धीरे से जाना खटीयन में..!

Submitted by A M I T on 24 February, 2011 - 00:32

असा प्रसंग वैर्‍यावरदेखील येऊ नये.

म्हणजे बघा झालं असं...

आम्ही दोघं एकाच ऑफीसात कामाला. ती रोजच पाहायची माझ्याकडे. आणि हो मीही.. चोरून... म्हणजे बुब्बुळं डोळ्यांच्या कडेला नेवून. आता म्हणून आमच्यात काही प्रेम-बिम नावाची भानगड होईल, याची आम्हांला सुतराम कल्पना नव्हती. डोळ्यांतल्या बुब्बुळांत अदृश्य अशी एक प्रकारची चुंबकीय शक्ती वगैरे असावी, असा जावईशोध मी तेव्हा लावला आणि मला आपण शास्त्रज्ञ वगैरे झाल्याचं वाटू लागलं.

तिचं नाव रोझी. अमुक एका "रोजी" माझं तिच्यावर प्रेम जडलं, असं तारीख, वार, सनावळीने नाही सांगता यायचं. म्हणजे बघा... ऑफीसातले काही सावध कटाक्ष चुकवून आमच्या नजरा एकमेकांच्या हृदयाची दारे ठोठावत होत्या. साहजिकच ती दारे उघडली आणि न भुतो न भविष्यति की काय म्हणतात? तशा मी ठरवून स्वप्नातही कधी पाहू शकलो नाही अशा आमच्या गाठी-भेटी ऑफीस सुटल्यावर ऑफीसबाहेरील प्रेमळ जागांवर घडू लागल्या. या प्रेमळ जागा ऑफीसबाहेरच का असतात? हा प्रश्न आजही मला कधीही न टॅली होणार्‍या बॅलेंस शीटइतका जटील वाटतो.

माझं वॉलेट नेहमीच आता मी डोळाभरून पाहू लागलो. ऑफीसातल्या मित्रांची देणी वाढली आणि प्रकाशाच्याही दुप्पट वेगाने रोझी आणि माझ्या प्रेमाची बातमी "लफडं" या नव्या बारशाने "आज ऑफीसात नवी (चिकणी, पटाखा, ढासू, रापचिक.. ही आणि अशा अर्थाची जमतील तितकी विशेषणे लावून..) रिसेप्शनिस्ट आलीय" च्या चालीवर सबंध ऑफीसभर पसरली.

आता आमचं प्रेम असं जगजाहीर झाल्यावर आम्हांला कुणाच्या बापाची का भिती उरली होती? अगदी रोझीच्याही..

मग काय? दिलं आवताण तिने मला.. घरी येण्याचं. मी कपडे आणि केसांची यथासांग विल्हेवाट लावून तिच्या घरी पोहोचलो. फाटकाजवळील "कुत्ते से सावधान" नावाचा फलक मी पाहीला आणि सावध पवित्रा घेतला. आत डोकावून पाहीलं पण फलकात उल्लेख केलेला कुत्रा कुठे दिसेना. चोरांना घाबरवण्यासाठी तो फलक लावला असावा, असा मी स्वत:चा समज करून घेतला. पण तो फलक चोरांना घाबरवण्यासाठी नसून सेल्समन आणि फेरीवाल्यांच्या उपद्रवापासून बचावासाठी होता, हे मला नंतर रोझीनं "विश्वासात" घेवून सांगितलं. मी दरवाज्याला कुलूप नसल्याची खात्री करून दारावरची बेल वाजवली. आतून चिमणीचा चिवचिवाट ऐकू आला. काही क्षणांत तिने दरवाजा उघडला. तिच्या गालावर एक खळी उमटून गेली. तिच्या मागोमाग मी आत शिरलो. तिने मला एका जुन्या काळातील आरामखुर्चीत बसण्याची खुण केली आणि स्वत: स्वयंपाकघरात गायब झाली. स्वयंपाकघरातून भांड्यांची खडबड ऐकू आली. मी एकदाचं घर नजरेखालून घालून घेतलं. दोन्ही हातांत दोन कप चहा घेवून ती आली. मग आम्ही चहाच्या प्रत्येक घोटागणिक गप्पा संपवल्या.
त्या चहाची शपथ घेवून मला "चाहा है तुझको.. चाहूंगा हरदम.." असला "चहा"टळपणा करावासा वाटला, पण तो "मधूमोह" मी आवरला.
तिचा निरोप घेवून मी त्या "आनंदाच्या डोही आनंदाने तरंगत" घरी गेलो.

तिचं हसरं वदन पाहून दिवस तर जात होते, पण कोणजाणे रात्री अंथरूणात कुस बदलत, तळमळत जात होत्या. मेरी रातोंकी नींद हराम की काय म्हणतात? तशी होऊ लागली.
"हे तर प्रेमाचे साईड इफेक्ट आहेत रे..!" असं प्रेमाच्या महासागरात आकंठ गोते खाल्लेला आणि आमच्याच ऑफीसातल्या केशरबरोबर "आँखमिचौली" खेळत असलेला मदन म्हणाला.
पण हे इफेक्ट प्रेमाचे नसून दुसर्‍याच कुठल्यातरी गोष्टीचे आहेत, हे मला नंतर कळालं.

त्या दिवशी ऑफीसात मी नवा व्हाईट्ट शर्ट घालून गेलो होतो. सर्वजण "टाईड" नजरेने माझ्याकडे बघत होते. काही क्षणांत माझ्या टेबलला गराडा पडला. मग या सफेद शर्टामागचं रहस्य काय? तो आजच का घातला? आजचा वार कोणता? इथपासून प्रत्येकाचा आवडता रंगही सांगून झाला आणि अशा "रंगीत" गप्पांमध्ये ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट चित्रपटांतील बॅकग्राऊंड म्युजीकसारखा अचानक गजा ओरडला, "अरे..! हे काय? शर्टसोबत ढेकूण फ्री मिळाला की काय?"
या ओरड्यासरशी मी चपापलो. सगळ्यांच्या नजरा माझ्या व्हाईट्ट शर्टवर ढेकूण फिरत होता, तशा-तशा फिरत होत्या. माझी बुब्बुळंही कॅरमच्या स्ट्राईकरप्रमाणे सबंध डोळाभर फिरत होती. गजाने मला स्थिर उभं राहायला सांगून त्या आगावू प्राण्याला चिमटीत पकडून माझ्याच टेबलवर चिरडून टाकला. तेव्हा कुठं मला घरात ढेकूण झाल्याची "कुणकुण" लागली.

रोझीनं दिलेलं हे प्रेमळ "गिफ्ट" मला मात्र भलतचं महाग पडलं. रात्रीच्या जागरणाने की काय मी प्रचंड चिडचिडा बनलो आणि याचाच परिणाम रोझीने माझ्या प्रेमाला "सुरूंग" लावला. मी रोझीवर जितकं प्रेम करायचो त्याच्या दूप्पट तिरस्कार मी ढेकणांचा करू लागलो.

आता लढा होता "माझ्याच रक्ताविरूद्ध..!!"

आता प्रत्येक रात्री ढेकणांच्या असंख्य कत्तली होऊ लागल्या. घरातल्या भिंती लाल रंगांच्या रेषांनी नटू लागल्या. तरी ढेकणांची संख्या कमी होईना.

अखेर पेस्ट कंट्रोलच्या फवारणीने त्या उपद्रवी प्राण्यापासून सुटका झाली आणि मी स्वस्थ झोपू लागलो.

परवा गावी मामांच्या घरी गेलो. बाजेवर बसलो तोच मला "ती" जाणीव झाली. म्हणजे इथेही तोच प्रकार आहे तर..!
मामीनं चहा "टाकला" होता, तो तसाच "टाकून" मी तिथून पळ काढला.

देवाला सांगावसं वाटलं, "हे भगवान..! मुझे इस "खटमल" से बचाओ..!!"

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

Lol

मुझे इस "खटमल" से बचाओ..!!"
और रोझी को बुलाओ

लेख ढेकणावर आणि फुटेज मात्र रोझीला ?
माझी बुब्बुळंही कॅरमच्या स्ट्राईकरप्रमाणे सबंध डोळाभर फिरत होती.: हे आवडलं.

प्रेमळ जागा ऑफीसबाहेरच का असतात?: ऑफिसच्या जागेची वास्तु तपासून घ्या. फायए एक्झिट, लिफ्ट इ.इ. जागा नाहीत की काय?

कथा छान पण पुढे काय आहे ह्याची उत्सुकता वाढत
असतानाच कथा संपते. असं का?