तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (अंतिम भाग -४/४)

Submitted by पाषाणभेद on 7 April, 2011 - 14:56

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (अंतिम भाग -४/४)

आधीचे तीन भाग:
तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (दोन भाग एकत्र: १/४/ व २/४)

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग३/४)

पुर्वसुत्र: वगनाट्याच्या प्रथम प्रवेशात आपण वाचले आहे की - पहिल्या भागात पारंपरीक गण होतो. दुसर्‍या भागात बतावणी होते. त्यात पेंद्या, किसनदेव गौळणींना अडवतात, छेड काढतात. कराच्या रुपाने गौळणींच्या नाचाची मागणी करतात.

तिसर्‍या भागात - अवंतिपुरचा राजा चतूरसेन राज्य करत असतो. शेजारचा राजा उग्रसेन त्याच्यावर हल्ला करतो. शुरसेन आईबरोबर अवंतिपुरलाच थांबतो. प्रधानजीही अवंतिपुरातच राहतो.

पुढे काय होते ते पहा........

(दुसरा प्रवेश सुरू होतो.)

शाहिर रंगमंचावर येतात व गातात:

क्रौंधनिती होता अवंतिपुरचा पंतप्रधान
खल कपट कृरकर्मा असले त्याचे गुण
राजा किर्तीमान पण दुष:किर्ती होती पंतप्रधानाची
अनीतीने तो वागे लुबाडणूक करी प्रजेची ||

उग्रसेन राजा होता उग्रनगरीचा
शेजारचे राज्य होते अवंतिपुर त्याच्या
कमालीचा उग्र राजा त्याची लई मोठी हाव
जमीनजुमला राज्यवाढवणे हेच त्याला ठाव ||

एकदा त्याने रचला अवंतिपुरावर हल्याचा डाव
सैन्याने तयारी केली अन सुरू केला सराव
हातमिळवणी केली त्यांने कपटी क्रौंधनितीशी
भ्रष्ट पंतप्रधान पाडेल का चतुरसेनाला तोंडघशी?
ऐका सज्जन नरनारी तुम्ही बसले सामोरी
वगनाट्य पाषाणभेद शाहीराचे
सादर करतो रंगमंदिरी || जी जी जी

(शाहीर रंगमंचावरून विंगेत जातात)

=====================

(बॅकग्राउंडला तलवारींचा खणखणाट. आरोळ्या, मारा, तोडा असले आवाज. तोफा बंदूकांचे आवाज होत असतात.)
(एखाद्या मिनीटात रंगमंचावर राजा चतूरसेन आणि चतुरांगण, हातमोडे, पायमोडे, अंगरक्षक आदी शत्रूच्या सैन्याच्या गराड्यात आहे असे दिसते. शत्रूसैन्याचा सेनापती त्याला दोरखंडाने बांधतो.)

हवालदार हातमोडे: अरे मुर्दाडांनो, हिंमत आसल तर मला मोकळं सोडा अन मग दावत माजा हिसका. (शत्रूसैन्याकडून सुटण्याचा असफल प्रयत्न करतो.)

शिपाई पायमोडे: हवालदार साहेब बोलतात ते बरोबर हाय. वाघाला जाळ्यात पकडल्यावानी आमची अवस्था केलीया जनू तुमी लोकांनी.

शत्रूसैन्याचा सेनापती: ए! गप बसा सारे. महाराज चतुरसेन, आम्ही तुमाला युद्धकैदी केलं आहे. आमचा विजय झालेला आहे.

चतुसेन महाराज: अरं हॅट, म्हनं विजय झालेला आहे. आरं अजून आमच्या राजधानीत परधानजी अन माझा मुलगा शुरसेन बाकी आहेत म्हटल. ते नक्कीच याचा बदला घेतील अन आम्हाला सोडवतील.

(तेथेच उग्रसेन राजा टाळ्या वाजवत येतो. )

उग्रसेन राजा: वा वा वा. सेनापती, तुम्ही महाराज चतुरसेनांना कैद करून चांगलीच कामगिरी केली आहे. आता बाकीची कामगिरी आमचे मांडलीक झालेले अवंतिपुरचे परधानजी क्रौंधनिती करतील.

महाराज चतुरसेन: काहीही काय बोलत आहेत उग्रसेन तुम्ही? कामगिरी काय? मांडलीक झालेले अवंतिपुरचे परधानजी क्रौंधनिती काय?

उग्रसेन राजा: आम्ही बरोबर बोलत आहोत महाराज चतुरसेन. अहो तुमाला शिकारी करण्याचा लय छंद होता. त्यामुळं तुमाला तुमच्या राज्याकडं लक्ष देता आलं नाही. म्हणूनच तुमचे परधानजी आमाला येवून मिळांलं. आता आमी त्यांना आमचं मांडलीक केलेलं हाय. गुमान आता तुमी आमच्या तुरूंगात जावा. तिकडं तुमच्या राणीची अन राजपुत्राची काळजी परधानजी घेतीलच. चला.

(महाराज चतुरसेनांना कैद करून सगळे जण रंगमंचावरून विंगेत जातात.)
==========================

(अवंतिपुरचा महाल. खिडकीपाशी निताराणी काळजीने उभी आहे. राजपुत्र शुरसेन तेथे येतो.)

शुरसेन: आई, तू काय काळजी करते. बाबा युद्धावरून लवकरच जिंकून परत येतील.

(प्रधान क्रौंधनिती मोठ्यानं हसत हसत तेथे येतो.)

प्रधानजी: हा हा हा हा हा... शुरसेना, अरे तुझे बाबा युद्ध हरले आहेत. त्यांना उग्रसेनाने कैदी केलं आहे. अन आता तुम्ही दोघंबी माझे कैदी झालात. आता अवंतिपुरावर आमचीच सत्ता राहील.

निताराणी: अरे निचा. तुझा हा डाव माझ्या कसा लक्षात आला नाही.

प्रधानजी: म्हणूनच आता तुम्ही आमचे कैदी झालात. चला आम्ही तुमची तुरूंगात निट काळजी घेवू.

शुरसेन: प्रधानजी, खाल्या मिठाला तूम्ही जागला नाही. आम्ही तुमचा बदला जरूर घेवू.

प्रधानजी: अरे जा जा. अजून तुझे दुधाचे दातही पडलेले नाहीत अन म्हणे बदला घेवू. कोण आहे रे तिकडे? राणीसाहेबांना अन राजपुत्रांना कैद करून तुरंगात डांबा.

(दोन शिपाई राणीसाहेबांना अन राजपुत्रांना कैद करून घेवून जातात.)

राजपुत्र शुरसेन: हे बरोबर नाही परधानजी. आम्ही तुमचा बद्ला जरूर घेवू हे लक्षात ठेवा.

(शिपाई राजपुत्राला कैद करून घेवून जातात. राजपुत्र ओरड्त विंगेत जातो. प्रधानजी मोठ्यानं हसत दुसर्‍या विंगेत जातात.)
================================

( राजपुत्र तुरूंगात आहे. राणीसरकारही दुसर्‍या तुरूंगात आहेत.)

(दृष्यः तुरूंगातला राजपुत्र तुरूंगाच्या रक्षकाकडच्या किल्या पळवतो व तुरूंगाचा दरवाजा फोडून पळतो. फाटलेले कपडे, वाढलेली दाढी अशा अवस्थेत राजपुत्र शुरसेन उग्रनगरीत प्रवेश करतो.)

राजपुत्र शुरसेन (स्वगत): चला एकदाची सुटका करून आपण उग्रनगरीत प्रवेश तर केला आहे. काहीतरी अक्क्लहुशारीने आता उग्रसेनाच्या महालात प्रवेश मिळवून वडलांची सुटका करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. सर्वात पहिल्यांदा माझा अवतार बदलून चांगले कपडे घातले पाहिजे.

(उग्रसेनाचा दरबार. दरबारात मंत्री तसेच उग्रसेनाची मुलगी सुनयना उपस्थीत आहेत. राजपुत्र शुरसेन एक शत्रविक्रेता बनून आलेला आहे.)

राजपुत्र शुरसेन: मुजरा महाराज. मी शारंगधर एक शत्रविक्रेता आहे. देशोदेशी मी शत्रे विकत फिरतो. आपणही माझ्या गोदामातील धारदार तलवारी, ढाली व बंदूका बघाव्यात.

राजा उग्रसेन: वा वा, आम्हाला शत्रास्त्रांचा मोठा शौक आहे. बरं झालं तुम्ही आलात ते. आता आलाच आहात तर आजच्या दिवस मुक्कामाला थांबा आमच्या राजमहालात. उद्या सकाळी आपण तुमच्या शत्रास्त्रांच्या कोठारावर जावू अन खरेदी करू. बरं, ही आमची राजकन्या सुनयना. बाळ तू आज यांची व्यवस्था बघ बर.

राजकन्या सुनयना: हो बाबा. मी यांची व्यवस्था बघते. चला शारंगधर, तुमच्या विश्रांतीची सोय मी करून देते.
============================

(सगळे जण विंगेत जातात. दुसर्‍या विंगेतून शारंगधर (राजपुत्र शुरसेन) व राजकन्या सुनयना येतात.)

सुनयना: शारंगधर, ही तुमची खोली.

शारंगधर: वा वा. छानच आहे ही खोली. पण मी शिपायाकडून असे ऐकलेय की या खोलीपासून जवळच राजकैद्यांना ठेवण्याचा तुरूंग आहे म्हणे?

सुनयना: काही काळजी करू नका तुम्ही शारंगधर. अहो ते तुरूंगातले कैदी काही तुरूंग फोडून तुमच्याकडे येणार नाहीत.

शारंगधर: हो ते पण खरं आहे म्हणा. पण मी कैद्यांना थोडा घाबरतो, म्हणून विचारतो आहे.

सुनयना: एक शस्त्र विकणारा अन तुरूंगातल्या कैद्यांना घाबरतो, मला खरं वाटत नाही. आणखी एक, तुम्हाला दरबारात बघीतल्यापासून मला सारखी शंका येते आहे. राग येणार नसेल तर विचारू का?

शारंगधरः अहो तुमचा कसला राग. बिनधास्त विचारा जे काय विचारायचे ते.

सुनयना: तुमच्या बोलण्यावरून अन दिसण्यावरून तुम्ही काही शत्रांस्त्रांचे व्यापारी दिसत नाही. तुम्ही खरंच कोण आहात?

शारंगधर: सुनयना, तुला खरं सांगण्यात आता काही हरकत नाही. मी तुमच्या शेजारच्या राज्याचा, अवंतिनगरीचा राजपुत्र शुरसेन आहे. तुझ्या वडिलांनी आमच्या राज्याव्रर हल्ला केला अन माझ्या वडिलांना त्यांच्या अंगरक्षकांसहित कैद केले. तिकडे आमचे प्रधानजी तुमचे मांडलीक झाले अन त्यांनी मला व माझ्या आईला कैद करून तुरूंगात टाकले. एके दिवशी मी तुरंगातून माझी सुटका केली अन येथे आलो. आता माझे एकच लक्ष आहे. माझ्या वडीलांची सुटका करायची. त्यानंतर आईची सुटका करून आमचे राज्य मला परत मिळवायचे आहे.

सुनयना: शारंगधर दरबारात पाहिल्यापासून तु मला आवडला आहे. माझ्या वडिलांना संपत्तीचा, जमीनजुमल्याचा फार हव्यास आहे. शेजारच्या राजाची संपत्ती मिळवण्यासाठी त्यांनी माझा विवाह शेजारच्या वृद्ध राजाशी करून देण्याचा हट्ट धरला आहे. मी पण तुझ्याबरोबर आहे शारंगधर. तुझ्या वडिलांची सुटका करण्यात मी तुला मदत करते. आजच रात्री मी तुरूंगाच्या किल्या मिळवते व तुझ्या वडिलांची, अंगरक्षकांची सुटका करते.

शारंगधर: ठिक आहे. मी मुख्यद्वाराजवळ थांबतो. तेथेच तुम्ही सगळेजण या. तु सुद्धा आमच्याबरोबर अवंतिपुरला आलीस तर आपले लग्न तेथेच करावे अशी माझी ईच्छा आहे. तुझी काही हरकत तर नाही ना?

सुनयना: नाही माझी कसलीच हरकत नाही. अरे तुझ्यासारखा शुरविर राजपुत्र मला मिळतो आहे हा खुप मोठा आनंद आहे. नंतर मी माझ्या वडिलांची समजूत घालीनच. ठिक आहे तर मग आज रात्री नक्की.

सुनयना: नक्की नक्की. ठिक रात्री बारा वाजता मी तुझ्या वडिलांना घेवून मुख्यद्वाराजवळ येते. तुम्ही तेथेच थांबा. तुम्ही आता आतल्या खोलीत आराम करा. येते मी.

(सुनयना, शारंगधर वेगवेगळ्या विंगेत जातात.)
=========================

(इकडे रात्री सुनयना राजा चतूरसेनाची त्याच्या अंगरक्षकांसहीत सुटका करते व ते सगळे मुख्यद्वाराजवळ येतात.)

सुनयना: शुरसेना, ठरल्याप्रमाणे मी तुझ्या वडिलांची सुटका केली आहे.

शुरसेन: बाबा!! (आनंदानं त्याच्या वडिलांना मिठी मारतो.) चला बाबा, आता तुमची सुटका झाली आहे. लवकरात लवकर आपण सगळे अवंतिपुरला निघूया. तिकडे भ्रष्ट प्रधानाने आईला तुरूंगात डांबलेले आहे. तिची सुटका केली पाहीजे.

चतूरसेन: चला चला. मलाही त्या परधानाचा बदला घेतला पाहिजे. त्याच्यामुळेच हे सगळं झालंय.

शिपाई: चला महाराज, मलाही माझा टिए, डीए, जेवणाचा भत्ता मंजूर न केल्याचा बदला घ्यायचा आहे. लयी सळवलं व्हतं त्या परधानानं.

(सर्वजण विंगेत जातात.)
==========================

(दृष्य: महाराज, राजपुत्र शुरसेन, राजपुत्री सुनयना व चतूरसेनासहीत अंगरक्षक, हातमोडे हवालदार, पायमोडे शिपाई अवंतिपुरला येतात. राजमहालात प्रवेश करतात )

प्रधानजी: हे काय! महाराज तुम्ही सुटून आलेले दिसतात! (तलवार काढतो)

महाराज: कपटी परधाना, आता तुझा खेळच संपवतो.

शुरसेनः महाराज, याचा वध माझ्याच हातून लिहीलेला आहे. तुम्ही बाजूला व्हा बाबा.

(शुरसेनाची परधानाशी लढाई होते. त्या लढाईत शुरसेन प्रधानाला ठार करतो.)

बाबा, आता कपटी प्रधान क्रौंधनितीचा वध झालेला आहे. चला आता आपण तुरूंगात असलेल्या आईची सुटका करण्यास जावू.

(सगळे जण विंगेत जातात.)
================================

(दुसर्‍या बाजूने विंगेत परत येतात तेव्हा त्यांच्याबरोबर निताराणी असते.)

चतुरसेन: चला सगळे आता एकत्र आलेत. आपलं राज्यही पुन्हा आपल्याला मिळलं आहे. राजपुत्र शुरसेन, हे सगळे तुझ्या शुरपणामुळे झालेले आहे.

निताराणी: हो हे खरेच आहे. माझा मुलगा आहे शुर आहे, हुशार आहे. अक्कलहुशारीने त्याने सगळे जमवून आणलेले आहे. अन ही मुलगी कोण आहे रे बाबा ते तर सांगशिल की नाही.

शुरसेन: आई मी काही सगळे जमवलेले नाही. हे सगळं या मुलीने जमवून आणलं आहे. ही शेजारच्या राजाची म्हणजे आपल्या शत्रूची मुलगी सुनयना.

निताराणी: काय उग्रसेनाची मुलगी? अन ती येथे कशी?

चतूरसेन: अगं मी सांगतो. अग ह्या मुलीने अन शुरसेनाने त्यांचे सुत जमवले. अन मग त्यांनी माझी सुटका केली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी येथे येवून भ्रष्ट प्रधानाचा वध करून तुझी सुटका केली. अन बरं का राणीसरकार, आता ते दोघंही लग्न करणार आहेत.

हातमोडे: मंग राणीसरकार, आहे की नाही हुशार तुमचा मुलगा अन सुन!

निताराणी: हो तर आहेच आपला मुलगा अन सुन हुशार. हो की नाही महाराज? चला एखादा चांगला मुहूर्त पाहून लग्न उरकून टाकू दोघांच.

चतूरसेन: हो तर. आणि त्याच दिवशी राजपुत्र शुरसेनाला आम्ही राजा करणार आहोत.

शिपाई पायमोडे: काय महाराज, म्हणजे लग्नाचे लाडू अन राज्याभिषेकाची मिठाई एकाच दिवशी का? नाय म्हणजे येगयेगळ्या दिवशी हे समारंभ ठेवले असते तर दोन दिवसांची जेवायची सोय झाली असती. काय?

(सगळे जण हसत हसत विंगेत जातात.)
===============================

(उग्रसेनाचा दरबार. एक शिपाई सुनयनाच्या लग्नाची बातमी आणतो.)

शिपाई: महाराज, राजपुत्री सुनयना अवंतिपुरचा राजपुत्र शुरसेनाशी लग्न करणार आहे अशी बातमी आहे.

उग्रसेन: काय! सुनयना अन शुरसेनाचं लग्न! आमचा तर विश्वासच बसत नाही. सुनयना पळून गेली हे एकवेळ ठिक होतं पण आता शुरसेनाशीच लग्न! नाही.....(उद्विग्न होतो.).....
....हं.... तिचंच बरोबर आहे म्हणा. मी मुर्खपणामुळे अन संपत्तीच्या हव्यासामुळे तिचं लग्न शेजारच्या वृद्ध राजाशी लावून देत होतो. मला माझ्या मुर्खपणाची लाज वाटते आहे. ते काही असो, माणसाच्या संपत्तीच्या हावेला सीमा नसते तसेच प्रेम करण्यासाठीही देशाच्या सीमा त्यावर बंधन आणू शकत नाही. देश प्रेमाला पुरत नाही हेच खरे. चला सुनयना चांगल्या राजघराण्यात पडली हाच आनंद आहे....
......(हाक मारतो) दिवाणजी....अहो दिवाणजी....

दिवाणजी: जी महाराज....

उग्रसेन: आताच्या आता अवंतिनगरीला निरोप पाठवा की आम्हाला आमच्या वागणूकीचा पश्चाताप झालेला आहे. आमचे राज्य आम्ही अवंतिपुरात विलीन करत आहोत अन राजपुत्र शुरसेनाचा जावई म्हणु स्विकार करत आहोत. अन त्यांना असाही निरोप पाठवा की, शानदार लग्नसमारंभ येथेच होईल म्हणून.

(दरबारातील सगळेजण आनंदाने अन आश्चर्याने महारांजकडे पहातात.)

दिवाणजी: जशी आपली आज्ञा महाराज.

उग्रसेन: चला सगळेजण झाडून लग्नाच्या तयारीला लागा. इतर सगळ्या राज्यांना विवाहाचे निमंत्रण पाठवा. अन आपल्या राज्यातली सगळी प्रजा लग्नाला हजर पाहिजे. काय हवे नको ते जातीने पहा दिवाणजी. चला लागा कामाला.

दरबरातील सगळे जण: महाराजांचा विजय असो.

(मुजरा करतात अन विंगेत जातात.)
=========================
(विंगेतून सगळे कलाकार रंगमंचावर येतात. त्यात राजपुत्र शुरसेन व सुनयना वधुवराच्या वेशात आहेत. गळ्यात फुलांच्या माळा आहेत. सर्व कलाकार भैरवी होत असतांना हात जोडून उभे राहतात.)

भैरवी:

गणेशा, नमन करतो,
आशीर्वाद द्या द्या ||
कलावंत आम्ही,
कला सादर केली
गोड मानूनी घ्या घ्या ||
(भैरवी होत असतांना पडदा पडतो)

समाप्त.

{{ वगनाट्य हा प्रकार रंगमंचावर सादर करतांना फार मोठेमोठे सेट, सजावट असण्याची आवश्यकता नाही. प्रस्तूत वगनाट्यात लावणी, गण गौळण आहे. प्रयोग करतांना मुळ नाट्याचे भान ठेवून इतर अ‍ॅडिशन्स टाकल्या तरी चालतात.

प्रस्तूत वगनाट्यात अजून एकदोन ठिकाणी लावण्या टाकता येतील.

नाट्यात संवाद ग्रामीण व शहरी भाषेत एकत्र झाले आहेत. वेळेअभावी मी त्यावर शेवटचा हात फिरवू शकलो नसल्याने तसे झाले आहे. हळूहळू ते सारे एकाच बोलीत एकत्र लिहीण्याचा प्रयत्न करेन.
कामे खुप असल्याने या संहितेचे काम हातावेगळे केले.
प्रतिसादकांचे अन वाचकांचे मनापासुन धन्यवाद.}}

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०४/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: