आयज जागतिक मराठी दिन

Submitted by ज्योति_कामत on 27 February, 2011 - 23:07

आयज जागतिक मराठी दिन. या दिनाच्या निमित्तान मराठीची एक धाकटी भैण कोकणी भाषेबद्दल किदें तरी बरोयात अशे हांवे चितलें. म्हणून हो लेख. कोकणी म्हणजे गोंयाची भास असो एक समज आसा, पुण ते सामकें खरे न्हय. कोकणी गोयांन उलैतात, महाराष्ट्रान उलैतात, कर्नाटकान उलैतात, तशी केरळातय उलैतात.

काय मंडळी, काही कळलं का? बरं आता मराठीत लिहिते.

आज जागतिक मराठी दिन. या दिनाच्या निमित्ताने मराठीची एक धाकटी बहीण कोकणी भाषेबद्दल काहीतरी लिहूया असा मी विचार केला. म्हणून हा लेख. कोकणी म्हणजे गोव्याची भाषा असा एक समज आहे, पण तो पूर्ण खरा नाही. कोकणी गोव्यात बोलतात, महाराष्ट्रात बोलतात, कर्नाटकात बोलतात, तशीच केरळमधेही बोलतात.

सोपंय ना? भले कोकणी घटनेच्या ८ व्या परिशिष्टात भाषा म्हणून समाविष्ट झाली आहे, पण ती मराठीला इतकी जवळची आहे, की ती स्वतंत्र भाषा आहे की मराठीची बोलीभाषा याबद्दल लोक वर्षानुवर्षे वाद घालत आले आहेत आणि यापुढेही घालत रहातील. मालवणी या दोघींच्या कुठेतरी अधेमधे.

अगदी साध्या गोष्टी बघितल्या तर, मराठीतला 'मला' हा शब्द घ्या. तो मालवणीत 'माका' असा येतो, तर कोकणीत 'म्हाकां'. मराठीत 'इकडे, इथे' तर मालवणीत 'अडे, हंयसर' कोकणीत होतो 'हांगा'. माझं मालवणीचं ज्ञान जवळपास संपलंच इथे! कारण म्हणजे मी रत्नागिरीतून एकदम गोव्यात आले. मधला मालवणचा श्टॉप आम्हाला लागलाच नाही! मालवणी म्हणजे फक्त 'वस्त्रहरण' बघितलेलं. पण रत्नागिरीजवळच्या गावात कुणबी, भंडारी, मुस्लिम, खारवी वगैरे लोकांच्या वेगवेगळ्या बोली ऐकून मालवणीचा थोडाफार गंध आला होताच.

तरी मजा सांगायची म्हणजे, गोव्यात पाय ठेवल्यापासून कधी एक दिवस सुद्धा माझं भाषेमुळे अडलं नाही. कोकणी थोडी सावकाश बोलली तर मराठी माणसाला तिचा अर्थ कळतो नक्की! त्यातून मी सुरुवातीला म्हापसा इथे रहात होते. ते सावंतवाडीपासून जेमेतेम ५० किमी. त्यामुळे तिथे मराठीचा प्रभाव आहेच. पेडणे भागात तर लोकांची मातृभाषा मराठी म्हणूनच ते सांगतात. डिचोली भागातही मराठीचा खूप प्रभाव आहे. साधारण कोकणीत पाण्याला 'उदक' म्हणतात, पण डिचोलीचे लोक चक्क 'पाणी' असंच म्हणतात. ख्रिश्चन लोकांचे उच्चार काहीसे वेगळे असतात, त्यामुळे एखाद्या ख्रिश्चन माणसाने बोललेली कोकणी कानाला आणखीच वेगळी लागते. गोव्यातल्या कोकणीत असे कितीतरी पोर्तुगीज शब्द घुसले आहेत. जसे 'जनेल' म्हणजे 'खिडकी'. 'वाज' म्हणजे 'कंटाळा'. मडगाव साष्टी भागात आणखीच वेगळी कोकणी. मडगावच्या पुढे कारवारला पोचलात की परत मराठी मिश्रित कोकणी सुरू होते. म्हणजे गोव्यातला माणूस कोकणीत म्हणेल 'मातशे' तर कारवारी माणूस म्हणेल 'जरा.' कारवारीत बसमधून 'उतरतां' तर गोव्यातल्या कोकणीत 'देवतां.'

कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क 'कोकणी लोक' असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात 'गौड' शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही! पण कदाचित त्यामुळेच असावं, कोकणीत बर्‍याच शब्दांचे उच्चार बंगालीसारखे 'ओ' कारान्त होतात. अगदी नावाची रुपे सुद्धा 'धेंपे' चं 'धेंपो'. मराठीतला 'बोका' कोकणीत 'बोकलो'. मराठीतला 'दादला' कोकणीत 'दादलो' होतो. अशी खूप उदाहरणं आहेत. लिहायला बसले तर संपता संपणार नाहीत!

मंगलोरी कोकणी लोक “गेलो” चा अर्थ “मेला” असा घेतील. तर गोव्याच्या कोकणीत “बाहेर पडलो” म्हणजे मराठीत “मेला!” एकदा एका मंगलोरी ऑफिसरने शिपायाला सांगितलं, “लेटर पेटय.” (पत्र पाठव.) शिपाई बिचारा गोव्यातला. तो काड्यापेटी घेऊन आला! कशाला? म्हटलं तर “पेटवायला.” त्यांची दोघांची जुंपली, ते बघून आम्हाला मात्र जाम मजा आली!

कोकणी भाषा बोलताना जास्त अलंकारिकतेच्या फंदात पडत नाही. 'पार्श्वभागा'ला सरळ 'भोंक' म्हणतात. माझ्या एका मैत्रिणीला दुसर्‍या एका कलिगचा छोटा मुलगा खूप आवडला, तिने त्याला सांगितलं "हो चलो माका दी, हांव ताका सांभाळतां, पुण भोंक धुवुपाचे ना!" (हा मुलगा मला दे, मी त्याला सांभाळते, पण त्याचे कुल्ले धुणार नाही.) तेव्हा आम्ही हसून लोळलो होतो! तर बॅकेत माझ्याशेजारी बसणार्‍याने पहिल्यांदा जेव्हा 'म्हाका मुतपाक टाईम ना' (मला 'एकी' ला वेळ नाही) म्हटलं तेव्हा मी बेशुद्ध पडायचीच राहिले होते! टेलिफोन बंद पडल्याची तक्रार करायला गेले तेव्हा तिथल्या माणसाने सांगितलं, " भुरगी करून घातल्यात, आता पोसपाक जाय ना!" (पोरं जन्माला घातलीयत, आता त्याना पोसायला जमत नाही.) तोपर्यंत मी गोव्यात रुळले होते, त्यामुळे आश्चर्य वगैरे वाटलं नाही!

गोव्यातल्या लोकांच्या बोलण्यात त्यांची आपुलकी दिसते. बोली भाषेत 'तुम्ही' हा शब्द वापरायची पद्धत जवळपास नाहीच. नवरा असो, की सासरा, 'तू'च! वरिष्ठाला पण 'तू'च म्हणतात. त्यामुळे आमचे एक 'साहेब' बेळगावहून बदलून आयुष्यात पहिल्यांदा गोव्यात आले, तेव्हा शिपायाने 'अरे पात्रांव' म्हणताच त्यांचा चेहरा फोटो काढण्यालायक झाला होता!

मराठी संस्कृत आणि मग प्राकृत पासून तयार झाली. इथेच कुठेतरी कोकणी, मालवणी, वर्‍हाडी, बाणकोटी अशा उपशाखा फुटल्या असतील! म्हणूनच तर बरेचसे शब्द आणि त्यांचं व्याकरण मराठी आणि कोकणीत सारखं आहे. काही शब्द मात्र संस्कृतमधून थेट कोकणीत आलेले दिसतात. जसे की 'हांव' हा संस्कृत 'अहम' पासून आलेला दिसतो, तो मराठीत मात्र 'मी' असाच येतो. तसाच 'उदक' थेट संस्कृतमधून कोकणीत! पण मराठीत मात्र 'पाणी'.

खरं सांगायचं तर कोकणीला आपली अशी एक ठराविक लिपी नाही. मराठी जशी फक्त देवनागरीत लिहिली जाते. तसं कोकणीचं नाही. कोकणी बोली देवनागरी, रोमन, कानडी आणि मल्याळम लिपी वापरून लिहिली जाते. म्हणजेच, त्या त्या ठिकाणी दुसरी जी प्रमुख भाषा बोलली जाते, तिची लिपी कोकणी साठीही वापरली जाते. रोमन कोकणी लिहिणार्‍यांचं आणि देवनागरी कोकणी वाल्यांचं तर मराठी-कोकणी वादापेक्षाही भयंकर भांडण आहे!

पोर्तुगीज येण्यापूर्वी गोव्यात कोकणी लिखित स्वरूपात जवळ जवळ नव्हतीच. मराठी हीच गोव्याची सरकारी, धार्मिक, सांस्कृतिक भाषा होती. जुने शिलालेख मराठी किंवा प्राकृत भाषेत आहेत. तर मराठी संतकवींच वाङमय गोव्यात घरोघरी वाचलं जात होतंच. विठोबा हीच गोव्यातल्या लोकांची माऊली होती, आहे, आणि आजही कित्येक लोक पंढरीची वारी चुकवीत नाहीत. पेडण्याच्या सोहिरोबा अंबियेनी त्यांचं संतकवींच्या परंपरेतलं काव्य लिहिलं ते मराठीतच. आणि गोव्यातल्या जुन्या कवींच्या ज्या काही रचना पोर्तुगीजांच्या तडाख्यातून वाचल्या त्याही मराठीतच आहेत. एवढंच काय सक्तीची धर्मांतरं झाली त्या १६ व्या १७ व्या शतकात नव ख्रिश्चनांना समजावं म्हणून फादर स्टीव्हन्सनं ख्रिस्तपुराण लिहिलं तेही मराठीतच.

पण मराठी भाषा गोव्यातल्या लोकाना हिंदू धर्माशी आणि इतर दैवतांशी बांधून ठेवते आहे हे लक्षात येताच पोर्तुगीजांनी मराठी भाषेच्या वापरावर बंदी घातली. तरीही लोकानी चोरून मारून धार्मिक ग्रंथ आणून, लिहून काढून मराठी जिवंत ठेवलीच. या काळात कोकणी ही फक्त गोव्यातली बोलीभाषाच होती. जेव्हा पोर्तुगीज निर्बंध सैल झाले, तेव्हा म्हणजे २० व्या शतकाच्या सुरुवातीला गोव्यातल्या लोकानी मराठी शाळा सुरू केल्या. आजही गोव्यात सरकारी मान्यताप्राप्त आणि अनुदान मिळणार्‍या शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. कोकणीच्या बाबतीत काहीशी गोंधळाची परिस्थिती आहे, ती प्रमाणित व्याकरणाच्या बाबतीत, आणि लिपीच्या बाबतीत. त्यामुळे कोकणी माध्यामाच्या शाळा या विना अनुदानित, किंवा खाजगी या स्वरुपाच्या आहेत.

गोव्यात आल्यानंतर मला जेव्हा ही माहिती कळली तेव्हा आश्चर्याचा छोटासा धक्का बसला. पण मुलं मराठी माध्यमात शिकतात आणि घराबाहेर अर्धं मराठी आणि अर्धं कोकणी बोलावं लागतं ही परिस्थिती आमच्या एकूण पथ्थ्यावरच पडली! मराठी माध्यम असल्यामुळे मुलाना शाळेत काहीच त्रास झाला नाही. तर कोकणीची अनेक रुपे असल्यामुळे मोडकं तोडकं कोकणी बोललं तरी कोणी हसत नाही हा पण एक मोठाच फायदा! आम्ही मराठी बोलतो म्हणून कोणी आम्हाला गोव्यात कधीच परकं समजलं नाही. कानडी लोकांसाठी खास राखीव असलेलं 'घाटी' हे संबोधन आमच्या वाट्याला कधीच आलं नाही, किँबहुना ते मराठी लोकांसाठी नाहीच! ऑफिसातसुद्धा अगदी पूर्वीपासून खूप गोंयकार लोक आपणहून मराठीच बोलायला येतात. गोव्यातल्या बर्‍याच जणांचे नातेवाईक मुंबईला असतातच. शिवाय गावातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्यामुळे बहुसंख्य गोंयकाराना चांगलं मराठी येतं. आमच्या बॆंकेतल्या ख्रिश्चन शिपायाने मला एकदा “पंढरीनाथा झडकरी आता...” हे गाणं म्हणून दाखवून झीट आणली होती!

गोव्यात आल्यावर सुरुवातीला कोकणी पेपर सुनापरांत’ वाचताना मजा वाटायची. हळूहळू सगळ्या प्रकारच्या कोकणी बोलींची सवय होत गेली. मग हळूहळू समजत गेलं, कोकणीत पण बाकीबाब बोरकरांसारख्या प्रतिभावंताने काही लिहिलंय. त्यांच्या कोकणी कविताही मराठी कवितांइतक्याच गोड आहेत. पण बहुतेक कोकणी मराठीच्या वादात दोन्ही बाजू समजल्या की हा कवी दुसर्‍या पक्षाचा आहे! त्यामुळे या थोर कवीला ज्ञानपीठ हा सहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळाला नाही. हल्लीच एकजण मला सांगत होता, की “बाकीबाब आमच्या पिढीला थोर कवी म्हणून माहिती आहेत, पण आताची पिढी त्याना ओळखत नाही!” दुर्दैव आमचं! आणखी काय म्हणू?

कोकणीबद्दल लिहायचं म्हटलं तर काय लिहू आणि काय नको, अशी माझी अवस्था झालीय. पण जास्त लिहिलं तर “तुमका “वाज” येतलो, म्हणून आता हांगाच र्‍हावतां. देव बरें करूं!”
(तुम्हाला कंटाळा येईल, म्हणून इथेच थांबते. देव चांगलं करील!”)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ब्येष्ट बरयलां ....दोनुय भाशांचो तुजो मोग काळजान पावलो
अशेच बरय

मजा आयली वाचतना!!

(कोकणी) प्रीमो

ज्योती ब्येस्टच गो.. ता तु लिवलला उतरता नि देवता.. ह्या शब्दान माजीव बरीच तारांबळ उडलली गोयाक गेल्लय तेव्हा. Happy तो देवता म्हणालो नि माका जेवता ह्या ऐकाक इला.. म्हटला उतराची येळ नि ह्यो गाडीवालो जेवणाचा काय इचारता Happy
वाज बिज काय येवचो नाय तु बरय आंम्ही आसवच Happy

ज्योति मस्त लेख. मी निदान नावापुरता तरी कोकणी, पण माझे तिथे काही अडले नाही. अगदी सरकारी आणि कोर्टाच्या कामातही नाही. गिरिराज तर धुळ्याचा, त्याचेही नाही अडले.
आज महाराष्ट्रात मराठी भवन बांधायची घोषणा झालीय, गोव्यात पर्वरीला तर मराठी भवन दिमाखात उभे आहे. मी होतो त्यावेळी बांधकाम रेंगाळले होते, तरी तिथे कार्यक्रम होत असत.

मस्त लेख ! मजा आली वाचतांना! माझी मामी कारवारी कोकणी , तिच्या कडुन काहि शब्द कळ्ले आहेत , जसे उदक, गोमटी- सुंदर, माका शीत जाय ! ... वैगरे

सुरेख लेख.
हल्ली मी गोव्यात गेल्यावर सुनापरांत वाचते ते सगळं समजतं. म्हातारी माणसं काय बोलतात काय पण समजत नाही. Happy
पण तुझ्या लेखानी बरीच भर घातली ज्ञानात.

केरीचे राजेंद्र केरकर आहेत ना ते एकदा सांगत होते की गोयंकार ख्रिश्चनांचं जे मराठी आहे ते खूप सारं जुन्या मराठीशी सरळ सरळ मिळतं जुळतं आहे. ज्ञानेश्वरी आणि दासबोधात वापरली गेलेली अनेक क्रियापदं जी आता बोली मराठीतून गेलेली आहेत ती अजून ख्रिश्चन गोयकारांच्या कोकणीत आहेत.

प्रीतमोहोर, तिथून जवळच माझे घर होते. आनंद झाला ते मराठी भवन पूर्ण झाल्याचे वाचून. खुप सुंदर इमारत झाली असेल नाही का ती, आता !

होय नी. कोकणीत जुन्या मराठीतले, अगदी ज्ञानेश्वरीतले काही शब्द आहेत, असं मी पण बर्‍याच ठिकाणी वाचलंय. तर ज्ञानेश्वरीतली वाक्यरचना आणि शब्दयोजना काही ठिकाणी कोकणीशी मिळतीजुळती वाटते असंही वाचलं होतं.

आणि हो.. त्या घाटी, कोकणी च्याबद्दल.... सिंधुदुर्गात देशावरच्या (सह्याद्रीच्या वरच्या बाजूच्या) लोकांना मराठी म्हणतात आणि ते स्वतः कोकणी असतात. Happy

मैत्रिणीच्या दवाखान्यात येणारे पेशंट, भगीरथच्या ऑफिसात येणारे लोक, इकडेतिकडे फिरताना भेटलेले शेतकरी लोक इत्यादींशी बोलताना हे लक्षात आलं.

खूपच सुरेख लिहिलंय. शैलीही मस्त. Happy
पश्चिम कर्नाटक आणि पश्चिम केरळातही कोकणी बोलली जाते, हे तर माहितीच नव्हतं.

मस्त लिहिलंय. एकदम सहज. कोकणी म्हणजे जरी 'एक घाव दोन तुकडे' असली तरी ऐकायला भयंकर गोड आहे. त्या रोखठोकमध्येही एक ओलावा, जिव्हाळा आहे असं वाटतं Happy

ज्योती, छान लिहिलं आहेस! आवडलं. बहिणीचं सासर मंगलोरी कोकणी. तिलाही हा लेख वाचायला देईन म्हणते! Happy

मस्तच लिहिलंय. Happy
कोकणीच काय, कुठल्याही (बोली) भाषेबद्दलची वैशिष्ट्यं, गमतीजमती वाचायला मला खूप आवडतं.

रोमन कोकणी लिहिणार्‍यांचं आणि देवनागरी कोकणी वाल्यांचं तर मराठी-कोकणी वादापेक्षाही भयंकर भांडण आहे >>> हे नवीनच ऐकलं.

आमच्या बॆंकेतल्या ख्रिश्चन शिपायाने मला एकदा “पंढरीनाथा झडकरी आता...” हे गाणं म्हणून दाखवून झीट आणली होती! >>> Lol

म्हणून आता हांगाच र्‍हावतां >>> दक्षिण गुजराथी प्रदेशातल्या बोली भाषेतही 'स'च्या जागी 'ह'चा वापर होतो. ते आठवलं. Happy

मला, कोकणी मातृभाषा असून मराठी गाणी गायलेले कितीतरी कलाकार आठवताहेत. कुणाच्याही गायनात, कोकणी हेल जाणवत नाहीत. (हे बाकि भाषिकांबाबत ठामपणे म्हणता येणार नाही.)
ज्योत्स्ना भोळे, पं जितेद्र अभिषेकी, प्रसाद सावकार, कान्होपात्रा किणीकर, किशोरी अमोणकर पासून ते थेट आजच्या आरती नायक पर्यंत. (रच्याकने आरती नायकच्या आवाजात, माझ्याच पावलांची, हे मराठी नाट्यगीत युट्यूबवर आहे. ऐकाच.)

कोकणी एकदम गोड भाषा आहे. लयबद्ध आणि प्रेमळ. तिला रोखठोकपणा जमत नाही<<<<
बरोबर गो शैलूबाय. काही समजली नाही तरी ऐकत रहावं असं वाटतं. एकदम आडसरातलो मऊ मऊ खोबरोच!! Happy

वर्षातून एकदा देवीच्या दर्शनाला म्हर्दोळला गेलो की देवळातल्या फुलं विकणार्‍या आज्या जे बोलतात ते कोकणी ऐकून खूप मजा वाटते. नुसतं ऐकत बसते मी थोडा वेळ. थोडं समजतं, थोडं नाही...पण गोड वाटतं! एका मस्त लयीत असतं ते बोलणं..

बरे बरयताय मगो तु. सगळ्यान बेष्ट पोर्तुगिज शब्द 'सुशेगाद' विसरलय गो तु. Happy
लहान आसताना आमी भॉक धुवपाव व्हाळार वैताली तेचो उगडास येयलो. Happy

ब्येष्ट ग्वॉड हाय तुमका कोंकणी आणि लेख.
पात्राव पोर्तूगीज शब्द. तसेच ओ कारान्त शब्द पोर्तूगीज प्रभावा मुळे झाले असावेत.
आय ला माय पोर्तूगीज शब्द.

छान लेख... मि कोकणात असताना ... ' मरे ' हा शब्द बर्‍याच वाक्यांच्या शेवटी ऐकायचो आणी भंजाळुन जायचो... नंतर समजुत करुन घेतली की हे आपल्या सोलापुरी 'बे' सारखे असेल..

मस्त लेख. Happy

>> पण बाकीबाब बोरकरांसारख्या प्रतिभावंताने काही लिहिलंय. त्यांच्या कोकणी कविताही मराठी कवितांइतक्याच गोड आहेत. पण बहुतेक कोकणी मराठीच्या वादात दोन्ही बाजू समजल्या की हा कवी दुसर्‍या पक्षाचा आहे! त्यामुळे या थोर कवीला ज्ञानपीठ हा सहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळाला नाही.
Angry

Pages