द बेअरफूट सोल्जर्स ऑफ तिलोनिया

Submitted by चिनूक्स on 21 June, 2008 - 17:00

यावर्षीचा अतिशय प्रतिष्ठेचा 'Ashden award for sustainable energy' डॉ. बंकर रॉय यांना परवा जाहीर झाला. डॉ. रॉय हे बेअरफूट कॉलेज, तिलोनियाचे संस्थापक. तिथल्या बेअरफूट सोल्जर्सचं अफलातून काम मायबोलीकरांपर्यंत पोहोचावं म्हणून हा लेख.

------------------------------------------------------------------------------------------

सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी आमच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संजीत 'बंकर' रॉय यांच्या एका व्याख्यानात तिलोनियाबद्दल पहिल्यांदा ऐकलं. राजस्थानात अजमेर जिल्ह्यात तिलोनिया नामक खेड्यात रॉय यांनी 'बेअरफूट कॉलेज' नामक संस्था स्थापन केली असून, अशिक्षित - अर्धशिक्षित महिला तिथे सौरदिवे तयार करतात, स्वयंपाकापासून काँप्यूटरपर्यंत कशासाठीही सौरउर्जेशिवाय अन्य कशाचाही इथे वापर होत नाही, ही प्राथमिक माहिती त्या व्याख्यानातून मिळाली. अधिक लक्षात राहिला तो त्यांच्या प्रेझेंटेशनमधला चकचकाट, डून स्कूल आणि सेंट स्टीफन्सच्या पार्श्वभूमीवर असणारी असंख्य राजकारण्यांशी मैत्री आणि केंद्र शासन व संयुक्त राष्ट्रसंघाकडून मिळणारी भरघोस आर्थिक मदत. त्यामुळे विलासराव साळूंके आणि सिंधूताई सपकाळ या आपल्या बेअरफूट सोल्जर्सचं मोठेपण मला अधिकच जाणवलं. मात्र, तिलोनियात तयार होणारे हे सौरदिवे हेमलकसा व आनंदवनात वापरता येतील का, याची चाचपणी करायला मी राजस्थान गाठलं, आणि हे पहिलं मत किती चुकीचं होतं, ते लक्षात आलं.

तिलोनिया हे हजारभर वस्तीचं गाव, बरचसं 'शोले'तल्या रामगढसारखं. तशीच घरं आणि तशीच टेकाडं. गावात बस येत नाही. सकाळी जयपूरला जाऊन रात्री अजमेरला परतणारी एकुलती एक रेल्वेगाडी हाच काय तो दळणवळणाचा मार्ग. Social Work and Research Centre (SWRC) अर्थात बेअरफूट कॉलेजमुळे गावात वीज आणि पाण्याची कमतरता नसली तरी गाव तसं मागसलेलंच. शहरीकरणाचा अजिबात स्पर्श न झालेलं.
बेअरफूट कॉलेजला पोहोचल्यावर सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात त्या इथल्या पांढर्‍याशुभ्र, बैठ्या इमारती. आर्किटेक्चरचं कुठलंही शिक्षण न घेतलेल्या स्थानिक महिलांनी त्या बांधल्या आहेत. दर्शनी भागात ईग्लूसारखा दिसणारा, 'इंटरनेट धाबा' अशी पाटी असलेला, एक छोटा घुमट आहे. सकाळी सहज आत डोकावलो, तर 'I Love New York' असं लिहिलेला टी शर्ट घातलेल्या एक राजस्थानी आजीबाई काँप्यूटरवर काहितरी टाईप करत बसल्या होत्या. या नौरतीबाई, इंटरनेट कॅफे चालवतात. वय वर्षे साठ. पस्तीस वर्षांपूर्वी त्या बेअरफूट कॉलेजला रजया विणायला आल्या. मग तिथेच लिहायला-वाचायला शिकल्या. गावातल्या इतर स्त्रियांना शिकवलं. या देशाची एक नागरीक म्हणून आपल्याला काही अधिकार मिळाले आहेत, ही नवीनच माहिती त्यांना या केंद्रात मिळाली आणि पंचायतीच्या निवडणूकीत उभं राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नौरतीबाई ' खालच्या जातीच्या', आणि 'बाई'. त्यामुळे त्यांना व्हायचा तो विरोध झालाच. नवर्‍याला मारहाण झाली, सवर्णांनी बहिष्कृत केलं. पण तरी नौरतीबाई निवडून आल्या. पुढची पाच वर्षं त्यांच्याच भाषेत सांगायचं तर 'मैंने पुरी पंचायत और अफसरोंका जीना हराम कर दिया'. बाईंनी डोक्यावरचा घुंघट काढून टाकला. जिथे पाणी प्यायचं असलं तरी परपुरुषासमोर बाई जात नाही, तिथे नौरतीबाई आल्या की पुरुष सावरून बसू लागले. ' ये बहुत खतरनाक औरत है', अशी त्यांची इमेज तयार झाली. त्यांना मिळणार्‍या विकासनिधीतून त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली पक्के रस्ते बांधून घेतले. या विकासनिधीसाठीसुद्धा बाईंना भरपूर झगडावं लागलं. वर्षं उलटलं तरी पैसा हाती येत नाही, हे बघून बाई उपोषणाला बसल्या. "आज दस साल हो गये, इको गढ्ढा नाही गिरा रास्ते पर. और इको पैसा रिश्वत नाही दिया. पाई पाई का हिसाब है हमारे पास", त्या अभिमानानं सांगतात.

पाच वर्षांपूर्वी नौरतीबाई काँप्यूटर शिकल्या. इंटरनेट वापरता यायला लागल्यावर पहिला ईमेल त्यांनी सॅम पित्रोदांना पाठवला. जर्मनी आणि बीजिंगला जाऊन आंतरराष्ट्रीय सभांमध्ये स्त्रियांच्या हक्कांबद्दल बोलून आल्या. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी खेड्यापाड्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल, या विषयावर गेल्या वर्षी बंगलोरला एक परिषद आयोजित केली गेली होती. नौरतीबाईंनी श्री. अझीम प्रेमजी यांच्यासमोर अर्धा तास भाषण करून ती परिषद गाजवून सोडली. ज्या सुसूत्रपणे नौरतीबाईंनी मला राजकारण आणि ITबद्दल सांगितलं, ते ऐकताना ह्या आजीबाई कधी शाळेत गेल्या नव्हत्या या गोष्टीवर माझा विश्वासच बसेना. रोजगार हमी योजना, खेळते भांडवल, स्त्रियांचे सक्षमीकरण, प्रामाणिकपणा, इंटरनेट, हाक्का नुडल्स, चॉपस्टीक्स वगैरे असंख्य विषयांच्या गल्लीबोळांतून त्यांनी मला सहज हिंडवून आणलं.

नौरतीबाईंसारख्या विलक्षण धडाडीच्या असंख्य कार्यकर्त्या मला तिलोनियात भेटल्या. सीता, शामा आणि मेहनाझ या तिघी सोलरकुकर तयार करतात. बाजारात मिळतात तसे लहान पेटीतले नव्हेत, तर एका वेळी ४०-५० माणसांचा स्वयंपाक होऊ शकेल एवढे १५ फूट व्यासाचे अंतर्वक्र आरशांचे हे संच असतात. त्यासाठी लागणारे आरसे, लोखंड विकत आणणं, ते कापून वेल्डींग करणं ही सारी कामं या तिघीच करतात. व्हर्नियर कॅलिपरचा वापर, इंच-सेंटीमिटरमधील फरक, अंतर्वक्र/बहिर्वक्र आरशांचे गुणधर्म हे सगळं त्यांना एका जर्मन सोलर इंजिनीयरने शिकवलं. शाळेत पाऊलही न टाकलेल्या या तिघींनी सारी मोजमापं, काचा कापणं, वेल्डींग इ. शिकून घेतलं आणि पहिल्या वर्षभरातच तीस कुकर बनवले. मग त्यांच्या लक्षात आलं की आरशांची ही बशी सूर्य जसा फिरेल तशी फिरवावी लागते, आणि लोकांना हे त्रासदायक वाटतं. म्हणून स्वतःच प्रयोग करून त्या कुकरच्या मागे त्यांनी एक गियर बसवला. या गियरमुळे सुर्याच्या भ्रमणानुसार तो आरसासुद्धा फिरतो. अर्थात त्यासाठी ट्रिगॉनोमेट्रीचा वापर करून कुकरचा आरसा आणि सूर्य यांचा योग्य कोन साधावा लागतो. हे त्या कसं करतात या माझ्या शंकेच्या समाधानार्थ त्यांनी मला ट्रिगॉनोमेट्रीची प्रमेयं भास्कराचर्यांच्या मोर आणि सापाचं उदाहरण देऊन व्यवस्थित समजावून सांगितली.

सौरकंदील तयार करणार्‍या गुलाब आणि ढापूबाईंनीसुद्धा मला असंच चकीत करून सोडलं. रेझिस्टर्स, डायोड्ससकट संपूर्ण सर्किट बोर्ड ट्रेस करून मला त्यांनी बेसिक इलेक्ट्रॉनिक्स समजावून सांगितलं. रात्रशाळा, दवाखाने आणि असंख्य घरांमध्ये इथे तयार झालेले सौरदिवे वापरले जातात. आजतागायत सुमारे ३५० स्त्रियांना त्यांनी सौरकंदील तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. सौरदिवे तयार करणं, त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करणं ही सगळी या बेअरफूट सोलर इंजीनियर्सची जबाबदारी. लेह, कारगील पासून सिक्कीमपर्यंत भारतातील सुमारे ४०० खेड्यांत ३०० मेगावॅट वीज इथल्या उपकरणांद्वारे तयार होते. हिमाचल आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये तिथल्या सोलर इंजीनियर्स २-२ दिवस पायपीट करून या सौरदिव्यांची दुरूस्ती करतात. बदाक्षान हे अफगाणिस्तानातील अतिशय दुर्गम खेडं राजस्थानातील बेअरफूट सोल्जर्सनी गेल्या वर्षी संपूर्णपणे सौरउर्जेच्या मदतीने पुन्हा वसवलं आहे.

याशिवाय सुमारे २५ देशांतील स्त्रिया येथे सहा महिने राहून सौरदिवे तयार करण्याचं प्रशिक्षण घेतात आणि आपल्या देशात परत जाऊन इतर स्त्रियांना शिकवून गावंच्या गावं प्रकाशमान करतात. बोलिव्हीया, सिएरा लिऑन, गांबिया, अफगाणिस्तानच्या काही प्रशिक्षणार्थींना मी भेटलो. निदान रात्री तरी वीज मिळावी या छोट्याशा इच्छेपायी सर्वस्वी अपरिचित अशा वातावरणात आपलं घरदार सोडून त्या राहत होत्या. भाषा येत नाही, जेवणाचा प्रश्न, सभोवती रुक्ष रखरखाट आणि तरीही शिकण्याची विलक्षण जिद्द आणि गावकर्‍यांनी या कामासाठी आपली निवड केली हा अभिमान. सकाळी खुणांच्या भाषेत इलेक्ट्रॉनिक्सच्या संकल्पना समजावून घ्यायच्या, मग हातात सोल्डरगन घेऊन सर्किट्स तयार करायला शिकायचं, संध्याकाळी बोअरवेलची दुरुस्ती आणि rainwater harvestingचे धडे. अफ्रिका आणि द. अमेरीकेतील असंख्य गावांत तिलोनियाला शिकून गेलेल्या स्त्रियांनी आपापल्या गावातील वीज आणि पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवून टाकला आहे. गावचं पुढारीपणही आपसूकच त्यांच्याकडे आलं आहे.

चौथी शिकलेल्या ललिताजींनी जलव्यवस्थापनासाठी भारतातील पहिलं सॉफ्टवेअर तयार केलंय. SWRCच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतील एकूण एक जलस्रोताची माहिती ललिताजींच्या सॉफ्टवेअरमुळे सहज मिळते. केवळ पाण्याची पातळीच नव्हे, तर fluoride content, pH हे सारं नियमितपणे मोजून डेटाबेसमध्ये अपडेट केलं जातं. रात्रशाळांतील विद्यार्थी त्यांना या कामी मदत करतात. याशिवाय सुमारे ६०० स्त्रिया १५,०० हँडपंपांच्या देखभालीचं काम बघतात. स्पॅनर्स हातात घेतलेल्या या कार्यकर्त्यांमुळे जवळजवळ ३ लाख लोकांना शुद्ध पाणी मिळतं.

तिलोनियातील या अफलातून श्रमसृष्टीच्या खर्‍या शिल्पकार आहेत डॉ. अरूणा रॉय. अतिशय मानाचा समजला जाणारा मॅगसेसे पुरस्कार आपल्या एकटीला न मिळता संस्थेला मिळावा म्हणून तो नाकारणार्‍या अरूणा रॉय आपल्याला त्यांनी माहितीच्या अधिकारासाठी दिलेल्या लढ्यामुळे परिचित आहेत. अख्ख्या तिलोनियाच्या त्या नानीजी आहेत. १९७२ साली पडलेल्या दुष्काळात बंकर रॉय यांनी बेअरफूट कॉलेजची स्थापना केली, आणि अरूणा रॉय त्यांच्या पाठोपाठ या कार्यात सामील झाल्या. भयंकर दुष्काळ होता तो. आयुष्यात कधीही घराबाहेर पाऊल न टाकलेल्या स्त्रिया सरकारने काढलेल्या दुष्काळी कामांत उन्हातान्हात भररस्त्यावर खडी फोडायला आल्या होत्या. नानीजींनी मग तिलोनियातील काही स्त्रियांना केंद्रात बोलावलं आणि रजया विणण्याचं काम दिलं. नौरतीबाई आणि मांगीदेवी इथे आलेल्या पहिल्या कार्यकर्त्या. काश्मीरमध्ये रस्ता बांधकामात राजस्थानापेक्षा ३० पैसे जास्त मिळतात म्हणून मांगीदेवींचं अख्खं कुटूंबच सहा महिने काश्मीरला इमिग्रेट व्हायचं. भीषण थंडी, पाऊस, हिमवर्षाव यांचा परिणाम म्हणून फार क्वचित माणसं धडधाकट परतायची. त्याऐवजी तेवढेच पैसे केंद्रात मिळतात म्हणून मांगीदेवींपाठोपाठ गावातील काही स्त्रियाही केंद्रात दाखल झाल्या. हळूहळू रजयांबरोबरच हस्तकलेच्या इतर वस्तूही तयार होऊ लागल्या. अक्षरओळख झाली. नानीजी गावोगाव जाऊन स्त्रियांना एकत्र करत. केंद्राबद्दल माहिती सांगत. दुष्काळात अशाप्रकारे असंख्य संसार देशोधडीला लागण्यापासून नानीजींनी वाचवले. तरीही स्थलांतरणाचा प्रश्न होताच. इथली माणसं जगायला शहराकडे धावायची, गावाकडली एकरा-दोन एकराची जमीन पावसाच्या लहरीवर अवलंबून पडलेली असायची. पाऊस बरा झाला तरी महिनाभर पुरेल एवढेही धान्य हाती लागत नसे. यावर उपाय म्हणून rainwater harvestingचा प्रयोग केला गेला. पावसाचं पाणी साठवण्यासाठी बायकांनी प्रत्येक खेड्यात प्रचंड टाक्या बांधल्या. वर्ष-दोन वर्षांत भूजलाची पातळी वाढल्यावर मग केंद्रानं स्त्रियांना बोअरवेल बांधण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर नानीजींनी केंद्रातील स्त्रियांसमोर कर्ज घेऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची योजना मांडली. एकट्या मांगीदेवी तयार झाल्या. एवीतेवी मरायचं आहेच, मग कर्ज घेऊन मरू, असा त्यांचा त्यावेळी विचार होता. १० हजारांचं कर्ज ट्रायसेम योजनेतून घेऊन हातमाग विकत घेतला गेला, आणि मांगीदेवींनी मुदतीच्या आधीच कर्ज फेडलं.

पन्नाशीच्या मांगीदेवी आज बेअरफूट कॉलेजच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख आहेत. चार जिल्ह्यांतील सुमारे ३५० रात्रशाळांचं संपूर्ण काम त्या बघतात. हिंदी आणि राजस्थानीत बोलताना मधेच इंग्रजी शब्द पेरण्याची त्यांची मजेशीर लकब तिलोनियात बरीच प्रसिद्ध आहे. त्यांच्याबरोबर रोज संध्याकाळी वेगवेगळ्या गावांतील रात्रशाळांत मी जात होतो. तिलोनियात तयार झालेल्या सौरकंदीलांच्या आधारे या शाळा चालतात. त्यावेळी बालसंसदेच्या अधिवेशनाची तयारी जोरात सुरू होती. मुलांना लोकशाही म्हणजे काय हे कळावं, हक्कांची जाणीव व्हावी, 'स्वातंत्र्य, समता, बंधुत्व' ही मूल्ये त्यांच्या ठायी रूजावी हा बालसंसदेमागील उद्देश. रात्रशाळांतील सारी मुलं आपले उमेदवार ठरवतात. प्रचाराच्या फैरी झडतात. मतदान होतं, आणि खासदार निवडून येतात. पंतप्रधानपद हे मुलींसाठी राखीव. मंत्रिमंडळाचा शपथविधी होतो. बेअरफूट कॉलेजच्या विभागप्रमुख या मंत्रांच्या सचिव म्हणून काम बघतात. उदा. मांगीदेवी या शिक्षणमंत्र्यांच्या सचिव. पाणी, सौरदिवे, शेती, आरोग्य यांसंदर्भातील सार्‍या सुचना, तक्रारी मंत्र्यांमार्फत सचिवांकडे येतात. त्यावर महिनाभरात काही कार्यवाही न केल्यास मंत्री आपल्या सचिवांची बेअरफूट कॉलेजमधून हकालपट्टी करू शकतात. मंत्र्यांना कुठल्याही रात्रशाळेचे इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार असतो. वर्षातून दोनदा या संसदेचं तिलोनियाला अधिवेशन असतं. हे अधिवेशन बघायला सगळ्या रात्रशाळांतील विद्यार्थी तर असतातच, पण जगभरातून पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी येतात. गेल्या वर्षी या अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण इंग्लंड, फ्रांस व इटलीमध्ये केलं गेलं. आपल्याकडे त्यावेळी ऐश्वर्या रायचं कुठल्या वडा-पिंपळाशी लागलेलं लग्न गाजत होतं.

मांगीदेवी आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे साक्षरतेचं प्रमाण वाढलंय. विद्यार्थ्यांपैकी ७०% मुली असतात, आणि निदान १०वीपर्यंत तरी त्या शिकतात. या मुलांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास आणि बाहेरच्या जगाबद्दल कुतूहल आहे. झापडं लावून जगणं त्याना माहितीच नाही. त्यांच्याशी गप्पा मारताना पहिलेछूट जाणवते ती त्यांची प्रगल्भता आणि सभोवतालच्या परिस्थितीशी जुळलेली नाळ. पर्यावरण, शेती, पाणी, मोर, हरीण, गावातील वृद्ध आणि लहान मुलं या सार्‍यांबद्दल त्यांना ममत्व आणि काळजी आहे. मांगीदेवींनी त्यांच्यासाठी खास पुस्तकं लिहून घेतली आहेत. खेळणी तयार करण्यासाठी खास विभाग आहे. रबरी चपला, ट्रकच्या फाटक्या सीट्स असल्या कचर्‍यातून देखणी खेळणी तयार होतात.

सौरउर्जेच्या इतक्या व्यापक आणि सुंदर उपयोगामुळे जीवनमानात पडलेला हा फरक अद्भुत आहे. आरोग्य, शिक्षण, शेती या सर्वच क्षेत्रांत आमुलाग्र बदल घडून आला आहे. स्त्रीभृणहत्येचे प्रमाण खूप कमी झालं आहे. बालविवाह होत नाहीत. कुठल्याही आरक्षणाशिवाय स्थानिक राजकारणात स्त्रियांना मानाचं स्थान मिळालं आहे. माहितीच्या अधिकाराचा वापर कसा करायचा हे ठाऊक असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. सौरकंदीलांमुळे स्त्रिया रात्री भेटू शकतात. बचत गट स्थापन झाले आहेत. हे सगळं करताना कुठेही मोठं समाजकार्य केल्याची किंवा उपकाराची भाषा नाही. कधीही शाळेत पाऊल न टाकलेल्या स्त्रिया अतिशय सन्मानानं सोलर इंजीनिअर, मेकॅनिक, केमिस्ट, शिक्षिका, आर्किटेक्ट या सगळ्या भूमिका उत्तम रितीने पार पाडताहेत. तिलोनियातील हे प्रयोग आत जगभरात सुरू झाले आहेत.

सुशिक्षित आणि अशिक्षित या शब्दांचा खरा अर्थ तिलोनियात गेल्यावर कळतो. कधीही शाळेत न गेलेल्या इथल्या स्त्रियांचे विचार अधिक सुस्पष्ट आहेत. पडेल ते काम करण्याची तयारी आहे. लाथ मारेन तिथे पाणी, ही धमक अंगी आहे. राजस्थानातील उन्हात किंवा हिमाचल-उत्तराखंडच्या डोंगरांवर सीता, शामा, मेहनाझ सहज दहा-पंधरा किलो लोखंड पाठीवर वाहून नेतात. स्वयंपाक किंवा शिवणकामाबद्दल बोलावं, तितक्या सहजतेने त्या transformers, coils आणि condensersबद्दल बोलतात. 'आप यहाँ क्या करती हो?' या प्रश्नाचं 'इलेक्ट्रॉनिक सर्कीट और सोलर चार्जर बनाती हूं. और इलेक्ट्रीक फिटींग, हँडपंप का रखरखाव भी आता है,' हे सगळ्यात कॉमन उत्तर मिळेल. प्रामाणिकपणे काम करून स्वतःचं आणि इतरांचंही आयुष्य सुखकर करता येतं, हे शंभर पुस्तकं वाचून न कळणारं साधंसोपं सूत्र इथे प्रत्येकानं सहज आत्मसात केलं आहे. 'आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात. सरकारवर विसंबून कुठं काय होत असतं का? आणि आपण काम केलं तरी लोकांचा पैसा लोकांकडेच जायला हवा,' हे नौरतीबाईंचे बोल खरं तर प्रत्येकानं कायम लक्षात ठेवयला हवेत. केवळ घरं, रस्ते, शाळाच नव्हेत, तर मन आणि बुद्धी झळाळून टाकण्याचं सामर्थ्य तिलोनियातील या बेअरफूट सोल्जर्समध्ये आहे.

गुलमोहर: 

चिन्मय,एका अद्भुत विश्वाची ओळख करून दिलीस की रे.. शून्यातून हे विश्व निर्माण
करणार्‍या या सगळ्यांना अनेक सलाम....
या बेअरफुट कॉलेजबद्दल,तिलोनियाबद्द्ल काहीच माहिती नव्हती.. तू ही माहिती दिल्याबद्दल तुला शतश: धन्यवाद....

चिन्मय, या माहिती बद्द्ल शतश: धन्यवाद, एका वेगळ्या विश्चाची ओळख करुन दिलीस.
"गेल्या वर्षी या अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण इंग्लंड, फ्रांस व इटलीमध्ये केलं गेलं. आपल्याकडे त्यावेळी ऐश्वर्या रायचं कुठल्या वडा-पिंपळाशी लागलेलं लग्न गाजत होतं"
वाचुन खुप वाईट वाटले, बाहेरचे देश अश्या कार्याचि दखल घेतात,
आपले मिडियावाले आणि सरकार सुधारतील हि फक्त अपेक्शा आपण करु शकतो.

ललितमध्ये लेखाचं शीर्षक वाचून एखाद्या पुस्तकाचं रसग्रहण असेल असं वाटलं होतं.... वाचताना आश्चर्याचे अनेक धक्के बसले आणि हे खरोखरीच एखाद्या पुस्तकातच घडत असेल असे वाटले. इतका सुंदर माहितीपूर्ण लेख इथे लिहिल्याबद्दल चिनूक्स तुमचे अनेक धन्यवाद..

लेख वाचुन वाट्त की राम्रराज्य ची सुरवात झाली .मीडीया च्या लोकाना लाज वाटली पाहीजे.डोळे दिपवणारी आणि सन्मानानी डोके वर करायला लावणारी घटना भारतात घडत आहे आणि आपल्या देशात फार कमी लोकाना त्या बद्दल माहिति आहे . बेअरफुट कॉलेजबद्दल,तिलोनियाबद्दल माहिति सान्गीतली त्या बद्दल धन्यवाद .

चिनूक्स, एका अतिशय चांगल्या कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविल्याबद्दल धन्यवाद! इतर मीडियातून ही माहिती मिळणे फार अवघड आहे हे त्या थेट प्रक्षेपणाच्या दिवशी आपल्या कडे काय दाखवत होते त्यावरून कळते.

खूपच छान माहिती. तुमचे खूप खूप आभार. हे भारतात घडतंय याचा अभिमान वाटला. महाराष्ट्रातले तुमचे अनुभव मन विषण्ण करणारे आहेत.
आपल्याकडे त्यावेळी ऐश्वर्या रायचं कुठल्या वडा-पिंपळाशी लागलेलं लग्न गाजत होतं.>> हे तर त्याहून विषण्ण करणारे...

Chinoox, फार चांगली माहिती दिलीत. धन्यवाद.

चिनूक्स,
उत्तम लेख.
जागं करणारी, विचार करायला भाग पाडणारी माहिती.

--
Come on you raver, you seer of visions,
come on you painter, you piper, you prisoner, and SHINE!

चिनूक्स - खूपच छान माहिती !!

अरे! हा लेख मी वाचलाच नव्हता! नेहेमीप्रमाणेच अत्यंत माहितीपूर्ण. अनेक धन्यवाद चिनूक्स!

नमस्कार चिन्मय दामले,
ते "अलीबाबा" परत जाताना त्या गुहेची किल्ली वगैरे तुमच्याकडे देउन गेले का हो ? आणि ही उपमाही कमीच कारण त्यापेक्षाही मौल्यवान अशी ही अनेक भारतरत्ने तुमच्या लेखातून वाचायला मिळतात - खरंच वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे या सर्व मंडळींची ओळख करुन दिल्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद व या सर्व मंडळींना सलाम.

Pages