इस्पिकचा काळा रंग - नेहा

Submitted by बेफ़िकीर on 6 April, 2011 - 05:09

'दूरच्या प्रवासाचा योग' या पेपरातील भविष्याचे हसू येते मला! भविष्य लिहिणारा आणि छापणारा मुळातच एका दूरच्या प्रवासात असतात आणि वाचणारेही! उगाच आपलं सांगतात की दूरच्या प्रवासाचा योग!

पण काही वेळा 'दूर' या शब्दाला 'आयुष्यापेक्षाही दूर' असाही अर्थ लाभू शकतो.

आणि काही वेळा त्या अर्थाचे तात्कालीन, म्हणजे साधारण सहा एक महिन्यापुरते नांव... नेहाही असू शकते.

विवेकानंदांनी 'माझ्या बंधू भगिनींनो' म्हणून टाळ्या मिळवल्या. तुम्ही आम्ही त्या व्यासपीठावर पोचलो असतो तर आपण नसत्या मिळवल्या? आपणही म्हणालो असतो की 'माझ्या बंधू आणि भगिनींनो'?

टाळ्या मिळण्याचे कारण वेगळे होते. विवेकानंदांना स्वतःला त्या संबोधनातून टाळ्या अभिप्रेतच असतील की नाही कोण जाणे! टाळ्या वाजल्यावर ते 'या टाळ्या कशावर वाजल्या असाव्यात' असाही विचार करत क्षणभर थांबले असतील की काय असे आपले मला वाटते.

टाळ्या वाजवणारे त्या स्नेहार्द्र दृष्टिकोनातील अभूतपुर्व नावीन्यावर भाळून टाळ्या वाजवत होते. स्वामी विवेकानंदांच्या धरतीत मात्र अब्जावधी लोक एकमेकांना तसेच संबोधतात.

दृष्टिकोन हा एक 'अ‍ॅबसोल्यूट' प्रकार आहे. त्याच्या अजरामररीत्या सापेक्ष असण्यात त्याचा 'अ‍ॅबसोल्यूटनेस' आहे असे मला वाटते.

लाल डब्यातून प्रवास करणे हे एका वेगळ्या प्रकारचे सुख असू शकते. त्यात माणसे अभ्यासण्याला अमाप म्हणजे अमाप वाव असतो. मग त्यातून काल्पनिक कथेची मध्यवर्ती संकल्पना तयार होऊ शकते. त्यावर 'मीपणाचे' लेप लावून आणि आकर्षकपणाची कॉस्मेटिक्स चोपडून ती मनांनी स्थापन केलेल्या बाजारात विकायला ठेवता येते. काही वेळा कथेऐवजी कविताही! विकण्याचा मोबदला म्हणून वाहवा किंवा तद्दन फालतू अशा प्रतिक्रिया मिळतात नातेवाईक, ओळखीच्यांमधून! हाफ राईस ची कल्पना अशीच सुचली असावी.

पण लाल डब्याची सगळ्यात शेवटची सीट अवयव तपासणी केंद्रच! तिथे बसण्याचे पैसे एस टी ने द्यायला हवेत प्रवाश्यांना!

पण मी स्वतःच पैसे देऊन बसलो होतो. गर्दी वगैरे नव्हती, पण पुढच्या कोणत्याही सीटपेक्षा ही सीट लांबलचक व तिरस्कारास पात्र असल्यामुळे येथे मी रात्री झोपू शकणार होतो. 'तिरस्कारास पात्र असणे' हे तिच्यातील आणि माझ्यातील दोन साम्यांपैकी एक साम्य! दुसरे म्हणजे दोघांची लांबी! 'सलग' लांबी!

जळगावला कधी दिवसा पोहोचू नये आणि पुण्यातून कधी दिवसा निघू नये. जळगावला दिवसा पोचणे म्हणजे स्वतला होरपळून घेणे आणि पुण्यातून दिवसा निघणे म्हणजे तो दिवसच आयुष्यातून सबट्रॅक्ट करणे!

रात्री दहा ते सकाळी सहा!

खड्यांमधून रात्रभर प्रवास करावा लागणार म्हणून मी बीअर घेतली होती की निवांत बीअर घेता यावी म्हणून कंपनीचे काम काढून जळगावला निघालो होतो ते त्याहीवेळेस आठवत नव्हते. चंदनवाडीला, म्हणजे पुण्यातच असलेल्या एका स्टॉपला गाडी रात्री साडे दहा, पावणे अकराला थांबली आणि काही प्रवासी चढले. माझे तोवर तिकीट बिकीट घेऊन झालेले असल्यामुळे मी इतकाच धावा करत बसलो होतो की या सीटवर बसायचा कुणालाही मोह होऊ नये व मला झोपता यावे.

हा धावा मी चंदनवाडीलाच करणे थांबवले.

शिरूर यायच्या आत ती मेडिकल डॉक्टर असल्याचे, त्यावर आश्चर्य व्यक्त करण्याचे, आपल्या एका ओळखीतल्याची केस उगाचच सांगण्याचे, ती विधवा असल्याचे, तिला दोन मुली असल्याचे, जळगावलाच चाललेली असल्याचे, जळगावचीच असल्याचे, तिला सेमिनार्ससाठी अनेकदा प्रवास करावा लागत असण्याचे व मी उद्या जळगावहून औरंगाबादला येऊन परवा औरंगाबादहून पुण्याला परतणार असल्याचे प्रकार सांगून व करून झालेले होते.

वयाच्या नव्वदीत ज्याला बालिशपणा जपता येतो तो माणूस खरा जगला असे समजावे. नाहीतरी आयुष्य बालिशच असते. आठशे वर्षांपुर्वीच्या ज्ञानेश्वर महाराजांचे जगण्यातले मोठेपण ऐकून आठशे वर्षांनी आपण केवळ सत्तर एक वर्षे जगायचे! आणि म्हणे तसाच जगायचा प्रयत्न करायचा. का? माझ्या बापाने सन्यास घेऊन पुन्हा संसारात पाय टाकलेला नाहीच! मला बालिशपणा खूप आवडतो. त्यात काही वावगे वाटत नाही. मी कुणाचीही भीडभाड न बाळगता एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यावर किंवा पोषाखातील कल्पकतेवर तिच्या नवर्‍यासमोर व चारचौघांसमोर अत्यंत आवडेल मात्र कोणताही गैरसमज होणार नाही अशी कमेंट द्यायला कचरत नाही. चांगल्याला चांगलं म्हणण्यात काय प्रॉब्लेम आहे? वाईटालाही चांगले म्हणू शकण्याची ट्युशन घेणारा / री शोधतोय. तर नेहाला मी चक्क सांगीतले.

"एकट्याने प्रवास करण्यापेक्षा असे बुद्धिवान कुणी बरोबर असले की गप्पा मारण्यात वेळ चांगला जाईल"

भारतीय स्त्रियांना बुद्धिवान ही कमेंट मिळणे हे लहान मुलाला अजिबात न मागताही दुसरे आईसक्रीम मिळण्यासारखे असावे हा माझा समज त्याही रात्री खरा ठरला. म्हणजे बुद्धिवान असल्या तरी आवडते अन नसल्या तरी!

प्रत्येक माणसाचे त्याच्यातील असलेले वेगळेपण जपण्याच्या व त्यास ड्यू रिस्पेक्ट देण्याच्या बौद्धिक पातळीला मानव जमात पोचेल तेव्हा मानव जमात निर्माण होण्याचे कारण उरलेले नसेल. आज मानव जमात निर्माण होते कारण आपल्याला दुसर्‍यातील वेगळेपण सहन होत नाही. तो आपल्यासारखाच असावा असे वाटते.

कुणीतरी मागे म्हणाले होते की म्हणे मानवाची निर्मीती हा निसर्गाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार आहे. अक्कलशुन्य माणूस!

झाड हा निसर्गाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार आहे. माणसाचा प्रवास माणूस असणे इथे सुरू होऊन झाड बनणे येथे संपतो! हा खरा दूरचा प्रवास! म दा भटांचे चिरंजीव लिहितात तो प्रवास प्रवासच नसतो.

आत्ता दिसतात ती सगळी झाडे हजारो वर्षांपुर्वी माणसे होती. त्यांच्यातील चांगुलपणा, तटस्थपणा आणि कशावरही रिअ‍ॅक्ट न होण्याचे आणि फक्त सावलीच देत बसण्याचे गुण इतके वाढले की त्यांना झाडाचा जन्म मिळाला.

माझ्यात बर्‍यापैकी चांगुलपणा आहे असे मला वाटते. बाकीचा कोणताही गुण अजिबात नाही. नेहामध्ये सावली देण्याचा गुण असेल असे वाटले, कारण रात्र असल्यामुळे नक्की सांगता येत नाही.

अहमदनगर हे रुक्ष शहर मला अतिशय आवडते. कारण तेथे साधी माणसे असतात.

नेहाच्या स्नोच्या गंधाची दरवळ अख्या एस टी त पसरलेली असली तरी रस्त्यावरच्या खड्यांमुळे त्या लाल डब्याचे 'या रावजी, बसा भावजी'च चाललेले होते.

माझा मात्र स्नोचा डबा झालेला होता.

मी तेव्हापर्यंतच्या आयुष्यात जेमतेम चार कविता रचलेल्या होत्या आणि त्याही चक्क आठ, आठ वर्षांच्या अंतराने! मात्र आज मी अनेक गझला वाचतो आणि स्वतःही रचतो. त्यामुळे मला इतर कित्येक गझलकारांचे शेर तर काही वेळा अख्खी गझलही पाठ असते. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नावे लिहायची तर ज्ञानेश पाटील, वैभव जोशी, चित्तरंजन आणि ढवळे यांचे अनेक शेर / गझला मला केव्हाही आठवतात.

त्यातलाच वैभवचा शेर मला अनेकदा आठवतो आणि त्या प्रवासाचीच आठवण करून देतो.

रिते आकाश निरखावे तसा माझा तुला चाळा
उद्या येईल कंटाळा, उद्या संपेल नवलाई

हा 'उद्या' सहा महिन्यांनी येणार आहे हे त्यावेळेस आम्हाला दोघांनाही माहीत नव्हते. कळत फक्त एवढेच होते की ज्या झोपण्याच्या मोहाने मी ती सीट पकडली होती त्यावर नेहा झोपलेली होती आणि टक लावून माझ्याकडे बघत होती. 'रिते आकाश निरखावे' तशी!

म्हंटले नव्हते? लाल डब्याचा प्रवास फार मजेशीर असतो. त्या रात्री काहीच झालेले नसूनही सहा महिने ती मैत्री गुप्तपणे चालली. पहाटे कधीतरी गाडी अजंठा लेणीबिणी मागे टाकून एकदाची फर्दापूरला थांबली.

फर्दापूरला जशी भजी मिळतात तशी एकाच ठिकाणी मिळत असावीत!

स्वर्गात!

बाहेरच्या थंडगार वार्‍यांमध्ये शरीराला सुखाच्या सर्वोच्च स्थानावर न्यायची क्षमता होती. फक्त त्यांना कोण कोणत्या स्थानावर आहे हे माहीत नसावे. कारण मला स्पर्शून ते 'अरे, हा तर आधीच तिथे दिसतोय' असे म्हणून टाळून दुसरीकडे जात होते.

सकाळी रिक्षेत बसल्यानंतर मी सहज मागे वळून पाहिले तेव्हा तीही मागे वळून पाहात होती.

एकमेकांचे फक्त सेल नंबर घेणे यापलीकडे काहीही झाले नसताना संध्याकाळी उशीरा मी औरंगाबादच्या हॉटेलमध्ये जाऊन टेकतोय तर...

कुछ पल की मुलाकाते
मिठीसी तेरी बाते

वगैरे वगैरे स्वरुपाचा एस. एम. एस!

लाखो पिढ्या जन्मून मरून गेल्या तरी स्त्रीच्या आमंत्रणस्वरुपी कम्युनिकेशनचे पुरुषांना अप्रूपच वाटते.

पण मला त्या अप्रूपाबरोबरच...

माझ्या 'बेफिकीर' या नावातील 'बे' सरकला असल्याचीही जाणीव झाली.

प्रकरण आज सकाळीच संपलेले दिसत नव्हते याची भीती वाटली.

पण हा 'बे' कसा काय सरकला याचा अपमान वाटून मी प्रतिसाद देऊ लागलो.

'उद्या येईल कंटाळा, उद्या संपेल नवलाई' असे झाले नव्हते.

पुन्हा कधीच भेट झाली नाही. पण भेट व्हावी अशी इच्छा तिने प्रदर्शित केली. त्यावेळेस मात्र तो 'बे' कंप्लीट सरकला आणि नष्टच झाला. मी आपले खरे काय ते सहधर्मचारिणीला सांगून टाकले. ती एक मला चिडवण्याव्यतिरिक्त काही करतच नाही. अशी बायको जन्मोजन्मी मिळावी यासाठी काही प्रथा आहे का हे मी सध्या बघत आहे. तिने मौलिक सल्ला दिला. 'नो एस एम एस'! हा सल्ला दहशत पसरवण्याच्या थाटात दिला असता तरी मी ते मान्य केले असते. पण तिने मलाच चिडवत तो सल्ला दिला.

कधीतरी २००२ मध्ये नेहा हे प्रकरण आयुष्यातून समाप्त झाले. पण त्या सहा महिन्यात झालेल्या एस एम एस मधील भाषिक तीव्रता आणि कवितांचा दोन्ही बाजूंनी भडिमार आणि इंतजार लक्षात घेता मी खरच बेफिकीर झालो असतो तर काय झाले असते माहीत नाही.

या गोष्टींना नंतर एका धुळकटलेल्या आणि चुकून बावन्नपैकी एकटीच उरलेल्या इस्पिक दुर्रीइतकीही किंमत राहत नाही. मात्र ती इस्पिक दुर्री नष्ट नाही करता येत. कोनाड्यातून काढून कचर्‍यात फेकता येत नाही की फाडता किंवा जाळता येत नाही. इस्पिकच्या काळ्या रंगाचा परिणाम मनावर सतत करत राहते.

खूप खूप बदाम आणि चौकटच्या नव्या नव्या पत्यांनी ती झाकत राहावी लागते.

पण आपले आपल्याला माहीत असते. आपल्याकडे कुठेतरी एक इस्पिकची मळकटलेली दुर्री आहे, जी कुणी पाहू नये.

प्रश्न हा नाहीच आहे.

आपण दुसर्‍याच्या कुणाच्यातरी कोनाड्यात जर किल्वर दुर्री म्हणून राहिलेले असू तर?

ही जाणीव अधिक त्रासदायक!

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो

================================

(नाव काल्पनिक आहे हे वे सां न ल )

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

बेफिकीर,
एकदम भारी........
------------------------------------
ती एक मला चिडवण्याव्यतिरिक्त काही करतच नाही.>> नशिबवान आहात तुम्ही.....

देशी, का जळतोयेस उगाचच !! त्यापेक्षा एक एक प्रकरण नीट वाचून , अभ्यास कर. संग्रही ठेव. अतिशय महान आशय आहे प्रत्येक प्रकरणात. तो तुला उमजला की तुझेही लवकरच २४ होतील. हाय काय अन नाय काय Happy Light 1

देशी, का जळतोयेस उगाचच !! त्यापेक्षा एक एक प्रकरण नीट वाचून , अभ्यास कर. संग्रही ठेव. अतिशय महान आशय आहे प्रत्येक प्रकरणात. तो तुला उमजला की तुझेही लवकरच २४ होतील. हाय काय अन नाय काय >>>

डेली या,

हे बघा!

http://www.maayboli.com/user/30943

देशी स्वतःला स्त्री मानत आहेत हे स्पष्ट होत आहे. आपण त्यांना 'का जळतोयेस' विचारताय!

आपल्याला जर माणूस स्त्री आहे की पुरुष हेच जाणून घ्यायचे नाही आहे तर आपण खटकणार्‍या जाचक प्रथांबाबत काय मुद्देमांडाणार?

Lol

तसेच, आपण एका स्त्रीला 'तुझेही लवकरह २४ विबासं होतील' असा आशीर्वाद देऊन समस्त स्त्रीजातीचा अश्लाघ्य अपमान करत आहात.

Lol

-'बेफिकीर'!

ओह्ह देशी स्त्री आयडी आहे होय!!

<< आपण एका स्त्रीला 'तुझेही लवकरह २४ विबासं होतील' असा आशीर्वाद देऊन समस्त स्त्रीजातीचा अश्लाघ्य अपमान करत आहात. >>
ओह्ह म्हणाजे विबासं ही पुरुषांसाठी अभिमानाची आणि स्त्रियांसाठी अपमानाची गोष्ट आहे होय.

प.पु. विबासं शिरोमणि बे फकीर महाराजांनी एक नविन मुद्दा इथे मांडला आहे. इच्छूकांनी, अभ्यासकांनी जरूर ध्यानात घ्यावा. " विबासं ही पुरुषांसाठी अभिमानाची आणि स्त्रियांसाठी अपमानाची गोष्ट आहे "

मी पुणेकर असून खरा "खरा" माणूस आहे......आता विचाराल का?....तर मला एकच प्रश्ण पडला आहे...आणि इतर कुठल्याही सुज्ञ माबोकराने त्या बद्दल भाष्य केले नाही म्हणून हा प्रश्ण......स्वर्गात भजी मिळतात का हो? खरं तर आत्ता पर्यंत या वर भरपूर भाष्य व्हायला हवं होतं...एकूण माबोकरान्चा परिक्शणाचा उत्साह पाहता......असो....बाकी बेफि लै झ्याक गड्या....परत एक्दा जाळ काढलात!!!!

Pages