स्वारगेटच्या स्थानकापासल्या सिग्नलवर स्वयंचलीत दुचाकीवर मी भर उन्हात थांबलेलो होतो. सिग्नल चालू होते पण दिवे दिसण्यापलीकडे त्यांचा उपयोग नव्हता. कारण सर्व चौक ठप्प झालेला होता. एक मोठा मोर्चा निघाला होता. लोकशाहीला शिव्या देत मी जमेल तितके कडवट तोंड करून डोळे ताणून न होणार्या प्रगतीकडे पाहात होतो.
इतके लोक चालत कुठे निघाले असावेत या विचारात शेवटी मी माझे मन रमवायचा प्रयत्न चालू केला. तेवढ्यात समोर एक माणूस आला. आडनावाने ठोंबरे वगैरे असणार हे मी ताडले. पांढरी बंडी, खाकी हाफ पँट, चेहर्यावरची झाक पाहून कोणत्याही आईने आपल्या मराठी माध्यमातील लहान मुलाला 'बावळटपणा बावळटपणा विचारत होतास ना, तो हाच' असे सांगावे, डोळे क्रोधाने विस्फारलेले, पूर्ण टक्कल, सावळा रंग, मध्यम उंची, बर्यापैकी जाडी जी मोदी गणपतीमध्ये दर चतुर्थीला ब्राह्मण म्हणून जेवायची संधी मिळत असावी हे स्पष्ट करणारी आणि आवाज देवळातील घंटेसारखा! ब्रह्मचर्याला अखंड वाहून घेतल्यामुळे 'न वाहून घेणार्यांबद्दल एक असूयायुक्त तिरस्कार' असलेली तणावयुक्त नजर!
"चला, चला... बघता काय??"
किंचाळत मला म्हणाला. त्याचे हातवारे पाहून मला तो नाझी समजून गॅस चेंबरमध्ये नेत असावा असे वाटले.
"कुठे?"
संताप टीपेला पोचला की माणूस अत्यंत शांत होतो याचे माझा स्वर हे उदाहरण होते.
"कुठे??? कुठे काय कुठे?? उतरा त्या वाहनावरून... आणि चला.. ओ... तुम्हीही चला.."
माझ्या शेजारच्याने त्याला मिळालेली आज्ञा ऐकून मुखातील गुटख्याने धरित्रीवर थुंकून बंडखोर कवीसारखी देहबोली केली. तोवर म्हातारा माझ्या वाहनाला माझ्यासकट वळवत होता.
"ओ... ओ अहो हे काय हे?? आ? काय चाललंय काय??"
मी धक्का कम संताप कम घृणा यांच्या मिश्रणाच्या स्वरात उद्गारलो.
"तुमच्या पिढीत स्वाभिमान नाही"
दाखवायला आणलेल्या ऐवजी तिसरीच मुलगी बोहल्यावर चढवल्याचा आरोप करावा त्या टोनमध्ये म्हातारं चिरकलं!
"कसला स्वाभिमान?"
स्वारगेटच्या सिग्नलमध्ये भरदुपारी आपल्याला कसला स्वाभिमान वाटायला हवा हे माझ्या लक्षात येईना!
"या... या गाडीचं नांव काय??"
"हिरो होंडा"
"आता हे होंडा कुठलंय सांगा बरं?"
"जपान..."
"तेच म्हणतोय मी.."
चार वर्षे वाट्टेल तशी उलटतपासणी होऊनही खुनाचा गुन्हा मान्य न करणार्या आरोपीने एका किरकोळ प्रश्नावर गुन्हा मान्य केल्यावर वकील ओरडेल तसे ओरडत म्हातारा हातवारे करू लागला.
"काय म्हणताय"
"तुम्हाला स्वाभिमान नाही"
"कसला?"
"चक्क परदेशी बनावटीच्या वस्तू वापरताय... चला चला... उतरा खाली..."
तोवर आणखीन दोन इसम पोचले तेथे! त्यांनी मला मते मागायला आलेल्या कॉर्पोरेटरसारखा नमस्कार करत 'आम्ही या म्हातार्यापेक्षा सौम्य आहोत' याची कल्पना दिली व खाली उतरायला सांगितले.
"ही टाक रे ट्रकमध्ये.. "
ढकलाढकली, ओढाओढी, खेचाताण, पडापडी व आरडाओरडी हे सर्व एकदम झाले. मला पहिली जाणीव झाली ती ही की मी शंकरशेट रोडवर हॉरिझाँटल झालो आहे व आजूबाजूचे अनेक वाहनचालक आत्तापर्यंतचे ट्रॅफिक जाम फाट्यावर मारत गाड्या तिथून लांब नेत आहेत.
सटपटून उठल्यावर मी भेदक नजरेने शोध घेतला. तीन माणसांच्या हातातून माझी हिरो होंडा तुफान वेगाने एकीकडे सरकत होती. आता मी धावलो. तिथे पोचायला मला जितका वेळ लागला तितक्यात ती एका ट्रकमध्ये कोंबण्यात आली व तोवर मोर्चा आवरल्यामुळे तिकडील ट्रॅफीक सोडण्यात आले व ट्रक निघाला.
डोळ्यासमोर वरातीतल्या वधूला पळवल्यावर वराचा होईल तसा चेहरा करून मी थयथयाट करावा की सूज्ञपणे अॅक्शन घ्यावी याचा विचार करत थांबलो. एक रिकामी रिक्षा दिसली. तीत बसून त्याला सांगितले.
"तो ट्रक चाललाय त्याला गाठायचंय.. "
"का?"
पुण्यात संपूर्ण पार्श्वभूमी कळल्याशिवाय माणूस श्वासही घेत नाही.
"त्यात माझी गाडी आहे..."
"उतरा..."
"का?"
"मी त्याच मोर्चातला आहे..."
मी गडबडून उतरलो आणि पुन्हा चढलो.
"का चढलात?"
"अहो नाहीतरी मला त्या मोर्चातच जाऊन ती गाडी मिळणार आहे... तुम्हाला भाडे देईन..."
"परदेशी बनावटीच्या वस्तू वापरणार्यांचे पैसे मी घेत नाही..."
"या रिक्षेचे इंजिन ग्रीव्ह्जचे आहे..."
"हा युक्तिवाद लागू पडणार नाही... उतरा.."
"का? माझी हिरो होंडा जपानी बनावटीची म्हणून लेलँडमध्ये टाकली... आणि ग्रीव्ह्जच्या रिक्षेला मोर्चात परवानगी होय??"
"गोळेंशी बोला... मागून या.. रिक्षेत प्रवेश नाही..."
चरफडत मी उतरलो व धावत पुढे निघालो. शेवटी मोर्चात पोचलो. आता ट्रक हळू जात होता कारण आता मोर्चातील लोकांना 'आम्ही परदेशी वस्तू कशा जप्त केल्यात बघा' याचे प्रदर्शन करायचे होते. आता ट्रक माझ्या आवाक्यात आलेला होता.
अजून थोडा वेगात पुढे निघलो तसे दोघ चौघांनी मला रोखले.
"पुढे कुठे जातो??"
"पुढे जायचंय मला.. "
"मग आम्हाला काय उलटं चालायचंय का??"
"अहो पण जाऊदेत की.. "
"जो पहिला पोचेल त्याला स्वेटर मिळणार आहे हिमालयातील मेंढराच्या लोकरीचा"
"... पण.. मला स्वेटर वगैरे नकोय..."
"मग का धावतोस??"
"सोडा मला.. च्यायला तो ट्रक गाठायचाय मला..."
मी सुटलो तसे तेहीमागून धावत निघाले. मोर्चा आता आमच्या चौघांमुळे डिस्टर्ब होऊ लागला.
बहुतेकांना स्वेटर हवा असावा. कारण आता शिस्त सोडून सगळे आम्हाला रोखायच्या मागे लागले. ही बातमी पुढे कळल्यामुळे तो म्हातारा धावत मागे आला. किंचाळत हातवारे करत ओरडू लागला.
"शिस्त मोडता आणि भारताचे नांव घेता?? ... शर्यत येथून नाही आहे... शर्यत बरीच पुढून सुरू होणार आहे... मोर्चा कसा बिघडला??"
मोर्चाला आता शिस्त आली. ते पाहून मी ओरडलो.
"ओ शहाणे.. माझी गाडी द्या आधी.. शर्यती कसल्या लावताय"
त्या म्हातार्याचे आडनाव शहाणे नव्हते हे माझे दुर्दैव! आणि माझा संताप पराकोटीला पोचलेला होता हेही माझेच दुर्दैव!
अख्खं पब्लिक माझ्याकडे भयाने पाहू लागले. आता बहुधा माझा भीषण सर्वनाश होणार असावा. त्यांच्या नजरेत तरी तेच होते.
"उचल... उचल याला... टाक गाडीत.. "
मी स्वतःच्या इच्छेविरुद्ध एका टेम्पोत समाविष्ट झालो. एका दैदीप्यमान म्हातार्याला त्याच्या अनुयायांमध्ये जाहीररीत्या 'शहाणे' म्हणण्याचा परिणाम मी स्वकष्टांविना टेम्पोत येणे असा होता.
आजूबाजूला माझ्यासारखेच दोघे असावेत. आणि 'त्यांच्यातले' तिघे! कारण 'त्यां'चा पोशाख त्या म्हातार्यासारखाच होता. हे माझ्यासारखे दोघे मात्र भयाण नजरेने सगळीकडे पाहात होते.
त्यातलाच एक टिचक्या वाजवत अत्यंत जहाल चेहरा करत म्हणाला..
"घोडा लावणार आहे मी घोडा... एकेकाला घरी येऊन घोडा लावणार आहे मी.. "
त्याचा तो स्वर ऐकून घोडा तरी लागायला तयार होईल का अशी शंका माझ्या मनात आली. मात्र 'त्या' तिघांमधील तिघेही हासले. अल्सेशियन कुत्र्याला कावीळ झाल्यावर ते जसे ओरडेल तसा तो आवाज होता. अन्नु मलिकलाही अॅचिव्ह करता आला नसता.
"हासतो काय भाडखाव??..."
तोवर 'आमच्यातलाच' दुसरा तीव्र आवाजात किंचाळत म्हणाला...
"आख्खं हडप्सर आन्नारे मी थित्तं .. आख्खं हडप्सर..."
त्या तिघांना या दोघांची काहीही भीती नव्हती. कारण या दोघांनी काहीही दगा फटका केला तर बाहेरच्या मोर्च्यातल्या दोन एकशे पब्लिकने यांचा चक्काचूर केला असता हे टेम्पोतल्या सगळ्यांनाच माहीत होते.
विलक्षण कॉंबिनेशन चालले होते त्या टेम्पोत!
एक ड्रायव्हर, ज्याला मोर्चा कसला आहे याच्याशी काहीही घेणेदेणे नव्हते. तो किलोमीटर मोजत होता. चीनला आसाम आणि काही सलगचा भाग कायमचा देऊन टाकावा या मागणीसाठी जरी मोर्चा काढला असता तरी तो आनंदाने आला असता टेम्पो घेऊन! त्याचा एक मित्र, जो मोर्चाशी संबंधीत नसूनही खिडकीबाहेरच डोके ठेवून घोषणा देत होता. त्या घोषणा तो घाबरून देत होता, मोर्चाचा मुद्दा पटल्यामुळे देत होता की नाहीतरी जायचंच आहे तर टाईमपास करू म्हणून देत होता ते त्याचे त्यालाच माहीत!
आतमध्ये हे पिसाळलेले दोघे होते. ते कोणत्या आरोपाखाली टेम्पोत कोंबण्यात आले होते याचा सुगावा लागत नव्हता. त्यांच्याकडे पाहून मला काहीही वाटत नव्हते. मला 'काहीही न वाटणे' ही मनाची अवस्था अत्यंत संताप होऊन मग निराशेची शिखरसीमा गाठल्यानंतर जर काहीही करता आले नाही तर प्राप्त होते. मी टक्क रिकाम्या नजरेने त्या दोघांकडे पाहात होतो. 'त्यां'च्यातले तिघे या दोघांना आणि मला हासत होते. त्यांच्या हासण्यात 'सिवा' गवसल्यानंतरचा औरंगजेबी थाट होता.
"बघतो काय भ्यँचॉद?"
मी दचकलोच! मला किस खुषी मे शिवी दिली काही समजेना!
"काय झालं?? " मी भीतीयुक्त कुतुहल या एका नवीन भावनेने विचारले.
"अख्खा सातारा पेटवीन..."
"का?"
मला आपण जेथे नाही आहोत ते शहर पेटले तर वाईट वाटत नाही.
"अरे हा तुमच्यातलाच आहे"
'त्या' तिघांपैकी एकाने सातारा पेटवणार्याला सांगितले तसे 'त्या' तिघांपैकी उरलेले दोघे मोठ्याने हासले.
मी वाचलो हे बायप्रॉडक्ट!
"गाडी रोक हितल्याहित्तं"
तो सातारा पेटवणारा तिघांना म्हणाला.
"गपचूप बसायचं... आरडाओरडा केलास तर फटके पडतील.. "
त्यांच्या धमकीचा परिणाम झालेला दिसला. हे दोघे पडेल नजरेने पण तरीही 'पडलो तरी मीच मोठा' अशाही नजरेने मागून येणारा मोर्चा निरखू लागले.
आता ते व मी एकाच पक्षात आहोत याची तात्कालीन सुखद जाणीव झाल्यामुळे मी मैत्रीचा प्रस्ताव मांडण्याच्या सुरात विचारले.
"काय अॅक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे?? हे सोडत का नाहीत आपल्याला?"
त्यावर त्या 'न सोडणार्यांची' आई अख्या गावाला हवी तेव्हा स्वेच्छेने प्राप्त व्हायची अशी हळुवार माहिती मला मिळाली.
मी 'छे हो, काहीही काय बोलता' असेही विचारणार तेवढ्यात मला ती संतापातिरेकातून आलेली शिवी आहे हे लक्षात आले.
"पण.. म्हणजे चाललोयत कुठे आपण??"
"सातारा"
"क्क्क्क्काय???? "
मी चेहरा वळू शकेल त्या सर्व कोनात वळवून दिसेल त्याला पाहून ओरडलो. तेवढ्यात 'त्या' तिघांनी घोषणा केली टेम्पोतल्या टेम्पोत!
"स्वाभिमानी असाल तर सातार्याला चलाSSSSSSSSSS"
मी हादरलो. हादरून मी गाडीचा नाद सोडून टेम्पोतून उडी टाकली. मोर्चामुळे टेम्पोचा वेग कमी होता, म्हणजे चालणार्या माणसाइतका होता म्हणून उडी सुचली तरी मला! पण बाहेर पडल्याच्याच क्षणी पुन्हा मी आत फेकला गेलो. मोर्चा काय उगाच होता काय!
"सातारा???"
आता तीव्र धक्क्याने हा प्रश्न विचारणे इतकेच माझ्या हातात होते.
मी अजून धाडस केले.
"हे बेकायदेशीर आहे... मी केस करीन.."
त्यावर 'बाबा, मी मोठा का तुम्ही मोठे' असा प्रश्न विचारणार्या दोन वर्षाच्या मुलाकडे पाहून करावा तसा कीवयुक्त हसरा चेहरा त्या तिघांनी केला. त्यावरून मला लक्षात आले. प्रकरण वाटत होते त्याहून गंभीर आहे. मोबाईल फोन नसलेला जमाना तो! कळवायचे कसे घरी?
काही मिनिटे मी तशीच जाऊ दिली.
"तुम्ही.. कसे काय आलात आत??"
मी त्या पिसाळलेल्या दोघांना घाबरत घाबरत विचारले.
"कसे काय म्हणजे?? आम्ही आतच होतो..."
मला हे इक्वेशन समजेना! हे आतच होते तर बोंबलतायत कशाला?
"म्हणजे काय?? आतच होतो म्हणजे??"
"आमचाच टेम्पोय हा... भडव्यांनी पळवलाय हा टेम्पो.. "
ऐकावे ते नवलच या म्हणीचे जिवंत प्रत्यंतर आले मला! आता लक्षात आले की ड्रायव्हर शेजारचा माणूस टाळके बाहेर काढून घोषणा का देतोय!
"ही जबरदस्ती आहे"
माझ्या मध्यमवर्गीय ब्राह्मणी संस्कृतीला पेलेल इतके आक्रमक विधान मी केले.
त्याच संस्कृतीने तयच क्षणी आणखीन एक गोष्टही सुचवली. जेत्याच्या बाजूने टाळ्या वाजवणे!
"अगदी म्हणजे.. पूर्ण नीट विचार जर केला... तर... "
माझ्या 'ततपप'चा अंदाज येत नसल्याने पिसाळलेले दोघे आणि पिसाळवणारे तिघे माझ्याकडे टक लावून बघत होते.
"तर यांचा मुद्दा काही चुकीचा नाही.. काय म्हणून पाश्चात्य वस्तू वापरायच्या?? आपल्या देशात कारागीर नाहीत?? कष्ट करायची इच्छा नाही कुणाला?? संधी मिळत नाही?? बाजारपेठे नाही?? रोखीचे व्यवहार नाहीत? कुशलता नाही?? का म्हणून बाहेरच्या देशांना फायदा मिळवून द्यावा आपण??"
भाषणाची कला कामास आली. त्या तिघांनी मला प्यायला पाणी दिले व त्यांच्यात बसवले. किंमत एकच होती. ते जे करत आहेत ते योग्यच आहे असे म्हणणे!
"सुरुवातीला मला समजलेच नाही की हे सगळे काय चाललेले आहे.. पण आता मी नीट विचार केला तेव्हा जाणवले.. काय चुकीचे आहे यात?? काय चुकीचे आहे सांगा ना?? आपला देश आहे.. आपली भूमी आहे.. येथे आपले लोक, आपली संस्कृती, आपले कुटुंब, आपला उदरनिर्वाह.. सगळं काही आपलं आहे.. येथे भलत्या सलत्या देशाच्या लोकांनी येऊन त्यांचा माल काय म्हणून विकायचा?? काय म्हणून?? म्हणजे त्यांचा माल विकला गेल्याबद्दल पैसे आणि फायदा त्यांना मिळणार.. आं?? आणी इथले कुशल कारागीर भीक मागायला लागणार... नाही.. तुम्हीच सांगा.. या टेम्पोचे अॅव्हरेज किती??"
"अॅव्ह... सहा..."
"सहा.. आता सहा किलोमीटर पर लिटरने तुम्ही मालवाहतूक करणार.. उद्या काढला समजा अमेरिकेने.. नाही एक मिनिट गृहीत धरा... समजा अमेरिकेने काढला एक टेम्पो.. जो लिटरला वीस अॅव्हरेज देतो... आणि तोच सगळ्यांनी घ्यायला सुरुवात केली... तुमचं काय होईल??"
"अरे पण आज काय म्हणून पळवताय टेम्पो???"
"एक मिनिट एक मिनिट..हा टेम्पो पळवला जात नाहीये... आयुष्यातील सर्वात श्रेष्ठ कामासाठी त्याचा वापर होतोय... आजवर या टेम्पोने हे काम कधीच केलेले नाही.. विचार करा.. स्वदेशीसाठी हा टेम्पो आज पळतोय... "
"मला डिझेल पायजंल सातार्यापर्यंतचं.. बाकी कशासाठीही पळवा टेम्पो..."
"नक्कीच... नक्कीच... स्वदेशीसाठी आपले लोक ही किंमत का नाही मोजणार??"
मी 'त्या' तिघांकडे अजिबात न बघता बोलत असल्यामुळे कुणाची मला विरोध करायची टापच नव्हती.
"पण आज हाच टेम्पो कुठल्यातरी कोरियन कंपनीचे टीव्ही घेऊन फुरसुंगीहून चिंचवडला गेला असता.. नाही.. गेला असता का नाही??.. म्हणजे तुमचा टेम्पो पळाला म्हणून आज जरी तुम्ही पैसे कमावले असतेत... तरीही मूळ मालाचे पैसे कुणाला?? चिक चँग च्यू टू फु टू असले बोलणार्या पिचपिच्या डोळ्यांच्या परदेशी माणसांना... हे कितपत योग्य आहे?? "
"ओ तुम्ही आम्हाला काय सांगू नका हो... मोर्चाला लय दा ट्यॅम्पो दिलाय मी... मला भाडं पायजंल.. "
"मी देईन.. मी देईन संपूर्ण ट्रीपचं भाडं.. मग तर झालं??? निदान आता तरी या विषयावर चर्चा करा.. मतप्रदर्शन करा??"
"आमाला काय करायचंय... स्वदेशी तर स्वदेशी.. "
"धिस इज बॅड... धिस इज बॅड.. हे फार वाईट.."
"क्का??"
"तुम्ही राहणार भारतात, जन्म इथे घेणार, इथे वाढणार, इथे शिकणार, इथेच नोकरी धंदापाणी शोधणार आणि भलत्यांना धंदा मिळणार हे चालवून घेणार पुन्हा.. "
"नाय नाय हो.. माझा काय प्रॉब्लेमच नाय्ये... मी तर म्हणतो वापराना स्वदेशीच.. क्काय.. स्वदेशाच्या भाएरचं काय आनायचंच कशाला म्हणतोय मी... माझा प्रश्न फक्त ट्यॅम्पोचाय.. "
"तो केव्हाच सुटलेला आहे... पाहिलंत?? दोन माणसांची मने वळवली मी आज..."
मी 'त्या' तिघांना म्हणालो तसे आदराने ते मला पाहू लागले. बोलती बंद झालेली होती त्यांची!
"आपण सातार्याला जाऊ"
निवृत्तीनाथांनी लहानग्या ज्ञानराजांना 'माफ कर या समाजाला' ज्या टोनमध्ये सांगितले असेल त्या टोनमध्ये मी म्हणालो.
मग आम्हाला नाश्ता मिळाला. पुन्हा पाणी मिळाले. पाण्याची बाटली फॉरीनची होती. पण मी दुर्लक्ष केले. मोठ्या ध्येयासाठी लहान लढाया हाराव्यात!
तो मगाचचा म्हातारा आढावा घेण्यासाठी टेम्पोपाशी आला काही वेळाने!
"गुरुजी.. या मुलाने काय सांगीतलंय या दोघांना स्वदेशीबाबत... "
पुढची दोन मिनिटे माझी स्तुती आणि म्हातार्याचा बदलत जाणारा चेहरा! त्यानंतर तो मला म्हणाला..
"पुढे मोर्चात ये की.. अशाच व्यक्तींची गरज आहे पहिल्या फळीत.. "
"नक्कीच येतो.. माझा एक प्रॉ... आपलं.. अडचण आहे.. मोठ्या भावाला कॉलेजला जायला माझी गाडी द्यायची होती... "
"कुठे घर आहे तुझं?? मी देतो पाठवून एकाबरोबर... "
पुढच्या दहा मिनिटात एका युवकाने माझी हिरो होन्डा मोर्चातून बाहेर काढून घरच्या रस्त्याला लावली. ते विहंगम दृष्य पाहून मी मागे टेम्पोकडे पाहिले. आधी मी तेथे धावलो.
"अहो टेम्पो यांचा.. यांचे आता विचारही स्वदेशी... यांनाच चालवूदेत ना.. उगाच काही चूक झाली चालवण्यात तर केवढ्याला पडेल ते.... "
मी गायब झाल्यामुळे पुन्हा भाड्याचा विषय काढून बोलू लागलेला ड्रायव्हर आता शांत झाला. पुढे येऊन त्याने टेम्पोचा ताबा घेतला. किन्नरही त्याच्या बाजूला बसला. मी घोषणा देत टेम्पोबरोबर निघालो.
"राईटलाच ठेवा.. राईटलाच ठेवा" असे मी मधेच टेम्पोवाल्याला सांगत होतो. हातवारे मात्र करत नव्हतो. फक्त तोंडाने सांगत होतो.
पद्मावतीचा फाटा आला उजवीकडे एकदाचा!
"मोर्च्याच्या पुढे घ्या टेम्पो... टेम्पो पुढे पाहिजे.. नेतृत्व करायला.. "
माझ्या दुमदुमणार्या घोषणांमुळे आदराने स्तब्ध होत मोर्चा माझ्याकडे पाहात होता. टेम्पो पुढे न्यायच्या मिषाने मी तो डिव्हायडरच्या पलीकडे घेतला...
आणि पटकन टेम्पोत बसून टेम्पोवाल्याला म्हणालो...
"बघा .. भाषण देऊन सोडवलं की नाही?? सुटा आता पद्मावतीवरून सुसाट.. आणि मलाही न्या..."
पंधराव्या मिनिटाला आम्ही तिघेही म्हात्रे पुलाआधी चहा पीत होतो. टेम्पोवाल्याच्या पैशाने!
(No subject)
भुषणराव, बोक्याची जागा आज
भुषणराव, बोक्याची जागा आज तुम्ही घेतली तर...पंचेस जरा हलकेच.. पण छानय
धन्यवाद!*
मी पन वचतोय छान आहे ! बाकि
मी पन वचतोय
छान आहे !
बाकि बुद्धी ( शिक्षन)कमि
आसल्यामुळे जास्त
बोलता लिहिता येत नाहि
क्षमस्व ............ :
लई भारी ! पन नशीबवान मानूसच
लई भारी !
पन नशीबवान मानूसच म्हनायचं तुमी; मोर्चातून कोनबी सुटल हो पन पोलीस तर नेमके हेरून हानतात ना अश्यानाच !!
>>>>>>>>>>>>त्यावर त्या 'न
>>>>>>>>>>>>त्यावर त्या 'न सोडणार्यांची' आई अख्या गावाला हवी तेव्हा स्वेच्छेने प्राप्त व्हायची अशी हळुवार माहिती मला मिळाली.<<<<<<< अगदी भयन्कर हसले
(No subject)
बेफिकीरजी, ऊन्हात घडलेली
बेफिकीरजी,
ऊन्हात घडलेली स्टोरी आवडली !
:स्मितः
छानच!! खुसखुशीत आहे, आवडले.
छानच!! खुसखुशीत आहे, आवडले.
भारी..
भारी..
मला आपण जेथे नाही आहोत ते शहर
मला आपण जेथे नाही आहोत ते शहर पेटले तर वाईट वाटत नाही. <<<
खुसखुशीत..>>
खुसखुशीत..>>
हे भारीये!!! भुषणराव,
भुषणराव, बोक्याची जागा आज तुम्ही घेतली तर...>>> चातकाला जोरदार अनुमोदन! मी अगदी हेच लिहिणार होते!
मला आपण जेथे नाही आहोत ते शहर पेटले तर वाईट वाटत नाही. >>> यावरुन एक सरदारजीचा विनोद आठवला.
गाढ झोपलेल्या सरदारजीला एक माणूस उठवत होता.
"सरदारजी, सरदारजी उठो उठो!! घरको आग लगी हैं"
"तो मेरा क्या जाता हैं?"
"सरदारजी, आपके घरको आग लगी हैं"
"तो तेरा क्या जाता हैं"
.... आणि सरदारजी पुन्हा एकदा निद्राधीन
(No subject)
लै भारी
लै भारी
सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.
सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.
लोभ असू द्यावात!
-'बेफिकीर'!
>> कोणत्याही आईने आपल्या
>> कोणत्याही आईने आपल्या मराठी माध्यमातील लहान मुलाला 'बावळटपणा बावळटपणा विचारत होतास ना, तो हाच'
बेक्कार हसलो!
फॅंटॅस्टिक मजा आया
फॅंटॅस्टिक
मजा आया
झाड व रेव्यू, आभारी आहे. लोभ
झाड व रेव्यू,
आभारी आहे. लोभ असू द्यावात!
-'बेफिकीर'!
एकदम मस्तच , शिक्षण पुण्याला
एकदम मस्तच , शिक्षण पुण्याला झाल्यामुळे तर स्वारगेटच्या सिग्नल सह अनुभवले. लय भारी.
एकदम आवडली!
एकदम आवडली!
नानाजी व श्यामराव - अनेक आभार
नानाजी व श्यामराव - अनेक आभार आपले!
मस्त... पंचेस आवडले...
मस्त... पंचेस आवडले...
धन्यवाद मार्को पोलो
धन्यवाद मार्को पोलो
सुरेख, स्वाभिमान असणे म्हणजे
सुरेख,
स्वाभिमान असणे म्हणजे मुर्खपणे वागणे नव्हे.
जेंव्हा "मराठी माणसावर अन्याय" म्हणुन पेपरातील बोंब ऐकते तेंव्हा वाटते
अरे यापेक्षा तुम्ही गुपचुप राहुन इतर लोकांप्रमाणे मराठी माणसांना पुढे यायला मदत करा.
नुसती आरडाओरड काय कामाची.
लेखात हे छान विनोदीरित्या स्पष्ट केले आहे.
लईच भारी!
लईच भारी!
आई शप्पथ बेफिकीर सर तुम्ही