सुपाएवढ्या काळजाची साधी भोळी माणसं :५: प्रिती सुर्यवंशी

Submitted by ह.बा. on 3 February, 2011 - 00:30

.................................................................
.........................................................................

दिव्या दिव्यांचे सुखी त्रिकोण आपापले कोपरे उजळण्यात दंग आहेत. अंधार्‍या कोठड्यांना निराशेचा असाध्य आजार जडला आहे. उजेडाच्या गावाला प्रेमाची साद घालून अंधाराच्या क्रूर खेळाचा अंत होईल असा आशेचा कवडसा नजरेच्या टप्प्यात येत नाही. कुणी कुणाचा कुणीच नाही... जो तो ज्याचा त्याचा आहे. उजळ कोपर्‍यांना सुबक नक्षीची... तर अंधार्‍या कोठड्यांना दबक्या हुंदक्यांची सोबत आहे. दिव्याने दिवे पेटताहेत... एक गाव उजळतो आहे. अंधारात मिसळणारा अंधार आहे... अंधार अंधारतोच आहे... हसणार्‍याला दिसतात ती फक्त आसव... रडणार्‍याला उगम उमजला आहे... हसणारा पाहतो... चुकचुकतो... हळहळतो... विसरून जातो. पण रडणारा पाहतो... जाणतो... जगतो आणि जगत राहतो.

अंधारात जन्मून अंधारात जगणार्‍याला प्रकाशाची आस नसतेच असे नाही. पण त्याच्या काळ्या भाळावर एक पांढरी रेघ उमटण्यासाठी प्रकाशाच्या गावी लोकसेवेची तपश्चर्या करणारा महात्मा जन्मावा लागतो. अंधार- प्रकाशाच्या नात्याचा इतिहासच दुराव्याचा आहे. आणि जेव्हा जेव्हा पणत्यांनी अंधाराशी सामना करून आसवांना मायेन कुरवाळ तेव्हा तेव्हा मानवतेच्या पवित्र ग्रंथाला उराशी कवटाळून प्रत्यक्ष सरस्वतीनं आनंदाश्रू ढाळले.

आयुष्याचा डोंगर पोखरून संसाराच्या उंदराला जीवनाच्या कोठारावर आनंदान बागडु देणारे येतात आणि जातात. पण जनसेवेच्या पालखिसमोर श्वासांची उधळण करत बेहोश नाचणारा जातो म्हणाला तरी मनातून जात नाही. उजेडाच्या साथिने देव शोधणार्‍याला मुक्ती मिळाली पण कुट्ट अंधारात वाहती आसव ज्याला मोत्यासारखी स्वच्छ दिसली त्याला माणसं मिळाली. ज्याचं त्याचं आयुष्य ज्याचा त्याचा मार्ग... प्रत्येकाची व्याख्या... प्रत्येकाचा परमार्थ आहे. कुणी सुखाच्या शोधात तर कुणी सुखाच्या राशीवर... कुणी देवाच्या मागे तर कुणी देवच बनतो आहे. दिशा बदलत नाहीत... माणसं बदलत नाहीत... वेदना बदलत नाहीत... की बदलतात? सगळेच बदलतात... अपघात तर घडणारच... आघात तर होणारच... अपवाद जन्माला येणारच... बस्स याच नियमान अपघात घडला... आघात झाला... अपवाद जन्मला!

'बदलत्या समाजात स्त्रीयांना सन्मानाची वागणूक मिळते आहे/नाही'

कॉलेजच्या कँटीनमधे बसून एका हाताने डोकं खाजवत दुसर्‍या हाताने स्क्रिप्ट लिहीण्यात मग्न होतो. स्त्रीयांना सन्मान मिळतो आहे याबद्दल माझ्या मनात कसलिही शंका नव्हती आणि ती आली असती तर बक्षीस मिळण्याची शक्यताही नव्हती. मी असं काही लिहीत असताना 'काय हाणमा? भाषण का?' 'चाल्लय का?' 'लिवताय का?' 'कूठाय वकृत्व स्पर्दा?' असे प्रश्न विचारून लिंक तोडणारे सदैव तयार असायचे. अपेक्षेप्रमाणे टेबलवर टकटक झाली. मी वर न बघता हातानेच न बोलण्याचा इशारा केला. सुचलेला मुद्दा लिहीला आणि वर बघितलं. एक अनोळखी मुलगी समोर उभी होती. पण ओळख व्हायला हरकतही नव्हती. गोरा पान रंग, गालांशी खेळणारे मोकळे केस, अभ्यासात हुशार असणार्‍या मुलांच्या असतो तसा भाव घेऊन आत्मविश्वासान थेट मनाला भिडणारे काळेभोर डोळे, नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या पाकळ्यांची नवाळी गालांवर पसरलेली, बघताच नजर थांबावी आणि बघता बघता थांबूच नये असं सौंदर्य... बड्या घरची ओळख सांगेल असा पेहराव, गळ्यातली सोन्याची साखळी दिसावी याची पुर्ण दक्षता, थोडासा गोंधळलो... पण... थोडासाच...
"नमस्ते"
"प्रिती सुर्यवंशी. बी ए थर्ड इयर"
"हणमंत शिंदे, सेकंड इयर"
"माहिती आहे, तुझी बक्षीसं बघितली प्राचार्यांच्या केबिनमधे म्हणून तर भेटायला आले"
"बोला ना"
"मी पण स्पर्धांमधे बोलायचे पण इथं कुणाला इंट्रेस्टच नाही त्यात, त्यामुळं बंद केलेलं... आता तू आहेस तर.."
"नक्की... मला पण वाद्-विवाद स्पर्धाना कुणी पार्टनर नाही मिळत इथे... परवाच कोल्हापूरला स्पर्धा आहे"
"मला वाटलेलं तू नाही म्हणशील... म्हणजे मी कशी बोलते ते ऐकल्याशिवाय..,"
"असं काही नाही प्रिती मॅडम... तुम्ही चांगल्याच बोलत असणार, हे वादविवाद स्पर्धेच पत्रक, हा विषय, विषयाची कोणतीही बाजू निवडा आणि तयारी करून या"
पत्रक आणि चेहर्‍यावर आनंद घेऊन ती निघून गेली. मी लिहीलेल्या मुद्यांचा कागद फाडून टाकला. स्पेशल चहाची ऑर्डर दिली. त्या दिवसापासून कँटीन वाला माझ्याकडे उगाच संशयाने पाहू लागला.

गेल्या दिडेक वर्षात मला या कॉलेजमधून एकही सोबती मिळाला नव्हता. त्यामुळ फक्त वक्तृत्व स्पर्धा कराव्या लागायच्या किंवा वाद-विवादाला दुसर्‍याच कॉलेजच्या स्पर्धकासोबत उतरावं लागायचं. पण प्रिती आली आणि माझा एक महत्वाचा प्रश्न सुटला. आता तिचं बोलण ऐकण्याची घाई झालेली. वक्त्यासाठी दिसण्याचं महत्व काय असतं याचा अनुभव मी बर्‍याच वेळा घेतला असल्यान उगाच ही आपल्याला जड जाणार नाही ना? अशी शंकाही मनात येऊन गेली. स्पर्धांच्या बाबतीत कॉलेजमधे कुणी माझ्या पुढे गेलेलं मला पचणार नव्हतं. त्यामुळे दुसर्‍या दिवशी कपड्यांना इस्त्रीचे भाग्य लाभले, केसांना स्पेशल इफेक्ट्स मिळाले.

कॉलेज सुटल्यावर वर्गातच थांबून तिची स्क्रीप्ट ऐकायची आणि प्रॅक्टीस करायची असं ठरलेलं. ठरल्याप्रमाणं मी माझ्या वर्गात थांबलो. अर्ध्या एक तासाने ती आली. कालच्यापेक्षा आज ती जरा जास्तच सुंदर दिसत होती. पण आपल्याला तसं मान्य करून चालणार नाही हे मी घरातून निघतानाच स्वतःला बजाऊन सांगितलेलं.
"किती वेळ" माझा साभिनय वैताग.
"सॉरी, अरे मॅडमनी थांबवलेलं"
"बोला, काय लिहीलय"
"आधी वाचतोयस की डायरेक्ट बोलून दाखवू"
"बोला"
एखाद्या सराईत वक्तृत्व स्पर्धकासारखी ती सात मिनीट भान हरपायला लावणार्‍या शैलीत बोलली. तिच्या स्क्रिप्टपुढे मी काढलेले मुद्दे मला फारच सामान्य वाटले. माझी काळजी वाढली. पण शब्द दिला आहे तर एवढी एक स्पर्धा करू असा विचार करून मी तिच्यासोबत कोल्हापूरची स्पर्धा केली. पहिला क्रमांक मिळण्याला पर्याय नव्हता. तो मिळाला. यावेळी कॉलेजमधे माझ्यासोबत तिचही कौतूक झालं... हो तिचही कौतूक झालं.

"ए पुढची स्पर्धा कधी आहे?"
"नाही. म्हणजे काही माहिती नाही"
"ती पुढच्या महिन्यात बिद्रीची आहे ना?"
"माझं जायचं नक्की नाही"
"ए जाऊया ना"
"मी नसेन तर तुम्ही जा ना दुसर्‍या कुणालातरी घेऊन"
"तू असलास तरच घरचे लाऊन देतील... तसं कबूल केलय घरच्यांसमोर मी"
"मला ओळखतात तुमच्या घरचे?"
"हो, चावडीजवळच घर आहे आमचं. तुझं मागच्या वर्षीचं भाषण ऐकलेलं पपानी"
"ठीक आहे. जाणार असेन तर सांगेन"
"नक्की जाऊया. शेवटचे सहा महिनेच राहिलेत इथे. नंतर संधी मिळेल की नाही माहिती नाही"

तिला बोलण्याची ओढ होती आणि व्यासपिठाला मंत्रमुग्ध करणारा आवाजही होता. ग्रामिण भागातल्या पोरींसारखच अनेक अटींचं पालन करत का होईना पण अंगी असलेल्या कलेचं सुख भोगण्याची तिची इच्छा होती, तिला फक्त स्पर्धक म्हणून टाळण्यात अर्थ नव्हता. एकदोनदा मी तिला चुकवून स्पर्धेला गेलोही पण बक्षीस घेऊन आल्यावर तिच्या डोळ्यात मला माझा पराभव दिसायचा. सहाच महिने आहेत... माझ्या कमाईचा मार्ग तिच्यासाठी स्वप्नांचा महामर्ग होता. माझ्या फक्त सोबत राहण्यानं तिच्या मनाचा ओलावा टिकणार होता. तिथून पुढ सहा महिने मी सगळ्या स्पर्धाना आम्ही सोबत गेलो. प्रत्येक स्पर्धेच्या बक्षिसाचे फोटो आम्ही सोबत काढले. वर्ष संपलं. निरोप समारंभालाही ती मनापासून, मनातलं आणि मनात साठवून ठेवावं असच बोलली.
कार्यक्रम संपल्यावर मी वर्गात थांबलो... ती येईनच असं सांगितल्यासारखा...
"इथे का थांबलायस?"
"तू का आलियेस?"
ओढणीनं किती पुसले तरी डोळे ओले राहणारच होते. सहा महिन्यात गांधीजीं पासून ग्रामस्वच्छतेपर्यंत आणि माणुसकीपासून स्त्रीभ्रुण हत्येपर्यंत सगळ्या चर्चा केल्या पण तिनं माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाची मुळं
मात्र मनाच्या कोपर्‍यात गाढलेलीच राहिली. त्या नात्याला ना सुरूवात मिळाली ना शेवट.
"तू इथेच थांबणार हे माहिती होतं म्हणून आले... "
"डोळे पुसा..."
"जाऊ का?"
"हं"
बोलण संपल्यावर बराच वेळ ती तिथच उभी होती. मला काहिच बोलायचं नव्हतं... बहुतेक तिलाही.
ती निघून गेली आणि पापण्यांमागे अवघडून बसलेल मन गालावरून ओघळलं... तिच्यासाठी... पहिल्यांदा आणि शेवटचं...
काळाच्या धक्क्यानी जाईल त्या दिशेला ध्येय मानुन वाहत राहिलो पण प्रत्येक थकव्यानंतर विश्रांतीला कृष्णाकाठचा औदुंबरच गाठायचो. असाच दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी गावी गेलो. गावात शिरतानाच कानावर कसलीतरी अनाउंसमेंट येत होती. कुणाचं तरी लग्न असेल म्हणून मी दुर्ल़क्ष केलं... संध्याकाळ पर्यंत कर्णा ओरडतच होता. सात साडेसातला हाक आली..
"हाणमा हायस का रं घरात?"
"कोण रे?"
"भायर ये मग सांगतो"
अंगणात युवर्‍या पवार आणि रंज्या थांबलेले.
"बोला सावकार... कसं येण केलं?"
"सावकार तुमी झालाय पुण्यामुंबयला जाउन... बरं ते जावदे चल दत्ताच्या देवळाकडं जावया"
"कशाला?"
"आरं तुज्या म्हैतरणीचं भाषण हाय"
मी गोंधळलो. मला वाटलं हळदी कुंकू समारंभात वर्गातल्या एखाद्या पोरीचं भाषण ठेवलेलं असेल.
"माझी मैत्रीण? टेपा लावता का राजे?"
"आरं खोटं कशाला बोलू? प्रिती सुर्यवंशी इसारला का?"
"आयला ती व्याख्यानं करायला लागली का?"
"मग सांगतुया काय"
"विषय काय हाय रे?.... घर असावे घरासारखे....? का स्त्री मुक्ती? का प्रेमा तुझा रंग कसा?" तिनं बोललेले सगळे विषय मला आ़जही आठवत होते...
"यचायव्ही यडस"
"काय?"
"यडस वर बोलती ती फकस्त... तिला झाल्यापासनं"
पोटात भला मोठा गोळा आला. तोल सावरायला युवर्‍याच्या खांद्याचा आधार घ्यावा लागला. 'यडस वरच बोलती ती फकस्त... तिला झाल्यापासनं' दैवाचे खेळ साले माणसाच्या मेंदुला पेलणारे नाहीत. कुणी पुण्यवान व्हायला जाईल आणि महापाप्याचे सारे भोग देव त्याच्याच झोळीत घालील. आपण काही ठरवू नये... घडवू नये आणि घडलेल्या बदलायचा यत्नही करू नये. जे जे होईल ते ते पहावे... हाच सुखी आयुष्याचा मंत्र असावा. काडी काडी जमवून घरट बांधावं आणि कष्टाचं फळ म्हणून कुणी शाबासकी द्यायची सोडाच पण झाडाशी पिंगा खेळाणार्‍या वार्‍यात कस्पटासारखं जन्माचं कष्ट विस्कटून जावं... आयुष्य म्हणजे शुन्य... फार फार मोठा आणि शुन्य किमतीचा शुन्य.

प्रितीसमोर जायचं धाडस माझ्यात नव्हत आणि मी समोर गेलो असतो तर तिला धाडसानं बोलताही आलं नसतं... मरण समोर असलं तरी एक सुंदर भुतकाळ मनाच्या पाटिवर पुसट का असेना जिवंत असणारच.

स्टेजच्या मागे उभा राहून व्याख्यानं ऐकलं... लक्षात राहिला तो फक्त आवाज. मी वादविवादात मला जड जाणारा, कृष्णेच्या प्रवाहासारखा मंजूळ वाटणारा आवाज शोधत होतो... प्रिती मात्र गावाबाहेरच्या घाटावर प्रवाह सोडून साचलेल्या डबक्यासारखी भासत होती. एकलकोंडी... गढूळ... चैतन्यहीन. व्यख्यानं संपलं. मी गडबडीनं घरी निघून आलो. बरीच वर्षे झालीयेत, आता काय आपला संबंध? केल्या असतील चार स्पर्धा सोबत... निरोप घेताना ढाळले असतील चार अश्रू... आता उगाच कशाला भेटायचं? तेही अशा आवस्थेत...
"हणमंतराव"
प्रिती दारात उभा होती. सोप्यात बसल्या बसल्या मी तिच्या डोळ्यातली आसवं गालावर येताना पाहिली. तिच्या जवळ जाऊन तिला आधार देण्याचं धाडस माझ्यात नव्हतं... रडावसं वाटत होतं पण व्यवहारी बुध्दीने भावनांवर विजय मिळवायची सवय झाली होती.
"आत ये ना प्रिती"
पदराने डोळे पुसत ती आत आली. माझ्या शेजारीच चटईवर बसली. मी पाणी द्यायला उठलो, आज्जीला चहा ठेवायला सांगितला. परत येऊन चटईवरून बाजुला बसलो.
"बोलयचं नाहिये का?" तिचा बदलेला आवाज भयावह होता.
"काय बोलू तूच सांग"
"लग्न झालं?"
"हो. तुझं?"
"म्हणजे तुला काहीच माहिती नाही?"
"नाही ना... म्हणजे पुण्याला गेलो..."
"आणि गावाला विसरलास..." आज्जी चहा घेऊन आली. दोघेही बोलायचे थांबलो. चहाचा कप उचलताना तिचा हात थरथरत होता. दोन्ही हातानी कसाबसा तो कप तिनं ओठांपर्यंत नेला. एक घोट घेऊन कप खाली ठेवत ती बोलायला लागली...
"नवरा शिक्षक होता, सासरा, सासू दोघे मुख्याध्यापक बघायला आले तेव्हा मुलगा गोरा गोमटा देखणा वाटला, भाळले. लग्नानंतर दोन वर्षात त्याची गोरी कातडी कुजायला लागली. मी सारखी आजारी पडायला लागले... माहेरला आले. कराडला जाऊन ब्लड टेस्ट केलं... एचआयव्ही पॉझिटीव्ह... खरं तर त्याच दिवशी मेले मी. पुन्हा सासरी गेले. नवरा मेला. त्याच्या दहाव्या दिवशी एका चुलत सासूचं बोलणं ऐकलं... 'सगळं माहिती असताना त्या पुरीच्या आयुष्याची धुळदान किली ह्या मास्तरनं' सासू-सासर्‍याना सगळं माहिती होतं... फसवलं मला... जाब विचारला तर हातापाया पडायला लागले... म्हणाले
आमचं पोरगं संसाराचं सूख न भोगता गेलं असतं म्हणून हे केलं... मी पोलिसांकडे तक्रार केली... केस चालू आहे... वर्ष दोन वर्ष जगेन मी अजून.... बर जाऊदे ते चल मला रेठर्‍याला व्याख्यानाला जायचय... निघते... तुला त्रास दिल्याबद्दल सॉरी, पण तू आलायस हे कळाल्यावर राहवलं नाही म्हणून आले... जाऊ?"
मला काहितरी बोलायचं होतं पण शब्द सापडत नव्हते... जमिनीकडं बघत मी शब्द शोधत राहिलो आणि मी काही बोलायच्या आधी ती निघूनही गेली...

मी काय बोलणार होतो ते आजही मला सुचलेलं नाही... कदाचीत सुचणारही नाही. तिच्या आजाराची बातमी तिला कळाल्यावर इतरांना सावध करण्यासाठी स्वतःच्या झिजलेल्या देहाचं उदाहरण देत गावोगावं फिरत होती. स्वतःच शरीर आतून पोखरलं जात असताना आपल्यासारख्याच मुलींच्या मनाला पोलादी बनविण्यासाठी अखंड धावत होती. कुणा नीच माणसाच्या उबदार जगण्यासठी तुमच्या आयुष्याची होळी होणार नाही याची काळजी घ्या म्हणून सांगताना स्वतःचे जळून राख झालेले आयुष्य व्यासपिठावर उधळत होती... साध्याश्या आजाराने चिडचिड करणार्‍या माझ्यासारख्याला मरणाशी एवढे जिव्हाळ्याचे संबंध कधीच ठेवता यायचे नाहीत. कॉलेजमधल्या स्पर्धांमधे बोलतानाचा तिचा आवाज खरचं गोड होता... पण ललित स्वप्नांनी भारलेल्या त्या ऐन मोहोरातल्या दिवसात एक वक्ता आणि मैत्रिण म्हणून मला ती जेवढी आवडायची त्याहून लाखो पटींनी ती मला आज आवडते... कारण लग्नापुर्वी मुक्त गाणार्‍या बहुतांश कोकिळा लग्नानंतर संसार... नवरा... सासर... समाज... बदनामी... रुढी परंपरा अशा हजारो विचारांनी स्वतःच स्वतःचा आवाज दाबून टाकतात... प्रिती मात्र तिच्या गळ्याभोवती एचआयव्हीचा फास करकचून बसलेला असतानाही सगळी शक्ती पणाला लावून, आपल्या बसक्या आवाजात दुसर्‍यांच्या मुक्तीसाठी लोकसेवेचे गाणे गात होती....

गुलमोहर: 

.

चिमुरी,
हे आत्ताच प्रकाशीत केलय. राहून नाही गेलेलं तुम्ही तर प्रकाशीत केल्या केल्या वाचलत.

धन्यवाद बेफिकीरजी, स्मितू!

नेहमीप्रमाणेच सुंदर,

मी तर आजच पाहिले....लिखाणाची प्रकाशन तारीख ३ फेब्रुवारी २०११ का येतेय हे प्रशासकांनाच माहित!!

सुं द र च!!

हबा, मला का कुणास ठाऊक पण अशोकची आणि आपल्या इचलकरंजीच्या प्रीती पटवाची आठवण झाली. त्यांचा काही संबंध नाही इथे पण त्यांची सल लागते असलं काही वाचताना...

लिखाणाची प्रकाशन तारीख ४ फेब्रुवारी २०११ का येतेय हे प्रशासकांनाच माहित!!
>>> बर्‍याच दिवसांपुर्वी थोडे लिहून ठेवले होते. आज पुर्ण केले. कदाचित त्यामुळे असू शकेल.

धन्यवाद हिमस्कूल, विजयजी, ठमादेवी!!!

नि:शब्द झालेय हबा!! Sad

<<मला काहितरी बोलायचं होतं पण शब्द सापडत नव्हते... जमिनीकडं बघत मी शब्द शोधत राहिलो <<<
अगदी हेच आलं तेव्हा मनात.

हृदयस्पर्शी......... पण त्याचवेळेला -
<<<<प्रिती मात्र तिच्या गळ्याभोवती एचआयव्हीचा फास करकचून बसलेला असतानाही सगळी शक्ती पणाला लावून, आपल्या बसक्या आवाजात दुसर्‍यांच्या मुक्तीसाठी लोकसेवेचे गाणे गात होती....>>>>>>> ही फार मोठी जिद्द जाणवली...... शब्दच नाहीत याचे वर्णन करायला इतक्या उंचीवरची आहे ही व्यक्तिरेखा..... सलाम.....

काय बोलावं तेच कळत नाहिये Sad

त्या प्रितीने अजून एक काम केलंय, ते म्हणजे "मैत्र जिवांचे"ची प्रेरणा बनण्याचे. हबा, हीच ती मैत्रिण ना, जिच्यावरुन तुला मैत्रची कल्पना सुचली?

ह.बा _____/\_____ तिच्या जगण्याच्या उद्देशाला व त्यापासुन तुझ्या प्रेरित होउन सुरु केलेल्या कार्याला.

हृदयस्पर्शी ..... वाचून नि:शब्द, सुन्न झालो.
"पण ललित स्वप्नांनी भारलेल्या ...... दुसर्‍यांच्या मुक्तीसाठी लोकसेवेचे गाणे गात होती...."
हा शेवट जबरदस्तच.
प्रीतीला आणि तिची ओळख करून देणार्‍या तुम्हालाही _____/\______

Pages