जिवडा दो दिन का महेमान- तिची चित्तरकथा!

Submitted by मी_आर्या on 30 April, 2011 - 08:22

"ओ बहिन... तुले सांगस, गयामां गाठलं तर बसायला पाटलं! " (गळ्यात सोन्याचे हार असतील तर(च) बसायला पाट मिळतो). आत्या मला सांगत होती,"पन तु पह्यले हाई लिख,"जिवडा दो दिन का महेमान" ! हे तिच्या पंजाबातल्या कुठल्याशा 'गुरु'चं गाणं होतं. थोड्याशा नाराजीनेच मी तिचं हे गाणं कागदावर उतरवलं. २००९ च्या ऑगस्टची २४-२५ तारीख असेल, सुरतला चुलतबहिणीकडे आम्ही जमलो होतो. मी, आई, काकु, ही मोठी आत्या आणि एक चुलतबहिण. मी 'अहिराणी ओव्या' सांग म्हणुन तिला थोडं झाडावर चढवायचा प्रयत्न करत कागद पेन घेउन तिच्या जवळच बसले होते. तशा आमच्या सगळ्या आत्या आमच्या अग्दी मैत्रीणीसारख्याच. घरी आल्या की भावजयांशी जुजबी बोलुन आमच्यात येउन बसत मग त्यांच्या पोतडीतुन एकेक विस्मयकारक (काल्पनिक नाही हं) गोष्टी सांगत व आम्ही तोंडाला ओढण्या लावुन खुसुखुसु हसत असु. ही आत्या दिसायला म्हणजे, मोठं कपाळ, ठसठशीत कुंकू, उंचीपुरी, शेलाटी! नऊवारी साडी, लांबसडक केसांचा अंबाडा त्यावर कायम एक चांदी फुल खोचलेलं.

१९४० च्या सुमारास आजोबांनी धुळ्याला स्थलांतर केलं. तिथे ६व्या गल्लीत एक वाडा-वजा बोळात आजोबा दोघी काकांसह रहात होते. आजोबा धुळे-अमळनेर युनियनच्या गाडीवर एजंटचं काम करायचे. या मोठ्या आत्याचे लग्न झाले, पण नव-याचा जळगावमधील एका छोट्या गावात कामधंदा होत नव्हता म्हणुन आजोबांनी त्यांना धुळ्याला आणले.त्याच बोळात मागच्या एका खोलीत आत्या रहायला आली. इकडे आत्याचा दर वर्षाला पाळणा असायचा. आत्याला एकुण १६ मुलं झाली. त्यापैकी ९ जीवंत राहिली. या नवांमधे ६ मुलं तर ३ मुली. भावजया सांगत, की ताई (आत्याला आम्ही सगळे 'ताई' म्हणत असु) च्या घरी केव्हाही जा, एक पोरगं पाळण्यात, एक मांडीवर, आणि स्टोव्हवर छोट्याशा पातेल्यात मटण उकळत असलेलं दिसे. हे सगळे खाण्या पिण्याचे लाड आजीमुळे चालतात बरं". कहर म्हणजे त्या काळात मुलींची नकळत्या वयात लग्न होत त्यामुळे कधी कधी आई-मुलगी, सासु-सुनांची एकाच वर्षी बाळंतपणं होत. शेजारी शेजारी बाळंतिणीच्या खाटी असत. आत्याच्या नव-याचं इथेही बस्तान बसत नव्हतं. तो मधुनच कुणाला न सांगता त्याच्या मुळ गावी निघुन जात असे. एवढ्या मुलांची सगळी जबाबदारी आत्यावर. ती घरीच भुईमुगाच्या शेंगा फोडायचे काम करी, किंवा कलाकुसरीची कामे.

मधल्या काकांनी पारोळा रोडवर प्लॉट घेउन घर बांधले. बाजुला एक छोटेसे खोपटे बांधुन,आत्याच्या
नव-याला सोनारी काम करण्यासाठी दिलं. आत्या आणि तिचा नवरा यांच्यात तसा काही बेबनाव नव्हता पण प्रेम ही नव्हतं, फक्त व्यवहार राहिला होता. आत्याने मोंगलाईकडे दोन रुमचे मातीचे घर घेतले.ती तिथे बाकीच्या मुलांना घेउन रहात होती. कालांतराने आत्याच्या एकेक मुलांची लग्न झाली. एवढ्याशा घरात सुना १-२ वर्ष राहुन वेगळ्या रहात होत्या. मुलींची लग्न होउन आपापल्या संसारात व्यस्त झाल्या. आत्याची २-३ मुलं स्वकष्टाने मार्गी लागली. उरलेली अशीच सोनारी काम, रिक्षा चालवणे, ड्रायव्हरची कामं करत नव्हती. खुप गरीबी नाही पण खाऊन पिऊन सुखी होती मुलं. आता आत्याच्या नव-याला काम करण्याची गरज उरली नव्हती .इकडे देखरेखीला माणसं पाहिजेत म्हणुन आत्याच्या नवर्‍याला एका मुलाने आपल्याकडे ठेउन घेतले.

आत्याच्या एका मुलीला सासरी त्रास होता, म्हणुन तिने तिला माहेरी आणले...तिच्या ३ मुलींसहीत. माय-लेकी काही बाही कामं करु लागल्या. तसं आत्याला कलाकुसरीची कामं ही चांगली यायची. ते सगळं विकुन त्यात किडुक मिडुक आणुन त्यांचा संसार चालु होता. मुलीने ही कधी नर्सच काम कधी धुणं भांडी असं केलं. ६ पैकी एकाही भावाने बहिणीला सांभाळयला होकार दिला नाही. उलट "मुलींना विहिरीत ढकलुन दे किंवा अनाथाश्रमात ठेव असा बहिणीला सल्ला देण्यात आला". एकाने तर सांगितले की "आम्ही प्रतिष्ठीत, तु हे असं लोकांच्या घरची कामं करतेस,आमचं नाव खराब होतं ... तु धुळ्यातही राहु नकोस".
आत्या तिच्या धाकट्या मुलाला आणि या मुलीला सोबत घेउन औरंगाबादला येऊन राहिली. धाकट्याने लग्न केले, सुनेने आत्यालाच घराबाहेर काढले. तिच्या विधवा मुलीने वेगळे बिर्‍हाड केले होते. आत्या पुन्हा एकटीच.मध्यंतरी म्हणजे २००३ मधे आत्याला मेंदुला गाठी झाल्याने मुंबैला अ‍ॅडमीट केल्याचे कळले होते...पण उपचारांचा खर्च कोणी करावा यावर मुलांचे वाद झाले म्हणुन आत्या तशीच परत आली. कदाचीत 'अती परिचयात ....'सारखा प्रकार असावा म्हणुन भावंड तिला कोणी जवळ करत नव्हते. बाकी तिघी आत्यांना सासुरवाशिणी असल्याने लग्न, समारंभांना आग्रहाचं निमंत्रण असायचं पण ह्या आत्याला एखादी बोलावणं फक्त...ती ही तेवढ्यात समाधान मानुन आनंदानं यायची.

शेवटी आत्या मोठ्या मुलीकडे येउन राहिली. तिथे २-३ महिने नातवंडांनी चांगली सेवा केली. मधेच तिचा एक मुलगा "६ मुलं असुन तु मुलीकडे रहाते, लोकं आम्हाला नावं ठेवतात" असं सांगुन तिला घेउन गेला. त्याच्या घरात आत्याला आई म्हणुन काहीच स्थान नव्हते. बाहेरच्या हॉलमधे यायचं नाही .. मागच्या तिच्या रुममधेच जेवायचं असे प्रकार होते. इतकच काय या मुलाने बहिणींना केळवणाला जेवायला बोलावले तर त्या हॉलमधे जेवायला बसल्या, पण आत्या आतल्या रुममधे एकटीच जेवत होती.एक महिना पण राहिली नसेल याने तिला घराबाहेर काढले. आत्याला हा मोठा धक्का होता. भावाकडे येउन ढसाढसा रडली भावजायीजवळ....आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचं सुद्धा! पुन्हा तिच्या जुन्या घरी गेली. कुलुप काढत असतांनाच समोरच रहाणारा तिचा एक मुलगा आला. म्हणाला," तु परत येतेयेस आणि म्हणशील की ही सून तुला २ हंडे पाणी भरुन देइन किंवा २ पोळ्या टाकुन देइल तर ते होणार नाही. हा विचार करुन मगच ये". डिसेंबरमधे मधल्या मुलीच्या मुलीचं लग्न होतं म्हणुन ती घेउन गेली. १५ तारखेचं लग्न करुन परत आली तेच तापाने फणफणत. नातवंडांनी हॉस्पीटलमधे अ‍ॅडमीट केले. २८ डिसें.२०१०,संध्याकाळी धाकटा मुलगा, नातु डबा घेउन आले. नातवाजवळ बसली आणि त्याच्या खांद्यावर मान टाकली. तिथेच जीव गेला. जवळच रहाणा-या मुलाला फोन करुनही तो तासाभराने आला.

दहावं-बाराव्याला आम्ही गेलो होतो. सुना-मुलं रडत होती. बाराव्याला सगळा स्वयंपाक झाल्यावर तिची मुलं म्हणाली,'अरे, ती जिलबी ठेवली का ताटात? ताईला(आईला) जिलबी फार आवडायची". आता सहा महिने होतील आत्याला जाऊन. आता तिची मुलं अभिमानाने सांगत असतात की ताईने आमच्याकडे १पैसा मागितला नाही. एकाने आता घरात दर्शनी भागात आत्याचा मोठ्ठा फोटो लावलाय म्हणे!

१९९९ ते २००९ या दहा वर्षात एकापाठोपाठ एक अशी आत्याची सगळी भावंड वारली आणि आत्या सर्वात मोठी असुनही ८१ वर्ष जगली.
'जिवडा दो दिन का महेमान' असं म्हणणारी ही ९ मुलांची आई एवढी वर्ष जगली....उपेक्षिताचं जिणं!!!

गुलमोहर: 

आर्ये Sad लेख अगदी स्पर्शून गेला.. Sad
तिच्यातली आई दिसली... इतकं केलं पोराबाळांसाठी पण शेवटपर्यंत उपेक्षा पदरी पडूनही तक्रार केलेली दिसत नाही तुझ्या आत्याने... निमूट सहन केलं.. Sad
धीराची बाई होती असे वाटतेय.

बापरे.. कसले भोग भोगायला आली होती गं या भूतलावर.. Sad
या दुनियेतून गेल्यावर आता तरी सुखी झाली असेल अशी आशा करते.!!!

अशी काय वागतात ही माणसं काय कळतं नाही, आपल्याच आई-वडिलांना सांभाळायला काय प्रॉब्लेम असतो ह्यांना? मला अशा मुलांचा खुप राग येतो, असं वाटतं की रस्त्यात उभ करुन चाबुकानी फोडुन काढलं पाहीजे.आपल्यालाही मुलं आहेत, आपण ही म्हातारे होवु हे सर्रास विसरतात लोक. Sad

आपल्यालाही मुलं आहेत, आपण ही म्हातारे होवु हे सर्रास विसरतात लोक. >>> एक्झॅक्टली रचु.... हे तर विसरतातच.... पण ज्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं, वाढवलं, त्यांनाच असे वागवण्याचा कृतघ्नपणा कसा काय करु शकतात ही मुलं, तेच समजत नाही.... Sad

बापरे.. कसले भोग भोगायला आली होती गं या भूतलावर..
या दुनियेतून गेल्यावर आता तरी सुखी झाली असेल अशी आशा करते.!!!
>>> अगदी अनुमोदन.

वाईट वाटल ग आर्ये, आत्याची ही परवड वाचून.

... जाचलं... टोचलं.
आर्या, एकदम भडाडा आलाय हा लेख. एका माणसाचं, स्त्रीचं, आईचं अख्खं आयुष्यं असं पोतेरं झालेलं... सरळ ओतलयस.
वास्तव इतकं विषण्णं करणारं आहे की त्याला कथेचा बाज वगैरे काही काही लागलं नाही...

>>अशी काय वागतात ही माणसं काय कळतं नाही, आपल्याच आई-वडिलांना सांभाळायला काय प्रॉब्लेम असतो ह्यांना? मला अशा मुलांचा खुप राग येतो, असं वाटतं की रस्त्यात उभ करुन चाबुकानी फोडुन काढलं पाहीजे.आपल्यालाही मुलं आहेत,

अगदी अगदी. पण पेरलेलं उगवतंच नेहमी. त्यांच्याही वाट्याला तेच येणार आहे. तेव्हा जनात नाही तर मनात तरी शंभरदा चूक कबूल करतीलच. Sad

आईग्गं Sad हे काय होतं..

या दुनियेतून गेल्यावर आता तरी सुखी झाली असेल अशी आशा करते.!!!>> खरंच‌.

अशी काय वागतात ही माणसं काय कळतं नाही, आपल्याच आई-वडिलांना सांभाळायला काय प्रॉब्लेम असतो ह्यांना? >> खरंय‌. त्यांच्या मुलांनीही त्यांना तसेच दिवस दाखवावेत , जे कोणी असे वागतील.