आम्ही चालवू हा पुढे वारसा!(फोटोसहित)

Submitted by मानुषी on 17 April, 2011 - 01:38

आम्ही चालवू हा पुढे वारसा!
(प्रस्तावना: काही सुचलं की माझं लिखाण खूप दिवस चालू असतं. पण परवाच्या पेपरमधे वाचलं की दि. १८ एप्रिल हा दिवस "जागतिक वारसा दिन" आहे. मग लक्षात आलं की सध्या जे लिहितेय ते बर्‍याच प्रमाणात या जागतिक वारसा दिनाशी संबंधित आहे म्हणून आज लगोलग लिहून पूर्ण करून आज इथे आपणा सर्वांशी शेअर करावसं वाटलं! सर्वांना या "जागतिक वारसा दिना"च्या शुभेच्छा!
आणि हो........माहेर आणि सासर दोन्हीची आडनावं बदलेली {काल्पनिक}आहेत.)
दर वर्षी रामनवमीला देव्हार्‍यातल्या एका फ़ोटोफ़्रेमला, माझ्या सासूबाई फ़डक्याने साफ़सूफ़ करून ठेवायच्या. नवीन हार घालायच्या. तो फ़ोटो त्यांच्या सासूबाईंचा होता. अर्थातच माझ्या सासर्‍यांची आई आणि माझ्या आज्जेसासूबाई! धारदार नाक, मोठे मो़ठे तेजस्वी डोळे, केस घट्ट मागे वळवून घातलेला नीटनेटका अंबाडा, कपाळावर बंद्या रुपायाएवढं कुंकू, काठापदराची साडी. अगदी प्रभावी आणि करारी वाटावं असं व्यक्तिमत्व! रामनवमीलाच त्याचं देहावसान झालं होतं. त्याच दिवशी माझ्या सासूबाई एका ब्राम्हण बाईला बोलावून तिला दूध, केळं द्यायच्या आणि काही दान करायच्या.
नंतर काही वर्षांनी माझ्या सगळ्यात धाकटया(दीर नं३) जावेने, देव्हार्‍यात माणसाचा फ़ोटो असू नये, असं कुणीसं सुचवल्याने तो फ़ोटो तिथून हलविला आणि व्यवस्थित कपाटात ठेवला. नंतर एकदा माझी दिल्लीची पुतणी(२ नं दीरांची मुलगी) सालाबादप्रमाणे सुट्टीला आमच्याकडे आली असता जुने फ़ोटो पहाण्याचा सर्वांचा अत्यंत आवडीचा कार्यक्रम चालला होता. आणि अचानक या सासूबाईंच्या सासूबाईंच्या फ़ोटोवर नजर गेली आणि सर्वांनाच एकदम साक्षात्कार झाला की ही माझी दिल्लीची पुतणी त्यांच्यासारखी दिसते. तिलाही ते पटलं!
ती म्हणाली," अय्या, म्हणजे मी माझ्या पणजीसारखी दिसते! वॉव! आय कान्ट बिलीव्ह!" आणि खूप वेळ कुणीच काही बोललं नाही. मग आम्ही तीघी जावा जावा तिला "आज्जेसासूबाई" म्हणून चिडवू लागलो. पण सर्वांच्या मनात काही वेगळेच विचार चाललेले असणार. मला खात्री आहे. सगळ्यांनाच हे अद्भुतच वाटलेलं असणार!
तेच मोठे डोळे, तेच धारदार नाक! सगळ्यांनाच खूप मजा वाटली. पण मला मात्र मजा वाटण्याच्याही पलिकडंचं काहीतरी जाणवलं.
असे आपण कुणाचे तरी वंशज असतो आणि त्यांचा वारसा पुढे चालवत असतो. तीच स्वभाववैशिष्ठ्यं, तेच नाक डोळे पुढे नेत असतो. आपल्याही नकळत! आपण त्यांच्याच रक्तामांसाचे बनलेले असतो! फ़क्त अश्या काही घटनांनी झालेली त्याची जाणीव ही फ़ारच चित्तथरारक असते.
प्रत्येक माणूस काही विशिष्ठ गुणविशेष घेऊन जन्माला आलेला असतो, ज्याला शास्त्रीय भाषेत त्याला क्रोमोसोम्स किंवा गुणसूत्रं म्हणतात, तेव्हा आपण म्हणतो, हं...हा अगदी याच्यावर गेलाय, किंवा ही अगदी त्याच्यासारखी आहे.
आमच्या घरात पुढच्या पिढीतल्या तीघी मुली(एकमेकींच्या चुलत बहिणी) अगदी सारख्या स्वभावाच्या आहेत. अतिशय जिद्दी, कुठलंही काम करायला घेतलं की ते अगदी उत्तम प्रकारे पूर्ण करणार, डोक्यात सतत काही ना काही चक्रं, पुढच्या कामाचं प्लॅनिंग चालू, अथक परिश्रम करण्याची तयारी, आनंदी स्वभाव, जीवनाकडे पाहण्याची जबरदस्त पॉझिटिव्ह नजर, जिकडे जातील तिकडे यांना नेहेमी चांगलेच लोक भेटणार... अश्या काही स्वभाव विशेषांनी या तीघींचं व्यक्तिमत्व बनलेलं आहे. "त्या" सासूबाईंच्या सासूबाई तश्या असतील का..या तीघींसारख्या?...आणि जश्या फ़ोटोत दिसतात तश्या ...करारी, जिद्दी आणि कर्तबगार?
या तीघी बहिणी स्वता:चा उल्लेख काही प्रसंगांनी, कारणानी, "कुलकर्ण्यांच्या मुली" असा अगदी अभिमानाने करतात. आणि सगळ्यात गंमत म्हणजे यात त्या फ़क्त तीघी बहिणींनाच न धरता प्रत्येक वेळी त्यांच्या आत्यालाही या विशिष्ठ गटात ओढतात. तीही "कुलकर्ण्यांचीच मुलगी" आहे ना मागच्या पिढीतली! तिच्यातही वर उल्लेखलेले बरेच स्वभावविशेष आढळतात.
"आत्ता आत्या असती तर काय मजा आली असती, किंवा तुला नाही पटणार आई, पण आत्याला नक्की पटेल!, किंवा अहो बाबा आत्या अशीच वागली असती." अश्या शेर्‍यांमधून या तीघी सतत आत्यालाही आपल्या विशिष्ठ विचारसरणीच्या गटात ओढत असतात.
हे पाहिलं की या स्वभावातील, व्यक्तिमत्वातील साधर्म्याचं आश्चर्य वाटतं! अर्थातच बरेच काही फ़रकही आहेत या सर्वांच्यात!
हो...पण ते त्यांचे स्वभाव विशेष त्यांनी आपापल्या आजोळकडून आणलेले असतील..........कदाचित!
हे झालं स्वभावाविषयी! दिसण्यातल्या साधर्म्याविषयी एक उल्लेख वर केलाच आहे.
आणखी एक किस्सा आठवून मला नेहेमी गंमत वाटते.
आमच्याकडे कामाला येणार्‍या शिंदे बाई, माझ्या लेकीला "बॉस" म्हणायच्या. "गेले का बॉस हपिसात?, आज काय बॉसला सुट्टी का?" असं चालायचं!
एकदा माझ्याकडे माझी भाची आली होती. ती आणि मी हॉलमधे बसून गप्पा मारत होतो. शिंदे बाई आल्या धाडदिशी दार उघडून आत आणि पटकन म्हणाल्या, "अरे आज बॉसना सुट्टी कसं काय?" आणि लगेचच त्यांनी एकदम जीभ चावली. जरा ओशाळया झाल्या. पटकन आमच्या पुढून निघून गेल्या आणि कामाला लागल्या. नंतर भाची गेल्यावर मला म्हणतात, "काकू, मी त्येच इचार करत होते, आज बॉस घरी कसं?"
त्यांचा पुढचा सल्ला ऐकून माझी हसून पुरेवाट झाली.
"काकू, दोगींना येका घरात देऊ नका बरं का.....लई घोटाळे होत्याल बगा!"
मी हसत सुटले. मग म्हणाल्या, "काकू...मी येकदम घुसले घरात...सोफ़्यावर पाह्यलं, मनात म्हनलं...आज बॉसला सुट्टी कशाची? अन लगोलग घोटाळा लक्षात आला बगा! पन लईच सारक्या वारक्या दिसत्यात दोगी! दोगींची केसं, नाकडोळे............!"
कुणी कुणी म्हणायचं खरं....या दोघीत बरंच साम्य आहे म्हणून! तसा अवतारही सारखाच असायचा दोघींचा! केसांची कपडयांची स्टाईल, वर्ण आणि ब़र्‍याच प्रमाणात फ़ीचर्समधेही साम्य होतेच. पण आज हा अगदी कळसच झाला!
आमच्या घरी(माहेरी) माझ्या लहानपणापासून एक अगदी जुना फ़ोटो आहे, असाच एका पिशवीत इतर अनेक फ़ोटोंबरोबर पडलेला असायचा. तसा हा फ़ोटो मी लहानपणापासून बघत आलेय. तेव्हा या फ़ोटोविषयी असं वेगळं कधीच काही जाणवलं नाही. या फ़ोटोचा काळ साधारणपणे १९व्या शतकाच्या सुरवातीचा असावा. यात माझ्या आजोबांची बहीण आणि तिचे यजमान आहेत....अशी माहिती मला माझ्या आत्याकडून समजली. दोघांमधे वयात अंतर बरंच असावं. त्यातल्या मुलीची साडी नेसण्याची पद्धतही वेगळी आहे. तिने पदर घेतलेला दिसत नाही. कारण ती अल्पवयीन आहे. त्या काळी अशी पद्धत होती की मुलीचा मासिक धर्म सुरू झाल्यावर साडीचा पदर घ्यायचा. या प्रकारच्या साडीला "परवंटा" म्हणत. याच्यावरूनच "पदर येणे" हा वाक्प्रचार आला असवा. म्हणजेच त्याकाळी लग्नही मुलींचा मासिक धर्म सुरू होण्यापूर्वीच करत असत! या मुलीने दागिनेही अगदी अंगभर घातले आहेत. तिच्या यजमानांनी पगडी घातलेली आहे. हातात छत्री वगैरे दिसतेय. आणि शेजारी कोरीव काम केलेलं सागवानी लाकडाचं जे टबल आहे ते अजूनही माझ्या भावाच्या हॉलची शोभा वाढवतंय!

6x8-2.jpg
तर काही गोष्टींचं कधी तरी एकदमच महत्व जाणवायला लागतं. किंवा एखाद्या गोष्टीबद्दल एकदमच आपलेपणा किंवा स्वत्वाची भावना जाणवायला लागते. तसंच या फ़ोटोचंही झालं! आपल्या पूर्वजांविषयी खूप कुतुहल वाटायला लागते. मनात सारखी कसली तरी हुरहुर लागून रहाते, भूतकाळात डोकावून बघावंस वाटायला लागतं.
लग्न झाल्यानंतर या घरी आल्यावर का कुणास ठाऊक, मला अधून मधून त्या फ़ोटोची आठवण व्हायची आणि वाटायचं की तो फ़ोटो हरवता कामा नये. तो जतन केला पाहिजे. अगदी कब्जाच घेतला त्या फ़ोटोने माझ्या मनाचा! एकदा माहेरी जाऊन तो आणला पाहिजे. अशी त्या फ़ोटोबद्दल ओढ वाटायला लागली. माझ्या लग्नानंतर कित्येक वर्षांनी माझ्या वहिनीच्या मागे लागून तो फ़ोटो मी हस्तगत केला. फ़ोटोफ़ास्टमधे जाऊन त्याच्या एन्लार्ज्ड कॉपीज आणल्या. दोन कॉपीज वहिनीकडे सोपवल्या.....तिला जर कुणाला द्यावीशी वाटली तर...या विचाराने तिला दोन कॉपीज दिल्या. दोन मी घेतल्या. आणि मला खूप मोठा खजिना तावडीत आल्यासारखं वाटायला लागलं. अगदी आपल्या वंशाचा वारसा वगैरे! तो फ़ोटो मी फ़्रेम करून हॉलमधे लावला. आता येणारे जाणारे बरेच लोक या फ़ोटोबद्दल विचारायला लागले. कारण अगदी अ‍ॅन्टिक म्हणावा इतका तो फ़ोटो पुरातन कालातला वाटतो म्हणजे आहेच आणि अगदी लक्ष वेधून घेतो. फ़ोटोतल्या व्यक्तींच्या कपडयांवरून आणि दागिन्यांवरून पुरातन काळाची लगेच जाणीव होते.
सांगायचा मुद्दा हा की, वर उल्लेखलेल्या भाचीची आई, म्हणजे माझी चुलतबहीण आणि या जुन्या फ़ोटोतली मुलगी यांच्यातही जबरदस्त साम्य आहे. काही वेळेला अगदी नाक डोळे, रंग रूप यात काही साम्य असेलच असं नाही पण ती व्यक्तिमत्वे ओव्हरऑल काहीतरी सारखंच एक्सप्रेस करत असतात. कधी कधी डोळ्यातल्या सारख्या एक्स्प्रेशन्समुळे दोन व्यक्तीत साम्य वाटते. असंही काही वेळेला होतं.
तर मध्यंतरी एका मासिकातल्या लिखाणात अंतर्भूत करण्यासाठी हा पुरातन फ़ोटो स्कॅन करण्यासाठी इथल्या फ़ोटोफ़ास्टमधे घेऊन गेले. या फ़ोटोतल्या मुलीने घातलेले दागिने आणि कपडे इतके वेगळे आहेत की कुणाचंही लक्ष वेधलंच जातं, मग फ़ोटोफ़ास्टमधला हा माणूस कसा अपवाद असणार?
तो आता फ़ोटोग्राफ़रच्या नजरेने तो फ़ोटो न्याहाळू लागला. एकदा फ़ोटोकडे, एकदा माझ्याकडे पहात म्हणाला, "मॅडम, हा फ़ोटो तुमच्या लहानपणीचा आहे का?"
मी चकीतच! लगेच त्याची असिस्टंटही आली फ़ोटो पहायला तीही म्हणाली, "हो मॅडम, बरीचशी तुमच्याचसारखी दिसते ही मुलगी...."
"अगं पण ...नीट पहा ना तिचे कपडे, दागिने, पुरातन काळातले नाही वाटंत?...परत ब्लॅक ऍन्ड व्हाईट आहे ना हा फ़ोटो" मी लगोलग स्पष्टीकरण द्यायला लागले, पण मनातून अगदी का कोण जाणे मी शहारून गेले होते. अगदी आत काहीतरी हललं.
"हो पण, मॅडम तुमच्या लहानपणी असेल ना ब्लॅक ऍन्ड व्हाईट! आणि फ़ोटोचं म्हणाल तर काही फ़ॅन्सी ड्रेस स्पर्धेतला वगैरे असू शकतो ना!" ती मुलगी अजूनही फ़ोटो न्याहाळत होती.
आता माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले! ओह्....म्हणजे इतकी मी आणि "ती" सारख्या दिसतो! इतक्या की, त्या दुकानातल्या मुलीला आलेले सगळे शक्याशक्यतेचे प्रश्न, सगळ्या शंका, तिने फ़ोटोतली "ती" मीच आहे असं समजून परस्परच निकालात काढले. फ़ोटोग्राफ़र अजूनही फ़ोटो पहात बुचकळ्यातच होता! मग फ़ोटोतल्या व्यक्ती कोण आहेत याबद्दल त्यांना परत सगळं पुराण सांगितलं.
मी घरी आले. वाटलं हे व्यक्तिमत्वातलं साधर्म्य किती पिढया पुढे चालंत आलंय!
आणि हो...."ति"चं आणि माझंही माहेरचं आडनाव एकच की! म्हणजे ही जरी माझ्या वडिलांची आत्या असली तरी शेवटी आम्ही दोघी "देशपांडयांच्याच मुली!"
तो फ़ोटो समोर ठेऊन "तिला" न्याहाळत राहिले.............................!

गुलमोहर: 

मानुषी, एक आग्रह म्हणून आणि संबधितांची हरकत नसल्यास त्यांचेही फोटो बघायला मिळतील का ?
आमच्याकडे माझी भाची, अगदी तिच्या आत्यावर गेलीय. रंगरुप, स्वभाव सगळेच तसे.

माझ्या सासुबाई ८ बहिणी.त्यांची लग्ने झाल्यावरही त्या कुठे गावाला गेल्या तर गाडीत ,स्टेशनवर किंवा कुठेही त्यांच्यातल्या एकीलाही ओळखणारे कोणी जर भेटले तर येऊन विचारीत की तुम्ही देवधर बहीणींपेकी का? आणी स्वभावही त्यांचे सारखेच होते.अतिशय कामसू,आणी बाहेर हिंडायची हौस्.कुठेही जायचे का विचारले की साड्या झटकून जायला तयार.

मानुषी ,
दिनेशदा ना अनुमोदन.
उसुकता लागून राहिली आहे.
आमच्या घरी पण माझ्या लहानपणी आजीचा( वडिलांची आई ) फोटो लावलेला होता.
तिच्या तरुणपण चा.
फोटो ताली माझी आजी आणि माझी मोठी बहिण यांच्यात प्रचंड साम्य आहे.
फोटो बघितल्या बघितल्या सगळे जण बोलून दाखवायचे

छान लेख आहे. साडी नेसायची पद्धत हि मराठी आहे का? दोन्ही ओचे सोडलेत खाली असे दिसतेय...

कानडीत वाटते पुर्वी अशीच साधारण साडी नेसायची पद्धत आहे असे वाटते. मला नक्की आठवत नाही/माहित नाही पण माझ्या लहानपणी एक शेजारी कानडी आजी रहात, त्यांच्या लग्नाचा (१९४० का आधीचा, त्याच सांगत स्वातंत्र्यपुर्व काळात त्यांचे लगन झाले वगैरे) त्यांच्या घरातल फोटो आठवला..

मानुषी,
छान लेख आणि माहिती !
शेवटी जुनं ते सोनं म्हंटलयच ना !
जुन्या लोकांची कर्तबगारी,हिम्मत,त्यांच धाडस,वागणं हे सगळं खरचं अजब होत,जे आता नव्या पिढीला खरं वाटणं देखील मुश्कील आहे असं वाटतं .

Happy

वॉव, मानुषी, जबरी लेख आणि तो फोटोपण..पण मनातून अगदी का कोण जाणे मी शहारून गेले होते. अगदी आत काहीतरी हललं.>>>>अगदी अगदी भा पो. आवडला लेख Happy

फार भारी! असं काही कनेक्शन दिसलं की मस्त वाटतं.
फार पिढ्या कशाला? आपल्याच आई-बाबांच्या काही काही लकबी अगदी तशाच आपल्यात येतात.

एका नातेवाईकांचं उदाहरणः -
त्या काकांना चालताना थोडं खांदे झुकवुन चालायची सवय आहे. (पाडुन म्हणा.. :))
त्यांचा मुलगा (दुसरीत होता वाटतं.. ) एकदा घरी जाताना दिसला. चालत चाललेला. तोही तस्साच खांदे झुकवुन चालत होता.
आता ह्याला काय म्हणावं? Happy त्या काका/काकू ला सांगून खुप हसलेलो.

दिनेशदा म्हटले, तसं फोटो दाखवा जमल्यास.

कळत्या बुद्धीच्या पलिकडलं काही जाणवलं की हलायला होत तस वाटलं. शेवटी आपण आपल्या वंशाच्या शिडीची एक पायरीच तर असतो. Happy

दिनेश आणि सुजा पहाते फोटो टाकयला जमते ते! धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
समई मी आणि माझी आत्या यांच्यात उंचीत प्रचंड फरक आहे पण आम्ही दोघी निघालो की खूप जणांना मायलेकीच वाटायचो.
ध्वनी ही पद्धत महाराष्ट्रीयच आहे. पण त्याचं स्पष्टीकरण लेखात दिल्याप्रमाणे आहे. >>>>>>>दोन्ही ओचे सोडलेत खाली असे दिसतेय...>>>>>>>>>>नुसतं तेवढंच नाही , पदर घेतलेला नाही.
अनिल, श्यामली ,बाबु धन्यवाद.
ऋयामा धन्यवाद रे! पहाते फोटोचं!

सही. फोटो तर अफाट. अभ्यासासाठी उतरवून घेऊ का तुमची हरकत नसल्यास?

हे दिसण्याबद्दलचं म्हणजे बाबांच्या कंपनीच्या फोर्टमधल्या ऑफिसमधे त्यांची काही डॉक्युमेंटस आणायला एकदा गेले होते तर तिथल्या कुणालाच मी कोण इत्यादी सांगायची गरज पडली नाही. "डि व्हि'ज डॉटर?" असंच डिरेक्टली विचारलं सगळ्यांनी.
आणि सांगलीत गेल्यावर कोणाचे नातेवाईक सांगायची गरज पडत नाही इतके सगळे आम्ही एका छापाचे दिसतो.

अनुवांशिकतेचा वारसा असं नाही, किंचित वेगळं पण मला 'वाडा चिरेबंदी' मधलं वहिनीच्या तोंडचं वाक्य आठवलं...
धरणगावकर देशपांडेच्या घरातली मोठी सून, वहिनी दागिन्यांचा डबा उघडून आहेत नाहीत ते जुने सगळे दागिने अंगावर घालते आणि म्हणते
"खरं सांगू? असं वाटते, हे सोनं नाही नुसतं. खूप काही आणखी. वाटते, देशपांड्यांच्या घरातल्या सगळ्या बायका उभ्या आहेत माझ्या अवतीभवती कौतुकानं पहात. सगळ्यांच्या मायेचा स्पर्श आपल्याला लागून राह्यलाय असं वाटते. किती जणींनी हे घातलं, जतन केलं. कोणाकोणाचे हात, गळे ह्यांना लागले असतील."

नी >>>>>>>>>>"खरं सांगू? असं वाटते, हे सोनं नाही नुसतं. खूप काही आणखी. वाटते, देशपांड्यांच्या घरातल्या सगळ्या बायका उभ्या आहेत माझ्या अवतीभवती कौतुकानं पहात. सगळ्यांच्या मायेचा स्पर्श आपल्याला लागून राह्यलाय असं वाटते. किती जणींनी हे घातलं, जतन केलं. कोणाकोणाचे हात, गळे ह्यांना लागले असतील.">>>>>>>>> अगदी अगदी. घे गं उतरवून!
हे "वाडा चिरेबंदी" हा लेख लिहिताना सारखं आठवत होत. प्रचंड आवडीचं आहे!
धन्यवाद शैलजा! आलीस सुद्धा गटग करून?

फोटो खासच. पूर्वजांविषयी वाटणार्‍या कुतूहलाबद्दल अगदी अगदी. आणि आता लहान असलेल्या छोट्यांमध्ये आधीच्या पिढीच्या खुणा शोधणं हेही त्यात आलंच!

मस्त...

वॉव.. मानुषी.. जबरदस्त लेख लिहिलायेस्..या गोष्टी आपण ही नोटिस करत असतो पण त्यावर लिहायचे कधीच सुचले नाही..ब्राव्हो Happy
फोटो तर एकदम जबरी.. किती क्लीअर आहे..साडी नेसण्याची पद्धत,दागिने अगदी ठळक दिसतायेत..

हं ..........स्वाती याचा एक कोपरा तुटलेला होता. मुलाचा उजव्या पायातल्या बुटाचा पुढचा भाग . फोटोफास्टातल्याने तो दुरुस्त केला.

फोटो मस्त आहे.
कधी कधी चेहर्‍यात लहानपणी साम्य दिसत नाही, पण वय वाढल्यावर साम्य दिसू लागतं. लकबी तर नकळत उचलल्या जातात.. हे ट्रेस करणं खरंच थरारक असतं.. मस्त लिहिलंय Happy

मानुषी, हम्म. आता नीट बघितल्यावर समजतय.
असो, छान लेख. फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद. Happy
कधी कधी चेहर्‍यात लहानपणी साम्य दिसत नाही, पण वय वाढल्यावर साम्य दिसू लागतं. लकबी तर नकळत उचलल्या जातात.>> अगदी, अगदी

मस्तच एकदम!
माझी ताई आजोबांच्या (आईच्या वडिलांच्या) आईसारखी दिसते म्हणून तिचं नाव "प्रतिमा". आणि नवल म्हणजे, बाळ जन्मल्यावर पहिल्या-दुसर्‍या दिवशीच हसलंय हे सहसा दिसत नाही, पण ताई १ दिवसाची असतानाच आजोबांकडे बघून खूप छान हसली होती असं आई सांगते. Happy

Pages