कथा - कॉस्टयुम डिझायनर !!!!

Submitted by Dipti Joshi on 21 March, 2011 - 06:41

कॉस्टयुम डिझायनर !!!!!

सकाळी सकाळी विशाखा ताईंचा फोन आला, त्यावेळेस साडेनऊ झाले होते, म्हणाल्या "वहीनी, सुजाने कॉस्टयुम डिझाईन केलेला सिनेमा आज गोपी मॉलला रिलिज होतोय. मी पासेस आणले आहेत, तुला तीने आग्रहाच आमंत्रण केले आहे. ती कामासाठी बाहेर गेलीय. त्यामुळे तिला नाही येता येणार.....आणि चित्रपट सृष्टीतील बरीच मंडळी येणार आहेत म्हणे....पहील्या शो ला....!! हो कां!! मी पण एक्साईट झाले. पण तरी म्हटलं, "अहो काल कां नाही केलात फोन? आता कसं जमतय बघते." "अगं, इतकी कसली कामं, साडेबाराचा शो आहे, येत असशील तर तुमच्या कॉम्प्लेक्स वरुन घेते रिक्शा", "तसं नाही हो, माझे दोन प्रॉब्लेम आहेत......एक म्हणजे नवरात्रीतली अष्टमी आहे त्यामुळे गुरुजी येणार आहेत सप्तशतीचा पाठ वाचायला. त्यांना अकरा पर्यंत बोलावलय....पाठ दोन तास चालतो आणि दुसरं म्हणजे आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये दुपारी साडेतीन वाजता नवरात्री निमित्त "नऊवारी साडी" स्पर्धा आहे......मी भाग तर घेतला आहेच, पण सगळ्या कार्यक्रमाच नियोजनही माझ्याकडे आहे.

"पाठाला त्या ’शेंडीवाल्या" श्री गुरुजीला सांगीतलय ना? तो ताईच्या नंणदेचा मुलगा.....मग काय काम असतं ग त्याला....रिकामाच तर असतो....लगेच फोन करुन लवकर यायला सांग", विशाखा ताईंच्या सुचना चालल्या होत्या. गुरुजींबद्दल केलेलं अस वक्तव्य मला अजिबात आवडल नाही....हे गुरुजी त्यांच्याकडे जायला तयार नसायचे ना म्हणुन वैयक्तीक आकसापोटी हे ताशेरे. "आणि नऊवारी साडीचच म्हणशील तर तु साडी नेसुनच निघ....आपण अगदी वेळेवर पोहोचु म्हणजे पटकन थिएटर मध्ये गेलं की कुणी नाही बघणार....आणि सोसायटीच्या मैत्रिणींना फोन करुन, तु साडे तीन पर्यंत येतेयस म्हणुन कळवुन टाक....पण तु ये ग......." त्यांनी त्यांच्याकडुन माझे सगळे प्रॉब्लेम्स सोडवले होते. आता इतक आग्रहाचं आमंत्रण नाही कसं म्हणणार? शिवाय डोळ्यासमोर चित्रपटातील मान्यवर मंडळीचे चेहेरे येत होते.....त्यामुळे वाटेल ती अडचण आली तरी जायचेच....हे नक्कीच ठरवले होते. आता हातातली कामं टाकुन मला हे सगळे फोन करायला हवे होते. पहीला फोन गुरुजींना लावला....त्यांनी लवकर यायला लगेचच हो म्हटल.....मला खुप विशेष वाटल.....एवढा डिप्लोमा इंजिनियर, पण मध्ये कंपनीत प्रॉब्लेम झाला नोकरी गेली, घाबरला नाही, सरळ पौरोहित्याचे शिक्षण घेतले आणि भिक्षुकी चालु केली. आमच्या सगळ्यांचाच तो "परमनंट गुरुजी" होता. नंतर ’मुन्नी’ला फोन लावला. ही ’मुन्नी’ म्हणजे आमची ’डोअर-स्टेप ब्युटीपार्लर’ वाली आमच्याकडे फुलके करणा-या भाभींची मुलगी. लग्नानंतर हा व्यवसाय सुरु केलेला.....ब्युटीपार्लरची सर्व्हीस घरी येऊन देणारी......फेशियल, हेअर मसाज, मेहेंदी....काय पाहीजे ते "अ‍ॅट यूअर डोअरस्टेप!!" आता ती एवढी तंदुरुस्त, तिचा ’आकारही’ एवढा मोठा तरीही तिचं नांव मुन्नी कां? मला आजपर्यंत न उलगडलेले कोडे...आमच्या घरात अगदी घरच्या सारखी वावरते.....तिला तेरा प्रकारच्या साड्या नेसवायला येतात, म्हणुन तिला बोलावल होत, नऊवारी साडी नेसवायला. आता तिच्याशी बोलायच म्हणजे तिच्या टिपेतल्या आवाजातल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची...तरी लावला फोन..."मुन्नी, जरा दुसरा काम निकल आया है, तु तिन बजेके बदले बारा बजे आयेगी क्या?.....हा चलेगा!! तिन असं म्हटल आणि माझा जिव भांड्यात पडला. मनात एक विचार तरळला....तिथे ’फर्स्ट डे फर्स्ट शो ला’ सगळी मोठी मोठी मंडळी येणार....आणि मी काय हे ध्यानासारख नऊवारी नेसुन जायच....पण काही इलाजच नव्हता. कॉम्प्लेक्स मधल्या कार्यक्रमाच नियोजन, संकल्पना माझीच होती त्यामुळे गुगली देण शक्यच नव्हत, मग सोसायटीच्या मैत्रीणींनाही लगेचच निरोप देऊन टाकला. सगळी ’फिल्डींग’ बरोबर लागली.....मग विशाखा ताईंना फोन करुन येतेय म्हणुन सांगीतल.

केशरी रंगाच्या साडीला हिरव्या रंगाचे काठ आणि हिरवं ब्लॉउज. मुन्नीने झकास नेसवली साडी. वरती केसांचा खोपा....!! ऑंटी बहोत अच्छी लग रही हो आप"!! मुन्नीने तिच्या टिपेतल्या आवाजात कॉमेंट दिली. मी म्हटल, "कुछ भी"!! अस म्हणतेय तेवढयात विशाखा ताईंचा फोन..."खाली उतर, पाच मिनिटात येतेय कॉम्प्लेक्स पाशी" त्यांच्या ऑर्डर्स एकदम खणखणीत आवाजात असतात....वन्स ना!! बापरे साडीमुळे सॉलिड कॉन्शस व्हायला झालं होतं. मी पटपट नऊवारीवर घालायचे दागिने....ठुशी....मोहनमाळ.....नथ....खोप्यावर लावायचे फुल सगळं पर्स मध्ये घातलं, आम्ही दोघी खाली उतरलो तर समोरच रिक्शा आणली होती. नेहेमीच्या स्वत:च्या पायावर धोंडा पाडुन घ्यायच्या सवयीप्रमाणे मुन्नीला म्हटलं, तु पण वेस्टला रहाते ना चल गोपी मॉल पर्यंत.....त्याबद्दल विशाखा ताईंच्या चेहे-यावर उमटलेली नाराजी मी टिपली. मग अगडबंब देहाची मुन्नी, मी, विशाखा ताई आणि त्यांची छोटी नात...’ननू’ सुजाची मुलगी. अशी आमची वरात वेस्टला गोपी मॉलला निघाली. खुपच वेळेवर निघालो होतो, सिनेमा चालु होऊन जातो की काय याचं दडपण आलं होतं "श्रेयनामावली" बघायची होती ना....त्यामुळे रिक्शावाल्याच्या पाठीमागे दर पाच मिनिटांनी, "भय्या, जरा जोरात चालव रे.....तो ’भय्याच’ ना त्यामुळे तो त्याच्याच पद्धतीने चालवत होता....वर त्याच्या खास ’भय्या’ भाषेत ’डोंबिवलीच्या खडड्यांवर प्रवचन देत होता...."इह खड्डांसे कैसे स्पीडमें चलाउ रिकसा.... जानसे काहे को खेलना!!! आम्हाला "भिक नको पण कुत्रा आवर" या म्हणीच्या चालीवर "हळु चालव पण प्रवचन नको" असं झालं होतं. एकदाचा आला गोपी मॉल. विशाखा ताई ननू ला घेउन वरच्या मजल्यावर पळत निघाल्या. मी ही माझ्या नऊवारीला सांभाळत त्यांच्या मागे धावले. तिकिट काउंटरला पास जमा करुन तिकिट घ्यायची होती. आम्हा पुर्वेकडील मंडळीच पश्चीमेकडे येणं होत नाही,....त्यामुळे गोपी मॉल होऊन बरेच दिवस झाले होते, पण बघायचा योग मात्र आत्ता आला होता..... त्यामुळे थिएटरचा दरवाजा कुठे आहे समजतच नव्हते. तिथल्या सिक्युरिटीने आम्हाला रस्ता दाखवला. आम्ही तिघीही धावतच लिफ्टमध्ये शिरलो....एन्ट्री गेट जवळ आलो.....गेटवरच्या माणसाला विचारले...."सुरु झाला का?"......तो पण बहुतेक ’भय्याच’ असावा, एक जांभाई देत म्हणाला...."हां, अभी शुरु हुआ है!! तिघीही लगबगीने पाय-या चढत होतो......अन समोरच स्क्रीनवर श्रेयनामावली झळकत होती......"वेषभूषा - सुजा सामंत", विशाखा ताई भान विसरुन जरा मोठया आवाजातच बोलल्या, "वहीनी, ते बघ सुजाच नांव" आम्ही अंधारात ते पडद्यावरच नांव वाचल आणि "याच साठी केला होता अट्टाहास!!" असे सुर मनात आळवत धप्पदिशी मिळेल त्या खुर्चीवर जाऊन आदळलो.....आता पुढच्या श्रेयनामावलीशी आमचं तस काही देणं घेणं नव्हत. सकाळची फोनाफोनी आणि धावपळ यामुळे दमायला झालं होतं......मग आम्ही आमच्या बॅग मध्ये काय काय खायला आणले होते त्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली.....वेफर्स....बटाटा कचोरी.....आता आमची पिकनिक सुरु झाली होती. त्यात ननूची बडबड सुरु होती, "विशाखा आजी, हा मम्माचा पिक्चर नां ग, मग मम्मा दिसत नाही याच्यात कुठे??? ननूच्या तोंडात एक भले मोठे चॉकलेट देऊन तिचे तोंड बंद केले.....मस्त खाण्याचा सपाटा लावला होता.....मधुन मधुन सिनेमा पण बघत होतो. आता अंधाराला डोळे सरावले.....आजुबाजुच्या ब-याच खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. सगळी मान्यवर मंडळी बहुतेक पुढे बसली असतील. विशाखा ताईंचा क्लास चुडिदार....आणि माझी नऊवारी!!! बापरे!!! मनातल्या विचारांना बाजुला सारुन थोडं सिनेमावर लक्ष केंद्रीत केलं. लो बजेट सिनेमा दिसत होता......"कॉस्टयुम डिझाईन" नावाची गोष्ट काय होती समजतच नव्हते......सिनेमाची हिरॉईन सबंध सिनेमाभर सुजाच्याच दोन साडया नेसुन वावरतांना दिसत होती....."विशाखा ताई, या सुजाच्याच साडया दिसताय", मी त्यांच्या कानात कुजबुजले...."बहुतेक, तु बघ ग शांतपणे सिनेमा", त्यांना जरा फणकारा आल्यासारखा वाटला.बरीचशी खादाडी करत, चुळबुळ करत.....ननूने बडबड केली की तिच्या तोडांत चॉकलेट कोंबत, एकदाचा सिनेमा संपला....थिएटर मध्ये लाईट लागलेत........आणि काय आश्चर्य!!! थिएटरमध्ये इनमिन ’साडेचार’ व्यक्ती!!! "मी, विशाखा ताई, ननू (अर्धी), खुप अंतरावर पुढे.....सिनेमाची हिरॉईन आणि तिची आई. आम्ही दोघी तिला भेटायला गेलो, ती विशाखा ताईंशी छान बोलली, पण माझ्या अवताराकडे मात्र विचित्र नजरेने बघत होती...एखाद्या झुरळाकडे बघाव तसं....मला उगीचच माझ्या वॉर्डरोबमधले डिझाईनर चुडिदार आठवत होते, "छान झालय तुमच काम" असं म्हणत मी तिला हात मिळवायला गेले पण तिने शेकहॅन्ड केलाच नाही. जाऊदे गेली उडत, कुठे मोठी हिरॉईन वाया चाललीय....थिएटर तर रिकाम पडलय, तरी एवढा शिष्टपणा!! मनातले संवाद चालु होते.

बाहेर पडलो तर माझ्या नऊवारी साडीचा पार बोजवारा उडाला होता. सकाळपासुनची धावपळ आणि ते नऊवारीच बुजगावणं....आता मात्र डोळ्यात पाणी यायला लागलं होतं....इकडुन, तिकडुन सुटायला लागलेल्या साडीला आवरणं मुष्किल झालं होतं. "थांब, वहीनी, मी तुला सगळीकडुन निट पिना लाऊन देते." मग आम्ही कॅरिडॉर मधल्या एकांत असलेल्या भागात सटकलो. विशाखा ताईंनी सगळीकडे सेफ्टी पिना लावल्यात. आम्ही अवघडलेल्या अवस्थेत बिल्डिंग मध्ये पोहोचलो.....मी रिक्शातुन उतरले तर सगळ्या बायकांनी मला गराडा घातला, "अगं होतीस कुठे, तुझीच थीम आणि तु गायब? काय हे? तुझं नांव तीनदा पुकारुन झालय. जा लवकर स्टेजवर. पर्समधले सगळे दागिने पटपट अडकवले आणि मी स्टेजवर पोहोचले.....दहा मिनिटे तिथे काय गोंधळ घातला माहीत नाही पण परफॉरमन्स संपवुन स्टेजच्या खाली आले आणि मैत्रीणींना म्हटल, अगदी पंधरा मिनिटात घरी जाउन येते...घरी आले....इथे..तिथे टोचलेल्या सेफ्टी पिना काढल्या....फराफरा साडी काढुन फेकली. छान आंघोळ केली, डोक्यावरचा तो घट्ट खोपा सोडला. हलकासा मेक-अप केला. माझा आवडता ’लक्की’! पांढरा आणि बेबी पिंक कॉंबिनेशनचा चुडिदार घातला, केसांना दोन नाजुक हेअरक्लिप्स लाउन मोकळे सोडले, छानसा परफ्युम उडवला....गरम चहा घेऊन खाली उतरले. दिडशे स्पर्धक होते....स्पर्धा संपायला आली होती....निकाल यायला निदान एक तास लागणार होता.....मग बिल्डिंगचा भोंडला झाला. मी शांतपणे खुर्चीवर बसले होते. मान्यवरांच्या हातात निकाल आला होता. रोटरीच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा "राधिका सप्रे" याच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार होता. आणि मग उत्कंठा वाढवत वाढवत त्यांनी पुरस्कार जाहीर केले......आजचा हा प्रथम पुरस्कार जाहीर होतोय...सौ........................बापरे!!! माझं नांव ऐकलं आणि आश्रर्याचा जबरदस्त धक्का बसला मला.....मान्यवर बोलत होत्या......"यांच्या नऊवारी साडीचं प्रेझेंन्टेशन म्हणजे.....’जुन्या आणि नव्या काळाचा संगम’ त्यांची साडी, दागिने, केसांची स्टाईल ही जुन्या पद्धतीची होती...पण त्यांचा स्टेजवरचा "वॉक"!!! तो मात्र नविन काळातला..........प्रत्येक पावलागणीक बदलणारे चेहे-याचे हावभाव!!!

मी जोरात डोक्याला हात लावला....मनात म्हटल....कप्पाळ माझं....अहो मॅडम......पायाजवळ लावलेली एक सेफ्टी पिन उघडली होती....आणि प्रत्येक पावलागणीक पोटरीला टोचत होती, त्यामुळे उगीचच तिरप पडणार पाउल......आणि प्रत्येकवेळी पिनेच्या टोचण्यामुळे होणारा त्रास आणि त्यामुळे चेहे-यावरचे बदलणारे भाव!!! शतश: धन्यवाद ग तुमच्या परिक्षणाला आणि तुमच्या नव्या जुन्याच्या फ्युजनला!!

पण तरीही, नऊवारी नेसुन सहजपणे काम करणा-या सासुबाई.......एखादी तरुण मुलगी जीन घालुन जितक्या सहजतेने वावरेल तितक्या सहजतेने वावरणा-या आत्येसासुबाई.....अन नऊवारी साडी नेसुन घोडयावर बसून हातात ढाल तलवार घेऊन लढाई करणारी झांशीची राणी!! आणि सगळ्यात....लाल जरी काठी....सोनेरी बुंदक्यांच नऊवारी नेसुन दहाही हातांमध्ये शस्त्रे घेउन, व्याघ्रावर बसुन जगाच रक्षण करणारी ती अंबामाता....आदीमाता!! सगळ्यांची आठवण झाली आणि मी त्यांना मनोमन वंदन केलं.

गुलमोहर: 

छान लिहील आहेस.

रोटरीच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा "राधिका सप्रे"

कुठल्या शहरातल्या ग ?

नन्ना, वत्सला,जागु धन्यवाद.

वत्सला, तुम्हाला किस्सा म्हणुन ठिक वाटली, हरकत नाही,
जागु, "राधिका सप्रे" इनरव्हील च्या अध्यक्षा......थोडेसे काल्पनिक!!!

कॉश्च्युम डिझायनर. आधी निदान नीट काय शब्द आहे ते समजून घ्या. आणि हो कॉश्च्युम डिझायनिंग म्हणजे काय हे पण घ्या जरा समजून. उगाच आपलं नवीन व्यवसाय कळलाय की वापरायचा...

डोंबिवली मधे सगळ्या कास्ट अ‍ॅण्ड क्रू सकट प्रिमियर.... निर्माता डोक्यावर पडला होता की लॉस दाखवायला फिल्म काढली होती?
कॉश्च्युम डिझायनरच्या फ्यामिलीला प्रिमियरचे हवे तेवढे पासेस हा पण एक महान विनोद आहे.
Rofl
कथा ठार काहीही आहे.
शीर्षकाचा किश्श्याशी काय संबंध आहे?

बाकी
"कॉस्टयुम डिझाईन" नावाची गोष्ट काय होती समजतच नव्हते......सिनेमाची हिरॉईन सबंध सिनेमाभर सुजाच्याच दोन साडया नेसुन वावरतांना दिसत होती....."विशाखा ताई, या सुजाच्याच साडया दिसताय", मी त्यांच्या कानात कुजबुजले.
या वाक्यावरून कथानायिका मठ्ठ, काहीही कळत नसलं विषयातलं तरी सर्वज्ञाचा आव आणून बोलणारी आहे हे मात्र कळले. Lol

कथा ठिक आहे! माबोवर ज्या "काहिच्या काहि" पाट्या पडतात त्या पाहिल्या तर हि कथा चांगलीच म्हणावी लागेल! त्यामुळे त्यात निधप आणी ऑर्फियस यांना एवढे खिल्लि उडवण्यासारखे काय वाटले ते समजले नाहि!

ऑर्फियस तुमचे काय वैयक्तिक भांडण आहे का लेखिकेविरुद्ध ? एकदम वैयक्तिक टिकेवरच घसरलात!

.

कथा आवडली नाही कारण नेमके काय कथानक आहे ते लक्षातच आले नाही. म्हणजे कथानायिकेला 'चुकून बसवलेल्या पीनमुळे बदललेल्या चालण्यामुळे' बक्षिस मिळाले हे की चित्रपटगृहात प्रिमियर असूनही सामान्य वेशभुषा होती व प्रत्यक्ष जीवनात मात्र दर्जेदार वेशभुषा होती हे!

=====================================

दिप्ती चांगलं लिहिताय लिहित रहा , फालतु कॉमेंटस कडे लक्ष देऊ नका>>> श्री यांच्याशी सहमत आहे. निदान तुम्ही स्वतः काहीतरी स्वतःच्या कल्पनेतून लिहीता हे काय कमी असे मला वाटते. अवांतराबद्दल दिलगीर!

-'बेफिकीर'!

मित्रानो... कथा वाचा.. उगाच वाद घालु नका हो......दिप्ती चांगला प्रयत्न आहे...लिहित रहा...

कथा म्हणून फार दम नव्हता असं वाटलं, किस्सा म्हणून ठीक आहे

आणि डोंबिवलीमधे का कोणी प्रिमियर करेल ???? (मी डोंबिवलीचीचं आहे तरी अगदी राहवलं नाही.......)

दिप्ती,

जेंव्हा तुम्ही एकाद्या वैयक्तीक अनुभवाबद्दल कथा लिहिता तेंव्हा चांगली लिहिता. म्हणजे भावना वै. छान व्यक्त होतात.

पण एकाद्या पेशाच्या आजुबाजुला कथा गुंफता.. तेंव्हा ती नीट उमटत नाही.. आणि मग त्यापेशाची जाण असलेली माणसं त्यातल्या सहज त्रुटी काढू शकतात. एकतर तुम्ही त्या पेशाची पूर्ण माहिती काढून घ्या आणि मग कथा गुंफा.. नाही तर मग माणसांच्या कथा लिहा (ज्या अधिक सरस लिहिता).

बाकी मलाही बेफिकीर यांच्यासारखाच प्रश्ण पडलाय - >>कथा आवडली नाही कारण नेमके काय कथानक आहे ते लक्षातच आले नाही. म्हणजे कथानायिकेला 'चुकून बसवलेल्या पीनमुळे बदललेल्या चालण्यामुळे' बक्षिस मिळाले हे की चित्रपटगृहात प्रिमियर असूनही सामान्य वेशभुषा होती व प्रत्यक्ष जीवनात मात्र दर्जेदार वेशभुषा होती हे!<< आणि ह्याचा शीर्षकाशी काय संबंध? Uhoh

सर्व मायबोलीकरांनो,

माझ्या कथेवर इतके उलट्-सुलट प्रतिसाद येउनही मी त्यावर काहीच प्रतिक्रिया देउ शकले नाही कारण कारण घरात लग्न आणि त्यानंतरचा एक दुखःद प्रसंग त्यामुळे नेटवर येता आले नाही.

सुरश, रचु, श्री, विनायक परांजपे, बाळकवि, प्रसिक - तुम्हाला सर्वांना धन्यवाद.

निधप - तुमचा आक्षेप "कॉस्ट्युम" या शब्दावर आहे, अनेकांना यावर मत विचारल्यावर "कॉश्च्युम" हा शब्द बरोबर असला तरी "कॉस्ट्युम" हा शब्द देखिल आक्षेपार्ह नाही असच त्यांनी मत मांडल.

- कथा जशी घडली अगदी तशीच लिहीली आहे, माझे स्वतःचे काल्पनिक असे काहीच नाही.

- पहिल्या प्रसंगापासुन चित्रपटगृहात हिरॉईनला भेटणे....इथपर्यंत....सगळं तंतोतंत जसं घडलं तसं

- कथेतली सगळी पात्र (नावं बदलुन) सुजा सामंत, विशाखाताई, वहीनी, ननू या सगळ्यांना मी अगदी
जवळुन ओळखते.

- सुजाचा मित्रच चित्रपटाचा हिरो आहे आणि हिरॉईन पण डोंबिवलीचीच. या सुजाने बी.कॉम. झाल्यावर फयाशन डिझाईनिंग चा कोर्स केला आहे. तिला चित्रपटात "कॉश्च्युम डिझायनर" म्हणुन करियर करायची हौस आहे. तिचा मित्र डोंबिवलीचाच, त्याला संधी मिळाली की सुजालाही काम मिळते त्याच्याच चित्रपटात.

- सिनेमा गोपी मॉलला रिलिज झालाय असं म्हटलय्....त्याचा 'प्रिमियर' होता असा उल्लेख मी तरी कुठेही केलेला नाही. उलट शेवटी..."एकदाचा सिनेमा संपला, थिएटरमध्ये लाईट लागलेत आणि आश्चर्य, थिएटरमध्ये इनमिन साडेचार व्यक्ती!.....या वाक्यावरुन तरी समजायला हवे की हा सिनेमाचा प्रिमियर असणे शक्यच नाही कारण प्रिमियर असता तर चित्रपटाशी संलग्न मंडळी आलीच असती ना?
- विशाखा ताईंना सिनेमाला जाण्यासाठी कुणीतरी सोबत हवी आहे म्हणुन त्या वहीनीला उगीचच सांगताय्.."चित्रपट सृष्टीतील मंडळी येणार आहेत म्हणुन....."

<<<कॉश्च्युम डिझायनरच्या घरच्यांना हवे तेवेढे पासेस्..हा एक महान विनोद>>>>
हवे तेवढे पासेस नाही....फक्त दोनच आणि ते ही सुजाच्या मित्राने चित्रपटाच्या हिरोने ते दिले आहेत.

- चित्रपटातली नायिका सबंध सिनेमाभर सुजाच्याच दोन साड्या नेसुन वावरत होती...
ही वास्तविक खरी घटना....त्यात
<<कथानायिका मठ्ठ, काहीही कळत नसलं तरी सर्वज्ञाचा आव आणुन बोलणारी आहे हे मात्र कळले>>
यांत कसला आलाय मठ्ठपणा आणि सर्वज्ञाचा आव?
तुमच्या या इतक्या "कटु" वाक्याचा अर्थ मला तरी समजला नाही.

सुजा, विशाखाताई सुजाची मामी आणि मी आम्ही सगळेच या विषयावर गप्पा मारत असतांना सगळ्यांनीच 'तुला एक विषय मिळाला लिहायला' असं म्हटल आणि लिहिलं गेलं त्यात कुणाच्याही व्यवसायाची खिल्ली उडवणं किंवा कुणालाही कडवट शब्दात प्रतिसाद देणं हा माझा स्वभावच नाही.

पण निधप तुमचे प्रतिसाद फार म्हणजे फारच तिव्र आणि कडवट असतात. माझ्या याच नाही दुस-या कथांचे तुमचे प्रतिसादही अशाच स्वरुपाचे आहेत. मला काल्पनिक लिहीताच येत नाही...घटना जशी घडली तशी....निटनेटकी मांडणी करुन....कथेच्या स्वरुपात वाचकांसमोर मांडायची....माझं स्वतःच् काल्पनिक असं काहीच नाही.

ऑर्फियर्स तुम्ही तुमचे प्रतिसाद डिलिट केलेत, पण गणू यांनी तुमच्या प्रतिसांदांना जी उत्तर दिली आहेत त्यावरुन तुमचे प्रतिसाद देखिल असेच कडवट असावेत असे वाटते

कथा आवडली नाही तर ती कां आवडली नाही ह्याच कारण नमुद केलं तर लिहिणा-याला खुप काही शिकायला मिळेल.

गणू
<<कंपु बनवुन मायबोलीवर नविन येणा-यांना त्रास देणा-यांची मी चांगलीच घेतो>>>

या तुमच्या प्रतिक्रियेतुन तुमचा चांगला हेतु समजला....पण बाकी सगळे वादविवाद फारच वैयक्तिक पातळीवर घसरलेत असं वाटतं, असं होऊ नये एवढीच विनंती.

बेफिकीर

तुमची स्पष्ट प्रतिक्रिया आवडली.
कथा आवडली नाही याच मुद्देसुद कारण तुम्ही मांडलय - अशा प्रतिसादाला उत्तर देतांना आनंद होतो..

"कथेत मध्यमवर्गीय कुटुंबातली सुजा एका नविन आवाहनात्मक क्षेत्रात जाउ पहातेय्....चित्रपटाचा विषय देखिल फार चांगला आणि गंभीर असा होता पण चित्रपट बघायला फक्त चारच मंडळी!!! हे दुर्दैव.

आणि कॉश्च्युम डिझायनिंगच्या अनुषंगाने ही "नऊवारी साडी स्पर्धा"

बक्षीस मिळतांना त्या विषयाची उच्च गुणवत्ता, त्यांच सादरीकरण हे घटक महत्वाचे असतातच पण बरेच वेळा "लक" हा घटक बाजी मारुन जातो याचही भान ठेवाव एवढच.

बाकी तुम्ही अवांतर गोष्टींबद्दल दिलगिरी व्यक्त केलीत यात तुमचे मोठेपण, या अवांतराला तुम्ही थोडीच जबाबदार आहात.

प्राजक्ता_शिरीन

कथा म्हणुन दम नव्हता, किस्सा म्हणुन ठिक आहे - हरकत नाही तुमच्या मताचा मी आदर करते पण मी माझ्या संपुर्ण कथेत "प्रिमियर" हा शब्द कुठेही वापरला नाही आणि डोंबिवलीत प्रिमियर असाही उल्लेख नाही.

सर्वप्रथम माझा आयडी नीधप असा आहे. निधप नव्हे.

>>>>पण निधप तुमचे प्रतिसाद फार म्हणजे फारच तिव्र आणि कडवट असतात. माझ्या याच नाही दुस-या कथांचे तुमचे प्रतिसादही अशाच स्वरुपाचे आहेत.<<<
मग? असतात पुढे? तुमच्यावर वैयक्तिक एकही कॉमेंट मी केलेली नाही. एकही गैर शब्द वापरलेला नाही. लेखन पब्लिक फोरमवर टाकलं आहेत तेव्हा त्यावर कश्याही प्रकारचे प्रतिसाद येणार याची तुम्हाला कल्पना असायला हवी. तक्रार कसली करताय? तुमच्या कथा मला जितक्या वाईट वाटतात तितका आणि तसा प्रतिसाद ज्या त्या ठिकाणी मी दिलेला आहे. तोही कारणांसहित. मला गोड गुळगुळीत प्रतिसाद देणं जमत नाही. जमणार नाही. मी स्पष्ट काय ते लिहिलेय. तुम्हाला कडवट वाटले तर तो माझा प्रश्न नाही. माझं तुमचं वैर नाही की तुम्हाला ठरवून मी टार्गेट करेन. मी तुम्हाला ओळखतही नाही. पण लिखाण वाचून त्यावर मला जे प्रामाणिकपणे वाटले ते सांगायचा वाचक म्हणून मला पूर्ण अधिकार आहे.

कॉस्ट्युम हे आक्षेपार्ह नाही हे सांगणारे तुमचे तज्ञ कोण असतील ते असो पण जगभरात कुठेही अश्या पद्धतीचा उच्चार केला जात नाही हे कुणी सांगितले नसेल तुम्हाला तर मी सांगते. याच क्षेत्रात बरंच काही करते मी पण त्यामुळे तेवढं नक्की मला माहितीये.

>>>लो बजेट सिनेमा दिसत होता......"कॉस्टयुम डिझाईन" नावाची गोष्ट काय होती समजतच नव्हते......सिनेमाची हिरॉईन सबंध सिनेमाभर सुजाच्याच दोन साडया नेसुन वावरतांना दिसत होती....<<<
तुमच्या कथानायिकेला कॉश्च्युम डिझायनिंग म्हणजे काय हे माहित नाहीये आणि तरीही आपल्यालाच सगळं कळतं असं म्हणणं आहे तिचं. जर सिनेमाच्या कथानकाची गरज असेल हिरविणीने दोनच साध्या साड्या नेसून वावरण्याची तर तिथे कथानायिकेच्या वॉर्डरोबमधले चकचकीत ड्रेसेस काय कामाचे? पण हे समजून न घेता त्यावर कथानायिका कॉमेंट करतेय जोरात. म्हणजे झालाच की मठ्ठपणा आणि सर्वज्ञाचा आव. कॉश्च्युम डिझायनर म्हणून ९ वर्ष काम करताना असे मठ्ठ सर्वज्ञ मला ठेचेठेचेला भेटतात.

>>>तुमच्या या इतक्या "कटु" वाक्याचा अर्थ मला तरी समजला नाही.<<
मी कथानायिकेला मठ्ठ इत्यादी म्हणलेय तर ते तुम्हाला का लागलेय इतके? बाकी अर्थ समजावून सांगितलाय मी. पण एकंदरीत पाहता आत्ताही अर्थ सांगूनही तो पोचेल याची अपेक्षा नाही मला.

कथा... असंबद्ध, शीर्षकाचा आणि वरच्या लिखाणातल्या (कथा म्हणणं शक्य नाही) एका दिवशी घडलेल्या एकमेकांशी सुतराम संबंध नसलेल्या दोन प्रसंगांचा काहीच संबंध नाहीये.

यातली माझी काही वैयक्तिक मतं असली तरी कॉश्च्युम डिझायनिंगशी संबंधित मुद्दे ही नुसती माझी मतं नाहीयेत. माझ्या क्षेत्राशी संबंधित चुकीचे मुद्दे दिसल्यावर ते मी मांडणारच. आणि माझ्याच भाषेत.

जाईजूई

मी घटना जशी घडली तशी कथा रुपात लिहिली, यात मला या व्यवसायाबद्दल फार माहीती आहे असं माझं म्हणणं नाही आणि परत एकदा नमुद करते कुणाच्याही व्यवसायाची खिल्ली उडवणे हा स्वभाव तर नाहीच नाही.

बाकी कथेच्या आशयाबद्दल वर लिहिले आहेच.

कॉस्ट्युम हे आक्षेपार्ह नाही हे सांगणारे तुमचे तज्ञ कोण असतील ते असो पण जगभरात कुठेही अश्या पद्धतीचा उच्चार केला जात नाही हे कुणी सांगितले नसेल तुम्हाला तर मी सांगते. >>>

मग तुमचे सांगणे चुकिचे आहे हे कुणी सांगितले नसेल तर मी तुम्हाला सांगतो. Proud

यातली माझी काही वैयक्तिक मतं असली तरी कॉश्च्युम डिझायनिंगशी संबंधित मुद्दे ही नुसती माझी मतं नाहीयेत >>

संपुर्ण कथेत कॉश्च्युम डिझायनिंगशी संबंधित काहि नाहिच आहे. संबध आहे तो फक्त कथेच्या विषयाशी.
आधी सांगीतले , परत सांगतो - तुम्च्या व्यवसायाची खिल्ली उडवली म्हणुन एवढया चिडु नका. फारच बालिश वाटतो तुमचा प्रतिसाद.

दिप्ती जी उत्तम लिखाण. सर्व चित्र डोळ्यासमोर उभे करण्याची ताकद तुमच्या लिखाणात आहे.
'माळ्याची मका आणि कोल्ह्यांची भांडणे' ह्या वगनाट्याचा प्रयोगही नन्तर पहावयास मिळाला हा आणखी बोनसच....

गणू.. Proud

Pages