फेक प्रोफाईल्स अन्याय निवारण समितीची स्थापना

Submitted by Kiran.. on 15 April, 2011 - 11:42

मित्रहो

आज आपण या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जमलेलो आहोत यावरूनच आजच्या सभेचं गांभीर्य लक्षात येतं. ( कोण ते म्हणतंय दहाच टाळकी दिसतात म्हणून ).
तर मंडळी नेट आणि फेक प्रोफाईल्स यांच अतूट असं नातं आहे. जसा व्हिलनशिवाय सिनेमा नाही तसं आपल्याशिवाय महाजाल नाही. ( उपमा चुकली का ?)
मंडळी
आपल्याच मुळे कित्येक संकेतस्थळांची संख्या वाढताना दिसते. आपल्याच जोरावर त्यांना जाहीराती मिळतात, लोकमान्यता मिळते, धागे प्रवाही होतात, काही जणं तर रातोरात स्टार होतात.
पण आपल्या हाती काय पडतं ?
अवहेलना, हेटाळणी, कुत्सित शेरे आणि टोमणे !
जणू काही झुरळ अंगावर पडलंय असे काही जण दचकतात. रोज ऑफिसात अफरातफरी करणारा इथं नेटवर आपल्याला नैतिकतेचे धडे देतो .
काही तर आपल्याला महारोगीच समजतात.. काहींना तर आपण म्हणजे अशारीरि अस्तित्व वाटतो.

याला कारण आपल्यात एकी नाही. आपल्यातले काही बावळट लोक हातात सायरन वाजवत बँकेवर दरोडा टाकल्यासारखे वागतात. एकामुळे सगळ्यांचंच हसं होतं.
मग आपल्याला झोडपणारे काही थ्रेडस पडतात..
फार वाईट्ट !!!

थ्रेड टाकणारा अतिशय हुषार असतो/ते. ते नाव न घेता अचूक वर्णन करून आपल्याला बावळटात जमा करत असतात आणि आपण तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात तिथं बळेच स्मायली टाकून येतो.
अरेरे ! काय ही लाचारी..

या समस्यांवर मात करण्यासाठीच आपण आज एका संघटनेची निर्मिती करत आहोत. फेक प्रोफाईल्सला आदर मिळवून देणे आणि नेटवर वावरताना घ्यायची काळजी याबाबत एका तज्ञांच्या समितीची स्थापनाही लगोलग करण्यात येत आहे. तसच सहाशे प्रोफाईल्सचा जन्मदाता या न्यायाने मी स्वतः या संघटनेचा पदसिद्ध अध्यक्ष असणार आहे. हे मान्य नसेल तर आपल्याला माझ्यापेक्षा जास्त फेकूंचा "पाठिंबा" आहे हे सप्रमाण सिद्ध करावं लागेल.

सर्व फेक प्रोफाईल्सना याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

नेटवर घ्यायच्या काही सर्वसाधारण खबरदा-या :

१. फेक प्रोफाईल आणि त्याच्या मालकाची भाषा सारखीच असू नये...( किंवा उलटे )
२. मालक अडचणीत आला असत प्रत्येक वेळी मालकाच्या बचावासाठी फेकूने जायची गरज नाही. मालकाला शहाणे होऊ द्यावे. ( नाहीतर पब्लिक लगेच ओळखता.. अच्छा , याचा बच्चा हा )
३. मालक कविता करत असेल तर फेकला ती आलीच पाहीजे असं नाही.
४. मालक तापट असेल तर फेकूने तसं असायची काय गरज ? मालकासारखे वागू नये.
५. स्त्री आयडींवर लोकांचा जास्त संशय असतो. तेव्हा कितीही मोह झाला तरीही स्त्रीलिंग टाळावे.
६. फेक प्रोफाइलला अडचणीत आणण्यासाठी काही जण भेटायला बोलावतात. अशा वेळी तिथं डमी उभा करावा.

आपल्या प्रमुख मागण्या आणि धोरणे

१. फेकूंना योग्य तो आदर देण्यात यावा
२. त्यांना गुन्हेगार समजण्यात येऊ नये.
३. सायबर क्राइमचे सर्व कायदे फेकूंना विश्वासात न घेताच करण्यात आलेले आहेत. तेव्हा ते रद्द व्हावेत म्हणून अण्णांच्या फेक कडून होणा-या उपोषणाला आपण मदत करावी.
४. डमी व इतर खर्चासाठी संकेतस्थळाकडून नियमित पगार देण्यात यावा.
५. वारंवार टोमणे मारणा-या काही दुष्ट आयडींची तक्रार करण्यासाठी दबावगट स्थापन करणे

मंडळी

ढोबळमानाने ही रूपरेषा तयार झालेली आहे. यात आपण भर घालू शकता.
आपण सर्वांनी या धाग्यावर आपल्याला काय त्रास आहे हे सविस्तर लिहावं. तसच काही ज्येष्ठ आयडींकडून आयडियाच्या कल्पना आणि टिप्स मिळाव्यात ही अपेक्षा आहे.
विशेषकरून जे आयडी अनेक वर्ष जालावर वावरूनही पब्लिकला त्यांचा संशय आलेला नाही त्यांनी त्यांचे अनुभव शेअर करावे. त्यांच्यावर स्वतंत्र जबाबदा-या टाकण्यात येतील.

चला तर मग सुरू होऊ द्या..

आपला

फेकचंददादा पवार

गुलमोहर: 

Biggrin मागे एकदा फेक आयडी घेतल्यावर मलाही असा त्रास झालेला आहे. मी तो आयडी आता वापरत नाही पण संघटनेचा आधार असेल तर पासवर्ड आठवून या लढ्यात नक्की समील होईन.

हे आंदोलन अण्णा हजारेंसारखे उपोषण करुन गांधीगिरी स्टाईलने होणार आहे की आंदोलन प्रमुखांच्या नावात "दादा" आहे म्हणुन टगेगिरी करुन होणार आहे?
आंदोलनास शुभेच्छा Happy

एका ड्युप्लिकेट आयडीला टारगेट करून कुणी काही लिहीलं तरी इतरांच्याही पोटात धस्स होतं. एखादा जायचा हार्ट अ‍ॅटॅकने.. म्हणून अशा सरसकट धोपटण्यावर बंदीसाठी काहीतरी करा..

शुभेच्छा रे. तूमच्याशिवाय मायबोलीचे काहि खरं नाही रे बाबांनो !!
तूमची प्रजा वाढो, वंश वाढो, पोस्ट्स वाढो, प्रतिसाद वाढो, टि आर पी वाढो, आणखी काय ते.. ते पण वाढो.

Proud मस्तच.

दिनेशदा, Proud

मुळात 'फेकू'ना सेकंड ग्रेड सिटिझन असल्याप्रमाणे वागवलं जातं याचा निषेध केला पाहिजे. त्यांनाही एक स्वतंत्र व्यक्तीमत्त्व आहे हे कधी स्विकारणार आपण? त्यामुळे नेटावर वावरताना त्यांची किती कुचंबणा होते याची कल्पना आहे तुम्हाला? जास्त तोंड उघडले तर ओळख पटण्याची भिती, जास्त वावरले तर पर्दाफाश होण्याची भिती... करावे काय अशा परिस्थितीत भल्या फेकूंनी? मूळ मालक करून सावरून उजळ माथ्याने मिरवतोय आणि त्याची ही प्रजा सांदीकोपर्‍यात पडून आपल्या संधीची वाट बघतायत. किती हृदयद्रावक आहे हे दृश्य!

अशाने लवकरच फेकूंच्यात बंडाची ठिणगी पडायला वेळ लागणार नाही. मी म्हणते त्यांना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत. फेकूंच्या मागण्यांना माझा पाठिंबा जाहीर करत आजच मी माझ्या २४ फेकूंचा संकल्प करत आहे.

गणू. Proud

भारीये लेख! अन् प्रतिसादही! Lol

आणि फेकू असल्याने 'असत्यनारायण' करावा काय? >> फेकूं चे कार्य अगदीच नकारात्मक पद्धतीने पाहताय कि अशी दाट शंका येतेय. Proud

आणि फेकू असल्याने 'असत्यनारायण' करावा काय? >>> Proud किंवा असत्याग्रह किंवा खुप खादाडी (उपोषणाच्या विरुध) Proud

फेकूं चे कार्य अगदीच नकारात्मक पद्धतीने पाहताय कि अशी दाट शंका येतेय. >>>नकारात्मक/ सकारात्मक इ.इ.वर्गवारीने काय दंगा होतो ते पाहिले ना? Wink

किरण्यके,

आपल्याकडून स्फुर्ती घेऊन आणि दिनेशदांच्या विनंतीचा मान ठेवून मी आजच्या मुहुर्तावर एक फेक आयडी प्रसवत आहे..... Wink

बरेच दिवस या प्रकाराचं प्रचंड कुतुहल होतं....... आता तुम्हा सर्वांना हे कसं काय जमतं बुवा (हा टोमणा मानण्याची गुस्ताखी करायला हरकत नाही Proud ) ते जरा मीही अनुभवेन म्हणतो....

वरील समितीने मला आपले म्हणावे ही नम्र विनंती....... पुरस्कृत सदस्यत्व बहाल केल्यास हिरिरीने फेक आयड्यांशी संबंधित लढ्यात भाग घेतला जाईल याची खात्री बाळगावी.

कळावे,

आपला
धूळफेक

हाय भुंगा, पहिल्या पोस्टमधेच बाद की. आता आम्हाला माहितीय, भुंगा म्हणजेच धूळफेक ते !!
वरिजिनल आयडिच्या उजव्या हाताला पण डाव्या हाताचा आयडी आणि पासवर्ड कळता कामा ने.

भुंग्याचा फेकू ओळखा अशी स्पर्धा सुरू करायची का?

'भुंग्याचा ड्युआयडी ओळखा आणि निदानानंतर ५ ड्युआयडी मोफत मिळवा. हे ड्यु नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहतील याची एक वर्षाची ग्यारंटी मिळेल. तुमचं या ड्युआयडींशीच 'वाजलं' तर ही ग्यारंटी लागू होणार नाही.'

भुंगा, इथे अन्याय निवारण समिती, आता स्थापन झालीय. अन्याय समिती तर आधीपासून कार्यरत आहे, त्यांना सगळ्यांचे फेक माहित असतात. नसल्यास तेच ठरवतात कुणाचे कोण फेक ते !!

ह्या समितीत सर्व फेकूंना आपलेला दबलेला आवाज व्यक्त करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, म्हणून मी उघडपणे माझा आयडी सांगत आहे.... आपल्या तक्रारी माझ्या पोस्ट बॉक्स मध्ये टका.... योग्य अ‍ॅक्शन घेण्याची हमी मिळेल!

दबलेल्या गटाची प्रतिनिधी
म ग रे सा Biggrin

भुंगा, इथे अन्याय निवारण समिती, आता स्थापन झालीय. अन्याय समिती तर आधीपासून कार्यरत आहे, त्यांना सगळ्यांचे फेक माहित असतात. नसल्यास तेच ठरवतात कुणाचे कोण फेक ते !!

>>>>>>>

दिनेशदा, तुम्हाला अ‍ॅडमिनना "अन्याय समिती" म्हणायचय का....... लब्बाड.... Rofl Wink

Pages