"वॉल" द बेस्ट..!

Submitted by A M I T on 10 March, 2011 - 23:56

म्हणजे बघा.. शाळेत असताना लिहता-वाचता यायला लागल्यापासून आमच्या गावातल्या काही चिखल मातीत बांधलेल्या घरांच्या मातकट भिंतींवर चुन्याने लिहलेल्या "पाणी गाळा. नारू टाळा", किंवा "गप्पी मासे पाळा. हिवताप टाळा" अशा काही आरोग्यविषयक (सरकारी) पण त्या वयात हे "टाळा" प्रकरण माझ्या "टाळू"वरून गेलेल्या घोषणा वाचून मी लहानाचा मोठा झालो.
त्यावेळी कळलं की, भिंतींना फक्त कानच नसतात तर त्या आपल्याशी मुक-संवादही साधतात.

हां..! आता त्याचा गैरफायदा आमच्याच वर्गातल्या पक्याने घेतला, हा अपवाद सोडला तर...

म्हणजे बघा झालं असं...
हा पक्या आमच्याच वर्गातल्या सुमीवर 'लव' करायचा. आता सुमी तशी दिसायला देखणी मुलगी. तिच्यावर पक्याच काय? सबंध वर्गच जीव ओवाळून टाकायला तयार. पण कुत्र्याच्या शेपटागत पीळ देवून केसांचा कोंबडा काढणार्‍या शंकर्‍याशी तिचं "सुत" जुळलं आणि पक्या 'सुत'की चेहरा वर्गभर मिरवू लागला.
परिणामी काहीच दिवसांत शाळेच्या मागील भिंतीवर "सुमीचा बापूस कवटा चोर" असा कोळश्याने लिहलेला अत्यंत वाईट अक्षरांतला संदेश सबंध शाळेने वाचला.
प्रेमभंग झालेल्या पक्याने आपला राग असा भिंतीद्वारे व्यक्त केला आणि शाळेला राग व्यक्त करण्यासाठी नवं 'माध्यम' सापडलं. आता शाळेची भिंत "ग्राफीटी वॉल" सारखी रंगू लागली. शाळेतील काही टारगट मुलांनी 'टकल्या ढवळे,'मारकूट्या पिसाळकर' अशा भिंतीवर लिहलेल्या विशेषणांनी भिंतीसह मास्तरांचीही तोंडे "काळी" केली.

अगदी मंदीरातही मी "चपला बाहेर काढाव्यात"सारख्या सुचना भिंतीवर पाहील्यात.

आमच्या गावातल्या एस.टी. स्थानकाच्या भिंतीवर "येथे थुंकू नये" अशी सुचना मी काही वर्षापुर्वी वाचली होती. नुकताच गावी गेलो होतो, तेव्हा ती कळकट तांबूस भिंत पाहून मला त्या गुटखा, पान, तंबाखू खावून स्थानकाच्या भिंतीवर 'रंगपंचमी' खेळणार्‍या महाभागांना त्याच भिंतीत चिणून मारावसं वाटलं.

'हर घर कुछ कहता है' तसं 'हर दिवार कुछ कहती है' असं म्हणावसं वाटतं. पण नंतर कळालं की, हल्ली भिंतींचं कुणी ऐकत नाहीत.

एकदा असचं फिरत असताना मला लघूशंका आली. मी योग्य जागेचा शोध घेवू लागलो. एका मोठ्या आवाराला ६-७ फुट उंचीच्या भिंतीचं कुंपण घातलं होतं. मी त्या भिंतीची 'तहान' भागवली. पण त्या भिंतीवर लिहलेल्या "येथे लघवी करू नये" या सुचनेतल्या "नये" या शब्दातल्या 'न' या अक्षराला कुणीतरी अणूकूचीदार दगडाने खरवडून 'न'ष्ट केले होते. आता ती भिंत सांगत होती, "येथे लघवी करू ये"
मला माझ्या या चुकीचा इतका पश्चाताप झाला की, वाटलं ज्ञानेश्वर माऊलींसारखी ही भिंत चालवून कुठतरी दूर न्यावी.

मुंबईत 'नो स्मोकींग', आणि 'नो पार्कींग' च्या सुचना हजारो भिंतींवर असतील. हे मी शपथेवर सांगू शकतो.

"यहाँ पेशाब करना मना है" या सुचनेतल्या "मना" या शब्दालादेखील अगदी "मना"पासून खरवडून काढलेलं मी अनेक ठिकाणी पाहीलयं आणि त्या भिंतींच्या तळाशी अजूनही तसाच टिकून असलेला "ओलावाही"...

आपल्या भिंतींचं मूत्र-वृष्टीपासून रक्षण होण्यासाठी भिंतींवर वेगवेगळ्या देव-देवतांची चित्रे असलेल्या टाईल्स डकवणार्‍या काही धूर्त मालकांचा लकडी पूलावर जाहीर सत्कार करायचा माझा विचार आहे.

मुंबईतल्या कोणत्याही प्याऊच्या भिंतीवर लिहलेल्या "ग्लासाला तोंड लावू नये" या सुचनेनूसार ग्लासाला तोंड न लावता "तोंडाला ग्लास लावून" पाणी पिणार्‍या 'तहानशहां'ना माझा त्रिवार मुजरा आहे.

मागे एकदा माझे गावाकडले चुलते (हे वरचेवर महीनाभराने आमच्याकडे हटकून यायचेच) मुंबईला माझ्या 'खुराडेवजा' खोलीत आले होते. आमच्या भागातल्या बर्‍याचशा चालींसाठी सार्वजनिक संडासं होती.
दूसरे दिवशी सकाळी काका तेथून प्रात:विधी उरकून आले आणि "अगदी जहांगीर आर्ट गॅलरीत जावून आल्यासारखं वाटलं" असं वाक्य त्यांनी 'एंन्ट्रीलाच' टाकलं, तेव्हा मी 'कॉमेडी सर्कस' मधल्या अर्चना सिंगसारखा खदाखदा हसलो होतो.
आता आमच्या सार्वजनिक संडासातील "भित्तीचित्रे" कशी होती? हे मी चांगलचं जाणून होतो. ती चित्रे आपल्या आद्य चित्रकार पुर्वजांनी गुफांत कोरलेल्या चित्रांशी काहीशी साधर्म्य राखणारी असतात. आमच्या देशात एम. एफ. हुसेनसारखे चित्रकार प्रसिद्ध होतात, मग या "टॉयलेट पेंटर" ("बाथरूम सिंगर" शी यमक जुळणारा शब्द. संबंधित कवींनी नोंद घ्यावी.) च्याच बाबतीत ही उपेक्षा का?
यालाच आपण "इंडीयाज फॉरगॉट टॅलेंट" म्हणू या हवं तर..

याच संडासांच्या कुठल्याशा भिंतीवर लिहलेला "कडी उजव्या हाताने उघडावी" हा बहूमोल संदेश या सर्वांवर "कडी" करतो म्हणा किंवा "उजवा" ठरतो म्हणा..

'भिंतीवरी फक्त कालनिर्णय असावे'चे दिवस गेले. आतातर भिंतीवर पालीही (पाल या प्राण्याचं अनेकवचन "पाली"च आहे ना? सुज्ञांनी मार्गदर्शन करावे.) डझनावारी दिसून येतात.
(अवांतर : या पाली भिंतीवरून खाली ढकलून देण्याच्या खेळात एकमेकींना "आता तुझी "पाळी" अशा म्हणत असाव्यात बहूधा... आणि त्यांच्या या बोलीवरूनच "पाली" भाषेचा जन्म झाला असावा, असा माझा कयास आहे.)

* * *
http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

अमित Biggrin

>>याच संडासांच्या कुठल्याशा भिंतीवर लिहलेला "कडी उजव्या हाताने उघडावी" हा बहूमोल संदेश या सर्वांवर "कडी" करतो म्हणा किंवा "उजवा" ठरतो म्हणा..

हे मी स्वतः बघितलंय. कुठे ते इथे नाही सांगत. मला अजून बरीच वर्ष पुण्यात रहायचंय Wink

Happy

कहर Rofl

Rofl
आमच्या गावातल्या एस.टी. स्थानकाच्या भिंतीवर "येथे थुंकू नये" अशी सुचना मी काही वर्षापुर्वी वाचली होती. नुकताच गावी गेलो होतो, तेव्हा ती कळकट तांबूस भिंत पाहून मला त्या गुटखा, पान, तंबाखू खावून स्थानकाच्या भिंतीवर 'रंगपंचमी' खेळणार्‍या महाभागांना त्याच भिंतीत चिणून मारावसं वाटलं.
>>>> १००% सहमत.

सिंहगड रोड वरल्या जोशी वडे वाल्या च्या आउटलेट मधे स्वच्छता गृहात " हा जोशी वडेवाला डुप्लीकेट आहे " असे वाचल्यावर हसुन हसुन माझी अवस्था बिकट झाली होती. बाहेर निघाल्यावर माझ्या चेहर्‍यावरचे आवरता न आलेले हसु पाहून याला " रिकामे " झाल्याचा एव्हडा काय आनंद झालाय? असा विचार करीत लोक माझ्या कडे विचित्र नजरेने पहात होते. Biggrin

आभार. Happy

या लेखात नंतर जोडलेल्या ओळी.

आपल्या भिंतींचं मुत्र-वृष्टीपासून रक्षण होण्यासाठी भिंतींवर वेगवेगळ्या देवांची चित्रे असलेल्या टाईल्स डकवणार्‍या काही धूर्त मालकांचा लकडी पूलावर जाहीर सत्कार करायचा माझा विचार आहे.

Pages