"पिंट्या, भाड्या बिरमुट्यायवडी पुरगी घागर घिऊन इतीया आणि तूला उचलना हुय?"
उन्हाळ्याच्या सुट्टीला माझ्या घरी गेलो की हे वाक्य ऐकावं लागणार हे ठरलेलच असायचं. आम्ही चार भावंडं. मी थोरला, माझ्या माग बया आणि जिजा ह्या दोन बहिणी आणि शेंड्यावर पोपटराव हे बंधुराज. बारसं घालताना आईनं चांगली वामन, ज्योती, शुभांगी, महेश अशी नावं ठेवलेली. पण म्हातारीनं घोळ केलेला. म्हातारी म्हणजे वडिलांची आई. समाजाचे भान ठेऊन तिला आज्जी म्हणायला पाहिजे होतं पण ते घडलं नाही. आई नेहमी सांगायची 'पिंट्या, म्हातारीला देवळातन बुलवुन आन' 'बया, म्हातारी कुटं गिली बग' 'जिजीला म्हातारीकड दिवन यं' मग आम्हीपण तिला 'म्हातारे, बापुनी बुलीवलया' असचं म्हणायचो. त्याचा बदला म्हणुनच तिनं आमची अशी नावं पाडली असावीत. पहिलीत नाव घालताना माझं नाव वामन घालयचं सोडून हनुमंत घालत होती. हेडमास्तरनी समजाऊन सांगितल तेव्हा नु ची शेपटी गाळायला तयार झाली आणि शाळेला हणमंत मिळाला. आई रानात गेलेली तेवढ्यात म्हातारीने हा कारभार उरकलेला. घरी आल्यावर तिला कळालं तेव्हा सासु सुनेत तुंबळ दंगल झाली. माझ्या नावारून मी पाचवी सहावीत जाईपर्यंत ह्यांच्या वादविवाद स्पर्धा व्हायच्या. साधारण मसुदा असा असायचा...
"वामन घालायचं सोडून हाणमंत कुणी घालायला सांगितल्यालं?"
"मग त्यला काय हुतया? चांगला मंगळवारचा जलामलाय म्हणून घातलं"
"बेस केलसा (पुटपुट्पुटपुट)"
"कुरकुराय काय झालया"
"म्या बामणाला इचारून पाळण्यात ठेवल्यालं नाव सुडून कशाला ह्यो उद्योग केलासा मग?"
"कुंच्या बामणाला इच्यारल्यालंस त्येला इचारुन यजा परत हाणमा काय वायट हाय का म्हणून"
"आता कशाला जातीया..."
शेवटी आता बदलणे शक्य नाही तर कशाला चर्चा म्हणून आई माघार घ्यायची. पण बाकीच्या तिघांची नावं घालताना तिनं म्हातारीला मधे पडू दिलं नाही. मला वामन काय नी हनुमंत काय काही फरक पडला नाही भांडणं लागल्यावर किडकी मिडकी पोरं हुप्प हुप्प म्हणायची पण जवळ यायला टरकायची. तेव्हा मी पण छाती काढून हुप्प हुप्प करायचो.
ज्योतीचं नावं म्हातारीन बया ठेवलं घरी बाहेर सगळे तिला बयाच म्हणायचे, शुभांगीची जिजा झाली आणि महेशचा पोपट्या झाला. जिजा आणि पोपट आमच्या दोघांपेक्षा लहान त्यामुळं सगळा लाड त्यांचा आणि सगळी कामं मी आणि बयानं करायची. खरं तर बयानच करायची. माझं आजोळ गावाजवळच होतं आणि आईच्या आईला मुलगा नसल्यानं मला दुसरीत असतानाच आजोळी ठेवलेला. आज्जीच्या लाडानं आमचा लाडोबा झालेला त्यामुळं कामाच्या नावानं चांगभलच होतं.
असा सुट्टीत आलो की मग माझी दमछाक व्हायची. लहान असून बयाला ती कळायची.
"र्हावदे दादा, मी भरते पाणी. तू नुसता सुबतीला चल" असं म्हणून ती भल्या मोठ्या घागरी घेऊन झार्याकडं चालू लागायची.
आळीतली सगळीच माणसं बयाचं कौतूक करायची. जराशी उजळ असती तर मी तिला सावळी म्हणालो असतो पण सावळी नव्हतीच ती. रंगानं काळी, चार भावंडत उजव दिसणारं नाक, सतत भिरभिरणारे, बोलघेवडे डोळे, हसायला लागली की आई म्हणायची "घर पाड्शील की बया". तिला कसली भिती नव्हती. सरावलेल्या बायकाही घाबरायच्या अशा उंच भिंती सारवताना हलक्या अंगान शिडीवर चढायची आणि चटक्यात काम उरकून खाली यायची. वयाला न शोभणारा तो समंजसपणा आणि कष्टाळू वृत्ती बघून आईला तिचा खूप अभिमान वाटायचा. पण तिचा धाडसी स्वभावं बघून भितीही वाटायची. खोडक्या गोळा करायला शिवारभर फिरताना इच्चु-सापाची भिती, झर्याच्या भवती तर कायम साप फिरत असायचे. बया आईचा फार मोठा आधार होती. आई रानात गेली की घरात एकही काम पडायचं नाही. सगळं उरकून बया शाळेला जायची. माघारी आली की जिजा आणि पोपट्याला खेळवायची.
घरापासून शंभरेक फुटावर असणारा ओढा पावसाळ्यात जसा रात्रंदिवस खळखळत असायचा तशी बया नेहमी एकतर हसत खिदळत असायची नाहीतर राबत असायची. उन्हाळ्याची सुट्टी संपेपर्यंत मी नुसता सगळ्यांकडून तिचं कौतूक ऐकत असायचो आणि माझ्या आळशीपणाबद्दल टोमणे खात रहायचो... मग दरवर्षी एक दिवस यायचा... वळवाचा... लख्ख पडलेल्या उन्हावर अंधारी सावली पसरायची आणि मनभर पसरलेल्या रखरखीच्या जागी गार हवा भरून जायची. अंगणात वाळत घातलेल्या खुरवड्या उडून थोड्या पत्र्यावर तर थोड्या रस्त्यावर जायच्या... म्हातारी जिजा आणि पोपट्याला घेऊन आत पळतानाच " खुरुड्या गेल्या बगे पोरे पळ..." म्हणून ओरडायची. त्या गोळा करायला मी आणि बया धावयचो पण वार्याच्या झापाट्यान कोलमडतानाच डोळ्यात धूळ जायची आणि घाबरून मी परत घरात पळायचो... बया मात्र मिळतील तेवढ्या खुरवड्या गोळा करायची आणि मगच घरात यायची. सोसाट्याचा वारा भिती दाखवत असायचा एवढ्यात आभाळ वाजू लागायचं... आता आपल्यावर वीज पडणारं या भितीनं मी स्वयपाकघरात जाऊन बसायचो... तेवढ्यात आई घरात यायची... बया उंबर्यावर उभा राहून ओरडत असायची "दादा भायर य की... आता गारा पडतिल्या बघ... गोळा करायच्या आणि सरबत करायचा." आवाज देत आभाळ धरणीला भिडायचं... भला मोठा थेंब पत्र्याचा ढोल करून वाजवत रहायचा... त्या तालावर बया टाळ्या वाजवत बेभान व्हायची... "बया, भायर जाव नगं बर का सांगतीया... यकादी गार बसली डोक्यात मजी कळल मग" आई ओरडायची पण वळवाच्या पावसाशी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखी बया त्याच्याशी समाधिस्त झालेली असायची. मग आभाळ बयाच्या सरबताची सोय करायचं बर्फाचा एकेक खडा अंगणात पडू लागायचा... हातात पातेलं घेऊन बया पडत्या पावसात तडातड उडणार्या गारा गोळा करायला धावायची... "आता काय म्हणू ह्या पुरीला" म्हणत आई कौतुकानं तिच्याकडं बघत रहायची आणि मी मोठ्या धाडसानं आईच्या मागे बसून बयाला 'हिकड आली बग... ए ती बग मुट्टी गार हाय... दगडामाग चार हायत्या बग' असा प्रोत्साहन देत रहायचो. जमतील तेवढ्या गारा पातेल्यात घेऊन बया आत यायची... चिंब भिजलेली असताना गारेगार सरबत करायच्या तयारीला लागायची... आई म्हणायची "त्यात जरा पानी वत मजी लगीच इताळतील्या आणि सरबत पण लय हुईल" पण बयाला गारांच्या पाण्याचाच सरबत हवा असायचा... गारा वितळेपर्यंत वाट बघायची, लिंबू आणायचा कुठला? मग त्यात साखर घालायची जरा मीठ घालायचं की झाला सरबत तयार... दोन दोन घोट सगळ्यांना मिळायचा. बयाच्या कष्टाची कमाई... सरबत पिताना कित्ती मज्जा वाटायची... सरबत पिऊन होईपर्यंत बयाच्या कपाळावर दोनतीन टेंगूळ आलेले असायचे. मग तिला कळायचं की आपल्याला गारानी चांगलच झोडपलय. तिचे टेंगूळ बघून जिजा खदखदून हसायची तशी "सरबत पेताना हासलीस का?" म्हणून बया तिला चिमटा काढायची. वळीव शांत व्हायचा तशी बयाही एकटक रित्या आभाळाकडं बघत बसायची...
उन्हाळ्याची वाट बघत मी आजोळी वर्ष काढायचो. आणि वळवाची वाट बघत आम्ही उन्हाळा काढायचो. कधी एकवेळा पडायचा तर कधी खूप वेळा भेटायचा... आठवीचा उन्हाळा म्हातारी मेल्याच्या दु:खात गेला. नववीची वार्षिक परिक्षा संपली आणि मला गावाची ओढ लागली... पण दरवर्षीसारखे वडील मला न्यायला आले नाहीत.
"बापू कसं काय आलं न्हायती न्ह्याला?" मी आज्जीला विचारलं.
"यंदा उशीरा जायाचं... कामं हायती त्यासनी"
"पर मग कदी जायाचं?"
"सांगावा आला की सांगते तुला... जा खेळायला"
मला चैन पडत नव्हता. खेळात लक्ष लागत नव्हतं. रात्री झोपही लागेना...
"वन्सं, काय झालं व मंगीच्या पुरीला?" शेजारजी वच्ची काकू आज्जीला विचारत होती.
मी जागाच होतो.
"भाजलीया... दुपारची कालवण गरम करायला गीली आणि स्टो पिटीवताना भाजली"
आज्जीचा आवाज कापरा होता... ती रडतच होती... माझ्या लक्षात आलं, बया आजारी आहे. बयाला भाजलय...
"पर लय न्हाय न्हवं झाल्यालं..."
"धा हजार गेलं. पावन्यानं रान घाण ठेवलया, म्हस इकली तरी आजून दवाखाना चालूच हाय... क्रुष्णा हास्पिटलात ठिवलीया"
"काय बाय त्या मंगीच नशीब तरी... दोन वर्सात लग्नाला इल पुरगी...आणि ही काय मदीच..."
वच्ची काकू हळहळली आणि आज्जी हुंदके देऊन रडायला लागली...
दुसर्या दिवशी आज्जीला न सांगता घराभायर पडलो. दोस्ताची सायकल घेतली आणि थेट घरी गेलो. बापू शिरडी आणि दोन करडं घेऊन निघालेले... आई दारात उभी होती. मला बघीतलं आणि बापूनी तोंड फिरवून डोळ्याला हात लावला... आईन पळत येऊन मला जवळ घेतलं... तिचं रडण बघून मला भिती वाटायला लागली...
"बापू कुटं निगाल्याती?"
"बाजारला. शिरडी इकून दवाखान्यात पैसं भरायचं हायती"
"मग मी बी जातो. मला बयाला बगायचं हाय"
"नगं, परवा सोडणार हायती तिला. तवा बग तिला. आता हाय चांगली."
"मग मला सांगितल का न्हाय?"
"काय करू सांगून? भाजलय तिला, डॉक्टरन सांगितलय सारख कुणाला बुलवू नगा"
डोळे पुसत बापू जवळ आले.
"पिंट्या, चांगली झालीया आता ती, परवा घरी आणायचं हाय म्हणून तर शेरडं इकतुया... मी यतो जावन तू घरी थांब"
दोन दिवसात रडून रडून डोळ्याचं पानी आटून गेलं.
"बोलाय लागलिया चांगली आता" बापुनी सांगितलं तसे सगळ्यांचेच चेहरे उजळले. पोपट्याला मांडीवर घेऊन बसलेल्या आईन जागेवरूनच देवाला हात जोडले.
"कधी आणायची घरी?" आईन विचारलं.
"उद्या सकाळी न्ह्या म्हणलाय डाक्टर"
"बेस झालं... बरी हुदे मजी झालं चांगली.."
संध्याकाळीच बापू एक चुलतभावाला घेऊन कराडला दवाखान्यात गेले. दुसर्या दिवशी सकाळपासून मी गावाबाहेर येऊन त्यांची वाट बघत बसलो... दुपार टळली... चार वाजत आले... चारची एसटी गावात गेली... एसटीत बापूंसोबत गेलेला काका दिसला. बया आली म्हणून मी एसटीच्या मागं पळत सुटलो... काका एकटाच होता.
"बया आणि बापू?"
गळ्यातल्या टावेलानं डोळे पुसत त्यान मला छातीशी धरला.
"त्यासनी सा वाजतील्या घरी याला... चल घरला"
"नगो मी वाट बगतो फाट्यावर.."
"आरं कशाला वाट बगतुयास?..."
त्याच्या डोळ्याची धार थांबत नव्हती... मी खुळ्यासारखा त्याच्याकडं बघत होतो. आळितली माणसं जवळ आली....
"काय झालं रं?"
"गिली बिचारी..."
सगळ्यांचे चेहरे उतरले... एकजण पळत घरी गेला. थोड्याच वेळात आईचा हंबरडा कानावर पडला आणि हातपाय तुटल्यासारखा मी लुळा होऊन कोसळलो... रखरखणार्या उन्हावर गार काळी सावली पसरायला लागली... वारा भिती दाखवायला लागला.. आभाळ वाजायला लागलं... कुणीतरी मला उचलून घरी आणलं... भल्या मोठ्या थेंबानी पत्र्याचा ढोल केलेला... गारा तडातड उडू लागल्या आणि "वळीव आलाय गं बया.... गारा यचायला यत न्हाईस का... वळीव आलाय बया..." म्हणत आई वेड्यासारखी अंगणात धावली. मी तिला आत आणायला अंगणात धावलो... गारांनी अंगावर वार केले... "नुसत्या गारांच्या पाण्याचा सरबत करायचा..." बया कानात कुजबुजून गेली आणि आईला सावरायचं सोडून मी अंगावर गारा झेलत तसाच उभा राहिलो... लोकांनी आईला आत नेलं.
"पिंट्या, थोरला हायसं. तूच असा रडत बसलास तर त्यासनी कुणी आदार द्याचा?"
हळू हळू वळीव शांत झाला... आणि वळीव थांबता थांबता हॉस्पिटलची गाडी दारात आली... पांढर्या कापडात बांधलेली बया... तिला पाहिलं आणि आईचा आवाज बंद झाला. बापू भिंतीला कपाळ लाऊन हमसून हमसून रडत होते. प्रत्येकजण डोळे पुसत त्याना समजावत होता... मी घरातला मोठा होतो... मी आता रडणार नव्हतो... जवळ जाऊन तिला बघितलं... "वळीव कोसळून गेला बया... कुणी गारा यचल्या न्हाईत" न बोलता तिला एवढाच निरोप दिला पण तिला माहिती असल्यासारखी मोकळ्या झालेल्या आभाळाकड एकटक बघत ती शांत झाली होती... मी रडलो नाही. तिचे सारे विधी पार पडेपर्यंत... उन्हाळा संपेपर्यंत... वळीव शांत होईपर्यंत... आता वळीव आला की गारा वेचाव्याश्या वाटतात... वळवात भिजणारी पोर दिसली की तिला गारांचा गारेगार सरबत मागावा वाटतो...
"बया, काल वळीव येऊन गेला... दादानं गारा वेचल्या पण सरबत जमला नाही गं...."
अप्रतिम कथा! खूपच आत भिडणारी!
अप्रतिम कथा! खूपच आत भिडणारी! पण जर ही सत्यकथा असेल तर............काही नाही,काहीच नाही.
ह बा अप्रतिम लिखान. सलाम
ह बा अप्रतिम लिखान. सलाम तुझ्या लेखनशैलीला

माझ्या आवडत्या १० त
अप्रतिम कथा, खुप खुप सुरेख
अप्रतिम कथा, खुप खुप सुरेख लिहिली आहे. वाचताना अक्षर कधी धुसर दिसायला लागल कळलच नाही
हमसाहमशी रडले मी. खुपच
हमसाहमशी रडले मी. खुपच ह्रूदयस्पर्शी
अप्रतीम !!
अप्रतीम !!
अप्रतिम. शब्दच नाही उरले आता
अप्रतिम. शब्दच नाही उरले आता काही बोलायला..
अशक्य.. डोळ्याला धार आणि
अशक्य.. डोळ्याला धार आणि आठवणींचा वळीव.. __/\__
निशब्द काय लिहू ? कथा का
निशब्द
काय लिहू ?
कथा का सत्य कथा ?
ह.बा. छान मांडलय्स.
ह.बा. छान मांडलय्स.
भारी
अरेरे, एवढ्या गुणी मुलीचे असे
अरेरे, एवढ्या गुणी मुलीचे असे अकाली निधन चटका लावून गेले. (सत्यकथा कि काल्पनिक ? - काल्पनिकच असूदे )
तुमच्या लेखनशैलीला सलाम....वाचकाच्या मनाचा पूर्ण कब्जाच घेते.
ह्यापुढच्या प्रत्येक वळीवाला
ह्यापुढच्या प्रत्येक वळीवाला बया आठवणार
ओघवती व सहज ... बयेच जाण
ओघवती व सहज ... बयेच जाण अनपेक्षीत ...
ह.बा. अगदी दिलसे भारी !
ह.बा.
अगदी दिलसे भारी !
.
.
अजुन काहीच नाही. फक्त निवडक
अजुन काहीच नाही.
फक्त निवडक दहात शामिल....................
निशब्द
निशब्द.. डोळे पाणावले बाबा..
निशब्द.. डोळे पाणावले बाबा..
नि:शब्द ...! (दहात नोंद
नि:शब्द ...!
(दहात नोंद घेतली).
नि:शब्द!! लेखनशैलीबद्दल
नि:शब्द!!
लेखनशैलीबद्दल अभिनंदन!
वर म्हटलं तसं वळिवाबरोबर बया
वर म्हटलं तसं वळिवाबरोबर बया आठवणार. अगदी कायम. आणि गारा पडल्यावर तिने केलेलं सरबत. मी बयाच्या आठवणीसाठी एकदा तरी गारांचं सरबत करुन बघीन, फ्रीज मधे वर्षभर बर्फ असला तरी.
पाणावलेल्या डोळ्यांनी खरच
पाणावलेल्या डोळ्यांनी खरच प्रतिसाद देता येत नाहि.
जीवाला चटका लावणार लिवलीत की हो.
सर्वांचा खूप आभारी
सर्वांचा खूप आभारी आहे!!!!
कथेबद्दलची गूड न्युज :
सदर कथा मायबोलीवरील चिनुक्स यांना आवडली व त्यानी ती एका सुप्रसिध्द नियतकालीकाच्या संपादिकांना पाठवली. त्या ही कथा त्यांच्या नियतकालिकात छापणार आहेत. तसा त्यांचा मेलही मला मिळाला. व पुढे लिखाण करण्याविषयी बोलण्यासाठी त्यानी मला भेटायलाही बोलावले आहे. ही संधी देण्याबद्दल चिनुक्स यांचा मी खूप खूप आभारी आहे.
अरे वा. अभिनंदन हबा.
अरे वा. अभिनंदन हबा. अश्यातल्या माबोवरच्या काही मोजक्या अप्रितिम कथांपैकी एक कथा आहे ही. नेहेमी लक्षात राहिल अशी.
हबा...मनापासुन अभिनंदन रे!!
हबा...मनापासुन अभिनंदन रे!! कथेला न्याय मिळाला! तुझी बया सर्वांपर्यंत पोचेल बघ....!
ह.बा अभिनंदन .. तुझ्या
ह.बा अभिनंदन ..
तुझ्या लेखणातल्या प्रवासाला शुभेच्छा !!!
हबा अभिनंदन! आणि भविष्यातही
हबा अभिनंदन!
आणि भविष्यातही आम्हाला असेच चांगले लेखन वाचायला दे.
मनापासुन अभिनंदन हबा !! आणि
मनापासुन अभिनंदन हबा !!
आणि भविष्यातही आम्हाला असेच चांगले लेखन वाचायला दे>>>>>गजाननला अनुमोदन.
डोळे भरुन आले. कथाच असावी असं
डोळे भरुन आले. कथाच असावी असं मनापासुन वाटले.
ह.बा. अभिनंदन मित्रा. असंच
ह.बा. अभिनंदन मित्रा. असंच लिहीता रहा.
हबा, अभिनंदन! कथा खरोखरच
हबा, अभिनंदन! कथा खरोखरच सुरेख आहे. असेच लिहिता रहा.
Pages