हेमलकसा

Submitted by चिनूक्स on 28 June, 2008 - 08:03

The health of a society is measured by the condition of its lost, its last, its least. - Mahatma Gandhi

------------------------------------------------------------------------------------

१९७१ साली विकास आणि प्रकाश या आपल्या दोन मुलांना घेऊन बाबा आमटे सहलीसाठी भामरागडच्या जंगलात गेले. त्यांच्या तरूणपणी बाबा या भागात शिकारीसाठी येत असत. माडीया गोंड हे इथले रहिवासी. त्यांची होणारी लुबाडणूक, हलाखीची परिस्थिती बाबांनी फार जवळून पाहिली होती. दारिद्र्य, भूक, रोगट हवामान या सार्‍यांमुळे शतकानुशतकं पिचलेल्या या जमातीसाठी काहीतरी करण्याची बाबांची इच्छा होती. १९५१ साली लोकांच्या विरोधाला व निंदेला न जुमानता, कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू केलेलं आनंदवन जोमाने वाढलं होतं. घनदाट जंगल आणि टेकाडांनी वेढलेला सोमनाथ प्रकल्पही यशस्वी झाला होता. बाबांनी आपला मोर्चा आता भामरागडच्या या आदिवासींकडे वळवला. १९७३ साली बाबांनी भामरागडजवळ कोईनगुडा आणि हेमलकसा गावाच्यामध्ये एक तंबू ठोकला, लग्न झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे तिथे राहायला गेले आणि 'लोकबिरादरी प्रकल्प' सुरू झाला.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडचा हा प्रदेश दंडकारण्याचा एक भाग. पूर्वेला बस्तर आणि दक्षिणेत आंध्र प्रदेश. पश्चिमेला सिरोंचाजवळ प्राणहिता नदी गोदावरी नदीला मिळते आणि उत्तरेला भामरागडजवळ इंद्रावतीचा संगम पर्लकोटा आणि पामुलगौतमी या नद्यांशी होतो. उत्तरेहून वाहत येणारी बांदीया नदी दमरंचा गावाजवळ इंद्रावतीला मिळते. ७३ साली चंद्रपूरहून सिरोंचाला यायला पक्का रस्ता होता. वाटेत ७५ मैलांवर आलापल्ली लागतं. तिथून भामरागड ६५ मैल. हा पूर्ण कच्चा रस्ता.

माडीया गोंडांची परिस्थिती त्याकाळी अतिशय बिकट होती. बस्तर, गडचिरोली आणि आन्ध्र प्रदेशातील दुर्गम जंगलात हे आदिवासी राहायचे.बाहेरच्या जगाशी अजिबात संबंध नव्हता. या जंगलापलिकडेही जग आहे याचा त्यांना पत्ता नव्हता. पटवारी, जंगलातले ठेकेदार त्यांचं प्रचंड शोषण करायचे. आपल्यालाही काही हक्क, अधिकार आहेत याची त्यांना मुळीच जाणीव नव्हती. अंगावर कपडे नव्हते. ऊन, पाऊस, वारा यांपासून संरक्षण करतील अशी धड घरं नव्हती. रस्ते नव्हते. वीज नाही. शाळा नाही, दवाखाना नाही. त्यामुळे संपूर्ण निरक्षरता आणि रोगांचे थैमान. पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य, आहारात मिठाचं कमी प्रमाण आणि लोहाचं जास्त. सेरेब्रल मलेरिया, कॉलरा आणि विषमज्वर यांसारखे भीषण आजार. आजारपणाचा संबंध जादूटोणा किंवा देवीच्या अवकृपेशी लावला जायचा. उपचारांसाठी वैदू अथवा मांत्रिक गाठले जायचे. थोडीफार शेती केली तरी उदरनिर्वाहाचं मुख्य साधन म्हणजे शिकार. साप, प्राणी, पक्षी यांपैकी काहीही वर्ज्य नाही. त्याच्या जोडीला जंगलातील फळं, तेंदू, चारोळी आणि बांबूचे कंद. पोटातली भूक मारायला ताडी आणि गोर्गा प्यायची.

अश परिस्थितीत आपली इंटर्नशिप अर्धवट सोडून प्रकाशकाका हेमलकशाला आले तेव्हा अनेकांना तो ध्येयवादी वेडेपणा वाटला होता. प्रकाशकाका-मंदाकाकूंबरोबर त्यावेळी होते गोपाळ फडणीस, दादा पांचाळ हे कार्यकर्ते आणि रेणुकाताई, बाबांच्या कन्या. वर्षभरानंतर आपला पुण्यात जोरात चालणारा रेफ्रिजरेशनचा व्यवसाय सोडून विलास मनोहर लोकबिरादरी प्रकल्पात सामील झाले.
हेमलकसाचा लोकबिरादरी प्रकल्प..गर्द झाडीत, जगापासून दूर.. तुटलेला..
तेव्हा बांदीयावर, नाल्यांवर पूल नव्हते. चालत जावं लागायचं. बल्लारपूर इंडस्ट्रीच्या ट्रकची पाऊलवाट होती फक्त. आलापल्लीला नागरी जीवनाच्या खुणा संपायच्या. विस्तीर्ण खोल जंगल घेरून टाकायचं. सुरुवातीच्या काळात प्रकल्प म्हणजे दोन गवती झोपड्या होत्या. दारंही नसलेल्या. वीज नव्हती. (प्रकल्पात वीज यायला तब्बल २० वर्ष लागले. १९९५ साली वीज आली, आणि टेलिफोन १९९९ साली) त्यातच कोब्रा, व्हायपर, क्रेटसारखे विषारी साप, विंचू आणि जंगली श्वापदं. मग जमीन स्वच्छ केली गेली, विहीर खणली. गरजेचं सारं सामान आनंदवनातून दर महिन्याला यायचं.

सुरूवातीला माडीया आदिवासी दवाखान्यात येतच नव्हते. शहरी पोषाख, भाषा यांना ते बिचकत असत. कपडे घालणार्‍या लोकांना घाबरूनच असायचे ते. त्यातच मांत्रिकांचा जबरदस्त प्रभाव होता त्यांच्यावर. आपला धंदा बसेल या भितीने हे मांत्रिक मुंडकं छाटलेलं कोंबडं 'मंत्रवून' दवखान्यासमोर टाकून देत. या माडीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रकाशकाकांनी त्यांची भाषा आत्मसात केली. हळूहळू प्रकल्पातील सगळीजणं सराईतांप्रमाणे माडीया बोलू लागले. आपल्या सायकलवर औषधोपचाराची पेटी घेऊन प्रकाशकाका गावोगाव फिरायचे. मग एक दिवस एपिलेप्सीचा एक रुग्ण दवाखान्यात आला. काकांनी त्याच्यावर उपचार केले, रुग्णाला थोडं बरं वाटलं, आणि हा नवा डॉक्टर आपल्याला बरं करू शकतो, हे माडीयांना कळलं. दवाखान्यात पेशंट्सची गर्दी होऊ लागली. शेकडो मैल चालत प्रकल्पातील दवाखान्यात हे आदिवासी येऊ लागले. कंदिल आणि टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया होऊ लागल्या. झाडावरून पडलेले, अस्वल, वाघाने जखमी केलेले, कॉलरा, टिबी झालेले असे सर्वप्रकारचे रुग्ण इथे असत. भामरागड आणि अहेरी येथे नंतरच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू होऊनसुद्धा माडीया रुग्ण हेमलकसालाच येत. आपुलकीनं आपल्या व्यथा सांगत.

पावसाळ्यात अतिशय कठीण परिस्थिती असायची. नद्यांना पूर आलेले. सगळे रस्ते बंद आणि तशात कॉलरा, गॅस्ट्रोच्या साथी. सलाईन, औषधं पुरेशी नसायची. आणि पुरामुळे आनंदवनातून येणारा ट्रक अडकून पडलेला असायचा. गावंच्या गावं दवाखान्यात भरती झालेली असायची. वीस-वीस तास सतत उभं राहून काम करावं लागे. कणीक संपलेली असायची. प्रकाशकाका-मंदाकाकूंसकट सगळीजणं पहाटे ४ वाजता उठून जात्यावर गहू दळायचे, मग सकाळी ६ वाजता काम सुरू. या झपाटलेपणामुळे माडीयांना हा प्रकल्प आपला वाटू लागला.

पण तरीही माडीयांच्या इतर समस्या अद्याप तशाच होत्या. या लोकांची सतत फसवणूक होत असे. कागदी नोटा, नाण्यांना त्यांच्या लेखी काहीच किंमत नव्हती. एखादी वस्तू विकत घेण्यासाठी barter system होती. मग आठवडी बाजारासाठी येणारे व्यापारी आणि फॉरेस्ट गार्डस त्यांना व्यवस्थित लुबाडायचे. त्याकाळी एका पैशाला किलोभर मीठ मिळायचं. हे व्यापारी किलोभर मीठाचा मोबदला म्हणून माडीयांकडून बाटलीभर चारोळी किंवा मध वसूल करायचे. प्रकाशकाकांनी मग प्रकल्पाच्या आवारात बाजार भरवायला सुरुवात केली. मीठ, रॉकेल, तांदूळ या वस्तू आनंदवनातून यायच्या, व माडीयांना योग्य किमतीत मिळायच्या. पण हा काही माडीयांच्या समस्यांवर कायम उतारा नव्हता. त्यांना साक्षर करण्याची आवश्यकता होती. बाहेरच्या जगाची ओळख करून देणं गरजेचं होतं. शेती, आरोग्य या विषयीचं ज्ञान त्यांना मिळणं आवश्यक होतं. भामरागड परिसरात तोपर्यंत एक - दोन शाळा सरकारने सुरू केल्या होत्या. मात्र शिक्षा म्हणूनच तिथे शिक्षकांची नियुक्ती केली जात असे. ह्या शिक्षकांना त्या जंगलात कशीबशी ३ वर्षं काढायची असत. शिकवण्यात काडीचाही रस नसे. बहुतेकांनी गावात दुकानं उघडली होती. त्यातून बर्‍यापैकी प्राप्ती होत असे. माडीयांनाही हे दुकानदार आपल्या पोरांना शिकवण्यासाठी आले आहेत याचा पत्ता नसायचा. कारण मुळात शाळा म्हणजे काय हेच माहिती नव्हतं.

लोकबिरादरी प्रकल्पाच्या सुरुवातीच्या आराखड्यात शाळेचा समावेश नव्हता. मात्र माडीयांना स्वयंपूर्ण बनविण्याच्या उद्देशाने १९७६ साली प्रकल्पात निवासी आश्रमशाळा सुरू झाली. गोपाळ फडणीस या शाळेचे पहिले मुखाध्यापक. फडणीस सर आणि त्यांचे कार्यकर्ते गावोगाव फिरून मुलांना शाळेत घेऊन आले. सुरूवातीला बरेच पालक तयार नव्हते. मात्र तोपर्यंत प्रकाशकाकांबद्दल त्या लोकांना विश्वास वाटू लागला होता, शिवाय शाळेत मिळणारं फुकट जेवण हे आकर्षण होतंच. पहिल्या वर्षी २५ मुलं शाळेत आली. त्यापैकी १० महिन्याभरातच पळून गेली. मात्र उरलेल्या मुलांनी वर्षाखेर घरी परतल्यावर इतर पालकांची समजूत घातली, आणि मग शाळेला विद्यार्थ्यांची कमतरता कधीच भासली नाही.

ही शाळा चालवण्यात अडचणी भरपूर होत्या. पैशाची कमतरता तर नेहमीचीच. मुलांसाठी कपडे, वह्या-पुस्तकं लागायची. शिवाय ही पुस्तकं होती मराठीत. मुलांना मराठीचा गंध नव्हता. शाळेच्या बंदिस्त वातावरणाची, एका जागी बसण्याची या मुलांना अजिबात सवय नव्हती. माडीया ही निसर्गात रमणारी जमात. एका जागी बसून लिहिणं-वाचणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. पण माडीयांच्या हितसंबंधांचं रक्षण करायचं तर त्यांना साक्षर करणं अत्यावश्यक होतं. तरच त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव होणार होती. आणि याचा प्रत्यय काही वर्षांतच आला.

१९८४ साली भामरागड परिसरात दोन मोठी धरणं बांधायचं सरकारने ठरवलं. गोदावरी नदीवर इचमपल्ली धरण आणि इंद्रावती नदीवर भोपाळपटनम धरण. या धरणांमुळे सुमारे २ लाख एकर जमीन पाण्याखाली जाणार होती. त्यापैकी निम्मं वनक्षेत्र होतं. बर्मा टीकच्या तोडीचं teak या जंगलात होतं. या परिसरात राहणार्‍या माडीयांना स्थलांतर करावं लागलं असतं. मात्र त्यांच्या पुनर्वसनाची कोणतीही योजना आखली गेली नव्हती. कारण माडीया गोंड ही कुठल्याही राजकीय पक्षाची व्होट बँक नव्हती. अनेक वर्षं जगाच्या खिजगणतीतही नसलेले हे आदिवासी जगले काय नि बुडले काय, कुणालाच काही घेणं देणं नव्हतं. बाबांनी या आदिवासींना या धरणाबद्दल सांगितलं. शाळेत शिकणार्‍या त्यांच्या मुलांनी त्यांना सत्याग्रह म्हणजे काय, ते समजावून सांगितलं, आणि बाबांच्या नेतृत्वाखाली ५,००० आदिवासींनी सत्याग्रह केला. इंदिरा गांधींनी हस्तक्षेप केला आणि धरणाची योजना रद्द झाली.

आज शालेय शिक्षणाबरोबरच या मुलांना शेतीबद्दल माहिती दिली जाते. शेतीच्या नवीन पद्धती शिकवल्या जातात. बी-बियाणं दिलं जातं. आपापल्या गावी जाऊन ही मुलं मग गावकर्‍यांना शेतीची नवी तंत्र शिकवतात. पूर्वी इथे फक्त तांदूळ कधीतरी पिकायचा. आता बर्‍यांच गावांत डाळी, भाज्या,फळं यांची लागवड केली जाते. बहुतेकांच्या अंगणात भाजी असते. हे गावकरी हल्ली कधीतरी बाजारात भाजी विकायलासुद्धा आणतात. तसंच या मुलांना हँडपंप दुरुस्तीचं कामसुद्धा शिकवलं जातं. माडीयांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं म्हणून काही वर्षांपूर्वी सरकारने हे हँडपंप बांधले होते. मात्र ते बिघडले की दुरुस्तीसाठी जंगलात यायला कोणीच तयार नसायचं. प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी बरेच दिवस हे काम केलं. मग मात्र मुलांनाच हे काम शिकवलं. आता आपापल्या पाड्यातील हँडपंपच्या देखभालीचं काम ही मुलंच करतात.

आज या शाळेत ६५० विद्यार्थी शिकतात. त्यांपैकी २०० मुली आहेत. ५०० मुलांसाठी सरकारी अनुदान आहे. उरलेल्या मुलांचा खर्च प्रकल्पातून होतो. बारावीपर्यंत वर्ग आहेत. दहावी-बारावीचा निकाल साधारण ८५% लागतो. प्रकाशकाकांचे दिगंत, अनिकेत, आरती, विलासकाकांचा अजिंक्य याच शाळेत शिकले. या शाळेत शिकून बाहेर पडलेली काही मुलं आज वनखात्यात नोकरी करतात. शाळेतल्या १५ शिक्षकांपैकी तिघं इथले माजी विद्यार्थी आहेत. या शाळेत बारावीपर्यंत शिकलेला कन्ना मडावी काही वर्षांपूर्वी डॉक्टर झाला. त्यानंतर भामरागड परिसरातली या शाळेत शिकलेली ५ मुलं डॉक्टर होऊन गडचिरोली जिल्ह्यात काम करत आहेत. दोघं वकील झाले आहेत.

तरीही काही समस्या अजूनही आहेतच. स्थपनेला ३० वर्षं झाली तरी अजूनही इथे दहावी-बारावीचं केंद्र नाही. कारण इथे कॉपी करता येत नाही. गडचिरोली जिल्ह्यातल्या ८०% आश्रमशाळा केवळ कागदोपत्री अस्तित्वात आहेत. इतर शाळांमध्ये शिक्षक गायब असतात. जर निकाल पुरेसा लागला नाही तर सरकारी अनुदान बंद होतं. म्हणून मग परीक्षांमध्ये सरळ फळ्यावर उत्तरं लिहून दिली जातात. आणि या बोगस शाळांचा १००% निकाल लागतो. लोकबिरादरी प्रकल्पाच्या शाळेत हे प्रकार खपवून घेतल्या जाणार नाहीत म्हणून त्यांना केंद्र नाही. इथलीच मुलं मग बाहेर जातात. त्यांनी तिथे कॉपी करू नये म्हणून वर्षभर आधी त्यांची मानसिक तयारी करावी लागते.

३० वर्षांपूर्वी एका तंबूत सुरु केलेल्या या शाळेतील धड मराठी न बोलता येणार्‍या माडीया गोंड मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यात रेणुका मनोहरांचा सिंहाचा वाटा आहे. शाळेच्या त्या पहिल्या शिक्षिका. गेली ३२ वर्ष त्यांनी या शाळेला वाहून घेतलं आहे. पहिलीच्याच वर्गाला त्या शिकवतात. कारण ही मुलं नवखी असतात. भाषा येत नसते, आंघोळ म्हणजे काय हे माहिती नसतं. मग त्या मुलांचे केस, नखं कापणं, स्वच्छ धुऊन काढणं या कामांना रेणुकाताई लागतात. वर्षभर ही मुलं रेणुकाताईंच्या ताब्यात असतात. घरची आठवणही या मुलांना त्या येऊ देत नाहीत. रेणुकाताईंच्या घरी त्यांची ही 'पिल्लं' कायम खेळत असतात. संध्याकाळी एक तास परत सगळे विद्यार्थी रेणुकाताईंच्या ताब्यात असतात. वर्षातले १० महिने शाळेत राहिल्याने त्यांचा आपल्या माडीया संस्कृतीशी संबंध कमी होतो, म्हणून रेणुकाताई कटाक्षाने त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलतात. त्यांची लोकगीतं शिकवतात. स्वच्छ शब्दोच्चारांतील संस्कृत श्लोक, माडीया लोकगीतं प्रकल्पाच्या आवारात संध्याकाळी तासभर ऐकू येत असतात.

प्रकाशकाका जसे माडीयांच्या प्रेमात पडले तसे वन्यपशुपक्ष्यांच्याही प्रेमात पडले. आज हेमलकसा प्रकल्पात एक वन्यप्राणी अनाथालय आहे. यात बिबट्या, सिंह, अस्वल, तडस, कोल्हे, मोर, ससे, माकडं, पाणमांजर, देवखारी, मसन्याउद, साळींदर, अजगर, साप, मगरी, नीलगाय, सांबर, चितळ, भेकर, धनेश, घुबड, घार असे सगळे पशुपक्षी आहेत. हे सर्व वन्यजीव अनाथ आहेत म्हणून मैसूरच्या 'झूप्रिंटच्या' संपादिका सॅली वॉकर यांनी त्याला ' डॉ. प्रकाश आमटेज वाईल्ड लाईफ ऑरफनेज' असं नाव दिलंय. एकेका अनाथ वन्य जीवाचं प्रकल्पात आगमन झालं, आणि हे वन्यजीव अनाथालय तयार झालं. प्रकाशकाका याला 'वन्यपशुपक्ष्यांचं गोकुळ' असं म्हणतात.

या गोकुळात सर्वप्रथम आगमन झालं ते एका माकडाच्या नवजात पिल्लाचं. ७४ साली उन्हाळ्यात प्रकाशकाका भामरागडच्या दिशेने संध्याकाळी सहज फिरायला निघाले होते. त्यांनी एक विदारक दृश्य पाहिलं. माकडांची शिकार करून दोन आदिवासी परत येत होते. त्यांच्या काठ्यांवर शिकार केलेली दोन माकडं लटकवलेली होती. बहुधा ती नर-मादी असावीत. माकडिणीचं पिल्लू तिच्या मृतदेहाला बिलगून बसलं होतं. काकांनी त्या आदिवासींना माकडाचं पिल्लू मागितलं पण त्यांनी ते देण्यास नकार दिला. 'आमची मुलं खातील', असं उत्तर दिलं. ' तुझ्या मुलांसाठी मी पाच रुपये देतो, पिल्लू मला दे', असं म्हटल्यावर कुठे त्या आदिवासींनी पिल्लू काकांच्या स्वाधीन केलं. काकांनी पिल्लू घरी आणलं. त्याला लहान मुलासारखं बाटलीनं दूध पाजून लहानाचं मोठं केलं. इथूनच प्रकल्पात वन्यपशुपक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली. जसजसा लोकबिरादरी प्रकल्पाचा विकास होत गेला तसतसं हे गोकुळही फुलत गेलं. प्रकाशकाका-मंदाकाकूंना माडीयांच्या मनात आदराचं स्थान मिळालं होतं. या संधीचा फायदा घेऊन काकांनी त्यांना विश्वासात घेतलं व निरपराध पशुपक्ष्यांची शिकार करण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पातील दवाखान्यात आदिवासी रुग्णांवर नि:शुल्क औषधोपचार होत असल्यानं तिथे येणार्‍या आदिवासींना उपकृत झाल्यासारखं वाटायचं. मुळात निर्धन असलेले हे आदिवासी या 'उपकारांची परतफेड' कशी करणार? मग दवाखान्याची फी म्हणून ते भामरागड परिसरात सापडलेले दुर्मिळ व पोरके प्राणी देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करू लागले.

अशाच एका रोगमुक्त आदिवासीनं १९८३च्या फेब्रुवारीमध्ये जंगलात आईविना भटकणारं बिबट्या वाघाचं एक पिल्लू प्रकाशकाकांना आणून दिलं. त्यावेळी तर त्याचे डोळेही उघडले नव्हते. बाटलीला रबरी बुच लावून त्याला दूध पाजावं लागे. पुढं ते रबरी बुच चावू लागल्यानं त्याला दूध कसं पाजायचं, असा प्रश्न प्रकाशकाकांना पडला. मग हा प्रश्न सोडवला प्रकल्पातच व्यालेल्या एका पॉमेरियन कुत्रीनं. तिनं आपल्या पिलांसोबतच बिबट्या पिलालाच नव्हे तर पिसोरी, देवखार या पिलांनाही पाजण्यास सुरूवात केली.
अनिकेत, आरती, अजिंक्य अनाथालयातील या प्राण्यांबरोबरच वाढले. काही वर्षांनी हेमल, नेगल, नेगली, राजा हे इथले रहिवासी विलास मनोहरांच्या 'नेगल'मधून घराघरांत पोहोचले. ही सगळी मंडळी पूर्वी बिनधास्त मोकळी फिरायची. आरती तर हेमलच्या पाठीवर बसून शाळेत जात असे. अनिकेत, आरती, अजिंक्य यांच्याबरोबर हेमल, नेगली, राजा यांसारख्या अनेक सिंह व चित्त्यांनी हेमलकसाच्या या शाळेत नियमित हजेरी लावली आहे. पिंजर्‍यात राहणं त्यांना अवडत नसे. मात्र प्रकल्प बघायला येणार्‍या पाहुण्यांना भीती वाटू लागल्यावर त्यांची रवानगी पिंजर्‍यात झाली. आता या भागात शिकार जरा कमी झाली आहे. अजूनही भूकेपोटी प्राणी मारले जातातच पण आदिवासी स्वतःच पिल्लं प्रकल्पात आणून देतात. (मंत्री असलेल्या या आदिवासींच्या राजानेच नुकतीच एका हरणाची शिकार केली. या आदिवासींना बोल लावून काय फायदा?) गेल्या महिन्यातच बिबट्याची पाच पिल्लं या अनाथालयात दाखल झाली. अनिकेत आता त्यांना वाढवतोय. इथे वाढलेले वन्यप्राणी पुन्हा जंगलात सोडून देण्याचाही प्रयोग करण्यात आला. मात्र त्या प्राण्यांची शिकार केली गेली. म्हणून आता सिंह, बिबटे हे प्राणी परत जंगलात सोडले जात नाहीत.

अबोल असणारे प्रकाशकाका-मंदाकाकू माणसांपेक्षा प्राण्यांशीच उत्तम संवाद साधू शकतात. 'चित्ता हा माणसापेक्षा खूप चांगला. तो कारणाशिवाय हिंस्त्र होत नाही', प्रकाशकाका सांगतात.
प्रकाशकाकांनी ३५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या कामाचा विस्तारही मोठा आणि व्याप्तीही मोठी. आज लोकबिरादरी प्रकल्पात ४० खाटांचा दवाखाना आहे. सुमारे १५०० गावांतील ४०,००० रुग्णांवर दरवर्षी येथे उपचार केले जातात. डॉ. दिगंत आणि डॉ. अनघा दिगंत आमटे तो चालवतात. गेली ८ वर्षं दिगंत प्रकल्पात काम करतोय. अनघा मुळची गोव्याची. ५ वर्षांपूर्वी लग्नानंतर अनघा इथे आली. तिचं हेमलकसावरील प्रेम, कामाबद्दलची तळमळ केवळ विलक्षण आहे. आठवड्यातील ४ दिवस दिगंत आणि मंदाकाकू रोज १-२ खेड्यांत रुग्ण तपासायला जातात. रुग्णांना दवाखान्यात अनेक मैल चालत यावं लागू नये हा हेतू. ५०-१०० पेशंट्स रोज दिगंतची आपल्या गावी वाट बघत असतात. हेमलकसाचा दवाखाना अनघा सांभाळते. माडीया गोंडांना बंदिस्त वातावरणात राहायला आवडत नाही. त्यामुळे अगदीच गंभीर अवस्थेतले रुग्ण वगळता बाकी सगळीजणं दवाखान्याबाहेर झाडाखाली राहतात. आतल्या खोल्या ओस पडलेल्या असतात. अनघासुद्धा उन्हा-पावसात दिवसभर झाडाखालच्या त्या दवाखान्यात काम करते. माडीयांचा तिने विश्वास कमावला आहे. त्यांची भाषा ती उत्तम बोलते. गंभीर अवस्थेतील अनेक पेशंट्स तिने बरे केले आहेत. काही महिन्यांपूर्वी बस्तरहून एक महिला चालत दवाखान्यात आली. नदीतून पाणी भरताना मगरीने तिचा हात धरला होता. कसाबसा तिने तो सोडवला, पण पंजापासून जवळजवळ तुटला. केवळ radial artery काय ती शाबूत राहिलेली. तीन दिवस चालत ती जेव्हा दवाखान्यात आली तेव्हा जखम पूर्णपणे सडली होती. हात पंजापासून कापून टाकण्याशिवाय पर्यायच नव्हता. मात्र हेमलकसात २ दिवस वीज नव्हती. तोपर्यंत ऑपरेशन करणंही शक्य नव्हतं. २ दिवस antibioticsचा dose देऊन वीज आल्यावर मग अनघानं ऑपरेशन केलं. त्या स्त्रीचा जीव वाचवला.

सेरेब्रल मलेरिया, टिबी या रोगांचं प्रमाण आजही खूप आहे. अपुरं अन्न आणि टिबीमुळे तिशीचा पुरूष सत्तरीचा दिसू लागतो. तंबाखू आणि गुटख्यामुळे तोंडाचे आणि घशाचे विकारही भरपूर. पूर्वी साप चावला की लोक मांत्रिकाकडे जायचे. आता हे जवळजवळ संपल्यात जमा आहे. पण क्रेटसारखा साप चावला की दिगंतची कसोटी लागते. कारण हा साप चावल्याचं लवकर लक्षातच येत नाही. एखादा मांत्रिक गावकर्‍यांनी बांबूचे कंद खाऊ नये, असा फतवा काढतो, आणि मग सहा महिन्यांत अनघाच्या दवाखान्यात स्कर्व्ही झालेले रुग्ण यायला सुरुवात होते. शिवाय कुपोषण आणि पंडुरोग. माडीयांकडे खरंतर गायीगुरं भरपूर असतात. पण गायीचं दूध मात्र वर्ज्य. कारण त्या दुधावर केवळ वासराचाच हक्क आहे अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रिया व लहान मुलांचं कुपोषण ही मोठी समस्या दिगंत-अनघापुढे आहे. त्यात वीजेचा अजूनही भरवसा नाही. पावसाळ्यात किंवा झाड पडल्यामुळे/नक्षलवाद्यांनी पाडल्यामुळे दिवसच्या दिवस वीज गायब असते. त्यातून मार्ग काढत काम करत राहायचं. आणि आता तर एका अतिशय गंभीर समस्येने दिगंत-अनघाला चिंतेत टाकलं आहे. १९७१ सालच्या युद्धानंतर सरकारने बांगलादेशी निर्वासितांना चंद्रपूर जिल्ह्यात जागा दिली होती. त्यांची लोकसंख्या वाढल्यानंतर त्यांनी भामरागडच्या प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी केली. २ वर्षांपूर्वी त्यांच्यापैकी दोघंजणं HIV positive असल्याचं निष्पन्न झालं. हा प्रसाद बांगलादेशींकडून या माडीयांना सहज दिला जाऊ शकतो. माडीयांचं लैंगिक जीवन अतिशय मुक्त असतं. त्यांना सुरक्षित लैंगिक संबंधांबद्दल कसं समजावून सांगणार? AIDSच्या संकटाला सामोरं जायची तयारी आता लोकबिरादरी प्रकल्पानं सुरू केली आहे. रविवारी माडीयांचा बाजार असतो. अनघा दर रविवारी एकेका गावात जाऊन कुपोषणाबरोबरच AIDSबद्दलसुद्धा बोलते.
गावातल्या महिलांना घेऊन तिला आता बचत गट सुरू करायचे आहेत. शाळेतल्या मुलांनी, गावकर्‍यांनी तयार केलेल्या बांबूच्या सुरेख वस्तू विकून त्यांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे.
आर्थिक समस्या तर कायमच्याच आहेत. प्रकल्पाच्या दवाखान्यात उपचारांसाठी आदिवासींकडून एकही पैसा घेतल्या जात नाही. दवाखाना, शाळा आणि प्राण्यांचं संगोपन यासाठी लागणारा सारा खर्च देणग्यांतून केला जातो. प्रकल्पाचा महिन्याचा खर्च असतो साधारण दोन लाख रुपये. पुढच्या महिन्याचा खर्च कसा भागणार ही कायमची चिंता असते. प्रकल्पाच्या खर्चासाठी २ कोटी रुपयांचा corpus fund तयार करण्याची योजना आहे. खरं तर हल्ली ही रक्कम फार मोठी राहिलेली नाही. पण हे काम सहजासहजी होणार नाही, हे खरं. पं. मदनमोहन मालवीय यांचं एक वाक्य मी कधीतरी वाचलं होतं. 'देश के हर द्वार पर एक दाता खडा है अपनी खुली थैली हाथों लिए, लेकिन कमी उन हाथों कि है, जिन में वह अपनी थैली दे सके |' लोक भरभरून मदत करायला तयार असतात, फक्त घेण्याची पत्रता असलेले हवेत. दुर्दैवाने मालवीयजींचं हे वाक्य आज खोटं ठरतंय. 'सकाळ'मध्ये एक छोटीशी बातमी आल्यावर दुसर्‍या दिवशी चांदीच्या रथासाठी २५० किलो चांदी गोळा होते. इथे मात्र लाखभर माडीयांच्या आरोग्यासाठी आमट्यांना लोकांसमोर झोळी पसरावी लागते.

शिवाय लोकबिरादरी प्रकल्पाची गडचिरोली जिल्ह्यात काम करणार्‍या इतर काही प्रकल्पांशी अतिशय चुकीची तुलना केली जाते, ती वेगळीच. आदिवासींसाठी काम करणारे हे प्रकल्प गडचिरोली शहराजवळ आहेत. तिथले आदिवासी हे शहराजवळ राहत असल्याने थोडेफार शिकलेले आहेत. शिवाय तिथे नक्षलवादाचा धोका अजिबात नाही. वन्यप्राणी नाहीत. त्यामुळे outreach programmes सहज राबवता येतात. याउलट आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी हे नक्षलवाद्यांचे बालेकिल्ले. इथले आदिवासी खरोखरच आदीम. मुळात त्यांना दवाखान्यात आणण्यातच भरपूर वेळ आणि शक्ती खर्च करावी लागली. त्यांच्यातून आरोग्यदूत तयार करणं अशक्य नसलं तरी अतिशय कठीण आहे. शिवाय आरोग्यदूतांनी नक्षलवाद्यांना औषधं दिली तर पोलीस त्रास देतील, आणि नाही दिली तर नक्षलवाद्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये. लोकबिरादरी प्रकल्पाने काही वर्षांपूर्वी ८ गावांमध्ये छोटे दवाखाने सुरू केले होते. पण नक्षलवादी आणि पोलीसांच्या त्रासामुळे ते बंद करावे लागले. आता फक्त येचली या गावी एक दवाखाना सुरू आहे. परत प्रकल्पाचं काम research oriented नाही. Medical journals मध्ये पेपर छापण्यात किंवा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आदिवासींच्या आरोग्यावरचे पेपर्स वाचण्यात प्रकाशकाकांना रस नाही, आणि हेमलकसाला दवाखाना उघडण्यामागील तो उद्देशही नव्हता. गेल्या ३५ वर्षांत दवाखान्यात उपचार घेतलेल्या प्रत्येक रुग्णाचं medical record व्यवस्थित जतन करून ठवलेलं आहे. पण त्याचा उपयोग केवळ आदिवासींसाठीच व्हावा याकडे कटाक्ष आहे. शिवाय हे आरोग्यदूत तयार कोणी करायचे? आमट्यांच्या घरातले ४ डॉक्टर्स १००-१५० मैलांवरून येणार्‍या आदिवासींची काळजी घेत असतात. आरोग्यदूत तयार करण्यापेक्षा आदिवासींच्या मुलांना शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं तर बर्‍याच समस्या सुटू शकतात, हे अतिशय सोपं सूत्र आहे. गडचिरोलीत इतर कोणीही आदिवासींना 'शिक्षण' देण्याचा प्रयत्न केलेला नाही. मुंबई-पुणे-अमेरिकेतील funding agenciesना दुर्दैवाने हे समजवून घ्यायची इच्छा नसते. गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी पाय ठेवलेला नसतो. 'ते अमुक असं करतात, मग तुम्हीही तसंच का करत नाही?', असं प्रकाशकाकांना विचारलं जातं. 'तुम्ही येऊन करा इथे हे काम.प्रकल्पात आपलं स्वागतच आहे ', हे प्रकाशकाकांकडून ऐकल्यावर हे वाचावीर गप्प बसतात. प्रकाशकाकांचा अशा कामांना विरोध अजिबात नाही. पण ते कोणी करायचं हा प्रश्न आहे. शिवाय या आदिवासींची अनेक शतकं अबाधित राहिलेली अशी जीवनशैली आहे. त्यांनी लगेच सारे बदल स्वीकारावेत ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. उत्तम आरोग्य, अन्यायाचा प्रतिकार इ. शब्द त्यांनी केवळ काही वर्षांपूर्वी ऐकले आहेत. कपडेही न घालणारे हे माडीया गोंड मलेरियावर उपचार कसे करू शकतील?

या आदिवासींना मागास ठरवणंसुद्धा प्रकाशकाकांना मान्य नाही. हा स्त्रीसत्ताक समाज आहे. लग्नात नवर्‍या मुलीला हुंडा मिळतो. मुलगी जन्मल्यावर इथे तोंडं वाकडी होत नाहीत. चोर्‍या, खून असले प्रकारही सहसा घडत नाहीत. मग शहरीकरणाच्या मोजपट्ट्या इथे का वापरायच्या?
पण तरीही या सगळ्यांना तोंड देत आमट्यांचं काम सुखेनैव सुरू आहे. जीवननिष्ठा म्हणजे काय याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण. म. गांधींनी साधनशुचितेचा आग्रह धरला होता. आमट्यांनी तो प्रत्यक्षात आचरला. शाळेला अनुदान मिळू लागल्यावर रेणुकाताईंना मिळणारा पगार वाढला. मात्र प्रकाशभाऊंपेक्षा जास्त मानधन कसं घ्यायचं, म्हणून गेली अनेक वर्षं रेणुकाताई प्रकाशकाकांइतकंच मानधन घेतात. विलासकाकांनी 'नेगल'ची रॉयल्टी म्हणून मिळालेले लाख-दोन लाख रुपये सहज प्रकल्पाला देऊन टाकले. आपण सगळ्याचंच विकृतीकरण करत चाललोय. त्याग, समर्पण, निरपेक्ष सेवा वगैरे शब्द कोशात सुखेनैव नांदत आहेत. तरीही गेली अनेक वर्षं ही माणसं प्रवाहाविरुद्ध वल्हं मारताहेत.
आपल्या निष्ठा, आपला मूल्यविवेक, आपला साधेपणा आणि सचोटी शाबूत ठेवून अनेक सच्चा माणसांना जी नेहमी बरोबर बाळगावी लागते ती हताशेची शिदोरीही सांभाळली आहे.

आणि तरीही निखळ आनंद म्हणजे काय ते मी दिगंत आणि अनघाकडून शिकलोय. टिबी, मलेरिया, अडलेल्या बाळंतिणी, फ्रॅक्चर्स, अस्वलाने फाडलेले, वाघाने फोडलेले.. कुणी ६० किमी चालत आलाय, कुणी ८०.. हिलमाडीया तर १२५ किमी चालत येतात. या शहारे आणणार्‍या रानात अथक काम करताना मी या दोघांना पाहिलंय. आणि अशा प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा ही मंडळी कायम हसतमुख. दिगंत, अनघाचा चढा, खडा सूर लागलेला मी अजून बघितलेला नाही. प्रौढी तर दूरच, पण आपण काही जगवेगळं करतो आहोत, याचा लवलेशही या दोघांच्या वागण्यात नसतो. या माझ्या मित्रांकडे साधेपणा आहे, जिद्द आहे, पण आवेश नाही. चिंता आहेत, पण उच्चार नाही. निर्लेपता आहे, पण कोरडेपणा नाही. दिगंत-अनघासारखं इतकं निखळ, विशुद्ध असं, काही खूप दुर्मीळ होत चाललंय.

आपल्या 'अस्तित्त्वाची' किंमतही मला हेमलकसात कळली आहे. एरवी आपण आपलं अस्तित्त्व इतकं गृहीत व हक्काचं समजतो की त्याचा उपयोग फक्त आपला अहं वाढवण्यात, चोचले पूर्ण करण्यात व इतरांना ओरबाडण्यात आपण सहज करत असतो. हे आपलं फक्त 'असणं' किती महत्त्वाचं असू शकतं, हे हेमलकसानं मला शिकवलंय. प्रकाशकाका-मंदाकाकू-विलासकाका-रेणुका मनोहर-दिगंत-अनघा-अनिकेत यांचं असणं, लोकबिरादरी प्रकल्पाचं असणं, हे त्या माडीया गोंडासाठी किती महत्त्वाचं ठरलं. प्रकाशकाका तिथे गेले तेव्हा नांगरणीसुद्धा त्या लोकांना ठाऊक नव्हती. जग कधीच आधुनिकतेकडे निघालेलं. तिथे मात्र शाळा सुरू झाली ती १९७६ साली. हॉस्पिटल सुरू झालं आणि सेरेब्रल मलेरियाचा पेशंट जगू लागला. आज हेमलकसापासून ४०-५० कि.मी. वर राहणारा एका उपाशी घरातला पांडू मुंबईत एमबीबीएस होतो, तेव्हा प्रकाशकाका-दिगंतच्या त्या असण्याबद्दल समजतं. अन्यथा आज पांडू कदाचित जिवंतही नसता.

प्रकाशकाका-मंदाकाकूंना 'India's Schweitzer couple' असं म्हणतात. Albert Schweitzerने सांगितलेले 'Reverence for Life' चे तत्त्वज्ञान ते प्रत्यक्ष जगले आहेत. आणि आता दिगंत-अनघाही त्याच वाटेवर आहेत.
मी खूपदा हा विचार करतो.. प्रकाशकाकांचं ठीक आहे, पण दिगंत-अनघाचं बळ कुठलं? कसं जमत असेल त्यांना हे?
ही दोघं माझ्यापेक्षा २-५ वर्षांनी मोठी. जेमतेम तिशी गाठलेली. माझ्या पिढीला खुणावणारी आकर्षणं मला चांगलीच ठाऊक आहेत. मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वैशाली, CCD यांशिवाय आमचा आठवडा काही पूर्ण होत नाही. हेमलकसा जगापासून तुटलेलं. तिथे वर्तमानपत्रसुद्धा तीन दिवसांनी मिळतं. टिव्ही, सिनेमा, हॉटेलं या मुलभूत गरजांचा पूर्ण अभाव. सरकारी अधिकारी, राजकारणी इथे चुकूनही येत नाहीत. त्यामुळे कुरियर वगैरे तर खूप दूरची गोष्ट.
मनात आलं तर त्यांना मुंबई-पुण्याकडे प्रॅक्टीस करता आली असती. उत्तम व्यावसायिक डॉक्टर म्हणून त्यांनी नाव काढलं असतं. इंजिनीयर झाल्यावर सॉफ्टवेअरमध्ये न जाता भौतिकशास्त्रात संशोधन करायचं ठरवल्यावर माझ्यावर 'वाया गेल्याचा' शिक्का बसला होता. त्या पार्श्वभूमीवर दिगंत-अनघाच्या वेडेपणाला काय नाव द्यायचं?
दिगंत यावर नुसतंच हसतो. त्याच्या मते ही सगळी त्याचीच माणसं आहेत. हा परिसर त्याचाच, आणि त्या परिसरातल्या समस्याही त्याच्याच, मग तक्रार कसली?.. आणि त्रास झाला तरी 'आपलीच खाज, बोंबलायचं कशाला?'..
असं वागणं सगळ्यांनाच जमलं असतं तर?
ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीचं आपण काहीतरी नक्कीच देणं लागतो. आपलं घर, आपला परिसर आणि आपली भूमी ह्या सार्‍याला का नाही आपण एकाच कुटुंबाच्या संज्ञेत बसवत?
वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. आमची वैचारिक पातळी आमच्या घरापासून सुरू होते व आमच्या बुद्धीची कुवत बहुतेक कमीच म्हणून ती पातळी तेवढीच राहते. नाही आम्ही विचार करू शकत अजून काही कुटुंबांचा, सभोवतालचा आणि पर्यायाने आपल्या देशाचा, त्यात राहणार्‍या आमच्याच काही बांधवांचा.
आपला जन्म भामरागड/बस्तरच्या जंगलात झाला असता, किंवा आपण अपंग/अंध म्हणून जन्माला आलो असतो, तर कदाचित आपल्याला आमटे, सिंधूताई सपकाळ, नसीमा हुरजूक या मंडळींचं मोठेपण कळलं असतं. एरवी आमचा काय संबंध?

कधी कधी मनाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात वाटतं इतकं निर्ढावलेलं मन घेऊन आपण जगू तरी कसं शकतो? समोर जे दिसतं ते वाईट आहे. हे कुठेतरी थांबायला हवं असं प्रत्येकाला का नाही वाटत? कधीतरी विलक्षण नैराश्य येतं, पण अगदी थोडा वेळ. कारण तोपर्यंत फक्त स्वतःचा असा एखादा विचार उसळी मारून वर येतो व हे मनातल्या मनातच राहतं.
मग दिगंत-अनघाशी फोनवर बोललं की खूप बरं वाटतं.
त्यांचं आश्वासक, प्रसन्न बोलणं ऐकलं की जगात चांगुलपणा शिल्लक आहे, माझ्याही हिश्श्याची जबाबदारी माझे हे मित्र आनंदाने पेलतील ही खात्री पटते..

------------------------------------------------------------------------------------


prakash_manda.jpgमाडीया रुग्णांबरोबर डॉ. प्रकश व डॉ. मंदा आमटे

------------------------------------------------------------------------------------
prakash_animals.jpgप्रकल्पातील 'गोकुळातील' प्राण्यांबरोबर प्रकाशकाका

------------------------------------------------------------------------------------animal_orphanage.jpgअनाथालयातील प्राण्यांबरोबर अनिकेत

------------------------------------------------------------------------------------ digant_anagha.jpgप्रकल्पातील दवाखान्यात डॉ. दिगंत व डॉ. अनघा आमटे. डावीकडे मगरीने हल्ला केल्यामुळे हात गमावलेली बस्तरमधील आदिवासी स्त्री.

------------------------------------------------------------------------------------ patients.jpg
१. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेला आदिवासी पुरुष. अक्षरशः नारळ सोलावा तसं अस्वल माणसाला सोलून काढतो. अस्वलाने जखमी केलेले असे पेशंट्स कायमच दवाखान्यात येत असतात.
२. गालगुंड झालेली आदिवासी स्त्री.
३. चार भिंतींत राहायला आवडत नाही, म्हणून दवाखान्याबाहेर राहणारे पेशंट्स आणि त्यांचे कुटुंबीय.
४. भाजलेली आदिवासी स्त्री.

------------------------------------------------------------------------------------Baba_s__Birthday.jpgबाबांच्या एका वाढदिवशी, डावीकडून-अर्णव, अनघा, डॉ. शीतल विकास आमटे, दिगंत, कौस्तुभ विकास आमटे, आरती, आणि बाबा.

------------------------------------------------------------------------------------
arnavanimals.jpgआमट्यांची चौथी पिढी.. चि. अर्णव दिगंत आमटे

------------------------------------------------------------------------------------
लोकबिरादरी प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी त्यांची वेबसाईट- http://lokbiradariprakalp.org/
------------------------------------------------------------------------------------

उत्तम गुणाची मंडळी | सत्त्वधीर सत्त्वागळी
नित्यसुखाची नव्हाळी | जेथे वसे ||

( दशक १, समास ८. सभास्तवन - दासबोध )
------------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

खुप छान मांडलीय माहिती. अर्थात वाचताना जसे सगळे सहज झाले असे वाटते तितके सहज नक्किच झाले नसणार हे सगळे...

बाबांच्या तिस-या पिढीतही हा आदर्शवाद कसा आला असावा, त्यांच्या मुलगा-सुनेने आणि पुढे नातू-नातसुनेने ही याच कार्याला वाहुन घेतलंय, आपण सहज जंगलभेट म्हणुनही जिथे जाणार नाही तिथे जाउन हे लोक राहाताहेत याचंच आश्चर्य वाटत राहातं.. माझ्या गावी मुलांच्या शिक्षणाची सोय चांगली नाही म्हणुन लोक तालुक्याला जाउन राहताहेत, आणि इथे जंगलातल्या शाळेत शिकुन मुले पुढे डॉक्टर आणि वकिल होताहेत...

त्यांचं आश्वासक, प्रसन्न बोलणं ऐकलं की जगात चांगुलपणा शिल्लक आहे, माझ्याही हिश्श्याची जबाबदारी माझे हे मित्र आनंदाने पेलतील ही खात्री पटते..

खरंच त्यांचे खांदे आहेत इतके बळकट्....आपल्याला नाही जमणार हे.

चिनु, माहितीबद्दल परत एकदा धन्यवाद.... आजच्या जमान्यात असेही लोक आहेत याची माहिती तुमच्यामुळे होतेय...
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

चिनू,
खरचं काय लिहु ते सुचत नाही आहे. वाचतांना भावनांचा कल्लोळ होतोय. परत एकदा सगळ्या जुन्या जुन्य आठवणी ना उजाळा मिळाला.
वाचुन अगदि सुन्न झाले. आज कळतय कि नही म्हणत असतांन देखिल आई बाबा हेमलकस्याला क न्यायचे. अजणते पणी झलेले ते संस्कार आज उपयोगी पड्तात. बाबा (आमटे) विषयी कही बोलवे ही माझी लायकि नाही. त्याना भेटु शकले ही मझी पुण्यायी...... परत एकदा महापुरुषा समोर नतमस्तक व्हावे ......

काय लिहु??? शब्दच सापडत नाही.....

चिन्मय.. खरंच शब्द सापडत नाहीयेत. बाबा-साधनाताई, प्रकाशदादा-मंदाताई ह्यांच्याबद्दल वेळोवेळी वाचलं होतं. बाबांच्या भारतभ्रमणादरम्यान त्याना भेटलेही होते. पण ह्या तिसर्‍या पिढीचं कार्य इतक्या विस्तृतपणे माहीत नव्हतं. त्यांचं कौतुक तर कराव तितकं कमीच आहे. पैसे, अधिकार कमावण्याच्या एवढ्या संधी उपलब्ध असताना आणि सतत खुणावताना असं विरक्त राहायचं.. खरच हॅट्स ऑफ... हेमलकशाला जायची फार पुर्वीपासुनची इच्छा आहे. आता लवकर जमवायला पाहीजे....

खुप छान लिहिलंत. हेमलकसा विषयी माहिती होती. आता नव्याने ओळख झाली. खरोखर खुप अवघड आहे हेमलसा सारख्या ठीकाणी जाउन तिथे काम करणं.
.
प्रकाशकाका जसे माडियांच्या प्रेमात पडले तसे वन्यपशुपक्ष्यांच्याही प्रेमात पडले >>>> श्री. प्रकाश आमटे यांचे आमच्या श्रीरामपुरच्या घरी १-२ वेळा येणे झाले आहे. पहिल्यांदा आले तेव्हा आमच्या घरी पप्पु नावाचा कुत्रा आणि सोनी नावाची मांजरी होती. त्यांची अर्थातच पप्पु/सोनीशी पटकन दोस्ती झाली. नेगल्/हेमलशी खेळलेले प्रकाश आमटे, त्यांना दाखवायला आपल्याकडे कमीत कमी एक कुत्रे आणि एक मांजर तरी आहे असे तेव्हा मला वाटले होते. {कोणाचे काय न कोणाचे काय. शाळेत होते मी तेव्हा. आत्ताचे वय बघितले तर माझ्या "बालपणीची" आठवण आहे ही Wink }

चिन्मय, हे सर्व वाचून मन हेलावून गेलं अगदी. हे सर्व जीव ओतून तू लिहिलसं त्याबद्दल तुझे लक्ष लक्ष आभार.

मी काल पासून हे २ दा वाचलं, पण प्रतिक्रिया काही सुचत नाही. त्यांच्याबद्दल इतर ठीकाणीही बरंच काही वाचलं आहे, आणि अपार आदर आहे.

चिनूक्स, हेमलकसाबद्दल वाचलं होतम. पण इतकी सविस्तर तुझ्या लेखामुळे मिळाली...

पैसे, अधिकार कमावण्याच्या एवढ्या संधी उपलब्ध असताना आणि सतत खुणावताना असं विरक्त राहायचं >>
सरीविना .. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी .... ही फार फार वरची लोकं आहेत ....

चिन्मय .. छान लिहीलं आहेस .. कितीदा विचार केला तरी निर्णय घेता येत नाही ... असो ..

ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीचं आपण काहीतरी नक्कीच देणं लागतो. आपलं घर, आपला परिसर आणि आपली भूमी ह्या सार्‍याला का नाही आपण एकाच कुटुंबाच्या संज्ञेत बसवत?
वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. आमची वैचारिक पातळी आमच्या घरापासून सुरू होते व आमच्या बुद्धीची कुवत बहुतेक कमीच म्हणून ती पातळी तेवढीच राहते. नाही आम्ही विचार करू शकत अजून काही कुटुंबांचा, सभोवतालचा आणि पर्यायाने आपल्या देशाचा, त्यात राहणार्‍या आमच्याच काही बांधवांचा. >>>>>

अगदी तुझ्यातला कार्यकर्ता बोलतोय. आपण काहीतरी सुरु करायला पाहीजे आता. अगदी मायबोलीवरील जे लोक खरच उत्सुक असतील त्यांचा सोबत तरी. एकदा चार लोक ऐकत्र आले तर काय करता येईल याचा अंदाज घेता येईल.

डॉ प्रकाश आमट्यांच्या कार्या बद्दल आधी वाचल होत, पण चिनुक्स, तु फारच मनातुन लिहील्यामुळे ते अगदी पोचल.
मी देखील वनवासी कल्यान मध्ये काम केले आहे. किनवट, माहुर येथील जंगलात. आमटे,बंग. पाटकर कुटुंबीयांचे मानसिक संतुलन काय जबरी असेल ह्याची पुर्ण नाही तरी थोडीशी कल्पना करु शकतो.

आमटे कुटुंबियांचं कार्य खरोखरंच शब्दातीत आहे. (चिन्मय, ह्यात तुझ्या लेखनाला कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. तू काळाजाला हात घालणारं लिहिलं आहेस!)
काही महिन्यांपूर्वी डॉ. मंदा आमटे आणि डॉ. प्रकाश आमट्यांच्या भेटीचा योग आला. कॅनडियन सरकारकडून ह्या प्रकल्पाला अनुदान मिळणार होतं. ते स्विकारायला आणि त्यानंतर अमेरिकेला भेट द्यायला दोघेही आले होते. हेमलकश्याच्या प्रॉजेक्टवर डॉक्युमेंटरी दाखवली गेली. दोघांच्याही तोंडून प्रकल्पाबद्दल आणाखी ऐकायला मीळालं. प्रचंड अस्वस्थ करून टाकणारं होतं सगळच. त्यांच्याच शब्दातून ऐकलेली, आणखी (अगदीच) थोडी भर...
दवाखान्याच्या सुरवातीला, येणार्‍या पेशंटला एक कार्ड मिळत असे. पुढल्या खेपेला ते बरोबर घेऊन यायचं, म्हणजे आधीच्या ट्रीटमेंटची माहीती मिळावी. पण दर वेळी कार्ड गहाळ झालेलं. चंद्रमौळी झोपडीत सुरक्षीत ठेवण्याजोगं काही नाहीच तर कार्डाला जागा कुठे? म्हणून दवाखान्यातच रेकॉर्ड ठेवला जाऊ लागला.
एक आई ५-६ वर्शांचं, तापानी मलूल झालेलं पोर घेऊन दवाखान्यात आली. मुल डीहायड्रेट होऊन अगदी मृत्युच्या दारात. त्याला ऍडमीत करून जरा स्थीर केल्यावर आई म्हणाली, "ह्याला बघा, मी घरी जाऊन येते." मंदाताईंना वाटलं, 'कसली ही आई, असं सिरियस झालेलं पोर सोडून जातेय.' तीला तसं विचारल्यावर उत्तर आलं, "हा जगला तरी. धाकटा गेला. त्याला तुटक्या फांद्यात झाकून आलेय. त्याचं सगळं उरकायचय." कल्पनेच्या पलीकडलं भयानक!
कँसरस ट्युमरचं एका वृध्द बाईवरचं अंगणातलं ऑपरेशन, कित्तेकांची भयानक रोगातून मुक्ती आणि हे सगळं कुठल्याही फळाची अपेक्षा न करता!!!!!!
आमटे दांपत्याची भेट झाली देवळालगतच्या हॉलमधे. प्रत्येकाच्या डोळ्याला धारा लागलेल्या! खरं सांगायचं तर त्यादिवशी देवदर्शनाला देवळात जायची गरज वाटली नाही!
चिन्मय पुन्हा एकदा, अप्रतीम लिहिलंय!

चिनूक्स, तुम्ही लिहिलेली माहिती मौल्यवान आहे. तुम्ही डॉ. प्रकाश आमटे ह्याना ओळखता असे वाटते.वर असेही वाचले की त्याना ह्या प्रकल्पासाठी २ कोटींची गरज आहे.
कृपया ह्या लिन्क वर जाऊन पहा http://www.rd.com/makeitmatter.do
रीडर्स डायजेस्ट ह्या वर्षी आवाहन करत आहे की, ते १ लाख डॉल्लर्स अश्या संस्थेला अनुदान देतील, जी संस्था मूलांसाठी काम करते आणि त्याना समाजपयोगी बदल करायला शिकवते. मला वाटते हा प्रकल्प अश्या गटात येउ शकेल कारण ते सर्व वयाच्या माणसांसाठी काम करत आहेत.
जर योग्य वाटले तर तो फॉर्म भरता येइल तुम्हाला. पण करायचे असेल तर लगेच करावे लागेल कारण फक्त ह्याच वर्षी आहे. नाहीतर त्यांच्याशी स्वतंत्र संपर्क साधून आवाहन करू शक्ता येइल का पहाणे. तुम्ही किंवा संस्थेशी संबंधीत कोणि केले तर बरे.

चिन्मय, तू नेहेमी माणुसकीच्या बाबतीत आणि माहितीपूर्वक लिहितोस. त्याबद्दल कौतुक कराव तेवढं थोडं आहे.
BMM च्या निमित्ताने मंदाताई आणि प्रकाशदादांची भेट झाली होती. माणुसकी, विनम्रता, शांती ह्या सगळ्याच ते मूर्तिमंत प्रतिक आहेत्. त्यांची मुलही त्यांच्या पावलावर पावलं टाकत आहेत. त्यावरून मी त्यांना म्हटल होतं मुलं अनुकरणाने शिकतात. हे तुमच्याबाबतीत केवढं खरं आहे. तीन पिढ्या केवढ्या नेटाने झटत आहेत. अशा लोकांना पाहिल्यावर देवाच अस्तित्व कोण नाकारू शकेल?

ऑनलाईन पैसे पाठवले आहेत का कोणी?

केदार शी पुर्ण सहमत !! आपण ही काही तरी मार्ग शोधला पाहीजे.........

चिनूक्स, दोनेक महिन्यांपुर्वी प्रभादेवीच्या पु.ल.देशपांडे अकादमीमध्ये हेमलकसामधल्या कार्याबद्द्ल एक प्रदर्शन भरले होतं, मी पाहिलं होतं जाऊन, हेच फोटो होते तिथं......

इतक्या निरलसपणे हे काम करणारी ही मंडळी खरंच महान आहेत,

मंड्ळी, आपण आदिवासी मुला/मुलीच्या शिक्श्णासाटी पैसेसुध्दा पाटवू शकतो, अर्थात हेमलकसाला कुरीयर जाऊ शकत नाही त्यामुळे डीडी पोस्टाने पाटवावा लागतो एव्द्ड्चं, आपण निदान एव्ह्द तरी करायला हवं

चिनूक्स, ही माहिती इथे टाकल्याबद्द्ल खूप धन्यवाद Happy

मंड्ळी, टिच (टीइएसीएच)डॉट टाईम्सऑफइंडिया डॉट कोम वर सुध्दा जाऊन पहा, चांगला उपक्रम दिसतो आहे, ही माहिती आणखी कुटे टाकायची माहित नाही म्हणून इथे टाकली, चूकभूल द्या. घ्या.

चिनॉक्स धन्यवाद .. नक्कीच भेट द्यायला हवी असा प्रकल्प आहे.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

सगळ्यांना प्रतिक्रीयांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..

सुनिधी,
RD च्या माहितीबद्दल आभार. मी अनघाला ही लिंक पाठवली आहे, १-२ दिवसांत आम्ही हा फॉर्म भरून पाठवू..

saanjya,
ऑनलाईन पैसे पाठवायचे असतील तर,

Details of Overseas Funds Transfer to Maharogi Sewa Samiti, Warora,
through SWIFT
*Beneficiary Name:
Maharogi Sewa Samiti, Warora
*Beneficiary Address:
At-Post: Anandwan, Tah: Warora,
Dist: Chandrapur,
Maharashtra State (India)
Pin: 442 914
Phone: +91-7176-282034, 282425
Fax: +91-7176-282034
E-mail: anandwan@gmail.com
*Beneficiary Bank Account Number:
048010100301343
*Beneficiary Account Name:
Maharogi Sewa Samiti, Warora
*Beneficiary Bank Name:
Axis Bank Limited
* Beneficiary Bank Address:
M. G. House, Rabindranath Tagore Road,
Besides Board Office, Civil Lines,
Nagpur - 440 001
Maharashtra State,
India
Phone No.: +91-712-2555647 / 2601699
*Beneficiary Bank Swift Code:
UTIBINBB048

***
पैसे पाठविताना कृपया 'लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसासाठी' असा स्पष्ट उल्लेख करावा..

अन्यथा, 'लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा' या नावाने काढलेले चेक्स/डीडी स्वीकारले जातील.
'MSSO'सुद्धा याबाबतीत आपली मदत करू शकेल.

अधिक माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लोकबिरादरी प्रकल्पाला आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. या वर्षाखेर निदान १ कोटी रू. जमू शकले, तर त्या व्याजातून हा प्रकल्प स्वयंपूर्ण होऊ शकेल.
यासंबंधी आपण काही मदत करू शकत असल्यास कृपया जरूर संपर्क साधावा..

अखी, केदार,
धन्यवाद, आपण एकत्र येऊन नक्कीच काहीतरी करू शकतो..

ashbaby, sarivina, bee, mrinmayee, meenu,
नोव्हेंबर ते मार्च हा काळ हेमलकसाला जाण्यासाठी चांगला, शक्य असल्यास एकदा प्रकल्पास जरूर भेट द्या..

खुपच चांगली माहिती चिन्मय. मला प्रकाश आमटे नंतरची पिढीपण समाजसेवेत कार्यरत आहे हे माहीत नव्हते. खरच आपण सगळ्यांनी एकत्र येवुन काही तरी करायला हवे.

चिन्मय्,अतिशय अप्रतिम लेख.परत परत वाचले.मल तरी वाटते सम्पुर्ण लेखाचा मतार्थ दडला आहे ह्यातः
आपला जन्म भामरागड/बस्तरच्या जंगलात झाला असता, किंवा आपण अपंग/अंध म्हणून जन्माला आलो असतो, तर कदाचित आपल्याला आमटे, सिंधूताई सपकाळ, नसीमा हुरजूक या मंडळींचं मोठेपण कळलं असतं. एरवी आमचा काय संबंध? कधी कधी मनाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात वाटतं इतकं निर्ढावलेलं मन घेऊन आपण जगू तरी कसं शकतो? समोर जे दिसतं ते वाईट आहे. हे कुठेतरी थांबायला हवं असं प्रत्येकाला का नाही वाटत? कधीतरी विलक्षण नैराश्य येतं, पण अगदी थोडा वेळ. कारण तोपर्यंत फक्त स्वतःचा असा एखादा विचार उसळी मारून वर येतो व हे मनातल्या मनातच राहतं." अगदी वस्तुस्थिती. किती तरी वेळा असे काही आढळले की अगदी ह्याच विचारसरणीतुन गेलोय मी
पण. शेवटी महत्वाचे आणी आनंदाची बातमी म्हणजे,आमटे कुटुंबिय देव माणसं कशाचीही पर्वा व अपेक्षा न करता
रात्रंदिवस समाजासाठी राबत असतात अन चिण्मसारखाकुणी एकाने आरोळी दिल्यावर तिला प्रतिसाद द्यायला
अजुनही हात वर होत आहेत. पुन्हा एकदा विस्त्रुत माहिती बद्दल मनंपुर्वक आभार.

चिन्मय हे जे काही लिहिलयस त्याला नुस्ती माहिती म्हणवत नाहीये माझ्याच्याने. हे म्हणजे सावरकरांच्या 'ने मजसी ने' ला निव्वळ कविता म्हणण्यासारखं आहे. तुझी तळमळ सर्वत्र जाणवते. सुंदर चित्रण आहे हे. तितकच डोळे उघडणारंही. हे आव्हान आहे, वाचणार्‍या प्रत्येक संवेदनाशील मनाला त्रासणारं.
***या माझ्या मित्रांकडे साधेपणा आहे, जिद्द आहे, पण आवेश नाही. चिंता आहेत, पण उच्चार नाही. निर्लेपता आहे, पण कोरडेपणा नाही. दिगंत-अनघासारखं इतकं निखळ, विशुद्ध असं, काही खूप दुर्मीळ होत चाललंय.***
***...... किंवा आपण अपंग/अंध म्हणून जन्माला आलो असतो, तर कदाचित आपल्याला आमटे, सिंधूताई सपकाळ, नसीमा हुरजूक या मंडळींचं मोठेपण कळलं असतं.
किती किती खरं!

सिडनीतील महाराष्ट्र मंडळाने ह्या वर्षी बाबांच्या कार्याला हातभार म्हणून काही उपक्रम सुरू केले आहेत.

तुझा हा प्रयत्नं इतका प्रामाणिक आहे की, ह्या हाकेला ओ देऊन अनेक जण मदतीचा हात उचलतील.

चिनूक्सने दिलेली बातमी:
************यावर्षीचा मॅगसेसे पुरस्कार प्रकाशकाका व मंदाकाकू आमटे यांना जाहीर****************

हाच पुरस्कार बाबांनाही मिळाला होता ना खुप वर्षांपुर्वी?
आमटे मंडळींचं काम खरोखर अशा पध्दतीने अप्रिशिएट होण्यसारखं आहे.
चिनूक्स, अमुल्य महितीबद्दल आभार..

चिन्मय, यावर्षीचा मॅगसेसे पुरस्कार प्रकाशकाका व मंदाकाकू यांना जाहीर झाल्याचे नुकतेच वाचले,आम्हासर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन, जरुर कळवा,

अरे वा. बातमी इकडे पोचली तर. आताच ई-सकाळ वर वाचुन इकडे आले की तुम्हा सगळ्यांना ही खुषखबर द्यावी. तर.. चिन्मय. आमच्या सगळ्यांतर्फे अगदी मनःपुर्वक अभिनंदन सांग हेमलकसावासियांना..

आनन्दाच्या बातमी नंतर खालचे पण वाचले, त्या यांकनी बहुतेक रोबोट बसविले आहेत का मुंबई कॉन्सुलेट मध्ये?
MUMBAI: Philanthropist doctor couple Prakash and Mandakini Amte, who won the prestigious Ramon Magsaysay Award on Thursday, were initially denied visa last year by the US consulate here due to their poor income. Both were invited to be guests of honour at the Brihan Maharashtra Mandal of North America convention in Seattle from June 28 to July 1 last year. When they appeared for the visa interviews on May 12, the officials refused to issue visas as they felt their financial status was not sound and they had no known source of income.
The Amtes said they were social workers and received an honorarium of Rs 2,000 per month. They had been to the United States in 2003 for the same event.

पेपर मधे वाचली बातमी आत्ताच आणि चिनूक्स च्या ह्या लेखाची आठवण झाली.. Happy
वाटलच होतं की इथे पोस्ट आले असतिल खूप..
खूप छान वाटलं.. चिनूक्स हा लेख लिहऊन माहिती शेर केल्याबद्दल खूप घन्यवाद.. !

आमटे आणि हेमलकसा परिवाराचे अभिनंदन !!!!

प्रकाश आणी मंदा आमटेंचे अभिनंदन!
आताच बातमी कळली!!!

प्रकाशकाका आणि मंदाकाकुंचे अभिनंदन!!

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

Pages