बहर गुलमोहराचा

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 1 March, 2011 - 06:11

ती उठून बाहेर आली. लख्ख उजेडामुळे तिचे डोळे दिपले…….पण मग त्या प्रकाशाचं महत्व कळलं. कित्येक दिवसांपासून ती अंधाराच्या साम्राज्यात वावरत होती. अंधाराच्या लाटांमधे गुदमरत होती. तिने मनातले सगळे काळेकुट्ट विचार झटकले आणि तिला एकदम मोकळं मोकळं वाटलं. कित्येक दिवसांची मनावर जमलेली कानाकोपर्‍यातली जळमटं निघाल्यामुळे तिचं तिलाच उत्साही वाटायला लागलं. किती दिवस साठवून ठेवलं होतं आपण हे सगळं…..!! कोंदटलेल्या मनाला जरा ऊन दाखवल्याबरोबर पुन्हा एकदा सगळं टवटवीत झालं. आजूबाजूचा कचरा साफ केल्यावर परत तीच झळाळी दिसायला लागली आणि नव्याने सगळं सुंदर दिसायला लागलं.

नकोच आता तो कोंडमारा….. आतापर्यंत झालं तितकं पुरं झालं…आपल्यालाही स्वतंत्र अस्तित्व आहेच की ! नव्या जगण्याचा तिला पुन्हा एकवार मोह झाला. सगळं नव्याने सुरु करुया. नवी विटी, नवं राज्य !! पुन्हा एकदा आपलं नवं अस्तित्व तयार करायचं. पण मग त्यासाठी हे गाव कशाला…. करुया एखाद्या छोट्याशा अनोळखी गावापासून सुरवात ! जिथे आपल्याला कोणीच ओळखत नाही त्या गावात नक्कीच जास्त सुरक्षित वाटेल. तिने जुजबी सामान सोबत घेतलं आणि निघालीसुद्धा.

बसस्टेशनवर आज काही फार गर्दी नव्हती. तिने माहित नसलेलं गाव निवडलं, तिकीट काढलं आणि बसची वाट बघत बसली. मन अगदी कोरं करकरीत झालंय असं तिला वाटलं. पण नाही….असं कधी शक्य असतं का ….!! अशी मनाची पाटी पुसून कोरी करकरीत करता येते……?? बस आल्यावर ती बसमधे चढली मनासारखी खिडकीतली जागा मिळाली आणि सुरु झाला प्रवास एका अगदी अनोळखी वाटेनं !

गार वारा चेहेर्‍यावर घेत ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. मागे पळणारी झाडं बघून ती अस्वस्थ झाली. प्रत्येकाचा प्रवास पुढच्या दिशेने सुरु असतो पण आपण मात्र फक्त त्याच्यासाठी असा उलट प्रवास स्विकारला. त्याच्या गतीशी जुळवण्यासाठी आपला वेग कमी केला. वाटलं…. आता सगळं ठीक होईल पण नाही….. त्याने चालणंच थांबवलं. त्यामुळे तिलाही थांबावं लागलं. थोडी विश्रांती घेतल्यावर पुन्हा चालूया….ह्या आशेनं तीही त्याच्यासोबत रेंगाळली. काही दिवस असेच आंजारण्या-गोंजारण्यात गेले. पण हा ढिम्म….!! हात –पाय हलवायलाच तयार नाही. अपयशाने इतकं खचून जाण्यालायक काहीच घडलं नव्हतं. त्याच्या लायकीप्रमाणे त्याला काम मिळत नव्हतं आणि लायकी पेक्षा खालचं काम करायची त्याची तयारी नव्हती आणि मग शेवटी जो काय मार्ग निवडला तो बघून तिला त्याची किळस वाटायला लागली. त्याच्यासोबत रहाण्याचा विचारही नकोसा झाला. त्याच्या मनाचा विचार करुन ती प्रत्येक वेळी त्याला समजून घ्यायची. त्याला वाईट वाटेल म्हणून तिने तिच्या स्वत:च्या achievements चा आनंद कधी उपभोगलाच नाही. कायम त्याच्याच मनाचा विचार केला. खरं तर ती सुद्धा एका मोठ्या कंपनीतAdministrative Manager म्हणून काम करत होती. तिला भरपूर पगाराची नोकरी होती…..मान होता. तिच्या कामाने, तिच्या मेहनतीने, तिच्या नवीन कल्पनांमुळे तिने कंपनीत स्वत:साठी एक खास जागा बनवली होती. पण तिच्या कर्तृत्वाचं त्याला कधीच सोयरसुतक नव्हतं. खरं तर तिचंही……हे तिला फार उशीरा कळलं.

बस थांबली. कुठल्याशा छोट्या गावात. तिने मोठ्या प्रयासाने मनातली आवर्तनं थोपवली. नको……आता नकोच त्या आठवणी. खिडकीतून बाहेर बघितलं. भरपूर गलका, गोंधळ ! ह्या गलक्यातही तिला शांत शांत वाटलं. खिडकीतून जितक्या दूर नजर जाईल तितक्या दूर बघितलं….अगदी त्रयस्थपणे. आभाळ भरुन आलं होतं……सगळीकडे अंधारुन आलं होतं. कुठेतरी टाचणी लागणार आणि आभाळ कुठल्याही क्षणी कोसळू लागणार. अनोळखी वाटेवर कां कोण जाणे…..तिला खूप सुरक्षित वाटलं…..तिचं तिलाच आश्चर्य वाटलं. आजपर्यंत त्याच्या वागण्यामुळे कोणी ओळखीचं शक्यतोवर भेटूच नये असं तिला वाटायचं कारण सगळ्या ओळखीच्या नजरा गढुळल्या होत्या. त्या नजरांमधे तिच्या विषयी कीव दिसायची आणि काही नजरांमधे चक्क घृणा ! तिने सगळं कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी कुठे तरी काही तरी उघडं पडायचंच ! बघता बघता तिच्या मनातही भरुन आलं…… आणि डोळे झरायला लागले ! समोरच्या आभाळालाही सहानुभूतीचा पाझर फुटला……. हळुहळु म्हणता म्हणता ते ही कोसळायला लागलं. सगळं पुन्हा एकदा अनावर होऊन ती ओक्साबोक्शी रडायला लागली. शेजारची आजी काहीशी बावरुन तिच्याकडे बघायला लागली. मोठ्या प्रेमाने तिने तिच्या पाठीवरुन हात फिरवला. त्या स्पर्शातल्या मायेनं तिला आणखीनच भरुन आलं ! आजीने तिला मनसोक्त रडू दिलं. काहीही चौकशा न करता. हळुहळु शांत झाली ती. तिचं तिलाच आश्चर्य वाटलं तिच्या रडण्याचं…..! आयुष्यात त्याने तिला इतके वेळा रडायला लावलं होतं की आपल्या डोळ्यातलं पाणीच आटलं असं तिला वाटलं होतं. पण सहानुभूतीचा स्पर्श होताच अश्रू सुद्धा फितुर झाले होते. जवळचं असं कुणीच उरलं नव्हतं. जी काय नाती होती ती फक्त त्याच्या एका नात्यासाठी तिने स्वत:च तोडून टाकली होती. तेव्हा तिला माहित नव्हतं की ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय ते नातंच किती तकलादू आहे.

तो पहिल्यांदा भेटला तेव्हा मात्र त्याने आपल्याला कशी भूल पाडली ह्याचाच ती विचार करायची. तो एक क्षण सोडला तर त्याने तिची कधीच म्हणावी तशी दखल घेतली नाही. कायम स्वत:च्याच कौतुकात मग्न ! एकाच नाटकामुळे तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोचला होता. पण ते मोठेपण त्याला झेपलं नव्हतं…सांभाळता आलं नव्हतं. इतक्या लवकर मिळालेल्या यशामुळे तो स्वत:ला फार मोठा समजायला लागला होता. त्याच्या वागण्यात झालेल्या बदलामुळे त्याचे सोबती त्याच्यापासून दूर झाले. तेव्हाच ती त्याच्या आयुष्यात आली होती. तिला त्याचं किती कौतुक ! इतका मोठा कलाकार आपल्यावर प्रेम करतो ह्या विचारानेच ती भारावून गेली होती. खरं तर त्याने त्याचं प्रेम कधी फारसं व्यक्तच केलं नव्हतं. आपल्या अनेक चाहत्यांसारखंच तिचं जवळ येणं त्याने आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या अभिनयाचा विजय म्हणूनच बघितलं होतं. त्यात तिच्याबद्दल फार काही भावना नव्हत्याच. पण जसजसे त्याचे जवळचे लोक त्याला दूर करायला लागले तेव्हा त्याची चिडचिड, त्रागा झेलायला हक्काची कुणीतरी त्याला हवी होती. तेव्हा तीच त्याच्या कचाट्यात सापडली.

त्याच्या नैराश्यात तिची मात्र फरफट व्हायला लागली. त्याची मनस्थिती सांभाळता सांभाळता तिला तिचं काम झेपेनासं व्हायला लागलं. ऑफीसला जायला उशीर, कामात चुका व्हायला लागल्या. बॉसला खरं तर तिचं केवढं कौतुक …..पण तिच्या चुका, तिचं दुर्लक्ष, तिचं मिटिंगमधे असूनही नसणं…. हे तो तरी किती दिवस माफ करणार होता. पुढे पुढे तर हा चक्क ऑफिसात येऊन पैशासाठी तमाशे करायला लागला. सगळं हाताबाहेर जायला लागलं. काही दिवस सुट्टी घेऊन तिने सगळं सावरायचा खूप प्रयत्न केला. त्याला घेऊन ती महाबळेश्वरला गेली. तिथे त्याला चुचकारुन, समजावून सांगितलं. ’तू काहीतरी नवीन सुरु कर, मी तुला पैसे देते.’ ’पण ’तुझ्या पैशावर जगायला मी काही तुझा मिंधा नाही…. मी जे काही करायचं ते माझ्या भरवशावर करेन…..तू तुझं बघ ’…..अशा भाषेत तिला झिडकारलं. आता मात्र तिची सहनशक्ती संपली. संतापाच्या भरात ती त्याला खूप बोलली. “तुझा तू हवा तसा जग…….पण माझी सुटका कर” म्हणाली. मग मात्र तो भानावर आला. तो माफी मागायला लागला. काहीही झालं तरी फक्त तीच होती त्याची हक्काची, जवळची. आता तीच जाते बोलल्यावर त्याला भांबावल्यासारखं झालं. ती गेल्यावर कुणाच्या जीवावर जगणार…..! तो गयावया करायला लागल्यावर ही पुन्हा विरघळली. त्याला मोठ्या मनाने माफ करुन पुन्हा घेऊन आली. आता शहाण्यासारखा काम शोधेन, तुला त्रास देणार नाही वगैरे वगैरे बोलून तिचा विश्वास मिळवला. तीही थोडीशी निर्धास्त झाली. आता हा नक्की सुधारणार असं समजून पुन्हा ऑफिसात जायला लागली.

काही दिवस अगदी छान गेले. एक दिवस घरी येतांना तिला तिच्या घरातून बर्‍याचशा मुली, मुलं जाताना दिसली. तिने त्याला विचारलं……तर बोलला….मी एक नाटक बसवतोय त्याची ऑडीशन घेतोय. तिला बरं वाटलं की चला काहीतरी सुरवात झाली. काही दिवस त्या स्वप्नरंजनात बरे गेले. त्याचाही मूड चांगला होता……जास्तच रोमॅंटिक होता. तिला वाटलं जे झालं ते एक वाईट स्वप्नं होतं. आता जे काही होणार ते नक्कीच छान होणार……. पण तिचं हे वाटणंही एक स्वप्नंच ठरलं.

एक दिवस ती ऑफीसला जाताना शेजारच्या काकूंनी ती दिसताच काहीतरी पुटपुटत दाणकन्‌ तिच्या तोंडावरच दार लावलं. तिला आश्चर्यच वाटलं. ऑफिसमधे गेल्यावर सुद्धा थोडी कुजबूज होतीच आणि ती गेल्यावर आपोआपच बोलणं बंद. तिला कळेचना. ह्याचा उलगडा तिला बॉसच्या केबिनमधे गेल्यावर झाला. बॉसने तिला तिच्या नवर्‍याच्या नव्या उद्योगाबद्दल माहिती विचारली. तिला थोडंसं नवलंच वाटलं कारण बॉस कधीच घरगुती गोष्टी बद्दल बोलत नसे. पण त्याला तिच्याविषयी आदर, जिव्हाळा मात्र नक्कीच होता. नवीन नाटक बसवतोय म्हणून सांगितल्यावर त्याचा सहजासहजी विश्वास बसेना ! तो म्हणाला, ’तू खात्री करुन घे कारण माझ्या कानावर भलतंसलतं येतंय आणि आता तर सगळ्या स्टाफमधेही त्याचबद्दल चर्चा आहे . तो काहीतरी गैर करतोय एवढं नक्की. बाकी सगळंच मी उघडून सांगू शकत नाही. ’ तिला धक्काच बसला. ’मी बघते काय ते’ असं मोघम बोलून ती घरीच जायला निघाली. बॉसनेही ती जातेय म्हटल्यावर काहीच आक्षेप न घेता तिला परवानगी दिली.

घरी पोचली तेव्हा काही लोक जिथून जागा मिळेल तिथून घरात डोकावण्याचा प्रयत्न करताना दिसले. ती जरा घाबरलीच. तिने लॅच उघडून दार उघडलं. समोरचं दृश्य बघून तिच्या जीवाचं पाणी पाणी झालं. असं काही बघायला मिळेल ह्याची कल्पनाच नसल्यामुळे तिला भोवळच आली. शुद्धीवर आल्यावर तिने बघितलं तर आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि हा अगदी साळसूद भाव चेहेर्‍यावर आणून तिच्याकडे बघत होता. स्वत:ला सावरल्यावर तिने त्याला जाब विचारला तर त्याने अगदी निर्ढावलेल्या सुरात, थंडपणे सांगितलं, ’झटपट पैसा कमवायचा सोप्पा उपाय. आजकाल पैशाशिवाय काही नाही. गरजू मुलामुलींना मी काम करायला शिकवतोय…. व्यवसायप्रशिक्षण म्हण हवं तर ! अभिनय शिकवतोय त्यांना.’ ती हतबुद्ध झाली. झाल्या प्रकाराला हा किती सहजतेने वेगळं रुप देतोय. तिचं मनच उतरलं. आता मात्र ती मनातून खचली. इतके प्रयत्न करुनही सुधारण्याचं तो नावही घेत नव्हता. स्वत:च्या कृत्याबद्दल त्याला किंचितही पश्चाताप नव्हता. आपण एका फालतू माणसासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं हे जाणवून ती अगदी निराश झाली. पण त्याचवेळी तिने ठरवलं…….की अशा नालायक माणसासाठी आपण आपलं पुढचं आयुष्य अजिबात वाया घालवायचं नाही. नक्की काय करायचं ते मात्र कळत नव्हतं. पण इथून शक्य तितक्या लवकर निघायचं हे मात्र मनोमन ठरवलं.

दुसर्‍याच दिवशी त्याला न सांगता मोठ्या निर्धारानं ती निघाली. तो, ऑफिस, शेजारी…… आता कुणाचीच पर्वा नव्हती. शक्यतोवर ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं ही एकच जाणीव होती.

पाऊस थांबला…..सगळं आकाश मोकळं झालं. कुठल्याशा गावात बस थांबली. ती अगदी गळून गेल्यासारखी खिडकीतून बाहेर बघत राहिली. पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे तजेला आला होता. ओला परिसर आनंदी दिसत होता. तिच्या मनालाही थोडी उभारी आली. तेवढ्यात शेजारच्या आजी म्हणाल्या, ’पोरी येतेस माझ्या घरी… थोडे दिवस रहा.’ वाट बघत असल्यासारखी ती पटकन ’हो’ म्हणाली. तिचं तिलाच आश्चर्य वाटलं. कोण कुठली आजी…..आपल्याला बोलावते काय आणि आपण हो म्हणतोय काय! आता खरं तर तिची वाट तिलाच शोधायची होती. पण सध्यातरी ही नवी सापडलेली आजीच तिची वाट तिला दाखवत होती. कदाचित पुढे ह्याच वाटेने आपली वाटही सापडेल आपल्याला असा विचार करुन ती आजी पाठोपाठ चालू लागली.

आजूबाजूला तिने बघितलं. शेताच्या बांधावरुन छोटी छोटी मुलं मस्तपैकी उड्या मारत खेळत होती. आपल्याच दुनियेत मग्न…..! किती छान, निर्व्याज आहेत ही मुलं. बाहेरच्या दुष्ट दुनियेशी ह्यांचा काहीच संबंध नाही. इथे ह्यांचंच एक हसरं आणि गोड जग आहे. त्यांच्या दुनियेत तिलाही सामावून जावंसं वाटलं. ती उत्साहाने आजीसोबत चालू लागली. त्या छोट्याशा पाऊलवाटेवरुन जाताना एक अनामिक ओढ तिला जाणवायला लागली. आतापर्यंत तिने नात्याचा फक्त काळाच रंग अनुभवला होता. आता इथे तर पूर्ण इंद्रधनुष्य समोर दिसतंय. तिने मनाशी पक्कं ठरवलं……आपण इथेच रहायचं. नवं आयुष्य इथेच सुरु करायचं. आता पैसा, घर ह्याबद्दल अजिबात आसक्ती राहिली नव्हती. फक्त आपल्या आयुष्याचा काहीतरी चांगला उपयोग करायचा होता. आपल्या शिक्षणाने, आपल्या मेहेनतीने, आपल्या बुद्धीने काहीतरी घडवायचं होतं.

तिला खुदकन हसू आलं….! प्रत्येकाच्या मनात एक गुलमोहर असतो आणि कुठे बहरायचं हे फक्त त्यालाच माहित असतं. तिच्याही मनातला गुलमोहर तिला खुणवायला लागला. तिला आतून जाणीव झाली…. आपल्या गुलमोहराचा बहर आपल्याला इथेच मिळणार !

जयश्री अंबासकर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जयु, सुंदरच कथा.. असाच एक मराठी पिक्चर आला होता 'गुलमोहर' नावाचा. सोनाली कुलकर्णी होती त्यामधे... तुझ्या कथे मधल्या नायिके सारखीच स्ट्राँग दाखवली होती तिला...

बर्याच दिवसांनंतर लिहिल आहेस तु इथे.... का बर???? Happy

वर्षू, दिप्ती, शामा, तृष्णा, माधुरी, मामी, रचु, प्राजु..........खूप खूप धन्यवाद Happy
माधुरी....... मला पण आवडला होता तो सिनेमा. अगं सध्या बर्‍याच गोष्टी सुरु आहेत त्यामुळे रोमातच जास्त असते:)

जया, बर्‍याच दिवसांनी दिसताय. कथा लिहिलीय मस्त ;पण पटली नाही हो कथा.
मोठ्या कंपनीत अ‍ॅडमिन असलेली बाई उगाच उठून वाट फुटेल त्या गावाकडे येईल का?
काही नियोजन वैगेरे नाहीच.
मनःशांतीसाठी एखाद्या आश्रमात राहून नंतर काही विधायक कामात झोकून दिलं असं दाखवलं तर ठिक. उगाच उठून बसमध्ये सापडेल त्या बाईच्या घरी जाणं म्हणजे अचाट आणि अतार्किक.

आपल्या कर्तृत्वाच्या बहराच्या शोधात बाहेर पडलेली 'ती' आवडली जयूताई... शून्यातून जग उभारायचा आत्मविश्वास तिच्यात आहे, धडाडी आहे आणि तेवढं बळही आहेच. तिला शुभेच्छा!! Happy

साती, कथा नीट पूर्णपणे वाचलीत तर लेखिकेला वाचकांपर्यंत काय पोचवायचंय ते कदाचित उलगडेल तुम्हाला Happy
<< लख्ख उजेडामुळे तिचे डोळे दिपले…….पण मग त्या प्रकाशाचं महत्व कळलं.>> Happy

दाद..... तुझा अभिप्राय.... मेरा दिन बन गया Happy अगं सध्या बरंच काही सुरु आहे त्यामुळे फक्त डोकावून जाते अधून मधून.

साती..... पटली नाही.....ह्म्म !! तुला सांगू.... ती खरं तर सगळ्यांना इतकी कंटाळली होती की तिला त्यांच्यात रहायचंच नव्हतं. तू म्हणतेस तसं मनःशांतीसाठी आश्रमात राहून नंतर विधायक कार्य करु शकली असती. तेच तर करणार आहे ना ती. एका अनोळखी खेड्यात जाऊन ती तिकडल्या मुलांना शिकवून त्यांचं भविष्य घडवणार आहे.

मंजूडी..... शुक्रिया !! लेखिकेला काय म्हणायचंय ते तू पुरतं ओळखलं आहेस Happy

कथा आवडली.
सातीच्या म्हणण्याप्रमाणे शेवट थोडासा अव्यावहारीक वाटतो , पण मनापासून आवडला तो शेवट.
यावरुन विद्या बाळ यांचे त्यांच्या मुलाखतीत ऐकलेले बोल आठवले. त्या असे काहीसे म्हणाल्या होत्या की मी संसारातून संन्यास घेतला आहे. आपल्या संस्कृतीत पुरुषांना 'संन्यास' घेता येतो पण बाईला मात्र जबाबदार्‍या संपल्या तरी शेवटपर्यंत घर सोडून जाता येत नाही.

बसस्टेशनवर आज काही फार गर्दी नव्हती. तिने माहित नसलेलं गाव निवडलं, तिकीट काढलं आणि बसची वाट बघत बसली. मन अगदी कोरं करकरीत झालंय असं तिला वाटलं. पण नाही….असं कधी शक्य असतं का ….!! अशी मनाची पाटी पुसून कोरी करकरीत करता येते……?? बस आल्यावर ती बसमधे चढली मनासारखी खिडकीतली जागा मिळाली आणि सुरु झाला प्रवास एका अगदी अनोळखी वाटेनं >>>

हा पॅरा अप्रतिम आहे जयश्री, पुढचे वाचतोय.

(माहित नसलेल्या गावाच तिकीट काढून कोरं कोरं होऊन बसण्याची अवस्था थेट पोचली आणि भिडली.)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

सातीचा प्रतिसाद काही पटला नाही....मनस्थिती चांगली नसेल आणि परिस्थिती वाईट असेल तर उगाच नसत्या जंजाळात राहण्यापेक्षा एखादी खंबीर व्यक्ती असा निर्णय घेऊ शकते असे मला वाटते.
कथा छोटीशीच पण छान आहे.

कथा छान आहे.
काही दिवसांपुर्वी गजेंद्र अहिरेचा गुलमोहर हा चित्रपट पाहिला होता..
त्या मुव्हीची स्टोरी लाईन जवळपास ह्या कथे सोबत मिळती जुळती आहे Happy

पिक्चर आणी त्याची माहिती ईथे
बघता येईल

लिखाण अप्रतिम आहे!
कथा वेगळी नसली तरी पटली आहे, बुरसट लोकांमध्ये राहुन मनाचा मनस्ताप, संताप म्हणजेच हालहाल करुन घेण्यापेक्षा खेड्यापाड्यात नैसर्गिक वातावरणात, नैसर्गिक जिवन व्यतित केलेले केव्हाही श्रेष्टच. Happy

अमित.......कथा फार काही वेगळी नक्कीच नाहीये..... पण असं खंबीर पाऊल माझ्या नायिकेनं घेणं मला खूप आवडलंय Happy लेखनशैली आवडल्याबद्दल धन्यु Happy

राखी, रेणुका, डेलिया, नंदिनी...आभार Happy डेलिया, विद्या बाळांचं मतही एकदम पटेश Happy

बेफिकीर...... तुमचा अभिप्राय बघून खूप छान वाटलं Happy

शिल्पा, चातक खूप खूप धन्यवाद Happy

आवळा, "गुलमोहर" सिनेमा मी बघितलाय....... मला तो मनापासून पटला होता. म्हणूनही कथेत डोकावला असेल. पण एक स्वतंत्र लिखाण म्हणून मला स्वतःलाही माझं हे लेखन आवडलंय Wink

भाषा शैली छान आहे. खंबीर बाण्याच्या कथा नायिका मलाही आवडतात.
म्हणून ही कथा जास्त आवडली.

Pages