ओळख

Submitted by आशूडी on 28 April, 2011 - 02:12

तिचं पत्र आलं. द्राविडी प्राणायाम करुन ते माझ्यापर्यंत उशिरा का होईना पोचलं हेच खूप. पाच वर्षात लग्नामुळे,नोकरीमुळे आपण चक्क दोन घरं बदलली याची आजवर पहिल्यांदा मला इतकी ठळक जाणीव झाली. या दोन घरांच्या आधी तिसर्‍याच घरात जिथे आधी राहत होतो, त्या पत्त्यावर तिनं पत्र धाडलं होतं. शेजारच्या काकूंनी सवयीप्रमाणे ते ठेवून घेतलं होतं आणि त्यांच्या नात्यातली एक मुलगी जी योगायोगाने माझ्याच ऑफिसात होती तिच्याकडे निरोप पाठवला होता. घरात कधीही काही पदार्थ केला की घरी थोडा आणून देणार्‍या, कॉलेजमधून यायला उशीर झाला की मायेने सरबत वगैरे देणार्‍या काकू मी साफ विसरुनच गेले होते. त्यांना माझा बदललेला पत्ता, बदललेले फोन नंबर कळवणं काय पण गेल्या तीन चार वर्षांत एक फोन करुन साधी विचारपूसही केली नव्हती. मला पत्र घ्यायला जाताना शरमिंदंच झाल्यासारखं होत होतं. पण त्यांनी मात्र त्याच साधेपणाने, प्रेमाने चहा केला, हालहवाल विचारले तेव्हा आत कुठेतरी कोंडल्यासारखं वाटणं कमी झालं. अशी कशी वागते मी? नेहमीच्या प्रश्नाने जोरात धप्पा देऊन उत्तर शोधण्याचं राज्य पुन्हा एकदा माझ्यावर आणलं.

पत्र घरी गेल्यावरच वाचायचं ठरवलं होतं. असं गडबडीत उभ्या उभ्या वाचण्यासारखं ते नसेलच याची मला खात्री होती. पण एसेमेस, ईमेल वगैरे ऐवजी पत्र? आपल्याला आयुष्यात एक तरी पत्र आलं आणि तेही, तिचं! याच आनंदात मी घरी पोहोचले. घरी गेल्यावर कुलूप बघून कधी नव्हे तो जास्तच आनंद झाला. मला एकटीच असायला हवी होते मी आता. पत्राचं पाकीट फोडलं. वहीच्या छोट्या हातभर पानावर लिहीलेले पत्र. काळ्या शाईतलं तिचं घोटीव अक्षर पाहून मी शाळेच्या दिवसात जाऊन पोहोचले. पाचवीपासून आम्ही दोघी सख्ख्या मैत्रीणी. आधी वेगवेगळ्या बाकांवर बसत असू, पण डबा खायचा आमचा सहा जणींचा घोळका. मग पुढे नववी आणि दहावीला आम्ही दोघी शेजारी बसत होतो. तिच्या वह्या, पुस्तकं, दप्तर, शाळेचा गणवेश, वेण्या सगळंच इतकं टापटीप आणि नीटनेटकं असायचं की माझा अजागळपणा, दुर्लक्ष जास्तच स्पष्ट व्हायचं, माझ्याशीच. परीक्षेत मार्क मला जास्त असायचे, स्पर्धांमध्ये आघाडीवर मी असायचे, बाईंची लाडकीही मीच असायचे. पण माझी लाडकी ती असायची. माझ्यापेक्षा चारदोन मार्कांचाच फरक असेल पण त्या सुंदर नेटकेपणापुढे ते फिके वाटायचे. तिच्यासारखं नीट रहावं, वागावं, दिसावं म्हणून मीही प्रयत्न सुरु केले. तसंच पेन, काळी शाई, वह्यांना कव्हर्सच काय स्टिकर्सही तशीच लावली. तिने मला याबद्दल कधीच छेडले नाही. आधी हे सारं मी करत नसतानाही, आणि हे करत असतानाही. तिच्याकडे बोलायला चिकार विषय असायचे. लिहीता लिहीताही आम्ही बोलत असायचो. आणि त्या बोलण्याला तिचे हावभाव, वेण्या मागेपुढे करणं यांची जोड असेल तर वाहवाच. तिच्या वडीलांचा लहान मुलांच्या खेळण्यांचा व्यवसाय होता. घरात दुकानातल्या नोकरांचा नातेवाईकांचा राबता. तिची आईही हौसेने सार्‍यांचे करायची. मला नेहमी आडनावानेच बोलवायची. नववीत एकदा तिने तिला आणलेले सुरेख सोनेरी घड्याळ दाखवले. लंबगोलाकृती काळ्या डायलचे ते घड्याळ, त्याला असलेल्या पानांच्या नक्षीच्या सुंदर पट्ट्यामुळे तिच्या हातावर फारच शोभून दिसत होते. दहावीच्या निकालानंतरच घड्याळ घ्यायचे तेही आठशे हजार रुपयांपर्यत अशी परंपरा जपलेल्या घरातून आलेल्या मला पंचवीसशेचे ते घड्याळ श्रीमंतीचे लक्षण वाटले. नंतर मग तिचे एकेक ड्रेस, कानातले, बांगड्या अंदाजे काय किमतीचे असतील ठरवायचा नादच लागला. नववीच्या सुटीत एकदा तिच्या घरी जायची वेळ आली तेव्हा मला धक्काच बसला. एका साठ वर्षं जुन्या इमारतीतल्या वरच्या मजल्यावरची एक खोली! जातानाही अंधारे जिने, बोळ जिथून कदाचित सुर्रकन उंदीरही पळत असतील. अंगावर काटाच आला. त्या एका पत्र्याच्या छताच्या खोलीत मधोमध खांबाच्या भोवती भोंडल्याला उभे असल्यासारखे कपाट, टीव्ही, फ्रीज, कॉट आणि माझ्या अभ्यासाच्या टेबलाएवढा ओटा! माझ्या चेहरा नक्कीच तिने वाचला असेल. पण अजिबात अवघडून न जाता ती नेहमीच्याच सहजपणे हसत बोलत होती. घरी येताना मला बरं वाटत होतं. माझं घर तिच्यापेक्षा कितीतरी छान, मोठं आहे याचं कौतुक वाटत होतं का, कुणास ठाऊक. मग माझं तिच्याशी वागणं पुन्हा एकदा बरोबरीचं झालं. किमतीची लेबलं मी पार विसरुन गेले. तिच्या लेखी तर ती कधी नसावीतच.

शाळेत शाळा भरल्यानंतर आणि मधल्या सुट्टीनंतर पाच मिनिटं शांतता कालखंड पाळावा लागत असे. मन शांत एकाग्र होण्यासाठी पाच मिनिटं मौनव्रत. त्या पाच मिनिटात कुणी बोललं तर शिक्षा व्हायची. पण आम्हाला दोघींना सगळी खुसुरफुसुर तेव्हाच सुचत असे.शाळेत आल्यावर काल संध्याकाळपासून काय काय घडलं ते एक आणि मधल्या सुट्टीत कोण काय बोलत होतं ते दुसरं. ते इतकं उचंबळून येई की बाकी सार्‍या मुली डोळे मिटून बसल्या की आम्ही वहीत एकमेकींना लिहून दाखवत असू. पाच मिनिटं दम धरायचं ते वय नव्हतं. दहावीला गेल्यावर त्यांच्या बरीच वर्षं बांधून आता तयार झालेल्या घरी मी गेले तेव्हा तिथली एकेक एकेक उंची, कलाकारी वस्तू पाहून थक्क झाले. मला तिच्या परिस्थितीचा अंदाज आला नव्हता हेच खरं. दुकानाला सोयीचं पडत होतं म्हणून इतके दिवस ते जुन्या घरात राहत होते पण आता मुली मोठ्या झाल्यात म्हटल्यावर त्यांची आवड बघायला हवी असं तिची आई कुणाला तरी सांगत असताना मी मऊ सोफ्यात बसून वरच्या झुंबरातले लोलक बघण्यात गुंगून गेले होते. मला पुन्हा एकदा अवघडल्यासारखं व्हायला लागलं. आजवर मी तिला एका शब्दानेही विचारलं नव्हतं परिस्थिती वगैरेबद्दल ते एका अर्थी बरंच झालं होतं. पण आपण तिच्यापेक्षा वरच्या नंबरवर की खालच्या या प्रश्नानं सतावून सोडल्यासारखं झालं होतं. कुठलाही असता तरी मान्य करण्याशिवाय माझ्या हातात काय होतं, पण तरीही वाटायचं ते वाटून झालं..

दोघींनाही दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले आणि अर्थातच वाटा वेगळ्या झाल्या. वेगवेगळ्या कॉलेजमधून बारावी झाली. दोघींना व्हायचं होतं डॉक्टर पण मी गेले इंजिनियरींगला आणि ती सायन्स ग्रॅज्युएशनला. आठवडा, महिना, दोन महिने सहा महिने करत करत आमच्या सहाही जणींचं भेटणं वार्षिक स्नेहसंमेलन कधी झालं कुणाच्याच लक्षात आलं नाही. मग भेटल्यावर लग्नाचं वय झाल्यावर ते ते विषय निघायचे. तिचं त्यांच्या ओळखीतल्या एका मुलावर प्रेम होतं. तिच्यात नाव ठेवायलाही कुठं जागा नव्हती, त्याचंही तिच्यावर प्रेम होतं. त्याचा कसला तरी व्यवसाय होता म्हणे. हॉटेल्सना काहीतरी कच्चा माल पुरवण्याचा. दरवेळी भेटले की काहीतरी सांगत असे त्याच्याविषयी. पहिली एक दोन वर्ष बरं चाललं होतं दोघांचं. मग पुन्हा एक दीड वर्ष अबोला. काय कारण घडलं विचारलं तर म्हणे नाही पटत वागणं. प्रेमाबीमाच्या जंजाळात मी अडकले नसल्याने मला काही समजायचं नाही. तरीही, त्याला एकदाच बघितल्यावर त्या दोघांचं लग्न व्हावं, असं मला मनापासून वाटलेलं. मी विचारत राहायची. मग पुन्हा आठेक महिन्यांनंतर तिनंच एकदा खुषीत येऊन सांगितलं की आता आम्ही पुन्हा भेटायला लागलो. मला खरंच बरं वाटलं. तिच्या घरुन लग्नाचा तगादा सुरु झाला तोवर माझ्याही घरी स्थळ बघायला लागले होते. मग एक दोनदाच आम्ही भेटलो तेव्हा ती काहीशी काळजीत वाटली. त्याच्या आईला मी पसंत नाही, हे तिच्याकडून ऐकल्यावर मी हतबुध्दच झाले. होईल सगळं नीट, असा एकमेकींना धीर देऊन आम्ही ज्या वेगळ्या झालो त्या आजतागायत.

पुढे लग्न होऊन एक दीड वर्ष मी बेंगलोरला गेले आणि सगळ्या भेटीगाठी गोठल्या. अधूनमधून एखाद मेल, चुकूनमाकून ऑनलाईन आलोच तर चॅट असं सुरु होतं. तिची कुठल्याशा कंपनीत नोकरी चालू होती आणि लग्नाचं भिजतच घोंगडं होतं एवढी माहिती मला होती. पुढे कधीतरी तिला पाठवलेल्या मेल्स बाऊन्स व्हायला लागल्या. फोन नंबरही 'अस्तित्वात नाही' असं ऐकू यायला लागलं. काही दिवस तीच आपणहून संपर्क करेल असं वाटलं होतं, वाट बघितली पण तसं काही घडलं नाही. मी ही माझ्या व्यापात गुंतत गेले. पुन्हा पुण्याला आल्यावर बस्तान बसवणं आलं. आमच्यापैकी कुणी भेटलं की हमखास तिचा विषय निघत असे, आणि मला काही माहिती असेल म्हणून अपेक्षेनं माझ्याकडे नजरा वळत. अंदाज बांधण्यापलीकडे काहीच होत नसे. मला तर कधीकधी रुखरुखही वाटे. तिने अचानक असं सर्वांपासून तुटण्याचं कारण काय? त्या दोघांचं लग्न झालं का? लग्नात काही अडथळे आले का? लग्न होऊन घरी काही त्रास..? की लग्न झाल्यावर तिला फसवलं गेल्याची जाणीव...? की लग्नच झालं नाही..? की तिनं आपलं काही बरंवाईट..? मन चिंती ते वैरी न चिंती याचा जिवंत अनुभव यायला लागला तेव्हा मी हा विचारच करायचं बंद केलं. कदाचित ती कंपनीतर्फे कुठेतरी दूरदेशी गेली असेल आणि सुखात असेल अशी मनाची समजूत घालून घेतली आणि आयुष्याची री ओढत राहिले.

..आणि आज जवळपास चारपाच वर्षांनी तिचं पत्र आलं होतं! आठवणींचा डोह ढवळून निघाला नसता तरच नवल! पत्रात ती सोलापूरजवळच्या कुठल्याशा गावात सध्या राहत असल्याचं सांगून तिथपर्यंत कसं यायचं याचं सविस्तर नीट वर्णन केलं होतं. बस स्टँडवरुन घरापर्यंत कसं पोहोचायचं याचा सुबक नकाशाही काढला होता. पट्टीशिवाय तिच्या सरळ ओढल्या जाणार्‍या रेषा आजही ठळक कळून येत होत्या. मला आग्रहाचं आमंत्रण होतं. मुलं असतील तर घेऊन ये म्हणालीच होती, पण सहज शक्य झाली तर नाही आणलीस या खेपेला तर उत्तम, कारण तिथला खूप उन्हाळा त्यांना सोसणार नाही आणि आपल्यालाही निवांतपणा मिळेल असं व्यवस्थित सांगितलं होतं. ती तिथे कशी जाऊन पोहोचली, तिथे काय करते याचा थांग लागू दिला नव्हता. 'तू ये. वाट पाहतेय केव्हापासून.' या दोन वाक्यांवरच माझी नजर खिळून राहिली होती. मी ताबडतोब तयारीला लागले. मुलं नव्हतीच त्यामुळे एक मोठा प्रश्नच मिटला. नवर्‍याला फोन करुन सारं समजावून सांगितलं. तिचं नाव घेऊन हळहळलेलं त्यानंही कित्येकवेळा पाहिलं होतंच. दुसर्‍या दिवशी निघाले. तिने सांगितलेल्या वेळेलाच बस होती. उन्हाच्या भट्टीवर बस तापत पळत होती आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने डोक्यातली चक्रं भराभरा फिरुन माझं मन धावत होतं. तिथे गेल्यावर काय बघायला मिळेल याची धास्तीच वाटत होती. गेली दहा वर्षं तिला ओळखणार्‍या मला आज ती ओळखू येईल का? अशी पण शंका मनात चुकचुकली. बस, जीप करता करता कळालं की ते गाव नसून खेडं आहे. आणि तिने पत्रात काढलेला तो नकाशा कडक उन्हात मला पायी पार करायचा आहे. प्रवासातच घामाने थबथबलेली मी जवळच्याच दगडावर टेकले. बाटलीभर पाणी प्यायले. ही इथे काय करतेय नक्की? काय अवतार करुन घेतला असेल स्वतःचा? कशासाठी? असं काय इतकं घडलं हिच्या आयुष्यात की हा अज्ञातवास हिच्या नशीबी यावा? की ज्याच्याशी तिला लग्न करायचं होतं त्यानं फसवल्यामुळे तर इथं दूर खेडोपाडी येऊन...? छे, छे. हिंदी सिनेमे पाहून डोक्याची काय माती झालीय याचा चटकाच बसला. हे असले विचार करत इथे बसण्यापेक्षा वाट चालावी उत्तम. आजूबाजूची वस्ती न्याहाळत मी हळहळू सावली गाठत चालले होते. नकाशा इतका खुणांसकट उत्तम होता की मला कुणाला काही विचारायची वेळच आली नाही. शेळ्या, कोंबड्यांमध्ये खेळणार्‍या अर्ध्या उघड्या मुलांना बघायला मला गॉगलचा अडसरच वाटू लागला. गॉगल ठेवताना पर्समध्ये सापडलेल्या लिमलेटच्या गोळ्या त्या मुलांना देत असतानाच कानावर हाक ऐकू आली. झर्रकन मागे वळून पाहिलं तर स्वच्छ साध्या पंजाबी ड्रेसमधली ती माझ्याइतकीच नुकतीच शहरातून आलेली दिसत होती.

धावतच येऊन माझ्या खांद्यावरची बॅग घेऊन प्रवासाची चौकशी केली. मग बडबडीचा जो धबधबा सुरु झाला त्यात गेली पाच वर्ष वाहून गेली. ती इतकी हसतमुख प्रसन्न दिसत होती की उन्हाने रापलेला चेहरा, लांब पण पातळ झालेले केस नजरेआड व्हावेत. त्या अडाणी खेड्यातली तिची स्वच्छ, स्पष्ट भाषा मला उगाचच नवल करायला लावत होती. अडीच खोल्यांच्या तिच्या मातीच्या आणि कौलारु घरात गेल्यावर एकदम थंडगार वाटू लागलं. कढत चहा पिऊन आंघोळ करुन घेतली तेव्हा स्वच्छ बरं वाटायला लागलं. जेवायची तयारी करते तोवर तू पड. जेवण झाल्यावर चांदण्यात बसून गप्पा मारु हा तिचा सल्ला मल लगेच पटला. तिला आनंदात बघून पोट भरलंच होतं आणि उन्हातल्या प्रवासाचा शिणवटा. पडल्या पडल्या डोळा लाग. एक दीड तासानं उठवल्यावर गरम पिठलं भाकरी, भात असं पोटभर जेवल्यावर पटापट आवरलं आणि बाहेर अंगणात येऊन बोलत बसलो.

तिचं 'त्या'च्याशी लग्न झालंच नाही अखेर. तिच्या कंपनीत एका कल्याणकारी संस्थेचं शिबिर आयोजित करताना ओळख झालेला हा तिचा नवरा. त्या संस्थेचं काम तिला इतकं आवडलं की तिने नोकरी सोडून त्यातच स्वत:ला झोकून दिलं. प्रेमभंगाचं दु:ख वगैरे विसरण्यासाठी नाही, तर तिला आवडलं म्हणूनच. आजही 'त्या'च्याविषयी 'ते बंध कधी जुळायचे नव्हतेच' असं स्पष्ट बोलू शकते म्हणून मला तिचं कौतुक वाटलं. त्या संस्थेसाठी काम करताना गावोगावी, दुर्गम भागात जावं लागायचं. त्यामुळे मग इंटरनेटशी वगैरे संबंधच तुटला. त्या कामात तिनं इतकं गुंतवून घेतलं स्वतःला की दोन दोन महिने घरी जाणं व्हायचं नाही. हा तिचा नवरा डॉक्टर होता. थोडाफार आयुर्वेदही शिकला होता. खेडापाड्यातल्या लोकांना अ‍ॅलोपॅथीबरोबर वनस्पती आणि घरगुती औषधोपचाराने बरे करीत असे. तिही त्यातले थोडेफार शिकली होती. त्याला मदत करीत असे. छोट्या दुखण्यांवर आपले आपणच इलाज कसे करावेत हे ते लोकांना शिकवत असत. तिथेच यांना एकमेकांत आयुष्याचा साथीदार दिसला. आपल्याला आयुष्यभर हेच काम करायचं असेल तर अशीच साथ हवी, हे त्यांना मनोमन पटलं. पण हे लग्न जातीबाहेरचं असल्याने अर्थातच तिच्या घरी मान्य नव्हतं. विंचवाचंच बिर्‍हाड असल्याने त्यांना काही फरक पडला नसता. त्यांनी लग्न केलं. मग अशा खेड्यात फिरुन संस्थेचं काम करुन शिवाय खेड्यातल्या निरक्षरांना, मुलांना ती शिकवतही असे. तिथल्या आजूबाजूच्या गावात त्या दोघांना लोकांचा इतका आपलेपणा मिळत होता की इथंच बरं वाटतं आता म्हणत होती. बैलानं शिंगं मारल्यानं गंभीर जखमी झालेल्या एकावर उपचार करायला आजही तिचा नवरा दोन दिवसांकरता शेजारच्या गावात गेला होता. आपल्याला डॉक्टर होऊनही समाजसेवाच करायची होती ना गं? मग ते नाही तर हे. तिच्या बोलण्यानं मी भानावर आले. खूप उशीर झाला होता आत जाऊन झोपायचं होतं.

गादीवर पडल्या पडल्या प्रश्नांचा झिम्मा. तिचं आयुष्य हे असं काही भव्य दिव्य झालं असेल असं मला एकदाही कसं वाटलं नाही? तिच्यावर कोणतेतरी संकटच ओढवले असेल हीच चिंता मला का ग्रासून टाकत असे? माझी घरं बदलली, फोन नंबर बदलले, तिला शक्य नव्हतं कदाचित, पण तिच्या घरी, दुकानात जाऊन चौकशी करणं तर मला शक्य होतं. मग नसत्या शंकांच्या भितीने मी ते केलं नाही का? तिला तरी पत्र पाठवताना कुठे खात्री असेल की ते मला मिळेलच? पण तरी तिनं एक शक्यता आजमावून पाहिली अन आज आम्ही सोबत आहोत एकमेकींच्या! पण गेले साताठ तास सोबत असूनही तिनं एकदाही मला यातला एकही प्रश्न कसा काय विचारला नाही? एवढ्या सुखवस्तू घरातून अशा आयुष्याला सुरुवात करताना तिला कमी त्रास झाला असेल का? आणि मी मात्र ती कशा अवतारात, अवस्थेत असेल याच्या काळजीत. स्वतःशीच खोटं कशाला बोलू, मला तर तिच्या भाषेचंही मगाशी आश्चर्य वाटलं होतं. मी तिला ओळखूच शकले नाही का? की ओळखायलाच चुकले? अशी कशी वागले मी? की मी अजून मलाच ओळखलं नाहीये नीट? ती शांत झोपली होती. शांतता कालखंड सुरु झाला होता. खुसुरफुसुरही.. माझी माझ्याशीच.

गुलमोहर: 

आवडली. त्यातला प्रांजळपणा भावला. इतरांविषयीचे आपले आडाखे, अंदाज, मतं, विचार हे प्रत्यक्षापेक्षा किती वेगळे असू शकतात....!! जे खूप जवळचे आहेत त्यांना तरी किती व्यवस्थित ओळखतो आपण?

मस्त आहे कथा ! खूप आवडली. पुन्हा एकदा शाळा, मैत्रिणी , शिक्षक सर्व आठवले. कसले मस्त दिवस असतात ना शाळेतले...!

remembering old school days...
about the story its fantastic..... truly meaningful

अनेकानेक धन्यवाद मंडळी, Happy
हा माझा अनुभव नाही. पण असा अनुभव येणार नाही, असं ठामपणे म्हणण्याइतकीही परिस्थिती उत्तम नाही! Happy

Pages