ती सांज....!!!

Submitted by बागेश्री on 18 February, 2011 - 05:12

ती सांज.... अजूनही ती सांज .... तिच्यातला प्रत्येक क्षण, आठवतो!.... अगदी जश्याचा तसा.....

ऑफिसमध्ये होते मी.. खूप उदास... एक मिटिंग संपवून माझ्या जागी परतत होते... गंपू बाबाच्या देवळावरचा केशरी झेंडा, सायंकाळचा गारवा, घरट्यात परतणारे पक्षी, शांत क्षितीज, ... ह्यातलं काहीच मनात उतरत नव्हतं.....

पार खचत चालले होते, आई बाबा माझा लग्न ठरवणार होते....... त्यांना मी आजवर दुखावलं नव्हतं... पुढेही दुखावणार नव्हते.... त्यांना वाईट वाटेल असं काहीही करणार नव्हते.......... माझ्या आत आत पोकळी वाढत होती... माझेच विचार मला बोचत होते!

"तुझ्यापासून" दुरावणार होते? पण तुला कधी कळलं होतं, माझ्या मनात आहे काय तुझ्याविषयी... की कळूनही तू अजाण?

... आणि मोबाईल वाजला ...तुझा कॉल आला !!!! गेल्या कित्येक वर्षांमध्ये पहिल्यांदाच "तू" कॉल केलास ! एरव्ही फक्त मी करणार .. तू कधीच करणार नाहीस ... मी कित्येकदा तक्रार करून सुद्धा.... ,जणू आपल्या मधील मूक करारच तो!

पुन्हा एकदा आठवलं, चार वर्षे झाली, आपल्याला भेटून, कितींदा भेटू म्हणाले मी तुला, तू तयारच नसायचास भेटायला.... माझे डोळे तुला फितूर करतील, तुला माझ्यात अडकवून ठेवतील, अशी तुला भीती नेहमी!

म्हणालास," सोनू , बरच झालं तू काल कॉल करून सांगितलस, की तुझ्यासाठी लग्नाचं बघत आहेत म्हणून, atleast I Got to know, what should be my stand is...."
मी विचारलं," म्हणजे विशू ? काय करणार आहेस तू?"
तू म्हणालास," आजच निघतोय नाशिक वरून, माझ्या घरी जाणार आहे, आई-बाबांना भेटून सांगतो, आपल्या दोघांबद्दल...."

काय सांगू, काय वाटलं मला? शहारा आला, अंगभर! .... तुला आवडते मी? माझा जीवनसाथी म्हणून विचार करतोस तू? विचारावं वाटलं..... कधी जाणवलंच नव्हतं मला..... तुझ्या तर्फे असं काही....
हजारो, लाखो विचार अंगावरून रांगत गेले.... थेट डोक्यापर्यंत!

लग्न होईल.... आपलं?..... मी स्वप्नात आहे? ...... तूच बोलतो आहेस न फोनवर, विशू?
आणि तू त्याच रात्री तुझ्या घरी निघालास.....

ती रात्र..... केव्हढी तगमग.... घालमेल.... तो रात्रीचा 3.30 चा सुमार, चंद्राची किरणे नेहमीप्रमाणे माझ्या उशीवर उतरलेली.... अस्वस्थतेने घेरून टाकलं होतं मला...... तुझे आई बाबा 'हो' च म्हणतील "मला" , दूरचे का होईनात आपण नातेवाईक.. एकमेकांचे परिवार जवळचे.. गणित जुळण्याजोगं ... पण.... तरीही... घालमेल!! दडपलेला उर !

सकाळी तुझा एस.एम.एस "मी घरी पोहोचलोय- संध्याकाळी कॉल करेन , नाशिकला परतण्यापूर्वी "
बापरे.... नऊ तास मला वाट पहायची होती... एका उत्तराची!! ... वाटलं ... उरेन का मी??
ऑफिसला गेले, लक्ष कश्यातच नव्हतं रे माझं, खरंच म्हणून सांगते! सायंकाळी पाच पासून ऑफिसच्या देवळात जाऊन बसले... गंपू बाबाची करुणा भाकत...

साडे आठला कॉल आला ना रे तुझा?? की त्याही नंतर? डोकं सुन्न होतं.... आठवत नाही बाकी काही
फक्त तुझे शब्द.... "सोनू...."

मी अधीर, " बोल, विशू... काय झालं? पटकन सांग..... जीव कानात अडकलाय...."
तू म्हणालास "आई ने नकार दिलाय, बाबांपर्यंत गेलीच नाही गोष्ट"
"तुझ्या आईने नकार दिला? अरे पण का? कारण काय? त्यांना तर आवडते मी! "
"आपण दूरचे का असेनात पण नात्यात पडतो, पुढे जाऊन complications येतात, असा तिचं म्हणणं"
शांतता...... दोघेही निशब्द.... मला आठवत नाही, माझी नक्की अवस्था काय होती ते.... पण मन घट्ट करून विचारलं,

"तुझं काय? तू काय ठरवलस"

कापत गेले तुझे शब्द मला " मी आईच्या विरोधात जाणार नाहीय्ये! "

तुझ्या ह्या पाच शब्दांचा अर्थ लावायला कित्ती तरी वेळ लागला मला....

अरे, काय, काय घडलं हे सगळं..... तू उठलास काय, घरी गेलास काय, लग्नाची तयारी दाखलीस काय.... अन नकारही दिलास !.....

पुरत्या चोवीस तासात सारं संपलं?
सगळंच संपलं...मला घेऊन!!
.
.
.

समीरच्या हाकेने तंद्रीतून जागी झाले "निशा, अगं काय हे, अर्धाच चहा प्यायलीस..... आणि असल्या मस्त सायंकाळी अशी उदास का बसली आहेस... माझे मित्र येतच असतील ... snakcs ची तयारी कर पटापट!"

स्वतःला रेटत उठले ..... तयारीला लागले.... पण जागा बदलली म्हणून विचार पाठलाग सोडतात?
मी कधी तुला स्पष्टीकरण मागितलं नाही.... तुझ्यावर माझं प्रेमही लादलं नाही ...... तुझंसुद्धा लग्न झालं म्हणे, मागच्याच महिन्यात!

कळतं इतकंच की ,गणितं चुकतात पण आयुष्य थांबत नाही, विशू...... आपण जगताना कोडगे होत जातो......काहीही, अगदी काहीही झालं तरी "जगणं" अखंडपणे चालूच असतं... विविध कारणे सांगून आपण जगतच असतो.....

किंबहुना,तीच आपली गरज असते!

-बागेश्री देशमुख

(देशोन्नती वृत्तपत्रात पूर्वप्रकाशित...)

गुलमोहर: 

बागेश्री मस्त लिहीलंयस!!!

जाजू समीर कथानायिकेचा नवरा! तिचं विशूशी लग्न नाही झालं!

solid ahe...

सगळ्यांचे मनापासून आभार...
वर्षू निल- माझं नाव तुम्हाला आवडलं हे वाचुन मस्त वाटलं!!
dreamgirl- जाजू च्या शंकेचे निरसन केल्याबद्दल आभार Happy
एकवाचक-अमित,अनु३, सुरेखा,जाजू, reshmasandeep: प्रतिक्रियेबद्दल आभार!!
vinayakparanjpe: thanks a lot for your compliments Happy

बागेश्री ...!! मस्त..!! चोविस तास..!! इतके क्षणभंगुर..!!
लिहित रहा मनं रिझवित रहा..!!

--------
व्याकुळता त्या अथांग सागरासारखी..!! अन ओढ त्या डोक्यावरच्या आभाळासारखी कधीही न संपणारी..!!

कळतं इतकंच की ,गणितं चुकतात पण आयुष्य थांबत नाही, विशू...... आपण जगताना कोडगे होत जातो......काहीही, अगदी काहीही झालं तरी "जगणं" अखंडपणे चालूच असतं... ......................... खरं आहे, छान लेखन केलय....., पुलेशु smileyvault-cute-big-smiley-animated-023.gif

Pages