* दोन जुने मित्र *

Submitted by शाबुत on 13 April, 2011 - 00:24

दोन मित्र

एका लहान गावात दोन जुने मित्र राहत होते. एकाचं नाव सखा, दुसरा भिका. त्याचं दोघांचं वय एवढं होतं की आता त्यांची मुलं लग्नाला आलेली होती. एक दिवस नेहमीप्रमाने सखा भिकाच्या घरी गेला, तेव्हा भिकानं त्याचं स्वागत केलं, नंतर ते अंगणात बाजीवर बसुन इकडच्या-तिकडच्या गप्पा मारायला लागले. थोड्या वेळाने भिकाची पोरगी दोघांसाठी चहाचे कप घेऊन आली, सखानं तिच्याकडे पाहीलं तेव्हा भिका म्हणाला की या वर्षी मला हिचं लग्न करायचं आहे, तुझ्या ओळखीत एखादा मुलगा असेल तर सांग?. सखाच्या डोक्यात वेगळाच विचार आला, तो भिकाला सरळ म्हणाला की "मीच तुझ्या मुलीशी लग्न करतो." आधी भिकाला गंमत वाटली पण नंतर सखा काही केल्या माघार घेयाला तयार होईना, म्हणुन त्या दोन जिवलग मित्रांचं जोराचं भांडण जुपलं.

संध्याकाळ झाली होती, गावातली माणसं शेतात काम करुन थकुन घरी आराम करत होती, तरी या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकुन ते भिकाच्या अंगणात जमा झाले. सखा काही केल्या माघार घेयाला तयार होत नव्हता, तो अजुनही भिकाच्या मुलीशी लग्न करायचं म्हणत होता. सखाची बायको, लग्नाच्या वयाची दोन मुलं, एक मुलगी तिथं आली होती. तेही त्याला समजावत होते की तुम्हाला वेड तर लागलं नाही, कारण तुम्ही तसचं बोलत आहात. भिकाचा मोठा मुलगा सखाला मारायला धावुन आला, कारण गावातल्याच एका म्हाताऱ्यासोबत बहीणीचं लग्न लावुन द्यायचं, ही गोष्ट त्यालाच काय तर साऱ्या गावात कोणालाही मान्य होण्यासारखी नव्ह्ती. उगाच मारामारी नको म्हणुन गावातल्या लोकांनी त्याला आवरलं आणि म्हटलं " या सख्याला वेड लागलं असेल, उद्या त्याला तालुक्याच्या चांगल्या दवाखान्यात घेऊन जावु." या गोंधळाच्या वातावरणातही सखाला ते बोलणं ऐकु गेलं तेव्हा तो गावातल्या लोकांना म्हणाला, "उद्या सकाळी मीच दाखवतो तुम्हाला मला काय झालं आहे ते!"

गावात या झालेल्या घटनेला सगळ्यांनीच गंमतीनं घेतलं, कारण याआधी त्या गावात असं काही घडलं नव्हतं. त्या रात्री सखाही बायको-पोरांनच्या शिव्या खात झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच सखा घरातुन पसार झालेला दिसला, हे पाहुन त्याची बायको घरातच रडायला लागली, पोरं बाहेर गल्लीत जावुन लोकांना विचारु लागले, "तुम्ही आमच्या बापाला रात्री घरातुन गावाबाहेर निघुन जातांना पाहीलं काय? आता ते घरात नाहीत." सगळ्यांनीच नकारार्थी मान हलवली तेव्हाच एक पोरगा भिकाच्या घराकडुन धावत आला आणि सख्याच्या पोराला म्हणाला, "तुझा बाप भिकाच्या घरापुढे उपोषणाला बसला आहे. भिकानं त्याच्या पोरीसोबत लग्न लावुन द्यायचं मान्य केल्याशिवाय अन्नाचा घासच काय तर पाण्याचा घोटही तो घशाखाली जावु देणार नाही. असंच काहीतरी तो बडबड करत आहे."

सख्याच्या घरातली सगळी माणसं त्याला पाहायला धावत आली, तेव्हा त्यांना सख्या भिक्याच्या अंगणात एक पोतं टाकुण बसलेला दिसला. आताही त्याचा बायकोनं सख्याला सांगितलं की, "तुम्ही असं काय करत आहात, तुमच्या अशा वागण्यानं गावातले लोक मला नावं ठेवतील, काही दिवसांनी ते आपल्या घराला गावाबाहेर हाकलुन देतील. आता तुम्ही असं काही करु नका, इथुन ऊठा आताच सरळ घरी चला, नंतर मी तुम्हाला घरात पाय ठेऊ देणार नाही!" बायकोच एवढं बोलणं ऐकुणही सख्यावर कवडीचाही फरक पडला नाही, उलट तोच बायकोला म्हणाला, "आता तुच बघ मी तुला कशी सवत आणतो ते!"

पहील्या दिवशाचं सख्याचं उपोषण साऱ्या गावात टिंगलेचा विषय झाला. लोक त्या दोघांच्या मैत्रीला हसायला लागले.

दुसऱ्या दिवशी गावातले लोक म्हणायला लागले, "आपण काहीतरी करायला पाहीजे, नाहीतर या सख्याला झोडपुन काढायला पाहीजे, कारण अशानं आपल्या गावाची बदनामी होईल. यानंतर दुसऱ्या गावाचा कोणीही पोरगा आपल्या गावातल्या पोरीसोबत लग्न करायला तयार होणार नाही."

गावाचा निर्णय म्हटला की वेळ हा लागणारचं. काहीतरी करायचं म्हणता-म्हणता तिसरा दिवस उगवला तरी सखा जागचा हलला नाही. गावातलं कोणीतरी तालुक्याच्या ठिकाणाहुन माहीती घेऊन आलं की आपल्याला सख्याच्या अंगाला हातही लावता येणार नाही, कारण तो उपोषणाला बसला आहे. हे एकुण सारं गावं हलबल झालं.

तिसऱ्या दिवसापासुन सख्याचं वजन कमी होऊ लागलं होतं, चेहऱ्यावर सुरुकुत्या पडायला लागल्या. संध्याकाळ झाली तेव्हा पोत्यावर बसायचंही त्राण सख्याच्या अंगात राहलं नव्हतं तेव्हा तो पोत्यावरच आडवा झाला पण काही उपोषण सोडायला तयार नव्हता. सख्याची बायको-पोरं दिवसभर त्याच्याजवळ रडत होती तरी सखा काही केल्या ऐकत नव्हता. भिकाला पुढच्या संकटाची जाणिव झाली, कारण पोरगी त्याची होती, तिच्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न होता. त्यालाच यातुन काहीतरी मार्ग काढणं गरजेचं झालं होतं. गावातले लोक खुप काही करायचं असं म्हणत होते, पण नक्की काय करायचं यावर त्यांच्यात एकमत होत नव्हतं.

सख्याच्या उपोषणाचा सहावा दिवस गावात एकदम मत परीवर्तनाची लाट घेऊन आला, कारण सखा मरायला टेकला होता. आता सारं गाव बोलायला लागलं की "प्रेम-प्रेम म्हणतात ते हेच आहे, या सख्याचं भिक्याच्या मुलीवर खरचं प्रेम आहे, नाहीतर आतापर्यत आपण खोट्याच प्रेमाच्या गोष्टी करत होतो. यांच्या प्रेमाला कोणतही बंधण नाही, म्हणुनच तो त्या पोरीसाठी आपल्या जिवनाला मुकायला तयार झाला आहे. आता आपण भिकाला उद्याच त्याच्या पोरीचं लग्न सख्यासोबत लावुन द्यायाला भाग पाडु." गावाने अशा पवित्रा घेतल्याने भिक्याला काय करावं हेच कळत नव्ह्तं, कारण गावाच्या निर्णयापुढे त्याला झुकावं लागणार होतं. गावातले लोक आता बोलायला लागले होते की भिकानं जर ही गोष्ट मान्य केली नाही तर आता त्यालाच या गावात राहु द्यायचं नाही.

भिका मोठ्या संकटात सापडला होता, शेवटचाच दिवस त्याच्या हातात होता. उद्या भिक्याच्या पोरीची इच्छा नसली तरी गावतले लोक त्या दोघांचं लग्न लावुन देणार होते. भिकाला अचानक शेजारच्या गावातिल ज्ञानी माणसाची आठवण झाली, त्या माणसाने आजवर खुप ग्रथांचा अभ्यास केला होता. भिका धावतच शेजारच्या गावाच्या रस्त्याने निघाला. तो त्या ज्ञानी माणसाच्या घरी पोहचला तेव्हा तो दुपारचं जेवण करुन पहुडलाच होता. भिकानं एका दमात त्याला सगळी हकीकत सांगितली, शेवटी तो म्हणाला की यातुन तुम्हीच माझ्या मुलीला वाचवा. यावर तो ज्ञानी माणुस म्हणाला की, "ते अगदी सोपं आहे, त्यासाठी तुला फक्त शंभर रुपये खर्च करावे लागतील."
"बस एवढेच!" असं भिका बोलला, कारण पोरीच्या आयुष्यासमोर एवढी रक्कम किरकोड होती. आता लवकर उपाय सांगा, कारण आजची संध्याकाळचं माझ्याजवळ आहे.

"आता तु असं कर, तुझ्या गावाच्या वेशीजवळ एका झोपडीत ती म्हातारी राहतेना, तिला तिच्या नवऱ्याने लग्नानंतर महीन्याभरात टाकुन दिलं होतं, नंतर तिच्यासोबत कोणीही लग्न केलं नाही. आता वयानुसार तिच्या तोंडातले सगळे दात पडले आहेत, डोक्यावरचे केस पांढरे झाले आहेत. आता तिला खऱ्या आधाराची गरज आहे, कारण तिचं या जगात कोणी नाही. ती म्हातारी तुझ्या लक्षात आली?" तो ज्ञानी माणुस बोलला त्यावर भिकानं होकारार्थी मान हलवली.

"तिला शंभर रुपये द्यायचे, तिला म्हणायचं की आज संध्याकाळी जेव्हा गावातले सगळे माणसं घरी असतील तेव्हा तिनं तुझ्या अंगणात येयाचं, त्या सख्यासमोर छाती बदळुन जोरात ओरडायला लावायचं की, सख्या तुझ्यामुळेच तर मला नवऱ्यानं टाकुन दिलं, कारण लग्न झाल्यानंतर त्यानं मला तुझ्याकडे पाहतांना पकडलं होतं. तु मला दररोज येता-जाता दिसावा म्हणुन मी वेशीजवळ झोपडी बांधुन राहले, पण मनातली ही गोष्ट माझ्या ओठावर कधीच आली नाही, पण आज सगळ्या गावासमोर सांगते, आजपर्यत मी तुझ्यासाठीच झुरत होते म्हणुन बघ माझी कशी अवस्था झाली. या पोरीच्या आधी तु माझ्याशी लग्न कर. नवऱ्यानं मला टाकुन दिलं तेव्हा हि जन्मालाही आली नव्हती. आता काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही."

भिका गावात आला तेव्हा सरळ त्या वेशीजवळच्या म्हातारीच्या झोपडीत शिरला. आधी तिच्या हातावर शंभराची एक नोट टेकवली, तिला सगळी गोष्ट समजावुन सांगितली. ती म्हातारी शंभर रुपायासाठी एवढं करायला एका पायावर तयार झाली. भिका निश्चिंत मनानं आपल्या घरी गेला.

संध्याकाळी उद्याचा सख्याच्या लग्नाचा कार्यक्रम कसा करायचा, हे ठरवायला गावातली काही कर्ति माणसं भिकाच्या अंगणात जमा झाली. जेव्हा भिका आरामात घरात जेवत होता, तेव्हा ठरल्याप्रमाणे ती म्हातारी वेशिपासुनच ओरडत निघाली. रस्त्यावरुन कोण ओरडत जात आहे, हे पाहायला घरात बसलेली बाया-माणसं रस्त्यावर आली. म्हातारी हंगामा करत भिकाच्या अंगणात आली, तेव्हा तिथं सखा कसातरी उठुन लोकांचं बोलणं ऐकत पोत्यावर बसलेला होता. त्या लोकांच्या बोलण्यावरुण सखाला आपला विजय नक्की वाटत होता, कारण ते लोक त्याच्या लग्नाचंच बोलत होते.

आता ही म्हातारी मोठ्याने ओरडत सख्यासमोर आली, हा काय प्रकार आहे हे सख्याला समजायला मार्ग नव्हता. तिथं जमलेली मंडळीलाही काही कळायला मार्ग नव्हता. म्हातारी एकसारखी रडत-ओरडत होती, आपली छाती सख्यासमोर दोन्ही हातांनी ठोकत होती. थोड्याच वेळात सगळं गाव तिथं जमा झालं, तेव्हा म्हातारीच्या अंगात आणखीच जोर आला. हा काय प्रकार आहे हे गावातली ती कर्ती माणसं म्हातारीला विचारायला लागली, जी आधी सख्याच्या लग्नाचं ठरवायला तिथं बसलेली होती.

म्हातारीनं आपलं रडणं-ओरडणं थांबवलं, नंतर ती सांगायला लागली.
"खुप वर्षाची गोष्ट आहे, एक दिवस मी या सख्यावर पाहताक्षणी माझा जिव ओवाळुन टाकला होता, तरी यानं कधी माझी पर्वा केली नाही. माझं याच्यावर एवढं प्रेम होतं की मी लग्नानंतर माझ्या नवऱ्याच्या घरी एक महीनाच राहली. आजही हा सखा जेव्हा वेशितुन येतो-जातो तेव्हा त्याकडे भिरभिरत्या नजरेनं पाहत असते. या गावातल्या लोकांना मी सांगते की मी आताच या सख्याशी माझं लग्न व्हावं म्हणुन आताच इथे उपोषणाला बसते." एवढं बोलुन ती म्हातारी सख्याच्या शेजारी उपोषणाला बसली.

भिका घरातुन बाहेर आला, तो अंगणाच्या एका कोपऱ्यात उभा राहुन सख्याची फजीती पाहु लागला. म्हातारी मधेच अवतरल्याने त्याला काय बोलावं हेही सुचत नव्हतं, म्हणुन तो गप्प बसला. गावातल्या लोकांनी उद्याच होणारं सख्याचं लग्न मोडलं. जशी रात्र होऊ लागली तशी तिथची गर्दी कमी व्हायाला लागली, शेवटी सख्या आणि म्हातारी दोघेच उरले. आता गावात सगळे झोपले असल्याची सख्यानं खात्री करुन घेतली. म्हातारी त्याच्या शेजारी चांगली घोरत झोपली होती, तिचं शंभर रुपायाचं काम झालं होतं तरी तिच्या झोपडीपेक्षा या अंगणात हवेशीर वाटत होतं.

सख्या आपल्या पोत्यावरुन तड्कन उठला, सहा दिवसाचा उपाशी असतांही गावाबाहेर जोरत पळत सुटला.

--- नंतर सखा सहा महीन्यानंतर गावात आला तेव्हा मागचं सगळं विसरुन गेल्याचं लोकांना सांगत होता.

**********

गुलमोहर: 

Happy

छान

मस्त कथा आहे..
आधी वाटले काही रुपक वगैरे निघेन.. राजकारणातला काही संदर्भ.. पण तसे नाही निघाले.. की तसे काही आहे यात?