******मला सुचलेली ही एक अतीशय बालिश कथा आहे. ह्यात साहित्यमूल्य वगैरे काहिही नाही आहे (ते माझ्या लिखाणात कधी नसतेच म्हणा). इथे टाकावे की नाही अशा संभ्रमात मी बराच वेळ पडलो होतो. पण शेवटी दिली टाकून. ह्यावर काय प्रतिक्रिया मिळणार आहेत ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तरिही**************************
काल रात्री अचानक कोण जाणे मला बाहेर रपेट मारून यायची हुक्की आली. म्हटलं जरा निघावे रमत गमत. रिपरिप पाऊस लागला होता. पण पुण्यातल्या पावसात छत्री घेऊन निघणे म्हणजे भ्याडपणाचे लक्षण मानतात म्हणे. मी छत्री न घेता अगदी तस्साच निघालो होतो. भिजत भिजत थंड वार्यात चालताना मज्जा येत होती. घराच्या मागून चालत चालत चांदणी चौकातल्या टेकडीवर पोहोचलो. टेकडीवरून रात्रीचे कोथरूड खूप छान दिसत होते. दिव्यांची झगझगीत रोषणाई, वहानांचे हलणारे दिवे, त्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला रस्ता; सगळेच कसे स्वप्नवत वाटत होते. सहज आकाशात नजर गेली. आहाहाहा! आकाशाचा काळा पडदा चंदेरी तार्यानी सजवलेला होता. पण हे काय? आकाशाततून एक गोल प्रकाशमान तबकडी खाली येत होती. छे! कसे शक्य आहे हे? स्वप्न तर नाही ना? मी जोरात मान हलवली. स्वत:ला एक जोरदार चिमटा काढला. चष्मा काढून पुसला आणि परत डोळ्यांवर चढवला. तुम्हाला सांगतो! खरंच एक उडती तबकडी खाली येत होती. अंधारात ती काय चमकत होती! तिच्या चहूबाजूला नुसते चकाकणारे दिवे होते. ओढला गेल्यासारखा मी त्या तबकडीचा माग काढत गेलो. दूरवर एका निर्मनुष्य जागी ती तबकडी अलगद खाली उतरली. अश्चर्य म्हणजे त्या तबकडीचा अजिबात आवाज येत नव्हता. मी तिथून धूम पळण्याचा प्रयत्न केला. पण कोण्यातरी अज्ञात शक्तीने मला बांधून ठेवले होते. मला हलचाल करता येईना. जोरात ओरडायचा प्रयत्न केला पण घशातून आवाज फुटत नव्हता. मी त्या अजब वस्तूच्या कैदेत अडकलो होतो आणि आता त्यातून सुटका नव्हती.
ती तबकडी अगदी चित्रपटात दाखवतात तश्शी होती. त्याला शनीसारखे कडे होते आणि खाली येताना त्यातून तीन पाय बाहेर आले आणि त्यावर ती विसावली. पाच मिनिटे अशीच गेली. मला आता खूप भिती वाटू लागली होती. पण पुढे काय होणार ह्याची उत्कंठाही होती. ही तबकडी परग्रहावरून आली आहे का? ते जीव कसे असतील? ते मला काही जबरदस्त शक्ती देतील का (कोई मिल गया मध्ये दिली तशी)? का ते मला मारून टाकतील? ते मला त्यांच्या ग्रहावर घेऊन जातील का? तबकडीचा दरवाजा हळूहळू उघडू लागला आणि माझे हृदय अजूनच जोरात धडधडू लागले. अचानक दरवाजातून निळ्या रंगाचा प्रकाशझोत माझ्या अंगावर सोडला गेला. त्या जबरदस्त झोतामुळे माझे डोळे दिपले गेले आणि काही क्षण डोळ्यांपुढे अंधारी आली. काही वेळाने तो प्रकाशझोत बंद झाला आणि दरवाजातून एक पिवळ्या रंगाचा, मोठ्ठ्या डोळ्यांचा, बदामाच्या आकाराच्या डोक्याचा, बुटका जीव बाहेर येऊ लागला. त्याचे पूर्ण अंग पिवळ्या रंगाचे होते. हाता पायाची अगदीच काडी होती. पोट सुटल्यासारखे वाटत होते. डोळे काळे, बटबतीत होते. त्याच्या हाताला दोनच बोटे होती. डोक्यावर केसांचा पत्ताच नव्हता. अतीशय ओंगळ दिसणारा तो जीव माझ्यापाशी आला. तो माझ्याजवळ आल्याबरोबर मला अचानक बंधनातून मोकळे झाल्यासारखे वाटले. तो जीव माझ्याजवळ आला. त्याने त्याचा हात पुढे केला आणि यांत्रिक आवाजात म्हणाला
"यू गॉट एनी सिगारेट्स? सुट्टा है क्या? सिगारेट आहे का?"
"च्यायला तुम्हाला मराठी येते?"
"हो! तुमच्या ग्रहावर बोलल्या जाणार्या सगळ्या भाषा आम्हाला येतात."
"अरे हो! माझे नाव येडा. आम्ही आमच्या ग्रहाला पृथ्वी म्हणतो. पृथ्वीवर तुमचे स्वागत आहे"
"माझे नाव व्रीन, मी स्रॉपी नावाच्या ग्रहावरून आलो. आता जास्त वेळ घालवू नकोस. तुझ्या खिशात सिगरेट आहे. मगाशी आम्ही तुला पूर्ण स्कॅन केले. चल काढ लवकर! एक एक सुट्टा मारू."
मी मुकाटपणे दोन सिगारेट्स बाहेर काढल्या. आम्ही खाली बसलो आणि निवांतपणे धूर सोडू लागलो. व्रीनला नाकपुड्या नव्हत्याच. नुसतीच दोन छिद्रे होती. त्यातून धूर बाहेर पडताना मोठे गंमतशीर दिसत होते.
"तू पुरुष आहेस का स्त्री?" मी भीड चेपल्यावर विचारले.
"आमच्यात असा भेदभाव नसतो" त्याने एक झकास झुरका मारला आणि शांतपणे उत्तर दिले.
"बाप रे! मग तुम्हाला पोरे कशी होतात?"
"काय चावट माणूस आहेस तू!" व्रीन चक्क लाजला (केवळ लेखनाच्या सोयीसाठी येथे पुरुषवाचक विशेषण वापरतो).
खरं तर मी हा प्रश्न केवळ शास्त्रीय दृष्टीकोनातून विचारला होता. पण व्रीन चिडायचा आणि मला मारून टाकायचा म्हणून मी तो विषय आवरता घेतला.
"तुला पुण्यात येऊन किती दिवस झाले?" मी नवीन विषय छेडला.
"झाले २/३ दिवस. एखादे घर भाड्याने घेऊन राहीन म्हणत होतो. पण काय पुण्यातली भाडी राव! साधे १ बीएचके परवडेना" व्रीनने तोंड वाकडेतिकडे केले.
"तुमच्याकडे सिगारेट्स वगैरे असतात वाटते."
"हो तर! विश्वातल्या सगळ्या ग्रहांवर ही भानगड मिळते" ही माहिती मला खूप महत्वाची वाटली.
"तुम्ही पुण्यात रहाण्याचा प्लॅन बनवताय की काय?"
"बनवत होतो. म्हणजे माझे संशोधन संपेपर्यंत"
"तुम्ही संशोधन करण्यासाठी पृथ्वीवर आलात? कसले संशोधन करताय?"
"ह्या ग्रहावरील जिवांचा अभ्यास करतोय आम्ही. हा माझा मिड-टर्म प्रॉजेक्ट आहे. मी मेंदूचा जरा जास्त खोलवर अभ्यास करतोय"
"अच्छा! मध्ये रशियातून गायी उचलल्या ते तुम्हीच काय? आज तक वर दाखवत होते. मला वाटले नेहमीप्रमाणेच थापा आहेत"
"होय! मीच उचलल्या त्या! तो अभ्यास आता पूर्ण झाल्यात जमा आहे. माकड, गायी, मासे ई. च्या मेंदूचा अभ्यास झाला. आता मानवी मेंदूचा अभ्यास राहिला आहे. तो करायला थोडा वेळ लागेल. मानवी मेंदू खूप गुंतागुंतीचा आहे ना!"
"कसा करता हो अभ्यास?"
"डोके फोडून मेंदू बाहेर काढतो. मग तो एका विशिष्ठ यंत्रात ठेवतो......."
"डोके फोडता तुम्ही? मानवी मेंदूच्या अभ्यासासाठी मला निवडले की काय तुम्ही? माझे पण डोके फोडणार?" माझ्या अंगावर भितीने काटा आला.
"नाही! तुझ्या मेंदूचा इनिशियल स्कॅन केला मी. पण तुझा मेंदू त्या गायीच्या मेंदूपेक्षा अप्रगत आहे. त्याचा मला काहिही उपयोग नाही."
तो मला अप्रगत वगैरे म्हणाला ह्याचे क्षणभर दु:ख झाले पण हा प्राणी मारणार नाही ह्या बातमीने मला खूप हायसे वाटले.
"स्रॉपी ग्रह इथून किती लांब आहे?"
"१२०० प्रकाशर्षे"
"अरे बाप रे! तुम्हाला इथे यायला किती वेळ लागला?"
"१५ दिवस"
"अरे वा! बरेच वेगात आलात तुम्ही."
"होय! आम्ही बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे अवकाशातल्या वातावरणाच्या घड्यांमधून आम्ही प्रकाशाच्या वेगाने प्रवास करून पटकन दुसर्या ग्रहावर जाऊ शकतो."
मला काहिही अर्थबोध झाला नाही. पण तरीही मी "अरे वा! छान!" असे बोलून गेलो.
"आता हेच सांग! माझे वय काय असेल? तुमच्य पृथ्वीवरच्या वर्षांच्या हिशोबात?"
"असेल १९/२०" हा मिड-टर्म प्रॉजेक्ट करत आहे म्हणजे साधारण तेवढे वय असणारच!
"चूक! माझे वय आहे १५४७ वर्ष"
"बाप रे! इतकं जगून तुम्हाला कंटाळा नाही येत? आणि ह्या वयात मिड-टर्म प्रॉजेक्ट?" आयला! हा बराच बुद्दू दिसतो. आणि मला अप्रगत म्हणतो लेकाचा!!
"आमचे एक वर्ष म्हणजे तुमची साधारण १०० वर्ष!"
"काय सांगता काय? पण तुम्ही तुमचे वर्ष एवढे मोठे का ठेवलेत?"
"अरे बाबा! आमच्या ग्रहाला आमच्या ब्रेऑन नावाच्या स्त्रोत तार्याभोवती एक फेरी पूर्ण करायला तेवढा वेळ लागतो. आमच्याकडे दिवस सुद्धा साधारण इथल्या दिवसाच्या २० पट मोठे असतात. खूप मोठा आहे आमचा ग्रह!" व्रीन खूप अभिमानाने बोलत होता.
"मोठा ग्रह असला म्हणून काय झाले? दिवस मोठा का ठेवायचा? आणि इतक्या मोठ्या दिवसात तुम्हाला कंटाळा येत नाही काय? पण एक बरे आहे. रात्र सुद्धा मोठी आहे. त्यामुळे मस्त १६० सात ताणून द्यायची! आहे की नाही?" मी असे म्हटल्यावर त्याने त्रासिक चेहेरा केला. "तू खरोखरंच मूर्ख आहेस!" मला खरं तर राग आला होता पण पाहुणा आहे म्हणून गप्प बसलो.
"तुम्ही क्रिकेट खेळता?"
"क्रिकेट? माझ्या शब्दकोषात ह्या शब्दाचा अर्थ ’एक कीटक’ असा दिलेला आहे"
"काहितरी काय? क्रिकेट हा एक भन्नाट खेळ आहे. आमच्या देशात तो भलताच लोकप्रीय आहे" मी
"बहुतेक मला माझा शब्दकोष अद्ययावत ठेवावा लागेल."
"पण तुम्ही दिवसाचे ३२० तास काय करता?"
"आम्ही संशोधन करतो. नवनवीन शोध लावतो. आमचे जीवन सुसह्य करायला मदत होते त्याने!" व्रीन पुन्हा अभिमानाने बोलला.
"म्हणजे तुम्ही एंजॉय करतच नाही की काय? तुम्ही पिक्चर पहाता?"
"पिक्चर म्हणजे चित्र?"
"चित्रपट! मूव्ही!!" आता कसे समजवातचे ह्याला?
"ओह हो! नाही. आम्ही असली कामे करण्यात वेळ दवडत नाही."
"अरे रे! मग तुम्ही इतके जगून काय उपयोग? मी असतो तर एकामागून एक पिक्चर टाकले असते. काय फुल्टू मजा येते म्हायतिये? तुम्ही कोई मिल गया पहाच! त्यात जादू नावाचा एक प्रग्रहावरचा जीव येतो आणि हृत्विक रोशनला जबरदस्त पावर देतो."
"काय बरळतोस तू हे?"
"अहो खरंच. तुम्ही मला पण द्या ना पावर्स! हमको भी पावर मंगता हैं"
"अबे हॅट!"
"असे काय करता? असुदे! निदान आपल्या दोघांचा एक फोटो तरी घेऊदे मला." मी मोबाईल बाहेर काढत म्हणालो.
"छे! शक्य नाही. मी तुझ्या मोबाईलचे सारी कार्यप्रणाली कधीच निकामी केली आहे. आणि मी तुला माझा फोटो अजिबात काढू देणार नाही." व्रीन हसत हसत म्हणाला.
"असंहो काय करता? मला मित्रांसमोर किती फुशारक्या मारता येतील म्हायतिये? जाऊदे. पण तुम्ही पिक्चर पहाच. काही पिक्चरमध्ये आयटम सँग्ज असतात. आयटम पोरी असतात"
"आयटम सॉग्ज?" हा शब्द माझ्या शब्दकोषात नाही आहे." व्रीन थोडासा ओशाळला.
"अरे! टकाटक पोरी असतात एक एक! रापचिक डान्स करतात." मी अतीशय उत्साहात ही माहिती देऊ लागलो.
"टकाटक? रापचिक? कुठली भाषा ही?" व्रीन गोंधळल्यासारखा वाटला.
"स्पेशल मराठी आहे ही. पण तुम्हाला सांगून काय उपयोग म्हणा! पुस्तकातले कीडे तुम्ही! आणि पोरगा पोरगी असला भेद नाही तुमच्यात. तुम्हाला काय कळणार?" मी हताश होऊन उद्गार काढले.
"तू माझ्या ज्ञानाबद्दल शंका घेतोस?" व्रीन चिडल्यासारखा वाटला. मला भिती वाटली. उगाच इजा करायचा.
"शंका नाही घेत हो! आपण दुसरी चर्चा करू."
"नाही नाही! तू मला आव्हान दिलेस. मी तुला दाखवतोच मी काय चीज आहे! तू मला तीन प्रश्न विचार. कोणतेही चालतील. मी जर का अचूक उत्तरे दिली तर मी जिंकलो. मग मी तुझा मेंदू बाहेर काढीन आणि तुझ्या डोक्यात माकडाचा मेंदू भरीन. पण माझे एकही उत्तर चुकले तर तू जिंकलास. मग मी इथून निघून जाईन. चल! विचार काहिही!!"
"अहो मला तुमचा अपमान करायचा नव्हता. माझा हेतू असा नव्हता. मी काय तुम्हाला हरवणार? उगाच का गरीबाची फजिती करता? मला माफ करा. सोडून द्या." माझी जबरदस्त फाटली होती.
"छे! आता तुला सोडून देणे शक्य नाही. माझी चेष्टा करतोस काय! चल, प्रश्न विचार नाहितर मी तुला अत्ताच जाळून टाकतो." व्रीन आता अगदीच हातघाईला आला होता. मी चांगलाच फसलो होतो. झक मारली आणि रात्री फिरायला बाहेर पडलो! आता मी काही वाचत नाही. माझे आईबाबा, मित्र, सहकारी, प्रियांका चोप्रा हे सगळे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले. मी गर्भगळीत झालो. पण आता प्रश्न विचारण्यापासून गत्यंतर नव्हते. मी अमिताभ बच्चनचे नाव घेतले आणि प्रश्न आठवू लागलो. पण ऐनवेळी जळ्ळा एक प्रश्न आठवेल तर शपथ! शेवटी बन्याने काल विचारलेला प्रश्न मला आठवला. "एक मुलगा आणि एक मुलगी पायर्यांवर बसलेले असतात. ते एकमेकाकडे पहातात. मुलगा एक गाणे गुणगुणतो आणि अचानक ते वाळवंटात जातात. कसे काय?"
"काय?" व्रीन चकीत होऊन म्हणाला. "हा कसला प्रश्न?"
"ह्म्म्म! हिंदी आणि मराठीचं मिक्स आहे!" मी.
"हा प्रश्न चुकिचा आहे. पृथ्वीवासियानी अजून इतकी प्रगती केली नाही की ते क्षणात एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जातील" व्रीन.
"ह्याचे उत्तर आहे माझ्याकडे. फोडू उत्तर?" मी
"थांब! मी माझ्याकडच्या डेटाबेस मध्ये पहातो. मला उत्तर नक्कीच मिळेल." व्रीनने बराच वेळ खटपट केली. मध्येच आत जाऊन मोबाईल फोनसारखी एक वस्तू घेऊन आला. दहा पंधरा मिनिटे कुठल्या कुठल्या कळा फिरवल्या. पण काहिही उपयोग झाला नाही. तो बराच चिडलेला वाटला. त्याच्या भाषेत त्याने बरीच बडबड केली. बहुतेक "भ" च्या बाराखडीतल्या शिव्या दिल्या असाव्यात. बरीच आदळ-आपट केली. शेवटी अगदी हताश होऊन त्याने माझ्याकडे पाहिले. अगदी घट्ट पकडलेले सावज सुटणार ह्या कल्पनेने तो अगदी रडकुंडीला येऊन म्हणाला "काय आहे उत्तर?"
"तो मुलगा गाणे गुणगुणतो ’आंखो हि आंखो में इशारा हो गया, बैठे बैठे ’जीने’ का ’सहारा’ हो गया’" खरं तर अतीशय सोप्पे कोडे होते. पण व्रीनला हे ही सोडवता आले नाही.
"हे कसले उत्तर? का प्रश्न मूर्खपणाचा आहे. ह्यात ज्ञानाची कसोटी कुठून लागणार? गाढवपणा आहे." व्रीन चरफडून बोलू लागला.
"अहो असे कासे बोलता? ते दोघे जिन्यावर बसलेले असतात. एकमेकांकडे पहातात ’आंखो आंखो में इशारा’. आणि त्याचा सहारा म्हणजे वाळवंट हो गया." मी त्याला खुलासा करून सांगू लागलो.
"मला माहित आहे सहारा काय आहे ते. पृथ्विवरचे सगळे भूप्रदेश मला माहित आहेत. मला शिकवू नकोस. तुझ्यासारख्या मूर्ख आणि अक्कलशून्य मानवाकडून उच्च विचारक्षमतेचे प्रश्न विचारलेजाणे अशक्य आहे हे मला आधीच सुचायला पाहिजे होते. पांचट आणि बावळटसारखे उत्तर आहे हे." व्रीनचा पिवळा रंग रागाने हिरवा होऊ लागला होता.
"म्हणजे मला तुम्ही सोडून देणार नाही?" मी पुन्हा एकदा गारठलो.
"दिलेला शब्द न पाळायला मी काय तुमच्य पुढार्यांपैकी वाटलो की काय तुला?" तो चिडून दणादण पाय आपटत त्याच्या तबकडीकडे गेला. आणि काही क्षणात ती तबकडी जशी आली होती तशी अजिबात आवाज न करता अवकाशात अदृष्य झाली.
मी परत एकदा मान हलवली, स्वतःला चिमटा काढला. हा प्रसंग आपल्या बाबतीत घडला ह्यावर माझा विश्वासच बसेना. थोड्यावेळाने मी भानावर आल्यावर सुटकेचा एक दीर्घ नि:श्वास टाकला. मनोमन बन्याचे आणि अमिताभ बच्चनचे आभार मानले. अजून एक सिगरेट काढली आणि मनसोक्त झुरका मारला!!
कायतरी
कायतरी गोंधळ आहे. मी अभिप्राय दिल्याचं आठवत. पण आज आईला वाचून दाखवताना कुठे दिसत नाहीये.
तू लिहिणार म्हणजे असलच कायतरी सतरा तरी येड्यापणाचं असणार... पण नाही. हे कायच्याकय.....सत्तर येडं आहे.
मस्तच.
मस्त
मस्त लिहिलय.....
आवदल राव .............
झकास , रापचिक........
च्यायला
च्यायला सगळे प्रियांका चोपडाच्याच पाठीमागे पडलेत. येड्याकडे कुणी बघतच नाही. त्याचा अमूल्य जीव वाचला हे काय कमी आहे? नाहीतर हे परग्रहावरचे प्राणी / लोक खूप खतरनाक असतात. येड्या, कधीचा प्रकार आहे हा? वर्तमानपत्रात वाचल्याचं आठवत नाही. अजूनसुद्धा बातमी दे.
पण ही गोष्ट खरी असेल असे मला वाटत नाही. नाहीतर चांदणी चौकात किती ट्रफिक असते! कुणीच कशी तबकडी पाहिली नाही. येडा बहुतेक थापा मारत असावा.
शरद
[माना कि इस ज़मीं को न गुलजा़र कर सके
कुछ खार कम तो कर दिये, गुज़रे जिधर से हम] साहिर लुधियानवी
मला आवडली. -
मला आवडली.
- सुरुचि
मजा आली.
मजा आली. येडाकिखुळा जमलाय बर्का लेख !
मस्तच, मजा
मस्तच, मजा आली वाचताना.
सही लिहिले
सही लिहिले आहे. मजा आली
अफाट ! अचाट
अफाट ! अचाट !
माझे आईबाबा, मित्र, सहकारी, प्रियांका चोप्रा हे सगळे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले.
व्रीन चक्क लाजला (केवळ लेखनाच्या सोयीसाठी येथे पुरुषवाचक विशेषण वापरतो)
हे जबरदस्त!
"नाही! तुझ्या मेंदूचा इनिशियल स्कॅन केला मी. पण तुझा मेंदू त्या गायीच्या मेंदूपेक्षा अप्रगत आहे. त्याचा मला काहिही उपयोग नाही."
येड्यासारखा हसलो !
हा लेख मी
हा लेख मी आधी वाचला नव्हता.
अतिशय भन्नाट...
धमाल!!! मजा
धमाल!!! मजा आली, एकदम मॅडकॅप!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
येड्या
येड्या रापचीक.
idea ची कल्पना चांगली आहे..
व्वा!! ही पण
व्वा!! ही पण कथा मस्तच!!
*******************
सुमेधा पुनकर
*******************
किती
किती मजेदार आहे. वाचताना आपोआप हसू येतं .
छान आहे रे
छान आहे रे
खुपच
खुपच आवडलि
खुप हसले मि. असेच लिहित रहा
येडचापच
येडचापच गोष्ट हाय च्यामारी ....!!!!!
लई बेस !
धमाल
धमाल आहे!
विशेष करून -
"हो तर! विश्वातल्या सगळ्या ग्रहांवर ही भानगड मिळते" ही माहिती मला खूप महत्वाची वाटली.
आणि ह्या वयात मिड-टर्म प्रॉजेक्ट?" आयला! हा बराच बुद्दू दिसतो. आणि मला अप्रगत म्हणतो लेकाचा!!
तू खरोखरंच मूर्ख आहेस!" मला खरं तर राग आला होता पण पाहुणा आहे म्हणून गप्प बसलो.
पण तुझा मेंदू त्या गायीच्या मेंदूपेक्षा अप्रगत आहे. त्याचा मला काहिही उपयोग नाही."
एकूणच मजा आली.
१\२ तास हसत
१\२ तास हसत राहिलो सर्व....
pavan9_0.jpg (3.48 KB)
(No subject)
अरे जाम
अरे जाम सहि लिहिलयेस : हा हा :
नाही! तुझ्या मेंदूचा इनिशियल
नाही! तुझ्या मेंदूचा इनिशियल स्कॅन केला मी. पण तुझा मेंदू त्या गायीच्या मेंदूपेक्षा अप्रगत आहे. त्याचा मला काहिही उपयोग नाही.>>>>>>>> अशक्य हसले
एकदम मस्त लिहीलय
एकदम मस्त लिहीलय
मस्तच
मस्तच
Pages