२४ खून माफ.....!!!

Submitted by भुंगा on 25 February, 2011 - 09:17

मायबोलीवर येऊन बरेच दिवस झाले होते....... तसे बरेच मित्र मैत्रीणी मिळाले. काही खुमासदार व्यक्तिमत्व नेहमीच त्यांच्या लेखनातून समोर येत राहिली. त्यातलेच एक आपले फेव्हरेट म्हणजे "मामी".
बर्‍याच दिवसांनी मामीला भेटण्याचा योग येणार होता.... कालच विपूतून बोलता बोलता एक "सुपर मिनी गटग" करूया असा मामीचा प्रस्ताव आला....... मलाही वेळ होता, मी लागलीच होकार दिला.
मामीच्या म्हणण्यानुसार तिच्याच घरी संध्याकाळी ५ वाजता भेटायचा प्लॅन ठरला. व्यवस्थित पत्ता घेऊन मी उद्या भेटूया असे म्हणून बाय बाय केलं.......

नेहमीच्या सवयीप्रमाणे थोडा लवकरच पोचलो मुलुंडला. बिग बाझारच्या जवळच्या मोठ्या काँप्लेक्समध्ये ३० व्या मजल्यावर मामी राहात होती...... एकदा फक्त हिरानंदानीच्या २३ व्या आणि ओबेरॉयचा ३५ व्या मजल्यावर गेलो होतो. पावसात विजा बाल्कनीतूनच निघत असाव्यात अशीच ती अवस्था. सगळे कसं खाली किड्या-मुंग्यांसारखं दिसत होतं. आता ३० व्यामजल्यावरही तीच अवस्था असणार होती. मी विचार केला की, कॉफी घेताना मामी डायलॉग टाकेल " सारी दुनिया राख की तरह नीचे और खूद धुएं की तरह उपर" Happy

बिग बझारजवळ पोचलो आणि आता पत्ता विचारायचा ठरवला. हे पूणे नसल्याने पत्ता नीटच सांगतील याची खात्री होतीच. पण आज जरा काहीतरी गडबड दिसत होती. बिग बझारच्या समोर सगळ्या मिडियाच्या व्हॅन्स लागल्या होत्या. हातात माईक घेऊन चिंटूपिंटू पत्रकारांची लगबग चालली होती. मला वाटलं काहीतरी शूटिंग बिटिंग असेल. पण थोडे पुढे बघावं तर पोलिसांच्या तीन - चार गाड्या लागलेल्या. बाजुचे कुजबूजत होते "लगता है, कमिशनर भी आया हुआ है"...... आता मात्र माझी उत्सुकता चाळवली.
हा नक्की काय प्रकार चाललाय???

हळूच बाजुच्या एका सिक्युरिटीला पकडला. खांद्यावर हात टाकून विचारलं "क्या हुआ यार??" इतनी गडबड क्युं है भाई???" सिक्युरिटीने सांगितलं.. "पता नही साब ठीक से, लेकीन ये बाजुवाले काँप्लेक्समे कुछ मर्डर हुवा ऐसे लोग बोल रहे है..... अब कौन मरा या बंब फटा वोही पता नही चल रहा है".
आता ह्याच्याकडून जास्त माहिती मिळणे अवघड होतं.... बरं मला ज्या कॉंप्लेक्समधे जायचय, ते हेच तर नसे ना या विचाराने मला ग्रासले. पुन्हा एकदा मामीने पाठवलेला एसएमएस पाहिला, काँप्लेक्सचं नाव वाचलं आणि गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ लागलो. गेटपर्यंत कसाबसा पोचलो आणि डोळ्यासमोर तारेच चमकले. मामीच्याच काँप्लेक्समधे खून झाला होता. आता मात्र मामीला कॉल करायला सुरुवात केली तर मामी फोनच घेईना. तरीही वाट काढत आत जाताना एका पोलिसाने हटकला. "साहेब, कुठे जाता आतमधे. आत कमिशनर आलेत. बाहेरून कुणाला आत जायला परमिशन नाही. मर्डर झालेत आत."
मर्डर झालेत?????????????? Uhoh

हे आता काहीतरी नवीनच. एक मर्डर ठीक आहे पण मर्डर झालेत???? म्हणजे नक्की किती?????
डोकं भंडावलं.... मामीला पुन्हा फोन लावला. तिने काही फोन उचललाच नाही. पोलिसाशी हुज्जत घालताना मामीचा एसएमएस आला की सरळ वरती ये. बी विंग ३० वा मजला.
अरे पण हा पोलिसवाला पाठवेल तर शपथ......... मामीला पुन्हा एसएमएस केला आणि पोलिसाबद्दल कळवलं......... मागोमाग तिचा कॉल आला, धीरगंभीर आवाजात मामी म्हणाली, "त्या पोलिसाला दे जरा". त्यांचे संभाषण संपताच पोलिसाने मला खुणेने आत जायला सांगितलं........
आयला, मामीची वट होती भारी.......!

सुशोभीत बागबगिच्यातून चालत पुढे आलो. या सगळ्या प्रकारात मला गाडी लांब पार्क करावी लागली होती. चालत चालत एका मोकळ्या प्रांगणात आलो, बाजुला ए, बी, सी, डी अश्या ४ विंगज्च्या टोलेजंग ईमारती गगनाला भिडल्या होत्या. आणि समोरचे दृश्य पाहून मी फक्त ओरडायचा राहिलो.
समोरच मोकळ्या जागेत एका मागोमाग एक अशी प्रेते ठेवलेली होती. नुसत्या नजरेने ती मोजणे शक्यच नव्हते. कुठून आज गटग ठेवले देव जाणे. त्यात जोडीला दुसरा कोणीच नाही. आणि ह्या असल्या वातावरणात भेटणार काय आणि गप्पा तरी काय मारणार????

लहानपणी सुहास शिरवळकरच्या कथा जरा जास्तच वाचलेल्या असल्याने माझ्यातल्या डिटेक्टिव्हचा उरलासुरला अवशेष सारखा डो़कं वर काढत होताच. काय झालं असेल??? एकाचवेळी एवढे मर्डर??
कोण कोण असतील हे???

हातात गाजर नसलं म्हणून काय झालं, चंद करम हमने भी डिटेक्टिव्ह के किये है Proud

बस्स..... अंगात डिटेक्टिव्ह शिरला आणि आता इथली इथ्थंबूत माहिती मिळाल्याशिवाय वर जायचच नाही असे ठरवूनच टाकलं. समोरचं दृश्य विदारक होतच पण शिरवळकर अंगात संचारलेले. तेच पुढचं सर्व करून घेत होते. हळूच सरकत सरकत पोलिस उभे होते तिथे जाण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. बर्‍यापैकी यश मिळालं. कणीच हटकलं नाही. मग काय, मी पण मीच या ३० व्या मजल्यावर रहातो या थाटात जरा जास्त सलगीने माहिती काढायला सुरुवात केली. हवालदाराला म्हटलं, काय साहेब एकावेळी एकाच दिवशी इतके लोक मारले???
हवालदार उचकला, "तुम्हाला माहितेय किती हायेत ते???"
माझ्या चेहर्‍यावर प्रशन्चिन्ह.
हवालदार, "२३ जनं मेलीत एकाच दिवशी. एकदम ब्येकार पध्दतीनं मारलीत. सगळ्यांच्या मानेवरुन सुर्‍या फिरवल्यात. सगळी साधी मानसं होती बिचारी. समोरचा सीन बगितला का कदी.... एकाला एक लागून २३ मुडदे. आयला सकालपास्न उभे हाय आम्ही पानी प्यायला पन देत नाय साहेब आमचा."
आहाहा....... मी हातात हलवत आणलेल्या बिसलरीचा उपयोग झाला होता. मगाशी गाडीत ठेवायची राहिलीच होती, म्हटलं काँप्लेक्समधे टाकू कचरापेटीत. बरा सापडला हा. पाणी फुकट गेल्याचं दु:ख नको आता. हवालदाराला बाटली दिली "साहेब, हे घ्या पाणी". एकदा चेहर्‍याकडे बघून "हे लई बेस बघा" असं म्हणाला.

आता मला उत्सुकता होती, ही मंडळी आहेत तरी कोण??? कोणी मारले असेल यांना एवढ्या अमानुषपणे?? दिवसभर पंचनामे झाल्याने हवालदार जरा निवांत होता. इतर पोलिसांचेही विशेष लक्ष्य नव्हते माझ्याकडे. आणि वरून मामीचा अजूनतरी "कुठे आहेस" असा एसएमएस आला नव्हता. झालं हवालदाराला बोलता केला. मेलेल्या सर्व लोकांमधे जी लिस्ट होती ती अशी:
१ ते १२: प्रत्येक विंग मधले ३ असे चार विंग्जमधले १२ सिक्युरिटी वाले
१३: दुधवाला
१४: ईस्त्रीवाला
१५: नारळपाणीवाला
१६: ईलेक्ट्रिकल काँट्रॅक्टर
१७: मुलाखतीला आलेला एक ड्रायव्हर
१८: एका मोलकरणीचा नवरा
१९: बगिचा सांभाळणारा माळीबाबा
२०: केबलचे पैसे गोळा करायला आलेला युवक
२१: कपडे डिलिव्हर करायला आलेला टेलर
२२: पिझ्झा हटचा डिलिव्हरी बॉय
२३: काँप्लेक्सचा प्लंबिंग काँट्रॅक्टर

प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी इतक्या शिताफीने मारलं होतं की कोणालाच काही कळल नव्हते. काल रात्रीपासून एक एक करत सगळे मुडदे पडले होते. याचा अर्थ काल रात्री मामीशी बोलताना इथे तिच्या काँप्लेक्समधे खून होत होते??? सगळंच अजब होतं.....

एकदम सून्न झालो. काही कळण्याच्या आत मोबाईल खणखणला. मामीचा कॉल....
"अरे आहेस कुठे??? काय ३० मजले चढून येतोयस का??? आमच्यात लिफ्ट असते वर यायला. कधीची वाट बघतेय, तुझा कॉल आल्यावर कॉफी केली होती... थंड झाली आता. लवकर ये वर. इट्स ऑलरेडी ५.३०. यु आर ३० मिनिट्स लेट." फोन ठेवला होता. मला बोलायला संधीच नव्हती.

हवालदाराला हात मिळवून सरळ बी विंगच्या लॉबीत आलो. लिफ्टमधे शिरलो. येता जाता दिसणारे चेहरे टेन्स्ड वाटत होतेच. आजुबाजुला चिटपाखरू नव्हते. झपाझप कधी लिफ्ट ३० व्या माळ्यावर पोचली कळलच नाही. मी लिफ्टच्या बाहेर पडलो. फ्लॅट शोधायचे कष्ट नाही पडले कारण एवढा मोठा काँप्लेक्स असला तरी मामीने आधीच दरवाजा उघडा ठेवला होता. मंद स्मित करत दरवाज्यात ती उभी होती.
"ये भुंग्या ये. मला तर वाटलं होतं की तू उडत उडतच येशील. येता येता दमलास तर मधल्या एखाद्या मजल्यावर बेडरूममध्ये डोकावशील Wink मामीचा मिश्कीलपणा जसाच्या तसा होता.
मी हसून आत शिरलो. घरात अजूनतरी कुणीच दिसत नव्हते.
भव्य हॉल, त्याला अटॅच्ड बाल्कनी... समोर निरभ्र आकाश. "वारा खूप असतो इथे. त्रासच होतो" असं म्हणत मामीने हॉलचा पडदा लावलाच. इतका चांगला व्ह्यु होता.... काय बोलणार??? ही काय विक्षिप्त पण आहे काय??? इथे बोलणं कठीण होतं........ तेवढ्यात मामीने आत जाऊन गरमा गरम कॉफी आणली आणि ती बोलायला लागली, "काय खाली घुटमळत होतास की काय इतका वेळ??"
मग मी काढून आणलेली सगळी २३ जणांची माहिती मामीला दिली.
मामी म्हणाली " बराच गृहपाठ करून आलायस, बघ हो ऐन परिक्षेत नापास होशील"......
मला हा पूर्ण बाऊंसर होता. काय बोलावं?? दोन मिनिटं कधी नव्हे तो भुंगा गप्प झाला होता.....

मग मीच जरा विषय बदलला. कोणी केला असेल मर्डर, आणि तोही इतक्या जणांचा??? काय घोडं मारलं होतं कुणाचं???? तडफडून मरेल ज्याने कोणी मारलय तो..... मामी स्तब्ध होती. एव्हाना कॉफी संपली होती..... "आलेच" म्हणत मामी आत निघून गेली. मी आपलं घर न्याहाळत बसलो होतो. घरात अजून कोणीच नाही, कदाचित मुलं गेली असतील खेळायला किंवा मग क्लासला.
मामी किचनमधून बाहेर आली.... हातात ट्रे आणि ट्रेमधे "बिस्किटे" होती. Proud या भानगडीत ट्रेच्याखाली माझं लक्षच गेलं नाही.

मामी, तुमच्या डोक्याला ताप झाला असेल ना दिवसभर........... मामी गप्पच "हं".....
पण मला एक कळत नाही मामी, एका दिवशी २३ खून एकाच काँप्लेक्समधे??? तेही वेगवेगळ्या वेळी पण एकाच पध्दतीने??? कमाल आहे...... पण २३ च का???

आता मामीने अबोला सोडला. थोडसे छद्मी हसत म्हणाली " कारण २३ नंतर २४ येतात"

माझं तर डोकच आऊट झालं.... अरे गटगला आलो काय, खून होतात काय, मामी विक्षिप्तपणे बोलते काय.
अरे पळावं म्हणतो इथून......

म्हणजे काय मामी...... २३ नंतर २४ च येतात... त्याचा इथे काय संबंध????

"कारण तू चोविसावा आहेस"......... काही कळायच्या आतच मामी उठली. मी हालचाल करायच्या आधीच ती माझ्या समोर होती. आता तिच्या चेहर्‍यावर ७ खून माफ मधली प्रियांका, मायामेमसाब मधल्या दिपा साही आणि कौनमधल्या उर्मिलालाही हादरवेल असे भाव होते.........
ट्रेच्या खालचा धारदार सुरा तिच्या हातात होता, चेहर्‍यावर कुत्सित हसू होतं.....

तितक्याच शिताफीने तो सुरा माझ्या मानेवर फिरला....... मी हकनाक मारला गेलो होतो.
डोळे बंद होता होता फक्त समोर मामीचा भेसूर चेहरा दिसत होता...... तेच ते छद्मी हास्य.
मामी स्वतःशीच पुटपुटली " चलो २४ खून माफ"
माझी तडफड ती मिटक्या मारीत बघत होती आणि मी शेवटचे आचके देत होतो.
*****************************************************
अचानक भानावर यावं तसे जाग आली. रात्री काँप्युटरसमोर असताना तशीच डुलकी लागली होती.
समोर स्क्रीनवर मायबोली साईट होती. मामीची विपू दिसत होती. तिच्या फोटोतून ती माझ्याकडे बघत उर्मिला, प्रियांका आणि दिपासारखं छद्मी हसत होती.......
"डार्लिंग आंखो से आंखे चार करने दो, रोको ना टोको ना मुझको प्यार करने दो" ही सुरावट कानात घुमत होती..........
मामीचा शेवटचा विपू चेक केला "सी यु टुमारोव" Happy
काही झालं तरी जायचच, आणि मामीला भेटायचच असं ठरवून शांत झोपलो.....

मायबोली मात्र सदैव जागीच होती.......... गालातल्या गालात हसत..... माझ्यासारख्या लाखो मराठमोळ्यांना व्यसन लावून........ तितक्याच दिमाखात....!!!!!!!

***************************************************

तळटीपः हे लेखन करण्यापूर्वी "मामी"ला पूर्वकल्पना दिलेली आहे... तिने मोठ्या मनाने "गो अहेड" म्हटलय Wink
प्रत्यक्ष आयुष्यात मला कधीच स्वप्नं पडत नाहीत Sad मी अश्या कित्येक स्वप्नांना मुकलोय.. Sad

गुलमोहर: 

३० मजल्यावर राहणार्‍या माणसांकरता " सारी दुनिया राख की तरह नीचे और खूद धुएं की तरह उपर" या डॉयलॉगचा लेखात केलेला चपखळ वापर प्रचंड प्रचंड आवडला.. (मी स्वतः "तीसमजली हसलो"..सातमजली नव्हे.)

बाकी रहस्य मी त्या लिस्टलाच ओळखू शकलो... (यासाठी मी माझीच पाठ थोपटून घेतो.)

"बिस्कीटे"ही यातून सुटली नाहीत, यासाठी तूझं कुरकुरीत, खुसखुशीत कौतूक.

आणि एकूणच लेखासाठी (अर्थात वाचकांना शेवटपर्यंत वाचतं ठेवण्यासाठी आणि स्वतः ही मामींच्या तावडीतून वाचल्यासाठी) आपल्याला माझ्यातर्फे ४-५ बिस्कीटचे पुडे... ती "बिस्कीटे कशी खावीत?" हे विचारायला तूम्ही मामींकडे जालच. तेव्हा मामी तूम्हाला "माफ" करणार नाहीत, अशी माफक अपेक्षा..

१दम सही. मी तर गेल्या काही दिवसातील e-loksatta चेक करायला घेतले. एवढे खुन आणि वाचनात कसे आले नाही हेच कळत नव्हते.

बाप रे! डेंजरच आहेस तू.. असली कसली स्वप्न पडतात तुला ?? बिचारी मामी! तिने बरी तुला परमिशन दिली लिहायला Lol
बाकी, २३ जणांची लिस्ट पाहिल्यावर लक्षात आलं की हे मामीच्या विबासं शी रिलेटेड कायतरी असणार.. पण तूच का शेवटी या कोड्याची उकल जे कोण करू शकेल त्याचा लकडीपूलावर सत्कार..

हे पूणे नसल्याने पत्ता नीटच सांगतील याची खात्री होतीच.>>>>>>>>> पत्ता नीट सांगतील न सांगतील पण सत्कार मात्र अगदी नीssssssssट करतात बरं पुणेकर Proud

भुंग्या भारी रे. Happy मला आधी २४ जण गटगला जमले की काय अशी शंका आली व नंतर दुधवाला वगैरे वाचल्यावर विबासंची ट्युब पेटली.

जबरी रे भुंग्या ________________/\__________________ Rofl
तुझ्या कल्पनाशक्तीची-असली दिवास्वप्ने बघणार्‍या सुपीक डोक्याची कमाल. Happy
मामींच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक Happy

तुझ्या टायरपिटीचे (एकदाचे) झालेले सार्थक म्हणून हा धागा वर काढते आहे रे भुंग्या...:हाहा:

बाकी, जबराट लिहिलं आहेस!
मामीच्या खिलाडू वृत्तीचं खरेच मनापासून कौतुक!
विबासंच्या लिस्ट मधे २४वा "तू", हे वाचून त्या खुनाचं हसूच जास्त आलं Biggrin
कल्पनाविलासाला _/\_

विबासंच्या लिस्ट मधे २४वा "तू", हे वाचून त्या खुनाचं हसूच जास्त आलं
>>>>>>>>>>>>

इतक्यातच अंडरेस्टिमेट करू नकोस बागे Light 1 Biggrin Proud

भुंग्या रे Happy
लई भारी राव, अस्लं काही मिस केलं असतं तर मला माफी नव्हती Happy
तुला आणि मामीना ________/\________

Pages