल्ली)
केळं हे माझं नावडतं फळ. पण हा
केळं हे माझं नावडतं फळ.
पण हा माहितीपूर्ण लेख मात्र खूप आवडला,
अगदी चवीने वाचला .....
नमस्कार दिनेशदा, लेख खूप छान,
नमस्कार दिनेशदा,
लेख खूप छान, वाचनीय व अभ्यासपूर्ण - झाड, पाने, फुले, फळे इ. सर्व बाबतीतले तुमचे वाचन, निरिक्षण व मुळातली तुमची या विषयाची आवड यामुळे कायमच तुमचे लेखन आवडते. नवनवीन माहिती मिळाल्यामुळे खूप आनंद होतो.
एक तांत्रिक गोष्ट सांगितली तर कृपया आगावूपणा समजू नये - "परागीभवन" नसून "परागीवहन" बरोबर आहे - डॉ. अनिल अवचटांनी याचे स्पष्टीकरण दिवाळी अंकातील त्यांच्या एका लेखात दिले आहे - तेही परागीभवन म्हणत होते - एका वनस्पतीशास्त्रज्ञाने ती चूक सुधारल्याचा उल्लेख आहे.
विनय, हि नवीनच माहिती. चवईची
विनय, हि नवीनच माहिती. चवईची केळी हातात मिळणे कठीन कारण ती झाडे, कडे कपारीत उगवलेली असतात आणि माकडांचा त्यावर पहिला हल्ला होतो. ति बी मिरिदाण्याएवढी मोठी असते. निसर्गात तर सहज रुजते. ते दोरखंडाचे मला नवीन.
आणि भाऊ म्हणताहेत त्या प्रमाणे वजन वाढवायला ते उत्तम. मिलिटरी भरतीच्या वेळी, केळ्यांना तुफान मागणी असते. प्लांटेन म्हणजेच आपली राजेळी / रसबाळी केळी. ती शिजवूनच खावी लागतात. तसे त्याचे झाड काहि वेगळे नसते.
शशांक, शद्ब सुधारतो. लहानपणापासुन याच शब्दाची सवय जडली आहे ना. जाणीवपूर्वक बदलावी लागेल.
दा एकदम रंजक माहिती केळी
दा एकदम रंजक माहिती
केळी खाऊन वजन वाढवायचा प्रयोग केलाय
रोज १.५ डझन फसला कसा कोण जाणे 
दिनेशदा, लेख आवडला ! कारण
दिनेशदा,
लेख आवडला !
कारण नविन माहिती मिळाली,खायला आवडीच फळ, अजुनही विकत घ्यायला परवडणार, फायदेही खुप आहेत म्हणुन ...!
खरे तर बाकी फळे सामान्य लोकांच्या आवाक्यातली क्वचितच असायची, पण केळी मात्र प्रत्येकाला परवडायची.
इकडे साधी केळे ३०-४० रु. डझन आहेत, पण देशी (लहान्,पातळ साल असलेले) केळे तर आता सामान्यांना परवडण्यासारखी राहिलेली नाहीत अस वाटतं,आजकाल ती बाजारात जास्त बघायलाही मिळत नाहीत
मस्त लेख. इथे कर्नाटक मधे पण
मस्त लेख. इथे कर्नाटक मधे पण रसबाळे केळी मिळतात. ती जरा महाग असतात. इथे लहान मुलांना साधी केळी देत नाही, सुरवात रसबाळे केळ्यानी करतात.
साध्यासुध्या गरीब बिचार्या
साध्यासुध्या गरीब बिचार्या केळ्यावर किती छान माहिती!
मी जळगाव जिल्ह्यातला. मामांचे
मी जळगाव जिल्ह्यातला. मामांचे गाव यावल.
कोणी विश्वास ठेवा अथवा ठेवु नका. १९९६ साली मी जेव्हा ४० गावी शिकत होतो, तेव्हा ४० गाव - भडगाव अप डाऊन करायचो, भुक लागली की कजगांव येथे केळी विकत घ्यायचो.
भाव फक्त २५ पैसे डझन. आणि तेही गोड केळी.
आताचे भाव पाहिले की ते दिवस आठवतात
आता २५ रु डझन
आता २५ रु डझन
Pages