आमच्या बिल्डिंगची वरल्ड कप 'फायनल'

Submitted by मामी on 30 April, 2011 - 11:44

कारुण्यातून जन्माला येणारा विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद असतो असं म्हणतात. हे जर खरं असेल ना तर मग आमच्या बिल्डिंगमध्ये तो 'तसा' विनोद (म्हणजे वर म्हटलाय तसा, उगाच इकडे तिकडे बघू नका) घडला असं म्हणावं का? तुम्हीच ठरवा.

पहिलं वाक्य जोरकस आहे म्हणून ओपनिंगला टाकलंय. आता थोडी मागची ब्याग्राउंड सांगतो. तर मी रघू. पाचव्या मजल्यावर राहतो. मीच ब्याग्राउंड सांगतो कारण पुढची सगळी मांदियाळीपण मीच सांगणारे. आमच्या बिल्डींगमध्ये मुद्दे मांडण्यात आणि गुद्दे हाणण्यात मीच पॉप्युलरली फेमस आहे, म्हणून बिल्डिंगमधल्या आबालगोपाळांनी या घटनेचा चक्कशुरवाही वृत्तांत मी तुमच्यापर्यंत यथाशक्ती पोहोचवावा अशी मला यथासक्ती केलीये.

तर, त्याचं असं झालं की ...... आमच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरच्या वर जाण्याच्या जिन्याच्या समोरच्या घरात राहणारे बरंआजोबा वरती गेले. म्हणजे खूप खूप वर गेले. म्हणजे कधीच परत न येण्याच्या वाटेवर निघून गेले. म्हणजे या बहुतेक जगातलं (की भहुतेक? की भउतिक? जरा कन्यफूजनचा मामला वाटतोय) आपलं अवतारकार्य संपवून शेवटच्या यात्रेला गेले. मरू दे. स्पष्ट शब्दांत ओपनली सांगायचं तर वारले.

बळवंत रमाकांत नितसुरे. गेले तीसेक वर्षे बरंआजोबा हे सार्‍या बिल्डिंगचे बरंआजोबा होते. (म्हणजे रंभातला रं नाही बरं का तर 'बरं का' तला रं. बरं का?) (छ्या! एक स्पलनेशन देताना सॉल्लिड कन्यफूजन होतय). म्हणजेच आजोबा आणि बिल्डिंग किती प्राचीन होते याचा मागमूस तुम्हाला लागला असेलच. बरं ते बरं गेले ते गेले .... च्यायला दिवस कुठला निवडावा तर वरल्डकपाचा. म्हणजे आधीच उल्हास त्यात हा दुर्विलास अशातली गत.

हा प्रसंग खरंतर डब्यात डब्यात डबा तसा कारुण्यात कारुण्य आणि त्यात अजून एक कारुण्य असा टिब्बल धमाका ठरला असता. म्हणजे बरं गेले, वरल्डकपाच्या म्याचच्या दिवशीच गेले हे तर झालंच. पण आता दर वरल्डकपाला त्यांची आठवण येणारच हे तिसर्‍या क्रमांकाचं सगळ्यात आतल्या डब्यातलं कारुण्य. पण बरंआजोबांच्या क्रिकेटप्रेमामुळे आणि बरंआजोबांच्या कुटंबियांनी मनावर घेतल्यामुळे (की न घेतल्यामुळे?) ........ काय झालं ते सांगतोच.

तर ते बरंआजोबांचं. तर ते वारले. इथपर्यंत भाग मागच्या एपिसोडात येऊन गेला आहेच. आता पुढे. तर झालं काय ..... अंहं ते जाऊ दे. आधी तुम्हाला झालं का ते सांगतो. बरंआजोबा हेSSSSSS उभेआडवे. व्हर्टिकली जसे सणसणीत तसेच हॉरीझाँटली पण दणदणीत. (म्हणजे त्यांच्या रुंदीबद्दल बोलतोय मी. त्यांच्या झोपल्यानंतरच्या पोझिशनबद्दल हे मत नव्हतं हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो.) पण पुढेपुढे त्यांची रुंदी वाढायला लागली. मग ती मागेमागे आणि बाजूबाजूलापण वाढायला लागली. जिन्यात पाय वाजवणार्‍यांना आणि खालच्या मैदानात क्रिकेटचा गेम खेळणार्‍यांना (कसे खेळायचे याच्या) सुचना देताना खच्चून ओरडणे हीच ज्यांच्या भक्कम व्यायामाची सरहद्द, त्यांचे दुसरे काय होणार? इतकी वाढली की त्यांना 'बरं' वरुन 'बरंनि' अशा पूर्ण नावाने हाक मारायची टूम निघत होती. पण रुंदीच्या (इथे नावाच्या म्हणतोय मी) भयाच्या दृष्टीकोनातून हा मुद्दा मागे पडला. तिसर्‍या मजल्यावरचा आचरट विन्या म्हणायचा सुध्दा की त्या व्हिआयपी कंपनीनं जर 'अंडर'वायर' बनियान' विकायला काढली तर त्याचं ब्रँड अंब्यासाडरत्व अगदी पाचशेएक टक्के बरंना बहाल केलं असतं. आणि यावर कधी नव्हे ते आमच्या टीमचं एकमत झालेलं.

पण बरंआजोबांना क्रिकेट भयंकर प्रिय. क्रिकेटवर त्यांचं सगळ्या भारतवर्षाएवढंच प्रेम. म्हणजे बरंआजोबा भारतावर जेवढं प्रेम करायचे, तेवढंच क्रिकेटवर करायचे आणि शिवाय आख्खा भारत जसा आणि जेवढा क्रिकेटच्या प्रेमात असतो ना तसं आणि तेवढं प्रेम बरंआजोबा क्रिकेटवर करायचे. (ह्म्म... मला वाटतं मी पुन्हा बर्‍यापैकी कन्यफूजनच्या रस्त्याला लागलोय). भारतीय टीमकडून कितीही क्याच सुटले तरी हे म्याच बघायचं सोडणार नाहीत. ते स्वतःच सेल्फअपॉईंट केलेले असे स्वयंघोषित क्रिकेटगुरूही होते. आमचं गल्ली क्रिकेट सुरू झालं की त्याची ग्यालरीतली आवडती खुर्ची भरून जायची. वरून लक्ष ठेऊन ते खच्चून सुचना करायचे. तेच आमचे स्कोअरकीपर, मार्कदरशक (नाही नाही मार्गदरशक), फिलॉसॉफर आणि तहान लागल्यावर पाण्याच्या बाटल्या फेकणारे होते. एकाच खुर्चीवर बसून आणि बसल्या बसल्या मार्गदरशन करत असल्याने त्यांचा कोच न म्हणता काऊच म्हणावे असे विन्या म्हणायचा देखिल.

पण क्रिकेट हा बरंआजोबांचा श्वास होता. आणि आवाज तरी कसला! सगळी टीम एकीकडे आणि बरंआजोबा एकीकडे तर तेच जिंकणार. त्यांची ती ग्यालरीतली आवडती खुर्ची ही त्यांची फारच आवडती होती. कारण ती भलीमोठी खुर्ची ठेवायला दुसरीकडे कुठे जागा नव्हती आणि दुसर्‍या कोणत्या खुर्चीवर बसणं परवडण्यासारखी बरंन्ची परीस्थिती नव्हती.

तर आता क्लायम्याक्सच्या पार्टाकडे येतो. तर सांगायची गोष्ट अशी की, आमची बिल्डिंग आणि आख्खी गल्लीच प्रचंड क्रिकेटवेडी. आपण वरल्डकप जिंकून आणणारच याची इतकी दुर्दम्य खात्री की आम्ही ऑरलेडी आधीच मिरवणूकीची फुल्ल्टू तय्यारी केलेली. म्हणजे फटाके, अ‍ॅटमबाँब, झालंच तर पिपाण्या ... असं बरंच काय काय. शिवाय गल्लीत केळी विकणार्‍याची हातगाडी मागून आणून सजवली होती. तिच्या चारी बाजूंना जुने स्टंप लावले होते. वरल्डकपाची एक थर्माकोलची प्रतिकॄतीही आणून ठेवली होती. फक्त आपल्या टीमनी वरल्डकप जिंकायचा आवकाश होता.......

तर झालं काय की फुल्ल बिल्डिंग, गल्ली, शहर, देश आणि वरल्डकप असल्याने वरल्ड .... त्या दिवशी फायनलची म्याच बघत होते. टाळ्या वाजवत होते, निराश होत होते, श्वास रोखून बघत होते. बरंआजोबाही आपले खुर्चीतल्या खुर्चीत नेहमीप्रमाणे म्याचशी एकरूप झाले होते. तेही बसल्याबसल्या आशानिराशेच्या झोपाळ्यावर झुलत होते. आणि तो ऐतिहासिक क्षण आला ...... तसं वेगळं सांगायची गरज नाहीये. वरल्ड कप आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे ढोणीची सिक्सरच!

ही इकडे ढोणीनं खण्णकन सिक्सर मारली आणि आख्ख्या वरल्डबरोबर बरंआजोबांनीही आनंदानं किंचाळत एक उडी ठोकली.... आणि काय सांगू तुम्हाला? गुरुत्वाकर्षणाच्या तिसर्‍या नियमाप्रमाणे त्यांचा देहच केवळ उडीनंतर खाली आला. आत्म्याला हा नियम लागू नसल्याने तो वरतीच कुठेतरी तरंगायला लागला असणार. (अ‍ॅक्च्युअली तिसरा नियम हा गुरुत्वाकर्षणाला नसून न्युटनला असतो असं अंधुक आठवतंय.) म्हणजे अत्युच्च आनंदात त्यांनी अत्युच्च उडी मारली आणि त्यांचा जीव अत्युच्च जागी जायच्या मार्गे लागला. बरं ही घटना बरंच्या मुलानी (नितसुरे काकांनी) पाहिलीही पण आनंदात बरंआजोबा उडी मारून पुन्हा खुर्चीत बसलेत असंच त्याला वाटलं. घरातले सगळेच आनंद साजरा करत होते त्यामुळे तब्बल अडिच मिनिटं घरच्यांना खर्‍या घटनेचा पत्ताच नाही. पण बर्‍याच काळ बरंआजोबांचा तो सुप्रसिध्द आवाज नाही म्हटल्यावर कोणाच्यातरी मनात चिचुंद्री चुकचुकली आणि एकच हलकल्लोळ माजला. आणि यथावकाश बातमी बिल्डिंगभर पसरली.

आता आमची सॉल्लिड गोची झाली ना. एक अत्यंत आनंद आणि एक अत्यंत दु:ख! म्हणजे बरंआजोबा गेल्याचं दु:ख तर होतच पण ते नेमके आमच्या आणि त्यांच्या अत्यानंदाच्या वेळी जावेत? आणि अशातच तीसेक मिंटं गेली. आणि अचानक नितसुरे काकांनी एक विचार मांडला. सगळे दचकलेच पहिल्यांदा. पण एकदा विचार केल्यावर सगळ्यांनाच हे पटलं पण आणि नितसुरेकाकांबद्दल आदर-बिदरही वाटलाच. आपल्या क्रिकेटप्रेमी वडलांना अशा क्रिकेटच्या उच्च आनंदाच्या क्षणी मृत्यु आला तर त्याचं दु:ख करण्यापेक्षा त्यांना आनंदाने निरोप दिला जावा अशी नितसुरेकाका आणि काकुंची इच्छा होती.

पुढच्या सत्राची सुत्रं नेहेमीप्रमाणे दाजीकाकांनी हातात घेतली. स्वत:च्या हातात माईक नसल्याचं दु:ख मनातल्या मनात दडवत त्यांनी दु:खभर्‍या आवाजात पुढची योजना सगळ्यांपुढे मांडली. सजवलेल्या हातगाडीवर ठेऊन आम्ही आमच्य गल्लीक्रिकेटच्या भीष्माचार्यांची वाजतगाजत पाठवणी करणार होतो - त्यांच्या लाडक्या (थर्माकोलच्या) वरल्डकपासकट. हे ऐकून सगळ्यांनी उत्स्फुर्तपणे घोषणा दिलीच 'बरंआजोबा अमर रहे!' आणि माझ्या मनातला सगळ्यात आतला डबा एकदम उघडला गेलाच ......

गुलमोहर: 

हे मी शनिवारी लिहायला घेतलं आणि रविवारी बघतेय तर विकवि सगळी माबो व्यापून राहिले होते. नेमकं त्याच गंगेत माझंही घोडं नहायला आलंय.

गुरुत्वाकर्षणाच्या तिसर्‍या नियमाप्रमाणे त्यांचा देहच केवळ उडीनंतर खाली आला. आत्म्याला हा नियम लागू नसल्याने तो वरतीच कुठेतरी तरंगायला लागला असणार. (अ‍ॅक्च्युअली तिसरा नियम हा गुरुत्वाकर्षणाला नसून न्युटनला असतो असं अंधुक आठवतंय.)>>> Rofl

(पण वाईटही वाटलं मामी, ते आजोबा गेले म्हणून! )

आवडला प्रसंग, पण जरा अधिकच कारुण्यमय झाला. की तेच अपेक्षित होते?

-'बेफिकीर'!

जबरी..

वर्ल्डकपाच्या दिवशीच मयतीची आयडियाच फॅण्टास्टिक. इथंच फुल्ल मार्क्स !!... मामी, तुस्सी ग्रेट हो.
अवांतर : एकदा पेताडांच्या अंत्ययात्रेला गेलो होतो तो प्रसंग आठवला...!!

मामी, हे पण मस्तच. एक सल्ला, विनोदीच लिहायला पाहिजे असे नाही, ललितही छान लिहिशील. एक नैसर्गिक ओघ आहे, तूझ्या लिखाणाला !

कारुण्यातून जन्माला येणारा विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद असतो असं म्हणतात.>> सुरुवात Biggrin

गुरुत्वाकर्षणाच्या तिसर्‍या नियमाप्रमाणे त्यांचा देहच केवळ उडीनंतर खाली आला. आत्म्याला हा नियम लागू नसल्याने तो वरतीच कुठेतरी तरंगायला लागला असणार. > Rofl हे लय भारी लिवलंय मामे.

बरं आजोबांच्या आत्म्यास चिर'शांती लाभो.