गोष्ट अल्केची -डायरीतील नोंदी,त्याही जशा हाताशी आल्या तश्या -भाग चार

Submitted by किंकर on 23 February, 2011 - 22:33

ठिकाण गरवारे कॉलेज मे १९८५ भर दुपार - मन कशात रमवायचे ?काही तरी ध्येय,काही तरी उद्दिष्ट हवे. नोकरीत प्रगती,बढती यात कर्तृत्वापेक्षा संस्थेची गरज मोठी म्हणून तिथे बढती झाली.जोशीबुवांसारखे काही वरिष्ठ मनातून करपले. पण त्यास आमचा,म्हणजे नव्या पिढीतील ज्यांनी बढती स्वीकारली त्यांचा काहीच दोष नव्हता. पदवीधर असणाऱ्या प्रत्येकास समान संधी होती. जावू दे,असे लोक भेटतच राहणार.आज मी ठरवले कि,पुढे शिकायचे आणि उठून थेट कॉलेज गाठले. एम.कॉम. साठी प्रवेश घेतला. मनात नोकरी आणि हे एकत्र जमेला का ? असा प्रश्न स्वतःला विचारत बाहेर पडलो आणि ध्यानी मनी नसताना समोर अलका आली. माझे येथे असणे तिलाही अनपेक्षित. मिनिटभर नुसतेच समोर समोर. मग तिनेच विचारले इथे काय करतोयस. मी तिला म्हणालो. एम. कॉम साठी प्रवेश घेतला. तर मला म्हणते, आता काय ऑफिसमध्ये साहेब मग उच्च पदवी एवढी कसली तयारी चाललीय.मग मात्र मी सरळ विचारले पत्र पाहून सुद्धा जर हा तुझा प्रश्न असेल तर तर त्यातून तू तुझे उत्तर दिलेस असे समजू का ? मग ती म्हणाली तू लिहितोस छान पण तुला वाचणे खूप अवघड जाते रे. आणि आता ऑफिस मध्ये तू साहेब आम्ही काय बोलणार. मग तिला सरळ म्हटले. हे बघ हवा तर थोडा वेळ घे मग सांग,पण कोड्यात बोलून,मला कोड्यात टाकू नकोस. त्यानंतर जवळ जवळ दोन तास आम्ही कॉलेजच्या स्टेडीयम वर बसून गप्पा मारल्या. कोणताच निश्चित विषय नसून,दोन तास कसे संपले कळलेच नाही. आता तर ऑफिस बदलले असल्याने पुन्हा कोठे व कशी भेट होणार माहित नाही. असे असून हि चल निघुयात! म्हणत ती उठली आमचे रस्ते वेगळे झाले.

ठिकाण माझेच घर महिना- नोव्हेंबर, दिवाळी १९८६- खरच ऑफिसमधील प्रमोशन होवून दीड वर्ष होत आले. जोशिबुवांसारख्या मागच्या पिढीतील मंडळींचा विरोध आपोआप ओसरला. मनातून राग असला तरी रोजच्या कामातील असहकार कमी झाला.हे सर्व ठीक तसेच माझे एम.कॉमचे रजिस्ट्रेशन होवून वर्ष होवून गेले.पहिले वर्ष सहजतेने पारही पडले. इतरांसाठी सर्व काही सुरळीत सुरु आहे. पण अलका तिचे वागणे दिवसेंदिवस गूढ होत चालले आहे. परवा तिच्या रिजनचा तो रमेश भेटला होता. त्याला मी अलकास ओळखतो हेच माहित नाही त्यामुळे बोलण्याचे ओघात तो ऑफिस मधील विशेष म्हणून सांगत होता अरे ती अलका आहे न हल्ली आपल्या ऑफिसचा सप्लायर आहे न तो डीसिल्वा म्हणून त्याचे बरोबर दिसते. एक दोनदा त्याच्या कारमधून गेली . काय माहित काय चाललेय ? असे म्हणून रमेश निघून गेला. पण माझे मन अक्षरशः जळत होते. हि अलका तीच का ? जिला एके काळी जोशीच्या नजरेचा राग येत होता. तेंव्हा जिने तीची उलघाल मला सांगताना भावनिक जवळीक साधाली होती. जावे का सरळ तिच्यासमोर आणि विचारावे का? तू अशी का बदललीस. आज दिवाळी सर्वत्र आनंदी आनंद असताना,मी मात्र असाच जळत राहणार का ? अलका तुला माझ्या या सैरभैर अवस्थेची जाणीव तरी आहे का ? या स्वतःस विचारलेल्या प्रश्नाने का माझे कोडे सुटणार आहे? आज तरी माझ्या कडे काहीच उत्तर नाही. तरीही माझ्या अलकेस दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा!

ठिकाण पुणे विद्यापीठ जानेवारी १९८७ - आज पुन्हा विद्यापीठात येणे झाले. यावेळी एम.कॉम फायनल परीक्षे करिता आलो . पण मनाने पुन्हा ओढ घेतली ती तीन वर्षांपूर्वीच्या आठवणींच्या दिवसात. तेव्हा विद्यापीठात आलो होतो , सोबत अलका होती. तेव्हाचे ठिकाण ती हवा एक सुखद झुळूक अंगावरून गेली. पाठोपाठ तो दिवस समोर आला. काय काय म्हणून अलका बोलली होती त्या दिवशी. तेंव्हाच तिचा खरेपणा प्रांजळ होता का आताचे तिचे वागणे मतलबी आहे. मन तुलना करू लागले. शेवटी एम.कॉमच्या फॉर्म भरण्याच्या कामाची पूर्तता केली, जुन्या खपलीला लागलेल्या धक्याने वाहणारी जखम जणू 'अश्वथामा' झाली होती. तिचे वाहणे तिच्या वेदना थांबणार नाहीत असे मनासी म्हणत विद्यापीठ सोडले.

ठिकाण- घर पूर्ण एकांत महिना-मार्च १९८७-दिवस पुढे पुढे सरकत होते.रमेशचा निरोप वरकरणी साधाच होता.पण कालच अलकाच्या ऑफिस मधील शिपाई राजू भेटला. त्याला माझी आणि अलकाची ओळख आहे याची माहिती नव्हती. जोशीबुवा खडूस साहेब यांच्या आठवणीनंतर विषय इतर स्टाफ कडे वळला . आणि ओघातच त्याच्या तोंडून अलकाची माहिती आली. हल्ली म्हणे फक्त डिसिल्व्हा नाही तर आणखीन एक दोघे वरचेवर दिसतात. ऑफिस सुटले की बाई त्यांच्या गाडीतून जातात. पण कोण ते माहित नाही. जावू दे ज्याचे नशीब त्याच्या बरोबर. असे म्हणत राजू निघून गेला. पण माझ्या डोक्यात घणाचे घाव बसतायत असे वाटू लागले. एकदा वाटले हे सर्व थांबवले पाहिजे. पण पुन्हा मन म्हणाले, नाही मी का म्हणून अलकावर अविश्वास दाखवू. नसेल ती संपर्कात पण म्हणजे सगळे थोडेच संपले आहे? मी मलाच प्रश्न केला आणि उत्तरासाठी अलकाच्या वाटेकडे डोळे लावून राहिलो....

ठिकाण घर महिना सप्टेंबर १९८७ - आज गणेश उत्सवाचा अखेरचा दिवस. अनंत चतुर्दशी. पुणेकरांसाठी दरवर्षी प्रमाणे एका सोहळ्याची सांगता करणारा दिवस. पण माझ्यासाठी आज पाच वर्षे झाली, बरोब्बर याच दिवशी अलकाला मी प्रथम पाहिले. आजही ती रात्र,लक्ष्मी पथ तो वाडा, काही काही म्हणून डोळ्यासमोरून जात नाही. बघता बघता पाच वर्षे कशी संपली कळलेच नाही. आणि गेल्या चार/सहा महिन्यात तर अलकाची वागणूक इतकी अनाकलनीय होतेय कि प्रत्येक बातमी एक नवे प्रश्नचिन्ह उभे करीत आहे. मागील वर्षी रमेशकडून त्यानंतर राजू शिपायाकडून कलेल्या गोष्टी मन कुरतडून टाकत होत्या. अजून थेट अलकाशी बोललो नसलो तरी, आता शंकेची जागा भीतीने घेतली होती. माझी स्वप्नातली परी स्वप्नात तशीच राहून स्वप्नच अधुरे नाही न राहणार? या प्रश्नांनी मन विदीर्ण होवू लागले.माझ्या स्वप्न सुंदरीचे नाव आता कोणीही ती इथे दिसली, तिथे दिसली आज डिसिल्व्हा तर उद्या तो पांडे अशा पैसेवाल्या बड्या आसामी बरोबर जोडली जावू लागली. मग मी ऐकतो ते खरे का माघारी काही घडतेय ते खरे या प्रश्नांनी छळवाद मांडला.आणि आज पाच वर्षांनी निर्णय घेतला कि १९८७ संपण्यापूर्वी या विषयाचा सोक्ष मोक्ष लावून टाकायचा.(क्रमशः)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ह्म्म्म एक सल्ला...लिहीताना परिच्छेद/ विरामचिन्हांचा वापर अजुन जरा वाढवा.बघा पटतेय का..
उदा.
ठिकाण- घर .पूर्ण एकांत.
महिना- मार्च १९८७ -
दिवस पुढे पुढे सरकत होते.रमेशचा निरोप वरकरणी साधाच होता.पण कालच अलकाच्या ऑफिस मधील शिपाई राजू भेटला. त्याला माझी आणि अलकाची ओळख आहे याची माहिती नव्हती. जोशीबुवा खडूस साहेब यांच्या आठवणीनंतर विषय इतर स्टाफ कडे वळला आणि ओघातच त्याच्या तोंडून अलकाची माहिती आली. हल्ली म्हणे फक्त डिसिल्व्हा नाही तर आणखीन एक दोघे वरचेवर दिसतात. ऑफिस सुटले की बाई त्यांच्या गाडीतून जातात. पण कोण ते माहित नाही. जावू दे ज्याचे नशीब त्याच्या बरोबर असे म्हणत राजू निघून गेला. पण माझ्या डोक्यात घणाचे घाव बसतायत असे वाटू लागले. एकदा वाटले हे सर्व थांबवले पाहिजे. पण पुन्हा मन म्हणाले, नाही मी का म्हणून अलकावर अविश्वास दाखवू. नसेल ती संपर्कात पण म्हणजे सगळे थोडेच संपले आहे? मी मलाच प्रश्न केला आणि उत्तरासाठी अलकाच्या वाटेकडे डोळे लावून राहिलो....