शाळेचे दिवस

Submitted by तेज on 10 February, 2011 - 02:20

नुकतंच एका वर्तमानपत्रात पन्नास वर्षांपूर्वीच्या मुंबईतलं वर्णन वाचलं आणि एकदम आठवली माझी शाळा, शाळेभोवतालचा परिसर आणि तेव्हाचे ते दिवस. तो सगळा काळ डोळ्यांसमोर उभा राहिला. माहीमची ‘ लोकमान्य विद्यामंदिर ‘ ही माझी शाळा.
आमच्या शाळेत जायची वाट एका मळ्यातून जात असे. दोन्ही बाजूला हिरवागार मळा अन त्यामधून जाणारी अरुंद पायवाट. मळ्यामधे विहीर, कधीकधी विहीरीवरच्या मोटेचा ऐकू येणारा ‘ कुई कुई ‘ आवाज. अधनंमधनं माडाची आकाशात गेलेली झाडं. पायवाटेच्या दोन्ही बाजूंना घाणेरीच्या झुडूपाचं कुंपण आणि त्यामधून जातांना येणारा घाणेरीच्या रंगीबेरंगी फ़ुलांचा तो वास. या वाटेनं जायला आम्हाला खरं म्हणजे आवडायचं. पण ही वाट थोडी लांबून जायची.
शाळेत जायला दुसरीही एक वाट होती. उशीर झालेला असला की आम्ही या ‘ शॉर्ट कट ‘ वाटेनं जायचो. ही वाट एका सिंधी लोकांच्या वस्तीतून जात असे. सिंधी लोकांची बैठी घरं. घरापुढे एखादी खाट. कधी कोणी खाटेवर बसलेलं असे. कधी लहान मुलं अंगणात खेळत असत. डोक्यावरून ओढणी घेतलेल्या, घोळदार सलवार आणि कमीज घातलेल्या बायकांची लगबग चालू असायची. आम्हाला त्या सर्वांची आणि त्यांना आमची सवय झाली होती. वस्तीमधे एके ठिकाणी त्यांचा ‘ सांझा चूल्हा ‘ होता. दुपारी शाळेतून घरी जातांना तो पेटलेला असायचा. एखादी बाई हातावर जाड रोटी थापून ती त्या चूल्ह्याच्या भिंतीला लावत असायची किंवा आधी लावलेली रोटी काढत असायची.
वस्तीमधे एखादं बाळ जन्माला आल्याचा सुगावा लागायची खोटी, की तृतीयपंथी त्या घरासमोर जोरजोरात टाळ्या वाजवत जमा व्हायचे. भसाड्या आवाजात गात, फ़ेर धरून नाचायचे. मला तर वाटतं की सिंधी लोक त्यांना मुद्दाम बोलावत असावेत. तृतीयपंथींचा आशीर्वाद नवजात बाळाला मिळणं हे त्या लोकांच्यात शुभ समजलं जायचं अशी माझी कल्पना आहे.
ते काहीही असलं तरी आम्ही मात्र तृतीयपंथीना जाम घाबरायचॊ. शनिवार हा त्यांचा वार होता. शनिवारी आमची शाळा अर्धा दिवस असायची. त्या दिवशी शाळेतून घरी येतांना आम्ही रमतगमत यायचो. सोसायटीच्या बाहेरच एक गोळ्या-चॉकलेटचं टपरीवजा दुकान होतं. तिथल्या गुलाबी रंगाच्या काजूवड्या मस्त लागायच्या. त्या दुकानासमोर काजूवड्या घ्यायला आम्ही थांबलो की कधीतरी तृतीयपंथी लोक टाळ्या पिटत यायचे आणि दुकानदाराकडे पैसे मागायचे. त्यांची चाहूल लागली की आम्ही वड्या न घेताच धूम पळत सुटायचो. एकदा म्हणे आमची एक मैत्रिण तिथे उभी असतांना त्यांच्यातल्या एकाने तिचे डोळे झाकले होते आणि ‘ काय बेबी ‘ म्हणून तो खो खो हसला होता. ते ऐकल्यापासून आमची टरकली होती.
आमची शाळा सकाळची असायची. सकाळी ७.२० ते दुपारी १२.२० अशी शाळेची वेळ होती. आमच्या घरापासून पाचदहा मिनिटांच्या अंतरावर शाळा असल्यामुळे आमच्या सोसायटीतली मुलंमुली मधल्या सुट्टीत जेवायला घरी यायची.
मधल्या सुट्टीत घरी आलं की पोटात भूक खवळलेली असायची आणि घरात आंबेमोहोर तांदुळाच्या भाताचा वास दरवळत असायचा. बापूंच्या पानात मागचा भात कालवलेला असायचा. माझं ताट मांडलेलं असायचं. मी हातपाय धुवून बापूंसमोर जाऊन उभी रहायची आणि ‘ आ ‘ करून म्हणायची, “बापू, ‘ आ ’ !” बापू मला त्यांच्या कालवलेल्या भातातला घास भरवायचे. मग आणखी एक घास. त्यांचा कालवलेला भात मला नेहमी आवडायचा. तेवढ्यात आई माझ्या ताटात गरम पोळी वाढायची आणि कृतककोपानं बापूंना म्हणायची, “असंच लाडावून ठेवा तिला. लहान आहे का ती आता घास भरवायला?” बापू फ़क्त हसायचे आणि मला आणखी एक घास देत आईला म्हणायचे, “मला आणखी थोडा भात वाढ.” भराभरा जेवून, मधल्या सुट्टीनंतरच्या तासांची वह्यापुस्तकं घेऊन मी शाळेत पळायची.
आठवीत आल्यापासून आम्हाला शिंगं फ़ुटली होती. आम्हाला म्हणजे आमच्या सोसायटीत रहाणाऱ्या मुलामुलींना. शाळा घराजवळ असल्यामुळे आम्ही मधल्या सुट्टीत घरी येऊन, जेवून परत शाळॆत जायचो. आता मोठे झाल्यामुळे ( असं आम्हाला वाटायचं ) दप्तर न्यायला लाज वाटायची. त्यामुळे सकाळी शाळेत जातांना फ़क्त आधीच्या तासांची वह्या पुस्तकं आम्ही ऐटीत डाव्या हातात धरून शाळेत जायचो, मधल्या सुट्टीत ती पुस्तकं घरी आणायचो आणि परत जातांना सुट्टीनंतर लागणारी पुस्तकं हातात घेऊन जायचो – दप्तराला आम्ही सुट्टी दिली होती. जी मुलं लांबून शाळेत यायची त्यांना दप्तर आणण्यावाचून पर्याय नव्हता. मग आम्ही त्यांना चिडवायचो, “काय लहान मुलांसारखं दप्तर आणता?”
माझ्या भावाला आणि मला आईने दोन बैठी डेस्क आणली होती. त्याच्या उतरत्या झाकणाच्या वरच्या भागात पेन,पेन्सिल ठेवण्याकरता एक खाच केलेली होती. झाकण उचललं की आतमध्ये एक मोठा कप्पा होता. त्या कप्प्यात आम्ही आमची वह्या-पुस्तकं, कंपासपेटी, रंगपेटी, फ़ूटपट्टी इ. सामान ठेवायचो. मी माझा गृहपाठ या डेस्कवरच करत असे. ते माझं खूप आवडतं होतं.
शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की सुट्टीत काय काय करायचं याचे बेत सुरू व्हायचे. त्याकाळी बाजारात आकाशकंदिलाचा कामट्यांचा सांगाडा मिळायचा. आम्ही तो सांगाडा विकत आणायचॊ. यंदा आकाशकंदील एकाच रंगाचा करायचा की दुरंगी करायचा याची चर्चा करायचो. त्याप्रमाणे त्या रंगांचे कागद आणायचो. मापाप्रमाणे कागद कापून चिकटवायचो. रात्री बारापर्यंत जागून नक्षीदार सोनेरी कागद आणि झिरमिळ्या लावून आकाशकंदील पूर्ण करायचो. दिवाळीच्या दिवशी तो आकाशकंदील प्रकाशाने उजळून निघाला की माझा भाऊ आणि मी एकमेकांकडे अभिमानाने पहायचो.
दिवाळीच्या आधी दोन दिवस मी वाण्याकडून काव, रांगोळी आणि रंग आणायची. दारासमोरचा कोपऱ्यातला चौकोन कावेनं सारवायची. दिवाळीचे चारही दिवस वेगवेगळी, ठिपक्यांची रांगोळी काढायची. त्या रांगोळीत रंग भरायची. रांगोळी पूर्ण झाली की आईच्या हाताला धरून तिला दाराबाहेर आणून रांगोळी दाखवायची. आईने समाधानाने रांगोळीकडे पहात ‘ छान काढ्ल्येस रांगोळी ‘ असं कौतुकानं म्हटलं की कसं कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं.
एखाद्या दिवाळीला माझी पुण्याची चुलत भावंडं आमच्याकडे यायची. आम्हाला सगळ्यांना, नर्कचतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकरात लवकर आंघोळ करून, अंगणात फ़टाके उडवायला जाण्याची घाई असायची. त्याकरिता आमच्यात भांडणे सुरू व्हायची. मग आई एक युक्ती करायची. १,२,३,४ असे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या करायची. प्रत्येकाने त्यातली एक चिठ्ठी उचलायची. चिठ्ठीतल्या नंबराप्रमाणे प्रत्येकाने आंघोळ करायची. आंघोळ करतांना सर्वांनी एकेक कारिंट पायाने फ़ोडायचं. एकजण आंघोळ करत असतांना दुसऱ्याने फ़ुलबाजी पेटवून ‘ दिन दिन दिवाळी, गाईम्हशी ओवाळी, गाईम्हशी कोणाच्या, लक्षुमणाच्या ‘ असं गात त्याच्यासमोर ओवाळायची.
दिवाळीची सुट्टी कधी संपली ते कळायचंदेखील नाही. मग वेध लागायचे ते गॅदरिंगचे. नाटकांच्या, नाचाच्या तालमी सुरू व्हायच्या. जानेवारीनंतर अभ्यासाला वेग यायचा.
आमची शाळा आमच्याबरोबरच वाढत होती. शाळा नवीन असल्यामुळे प्रत्येक नवीन वर्षात एकेक यत्ता वाढवली जायची. असं करता करता मी नववी पास झाले त्यावर्षी शाळेची अकरावीची पहिली बॅच बाहेर पडली.
लंगडी, खोखो, कबड्डी, लोकनृत्य आणि वक्तृत्व यांच्या आंतरशालेय स्पर्धांमधे आमची शाळा दरवर्षी भाग घ्यायची. बक्षिसदेखील मिळवायची. एखाद्या वर्षी बक्षिस मिळाले नाही तर आमच्या मुख्याध्यापिका आम्हाला समजवायच्या की ‘ पराभवदेखील हसतमुखाने स्वीकारता आला पाहिजे. आपल्या काय चुका झाल्या याचा शोध घेऊन पुढच्या वेळी त्या चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊन जिद्दीने उभं राहिलं पाहिजे.’
शाळेने मला खेळ, वक्तृत्व, नृत्य या स्पर्धांमधे भाग घेण्याची संधी दिली, हस्तलिखिताचं संपादन करण्याची संधी दिली आणि शाळेच्या गॅदरिंगमध्ये नाटकात काम करण्याची संधी दिली. माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत या सगळ्याचा निश्चितच वाटा आहे.
अकरावीत प्रिलिमचा अभ्यास करतांना रोज मनात यायचं की हे आपले शाळेतले शेवटचे दिवस आहेत. आपली शाळा आता संपली. यापुढे शाळेत आपण विद्यार्थी म्हणून कधीच येणार नाही. कॉलेजचं एक नवं विशाल जग हात पसरून आपली वाट पहात आहे याचं औत्सुक्य होतं तरीही; निरोपसमारंभाच्या दिवशी शिक्षकांच्या पाया पडतांना, मित्रमैत्रिणींचा निरोप घेतांना, ‘ रडायचं नाही ‘ असं ठरवलेलं असूनही मी डोळ्यातल्या पाण्याला अडवू शकले नाही.
ते खूप साधे, सरळ, सोपे, आनंदी दिवस होते. सकाळी शाळेत जाण्याचे, शाळेतून तडक घरी येण्याचे, दुपारच्या वेळात गृहपाठ करण्याचे, गोट्या, चंदू, चांदोबा वाचण्याचे, नाथ माधवांच्या कादंबऱ्या वाचण्याचे, संध्याकाळी मैत्रिणींबरोबर लगोरी, डबाऐसपैस, सोनसाखळी आणि टिक्कर खेळण्याचे, सात वाजताच घरी येऊन शुभंकरोती, रामरक्षा म्हणण्याचे, जेवून दुसऱ्या दिवशीचे दप्तर भरण्याचे आणि नऊ वाजले की ‘गुडुप’ झोपण्याचे! उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी जाण्याचे आणि आईवडिलांनी दाखवला तरच एखादा सिनेमा, नाटक बघण्याचे!
असे स्वच्छंदी, मुक्त, निरागस, ताणतणावविरहित दिवस आयुष्यात पुन्हा वाट्याला येणार नाहीत अशी शंकाही त्याकाळी मनात आली नव्हती. खरं म्हणजे ते ‘ तसे ’ आहेत असंही ते दिवस प्रत्यक्षात जगत असतांना कळलं नव्हतं. यापेक्षाही वेगळं काही असू शकतं हेच मुळी कधी वाटलं नव्हतं.
आज इतक्या वर्षांनंतर मागे वळून पहातांना मला दिसतंय एक जग, जिथे आहे हिरव्यागार पानांनी सजलेली, रंगीबेरंगी फ़ुलांनी नटलेली, गाणाऱ्या पक्ष्यांनी झुलणारी, सोनेरी चमचमत्या उन्हात बागडणाऱ्या फ़ुलपाखरांनी भिरभिरणारी, तुषार उधळणाऱ्या कारंज्यांनी भिजणारी, वाऱ्याच्या मंद झुळूकांनी डोलणारी, आनंदाचा मंत्र जपणारी एक बाग ! त्या बागेत उभी आहे शाळेचा निळा स्कर्ट पांढरा ब्लाउझ घातलेली, दोन वेण्यांना लाल रिबिनी बांधलेली, हसऱ्या डोळ्यांची नाचऱ्या पावलांची एक मुलगी !!
शाळेचे ते दिवस आता केव्हाच मागे पडले आहेत. हसऱ्या डोळ्यांची ती मुलगी मात्र अजूनही माझ्या मनात दडलेली आहे.

गुलमोहर: 

सुंदर मांड्णी.

खरं म्हणजे ते ‘ तसे ’ आहेत असंही ते दिवस प्रत्यक्षात जगत असतांना कळलं नव्हतं. यापेक्षाही वेगळं काही असू शकतं हेच मुळी कधी वाटलं नव्हतं.>> अगदी अगदी.

लिहल्या नंतर हलकं वाट्लं आसेल ना... Happy

छान आठवणी आणि त्या सोप्या शब्दांमध्ये सहजपणे मांडल्या आहेत!

बायदवे, कारिंट म्हणजे काय?

माहीमची ‘ लोकमान्य विद्यामंदिर ‘ ही माझी शाळा.>> आयला काय झाल माहीताय. मी हे वाक्य वाचलच नाही. पुढे वाचत गेलो तर म्हंटल अरे ही तर आपलीच शाळा. विचारायला जाणार तर परत एकदा वाचुया म्हंटल. तर हे वाक्य दिसल. कुठली बॅच हो तुमची. मनोहर बाई होत्या ना प्रिंसिपॉल.
डॅविड सर पी.टी. ला होते ना.

खूप सुंदर लिहिल्या आहेत सार्‍या बालपणाच्या,शाळेच्या आठवणी.आवडल्या.

कालवलेला भात्,"आ" आणी डाव्या हातात पुस्तके,दुसर्‍या दिवशीचे दप्तर भरणे,संध्याकाळची रामरक्षा,पांढरा स्कर्ट निळा ब्लाऊझ,गोट्या,चांदोबा वाचण्याचे दिवस.... मस्त मस्त.
जियो!

तुम्हाला सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
चातक, लिहिल्यानंतर आणि लिहितांनाही खूप छान वाटलं.
अरुंधती, कारिंट हे एक मोठ्या लिंबाच्या आकाराचं, हिरवट- पांढरट रंगाचं फळ असतं. नर्कचतुर्दशीच्या दिवशी पहाटे आंघोळ करतांना त्याला नरकासुर समजून पायाखाली चिरडायचं असतं. त्याला कडवट काकडीसारखा वास येतो.
अनिलभाई, ६२ साली मी पास झाले. मनोहरबाई मुख्याध्यापिका होत्या. आणि पी. टी. ला माने सर होते.