गोष्ट अल्केची -डायरीतील नोंदी,त्याही जशा हाताशी आल्या तश्या -भाग तीन

Submitted by किंकर on 16 February, 2011 - 22:33

ठिकाण ऑफिस मार्च १९८५ -मला आठवतेय सोमवार होता. नवीन आठवड्याची सुरवात,थोड्या तापलेल्या वातावरणातच झाली. कारण दोन दिवसात अर्ज मागवून,सर्व पदवीधर स्टाफ करिता परीक्षा घेवून, बढतीची संधी देण्याचे ऑफिसने नक्की केल्याची सूचना लेखी आली होती. आमचा खडूस साहेब स्वतः बाहेर येवून,त्यांनी मला केबिन मध्ये बोलावले. आणि"हे पहा, धारवाडकर तुम्ही बी.कॉम.आहात मला तुमचा अर्ज पाहिजे". मला आता सरावाने माहित झाले होते कि, बोलताना हा साहेब अहो,जाहो करू लागला कि समजायचे कि ते एच.ओ.च्या वतीने बोलत आहे. मला काय,नोकरी महत्वाची म्हणून "हो"म्हणालो.अर्ज तिथेच भरून दिला.अर्ज घेत साहेब प्रसन्न चेहऱ्याने धन्यवाद! म्हणाले.आणि बघता बघता दिवस पार पडला.
ठिकाण घर मार्च १९८५ शुक्रवार दुपार-आज कॉलेज मध्ये जावून,फॉर्म आणायचा होता, म्हणून आर्धा दिवस सुट्टी घेवून, घरी आलो होतो. कॉलेजचे काम संपवून, घरी येतोय तोपर्यंत घरी फोन,तोही थेट खडूस साहेबाचा.मी म्हटले काय झाले कोण जाणे. तर अगदी मधाळ स्वरात," अहो धारवाडकर सोमवारी सकाळी थेट एच.ओ.ला जा तिथे कोणास ओळख देवू नका, पण तुम्हाला सांगतो. मागील आठवड्यात तुम्ही अर्ज दिलात, त्यानंतर तुमची व इतर जवळ जवळ सत्तर स्टाफची परीक्षा झाली. त्यातून, सोळा जण निवडले आहेत आणि पहिला दहात तुम्ही आहात.आता तुमची बढती नक्की झाली. अभिनंदन!" आमचा साहेब प्रथमच गोड आवाजात बोलत होता. मी त्यांना THANKS! म्हणालो. आणि फोन ठेवला.
ठिकाण एच.ओ. बोर्ड रूम सोमवार मार्च १९८५,वेळ सकाळी ८.३० -मला चांगलेच आठवतेय त्या दिवशी मिटिंग अगदी वेळेवर सुरु झाली.ऑफिसचे मुख्य साहेब थोडेसे तणावातच होते. प्रथम आम्हा उपस्थित सोळा जणांचे अभिनंदन केले. मग एका अवघड परिस्थितीत हि प्रमोशन ऑफिस देत आहे , तुमच्यावर खूप जबाबदारी आहे, असे सांगत नवीन कामाची माहिती दिली. मग असे सांगितले कि प्रत्येकाचा अनुभव आणि टेस्ट मधील गुणवत्ता यानुसार तुमच्या पोस्ट नक्की केलेल्या आहेत. मी इथेच तुम्हाला प्रमोशन आणि ट्रान्स्फर ओर्देर देणार आहे. त्या स्वीकारून थेट नवीन ठिकाणी कामास सुरवात करा. यावर विचार करायला १५ मिनिटांचा वेळ देतो. त्यानंतर प्रमोशन घ्या किंवा यापुढे माझा विचार कोणत्याही बढतीसाठी करू नये असे लिहून देवून बोर्ड रूम सोडा. प्रश्न बढती नाकारण्याचा नसल्याने मला तन नव्हता. त्यामुळे बाकी चेहरे पाहत मी निवांत बसलो. पंधरा मिनिटात साहेब परत जागेवर आले. सर्वानीच त्यांचे विनंतीस मन देत नवीन आव्हान स्वीकारले. माझे जुने ऑफिस सुटले. मी नवीन ऑफिस कडे परस्पर रवाना झालो.
ठिकाण घरीच महिना – 1 एप्रिल १९८५ वेळ मध्यरात्र -बघता बघता एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला. एच. ओ. कडे सांगून करून घेतलेल्या या बदलीने नक्की काय साधले. खडूस बॉस, जोशी बुवांसारखा सहकारी या खेरीज काय पदरात पडले. एक चांगली मैत्रीण मिळाली आता अलका बरोबर नवीन स्वप्ने रंगवू असे वाटत असतानाच, मागील वर्षी विद्यापीठात गेलो,तेंव्हा तीने प्रांजळपणे पहिल्या पुरुषस्पर्शाची गोष्ट सांगितली,आणि त्या नंतर तिचे वागणेच बदलले, पूर्वीचा मोकळेपणा राहिला नाही. अर्थात तीही हल्ली सुन्नच असते.एक झालेय आमच्यातील दुरावा जोशी बुवा अगदी एन्जॉय करतात. त्यांचे अलका अलका खूपच वाढले आहे. पण आता मी सोक्ष मोक्ष लावायचा असे नक्की केले आहे. आणि मनाचा हिय्या करून मी आज अलकाला पत्र लिहायला घेतलय.
प्रिय अलका,असे लिहिले आणि पुन्हा पान फाडून टाकले कोणत्या अधिकारात मी तिला प्रिय म्हणणार. मग मनात असे ठरवले कि काही मायना नकोच मन मोकळे करणारे मत लिहून तिला द्यावे आणि निर्णयाची वाट पहावी.आणि माझ्या पहिल्या प्रेम पत्रास सुरवात झाली.
प्रिय ........गेले दीड वर्षाहून अधिक काळ आपण एकमेकांना ओळखतो आहोत. खरे तर फक्त पाहतो आहोत असेच म्हटलेले बरे नाही का? कारण ओळखत असतो तर गेल्या चार सहा महिन्यातील दुरावा वाढला नसता. ऑफिस मधील मनाचा कोंडमारा मोकळा करण्याचे निमित्त, मग मला सहजच घरी बोलावणे त्यानंतर आपले देवळातील भेटणे,गुरुजींचा त्या वेळी हवाहवासा वाटलेला गैरसमज, मग पुणे विद्यापीठ आणि तेथील प्रसंग सगळेच कसे वेगाने घडून गेले. खरे तर कसलाच आड पडदा न ठेवता तू तुझा पहिला अनुभव मांडलास, मी तेंव्हाच," ठीक आहे मी हात हातात घेण्याने तुला तो प्रसंग का आठवला ? माझ्या स्पर्शाने तुला,झाडून साऱ्या पुरुष जातीची शिसारी आली का? अंतर्मनाने माझ्या स्पर्शातून तुझ्या दडलेल्या सुखद स्मृतींना उजाळा मिळाला." असे विचारायला हवे होते का ? असे आत्ता राहून राहून वाटतेय. पण कदाचित तेंव्हा माझ्यातील मित्र नाही तर फक्त पुरुषच सावध झाला का ? खरे सांगतो काहीच कळत नाही.कधी वाटते कि तूझ्यासारखी मोहक,देखणी स्त्री हि पत्नी व्हावी. तर कधी मन म्हणते,पण तिने त्या नंतर नोकरी सोडली पाहिजे निदान या कार्यालयतील. कारण जेथे जोशी बुवांसारखे लंपट नजरेचे लोक आहेत, तिथे माझी पत्नी असता कामा नये. अरे हे मी काय लिहून बसलो. तू माझ्याशी लग्न करशील का ? हा तुझ्या माझ्या जीवन मरणाचा प्रश्न मी असा उलगडवा. पण काय करणार वेगळ्या अर्थाने देवा ब्राह्मणांच्या साक्षीने जेव्हा तू मला माझा निर्णय देवळात विचारलास तेंव्हा मी वेळ मागितला. त्यानंतर गेल्या वर्ष दीड वर्षात तू इतकी दूर झालीस कि देवळातील डोक्यावर पदर घेवून डोळे मिटून उभी असलेली अलका कुठे हरवली आहे तेच समजत नाही. त्यामुळे मी आज या घडीला तुझ्यासाठी इतकेच म्हणेन कि हे अलका मला तू हवी आहेस. मागे काय झाले ते मी नाही विचारणार, कॉलेजात असताना तू मित्रांबरोबर सिनेमा पाहिलास तेही तू सांगीतलेस, अभ्यासाच्या वहीतून तुला प्रेम पत्र आले होते तेही तू सांगीतलेस, सलाम तुझ्या प्रामाणिकपणास. मला पूर्वी कधी अशी संधी मिळाली असती तर तर त्याचा लाभ घेवून नंतर मी झालो असतो का,तुझ्या सारखा धाडसी पुर्वायुष्याबद्दल बोलायला ?. ह्या स्वतःस विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्या जवळ आज तरी नाही.तर हे पत्र मिळताच वाच विचार कर आणि मला कळव. मी वाट पाहीन. जसे तू देवळात म्हणालीस तसेच सांगतो, मी वाट पाहीन. आणि हो एक सांगतो पत्र १ एप्रिल रोजी लिहिले असले तरी हे एप्रिल फुल नाही.(क्रमशः)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आणि हो एक सांगतो पत्र १ एप्रिल रोजी लिहिले असले तरी हे एप्रिल फुल नाही>>>>> हे वाक्य खुप छान वाटले.............काहि असो तुमची कथा मात्र आवडली. फार सु॑दर लिहता असेच लिहित रहा.