तळटीप: आज तळाला टाकायची टिपण्णी मी सुरुवातीलाच टाकतोय, तेंव्हा वाचकांनी ती "तळटीप" मानून वाचावी.
सर्व उपस्थित मंडळी: डॉक, भुंगा, स्मितहास्य, कणखर, किश्या, मंदार जोशी आणि आशुचँप
टांगारू: सखीराधा, आर्या, गिरिकंद, प्रसादपंत आणि समस्त पुणेरी गगोकर्स.
सर्व फोटो- सौजन्यः स्मितहास्य (अमोघ शिंगोर्णीकर)
****************************************************
वृत्तांत टाकायला प्रचंड वेळ काढल्याबद्दल क्षमस्व. इतका वेळ लागला की तेवढ्यात मंदार जोशींच्या गोठ्यातली गाय व्याली, सर्व गगोकरांनी खरवसाचा खरपूस समाचार घेतला. कैलासरावांना "नंदीबैल" ही पदवी मिळाली आणि मग हाच कैलासाधिपती मानचिन्हप्राप्त डॉक्टर झाला, एका नंदीबैलाला माणसांचा सर्वोत्कृष्ट डॉक्टर असल्याचे प्रशस्तीपत्रक मिळाल्याची घटना जगात प्रथमच घडली
त्यामुळे समस्त गायी म्हशी नंदीबैलावर लट्टू झाल्यात. आणि त्याचमुळे कैलासराव सध्या अज्ञातवासात गेले आहेत.
बेफिकिरना साहित्य पुरस्कार मिळाला आणि त्यांना अत्यानंदाने हास्यवायू झाला. तोच पसरवत सध्या ते गुलमोहरात "मोहरलेत". पुन्हा एकदा पाडवा साजरा झाला आणि आणखी एका नव्या वर्षाची भर आयुष्यात पडली. विश्वचषक भारताला मिळाला, अण्णांनी दूध सोडले आणि सरकारच्या तोंडचे पाणी पळाले.
एवढे होऊनही वृत्तांत लिहायचा काही योग जुळेना. अखेर तो दिवस आज उजाडलाच.
****************************************************
गटग करून बरेच दिवस लोटले होते आणि आता सगळ्यांनाच पुन्हा गटगचे डोहाळे
लागले होते.
तश्यातच तरही गझलच्या धाग्याने सगळ्या गझलप्रेमींना मायबोलीवर आकृष्ट केलेलं. त्यामुळे गुलमोहरात गझलांची टाकसाळच लागली होती. कधीकधी नवीन लेखनाचं पान उघडलं की फक्त आणि फक्त गझलाच दिसत, गझलप्रेमी असूनही कधीकधी मलाही याचा वीट यायचा
बघावं तिकडे गझलाच गझला.
पण या उपक्रमाने खर्या अर्थाने बर्याच जाणकारांची दाद मिळवली. नव्याने गझल करणारे बरेच जण एकत्र आले.
यासंबंधित उपक्रम गेली काही वर्षे श्री. भूषण कटककर (बेफिकीर) आणि श्री. अजय जोशी हे यशस्वीरित्या राबवत होतेच, त्याचं नाव आहे "गझल सहयोग - गझल मुशायरा". या सर्व पार्श्वभूमीवर असाच एक गझलेचा चक्री मुशायरा पुण्यात १९ मार्च २०११ ला आयोजित करण्यात आला. शिवाय बेफिकीर यांच्या दोन कादंबर्यांचं प्रकाशनही त्याच दिवशी करायचे ठरले. प्रकाशक होते श्री. अ.अ. जोशी. वरचा दोघांचा उल्लेख वाचून हे दोघे म्हणजे "जय आणि वीरू" की काय अशी पुसटशी शंका लोकांच्या मनात येईलही, आता बेफिकीर उंचीमुळे "जय" वाटतीलही पण अजयजी चेहर्यावरून "वीरू" नाही तर "पापभीरू" वाटतात. प्रचंड शांत व्यक्तिमत्व. असो. 
मुशायरा म्हणजे नक्की काय ही एक उत्सुकता होतीच, शिवाय सगळ्यांना पुन्हा भेटण्याचा एक नामी योग जुळून आला होता. अर्थात गेल्या काही अनुभवांवरून हे असं भेटण्याचं खूळ बहुधा जास्त मुंबईकरांमधेच असावं कारण मुंबईकरच प्लॅन ठरवून पुण्यात सगळ्यांना जाऊन भेटत आहेत आणि पुणेकर (म्हणजे गगोकर्स तरी) मात्र गावातल्या गावात "टांगारू" होणेच पसंत करतायत असं एकंदर चित्र.
पण यावेळी मुशायरा हे मुख्य आकर्षण होतं......... अर्थात तिथे काय "बिडी जलायले" वर बिपाशा येऊन नाचणार नव्हती किंवा मुटेजींच्या गावातलं पोरगं येऊन बिपाशाला लुगडं देणार नव्हते. 
पण आकर्षण कशाचे असावं यावर काही कुठल्याही अॅडमिनचा अंकुश नाहीच.
मुंबईतून डॉक्टर (कैलास गायकवाड) मुशायर्यात सहभागी होणार होते आणि आम्ही फक्त त्यांचे हितचिंतक म्हणून जाणार होतो. किंवा सोप्या भाषेत ड्रायव्हर. 
यालाच म्हणतात "गाड्याबरोबर नळ्याची यात्रा" 
सगळा प्लॅन ठरला. मी डॉक्टर आणि स्मितहास्य मुंबईहून फिक्स होतो. प्रसादपंतांनी अचानक परिक्षा द्यायचं खूळ डोक्यात घेतल्याने ते आधीच टांग मारून सातार्यात रवाना झाले. दुपारी सगळ्या गगोकर्सनी भेटायचं आणि मग संध्याकाळी ५ वाजता कार्यक्रमाला जायचं. तिथे कोण येणार आणि कोण नाही ही वैयक्तिक मुभा होतीच. माझ्याबरोबर साबा, साबु मंडळी असल्याने मी फक्त डॉकना घेऊ शकत होतो गाडीत.
आदल्या दिवशी स्मितहास्यने गगोवर आपली टांगारू होण्याची शक्यता सांगितली होतीच. आता पुणेकर्स आपापल्या (म्हणजे वैयक्तिक, सामुहिक नव्हे
) सोयीनुसारच भेटणार होते. त्यातही आपल्या घराजवळ असलेलेच हॉटेल असावं असा छुपा अजेंडा प्लॅन ठरवताना लक्षात येत होताच. 
ठरल्याप्रमाणे (इथे सालाबादप्रमाणे असं वाचलत तरी चालेल, कारण कॅलेंडरवर वर्षं अशीच बदलतील, गटग अशीच होत राहतील आणि नेहमीच फक्त आणि फक्त मुंबईकरच पुण्यात पेट्रोल जाळून येत राहतील.) पुणेकर्स फक्त फोटोत पोझ द्यायला..... कारण त्याला आपल्या खिशातले पैसे नाही पडत, कॅमेरा पण मुंबईकराचाच असतो
तर असो. तुर्तास मूळ विषयाकडे येऊया.
सकाळी ८ वाजता घरून निघालो आणि साधारण ९ वाजता डॉक्टरना नेरूळला पिक अप केलं. आता माझे साबा साबु आणि डॉक्टर यांच्यात मस्त गप्पा रंगल्या. हे डॉक्टर आहेत म्हटल्यावर सासूबाईंनी आपली कुठली कुठली औषधं दाखवून घेतली आणि डॉकनी पण आपल्या पेशाला जागत (न जागून सांगतात कोणाला
) सगळी सविस्तर माहिती दिली. सर्व आवश्यक माहिती फुकटात मिळाल्यावर खरे "कोब्रा" असल्याचा कोण आनंद माझ्या सासूबाईंच्या चेहर्यावर झळकत होता. अस्सल सदाशिव पेठी हास्य. 
हेच ते डॉक्टर.
बोलता बोलता डॉक्टर हे मराठी भाषेतही डॉक्टरेट आहेत हे कळल्यावर तर सासुबाई आणखीच खूष. आपला जावई कोणाकोणाबरोबर भटकत असतो याचा शंकायुक्त प्रश्न एव्हाना गळून पडला होता आणि किती मोठ्या लोकांबरोबर फिरतो हा
अश्या विचारांनी त्यांना भरून आलं असेल. थिसिसचा विषय हा जुन्या विविध मराठी भाषा आणि त्यांचे परस्पर संबंध असा काहिसा आहे हे कळल्यावर आता मला वाटलं की , सवयीप्रमाणे सासूबाई डॉकना "म्हणा हो वारली भाषा" असं फर्मान काढणार की कॉय, पण डॉकनी आधीच वारली, आगरी अश्या काही भाषा धडाधड सासुबाईंच्या धडावर (आय मिन तोंडावर)
फेकल्याने त्या "स्टॅच्यू" दिल्यासारख्या झाल्या काहीवेळ.
मला आणि सासरेबुवांना "ही कायम स्टॅच्य्यु मोड मधे राहिली तर कित्ती सुखकर" असे एकत्रच वाटून गेले........ "खयाल टकराना" म्हणतात ते यालाच बहुतेक 
साधारण ११ वाजता आम्ही कोथरूडला टच. डॉकना माझ्या सासरी नेणं हे ओघाने आलंच. किश्या, बेफीकीर, अजयजी यांचे फोन अधेमधे आलेले होतेच. थोडं चहापान करुन निरोप समारंभ, घर फिरवून आणणं (फिरवून आणणं अश्यासाठी की, मुंबईतल्या माणसाला पुण्यातली प्रशस्त बाल्कनी असलेली घरं म्हणजे फिरवून आणल्यासारखीच वाटतात). या एका बाबतीत पुणेकर बाजी मारून जातात भौ.....
म्हणजे अगदी हमखास डायलॉग टकावा त्यांनी....... "जहां आपकी बेडरूम खतम होती है वहां हमारा उंबरठा शूरू होता है जानी......" 
किश्या एव्हाना आमची वाट बघत "किनारा"पाशी उभा होता. तिथे पोचून किश्या भेटला तर गाडीत बसताना अरे हा माझा "रूममेट प्रमोद" आहे असं म्हणून एका गृहस्थाला त्याने आत घेतला.... किश्याचा रूममेट आणि गळ्यात "कॅननचा डमरू" घेऊन गटगला????????? काही टोटल लागेना..... 
मग स्मिहाने कशी टांग दिली यावर विषय सुरू झाला, तर हा पठ्या काल मी लिहिलेले सगळे संवाद तोंडपाठ केल्यासारखे म्हणून दाखवतोय....... मी विचारलं तुला काय रे माहित मी काय बोललो स्मितहास्यला??? तर म्हणतो मी गेस केलं...... यापुर्वी स्मितहास्यला पाहिला नव्हता, पण आता शंका यायला लागली.
मग मी मुळावरच घाव घातला. प्रमोद तुझं गाव कुठलं रे???? हा म्हणतो पुणे...... पुण्यात कुठे राहतोस???? तर म्हणतो डेक्कन........
च्या मारी..... घर डेक्कनमधे, आणि हा राहतो रूममेट म्हणून किश्याबरोबर पौड रोडवर. कसं शक्य आहे??? गाडी चालवता चालवता चक्रं फिरत होती आणि तेवढ्यात किश्या फिदीफिदी हसायला लागला.
हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून "स्मितहास्य" होता. त्याचं सर्वात जास्त कौतुक. कारण गझलेची आवड नाही तरी फक्त आणि फक्त सगळ्यांना भेटायला हा लाल डब्यात धक्के खात सकाळी सकाळी ठाण्याहून आला होता. तिथे त्याला फटकावणे शक्य नव्हते कारण दिवसभराचे फोटो हाच काढणार होता..
"सुसरबाई तुझी पाठ मऊ" 
मग मंदार जोशींचा कॉल. भेटायचं कुठल्या हॉटेलात आणि पोचायचं कसं यावर चर्चा. पुण्यात किती वर्षं आहे हा माहित नाही पण याच्या पेक्षा पुण्यातले रस्ते मला जास्त माहिती आहेत. मग त्याने वहिनीं कडे (मंद्याची सौ. म्हणजे माहिती देण्याबाबत, मंद्या एक आणि वहिनी सौ के बराबर
) फोन दिला आणि फायनली आम्ही "हॉटेल मनालीला" जमायचं ठरवले. एक एक करत आता सगळा गगो कोरम फुल्ल झाला. टांगारूची नावे सेपरेट देण्यात आलेली आहेत, तरी कृपया वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा 
भुंगा, डॉक, आशुचँप, मंदार जोशी, किश्या उर्फ किशोर करंजकर, स्मितहास्य उर्फ अमोघ शिंगोर्णीकर, कणखर उर्फ विजय पाटील असे सगळे जमलो आणि गप्पाटप्पा आणि खाण्यावर यथेच्च ताव मारण्यात आला. विशेष म्हणजे किश्याच्या सांगण्यावरून इतर कोणी स्त्री पात्रं जोडीला नसल्याने ऑर्डर देताना ती उणीव भरून काढण्यात आली. मग मॉकटेलपासून ते मुख्य मेनूपर्यंत अनुक्रमे मेरी, नर्गिस, मुमताझ अश्या नावाची यादी सिलेक्ट केली गेली......... 
यावर कळस म्हणून मग आशुच्या आग्रहास्तव सुजाताची मस्तानी
चवीने ढोसली. सर्वात जास्त तृप्तीचे ढेकर जर कोणी दिले असतील तर ते सडाफटिंग किश्यानेच.
वर म्हणाला तृप्तीच्या वाटणीचे दोन बाकी ठेवलेत, ते डिनरनंतर 
तिथून आरामाकरीता आशुच्या बंगल्यावर गेलो. तिथे स्मितहास्य आणि आशु यांचे फोटोसेशन जमले. मॉडेल (बकरे) अर्थातच आम्ही सगळे. दोन जाडसर बाहुले डॉक आणि कणखर डायरेक्ट झोपाळ्यावर विराजमान झाले. चेहर्यावर माहेरी आल्याचे भाव आणि आपापली तुंदिलतनू सांभाळत गपाटप्पा मारत खुशाल (खरं तर खुशालचेंडू म्हणायला हवं ) रेलले होते.
थ्री ईडियट्स : भुंगा, किश्या आणि आशुचँप
पावणेपाचला बेफिकिरांचा फोन आला आणि सगळे भानावर आले. अरे कार्यक्रमाला आलोय, जरा प्रकाशनाला तरी वेळेवर जाऊया नाहीतर डायरेक्ट मुशायर्याला गेलो तर बेफिकीर वैतागतील, इति कणखर. तरी "तुम्ही लवकर याल अशी अपेक्षा होती" असा धमकीवजा संदेश आलाच. पोचेपर्यंत कार्यक्रम सुरू झाला होता. गर्दीवरून इतरही काही मायबोलीकर भेटतील याची खात्री होती. काही जण आधीच बघून हसत होते, बहुधा त्यांनी आमचा आयडी ओळखला होता. आता हे म्हणजे अट्टल गुन्हेगाराला ओळखल्यासारखं होतं..... "तूच ना रे तो भुंगा" ... ह्म्म्म्म्म्म्म्म्म 
प्रकाशन सोहळ्याला सुरुवात झाली होती. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. मीनाताई कुर्लेकर आणि सुनिताताई जोगळेकर उपस्थित होत्या. व्यासपीठावर बेफीकीर, त्यांची मावशी, मीनाताई, सुनीताताई आणि अजयजी होते. मीनाताई या वेश्यांना शिक्षण देणे, कायद्याचे ज्ञान देणे, वैद्यकिय सेवा उपलब्ध करू देणे आणि तिथेच मुलांसाठी पाळणाघर चालवणे असे वेश्यावस्तीत जाऊन समाजकार्य करतात. सुनिताताई ह्या वेश्यांच्या मुलांसाठी शाळा चालवतात. सर्वांच्या उपस्थितीत श्री. भूषण कटककर (बेफिकीर) यांच्या "सोलापूर सेक्स स्कँडल - पर्दाफाश" आणि "बुधवार पेठ - एक वास्तव" या कादंबर्यांचे प्रकाशन पार पडले. आपल्या छोटेखानी भाषणात मीनाताई आणि सुनिताताई यांनी वेश्याव्यवसायात ओढल्या गेलेल्या (मग स्वेच्छेने असो वा बळजबरीने) स्त्रीयांना समाजात सामावून घ्या, त्यांना नाही म्हणून त्यांच्या परतीचे मार्ग बंद करून पुन्हा त्याच खाईत त्यांना लोटू नका असे नम्र आवाहन केले. थोडक्यात त्यांनी मांडलेली त्यांची वेदना भयंकर होती.
कादंबरीच्या विषयाबद्दल बोलताना त्यांनी भूषणजींबरोबरच्या त्यांच्या ऑफिसातील भेटींचे प्रसंग सांगितले. त्यांचे त्यांच्या आईवर असलेले निस्सीम प्रेम मीनाताईंनाही जाणवले होतेच. त्या हयात नाहीत म्हणूनच भूषणजींच्या मावशी या समारंभाला व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होत्या. मग झालेल्या आपल्या छोटेखानी भाषणात भुषणजींनी मायबोलीकरांचा उल्लेख केला, त्यांच्याच साक्षीने ऑनलाईन या कथा लिहिल्या गेल्या याचाही उल्लेख आला. मुख्य म्हणजे अत्यंत प्रांजळपणे त्यांनी आपण या कथा वेश्यांच्या वेदना, त्यांचे जग वगैरे मांडायच्या उदात्त हेतूने लिहिल्या नव्हत्या हे मान्य केले. ते दाखवणे हा एक हेतू होताच पण उभे केलेले त्यांचे हे जग प्रत्यक्ष त्या जगात न फिरकता, निव्वळ मिळणार्या माहितीवर केलेलं आहे हे सांगितले. प्रकाशक स्वतः श्री अजयजी जोशी उपस्थित होतेच.
डावीकडूनः बेफिकीर यांची मावशी, मीनाताई, सुनीताताई आणि अजयजी जोशी
आता यानंतरचा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे अर्थातच....... "अल्पोपहार" 
सर्वजण अल्पोपहार घेत असताना मायबोलीकरांच्या आपापसात ओळखी झाल्या. सुशांत भल्या पहाटे सोलापूरला जाऊन तिथून थेट कार्यक्रमाला आला होता. महेश (जपान रिटर्न :स्मित:) आणि निळूभाऊ होतेच. उत्तम गझला करणारे श्री. निशिकांतजी आवर्जून आले होते कार्यक्रमाला. प्रकाशन समारंभ संपता संपता हणमंतराव शिंदे (हबा) ही अवतरलेच. या सगळ्यात "निळूभाऊ" हा कंप्लीट सरप्राईज पॅकेज होता.
मला तरी नावावरून निळूभाऊ हा घारूअण्णा आणि लिंबूटिंबू यांचा कुंभमेळ्यात हरवलेला छोटा भाऊ वाटायचा.....
हो ना हो, इन तीनो आयडी का परस्पर संबंध कूछ तो है
हीच अपेक्षा आणिही एका दोघांना होती. आय्डीवरून वयस्क वाटणारा हा निळूभाऊ उर्फ "स्वप्निल" आय्टी अभियंता आहे आणि अंगाने थोराड दिसला तरी वयाने फारच लहान आहे. बाकी वागायला गडी एकदन ब्येस बघा. पुन्हा हॅकिंगच्या क्षेत्रात मास्टर. (निळूभाऊ आता भरपूर कॉल्स येणार बघ तुला
)
इकडे आता कणखर आणि डॉक आपल्या पहिल्यावहिल्या मुशायर्याच्या तयारीला लागले. पहिलटकरणीचा कोण आनंद चेहर्यावरून ओसंडून वाहात होता.... आज गझला प्रसवणार होते ना 
निळूभाऊं नी इतरांचा ताबा घेऊन सगळ्या धुरांड्यांना हॉलसमोरच्या भिंतीजवळ गोळा केले. पॅसिव स्मोकिंग चालतं ना मग चल असे सांगून मलाही जोडीला घेतले.
तेंव्हाच मला सुचलेल्या ह्या ओळी:
शिलगावली तुला अन, मी पेटलो नव्याने..........
शिलगावली तुला अन, मी पेटलो नव्याने.......
"माचिस" मागण्याला........ आले "फुके" थव्याने...

अनौपचारिक "चक्रम मुशायरा" संपवून आम्ही सुरू झालेल्या "चक्री मुशायर्याकडे" वळलो.
व्यासपीठावर बेफिकीर, डॉ. कैलास गायकवाड, कणखर (विजय पाटील) , अरूण कटारे, अनंत ढवळे, सारंग भणगे आणि अजयजी जोशी बसले होते.
एकापाठोपाठ एक सगळे आता आपापल्या गझला ऐकवणार होते. काही मुरलेले काही नवे असा सगळा संच जमला होता. सादरीकरणात विशेष छाप पाडली ती कणखरने. त्याचे हे काही शेर दाद मिळवून गेले.
बनावाला तुझ्या बिल्कूल मी बधणार नाही
डिवच तू पाहिजे तितके, कधी चिडणार नाही
तुला सांगेन मी केव्हातरी माझी कहाणी
अता दु:खात इतके बोलणे जमणार नाही
शिवाय,
ठरून येते, चुकून येते, बरेच काही
मनात माझ्या कुठून येते बरेच काही?
ही गझल पण लक्ष्यवेधी होती.
बेफिकिरांनी आपल्या पोतडीतून खास खास शेर काढलेच.
"छोट्या छोट्या तक्रारी" त्यांच्या तोंडून ऐकताना सौ. बेफिकीर पण दिलखुलास दाद देत होत्या.
पालखीत पादुका, जिवंत लोक चालतात, हाल हाल पाहुनी कमाल वाटते
पांडुरंग, माउली, तुका मिळून एकजात नाद लावतात यात चाल वाटते
आमचा गुलाल लाल हिंदवी रुपातला, तुझा गुलाल वेगळाच पाकधार्जिणा
फक्त दंगलीत मात्र आमच्याकडील वा तुझ्याकडील रक्त लाल लाल वाटते
आजवर पुण्यात शांतताच नांदली, जगात आमचे शहर कुणास माहिती नसे
स्फोट जाहला, अनेक लोक संपले, अता पुण्यात राहणे कसे विशाल वाटते
ही गझल मात्र क्लासच होती.......खल्लास.
मग अजयजींच्या काही गझला,
टाळलेला आजही निष्णात कोणी
धुमसतो अद्याप माझ्या आत कोणी
माहिती होती जगाला गोष्ट सारी
बोलले नाही तरी जोरात कोणी
अनंत ढवळेंच्या गझलाही सुरेखच.
पिके वाळलेली ,उभी खिन्न शेते;
स्मशानाहुनी भासती खिन्न शेते.
मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा
माझ्यावरती गतकाळाचा ताबा बहुधा
मी उसनवारी करुन जो आणला
एक दिवशी धीर तो ही संपला
या गझला विशेष दाद मिळवून गेल्या.
सारंग भणगे आणि अरूण कटारे यांच्याही काही गझला झाल्या.
मग आपले डॉक त्यांनीही आपली पोतडी उघडली. आज चक्क औषधांच्य ऐवजी गझला होत्या.
एक ओठी एक पोटी जाणल्यागत वाटते
हात ते फैलावणे आता न स्वागत वाटते
वाटतो जरी प्रसन्न मी वरुन,
दु:ख साचलेय आत भरभरुन
आणि मग एक फक्कड शेर आला. त्याचे संदर्भ उपस्थितांनी वेगवेगळे लावल्याने तो अगदीच हझलिश शेर झाला.
जीवन ज्याचे सारे,पेल्यात जमा आहे
जिवंत असुनी ही तो,मेल्यात जमा आहे.
यावर डॉकसहित सगळेच प्रचंड हसत होते. पुन्हा एकदा दिलखुलास दाद देण्यात सौ. बेफिकीर आघाडीवरच होत्या
कार्यक्रमाला माबोकरांव्यतिरिक्त इतरही दर्दी लोक होतेच. सन्माननीय श्री. म.भा. चव्हाण (ज्येष्ठ गझलकार) आले होते. त्यांनी पहिल्या रांगेत बसून सर्व गझलकारांना भरभरून दाद दिली.
साधारण ८ वाजायच्या सुमारास कार्यक्रम संपला. सर्वांचे हाय हॅल्लो होऊन थोडी महत्वाची चर्चा करून सगळ्यांना निघेपर्यंत ९ वाजलेच. बाहेर पडता पडता बेफिकीरजींनी डिनरला जॉईन होण्याचे आमंत्रण दिले होतेच. पण डॉक्टरना घरी पोचणे आवश्यक होते म्हणून हबा बरोबर ते निघाले. सभ्य लोकांच्या भाषेत आम्ही याला "कल्टी देणे" म्हणतो
मी, विदिपा आणि स्मिहा रात्री किश्याच्या रूमवर राहायचा ठराव केला होता. पहाटे उठून निघायचे असे ठरले.
डावीकडून: भुंगा, डॉक, विदिपा, हबा (बाह्या सरसावून), निळूभाऊ आणि किश्या
मुशायर्यात शेर ऐकले होते आणि आता "सव्वाशेर" ऐकायला मिळणार होते. म्हणजे पावशेर पोटात टाकून जे ऐकवले जातात ते "सव्वाशेर" ही आपली माझी भाबडी व्याख्या 
त्याही महौलचा आस्वाद घेऊन उरलीसुरली गगो ब्रिगेड किश्याच्या घरात स्थिरावली.
स्मितहास्य काही क्षणातच निद्राधीन झाला. मी आणि विदिपा मात्र रात्री २.३० पर्यंत किश्याबरोबर गप्पा मारत होतो. किश्याच्या एकंदर कथा, त्याचे अद्वितिय प्रताप ऐकून आपले अस्तीत्व हे यःकश्चित आहे असे मला आणि विदिपाला वाटून गेले. "काय केलं काय आपण???" हा प्रश्न आम्ही एकमेकांना विचारत किश्याचे "सचित्र" किस्से ऐकून बधीर होत होतो. मग थोडासा आमच्या वयाचे भान राखून जरा मनोविश्लेषणाचे डोसही किश्याला पाजण्यात आले. तूर्तास याबद्दल एवढंच.
नाहीतर किश्या उचकायचा बिचारा. या निमित्ताने किश्याच्याच भाषेत सांगायचे तर "या रे माझ्या रूमवर राहायला, तुम्ही जर आलात तर मला पण जरा मोठे होता येईल" ह्या त्याच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्याला "मोठा" केला
पण म्हणजे नक्की काय यावर अजूनही आम्ही संशोधनच करतोय.
पहाटे जाताना लोणावळ्यात फोटो काढू असे सांगणारा स्मितहास्य डाराडूर होता सकाळी. साधारण ७ वाजता आम्ही पूणे सोडले आणि सुसाट निघालो. मधे चहापाण्याचा एक हॉल्ट आणि ठीक ९ वाजता स्मितहास्यला कांजूरमार्गला उतरवला. रंगपंचमी होती. मला नेहमीप्रमाणे माझ्या ग्रूपबरोबर खेळायची होतीच. स्मिहा पण मुंबईभर फोटो काढत फिरणार होता. स्मितहास्य हा खरोखर फोटोग्राफिला वाहून घेतलेला कलंदर माणूस आहे. (खरं तर मुलगा म्हणावा एवढाच दिसतो तो, पण ३ वर्षांची मुलगी आहे म्हटल्यावर मुलगा कसा म्हणायचा
) फोटोग्राफी त्याचे पॅशन आहे. त्याला पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा.
हा स्मितहास्य
करेक्ट ९.३० ला मी घरी टच. कालचे सगळे मनात साठवून आजच्या रंगपंचमीला मी सज्ज.
माझी "जया" घरी वाट बघत बसलेली आणि मनात "रेखा" होतीच.
आल्या आल्या माझा गेट अप चेंज केला, "अमिताभच्या गेट अपमध्ये रंगपंचमी खेळायला माझ्या "जया" आणि मुलीला घेऊन बाहेर पडलो. गाणं मनात गुणगुणत नाही अशी कधी वेळच येत नाही, तेंव्हा एकच गाणं सारखं मनात येत होतं.......
रंग बरसे ......... भीगे चुनरवाली........ रंग बरसे.......... होली है.........!!!!!


अजयजी, ग्रूपमधे असणारे सगळे
अजयजी,
ग्रूपमधे असणारे सगळे ग्रूप फोटोत आहेतच.....
शिवाय, मुशायर्यातील गझलकारही फोटोत आहेत. त्यांचाही ग्रूप स्पष्ट दिसतोच आहे.
फक्त, दोन आयोजक गझलकार दोन टोकाला का बसले होते, त्याचे उत्तर आता मिळतय

सुंदर व्रुत्तांत , त्यावरील
सुंदर व्रुत्तांत , त्यावरील प्रतिक्रियांच्या शेवटी लागलेले वेगळे वळण मनाला
त्रासदायक वाटले म्हणुन.
ह्या वादामुळे एकंदर मराठी गझल आणी आपण दोघेही करीत असलेले विविध कार्यक्रम,
पर्यायाने रसिकांचे नुकसान होउ नये असे अगदी कळकळीने विनवतो.
गझल आवड्ते, पण तांत्रिक बाबी वगैरे माहीत नाहीत अशा एका सामान्य व्यक्तीला
जे वाटते ते लिहीले. चु भु द्या घा.
त्यात मी दोघांचीही नावे सांगत
त्यात मी दोघांचीही नावे सांगत होतो. मात्र तो कार्यक्रम नंतर होऊ शकला नाही हे खरे.
आता तुम्ही त्यावर मालकी हक्क दाखविण्याचा प्रयत्न करीत असाल तर दाखवा. मला काही घेणे देणे नाही. इतिहास तर बदलणार नाही. पण तुमची इच्छा असेल तर 'गझल परिचय' हे नाव यापुढे तुम्हासच बहाल.
तसेच 'गझल सहयोग तर्फे गझल मुशायरा' असा कार्यक्रमही आपण करीत होतो. तरी तुम्हाला माझ्याशिवाय कार्यक्रम करायचा झाल्यास कृपया ही दोन नावे तरी वापरू नयेत ही विनंती.>>
हे काय आता नवीन? हल्ली रोज सकाळी उठले की एका नवीन मुद्यावर युद्ध दिसू लागले आहे. कुणीही कुठलीही नावे वापरा राव! आपण काय सुरेश भट आहोत का मीर? आपण पहिलीतल्या मुलांसारखे मधल्या सुट्टीत रुमालपाणी खेळणारे यमककार आहोत! कशावरूनही वाद घालण्यापेक्षा कन्स्ट्रक्टिव्ह लेखन केलेले बरे! आधी थांबणार होतो लिहायचे पण अनेक वाचकांचा काहीतरी भयंकर गैरसमज होऊ नये म्हणून आता असे ठरवले आहे की मुद्दा संपेपर्यंत लिहिणारच! गझल सहयोग काय, गझल परिचय काय, ही काही रजिस्टर्ड झालेली नावे आहेत नाहीत. तुम्ही वापरा नाहीतर नका वापरू. बहाल कसली करणार कुणी कुणाला!
==============================================================
त्यावरील प्रतिक्रियांच्या शेवटी लागलेले वेगळे वळण मनाला
त्रासदायक वाटले म्हणुन.
ह्या वादामुळे एकंदर मराठी गझल आणी आपण दोघेही करीत असलेले विविध कार्यक्रम,
पर्यायाने रसिकांचे नुकसान होउ नये असे अगदी कळकळीने विनवतो.
गझल आवड्ते, पण तांत्रिक बाबी वगैरे माहीत नाहीत अशा एका सामान्य व्यक्तीला
जे वाटते ते लिहीले. चु भु द्या घा.>>>
विप्रा,
१. मला मराठी गझलेच्या प्रगतीविषयी काहीही आस्था नाही. तसेच ती माझी जबाबदारी नाही व ती जबाबदारी पेलण्याची माझी क्षमताही नाही. मला आस्था केवळ माझ्या आणि माझ्याच प्रगतीची व प्रसिद्धीची आहे.
२. मराठी गझलेसाठी आम्ही दोघे करत असलेले कार्यक्रम किंवा उपक्रम हे चांगलेच आहेत. त्यात नावाजलेले गझलकार उपस्थिती लावून गेलेले आहेत. पण दिड वर्षापासून मी कोणत्याही कवीसंमेलन, मुशायरा, स्वतचा कार्यक्रम, निमंत्रीत कवी या भूमिकेतून कोणत्याही व्यासपीठावर जाणे बंद केलेले आहे व त्यामागची माझी कारणे वेगळि आहेत. 'टाळीची कविता रचण्यापासून स्वतःला दूर ठेवणे' हे माझे कारण आहे. मात्र गझल सहयोग या नावाने करत असलेल्या मुशायर्यात माझा सक्रीय सहभाग असल्याने त्याला मी उपस्थित असायचोच! प्रकाशन समारंभही मी वेगळा करणारच होतो. ते दोन कार्यक्रम फक्त मिक्स केले इतकेच! श्रेय घेण्याइतका मी स्वार्थीही नाही आणि टाळण्याइतका निस्वार्थीही! पण एक गोष्ट व्यवस्थित लक्षात आलेली आहे. ती म्हणजे आपण फक्त आपल्या लेखनानेच ओळखले जातो. तेव्हा स्वतःच्या क्षमतेनुसार अधिकाधिक व तेही स्वतःच्या व्याख्येनुसार अधिकाधिक बरे लेखन करणे यापुरतेच मी स्वतःला मर्यादीत ठेवलेले आहे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
>>>गझल सहयोग काय, गझल परिचय
>>>गझल सहयोग काय, गझल परिचय काय, ही काही रजिस्टर्ड झालेली नावे आहेत नाहीत.<<<
हे आपले म्हणणे मलाहीमान्य आहे. पण....
>>>मी आणि बेफिकीर घेत असलेल्या 'गझल परीचय' या कार्यक्रमाच्या आयोजनातही एकदा सारंग होता.>>>
हे वाक्य कृपया जमल्यास एडिट कराल का?
मी एकंदर आठ मोफत कार्यक्रम केले त्यातील दोनना आपण असल्याचे आठवते व ते कार्यक्रमही मला अॅप्रोच करून आयोजीत करण्यात आले होते .<<<
असे आपण लिहिल्यामुळे मला तसे लिहावे लागले.
दुसरे महत्वाचे असे की जर आपण दोघे जबाबदारीने आणि व्यवस्थित विचार करून हे कार्यक्रम घेत असू तर उद्या याच नावाने आणखीही कोणी काहीही करेल. मला हरकत नाही. परंतु ते जर अविचाराने किंवा अगदीच दर्जाहीन झाले तर याच नावाने होणारा आपला कार्यक्रमही तसाच समजला जाईल. असो. समजेनात का कोणी? काय फरक पडतो?
भुंगा, मला म्हणायचे होते की
भुंगा,
मला म्हणायचे होते की कोणीतरी मायबोलीवर असणार्या आणि कार्यक्रमात उपस्थित असणार्या सर्वांचा एकत्रित फोटो काढायला हवा होता. मलाही सुचले नाही.
.......आणि
>>दोन आयोजक गझलकार दोन टोकाला का बसले होते, त्याचे उत्तर आता मिळतय<<
ही नारदीय कळी मात्र वाया जाणार.....
आम्ही (मी आणि बेफिकीर) प्रत्येक मुशायर्यात जागा बदलतो. मात्र बेफिकीर १ मुशायरा सोडून इतर सर्व मुशायर्यात सूत्र संचालक असल्याने त्यांना कोणत्यातरी क्डेच्या जागेतच बसावे लागते. कारण तिथे स्थिर माईक म्हणजे स्टँड असलेला माईक ठेवणे सोपे जाते. तसेच आयोजकच मध्यभागी बसले तर कोणी त्यातही काहीतरी काढेलच.
hmmm
hmmm
साने
साने
मस्तच !
मस्तच !
(No subject)
बेफिकिर, तुम्हाला खुप खुप
बेफिकिर, तुम्हाला खुप खुप शुभेछा.
मलाच कळत नाहि मि कुठल्या जगात आहे? हा कारक्रम पुण्यात झाला आणु मि हाफिसात किबोर्ड बडवत होतो.... काय हे नशिब....
पण बेफिकिर्जि गुड मॉनिंग पण प्रकाशित करा ना.......
Pages