वाहती रीत.... आळंदी -पुणे

Submitted by आशूडी on 4 July, 2008 - 05:52

माझा पण वारीचा अनुभव! विषय एकच आहे ...पण अनुभव मात्र वेगळे आहेत! साजिर्‍याच्या लिखाणातले पुन्हा इथे येणार नाही याची काळजी घेते.:)
सगळ्यांसारखंच आमचंही वारीला जायचे दरवर्षी फक्त ठरत होतं! आम्ही जवळच्या लांबच्या मिळून जवळपास १०-१२ बहिणी..त्यामुळे नेहमीच असे काही काही उपक्रम ठरतात. या गमतींमधे आमच्या हौशी मावशा आणि आत्यापण सामील असतात. तर वारीच्या आधी २ दिवस आमची फोनाफोनी झाली. नेहमीप्रमाणे प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी आल्या. मग माझी मोठी बहिण , मी आणि माझी मावशी आम्ही ठरवले की कोणी येवो अथवा ना येवो या वर्षी आपण मात्र जायचंच! जास्त उगाच कुणाला विचारण्याच्या फंदात पडायचे नाही नाहीतर त्याला फाटेच जास्त!
मी आणि माझी बहिण चंदा आम्ही सकाळी ६ वाजता मावशी कडे जायला निघालो. चंदाचा ३ वर्षांचा मुलगा त्याच्या आजी कडे राहणार होता दिवसभर. त्यामुळे आमच्या आईची जरा कुरकुरच चालू होती.. काय एकेक खूळ असते या मुलींचे..सासूबाई काय म्हणत असतील? पण तिच्या सासूबाई म्हणाल्या होत्या,"तुझ्या मनात आलंय ना वारीला जायचं तर जाऊन ये, नाही म्हणू नकोस. तो अगदी छान राहिल माझ्याकडे." वारीत असताना आम्ही किती वेळा त्यांचे मनोमन आभार मानले कुणास ठाऊक काराण त्यांच्यामुळेच तर आमची वारी होऊ शकली होती. माझी मावशी भोसरीला राहत असल्यामुळे आम्ही दिघी पासूनच वारीत जायचे असे ठरवले.तिच्या ऑफिसमधल्या अजून दोन जणी ही आमच्या सोबत आल्या.. वय ५० च्या आसपास.
दिघी रोड वर वारकर्‍यांची लगबग चालू झाली होती. पण अजून टाळ मृदुंग घेणारे काही दिसले नव्हते. आम्हाला ज्या दिंडी त भजन, गाणी असतील असे जायचे होते. पण ते लोक आपल्याला त्यांच्यात येऊन देतील का? असेही वाटत होते. थोडा वेळाने एक अशी दिंडी आली. आम्ही उठून जाईपर्यंत ते पुढे गएले सुध्दा!
पुन्हा थांबलो. पाचच मिनिटात दुसरी दिंडी आली. त्यात बर्‍याच बायका , मुली, पुरूष गाणी म्हणत होते, झेंडा नाचवत होते, टाळ-मृदुंग वाजवीत होते. आम्ही त्यांआ जाऊन विचारणार , इतक्यात त्यातील एक गृहस्थ चंदाच्या ओळखीचेच निघाले. आम्हाला प्रवेश तर मिळाला. हुश्श! ती दिंडी पुण्याचीच होती. त्या गृहस्थांचे वडील दरवर्षी पंढरपुरास जात असत. त्यांचा वारसा पुढे चालू ठेवावा म्हणून त्यांनी आळंदी ते पुणे अशी ही दिंडी चालू केली होती. सगळेजण पुण्यातले वेगवेगळ्या ऑफिसमधे चांगल्या पोस्ट वर असणारे,त्यांची कॉलेजमधली मुले-मुली. सांगायचे कारण पालखीला फक्त खेडेगावातले, म्हातारे कोतारे, ज्यांना उद्योग नाहीत असेच जातात असे नाही! नामघोष चालूच होता.त्यांनी खास वारीसाठी अनेक भजने तयार केली होती..तालावर बसवली होती. अतिशय उत्साहात ते ती गाणी गात होते. आमच्या सारखे..ज्यांना गाणी माहित नाहीत त्यांच्या साठी एक एक ओळ सांगत होते ... संपूर्ण वातावरण भक्तीमय झालं होतं .. भक्तीचा मळा हाच असे वाटत होते.
एक तास कधी गेला कळालेच नाही. कळस आले तेव्हा तर जयजयकाराने कळस गाठला. कारण आता थोडी विश्रांती मिळणार होती. थोडे थांबून राजगिर्‍याचे लाडू, शेंगदाणे, वेफर्स असा हलका नाष्ता झाला आणि पुन्हा पाऊले चालती पंढरीची वाट!आता पोटात इंधन पडल्यामुळे तर नाच गाण्यांना अजूनच ऊत आला होता. मी एक झेंडा मिळवला. तसेही आमच्या गणेश मिरवणुकीत झेंडा नाचवायचे काम मीच करते..त्यामुळे मगाच पासून ते नाचते झेंडे बघून फार सुरसुरी येत होती. ( तसाही "आपलाच झेंडा पुढे नाचवायची सवय जुनी आहे! ) झेंडा नाचवताना एक उधाण येत होते.आजूबाजूच्या जगाचा विसर पडत चालला होता.. टाळ, मृदुंग, टाळ्या, गाणे आणि तो उंच भगवा झेंडा!! बस्स!
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला

कोण कुठचे ते लोक...कधी ना पाहिलेले..पण आम्ही त्यांच्यात इतके मिसळून गेलो होतो की थट्टा मस्करीत एखाद्या काकूंच्या हातावर जोरात टाळी द्यायला पण कमी केले नाही. माऊलींच्या मनात हेच असेल का? सर्व जाती धर्म, भाषांच्या, नातेसंबंधांच्या भिंतीं पलीकडे समाजाचा परस्पराशी संवाद व्हावा..आपण सगळे मनुष्य आहोत आणि एका अगाध अशा शक्तीने परस्पराशी बांधले गेले आहोत..त्या शक्तीला कधीतरी आयुष्यात ओळखावं.नतमस्तक व्हावं....देवाची खरी भक्ती मूर्तीपूजेत नसून मनुष्याच्या सेवाधर्मात आहे... याचा प्रत्यक्ष अनुभव वारीतल्या वयोवृध्द माऊली भक्तांच्या डोईवरचा भार जेव्हा दुसरे होतकरू भाविक घेतात, एखाद्याची तहान आपल्या हातांनी भागवतात, एखाद्याच्या पायत रुतलेला काटा हलक्या हाताने काढतात ते दृष्य पाहताना येतो. कोणत्या तरी अनामिक जिव्हाळ्याने अंतःकरण भरून येते...८०-९० च्या घरातले वारकरी चट्चट पावले उचलताना दिसतात तेव्हा त्यांच्या पायवर डोके ठेवणार्‍यांच्या डोळयातील अपार आदरभाव आणि श्रद्धा पाहिली आणि आशीर्वाद देणारे त्यांचे थरथरते पण सायी सारखे मऊसूत हात पाहिले की डोळ्यातून चंद्रभागा का वाहू लागते याचं कारण सांगता येणार नाही. कदाचित ते पु. लं म्हणतात तसे लहानपणी झालेल्या संस्कारात असेल...मारूतीपुढे एक फटक्यात फोडलेल्या नारळाचे पाणी पाहण्यात असेल, गणपतीत अंगावर उडवून घेतलेल्या गुलालात असेल, होळीच्या दिवशी घरभर पुरणपोळीचा घमघमाट पसरलेला असतानाही नैवेद्य दाखवेपर्यंत राखलेल्या संयमात असेल!
-२-
आमच्या या तरूणाईने सळसळलेल्या दिंडीकडे बाकीचे नेहमी वारी करणारे वारकरी मोठ्या कौतुकाने पाहत होते. त्यातीलच एक वॄध्द वारकरी माझ्याजवळ आले आणि हसत म्हणाले,"छान झेंडा नाचवतीयेस पोरी...तुझे पाहून मला पण तो हातात घ्यावासा वाटतोय! " मी आनंदाने म्हणाले,"घ्या ना आजोबा!" त्यांच्या डोक्यावरचे गठुडं मी डोक्यावर घेतले. एका माऊली भक्ताच्या डोईचा भार काही मिनिटांसाठी का होईना आपण हलका करू शकलो याच समाधानात मी होते. त्या आजोबांनी धीम्या गतीने तो झेंडा नाचवायला सुरूवात केली. ही गोष्ट दिंडीत पसरायला वेळ लागला नाही. मग काय! रस्त्यात आमच्या दिंडीने त्यांच्या भोवती कडे केले.. टाळ मृदुंग मधोमध आले आणि हातांनी टाळ्यांचा ताल धरला. आजोबांना अतिशय आनंद झाला.त्यांना झेंडा नाचवायला अजूनच मूठ्भर बळ आले. असे ते मनोहर दॄष्य पाहताना आमच्याच काय तर आजूबाजूला उभे राहून पाहणार्‍यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले! अशीच पाच एक मिनिटे झाल्यावर आजोबांनी झेंडा पुन्हा माझ्या हाती सोपवला आणि माऊलींच्या नामाचा एकच गजर झाला. :"बोला पंढरीनाथ महाराज की जय! संतश्रेष्ठ ज्ञानदेव महाराज की जय!! जगद्गुरू तुकाराम महाराज की जय!!" त्या आजोबांनी दोन्ही हात उंचावून सर्वांना आशीर्वाद दिला. त्या प्रेमभर्‍या आशीर्वादात न्हाऊन आमची दिंडी पुढे सरकू लागली.
आता विश्रांतवाडी आली. इथे माऊलींचा विसावा असतो. साडेबारा वाजत आले होते. इथल्या एका महानगरपालिकेच्या शाळेत माऊलींच्या दिंडीसह अनेक दिंड्या भोजनासाठी थांबतात. तिथले महापौर, नगरसेवक व इतर समाजसेवी संस्था वारकर्‍यांच्या भोजनाची सोय करतात. अनेक जणांनी सांगितल्यामुळे पूर्वग्रहदूषित झालेल्या आमच्या मनात तिथल्या जेवणाच्या "हायजिन" बाबत शंकाच होती. मग आम्ही ठरविले की पाहू कसे काय आहे ते. नाहीच आवडले तर बाहेरची हॉटेल्स आपल्यासाठीच तर आहेत! त्या छोट्याशा शाळेच्या अंगणात घटकाभर बसायच्या आधी पुन्हा ३-४ भजने झाली, नामघोष दुमदुमवून तिथले आसमंत पावन झाले. थंडगार पाण्याने सगळ्यांनी हात पाय तोंड स्वच्छ धुतले. कुठे गडबड नाही गोंधळ नाही. ही स्वयंशिस्त रेल्वे-बस तिकीटाच्या रांगेत, बसच्या धक्काधक्कीत, गणपतीत होणार्‍या ढकलाढकलीत असती तर?? जाऊद्या. असले "समाज सुधारक" विचार करून आम्हाला आमचा मूड नव्हता घालवायचा!
सर्व महिलांना एका वर्गात बसून विश्रांती घेण्यास सांगण्यात आले. ते वर्ग आधी बाक उचलून रिकामे करून झाडून वगैरे स्वच्छ करून ठेवण्यात आले होते. गार गार फरशीवर बसल्याने उन्हाने शिणलेल्या जीवांना गारवा मिळाला. सर्वांची घरी दारी फोनाफोनी झाली. कुठे आहोत्,काय करतोय ,पुढे काय बेत आहेत, घरी काय चालू आहे, मुले काय करतायत याची बित्तंबातमी देऊन झाली. संसार पाश कुणाला सुटले आहेत का? जगदगुरू तुकाराम महाराज सुध्दा या भोवर्‍यातून सुटू शकले नाहीत तिथं तुमची आमची काय कथा!! संसारात पडूनच भक्ती करण्याचा हा सोपा मार्ग तर या संतांनी जगाला दाखवला. आता जरा विसाव्याच्या अंमळ गप्पा चालू झाल्या. पालखी इथे आली की मगच सर्व भक्तांना प्रसाद म्हणून जेवण देण्यात येते. पालखी यायला अजून १ तास तरी होता. बसलेल्या हळूहळू लवंडू -कलंडू Happy लागल्या. आणि दहाच मिनिटांत बर्‍याच जणींचा डोळा लागला.
१.३० वाजता बाहेर माऊलींचा गजर ऐकू आला तेव्हा कळाले की पालखी चे आगमन झाले आहे. लगबगीने आम्ही बाहेर गेलो. माऊलींच्या चांदीच्या रथाला संपूर्ण केशरी लाल पिवळ्या फुलांच्या माळांनी सुशोबित केले होते. वर तीन चांदीचे कळस दिसत होते. उदबत्त्या ,धूप आणि फुलांचा एक मिश्र सुवास हवेत दरवळत होता. पावसाने ही रिमझिम नाचत येऊन माऊलींचा आशीर्वाद घेतला. तो गेल्यावर सूर्यनारायणही ढगांच्या पडद्याआडून डोकावून बघत माऊलींची पालखी कौतुकाने न्याहाळू लागले. त्यांचा प्रकाशा मुळे तो दिव्य रथ अजूनच तेजाने झगमगू लागला. हे कमी होते म्हणून की काय तिथल्या स्वागत मांडव उभारलेल्या संस्थांनी,राजकीय पक्षांनी माऊलींवर पुष्पवॄष्टी केली. नामाचा जयजयकार आसमंतात निनादला. माऊलींची मोठ्या श्रध्देने टाळयांच्या तालात आरती झाली. आणि पुजारी बुवांनी महाप्रसाद घेण्याचा इशारा दिला.
आम्ही परत वर्गात येईपर्यंत पत्रावळी, पाण्याचे प्लॅस्टिकचे ग्लास रांगेत मांडून ठेवलेले होते. केवढी ही तत्परता! सर्वांना पानावर बसून घेण्याची घरच्यासारखी आग्रहाने विनंती करण्यात आली. कारण आधी पाने वाढून ठेवली की त्यावर माशा बसतात किंवा धूळ उडते. मी आणि चंदा जरा का कू करत होतो तर मावशीने दटावले. प्रसाद समजून खा! आम्ही पण बाकीच्यांसारखे हात धुवून पानावर बसलो. आम्ही सर्व बायका जेवायला बसलो होतो आणि आश्चर्य म्हणजे आमच्याही दिंडीतले होतकरू मुले पदार्थ वाढण्यास पुढे झाली होती. सगळ्या जणी त्यांना चिडवत होत्या. गरम वाफेचा पांढरा भात,वरण्,लिंबाची फोड बटाट्याची भाजी, अळूची भाजी, मसाले भात, पापड, काकडीची कोशिंबीर, जिलेबी, पोळ्या असे सुग्रास पान वाढण्यात आले. त्याचा घमघमाट पाहून भूक चाळवली गेली. म्हणतात ना, पदार्थाच्या चवीपेक्षा पानच असे सजवलेले असावे की ते पाहूनच जेवणार्‍याचे मन तृप्त व्हावे!! हात जोडून "वदनि कवळ घेता" म्हटल्या वर "हं , मंडळी करा आता सुरू!" असा इशारा मिळाला आणि सर्वांनी भोजनास प्रारंभ केला. वरण भाताचा पहिला घास तोंडात जाताच मी आणि चंदाने एकमेकींकडे सकौतुक पाहिले! आमच्या मनातल्या सर्व शंका त्या एका घासाने मिटवल्या होत्या. मावशी कडे पाहताच ती आमच्याच कडे पाहून हसत होती. रोजच्या वरण भातापेक्षा हा घास काही निराळयाच चवीचा होता! अतिशय मधुर अन चविष्ट! या सुग्रास जेवणाबद्दल शंका घेतल्याने आम्ही मनातल्या मनात खजील झालो..माऊलींची क्षमा मागून आम्ही जेवणावर ताव मारायला सुरूवात केली. प्रत्येकाला काय हवं नको हे जातीने पाहिले जात होते. कोणताही पदार्थ नि:संकोच पणे मागवला जात होता. त्या शाळेच्या जवळपास तीन वर्गात आणि बाहेरच्या अंगणात मिळून एक तीनशे पान एका वेळी जेवत असेल. पदार्थ एका दुसर्‍या वर्गात ठेवले होते. इतक्या चपळाईने ते पदार्थ आणून पानात वाढले जात होते की अवघ्या दहा मिनिटांत तीनशे पान तॄप्तीचा ढेकर देऊन " अन्नदाता सुखी भव !!" म्हणत उठलं! नाहीतर आपल्या घरात १० माणसं जेवायची असली तरी या सगळ्या प्रोसेस ला निदान एक तास तरी लागतो! या लोकांना कुणी शिकवली ही मॅनेजमेंट?? ती पिढ्यान् पिढ्या करत आलेल्या सेवेमुळे रक्तात आली आहे! अन्न वगैरे कमी पडण्याचा सवालच नव्हता! पण इतक्या प्रचंड प्रमाणावर केलेल्या पदार्थांची गोडी इतकी अवीट? जसे एखादा अत्यंत प्रसिध्द आचारी त्याच्या हातच्या चवीचे रहस्य सांगतना म्हणतो ना," तिखट मीठ तर काय, सगळेच घालतात हो! त्या पदार्थात थोडं मन घालून बघा.. आणि पदार्थ करताना मनात म्हणा की हा पदार्थ खाणारा तृप्त होवो! मग बघा तुमच्या पदार्थाची चव कशी अवीट होते ते!! " त्याचा आम्हाला तिथे प्रत्यय आला. माऊली भक्तांना तृप्त करण्याच्या इच्छेनेच त्या आचार्‍याने तो स्वयंपाक बनवला असेल आणि त्याची ही इच्छा पाहून कोण जाणे, कदाचित माऊलींनीच त्याला मदतीचा हात, चवीची गोडी अन सढळ अंदाजाचे माप दिले असेल!!!

-३-
सुग्रास भोजनाने तृप्त झालेली आमची दिंडी आता पुढच्या वाटचाली करिता निघाली. एकवार माऊलींचा जयघोष झाला.. संथ गतीपासून जलद गतीची भजने म्हणून पुन्हा एकदा अंगात उत्साह निर्माण केला गेला.सगळेजण अतिशय खूष होते. आमचीही एव्हाना त्या सगळ्यांशी मस्त गट्टी झाली होती. पावसाची ये जा चालूच होती. थकल्या भागल्या जीवांना थोडा गारवा मिळावा यासाठीच जणू ती विठूमाऊली आपल्या त्या लेकराला धाडत होती. त्याच्या येण्याने, एखाद्या लहान मुलाप्रमाणे सान थोर याचा विचार न करता सगळ्यांच्या अंगावर मुक्त बागडण्याने प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसू उमटत होते. दुपारची वेळ असूनही उन्हाची काहिली नव्हती की पावसाचा चिकचिकाट वाटत नव्हता. तरीही जर एखाद्या पठ्ठ्याने छत्री घ्यायचा प्रयत्न जरी केला तर सगळे "ए sssssss" करून त्याच्या कडे सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे. मग तो ही हसून ती छत्री बंद करायचा. मला एकदम कॉलेज मधे असताना जर कुणी काहीतरी वेगळे नवीन हेअरकट करून आले ड्रेस किंवा नव्या फॅशनचा गॉगल लावून आले की सगळे चिडवतात तसेच वाटले अगदी!!
आता वारीचा रस्ता अगदी फुलून गेला होता.टाळ्-मृदुंग अगदी रंगात आले होते. झेंडे त्यांच्या तालावर आणि आमच्या बोटांवर नाचत होते. गाण्याचा आवज आता अगदी खणखणीत येत होता. वारकर्‍यांची एक नदीच जणू त्या रस्त्यावरून दुथडी भरून वाहत होती आणि किनार्‍यावर त्या त्या ठिकाणचे रहिवासी हा सोहळा याची देहि याची डोळा पाहण्यास जमले होते.

दिंडी मागे दिंडी जशी लाटेमागे लाट
ज्ञानोबाची तुकोबाची उराउरी भेट
टाळ मृदुंगाचा घोष पताकांची दाटी
विठठ्लाची वेडी जाती आज त्याच्या भेटी

आज त्या लाटेतला एक थेंब होण्याचे भाग्य मजला लाभले!! नाचत गात आम्ही विश्रांतवाडीच्या बाहेर पडलो. तेथे शिवराय प्रतिष्ठान तरूण मित्र मंडळाने मंच उभारून अतिशय नेत्रदीपक देखावा उभा केला होता. देखावा कसला.. खरी खरी माणसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज,मांसाहेब जिजाऊ,संत ज्ञानेश्वर माऊली, निवॄत्ती,सोपान, मुक्ताबाई, तुकाराम महाराज, त्यांच्या पत्नी आवडीबाई, समर्थ रामदास,जनाबाई यांचे वेश घालून उभी होती. एका बाजूला वर गरूडावर पुष्पक विमानात बसलेले तुकाराम महाराज ही होते! त्यांना पाहून क्षणार्धात आम्ही त्या काळात पोहोचलो. अतिशय प्रेमाने , आदराने ते सर्व भाविकांना आशीर्वाद देत होते. ते खरे 'ते ' संत नाहीत हे बुध्दीला माहित असूनही मनाला मात्र त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचा आनंद होत होता इतके ते हुबेहुब दिसत होते. मीही मनाला त्यांना नमस्कार करण्यावाचून अडविले नाही. कधी कधी मनाचे ऐकून जर आत्म्याला समाधान मिळत असेल तर बुध्दीच्या घोड्याला जरा लगाम घालणेच इष्ट! शेवटी समाधान मिळणे महत्वाचे. आम्हा सार्‍या बायका मुलींना दिंडीत नाचताना पाहून स्टेजवर नऊवारी नेसून उभ्या असलेल्या एका मुलीला राहवले नाही. तिने खाली उतरून आमच्यातल्या एकीला माझ्याशी फुगडी खेळशील का असे विचारले.. अन त्यांची मस्त फुगडी सुरू झाली!! उत्साह हा संसर्गजन्य असतो!! तिची गरगरा फिरणारी फुगडी पाहून अजून दोघी तिघी खाली आल्या! आणि त्यांनी आमच्या सोबत फुगड्या घालायला सुरूवात केली. त्या चौकात एक मोठे रिंगण तयार झाले. मधे आम्ही सार्‍या बायका मुली.. बाजून कडे करून उभे राहिले आमच्या दिंडीमधले पुरूष. मागची वारकर्‍यांची लाट मागेच थोपवली गेली. आजूबाजूला राहणारे रहिवासी खिडकी , गॅलरीत येऊन हा आनंद वेचू लागले. तेथल्या संयोजकांचेही प्रसंगावधान इतके की त्यांनी स्पीकरवर चालू असलेला गोंधळ बंद करून सर्वांना स्फुरण देणारे "उदे गं अंबे उदे" हे गाणे लावले. मग काय! आम्ही सगळ्यांनी तिथे आईचा गोंधळ मांडिला!! जिचा धावा करतोय ती आई जगदंबा तिचाच अंश असलेल्या प्रत्येक स्त्री मधे इथेच अवतरली आहे की काय असा भास होत होता!! वर स्टेजवर इतका वेळ शांत उभे असलेले शिवाजी महाराज,मांसाहेब जिजाऊ,संत ज्ञानेश्वर माऊली, निवॄत्ती,सोपान, मुक्ताबाई, तुकाराम महाराज हे पण त्या तालवर ताल धरण्यातून स्वतःला वाचवू शकले नाहीत. भान हरपून आम्ही सार्‍या आईचा धावा करत नाचत होतो!! आजूबाजूच्या जगाचाच काय पण आपल्या सोबत कोण नाचतंय याचाही अक्षरशः विसर पडला होता. तेवढयात आमच्या सार्‍यांवर पुष्पक विमानात बसलेले तुकाराम महाराजांनी वरून पुष्पवृष्टी केली. त्या भक्तीमेळ्यात आम्ही न्हाऊन निघालो. भक्ताला देव भेटल्यामुळे होणारा अपार आनंद आणि देवाला भक्त आपल्या भेटीस आल्यामुळे झालेला कौतुकाचा आनंद एकमेकात इतका मिसळून गेला की भक्त कोण आणि देव कोण हेच ओळखणे कठीण झाले असावे!! अवघा रंग एक झाला!!!!! गणपती विसर्जन सोहळयात नाही का.. ढोल ताशांचा गजरात तालात एकसारखी नाचणारी पाऊले पाहू.. इतके जड वाद्य कमरेला बांधून इतक्या दूर चालत असूनही अगदी हातांच्या बोटाला ठिकठिकाणी बँडेड च्या पट्ट्या बांधूनसुध्दा अजून उत्साहाने जोरजोरात ढोल ताशे वाजवणार्‍यांच्या चेहर्‍यावरुन ओसंडून जाणारा आनंद पाहू..का आपल्या भक्तांना सदैव असेच बळ देण्यासाठी , सुखी ठेवण्यासाठी ,त्यांची कार्ये नेहमी अशीच निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तत्पर असणार्‍या त्या एकदंत चतुर्हस्त गजाननाचे सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढवलेले आणि फुलांनी सजवलेले ते रूप मनोहर डोळयात साठवू असे होऊन जाते!! त्या पाचच मिनिटात आम्ही संपूर्ण वारीचा आनंद लुटला. शेवट अगदी एकमेकांच्या पायाला हात लावून नमस्कार करून एकमेकांचा निरोप घेतला. या इतक्या कमी वेळात निर्माण झालेल्या मैत्रबंधांमुळे डोळयात आनंदाश्रू अभे राहिले होते की इतक्या कमी वेळात आपली साथ सोबत संपुष्टात आली यामुळे डोळे भरून आले याचा विचार करण्याचा आम्ही प्रयत्नही केला नाही. काही गोष्टी या जशा आहेत तशा स्वीकारण्यातच आणि तशाच त्या जपण्यातच शहाणपणा असतो.
तसेच मग पुढे आम्ही भजने म्हणत , झेंडे नाचवत शिवाजी नगर ला आलो. तिथे एके ठिकाणी एका सोसायटीत आमच्या दिंडीची चहाची व्यवस्था दरवर्षी केली जाते. चहा घेऊन सगळेजण आपापल्या मार्गाने जाणार होते. आम्ही निघताना त्या सगळ्यांचे आभार मानयला विसरलो नाही. कारण आजच्या आम्ही मिळवलेल्या संपूर्ण आनंदाच्या समाधानाच्या ठेव्याचे श्रेय त्यांना जात होते. परंतु त्यांनीही अत्यंत विनयाने "तुम्ही आलात त्यामुळे आम्हाला अजूनच मजा आली. आणि श्रेय वगैरे आम्हाला प्लीज देऊ नका कारण ही वारी करण्याची इच्छा होणे आणि ती जिद्दीने पूर्ण करणे या गोष्टी तुमच्या पुण्यसंचयाने आणि माऊलींच्या आशीर्वादाने घडल्या आहेत!!" असे सांगितले.
किती खरे बोलले ते! आम्हाला माऊलींच्या आशीर्वादानेच इतकी चांगली देवमाणसे भेटली की ज्यांच्यामुळे पुढच्या वर्षीही वारीला जायचा आमचा निश्चय आणखी दृढ झाला. आम्ही घराकडे परतू लागलो ते हा सगळा अवर्णनीय आनंद इतरांना सांगण्यासाठी आणि पुन्हा पुढच्या वर्षी वारीत सहभागी होण्यासाठीच केवळ!!

गुलमोहर: 

हे वारी दर्शन छानच आहे, पुढ्चा भाग लवकर टाका !
गोदेय

त्या शक्तीला कधीतरी आयुष्यात ओळखावं.नतमस्तक व्हावं....देवाची खरी भक्ती मूर्तीपूजेत नसून मनुष्याच्या सेवाधर्मात आहे...>>
अगदी अगदी... Happy
छान लिहीतेस. पुढचं येऊ दे. विषेशतः अनुभव लिहावेत असं वाटतं.

छान लिहिलं आहेस आशु. पुढचा भाग टाक लवकर ........ Happy

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Dream is not what you see in sleep
    But it is the thing which does not let you sleep

    मी काही दिवे घाटातले फोटो टाकतेय वारीचे. इथे टाकते कारण तिथे साजिराने बरेच टाकलेत. माझ्या ऑफिसमधल्या मित्रांनी काढलेत.
    .
    vari1.jpg
    .
    vari2.jpg
    .
    vari3.jpg

    लिखाण ओघवतं, अन सुंदर.
    फोटो त्याहुनही सुंदर..
    पुन्हा लिही. वाट बघतो.

    अतिशय सुंदर लिहिले आहे. फोटो तर अप्रतिमच. हि अशी एकच शक्ति आहे (परमेश्वर) जी ईतक्या विविध थरातल्या, वयाच्या, धर्माच्या, शिक्षित, अशिक्षित, बायका, पुरुष, मुले सगळ्यांनाच एकत्र नाचायला लावते. हे वेडे नाहित, रिकामटेकडे नाहित, टाईम पास म्हणुन वेळ घालविणारे नाहित. किति प्रचंड ओढिने पावले टाकत स्वता:ला हरवुन गुंगीत असतात.
    आपले आभार.

    धन्स रे सगळ्यांना! मीनू तुझ्या फोटोंमु़ळे लेखाला अजूनच सजीवता आली. मी झेंडा नाचवत असल्याने मोबाईल वगैरे सबकुछ बंद!!
    Happy
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
    पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

    मस्त! पुढचं येउ द्या.

    आशू, किती सुंदर लिहिलं आहेस गं!! खूपच आवडलं Happy
    खूप छान आहे तुझी लेखन शैली, लिही पुढे लवकर....

    आशू फार सुंदर लिहीलेस!! शेवटची ओळ मस्तच आहे! Happy लिही पुढे पटकन! Happy

    छानच लिहिले आहेस आशु! Happy मीनु, मस्त आहेत गं फोटो. संपूर्ण दिवे घाट केवळ वारकरी! अद्भुत वाटतं खरंच!
    आशु, पूर्ण कर लवकर!
    ----------------------
    The cheapest face-lift is a SMILE
    Happy

    आशू, छानच लिहलय अगदी!! Happy
    तुझ्या लिखाणाने आणि मिनूने टाकललेल्या फोटोनी याची देही वारी घडल्या सारखी वाटतेय! आणि वारीला जाण्याची इच्छा बळावलिये! पुढील लिही लवकर!

    आशु छान लिहीते आहेस ... आवडलं. काल गडबडीत फोटो पोस्ट केले वाचायला मात्र वेळ नव्हता झाला.
    खरंच वारीचे फोटो आहेत म्हणल्यावर छानच असणार.

    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    आशू, सुंदर लिखाण. मिनू, फोटोसुद्धा छान आहेत. तुम्हा लोकांमुळे पुढच्या वर्षी वारीत हजेरी लावायची मनापासून इच्छा होतेय!!

    ए मुली अगं पूर्ण कर की हे... मस्त चाललंय. मन लावून लिही पुढचंही.
    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    खूप खूप मस्त वाटलं तुमचे मनापासून केलेले प्रतिसाद वाचून! आता पुढचे लिहायचा उत्साह अजून दुणावला आहे. धन्स!
    Happy
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
    पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

    मनापासून घेतलेला अनुभव तितकाच मनापासून लिहिलाय Happy
    क्रमशःच्या पुढच्या लेखाची वाट बघतोय आणि फोटोंचीही .

    आशू, सगळेच भाग उत्तम जमलेत Happy सुरेख लिहिलेस गं! ३र्‍या भागातले फुगड्यांचे वर्णन खूप सुरेख शब्दांत मांडले आहेस!
    पु. ले. शु.

    तिखट मीठ तर काय, सगळेच घालतात हो! त्या पदार्थात थोडं मन घालून बघा.. आणि पदार्थ करताना मनात म्हणा की हा पदार्थ खाणारा तृप्त होवो! मग बघा तुमच्या पदार्थाची चव कशी अवीट होते ते!! ">>
    सहीच...
    जर एखाद्या पठ्ठ्याने छत्री घ्यायचा प्रयत्न जरी केला तर सगळे "ए sssssss" करून त्याच्या कडे सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे. मग तो ही हसून ती छत्री बंद करायचा.>> Happy मस्त...
    कधी कधी मनाचे ऐकून जर आत्म्याला समाधान मिळत असेल तर बुध्दीच्या घोड्याला जरा लगाम घालणेच इष्ट! >> अगदी अगदी...
    उत्साह हा संसर्गजन्य असतो!! >> Proud खरंय...
    पोरी खरंच छान लिहितेस तू... पुढच्या वर्षी मी पण येईन Happy
    फोटोही बेष्ट... Happy

    उत्साह हा संसर्गजन्य असतो!! >>>>

    वा वा .... अनूभुती अशी शब्दात पकडता आली पाहिजे ..

    सुन्दरच आहे लिखाण .... किती उस्फुर्त आणि नेम्.क ...

    <<देवाला भक्त आपल्या भेटीस आल्यामुळे झालेला कौतुकाचा आनंद एकमेकात इतका मिसळून गेला की भक्त कोण आणि देव कोण हेच ओळखणे कठीण झाले असावे!! अवघा रंग एक झाला!!!!! >>
    आशु.. मस्तच.. शेवटच्या क्षणाची तुमची तल्लीनता.. इतरांना भक्तीच्या सागरात उत्सवमुर्ती होवुन
    भाग घेण्यास तुमचं भाग पाडणं खरच वाचुन अगदि वारकरी झाल्यासारखं वाटलं.

    इतका मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे!
    Happy
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
    पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

    वा खुप छान... अनुभुती सह इच्छा जाग्रुत झाली आहे वारी ला जायची Happy

    आशू, खुप छान लिहिलयस.. अगदी वारीत सामील झाल्यासारख वाटल. धन्यवाद.

    आशु अगदी मनापासून लिहीलंस ते जाणवतंय जागोजागी...
    कुठल्याकुठल्या वाक्याला दाद देऊ...?
    मस्त..
    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    आशू, किती किते सुंदर लिहिलयस! मीनू म्हणतेय तसं इतकं मनापासून की, तो आमचाच अनुभव व्हावा. काय काय आवडलं ते सांगायचं तर अख्खा लेख पुन्हा पेस्टावा लागेल इथे.
    आई अंबेच्या गजराचा भाग तर पुन्हा पुन्हा वाचला. आणि डोळ्यात पाणी आलं.
    आशू, खूप खूप छान लिहिते आहेस. अनुभवण्याची अन नेमक्या शब्दात मांडण्याची तुझी हातोटी वेधक आहे. लिहीत रहा गं. तुझ्या पुढच्या लेखाची वाट बघत्ये.

    आशुडी मस्तच, तिथे असायला हवे होते असे वाटतय.

    बोलावा विठ्ठल
    करावा विठ्ठल
    पाहावा विठ्ठल
    जिवभावे.

    छान लिहीलेस मीनु , अन फोटो एकदम खास आशु Happy
    एकाने वारीला जायचे अन पुण्य दुसर्‍याने घ्यायचे अस झाल Happy
    बर बर .. दोघींना पण Happy
    आशु छान शैली .... वारीत सामील झाल्याचा भास झाला .

    Pages