ते प्रेमाचे दिवस

Submitted by राजेंद्र क्षत्रिय on 12 February, 2011 - 08:17

दुपारीच कपडे इस्त्री करून आणले होते. दाढी करून आंघोळ आटोपली. कपडे बदलले. जाताना बाईकमधे पेट्रोल टाकून पुढे जायचे मनाला पुन्हा एकदा बजावले. पायर्‍या उतरून खाली आलो. होस्टेलमधील सर्व मुले आज रापचीक आवरून बाहेर पडण्याच्या बेतात होती. बाईक स्वच्छ केली आणि भरधाव निघालो. कधी नव्हे तो आज मी खूप खूष होतो. मन आनंदाने आकाशात भरार्‍या मारत होते. कधी एकदा सुलूला भेटेन असं झालं होतं. गेली कित्येक दिवस आणि रात्री याच दिवसाची वाट बघण्यात गेले होते. आणि आज तो दिवस आला होता. तो खास दिवस. सुलूला सर्व काही सांगण्याचा. मन मोकळं करण्याचा. मॅक-डी समोरच्या बस स्टॉपजवळ ती माझी वाट पाहणार होती. तेथून आम्ही एम्प्रेस गार्डनमधे जाणार होतो. तेथे एखाद्या सुंदर अशा गुलाबाच्या झाडाजवळ सुलूला उभे करणार होतो. आणि मी गुड्घ्यावर बसून तिचा कोमल हात हातात घेत म्हणणार होतो. "सुलू, सुलू आय लव्ह यू ऽ ऽ गं. मला तू खूप आवडतेस. माझ्याशी लग्न करशील ?"

डाव्या बाजुला नेहमीच्या पेट्रोलपंपावर बाईकमधे पेट्रोल भरून निघालो तर चौकात रेड सिग्नल पडला, पुन्हा थांबलो. जशी संध्याकाळ होऊ लागली तशी ट्रॅफीकही वाढू लागली. पोहोचेपर्यंत सहा-सात सिग्नल्स लागणार होते. मी ग्रीन सिग्नलची वाट पाहू लागलो सिग्नल पडला की, भरधाव निघणार होतो. आठवणीही अशाच असतात आपल्या, या ट्रॅफीकसारख्या. थांबवल्या की साचून राहतात. थोडी वाट मोकळी केली की, भरधाव वेगाने गर्दी करतात मनांत.

मला आठवतं, इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षी, कॉलेजच्या पहिल्याच दिवशी ती वर्गात आली. गोरीपान, निळसर डोळे, धारदार नाक, सोज्वळ चेहरा, मध्यम उंची, आणि आकर्षक बांध्याची सुलू. केसांचा स्टेपकट केलेला, निळ्या जिन्सवर पांढरा शुभ्र टॉप. तिला पाहता क्षणीच माझी विकेट गेली होती. ’लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’ असं काहीसं झालं होतं. पुढे चार-पाच दिवसांत मुलामुलींच्या आपसांत ओळखी झाल्या. माझी ही सुलूशी ओळख झाली. पुढे चांगली मैत्री झाली. मला ती आवडू लागली. आणि...मी तिच्या प्रेमात पडलो. तिला बघितलं की, छातीत धड्धड्‌ व्हायची, ओठ कोरडे पडायचे. ती दिसली नाही की बेचैन व्हायचो. कॉलेजमधे अभ्यासाच्या निमित्ताने, कधी लायब्ररीमधे खूपदा तिची भेट व्हायची, पण खास असं बोलणं कधी व्हायचं नाही. अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही विषय निघाला की, तिचा चेहरा असा काही गंभीर व्हायचा की, पुढे काही बोलायला धीरच व्हायचा नाही.

थर्ड ईअरला असताना कॉलेजची ट्रिप गेली होती गोव्याला. तेव्हा ती आमच्या ग्रुपमधेच होती. पोहोचलो त्याच दिवशी संध्याकाळी बीचवर सनसेट बघायला गेलो होतो. किनार्‍यावर सर्वत्र मऊशार वाळू पसरलेली होती आणि समोर अथांग समुद्र. शांत. धीरगंभीर. दूरदूरपर्यंत, नजर पोहोचेल तेथपर्यंत समुद्राच्या निळ्याशार अवखळ लाटा, क्षितिजाशी जणू शिवाशिवीचा खेळ खेळत होत्या. क्षणांत क्षितिजावर आदळून माघारी किनार्‍यावर येत होत्या. त्यांचा तो खेळ अखंड सुरू होता. वरती निरभ्र आकाशात असंख्य पक्षांचे थवे स्वच्छंद विहरत होते. आणि दिवसभर सार्‍या सॄष्टीला आपल्या सोनेरी किरणांचे अमृत पाजून, थकून-भागून सुर्यनारायण मावळतीला जात होते. मी सुलूकडे पाहिले. तिने फिकट निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिच्या गोर्‍या अंगावर तो खूपच खुलून दिसत होता. पश्चिमेकडून येणारी मावळत्या सुर्याची सोनेरी किरणे तिच्या चेहर्‍यावरील तेजात आणखीच भर टाकत होते. क्षणभर मी भान हरपून तिच्याकडे बघतच राहिलो. इतकी सुंदर ती कधीच दिसली नव्हती. मी पुढे होऊन तिचा हात हातात घेतला, तिने क्षणभर माझ्या डोळ्यांत बघितलं आणि आम्ही अनवाणी पावलांनी सुर्याकडे बघत समुद्राच्या दिशेने चालू लागलो. पायांना खळाळत्या पाण्याचा सुखद स्पर्श झाला तेव्हा थांबलो. एव्हाना सुर्य क्षितिजाला भिडला होता. सुर्याच्या प्रतिबिंबामुळे निळ्या फेसाळत्या लाटांनी आता नारिंगी, लाल रंगाची चादर पांघरली होती. आकाशात सर्वत्र लालिमा पसरला होता. निसर्गाच्या त्या अतीव सौंदर्याकडे बघत मी म्हटलं, "सुलू, मला तुझ्याशी काही बोलायचंय." थोडा वेळ तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून हळूच मान वळवून तिच्याकडे बघितले. ती एखाद्या शांत, निरागस बालकासारखी निसर्गाचा तो अद्‌भूत प्रणय बघण्यात रममाण झाली होती. कितीतरी वेळ मी कौतुकाने तिच्याकडे तसाच बघत राहिलो. प्रेम ही अव्यक्त अनुभूती असते. ती शब्दांनी व्यक्त होतच नसते कधी. आणि तशी गरजही नसते. कितीतरी वेळ आम्ही त्या मंत्रमुग्ध अवस्थेत तसेच उभे होतो. सूर्य क्षितीजाच्या कुशीत लुप्त होऊन काळोख दाटू लागला तेव्हा माघारी फिरलो होतो.

मी सिग्नलवर काऊंट डाऊन मोजत होतो. पंचवीस.... चोवीस... तेवीस..., उजव्या बाजुला एक स्कोडा उभी होती, ती बहुधा राईटला जाणार होती. सहज डाव्या बाजुला उभ्या असलेल्या रिक्षाकडे लक्ष गेले आणि मी हादरलोच. नकळत पुट्पूटलो, "आई?... पण कसं शक्य आहे???".
डाव्या बाजूकडून रस्ता क्रॉस करण्यासाठी त्या बाई घाईघाईने रिक्षाच्या पाठीमागून उजवीकडेच येताना दिसल्या. हुबेहूब ’माझी आई’ जशी. तसाच गोरा रंग. तशीच शरीरयष्ठी. तशीच चेहर्‍याची ठेवण, डोळ्यांवरचा चष्मा आणि नेसलेली साडीही तशीच. हो, आईकडेही अशाच रंगाची अशाच डिझाईनची साडी होती. डाव्या हातात एक पिशवी, उजव्या हातात छोटी पर्स. पण ती आई नव्हती. आईला एखादी बहीण असती तर कदाचित ती अगदी अशीच दिसली असती. त्या माझ्या पुढून घाईने उजवीकडे गेल्या, मी सिग्नलकडे पाहत होतो. तीन... दोन... एक.. आणि मी निघणार तोच धप्प्‌ ऽ कन्‌ आवाज झाला आणि पाठोपाठ एक किंकाळी ऐकू आली. मी कच्च्‌कन्‌ ब्रेक दाबून उजवीकडे बघितले तर राईट टर्न मारताना स्कोडाने त्या बाईंना जोराचा धक्का दिला होता. सगळ्या गाड्या जागीच थबकल्या, सर्व आवाज थांबले. गाड्यांमधील लोक खिडक्यांमधून डोकावू लागले. क्षणभर काय करावे ते सुचेना. आता काही तरी भीषण, भयानक बघावं लागणार या कल्पनेने मी नखशिखांत हादरलो. बाईक स्टँडला लावून तिकडे धावलो. त्या मघाच्याच बाई स्कोडाच्या पुढे बेशुध्द्‌ होऊन काही अंतरावर अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यांच्या हातातील पिशवी फेकली जाऊन त्यातील सामान आजुबाजुला विखूरलं गेलं होतं. त्यांचा चष्मा बाजुलाच पडला होता. चार-पाच रिक्षावाले आपल्या रिक्षा तशाच उभ्या करून धावत आले. चौकातील ट्रॅफीक पोलिस आणि आणखीही काही माणसे गोळा झाली. एका बसमधून दोन-तीन महिला उतरल्या व त्या बाईंना हलवून शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करू लागल्या. थोड्या प्रयत्नांनी त्या शुध्दीवर आल्या. बाईंच्या हाताला खरचटले होते आणि सर्व शरीराला मुकामार लागला होता. दोन-तीन जणांनी त्यांची पिशवी, चष्मा व इतर सामान गोळा करून त्यांच्याकडे दिले. स्कोडावाला त्यांना दवाखान्यात नेवून औषधोपचार करणार होता. ते ऐकून मनाला थोडं हलकं वाटलं.

सर्व लोक पांगले तसा मी बाईकला कीक्‌ मारून निघालो. पण काही केल्या त्या बाईंचा चेहरा डोळ्यांपुढून जात नव्हता. नकळत आईच्या आठवणीने मन सुन्न झाले. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. आई ठीक तर असेल ना? तिच्यावर तर असा काही प्रसंग ओढवला नसेल ना? तिची तब्येत चांगली असेल ना? तिला फोन करून तिची विचारपूस करावी का? अशा अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवलं. किती काळजी घ्यायची आई माझी. दहावीत असताना ऐन परीक्षेच्या वेळी मी तापाने फणफणलो. तेव्हा रात्रभर माझ्या उशाशी बसून होती आई. बारावीला मी पहिल्या पाच मधे आलो तर सगळ्यात जास्त आनंद झाला तो तिला. काय कौतूक होतं तिला माझं. होस्टेलवर राहायला येण्याच्या आदल्या रात्री मी गाढ झोपलो होतो पण कितीतरी वेळ आई माझ्या उशाशी बसून कौतुकाने केसांमधून बोटे फिरवित होती. होस्टेलवर मला सोडवायला आई आणि बाबा दोघेही आले होते. "मेसचं जेवण आवडलं नाही तर खुशाल हॉटेलमधे जाऊन आवडेल ते खात जा. पैशांची काळजी करू नकोस. तब्येतीची काळजी घे. निष्काळजीपणा करू नकोस. लवकर उठत जा. लवकर झोपत जा." अशा कितीतरी सूचना ती करत होती. बाबांच्या नकळत तिने साठवलेल्या पैशांमधून मला हजारच्या तीन नोटा देताना म्हणाली, "काळजी घे बरं बाळा, पहिल्यांदाच माझ्यापासून दूर राहतोयस, सोडून जायला जीव होत नाही". आणि तिचा चेहरा रडवेला झाला होता.

माझा शिक्षणाचा खर्च, बहिणीचा शाळेचा खर्च नाही म्हटलं तरी बाबांचं आर्थिक बजेट कोलमडलं होतं. अनेक आवश्यक गोष्टींनाही फाटा देऊन ते आमच्या शैक्षणिक गरजा पुरवत होते. माझं शिक्षण पुर्ण झाल्यावरच त्यांच्यावरचा माझा भार कमी होणार होता. अशा अनेक विचारांनी मनात काहूर माजवलं आणि नकळत बाईकचा स्पीड कमी-कमी होत होता.

आता माझा मलाच राग येऊ लागला. किती स्वार्थी होतो मी. मी फक्त माझ्याच सुखाचा विचार करत होतो. माझ्यासाठी माझ्या आईने, बाबांनी खालेल्या खस्तांचा मला इतक्यातच कसा विसर पडला? माझा घसा दाटून आला. डोळे पाणवले. मी स्वतःशीच बोलू लागलो. काय बोलणार आहेस आज तू सुलूशी? अजून शिक्षण पुर्ण करायचंय, जॉब शोधायचाय. शिक्षणाकरीता घेतलेलं लोन फेडायचंय. आई, बाबा आणि बहिणीची जबाबदारी तुझ्यावर आहे. लग्नाचा विचार इतक्यात तुझ्या मनात आलाच कसा? तू स्वतःच अजून परावलंबी आहेस चिमणीच्या पिलासारखा, अजून तुझ्या पंखांमधे बळं यायचंय आकाशात उंच उडायला. थांब जरा.

मी भानावर आलो, नको... आत्ताच एवढी घाई नको, एकदा फायनल एक्झॅम्‌ होऊ द्यावी. मग सावकाश बोलू सुलूशी. मॅक-डी जवळचा बसस्टॉप समोर दिसत होता. सुलू केव्हापासून माझी वाट पाहत तेथे उभी होती. मी थोडी अलीकडेच बाईक थांबवली. खिशातून मोबाईल काढला. सुलूचे सोळा मिस्ड्‌ कॉल्स्‌ पडले होते. कॉल लावला आणि तिला जराही बोलू न देता म्हटलं, " सुलू, अगं.. मी बोलतोय, ए... ऐक ना.... मला जरा आज यायला जमत नाहीये. मी तुला नंतर फोन करतो...सॉरी...." मी मोबाईल बंद करून यू टर्न मारला अन्‌ तिला काय वाटेल याचा विचार न करता तडक होस्टेलच्या दिशेने परत निघालो.

मी होस्टेलपर्यंत कसा पोहोचलो ते माझे मलाच समजले नाही. होस्टेलवर सगळीकडे सामसूम होती. मी धड्‌धड्‌ पायर्‍या चढून रूममधे गेलो आणि माझा बांध फुटला. माझं अवसान गळालं. मन भरून आलं. माझा कोणावरच राग नव्हता, कोणावरही रूसवा नव्हता, मला काहीच नको होतं, माझ्या जवळही कोणी नको होतं, अगदी सुलूही. आता मला फक्त मनसोक्त रडायचं होतं, ओक्साबोक्शी. मी धाड्‌कन स्वतःला कॉटवर झोकून दिले आणि लहान मुलासारखा, ढसाढसा रडू लागलो. किती तरी वेळ मी स्फुंदून स्फुंदून रडत होतो. मी भानावर आलो तेव्हा कोणीतरी माझ्या केसांमधून बोटे फिरवत मला थोपटत होतं. मी हात चाचपून पाहिला, तो हात सुलूचा होता. मी परत येताना तिने मला ओझरतं बघितलं होतं. काही तरी बिनसलंय हे तिच्या लक्षात आलं आणि रिक्षा करून ती तडक होस्टेलवर आली होती.
मी हळूच लहान बाळासारखं तिच्या मांडीवर डोकं ठेऊन तिच्या कुशीत शिरलो. ती आईच्या मायेने मला थोपटत राहिली. स्त्री ही क्षणांची सोबतीण अन्‌ अनंत काळची माता असते. खरंच.

गुलमोहर: 

मस्त

मी हळूच लहान बाळासारखं तिच्या मांडीवर डोकं ठेऊन तिच्या कुशीत शिरलो. ती आईच्या मायेने मला थोपटत राहिली. स्त्री ही क्षणांची सोबतीण अन्‌ अनंत काळची माता असते. खरंच.>>> ग्रेट..! Happy

स्त्री ही क्षणांची सोबतीण अन्‌ अनंत काळची माता असते. खरंच.>>> हो हे ख॑रच आहे.! स्त्री च्या मनात काय आहे हे खुप कमी जण जाणतात. तिच्या मनाची तळमळ कोणाला कळत नाही आणि कोणी जाणुन घ्यायचा प्रयत्न सुध्दा करत नाही. पण ती सगळया॑ना मायेने साभा॑ळते.

तुमची कथा फारच छान आहे. मनाला भावली.

मी हळूच लहान बाळासारखं तिच्या मांडीवर डोकं ठेऊन तिच्या कुशीत शिरलो. ती आईच्या मायेने मला थोपटत राहिली. स्त्री ही क्षणांची सोबतीण अन्‌ अनंत काळची माता असते.>> खूप आवडली!!

छान आहे कथा....... स्त्रीला वेळप्रसंगानुसार अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात..... हे एका पुरूषाने जाणले याचा आनंद वाटला......

आवडली कथा Happy

स्त्रीला वेळप्रसंगानुसार अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात..... हे एका पुरूषाने जाणले याचा आनंद वाटला......<< अनुमोदन Happy

पु ले शु Happy

आवडली Happy

Pages