नॉस्टॅल्जिया... सिनेमा सिनेमा..

Submitted by मी मुक्ता.. on 4 March, 2011 - 00:01

असं म्हणतात की आयुष्यात प्रत्येक क्षण युनिक असतो. एकमेव्-अद्वितीय. आणि तो तसाच जगला पाहिजे. तरच आपण प्रत्येक अनुभवाचा परिपूर्ण प्रत्यय घेवु शकतो. पण प्रत्येक क्षणाला हा पण पाळणं अवघड आहे. आणि काही क्षण, काही नावांसाठी तर अशक्य. तसं प्रत्येकच गोष्टीला एक रुप असतं, एक रंग असतो, एक गंध असतो..पण काही नावं येतानाच आपल्यासोबत अनेक रुप, रंग, सुगंधांची गाठोडी घेवुन येतात. आजही कोणताही सिनेमा बघताना मी फक्त तो सिनेमा बघत नसते तर लहाणपणापासून सिनेमासोबत जुळलेल्या, भोगलेल्या सगळ्या आठवणी जगत असते. सिनेमाच्या त्या जगाबरोबरच अजुन एका वेगळ्या आठवणींच्या जगात फिरुन येत असते. गुलजार म्हटलं की त्यांची ती सगळी गाणी, वेळोवेळी मी त्यांच्याशी साधलेला संवाद, अनेक उत्कट क्षणांना त्यांच्या शब्दांची झालेली ती सोबत असं सगळं घेवुनच ते नाव माझ्यासमोर उभं रहातं. अशा अनेक गोष्टी आहेत. सिनेमा, गुलजार, चित्रपट संगीत, शाळा, समुद्र, प्रवास.. अशाच काही मनाच्या कोपर्‍यात मंद दरवळत रहाणार्‍या गोष्टींना दिलेला हा उजाळा.. नॉस्टॅल्जिया... साधारणतः १९९४ ते २००९ या काळाच्या मैफिली रंगवणारा. मी ७-८ वर्षांची असल्यापासून ते इंजिनीरींग होईपर्यंतच्या कालखंडातल्या आणि त्या वेळेत बालपण रंगलेल्या सगळ्यांना आठवतील अशा काही गोष्टी. Happy
------------------------------------------------------------------------------------
सिनेमा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे मे च्या सुट्टीत थिअटरला सिनेमा बघायचा कार्यक्रम. त्यावेळी दर आठवड्याला उठुन सिनेमा बघायची पद्धत नव्हती त्यामुळे सिनेमाला जाणं हा वार्षिक किंवा सहामाही कार्यक्रम असायचा. आणि सुट्टीवरुन परत शाळा सुरु गेल्यानंतर कोणता सिनेमा बघितला याच्या चर्चा पुढची चाचणी परीक्षा येईपर्यंत अधूनमधून चविने चघळल्या जायच्या. मे च्या सुट्टीत गावी गेलो की त्या वर्षांतला त्या सुट्टीतला सगळ्यात बिग बजेट सिनेमा गावात कधी येतोय त्याची वाट पाहिली जायची. तो आला की एका दिवशी गावातल्या एकुलत्या एक चांगल्या थिअटर मध्ये त्याची एके रात्री ९ ते १२ च्या शो ची तिकीटं काढली जायची. त्यातल्या त्यात आमचे मधले काका जरा रसिक वै. म्हणता येतील असे होते. त्यामुळे तेच पुढाकार घेवुन तिकीटं काढुन आणायचे. बाकी घरातल्या पुरुषांना सिनेमा बघण्यात काही रस नव्हता आणि तशी पद्धत पण नसावी कदाचित. मग त्या दिवशी सकाळपासुनच घरात फार लगबग असायची. आम्ही सगळी चुलतभावंड त्याच विचारात गुंग. कोणी दंगा केला की लगेच, "तुला नेणार नाही मग संध्याकाळी.." अशी धमकी दिली जायची. रात्रीच्या स्वयंपाकाला दुपारच्या जेवणानंतर लगेचच सुरुवात व्हायची. सगळं आवरुन मग आई, दोन काकु जरा आराम करायच्या. आम्ही पण त्यादिवशी दुपारी त्यांना दंगा न करता झोपु द्यायचो. संध्याकाळी काका स्वतःहुन अंगण झाडणे, सडा-पाणी वै. कामं करायचे घरातल्या बायकांना तेवढीच मदत म्हणुन. पिच्चरला जायचंय, पिच्चरला जायचंय म्हणत लवकरच जेवणं आवरायची. सगळी झाकपाक, भांडीकुंडी होवुन घरातली सगळी महिला मंडळी आणि बच्चे कंपनी निघायची. घरापासुन फक्त १०० मी वर असलेल्या ठिकाणी सगळ्यांना सोडायला काका यायचे सोबत. आणि मग लहान मुलं सोबत असल्यावर जे प्रकार होतात ते सगळे प्रकार साग्रसंगीत पाड पडुन आम्ही तो सिनेमा बघायचो. ते सिनेमागृहाच्या मंतरलेल्या काळ्याभोर अंधारातले जादुई ३ तास म्हणजे पुढच्या ६ महिन्यांची बेगमी असायची. असा पाहिलेला पहिला सिनेमा आठवतो तो म्हणजे, हम आपके है कौन.! रेणुका शहाणे मरते तेव्हा ढसा ढसा रडले होते मी. आणि परत शाळा सुरु झाल्यावर कोण किती रडलं हे सांगायची मुलींच्यात चांगलीच चुरस लागलेली. अशा सुट्टीत बघितलेल्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर त्यानंतर अशाच प्रकारे बॉम्बे, दिलवाले दुल्हनिया.., कुछ कुछ होता है, राजा हिंदुस्तानी वै. वै. चित्रपट पाहिले.
पण हा म्हणजे अगदीच सठीसामाशी येणारा योग असल्यामुळे चित्रपट बघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे टिव्ही..! शुक्रवारी-शनिवारी रात्री आणि रविवारचा मराठी चित्रपट पहायला मिळणं म्हणजे त्या दिड दिवसाच्या सुट्टीतलं एक महत्वाचं काम असायचं. मला चांगलच आठवतंय ते म्हणजे, त्यावेळी शुक्रवारी जरा बर्‍यापैकी जुने आणि शनिवारी त्यातल्या त्यात नवे चित्रपट लागायचे टिव्ही वर. मग शुक्रवारचा सिनेमा जर चांगला असेल तर आई आवर्जुन बघ म्हणुन सांगायची. मग डोळे ताणुन ताणुन, मधल्या जाहिरातींना कंटाळत तो चित्रपट संपवला जायचा. मग दुसर्‍या दिवशी अपुर्‍या झोपेमुळे जे व्हायचं ते व्हायचं. पण असा असायचा तो शुक्रवारचा सिनेमा. आणि शनिवारी तर बघायलाच नको. रविवार म्हणजे उशिरा उठायचा हक्काचा दिवस (अर्थात कुठली स्पर्धा किंवा परिक्षा नसेल तरच्).! त्यामुळे शनिवारी रात्री चांगला सिनेमा लागावा हे माझी अगदी मनापासूनचे इच्छा असायची. लागला तर दुधात साखर.. आणि नाही लागला तर? अहो नाही लगला तर रविवारच्या मराठी चित्रपटाची वाट बघायची. रविवारी घरी अभक्ष भक्षणाचा भरगच्च कार्यक्रम असायचा. दुपारच्या छायागीतसोबत तो संपला की मग दुपारी जडावलेले डोळे घेवुन "दुपारी झोपू नका, नाहीतर रात्री झोप लागायची नाही" ही आईची सुचना ऐकतच झोप लागुन जायची. आणि मग ४ च्या मराठी सिनेमाची सुरुवात व्हायच्या आत घरात एकेक मेंबर जागं व्हायचा. रविवारी दुपारी प्रदेशिक चित्रपट लागायचे. त्यावेळी असं खूप वाटायचं की हे चित्रपट कळायला हवेत. आपण ते पाहिले पाहिजेत. त्यावेळी अशी काहितरी धारणा होती की हे कोणतेतरी भारी चित्रपट आहेत. पण एकदा त्याच प्रादेशिक चित्रपटात जेव्हा मराठी चित्रपट पाहिला तेव्हा मनात म्हटलं, "हात्तिच्या, म्हणजे इतर भाषांतले पण असेच चित्रपट असणार ते, वेगळं नाही काही !" आणि मग एकदम फुग्यातली हवाच काढुन टाकल्यासारखम झालं.
पण बहुतेक वेळेला सिनेमा बघताना खूपच्या खूप हरवुन जायची मी. मग असाच एखादा टाइमपास सिनेमा असला तरी. पण आईच्या आग्रहामुळे असे पांचट चित्रपट फारच कमी बघितले गेले. रविवारी दुपारी बघितलेल्या चित्रपटात अगदी अजुनही आठवतात ते म्हणजे, सामना, वजीर, सरकारनामा, निवडुंग, सगळे विनोदी मराठी सिनेमे, दर दिवाळीला न चुकता लागणारा धुमधडाका! अशोक-लक्षा-सचिन-महेश यांचे बहुतेक सगळे हिट चित्रपट रविवारी ४ लाच पाहिलेले आहेत.
या वीकेंड सिनेमाचे वेध मला तरी बुधवारपासुनच लागायचे. शाळा मनापासुन आवडायची पण तरीही या सिनेमांसाठी शुक्रवारची वाट बघायची मी. रविवारी संध्याकाळचा सिनेमा संपला की अगदी उदास्-उदास, भकास वाटायचं. कोणी बोलवायला आलं तरी जायला नको वाटायचं.. (हल्ली पण असंच होतं, पण ते सोमवारी ऑफिस आहे या कल्पनेने.. Sad ) असो..
मधल्या काळात कधीतरी या लोकांनी शनिवारी रात्री ९.३० कोणतंकी सिरिअल सुरु केलेलं त्यामुळे सिनेमा लागायचा १०.३० ला आणि संपायचा १.३० ला. हे म्हणजे आमच्यासाठी अतीच होतं. (हॉस्टेलला राहिल्यापासुन मात्र १.३० म्हणजे किमान वेळ झाली ते सोडा) त्यामुळे अगदीच चांगला सिनेमा असल्याशिवाय शनिवारचा सिनेमा बघणं बंद झालं.
लिहिता लिहिता अचानक आठवलं.. एक चायनीज म्हण आहे, Day by day nothing changes but when you look back, everything is changed...!!
ह्म्म... आणि त्या काळचे ते हिरो-हिरोईन्स.. सगळी खानावळ, अक्षय कुमार, गोविंदा, अजय देवगण, सुनिल शेट्टी, माधुरी, उर्मिला, रविना, काजोल, करिष्मा.. सगळे एकजात गोड गोड चॉकोलेट हिरो असलेले खान्स.. नंबर १, नंबर १ करणारा गोविंदा आणि मला ज्यांचा प्रचंड राग यायचा आणि यांना हिरो कोणी केलं हा प्रश्न ज्यांच्याकडे बघुन पडायचा असे अजय आणि सुनिल. (काजोलने अजयशी लग्न केलं त्याचा सगळ्यात मोठा धक्का मला बसलेला हे मी आजही शपथेवर सांगु शकते..) मराठी मुलगी आणि मिलियन डॉलर स्माईल ने घराघरातील बायका-पुरुषांच्या गळ्यातला ताईत बनलेली धक धक गर्ल माधुरी, मराठी पोरी बोल्ड व्हायला लागल्यात हे वाक्य जिच्यामुळे जास्त वापरलं जाउ लागलं ती उर्मिला, आपल्या अभिनयाने नेहमीच सगळी अ‍ॅवार्डस् घेवुन जाणारी काजोल. (त्यावेळी सगळ्या पेपरमध्ये तिचा उल्लेख गुणी अभिनेत्री असा असायचा. तेव्हा मला खरच असं वाटायचं की पेपरवाले ज्यांना गुणी म्हणतात ते खरच साधे-सुधे, गुणी असतात) मधुनच आपल्या एखाद्या चित्रपटाने वाद्ळ निर्माण करणारे महेश भट, पूजा भट.. त्यावेळी म्हणजे घरचे त्यांना शिव्या घालायचे यथेच्छ! लहान मुलांनी बघु नये म्हणायचे. का ते विचारायचं धाडस आम्ही कधी केलं नाही. पण अंगप्रदर्शन, भारतीय संस्कृती वै. वै. शब्दांची डोक्यात नुसती भेळ व्हायची पेपर वाचुन जे कळायचं त्यावरुन.
पुढे पुढे हे सगळं नकळत कधी मागे पडत गेलं कळलं नाही. दिल चाहता है बघितला तेव्हा असाही सिनेमा असु शकतो हे कळलं. न जाणवेल असं काहीतरी वेगळम वाटत राहिलं. पुढे हॉस्टेलला आल्यावर तर मग काही विचारालाच नको. इंग्लिश सिनेमाच्म खरं वेड हॉस्टेलच्या काळातलं. तिथे IMDB TOP सिनेमांचा फडशा पाडला. तिसर्‍या आणि शेवटच्या वर्षी तर सिनेमाचं वेड अगदी भरात होतं. तेव्हाच पहिल्यांदा PIFFला हजेरी लावली आणि तेव्हापासुन कायन न चुकता लावतेय. पहिल्या वर्षी मी सलग आठवडाभर २-३ सिनेमे रोज पाहत होते. एका शनिवारी तर ५.! संध्याकाळी बाहेर आलेय तेव्हा अक्षरशः ब्लॅंक
झालेले २ तास. हॉस्टेलला परत जाताना मी सिनेमातल्याच कोणत्यातरी रस्त्यावरुन चाललेय असं वाटत होतं. इतका बेक्कार हँगओव्हर परत कधी अनुभवला नाही मी. पहिल्यांदा PIFF पाहिल्यावर मग वर्ल्ड सिनेमाचा काळ सुरु झाला. मग हजार कटकटी करुन कुठून कुठून अशा फिल्म्स, त्यांची माहिती, सबटायटल्स मिळवुन मग असे सिनेमे पहायची मी. त्यातुनच मग सोर्सेसे भेटला, इनारित्तू, वूडी अ‍ॅलन भेटला आणि माझा सिनेमाजगाचा स्वामी, बर्गमन..! बर्गमन पहायचा म्हणजे माझ्यासाठी अगदी साग्रसंगीत कार्यक्रम असायचा. सिनेमा आणि इतर सगळी माहिती मिळवणे, सगळं आवरुन आता सिनेमा पाहिल्यानंतर काही कामं करायला लागु नयेत हा हिशोबाने सगळं आवरणं (कारण बर्गमनचा सिनेमा पाहिला की बाकी कशावर विचारही करायची स्थिती रहात नाही), हेड्फोन्स म्हणजे अगदी गरजेचे कारण शब्दन् शब्द साठवुन ठेवायचा असतो (कारण तो सिनेमा दुसर्‍यांदा पहाण्याचं धाडस मी करेन यावर माझाच विश्वास नाही)
असो... सिनेमा म्हटलं की थंडीच्या रात्रीत चादरीत गुरफटून बघितलेले, उन्हाळ्यातल्या दुपारी उकाड्याचा विसर पाडतील असे, गरमागरम चहाच्या वासाची आठवण करुन देणारे, अगदी वणवण फिरुन तिकिटं न मिळालेले, झोपेतुन उठुन ५ मिनिटात थिअटरला पोहचुन पाहिलेले, भिजुन, आतल्या एसी मध्ये कुडकुडत पाहिलेले असे सगळे सिनेमे आठवतात.. एखाद्या पांचट सिनेमाला सगळ्या ग्रुपने मिळुन केलेला दंगा, एखाद चांगला सिनेमा बघुन बदलुन गेलेलं माझं जग.. अशा अनेकानेक आठवणी दाटतात.. मला सिनेमातलं किती कळतं माहित नाही पण एखादी चांगली कलाकृती बघुन वाटणारं समाधान परत परत अनुभवावसं वाटतं.. अनेक रंग, अनेक गंध, अनेक आठवणी घेवुन येणारा हा माझा उत्सव.. कोणत्याही सिनेमाला जाताना आज मी या सगळ्या आठवणींचं गाठोडं घेवुन जात असते, त्या गाठोड्यात जमेल तशी भर टाकत असते..

गुलमोहर: 

प्रथम मनापासून धन्यवाद -एका चांगल्या विषयाला हात घातल्याबद्द्ल. दुसरे असे की एवढ्या चांगल्या विषयावर एकही प्रतिक्रिया नसावी. सारे मा.बो. कर कुठे हरवले ? खूप जिव्हाळ्याच्या आणि महत्वाच्या विषयावर चर्चा व्हावी असा हा कट्टा आहे. खूप लिहायचे आहे. थोडा वेळ मिळाला की लिहिनच.

सुंदर लिहिलयंस. अगदी माझीच गोष्ट, माझी काय पूर्वी फक्त दूरदर्शन ज्यांच्या घरी होते त्या सगळ्यांचीच असेल मला वाटतं. पिक्चरला जायचं हा कित्ती आनंदाचा क्षण असायचा आणि त्यातही दूरदर्शनवर अगदी चांगला पिक्चर असला तरी खूपच मस्त वाटायचं. दिवाळीत कोणता पिक्चर लावणार आहेत याची अगदी चर्चा वगैरे करायचो आम्ही भावंड. लक्ष्मीपूजन झालं की फराळ घेऊन टीव्हीपुढेच बसायचं कारण चांगला काहीतरी कार्यक्रम लागेल म्हणून. हम्म गेले ते दिवस. आता पायलीला पन्नास वाहिन्या आणि त्यावर ढिगभर चित्रपट, ती मजाच नाही राहिली.

खरच जुन्या आठवणी जाग्या करणारा धागा चालू केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या आठवणी फारच जुन्या वाटतील. मी लहान असताना फक्त धार्मिक सिनेमा पहायची परवानगी होती. परिक्षा संपली की राजा हरिश्चंद्र,संपूर्ण रामायण्,कैलासपती असे सिनेमे पहायला वाड्यातले मुले,मुली मिळुन जात असू. त्यातल्या वयाने मोठ्या असणार्‍या मुलाकडे किंवा मुलीकडे वडिल पैसे देत असत. मी पहिलेला सगळ्यात पहिला सामाजिक सिनेमा सुजाता होता.आणखी एक गमतीची आठवण म्हणजे तेंव्हा बीस साल बाद लागलेला होता.माझ्या मोठ्या भावाला (त्याच्या आणी माझ्यामधे आठ वर्षाचे अंतर आहे) तो पहायचा असावा,पण वडिलांना विचारायची हिंमत होत नसेल्.म्हणून त्याने माझ्या दुसर्‍या भावाला व मला बरोबर घेतले.वडिलांना त्याने एका धार्मिक सिनेमाचे नाव सांगितले असावे.आणि आम्हाला त्याने बीस साल बादला नेले.तो माझा पहिला थरारपट्.त्यात मी अर्धावेळ भितिने डोळे घट्ट बंद करुन बसले होते.घरी आल्यावर वडिलांना जेंव्हा खरे कळले,तेंव्हा त्याची चांगली धुलाई झाल्याचे आठवते.कॉलेजमध्ये राजेश खन्नाचा रोमँटिक जमाना होता.अमिताभ बच्चनची सुरवात होती.मी होस्टेलला होते. खूप जुने नवीन सिनेमे पाहिले.खरच गेले ते दिन गेले म्हणावेसे वाटते.

धन्यवाद टण्या, एक नॉस्टॅल्जिक प्रवास म्हणेन मी याला. यातली कुठेलीही एक आठवण फक्त तेवढीच म्हणुन येत नाही कधी. सगळ्या एकमेकांत मिसळल्यात्-न मिसळल्यात अशा.. म्हणुन हा एकत्रितपणे सिनेमाचा नॉस्टॅल्जिया.. Happy

धन्यवान समई.. Happy छानच आहेत आपले पण अनुभव. I think सिनेमाशी निगडीत आठवणी नाहित असा माणुस विरळाच..! Happy