'कळी' खुलली !...

Submitted by झुलेलाल on 13 February, 2011 - 21:05

सकाळची उन्हं भंवतालच्या हिरवाईवर पसरली, तरी उमलूउमलू म्हणत गुलाबाच्या लालसर फांद्यांच्या टोकांवर झुलत राहिलेल्या कळ्या काल पाकळ्या मुडपून गुपचूप बसूनच होत्या... `फुलण्या'चं सार्थक व्हावं, म्हणून हुरहूरत होत्या... कळीत दडलेली पाकळीपाकळी मोहरली होती, पुरतं उमलून आपल्या देखण्या तारुण्याची भुरळ जगाला घालण्यासाठी उतावळी होती... त्यातच, तो काटेरी गुलाब, कळीआड दडलेल्या प्रत्येक पाकळीला दटावत होता.
... ‘एक दिवस थांबा... आजचा सूर्य मावळू द्या, उद्याचा सूर्य उगवेल, त्याची किरणं सोनेरी नसतील.. त्या किरणांचा स्पर्श झाला, की तुमची `कळी' आपोआपच खुलेल, पाकळीपाकळी मोहरून उठेल... कारण, उद्याची किरणं गुलाबी असतील.. सारा दिवसच गुलाबी असेल. उद्याच्या वार्‍यांना प्रेमाचा गुलाबी गंध असेल, या गंधाने आसमंत धुंद असेल... कळीच्या पाकळीपाकळीवर आपल्या हळुवार झुळुकेने हा वारा गंधाचा शिडकावा करेल आणि पाकळ्यांचे भान हरपेल.
आपण जन्माला येतो, उमलतो आणि फुलतो, तेच मुळी झोकून देण्यासाठी!... उमलल्यानंतर कोमेजून जाईपर्यंतचं आपलं जगणं झाडाच्या काट्यांशी खेळत संपून जावं, असं कुठे आपलं स्वप्न असतं? ...भुरळल्या नजरेनं कुणीतरी पाहावं, नाजूक हातांनी हळुवार कुरवाळावं, आणि प्रेमभरल्या स्पर्शानं आपल्याला खुडावं... आपल्या सौंदर्याशी, रंगाशी स्पर्धा करणार्‍या मुसमुसल्या हातांमध्ये सोपवावं... आणि आपण, त्या क्षणी परस्परांच्या डोळ्यात उमटणार्‍या हळुवार, स्वर्गीय प्रेमभावनांचे साक्षीदार होताना देठाशी होणारी ठुसठुस विसरून समरसून त्या क्षणाचं सौंदर्य खुलवावं... मग आपल्या फुलण्याचं सार्थक झालं...
... कारण, असं झोकून देण्याचं भाग्य फक्त आपल्याच नशीबी असतं. या झोकून देण्यालाच, प्रेम म्हणत असतील, तर आपण तर त्या प्रेमाचं खरंखुरं प्रतीक आहोत'...
... ‘फुलण्या'साठी कधी तो ‘उद्या' उजाडतो, या प्रतीक्षेत पेंगुळलेली कळी काटेरी गुलाबातून उमटणारे ते शब्द कानात साठवत होती...
... आणि त्या शब्दांनी कळीतली एक पाकळी मोहरली... हा असा काटेरी, तरी इतका हळुवार?... हा तर आपल्याला ‘फुलासारखं' जपतोय... आपण कळीत ‘साठलो' तेव्हापासूनचा हा आपला अनुभव... त्या दिवशी, आपण पहिल्यांदाच काट्यांची नजर चुकवूनच कळीतून बाहेर डोकावलो... ती पहाट अनुभवली, सूर्याची ती कोवळी किरणंही अंगावर झेलली, तेव्हा ‘मोहरलेपणा'ची पहिली प्रचीती घेतलीच होती... आज या काट्यातून पाझरणारं हे हळुवारपण पुन्हा त्याचाच अनुभव देतंय... त्या दिवशी आपलं पहिलं गुलाबी रूप या काटेरी फांदीनं न्याहाळलं, तेव्हा त्याच्या डोळ्यात साठलेलं प्रेम आपण अनुभवलंच होतं.
आता उद्याच उमलायचं... उद्याची गुलाबी किरणं, फक्त एकदाच अनुभवायची...
झोकूनच द्यायचं, तर तो क्षणही असा, गुलाबी, मोहरलेला आणि स्वर्गीय असलाच पाहिजे... म्हणजे त्या उमलण्यालाही अर्थ असेल...
... पेंगुळलेपण विसरून पाकळीनं शेजारच्या पाकळीच्या कानात हे गुपित सांगितलं, आणि उमलूउमलू पाहणारी शेजारची पाकळीही पुन्हा कळीत मुडपून गेली... उद्याच उमलायचं ठरवून !
काल गुलाब फुललाच नाही... काटेरी फांदीफांदीवर सगळ्याच कळ्या होत्या...
त्यांना उमलायचं आहे, पण त्यांना `उद्या'ची आस आहे !
... आज गुलाब फुलला आहे !!

http://zulelal.blogspot.com
(लोकमत, मुंबई. १४ फेब्रु. २०११)
----------------------

गुलमोहर: