खरेदी

Submitted by Dipti Joshi on 27 February, 2011 - 16:20

खरेदी

घडयाळात बघितले तर चार वाजले होते. अनिरुद्धची निघायची वेळ झाली होती. हे त्याला सोडवायला एअरपोर्टवर जाणार होते. भाऊबीज म्हणुन सकाळी सगळे आत्याकडे, ह्यांच्या धाकटय़ा बहीणीकडे जेवायला गेलो होतो. जेवायला जायच्या अगोदर मी अनिरुद्धच सगळ फराळाचं, त्याच्यासाठी आणलेल्या वस्तुंच पॅकींग करुन ठेवल होत. तो बंगलोरला रात्री नऊ वाजता पोहोचेल म्हणुन त्त्याच्या जेवणाचा डबाही भरुन ठेवला होता. जावईमाणुस जाणार म्हणजे सगळ कस निटनेटक पॅकींग केलं की मनाला समाधान वाटते. सायलीला म्हटलं, तु जाणार कां ग एअरपोर्टला, तर म्हणाली "मला न थोडीशी खरेदी करायची आहे, अनिरुद्ध, मी नाही आले तर चालेल ना तुला? येस मॅडम, तुम्ही खरेदी एन्जॉय करा, आम्ही जातो बिचारे एकटेच" असं म्हणत ते दोघही निघाले. अनिरुद्ध बंगलोरला एम.डी.एस. करत होता, सायलीने बी.डी.एस. झाल्यावर बंगलोरमध्येच एक पोस्ट ग्रॅज्युएट अ‍ॅडव्हान्स कोर्स करुन नुकतेच नाशिकला, तिच्या सासरच्या ठिकाणी स्वत:च ’क्लिनिक’ नुकतच सुरु केल होतं.

सायलीला म्हटल "काय खरेदी करायची ग तुला?", तर म्हणाली "काही नाही ग मम्मा नाइट ड्रेसच्या खालची एक पॅन्ट घायचीय फक्त" तिने असं लाडात येऊन आईच्या ऐवजी ’मम्मा’ अस हाक मारलं की माझ्या काळजाचा ठोकाच चुकतो. संभाव्य धोक्याच्या घंटा वाजायला लागतात. मी परत एकदा विचारल, "नक्की ना पॅन्टच घ्यायचीय?" "हो ग मम्मा". मागचे अनेक अनुभव गाठीशी होतेच ते आठवुन मी म्हटल, "सायली, आज भाऊबीज आणि पाडवा दोन्हीही आहे, वेळेत घरी येऊ ना आपण? नाहीतर अस करुया आताच पणत्यांमध्ये छोटया मेणबत्त्या लाऊन ठेवु, त्या ब-याच वेळ जळतात. तेलाच्या पणत्या आल्यावर लावु. आकाशकंदिल तर आत्ताच लावुन जाऊया". ए आई, प्लीज बोअर नको ना करु, येऊ आपण लवकरच, फार खरेदी नाही करायची मला."

सायली, आपण अस करुया परत एक गरम चहा घेऊया. तु झोपाळ्यावर गाणी ऐकत बस, मी अर्धा तासात पुलाव आणि सुप करते मग निघुया. त्याला मात्र तिने होकार दिला, आणि पाऊण तासात आम्ही बाहेर पडलो. काय ग कारने जायच कां? व्वां.....कारने का? मग पुढच्या दिवाळीच्या भाऊबीजेपर्यंत येऊ घरी, डोंबिवलीचे रस्ते आणि ट्रॅफिक यावर तीने एक पीजे मारला. मग आम्ही स्कुटीच काढली.

नाईट ड्रेसची एक पॅन्ट आणि थोडस प्रोव्हिजनच सामान, प्लॅस्टीक बॅग्ज, रॅपींग फॉइल आणि सायलीच्या सासरी फराळाचे द्यायचे त्याच्यासाठी बॉक्स, एवढेच घ्यायचे होते म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत नक्की परतुन येऊ असे वाटले. ती जरी थोडीशीच खरेदी अस म्हणाली तरी मी क्रेडिट कार्ड, जास्तीची कॅश, आणि मोठी बॅग कम झोळा बरोबर घेतलाच.

मानपाडा रोडवरची कांही दुकान म्हणजे धोक्याचे कंदिल!!! म्हणजे त्या दुकांनामध्ये सायली तासंतास रमणार, म्हणुन तो रोड टाळण्यासाठी मी तिला म्हटल, "आपण टिळकनगरमधुन फडके रोडवर जाऊया का?" "नको ग जाऊ या ना मानपाडा रोडवरुन" ती उत्तरली. आणि त्या धोक्याच्या ठिकाणी आम्ही आलोच!!, सायलीने स्कुटी थांबवली, मी तिला म्हटल, अग इथुन लवकर काढ स्कुटी, नुसती गर्दी......!! आई, कॉटन कॉटेजमध्ये जाऊया का? एखादा टॉप बघते........! मी मनातल्या मनात अस्वस्थ होत, वरवर मात्र तोंडभरुन म्हटल....हो....जाऊया... काय करता माहेरवाशिण ना! स्कुटी पार्क करुन आम्ही दुकानात शिरलो. लवकर निघालो होतो त्यामुळे दुकानात गर्दी नव्हती. सायलीला बघुन शोरुम मधल्या मुलीच्या चेहे-यावर हसु उमटल. भरपुर खरेदी करणारे कस्टमर आम्ही! मग टॉप बघायला सुरवात झाली. बघता बघता अर्धा तास झाला कधी ’नी लेन्थ’ चा, कधी ’लॉंग ’ कधी ’शॉर्ट’, तिचं न कंटाळता दाखवण चालु होत, सायलीच न कंटाळता बघण चालु होत. दहा-पंधरा टॉप सायलीच्या हातात जमा झाले होते. प्रत्येक टॉप ती समोरुन लाऊन शोरुमच्या आरशात बघत होती, मग एकदा इकडे मान तिरपी करायची, एकदा तिकडे, मग माझ्याकडे बघुन भुवया वर करायची, कसा आहे ग? या अर्थाने...., मग मी पण माझ्या भुवया उंचावुन, दोन्ही बाजुला मान डोलावुन तीला ’छानची’ पावती देत होती. तिच्या खांद्यावर जमा झालेले टॉप बघुन मला तर धडकीच भरली होती. सावधगीरी म्हणुन मी तिला म्हटल, "सायली तुझ्याजवळ असणारे रंग सोडुन दुसरे बघ", आता यासाठी तिला सगळे टॉप सोडुन बाहेर यावे लागणार होते किंवा ब्रह्मदेवाला नविन रंगांच्या निर्मितीच्या कामाला लागावे लागणार होते. माझ्या असल्या निरर्थक संवादाकडे ती कधीच लक्ष देत नाही.

जेवल्या जेवल्या लगेच निघाल्यामुळे, दुपारची पुरणपोळी अंगावर आली होती, मला झोप अनावर होत होती. मी त्या शोरुमच्या मुलीला म्हटलं, "एखाद स्टुल देतेस का बसायला? तिने मला खुर्चीच दिली आणि म्हणाली, "तुम्ही कांऊटरच्या आतल्या बाजुला आरामात बसा", मनात म्हटल, तुझा सेल होतोय ना मग तु सांगशीलच आरामात बसायला. जांभायाना आवरत मी खुर्चीवर बसले. इकडे सायलीचा टॉप बघण्याचा सपाटा चाललाच होता. आता तर तिच्या खांद्यावर आणखीनच टॉप जमा झाले होते, तेवढे सगळे ती ट्रायल रुम मध्ये ट्राय करणार होती......परत आरशात मान तिरपी......!!! दुकानात हळुहळु गर्दी वाढायला लागली होती........निर्विकारपणे मी त्या गर्दीकडे बघत बसले होते.......अचानक नऊ-दहा लोकांचा लोंढा दुकानात शिरला काही बायकां, काही पुरुष. बायकांनी नाकात दोन्ही बाजुंनी चमक्या घातल्या होत्या. दिवाळीमुळे तिथल्या ब-याच मुली रजेवर गेल्यासारख्या दिसत होत्या. त्या मुलीने आतुन टेलर मास्टरला बोलावले, तो या लोकांना काय पाहीजे ते दाखवत होता. कुणी चुडिदार दाखवा म्हणायचे, कुणी टॉप दाखवायला सांगत होते, तर मध्येच कुणी जेन्टस च्या शर्ट बद्दल विचारत होते. ’मास्टर’ ची धावपळ होत होती. नुसता गोंधळ चालला होता. मी सगळा गोंधळ बघत बसले होते.....तेवढयात माझं तिच्याकडे लक्ष गेलं....कडेवर मुल घेतलेल्या तिने टॉपच्या रॅकमधुन दोन टॉप मुल ज्या बाजुने कडेवर घेतले होते त्याबाजुने ओच्याच लपवले, मला रहावल नाही, मी मास्टरला खुण करुन टॉप लपवल्याचे सांगीतले. तो तरातरा तिच्याजवळ गेला.....एक कानाखाली काढत ओरडला ....."ए, बच्चेको निचे रखो....अस म्हणत त्याने तिच्या ओच्यातले टॉप हिसकावले,. आणि मग त्या मंडळींनी बाहेर धुम ठोकली. मास्टर आणि ती मुलगी दोघही माझे आभार मानत होते. या सगळ्या गडबडीत सायलीने एकदाचे पाच टॉप सिलेक्ट केलेत. मी हुश्श्श....... केले, क्रेडीट कार्डने पेमेंट करुन आम्ही बाहेर पडलो.

मध्ये लिबर्टीच शोरुम लागलं, सायली म्हणाली, "आई, चपला बघुया का?"......तिथेही बरीच चिकित्सा करत लिबर्टीची आणि तिथल्याच शोरुमची असे दोन चपलेचे जोड घेतले. ’कलर्स’ च्या शोरुममध्ये गेल्यावरही ह्याच पद्धतीने आरशात बघुन मान तिरपी करत तिने दोन नाईट ड्रेस घेतले. जवळच्याच ’रिलायन्स फ्रेश’ मधुन मी बरचस प्रोव्हीजन सामान घेतल, त्याची पण एक मोठी बॅग झाली. मला वाटल आता ’बॅक टु पॅव्हेलियन" पण बाहेर पडल्यावर ती म्हणाली "आई, प्लीज या टॉप वर लेगिन्स बघुया का? नाही तर काही उपयोग नाही, मला हे टॉप घालता येणार नाही. नाही काय म्हणतेय......नाईलाजाने मान डोलावत मी तिला म्हटल, "अग त्या समोरच्या गुजराथी भाभी आहेत ना त्यांची केळकर रोडवर ’रेलीश’ नावाची मोठी शोरुम आहे, तिथे बघुया". मग आमचा मोर्चा आम्ही केळकर रोडकडे वळवला, ’रेलीश’ मध्ये गुजराथी स्टाईलचे खाली चमकदार लेस लावलेले लेगिन्स होते, सायलीला ते पसंत पडलेच नाही. स्कुटी एका आतल्या लेन मध्ये पार्क करुन, काही बॅगा डिकीत, काही हातात घेउन आम्ही लेगिन्स शोधायला पायीच निघालो. केळकर रोडवर सगळ्या शोरुम मध्ये विचारुन झालं ब्लॅक आणि व्हाइट, याशिवाय नव्हत्याच. पायाचे तुकडे पडायला आले होते, शेवटी ती ही म्हणाली ,"जाऊ दे आई नंतर बघु".........अगदी शेवटचा प्रयत्न म्हणुन बाजुच्याच ’चुडीदार’, नावाच्या दुकानात विचाराव म्हणुन आम्ही दोघीनींही आत शिरतच विचारलं, "लेगिन्स मिलेगे?", "आओ अंदर....आणि त्याने आमच्या समोर छोटे छोटे कापडांचे विविध तुकडे चिकटवलेला पुट्ठा टाकला........इसमेसे कौनसा कलर चाहीये". एवढया सगळ्या व्हरायटी? मी त्याला म्हटल, "इतना बडा शोरुम है, बाहर बोर्ड लगाओ ना..............यहा मॅचिंग लेगिन्स मिलेगा बोलके" दुकानाच्या स्तुतीने तो खुश झाला आणि त्याने नोकराला सांगीतले, "अरे भाई इनको जरा जल्दी दिखाओ" पण तो नोकर त्याच्या खास थंड स्टाइलने मॅचींग दाखवत होता. मला तर आता अजिबात धीर धरवत नव्हता. सायली त्याला विनंती करत होती..."भय्या प्लीज, एक कलरमे तीन चार शेड दिखाओ ना....." आणि मग झालं एकदाच सिलेक्शन, आम्ही बाहेर पडलो. सायलीने माझा हात दाबत म्हटल "मम्मा प्लीज.....प्लीज, समोरच्या ’श्री दर्शनी’ मधुन मॅचींग दुपट्टे घेऊया ग.....अगदी दहा मिनिटांतच, घडयाळाचा काटा सव्वाआठ दाखवत होता.

तिथुन बाहेर पडलं की एक घातकी दुकान आहे ’महालक्ष्मी इमिटेशन ज्वेलरी’. सायलीच्या सासुबाईंनी तिला सगळा डायमंडचा सेट केलाय, मंगळसुत्र, कानातले, अंगठी, शिवाय सोन्याचे वेगवेगळे सेट्स आहेतच.....पण हे शॉप बघितलं की आपोआप तिची पावलं त्या दुकानाकडे वळतात......"अग आई एकही क्लीप धड नाहीये केसांना लावायला.....आणि थोडया अ‍ॅक्सेसरीज"......घरात इतस्तत: पसरलेल्या क्लीपा डोळ्यासमोर आल्या......!! छोटया छोटया इमिटेशन खडयांच्या कानातल्यांनी तर मोठ्ठा बॉक्स भरलाय, तो उघडला की मला तर चक्करच यायला लागतात. एकदा माझ्या आईने तिला विचारल होतं, "काय ग सायली या एवढया कानातल्यांमधुन तु बरोबर दोन्हीही जोडीचे कसे शोधतेस ग?", "येस्स आजी तीच तर गंमत आहे ना" असं म्हणुन हसत होती. मला तिच एक मात्र नवल वाटायच, दवाखान्यात पेशंटची ट्रीटमेंट करतांना तिचा हात इतका कुशलतेने चालायचा की सगळ्यांना तिच्याबद्दल आदर वाटायचा, पण या डोंबिवलीच्या मार्केटमध्ये फिरतांना तिची शोधक भिरभिरणारी नजर बघितल की वाटत,,,,,छे! ही कसली डॉक्टर....ही तर आत्ताच कॉलेजमधुन पास झालेली एन्जॉय करणारी कॉलेज गर्ल दिसतेय. मला तिच नेहेमी आश्चर्य वाटात.....सासरी कशी छान शिस्तीत रहाते....डायनिंग टेबलवर बसलं की सगळ्यांना हव नको बघते....स्वत:ला पण पाहिजे ते वाढुन घेते. पण इकडे आली की कशातच लक्ष नसत, नुसता वेंधळेपणा चालला असतो!!! "आई, बघ ग हे कानातले कसे वाटतात?.......विचारात हरवलेल्या मला तिने भानावर आणल.....आणि मग एकदा एका पायावर, एकदा दुस-या पायावर वजन टाकत एकदाची क्लिपांची आणि कानातल्यांची खरेदी संपली.

माझं डोकं गरगरायला लागल होतं......अंधारात बुडालेलं घर दिसत होत. स्कुटी थोडी लांब पार्क केली होती तिथे आम्ही भरभर चालत आलो, मला अचानक आठवण झाली..."अग सायली पॅकींगचे बॉक्स, बॅग्ज आणि रॅपर फॉइल्स राहील्या ग" मी परत भरभर पाठीमागे जाऊन त्या वस्तु खरेदी केल्या स्कुटीच्या डिकीत, खालच्या हुकला आजुबाजुला, समोरच्या स्टॅंड मध्ये अशा ब-याच शॉपींग बॅग्ज लटकवल्या होत्या, सायली दोन पाय आजुबाजुला टाकुन स्कुटी स्टार्ट करण्याच्या पोझीशन मध्ये.......मी आता किक मारुन मागच्या सीटवर बसणार.......तेवढयात पाठीमागुन हाक आली...........जोशी वहीनी किती दिवसांनी? ह्यांचे पुर्वाश्रमीचे ट्रेन फ्रेंड....दिक्षित आणि त्यांच्या सौभाग्यवती!! त्यांची मुलगी सुखदा सायलीच्या वर्गात......शाळेत असतांना ऑफिसला जायच्या अगोदर मुलींना सोडवायला बसस्टॉपवर यायचो त्यामुळे आमची दोघींचीही ओळख. त्यांना बघितल आणि पोटात गोळाच उठला.......भाऊबिजेला सकाळी केलेल्या स्वयंपाकाची उरसुर खाउन बडिशेप चघळत फेरफटका मारायला निघाल्यासारखे दिसत होते. आता ’अस्मादिक पुराण’ ऐकाव लागणार. "काय म्हणतेस सायली? दोन्ही बाजुच्या बॅग्जचा तोल सांभाळत थोडासा आंबट चेहेरा करत सायली म्हणाली...."मज्जेत", दिक्षीत वहीनींच्या नजरेतुन तिचा आंबट चेहेरा सुटला नाही...."काय ग बरं वाटत नाही कां? परत त्यांचा प्रश्न.....नाही हो, सुखदा कशी आहे....सुखदा ना एकदम छान.....अग ट्वीन्स झालीत.........मस्त गोरे....गोरे..... निळ्या डोळ्यांचे......अगदी युरोपियन......!!!आता ही सुखदा मुळात गव्हाळ वर्णाची मग हीची मुलं युरोपियन कशी? माझ्या मनातली शंका....? जावई कुठे असतात.....? यु.के.त, व्वा व्वा!! हातातल्या पिशव्या सांभाळत चुळबुळ करत मी उत्तरले....."मस्त चाललय तीच, तिकडेच सेटल झालीय ती, सुशांत एम.एस. करतोय अमेरिकेत.......माझी टेलीफोन्स मधली नोकरी चालु आहे अजुन त्यामुळे मी डोंबिवलीत,ह्यांनी बिझीनेस सुरु केलाय........नाशिकला असतात.......१० खोल्यांचा बंगला बांधलाय तिथे....या की बघायला...बापरे....चार माणस चार दिशांना !! आणि पहील्या खोलीत असणा-या दिक्षित वहीनी दिक्षितांना कसं बोलावत असतील? बहुतेक इंटरकॉम असेल.....माझ्या मनातले संवाद चालुच होते. मी म्हटल "दिक्षीत वहीनी, जावई कुठले ? आता जरा त्यांचा आवाज खाली आला.........तो तिकडलाच, युरोपियन......नेटवर जमल.......आत्ता कळली ग्यानबाची मेख....! मुलं युरोपियन कशी दिसतात याची.....मनात म्हटल "दिक्षीत वहीनी, मुलीने अंतरजातीय लग्न केलय हे सांगा की आधी"......"मग सुखदाचा दवाखाना?” अहो, यु.के. मध्ये दवाखाना टाकायचा किंवा जॉब करायचा तर तिकडली परिक्षा द्यावी लागते, तिथे नोकर मिळत नाही......पुन्हा मुलं......घरातलच इतक पुरवत की कसला जॉब आणि कसला दवाखाना!!......"सायलीने ’क्लिनिक’ काढलय नाशिकला, अनायासे तुम्ही नाशिकलाच आहात तर बघुन या तिच क्लिनिक. आता ’अस्मादिक पुराण’ संपल होत आणि आमच ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते.......त्यामुळे हो...हो... असं म्हणत त्यांनी आमचा निरोप घेतला आणि आम्ही दोघींनीही मोठा श्वास टाकला.

घरी परततांना सेकंड राउंडच्या अ‍ॅडमिशनच्या सगळ्या घटना मनात तरळुन गेल्या......सायली आणि सुखदा दोघींनाही डेन्टललाच अ‍ॅडमिशन हवी होती. मेरीटलीस्ट मध्ये चांगला वर नंबर असुनही पहिल्या राउंडला त्यांना ’आयुर्वेद’ ला अ‍ॅडमिशन मिळाली होती आता सगळ्या आशा सेकंड राउंडवर होत्या. त्या दिवशीचं सेकंड राउंडच टेन्स वातावरण. सेंट जॉर्ज गव्हर्नमेंट डेन्टल कॉलेजच्या आवारातली पालकांची गर्दी. ऑडिटोरियमध्ये मोठया स्क्रीनवर सिट्स ची पोझीशन दाखवली जात होती. अ‍ॅडमिशन घेणारे नंबर हळुहळु पुढे सरकत होते.......सुखदा एक नंबरने सायलीच्या पुढे होती, तिचा नंबर आला तेव्हा फक्त दोन डेन्टलाच्या जागा शिल्लक होत्या , डी.वाय. पाटील, पुणे आणि एम.जी.व्ही. डेन्टल, नाशिक, सुखदाने पुण्याची सीट घेतली आणि शेवटची सीट सायलीला.......आम्ही सगळी प्रोसेस पुर्ण करुन आलो तर बाहेर अनेक मुलं-मुली रडत होती....एक तर माझ्या खांद्यावर मान टाकुन म्हणाली "ऑन्टी, मुझे तो डेन्टलही......चाहीये था" माझं मन हळव झालं होतं, अरे बेटा तिसरे राउंडमे भी चान्स रहता है" अस काहीतरी बोलुन मी तिची समजुत घातली होती. इतक्या जिवघेण्या स्पर्धेत एक सीट अडवुन या सुखदाने काय मिळवल होतं? शिक्षणाच्या जोरावर परदेशातला भरपुर पगार कमावणारा नवरा!! आणि तिथलं हाउसवाईफ कम मेड आयुष्य!! सीट मिळाली नाही म्हणुन रडवेले झालेले त्या मुलांचे चेहेरे आठवुन मी एक सुस्कारा सोडला.

सगळ्या खरेदीच्या बॅगा घेउन दरवाजाचे कुलुप उघडले तेव्हा साडेनऊ झाले होते. सगळ्या बॅगा मी सायलीच्या बेडरुम मध्ये पटकल्या. पायावर पाणी घेतलं आणि भराभरा सगळीकडले दिवे लावले. देवाजवळ दिवा लावला, पणत्यांमध्ये तेल घालुन तुळशीजवळ, समोरच्या दरवाज्यात, बाल्कनीच्या कठडयावर पणत्या लावल्या. सायलीपण मदत करत होती. हल्ली राग आला तरी पुर्वी सारखी रागवा रागवी करायची नाही, गप्प बसायच. माहेरपणाला आलेल्या मुलीला बोलायच आणि मग ती गेली की आठवणींनी डोळ्यांत पाणी आणत रहायच, त्यापेक्षा मौन बर. सायलीला पण कळल होत आई रागावलीय......!!

हे तेवढयात आले, सायलीने त्यांना सांगीतलं, "पप्पा आम्ही जोरदार खरेदी करुन आलोय, आणि आई जाम वैतागलेली दिसतेय.....!!! अग, पण तु तर फक्त नाईट ड्रेसची एक पॅन्टच घेणार होतीस ना?" "हो ना पण नेहेमीचीच कथा". आम्ही जेवण आटोपलीत, टेरेसवर जाउन फटाके फोडुन आलोत......आणि मी झोपाळ्यावर बसले होते.......हळु....हळु झोके घेत......पण गप्प गप्प्च होते. तेवढयात सायली पाठीमागुन आली, माझ्या गळ्यात हात टाकत म्हणाली, "आई, रागावलीस कां ग, बोलत नाहीस अजिबात?" तिचा स्पर्श अजुनही तसाच होता मृदु, मुलायम.....अगदी लहानपणी होता तस्साच......बालीश! मी ऑफिसमधुन आली की अगदी खुप दिवसांनी भेटल्यासारखी गळ्यात हात टाकायची. मी म्हटल, "नाही ग रागावु कशाला?" अन मग ती बोलत होती....."आई, काकु आणि बाबा......माझ्या सासुबाई आणि सासरे खुप चांगले आहेत दोघेहीजण स्वभावाने, बाबा मुलीपेक्षाही जास्त काळजी घेतात माझी.....काकु तर मला कितीवेळा नाश्ता, टॉनिकची गोळी, भिजवलेले बदाम हातात देतात, मोठं घर, नोकर.....सगळी सुखं आहेत,

बाबांचा दोन्ही वेळचा दवाखाना..... मधल्या वेळेत ते तीन कंपन्यांमध्ये पॅनल डॉक्टर म्हणुन काम करतात. खुप बिझी असतात. साडेनऊला घरी येतात, आम्ही लगेचच जेवायला बसतो. माझा दोन्ही वेळचा दवाखाना, परत एका वर्तमानपत्रासाठी मी डेन्टीस्ट्रीवर लिखाण करते, फावल्या वेळात ते लिखाण करायच, वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये देऊन यायच. श्वेता पण फिजीओथेरेपिस्ट आहे, ती पण बारा ते आठ एक स्वतंत्र क्लिनिक सांभाळते आणि शिवाय पीजी चा अभ्यास करते. काकुंना मग लेकीसाठी पण धावपळ करावी लागते. सगळेजण आपापल्या व्यापात इतके व्यस्त आहेत की सगळ्या कामांना नोकर असुनही, त्यांच्याकडुन कामं करवुन घ्यायची आणि आमच्या सगळ्यांच्या वेळा सांभाळायच्या .....काकु पण थकतात. एकच रविवार, त्यात सगळ्यांना आराम करायचा असतो, पुढच्या आठवडयाची तयारी करायची असते..........मग शॉपींग वगैरेला फार कमी वेळ मिळातो......आमच्या घराजवळच कॉलेजरोडला मोठमोठे मॉल्स....बिग बजार सगळं आहे....पण सवडच होत नाही.

डोंबिवलीला आपल्या घरी आलं ना की आभाळ कसं मोकळं मोकळं झाल्या सारख वाटतं........बिनधास्त झोपाव.......बेडरुममध्ये पसारा फेकावा......बेधुम शॉपींग कराव......तु म्हणतेस ना तिकडे कशी निटनेटकी वागतेस.......इथे डायनिंग टेबलवर समोर वस्तु असली तरी घेत नाही.....अग असं वाटत आहे ना माझी ’मम्मा’.....वाढेल की ती........या घरात वावरत असतांना ........ डॉक्टर.....सुन.........वहीनी......सगळ्या झुली उतरवुन मी मस्त हुंदडत असते......मुलगी म्हणुन.....माहेरवाशिण म्हणुन! अन मनाच कधीच पाखरु झालं असत उंच निळ्या आभाळात उडणार.

तिचं बोलण ऐकता ऐकता माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. नवरात्रीतल्या अष्टमीला आम्ही भोंडला खेळतो......किती गाणी.....काही अर्थपुर्ण...काहींचा अजिबात अर्थ कळत नाही...... त्या गाण्याच्या ओळी मनात उमटत राहील्या

"अक्कण माती चिक्कण माती.....जातं ते रोवाव....,अस जात सुरेख बाई गहु ते दळावे......."
अन त्या गाण्याचा शेवट दोन्ही टिप-या एकमेकांवर जोरजोरात वाजवत........असं माहेर सुरेख बाई, खेळाया मिळतं" त्यानंतर उसळलेले हास्याचे फवारे!!!!!

मी तिला जवळ घेत म्हटल, सायली मॅडम छान लेखिकेसारख बोलताय, चला तुमची खरेदी बघुया की....आम्ही सगळा पसारा मांडुन बसलो होतो.....सायली खळखळुन हसत होती. तिचं मनमोकळ हसु बघुन माझ्या मनात लक्ष लक्ष पणत्या उजळल्या होत्या.....मायेच्या तेलाने अन वात्सल्याच्या वातींनी पेटलेल्या........तिन्हीसांजेला दाटुन आलेला अंधार दुर दुर पळाला होता. सगळ घरच प्रकाशमान झाल होत, माहेरवाशिणीच्या आगमनानं !!!

******************************

गुलमोहर: 

डोंबिवलीला आपल्या घरी आलं ना की आभाळ कसं मोकळं मोकळं झाल्या सारख वाटतं........बिनधास्त झोपाव.......बेडरुममध्ये पसारा फेकावा......बेधुम शॉपींग कराव......तु म्हणतेस ना तिकडे कशी निटनेटकी वागतेस.......इथे डायनिंग टेबलवर समोर वस्तु असली तरी घेत नाही.....अग असं वाटत आहे ना माझी ’मम्मा’.....वाढेल की ती........या घरात वावरत असतांना ........ डॉक्टर.....सुन.........वहीनी......सगळ्या झुली उतरवुन मी मस्त हुंदडत असते......मुलगी म्हणुन.....माहेरवाशिण म्हणुन! अन मनाच कधीच पाखरु झालं असत उंच निळ्या आभाळात उडणार.>> अगदी अगदी गं मनातलं लिहीलयंस दिप्ती... घरी गेले की अश्शी उपभोगते भरभरून ना माहेरपण...

पण मी या बाबतीत जरा जास्त लकी आहे... सासरच्या गावी गेले की तिथेपण सासू पाटावरून ताटावर ठेवते... म्हणजे दोन माहेरपणं :)!!!

सुंदर कथा... खुप आवडली..
मीही आईकडे जाताना नेहमी 'यावेळी आईला काही करायला द्यायचे नाही, जरा आराम देऊया तिला' असे ठरवुन जाते आणि तिच्याकडे गेल्यावर अंग असे सैलावते की बस पाटावरुन ताटावर आणि तिथुन बेडवर Happy

लाजो, फुलपाखरु, ड्रिमगर्ल, आस, साधना, साती,
धन्यवाद तुम्हाला कथा आवडली.

सासरी सगळी सुखं असली तरी....माहेरचं मोकळेपण्.....त्यासाठी मुलीचाच जन्म हवा....!!! आणि ड्रिमगर्ल्....तु तर खुपच भाग्यवान ग.....दोन्हीकडे असं प्रेम मिळतय.....!!! असच सगळ्या मुलींना मिळो!!

काय ग कारने जायच कां? व्वां.....कारने का? मग पुढच्या दिवाळीच्या भाऊबीजेपर्यंत येऊ घरी, डोंबिवलीचे रस्ते आणि ट्रॅफिक यावर तीने एक पीजे मारला. मग आम्ही स्कुटीच काढली.

आपल्याकडे कार आणि स्कुटी दोन्ही असून आपण सुखवस्तू आहोत हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न

साती, चांगभल,तृष्णा - धन्यवाद तुम्ही कथा वाचलीत.

तृष्णा - तुला हे अगदी मनातुन आलेलं वाटल - छान!!

चांगभलं - खर म्हणजे हे कथेतल्या पात्राचे संवाद आहेत, कथेतल्या पात्रांच्या घरात कार आणि स्कुटी आहे, तेव्हा इथे मी सुखवस्तु आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न करायची मला काय आवश्यकता??

खुप छान कथा आहे! खरच माहेरी गेलं की अगदी असच होतं! मनातुन अगदी ठरवलेलं असतं की आईला काही काम करु द्यायचं नाही..आराम करायला लावायचा पण तिथं गेलं की निघायचीवेळ आली तरी आराम संपतच नाही!

Dipti Joshi, अगदिमनापासुन लिहला आहे लेख सुंदर जमला आहे, मुलीच्या महेरी आल्यावर मनातले भाव छान स्पष्ट केले आहेत.
सुंदर लिखाण आहे ... पण जर शेवट्च्या अक्षरावर टिंब टाकलात तर वाचण्यास आण्खी सहज होईल Happy

जसे...,

सगळ कस, म्हटल>>सगळं कसं, म्हटलं
होत>>होतं
सायलीच>>सायलीचं
न कंटाळता बघण चालु होत.>>न कंटाळता बघणं चालु होतं.
लिबर्टीचं शोरुम लागलं>>लिबर्टीचं शोरुम लागलं
घेतल>>घेतलं
बरचस>> बरचसं
मला वाटल>> मला वाटलं
बघितल की वाटत,,,,,छे!>>बघितलं की वाटतं,,,,,छे!
मला तिच एक मात्र नवल वाटायच>>मला तिचं एक मात्र नवल वाटायचं

**
झालं, गेलं, वाटलं, सुंदर, तिथलं, माणसं.
सामजा या शब्दांमध्ये शेवट्च्या अक्षरांवर टिंब नसतील तर आपण असं वाचु
झाल, गेल, वाटल, सुदर, तिथल, माणस.

(अगदी निरस वाचन वाटते,जसे आवड्त्या डाळित मीठ कमी)

माझ्या समजण्यात चुकभुल झाली असल्यास देणे घेणे.... Happy

मुलीचं माहेरपण इतक चांगलं रंगवलं असताना त्या दिक्षीतांच्या बाबतीत त्या सायलीच्या आईचे इतके बुरसटलेले विचार का दाखवले आहेत? इतर बोलण्यावरून सुशिक्षीत असावी असं वाटलं. ( उदा: मनात म्हटल "दिक्षीत वहीनी, मुलीने अंतरजातीय लग्न केलय हे सांगा की आधी. शिक्षणाच्या जोरावर परदेशातला भरपुर पगार कमावणारा नवरा!! आणि तिथलं हाउसवाईफ कम मेड आयुष्य!! )

कथा आवडली.
<<सासरी सगळी सुखं असली तरी....माहेरचं मोकळेपण्.....त्यासाठी मुलीचाच जन्म हवा....!!! ----
१०००% अनुमोदन Happy

नुकतेच लग्न झालेल्या एका मैत्रीणीच्या तोंडचे वाक्य आठवले. ती म्हणाली होती --- सासरी तसे सगळे छान आहे. पण मला खूप बांधल्यासारखं वाटतं.

बाकी आर्च ला अनुमोदन. अंतरजातीय लग्नाचा ( अंतरजातीय का आंतरधर्मीय ? ) उल्लेख खटकला.