एक तरी पोरगी पटवावी

Submitted by येडाकाखुळा on 11 June, 2008 - 07:52

मी अत्तपर्यंत अनेक रोमांचक अनुभव घेतले आहेत. तंबाखू, गुटखा, मावा इत्यादी रसाळ पदार्थांचे सेवन करून पाहिले आहे. दारू पिऊन तेजतर्रार अवस्थेत मित्राना शिव्या देण्याचा आनंद उपभोगला आहे. धूम्रपान ह्या शास्त्रात प्रबंध लिहिण्याएवढे अगाध ज्ञान अर्जित केले आहे. तीन बोटांमधल्या दोन खोबणीत धरून मी एकावेळी दोन सिगारेट चिलीम स्टायलीत ओढू शकतो. एक कश जोरात मारून वर्तुळाकार धुम्रवलय सहज सोडू शकतो. अफू, गांजा वगैरेचे माफक प्रमाणात सेवन करून पाहिले. एकूण सगळे अफलातून जीवनानुभव मी चाखून पाहिले आहेत. पण मी अत्तपर्यंत एकही पोरगी पटवली नाही ह्याचे शल्य मला नेहमी बोचत असे. आमच्या दारूगँग मधल्या रंगाने अत्तापर्यंत शंभर पोरी नाचवल्या. शशीने तर चक्क प्रेमविवाह केला. उरलेल्या प्रत्येकाने एकदोन लफडी करून पाहिली, पण मी मात्र ह्या बाबतीत दुर्दैवी राहिलो. एक दिवस व्हिस्कीचा घोट घेताना मी ही व्यथा गँगला बोलून दाखवली. माझी ती अवस्था पाहून बाकी मेंबरच्या डोळ्यात पाणी आले. राजाच्या डोळ्यात पाणी आले नाही हे खरे असले तरीही तो त्याआधीच लघवीला जाऊन आला असल्याने त्याच्या शरीरातील पाण्याची मात्रा कमी झाली होती. त्यामुळे तो आश्रूपात करू शकला नाही. पण त्याला दु:ख नक्कीच झाले होते कारण मला मुलगी पटवण्यासाठी सगळ्यानी मला मदत केली पाहिजे असा प्रस्ताव त्याने मांडला आणि त्यावर लगेच चर्चाही चालू केली.
"येड्या, पोरगी पटवण्याआधी तुला पोरगी शोधून ठेवायला लागेल"
"ही पोरगी शोधायची कशी?" मी बाळबोध शंका काढली.
"तुझ्या सोसायटी पासून सुरुवात कर!" शशी.
"माझ्या सोसायटीतल्या सगळ्या पोरी डोक्यापासून पायापर्यंत गुंडाळलेल्या असतात." मी.
"तुझ्या सोसायटीत सगळे मुस्लिम लोक रहातात की काय?" राजा.
"नाही रे! पुण्यातल्या पोरी!" रंगाने परस्पर उत्तर दिले.
"नाहितर काय! एखादीला डोळा मारायचो आणि ती नेमकी सेक्रेटरीची बायको निघायची. आमचा खेळ खल्लास!" मी वैषम्यग्रस्त झालो.
संभा इतकावेळ गप्प बसून आमचे संभाषण ऐकत होता. तो मार्केटिंग मध्ये एम. बी. ए. असल्याने स्वत:ला अतीशहाणा समजतो. प्रत्येक चर्चेत तो स्वत:चे वेगळे मत मांडण्यासाठी उत्सुक असतो. त्याने न रहावून तोंड उघडले.
"येड्या, पोरगी पटवणे हा मार्केटिंगसारखाच प्रकार आहे."
"तो कसा हे सांगण्याचे कष्ट आपण करावेत." मला ह्याचा खूप राग येतो.
"तुला मुलगी आवडणे हा पहिला भाग झाला, पण मुलीलाही तू आवडला पाहिजेस. म्हणजे तू सुद्धा एक सेलेबल प्रॉडक्ट आहेस का ह्याचा तुला विचार करावा लागेल."
मी दुकानात विक्रीकरता ठेवला गेलो आहे आणि मुली येऊन माझे चहूबाजूने निरिक्षण करत आहेत असे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.
"आयला ह्याचे ना फुकट फंडे असतात." शशीने तीव्र विरोध दर्शवला.
"ठीक आहे. मी सर्वाना समजेल अशा भाषेत सांगतो. आता वेड्याकडेच पहा. काळाढुस्स आहे. पोट सुटलेले, कुजलेल्या बटाट्यासारखा चेहेरा, ढेकूणछाप मिशा, जाड भिंगाचा चष्मा, केवळ मोरी घासायच्या-तारेच्या ब्रशने भांग पडू शकेल असे कुरळे राठ केस, पोक काढून चालयची ढब, नखं खाणे.....आता तो स्वभावाने चांगला आहे हा एक प्लस पॉइंट आहे म्हणा." त्याने शेवटचे वाक्य मी रिकामी बियरची बाटली उगारल्यावर केवळ भितीपोटी घाईघाईने उद्गारले होते.
"पण येड्या, जर कोणी मुलगी तुझ्याजवळ आलीच नाही तर तिला तुझा स्वभाव कळणार तरी कसा?"
"हे हे हे हे! हे मात्र खरे आहे. येड्या तू मोलकरणीला प्रपोज मारलेस, तर ती सुद्धा तुला नकार देईल." रंगाला माझी खेचायची लहर आली. "अफ्रिकन पोरीला मात्र तू आवडशील. ती तुला प्रेमाने बेडकाच्या पायाचे लोणचे खायला घालील." ह्यावर गॅंगच्या बाकी मंडळीनी पोटभर हसून घेतले. मला जरा ओशाळल्यासारखे झाले. "मी असा आहे ह्यात माझा काय दोष?"
"इतर गोष्टीत तू काही करू शकत नाहीस हे एकदम खरे. पण पोट तर तुझ्या हातात आहे ना! आय मीन ते तर तू कंट्रोल करू शकतोस." खरे तर संभाचेही पोट टमटमीत आहे. पण तो माझ्या पोटावर उगाचच घसरला.
"येड्या, तुझ्या पोटावर बशी ठेऊन तु चहा पितोस काय रे? ह्या ह्या ह्या ह्या" शशी.
"अफ्रिकन मुलगी निवडलीस तर जरा जपून हो! ती नेमकी नरभक्षक टोळीतली निघायची. तुझ्या पोटावर तिची अख्खी टोळी महिनाभर पोसली जाईल. ही ही ही ही" राजा.
"एखाद्या पोरीला तू मिठीत घ्यायचा प्रयत्न केलास तर तुझ्या पोटावर बाउन्स होऊन ती दूर फेकली जाईल. खी खी खी खी!" शशीला आता जोर चढला होता.
"माझ्या सोसायटीतल्या छोट्या पोराना मी तुझ्या घरी खेळायला पाठवतो. तू फक्त पोटावर पालथा पड. पोराना रेडीमेड सी-सॉ खेळायला मिळेल." रंगालाही जोर चढला.
प्रत्येक वाक्यागणिक हास्याचा जोर वाढत होता. मला मात्र खूप दु:ख झाले.
"अबे! नुसतेच पी जे मारणार आहात का काही उपाय सुद्धा सुचवणार आहात?"
"तू जिम जॉईन कर! महिन्याभरात फरक पडेल. माझ्या घराजवळच एक जिम आहे. उद्या संध्याकाळी आपण तिकडे जाऊया. तिथली इन्स्ट्रक्टर काय हॉट आहे म्हायतिये?" संभा. संभाने त्या बाईचा विषय काढला हे एक बरे झाले. गप्पांचा ओघ तिच्याकडे वळला आणि पुढील अपमानापासून माझी सुटका झाली.
व्यायाम ह्या प्रकाराला मी जितका घाबरतो, तितका मी कुत्र्यालासुद्धा घाबरत नाही. त्यामुळे त्या व्यायामशाळेत मी जरा दबकतच गेलो. पण तिथले वातावरण पाहून मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. व्यायामशाळा म्हणजे एक अंधारी खोली असून तिथे बलदंड लोक जोर, बैठका, सूर्यनमस्कार ई. प्रकार करत असतात अशी माझी समजूत होती. ही व्यायामशाळा तर एकदम चकचकतीत आणि वातानुकूलित होती. आत दोन/तीन टी. व्ही. होते. ढिनच्याक इंग्लीश गाणी जोरजोरात सतत चालू होती. कमनीय बांध्याच्या काही तरुणी तिथे कुठल्याशा यंत्रावर धावत होत्या. हे सगळे पाहून मला पोटात गुदगुल्या झाल्या. संभाने माझी ओळख एका सडपातळ तरुणीशी करून दिली. ती तिथली इन्स्ट्रक्टर होती म्हणे. काळिसावळी असली तरी पोरगी भलतीच स्मार्ट होती. तिचा चेहेरा थोडासा उभट होता आणि दात थोडेसे पुढे अलेले होते. पण ते दात तिच्या चेहेर्‍याला अगदी शोभून दिसत होते. त्यात तिने शरीराला घट्ट चिकटून बसतील असे कपडे घातलेले होते. माझ्याकडे पाहून तिने सुहास्य करत "वेलकम" केले. आम्हाला दोघाना तिने संपूर्ण जिमचा (त्या प्रकाराला व्यायामशाळा म्हणणे म्हणणे म्हणजे ऐश्वर्या रायने परिधान केलेल्या दहा लाखाच्या "आयगियरला" चाळिशी म्हणण्यासारखे होते) फेरफटका मारून आणला. तिथली सगळी यंत्रे पाहून माझ्या पोटात गोळा आला. "मला फक्त पोट कमी करायचे आहे" मी घाबरत घाबरत सांगितले. "नो प्रॉब्लेम सर! तुम्ही पहिल्यांदा वजन करून घ्या. आम्हाला तुमचे बी पी. चेक करावे लागेल. तुम्ही तुमचे नाव, पत्ता, तुमची हाईट वगैरे माहिती ह्या फॉर्मवर भरा. आय विल बी विथ यू इन अ शॉर्ट व्हाईल." सगळी औपचारिकता पूर्ण झाल्यावर तिने मला सदस्यत्वाचे शुल्क सांगितले. ते ऐकून माझ्या पोटात पुन्हा एकदा गोळा आला. "सात दिवस तुम्ही ट्रायल घेऊन पहा. मला खात्री आहे की तुम्ही सात दिवसानंतर कायम मेंबरशीप घ्याल." आता तिला खात्री होती म्हणजे प्रश्नच मिटला. ती मल कुठल्याशा यंत्राजवळ घेऊन गेली. "ह्याला ट्रेडमिल म्हणतात" तिने ते यंत्र चालू केले. पिठाच्या गिरणीत असतो तसला एक पट्टा चालू झाला. "तुम्ही आज ह्यावर पंधरा मिनीट रनिंग करा. हळूहळू स्पीड आणि वेळ वाढवा. पुढील आठवडाभर हेच करा" तिने अतीशय प्रेमाने मला सूचना केली. "असली इन्स्ट्रक्टर मला आधी भेटली असती तर मी अत्तपर्यंत सलमान खान सारखा बनलो असतो" मी मनातल्यामनात खूश झालो. तो प्रकार मला वाटला त्यापेक्षा भलताच अवघड निघाला. पाच मिनिटात माझी दमछाक झाली. मी सात आठ मिनीट कसेबसे धावलो. त्यानंतर माझी छाती लोहाराच्या भात्यासारखी फुलून वारखाली होऊ लागली. पायातले त्राण नाहिसे झाले. माझे कपडे घामाने भिजून निघाले. आज पहिल्या दिवशी एवढेच बास बुवा असे म्हणत मी तिथून पळ काढणार एवढ्या ती सुंदरी माझ्यासमोर उभी ठाकली. "इट्स ऑल राईट. पहिलाच दिवस आहे. आय होप यू हॅड नाईस वर्क आऊट" ही पोरगी भलतीच समजुतदार होती. "येस येस. उद्या भेटू" असे म्हणत मी तिथून सुटलो. एकून पहिला दिवस मला वाटला त्यापेक्षा खूपच चांगला निघाला. रात्री माझे पाय मात्र ठणाणा करत होते. मला जिन्याची पायरी चढणेही अवघड झाले होते. पाठही बोंबाबोंब करत होती. पण पोरगी पटवण्यासाठी हे सगळे करणे भाग होते. रात्री सर्वांग ठणकत असतानासुद्धा मला लगेच झोप लागली. स्वप्नात ती देखणी इन्स्ट्रक्टर आणि मी एका ट्रेडमिलवर हातात हात घालून पळत आहोत असे दिसले. त्यामुळे माझा हुरूप अजून वाढला. दुसर्‍या दिवशी दुखणार्‍या पायाना न जुमानता मी जीम गाठली. आज ललना अजूनच सुंदर दिसत होती. हिचे नाव आज विचारून घेईन असा मी विचार केला. माझ्याकडे पाहून तिने स्मितहास्य केले. "हाऊ आर यू टुडे?". मला काय बोलावे सुचेनाच. मी खुदकन लाजून कपडे बदलायला पळालो. दुसरा दिवस मात्र पहिल्या दिवसापेक्षा अवघड गेला. मी जेमतेम ५ मिनिट धावाधाव केली असेल. मी उतरल्यावर ती धावत माझ्यापाशी आली. "सर! आज आपल्याला वेळ वाढवावा लागेल. आज स्पीड सहा करा आणि दहा मिनिट धावा. काल आठच मिनिटे धावला होता आपण". मी पुन्हा धावण्याचा निकराचा प्रयत्न केला. पण एका मिनिटात माझा श्वास फुलला आणि मी हा हू करत खाली उतरलो. "सर! प्लीज ट्राय फॉर सम मोअर टाईम" ही बया हजर. "मला नाही जमणार" मी कसेबसे बोललो. "सर! यू हॅव टू ट्राय." तिने काकुळतीने विनवणी केली. मी पुन्हा प्रयत्न केला, पण आता तर अवस्था अजून वाईट झाली. "सर! असे करून नाही चालणार" खाली उतरू नका." ह्या शहाणीने यंत्र परत चालू केले. "मला जमत नाही सांगितले ना!" मी जरा घुश्श्यात बोललो. "असे कसे नाही जमणार? पोट कमी करायचे असेल तर हे जमायलाच लागेल" तिचे पुढे आलेले दोन दात विचकावत ती चिडून म्हणाली. "मला नको हे असले. मला खाली उतरू दे" मी जोरात ओरडलो. "बिलकूल नाही. अजून दोन मिनिटेतरी तुम्ही धावाच" पुढे आलेले दात आणि लांबलचक नाकामुळे ही बया चिडल्यावर चेटकिणीसारखी दिसत होती. मी ते यंत्र बंद केले, तर लगेच ही टवळी ते परत चालू करत असे. जीम मधेले बाकिचे लोक आपापले व्यायाम थांबवून आमची गंमत पहात उभे राहिले. माझी अशी सार्वजनिक नालस्ती होत आहे हे पाहून मलाही राग आला. मी त्या यंत्रावर उभे राहून असहकार पुकारला व धावणे बंद केले. पण यंत्र तसेच चालू असल्याने माझा एकदम तोल गेला आणि मी धाडकन खाली पडलो आणि यंत्राने मला मागे सरकवत जमिनीवर ढकलले. माझी पाठ आणि खांदे चांगलेच सडकून निघाले. टाळके लोखंडी बारला आपटल्याने डोक्याला जबरदस्त टेंगूळ आले. जीममधले सगळे लोक वात्रटपणे हसू लागले. ती महामायाही माझ्या फजितीवर खो खो हसत होती. झालेला अपमान रागाने गिळत मी तिथून जो पळ काढला, तो एकदम घरी येऊन विसावलो. परत त्या जीम मध्ये जाणार नाही असा पक्का निर्धार केला.
पुढील दोन दिवस मी बिलकुल घराबाहेर पडलो नाही. माझे संपूर्ण शरीर एकसारखे ठणकत होते हे एक कारण असले तरी मला आता मुलगी पटवणे जमणार नाही ह्या विचाराने मी उदासीन झालो होतो. मी आतल्याआत झुरत होतो. एका संध्याकाळी दु:खदग्ध अवस्थेत पडलो असताना मला रंगाने फोन केला. "येड्या! माझ्या सध्याच्या गर्लफ्रेंडची एक मैत्रीण आहे. प्रिया नाव आहे तिचे. तिचा २/३ महिन्यापूर्वी ब्रेक-अप झाला होता.मी तुला तिचा नंबर देतो. तिला फोन करून भेट." मला एकदम आनंद झाला. कडक उकाड्यानंतर पावसाची सर आल्यावर होते तशी माझी अवस्था झाली. मी अजिबात वेळ घालवला नाही. तिला फोन करून सी सी डी मध्ये भेटायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे मी सी सी डी मध्ये दाखल झालो.
मी मित्रांबरोबर इथे पहिल्यांदा आलो होतो. पण मुलीला भेटायची ही पहिलीच वेळ. त्यामुळे तांबड्या रंगाचा टी शर्ट आणि निळी जीन्स घालून, डिओचा फवारा मारून, कानात इअरफोन्स घालून मी एकदम कूल डूड बनलो होतो. बाहेर पाच दहा मिनिटे ताटकळत उभे राहिल्यावर मला प्रियाचा फोन आला. मी फोन उचलल्याबरोबर समोरून एक मोरपंखी रंगाचा टॉप घातलेली काळीसावळी आणि मजबूत बांध्याची मुलगी जोरजोरात हात हलवताना दिसली. हीच प्रिया असावी हे मी लगेच ओळखले. पुढे जाऊन मी माझी ओळख सांगितली आणि आम्ही आत जाऊन एका टेबलवर समोरासमोर बसलो.
"मी प्रिया बालसुब्रमण्यम. तमिळ आहे पण बॉर्न ऍंड ब्रॉट-अप इन पुणे"
"मी येडा का खुळा. मराठी आहे." बराच वेळ काय बोलावे मला सुचेना. बरेच क्षण असे अस्वस्थ वातावरणात पार पडले. "मला सांबार खूप आवडते." काहितरी बोलायचे म्हणून मी बोललो. तिच्या चेहेर्‍यावर कुतुहलजन्य आश्चर्य उमटले. "इथे सांबार मिळत नाही. फक्त कॉफी आणि स्नॅक्स मिळतात". उगाचच हसून मी पुन्हा गप्प बसलो. तीही इकडेतिकडे पाहू लागली. तिचा चेहेरा गोल गुबगुबीत होता. जिवणी रुंद होती. तिने डोळ्यात भरगच्च्च काजळ लावले होते. तिचे केस लांबसडक होते आणि तिने मोगर्‍याचा गजरा मळला होता. गजरा आणि दात सोडले तर पांढर्‍या रंगाला पूर्ण फारकत होती. मोरपंखी रंगाची रंगसंगती मात्र कमालिची होती. मोरपंखी रंगाच्या क्लिपा, बांगड्या, घड्याळाचा पट्टा, नेलपॉलिश, कानातले, गळ्यातले एवढेच काय तर तिची पर्स सुद्धा मोरपंखी रंगाची होती. "तुम्हाला छंद कसले कसले आहेत?" मी कुठलातरी विषय सुरु करायचा म्हणून विचारले.
"मला म्युझिक फार आवडते. आय सिंप्ली लव्ह लेड झॅप्लीन! तुम्हाला?"
मी हे झॅप्लीन प्रकरण पहिल्यांदाच ऐकत होतो. मला फार तर फार चार्ली चॅप्लीन माहित. पण तरिही उगाच विरोध कशाला म्हणून "हो हो! आय लव्ह लेड" असे उत्तर दिले.
"ओह! सही. तुम्ही माझ्या घरी या एकदा. माझ्याकडे लेड झॅप्लीन कलेक्शन आहे. मला रोलिंग स्टोन्सही खूप आवडते. मेटॅलिका सुद्धा सुपर्ब." असे म्हणून ती तिथे एकदन सतार का गिटार वाजवल्याचा अभिनय करत नथिंग एल्स मॅटर्स असे काहितरी ओरडू लागली.
"मला जुनी गाणी सुद्धा खूप आवडतात" मी तिला माणसात आणण्याचा प्रयत्न केला.
"ओह येस! बीटल्स काय भन्नाट होते नाही! तुम्ही मूडी ब्लूजचे नाईट्स इन व्हाईट सॅटिन ऐकले आहे का? ते माझे ऑल टाईम फेवरेट गाणे आहे." आता ही ते गाणे गाऊन दाखवते की काय अशी मला भिती वाटू लागली. तेवढ्यात तिथला वेटर ऑर्डर घ्यायला आला आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला.
"मला मूव्ही पहायला सुद्धा खूप आवडते. मला सेन्सिटिव्ह मूव्हीच आवडतात. मी खूप सेन्सिटिव्ह आहे." तिने लाडिक चाळा करत सांगितले.
"मी ही सेन्सिटिव्ह आहे." मी तुम्हाला म्हणून सांगतो, मी इथे चक्क खोटे बोललो. मला केवळ मारधाड चित्रपट आवडतात. जॅकी चॅन, व्हॅन डॅम, अरनॉल्ड (ह्याचे शेवटचे नाव काय आहे हे मला अजून वाचता आलेले नाही) अक्षय कुमार, सनी देओल, सुनील शेट्टी, अजय देवगण ई. माझे आवडते अभिनेते आहेत.
"माझा आधिचा बॉयफ्रेंड अजिबात सेन्सिटीव्ह नव्हता. त्याला फक्त मारामारीवाल्या मूव्ही आवडायच्या." प्रिया.
"छे! मला नाही आवडत तसले पिक्चर. नुसता रक्तपात! आजकालच्या तरूण पिढीला अगदी बिघडवून टाकले आहे त्याने" मी.
"मला ब्रॅड पिट खूप आवडतो. त्याने त्या ऍंजलिना जोली मध्ये काय पाहिले कुणास ठाऊक!" ती नाक फुगवून म्हणाली. "तसा मला टॉम क्रूज सुद्धा क्यूट वाटतो" प्रिया अतिशय अगम्य भाषेत बडबडत होती. ह्या ईंग्लीश लोकांबद्दल जरा जास्त माहिती घेतली पाहिजे असे मी मनोमन ठरवले.
"आणि हो. आय लव्ह पेट्स! आय सिंप्ली लव्ह देम!! किती क्यूट असतात नाही ते!" ओठांचा चंबू करत आणि दोन्ही हात गालावर ठेवत हर्षवायू झाल्यासारखी ती ओरडली. "मी पेटाची सदस्य आहे."
"पेटा?" मी.
"हो! प्राणिमित्र!" प्रिया.
"हो हो! मला माहित आहे. मलाही कुत्रे मांजरी खूप आवडतात." मला मांजर मुळीच आवडत नाही. कुत्रे ह्या प्राण्याला मी खूप घाबरतो. लहानपणी एका कुत्र्याने मला जबरदस्त प्रसाद दिला होता. परिणामस्वरूप मला पोटावर चौदा लसी टोचवून घ्याव्या लागल्या होत्या. त्यानंतर मी कुत्र्याच्या वाटेला कधी गेलो नव्हतो.
"ओह रियली? मग तर तुम्ही माझ्या घरी याच! माझ्याकडे एक डॉगी, एक मनी आणि एक पोपट आहे." ती उभे राहात म्हणाली.
"आत्ता?" मी घाबरून विचारले.
"होय! मला तुमची ओळख त्यांच्याशी करून दिल्याशिवाय चैन पडणार नाही. लेट्स गो" ती आता चक्क नाचायची बाकी होती.
"पुन्हा केव्हातरी येईन. आज मी जरा बीझी आहे." मी न घाबरल्याचा अभिनय करत सांगितले.
"मी जास्त वेळ घेणार नाही. चला तर खरं!" असे म्हणत ती मला चक्क खेचू लागली. ही बया चांगलीच ताकदवान होती आणि जीम मधील प्रसंगानंतर माझी आर्धी हाडे खिळखिळीत झाली होती. आता ही मला फरपटत घरी घेऊन जाते का काय अशी मला भिती वाटू लागली. "बरं बुवा! ठीका आहे. येतो मी." असे म्हणत मी तिच्या पकडीतून माझा हात सोडवला आणि निमूटपणे तिच्या मागून तिच्या घरी पोहोचलो.
विश्रांतवाडी मधल्या एका बैठ्या घरात आम्ही प्रवेश करते झालो. तिने "रोव्हर! कम हियर!" अशी प्रेमाने हाक मारली. आतून पांढरट पिवळ्या रांगाचे एक गावठी कुत्रे बाहेर आले. त्याने माझ्याकडे पाहून जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. मी दबा धरून एका कोपर्‍यात सरकलो. "काहीही करत नाही तो! घाबरू नकोस" असे म्हणत तिने कुत्र्याला गोंजारायला सुरुवात केली. "रोव्हर! मीट माय न्यू फ्रेंड" असे म्हणत तिने मला जवळ बोलावले. मी जरा दबकत दबकतच पुढे सरकलो. पण त्या कुत्र्याला मी चोर वाटलो का काय कुणास ठाऊक. तो तिच्या हातून जो सुटला तो तडक माझ्या अंगावर धावून आला. मी अरे अरे म्हणायच्या आत त्याने माझ्या अंगावर झेप घेतली. त्याने त्याचे पुढचे पाय माझ्या खांद्यावर रोवले. ह्या अनपेक्षित प्रकाराने बेसावध असलेला मी धाडकन जमिनीवर कोसळलो. माझा पार्श्वभाग चांगलाच सडकून निघाला. पाठीचे अगोदरच धिरडे झाले होते, त्यात पुन्हा एकदा तिथेच धडक बसल्याने माझ्या मेंदूपर्यंत कळ गेली. "अगं आई गं!" मी जोरात बोंबललो. "काही नाही. खेळतो आहे तो तुझ्याशी! तू त्याला आवडलास वाटते! रोव्हर कम हियर" असे म्हणत तिने त्या जनावराला माझ्यापासून दूर केले आणि साखळीला बांधून ठेवले. मी कसाबसा उठून उभा राहिलो.
"खूप खट्याळ आहे हा! प्रत्येकाशी खेळायचे असते. पण खूप गुणी आहे हो! बस ना कोच वर!" तिने मला आसन दाखवले. माझी सगळी हाडे जागच्या जागी आहेत ह्याची खात्री करून मी त्या कोचवर बसलो.
"मी आपल्यासाठी चहा आणते!" असे म्हणून ती आत पळाली. मी घाबरून कुत्र्या साखळीला नीट बांधला गेला आहे ह्याची खात्री करून गृहनिरिक्षणाला सुरुवात केली. कोचवर दुसर्‍या कोपर्‍यात एक पांढर्‍या रंगाचे मांजर निपचीत पडले होते. तिने माझ्याकडे मान उचलून पाहिले आणि ती परत झोपी गेली. प्रिया आतून रोव्हरचे गुणगान गातच होती. मी फक्त "हो.", "अरे वा!", "सही!", "काय सांगतेस!", "खरंच?" असले उद्गार काढत बसलो होतो.
थोड्या दोन चहाचे कप आणि बशीभर बिस्किटे घेऊन प्रिया बाहेर आली. "मला किनई मारी बिस्किटंच आवडतात. त्यात साखर कमी असते ना! मी डाएटिंग करत आहे सध्या" अशी मौलिक माहिती देत तिने चहाचा कप माझ्या हातात दिला. मी बशीतले बिस्किट उचलले आणि चहात बुडवणार इतक्यात इतकावेळ निपचीत पडलेल्या मांजरीने अचानक झेप घेऊन माझ्या हातातले बिस्किट दातात पकडत पोबारा केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मी दचकलो, चहाचा कप हेंदकाळला आणि चहा माझ्या पॅंटवर नको तिथे सांडला.
"ओ! सॉरी. मी तुम्हाला सांगायलाच विसरले. मनी आहे ना! तिला असे अधांतरी बिस्किट धरले की वाटते की आपण तिला उडी मारून पकडायलाच शिकवतो आहे." मग ती मनीला ओंजारत लाडिकपणाने म्हणाली "मनी! सी! व्हॉट डिड यू डू! नॉटी गर्ल!!"
मनी बिस्किट खाण्यात गुंग होती. "तुमची जीन्स स्पॉईल झाली वाटते. सॉरी अबाऊट दॅट."
माझा चेहेरा आता अगदी रडकुंडीला आला होता. गरम चहा नको तिथे सांडल्यामुळे मला आधीच अस्वस्थ वाटत होते, पण ह्या बयेला त्याचे ना सोयर ना सुतक! "चला मी तुमची विठूशी ओळख करून देते." असे म्हणून ती मला दुसर्‍या खोलीत पोपटाच्या पिंजर्‍यापाशी घेऊन गेली. पिंजर्‍यात एक गुबगुबतीत पोपट आरामात बसला होता. मी त्याच्याकडे पाहून शीळ घातली. त्यानेही मला प्रत्युत्तर दिले. मी अजून थोडा पुढे सरकलो आणि "विठु विठु" असे म्हणालो. अहो अश्चर्यम! पोपटही "विठु विठु" असे म्हणाला. "अरे वा! मस्तच खेळतोयस तू त्याच्याशी!" प्रियानेही पावती दिली. मीही मनोमन खूष झालो. निदान एक तरी प्राण्याशी माझी गट्टी जमत होती. मी अजून थोडे पुढे होऊन पिंजर्‍याच्या गजांवर माझे नाक लावले आणि एक झकास शीळ घातली. पण त्या प्रकाराचा परिणाम मात्र भलताच झाला. त्या हरामखोर पोपटाने त्याची चोच बाहेर काढली आणि माझ्या नाकाचा कडकडून चावा घेतला. मी एक जोराची आरोळी ठोकली आणि नाक अक्षरश: मुठीत धरून तिथून पळ काढला. "अरे थांब! आपण तुझ्या जखमेवर मलमपट्टी करुया!" असे म्हणत प्रिया माझ्या मागून धावली. पण तिला न जुमानता मी जी धूम ठोकली म्हणून सांगतो, तो एका दवाखान्यात जाऊन थांबलो. बाहेर बसलेल्या रोग्यांकडे दुर्लक्ष करत मी तडक डॉक्टरांची खोली गाठली. माझ्या नाकाच्या जखमेतून भळाभळा रक्त वहात होते. ते पाहून डॉक्टरही क्षणभर भांभावले.
"काय झाले तुमच्या नाकाला?"
"पोपट चावला"
"पोपट? म्हणजे पक्षी?"
"होय."
"चावला?"
"होय."
"तुमच्या नाकाला?"
"होय हो!"
"तो कसा काय?"
मला ह्या डॉक्टरचा भयंकर राग आला. इथे माझ्या जखमेतून रक्त वहात होते. नाक भयानक दुखत होते आणि हा बाबा मला फाजील प्रश्न विचारत होता.
"मी जादुगाराने कैद केलेल्या राजकन्येला सोडवायला गेलो होतो. त्या जादुगाराचा जीव एका पोपटाच्या पोटात होता. त्या पोपटाला मी मारायला गेलो तर त्याने माझ्या नाकाचा चावा घेतला."
"मग त्या राजकन्येचे काय झाले?"
"मला काय माहित? मी तिथून पळून आलो. तुम्ही प्रश्न विचारणार आहात की ड्रेसिंग करणार आहात?"
"तुमच्या पॅंटला काय झाले?" माझ्या ओल्या जीन्स कडे संशयाने पहात त्यानी प्रश्न विचारला.
"तो जादुगार इतका भयानक होता की त्याच्याकडे बघून मला चड्डितच झाली. आता प्लीज काहितरी करा ना! माझे नाक भयानक दुखते आहे" मी अगदीच काकुळतीला आलो.
हो हो! असे म्हणत त्यानी माझी जखम पुसली. "टाके घालावे लागतील. ऑपरेशन थोडे अवघड आहे. काय आहे, नाकाला भूल दिली तर श्वासोछ्वास बंद पडून रोगी दगावण्याची शक्यता असते. चूक भूल द्यावी घ्यावी हे व्यापारात खरे असले तरी वैद्यकीय पेशात नसते. हॅ हॅ हॅ" डॉक्टरानी उगाचच एक पांचट विनोद केला.
"ठीक आहे. द्या भूल माझ्या नाकाला! गुदमरून मरून जाऊदे मला! मला मारून टाका! जिवंत ठेऊ नका!" आता माझ्या मस्तकात राग शिरला होता. मी जोरात मनात येईल ते बरळत होतो.
"अहो, तसे नाही! तुम्हाला पूर्ण भूल द्यावी लागेल. लोकल ऍनेस्थेशिया देऊन चालणार नाही. मी अत्ता असे करतो, तुम्हाला काही पेन किलर देतो. जखमेवर तात्पुरती मलमपट्टी करतो. तुम्ही उद्या ह्या पत्त्यावर मला भेटा."
मी दुसर्‍या दिवशी जाऊन नाकाला टाके घालून आलो. अपमान होण्याला नाक कापणे का म्हणतात हे मला त्या दिवशी कळाले.
त्यानंतर माझ्या मित्रानी माझी जी चेष्टा केली त्याबद्दल मी काय सांगू? पण ह्या प्रसंगानंतर मी धडा घेतला. पोरगी पटवणे हे वाटते तेवढे सोपे नाही. लांबवर जरी मुलगी दिसली तरी मी वाट बदलतो. परस्त्रीकडे ढुंकूनही पहात नाही. मी बरा आणि माझी तनहाई बरी.

गुलमोहर: 

आयला यड्या, द.मा. मिरासदारांकडे शिकायला होतास का रे?
ऑफिसात हसू दाबता दाबता पुरेवाट झाली की..
भोत आवड्या रे, भोत आवड्या!!

आयला, भारीये राव तु येडा का खुळा.. जबर्‍याच.........

मस्तच लिहीलंय!!! :))

नेहेमीप्रमाणेच छान ! जास्त करून पहीला अर्धा भाग !

येकीखु, येडे करणार तुम्ही वाचकांना Happy मस्तच लिहिलय.
-प्रिन्सेस...

हा हा हा !!!! खुर्चीतल्या खुर्चीत गडाबडा लोळलो ...... भन्नाट .

हा हा हा.. कसल धमाल लिहिल आहे...... अफलातुन.... ऑफिस मधे बसुन वाचल्याचा चांगलाच पश्चाताप होतोय

सहीच लिहिलंय!! ह ह पु वा!! Lol

Rofl
जबर्‍या रे येकाखु!! साजिराला मोदक.

जबरी रे बाबा जबरीच. हसुन लोळले.

मला खरच माहित नव्हत की पोरी पटवणं एवढं अवघड असतं. मी जादुगाराने कैद केलेल्या राजकन्येला सोडवायला गेलो होतो.>>> अप्रतिम!!! Happy Biggrin

I am not a complete idiot.. Some parts are missing!!

मंड्ळ आभारि आहे................

येड्या, अगदी प्रातिनिधीक! Happy
अस्सच होत होत हो आमच पण! Proud
आपला, लिम्बुटिम्बु

जबरा... ह ह पु वा, खल्लास लिहिल आहेस... वाईट्ट हसलो हापिसात बसुन, बंगुळुरातल्या आण्णांना सांगता पण येईना का हसतोय ते... Happy

ठीक आहे. मधून मधून रटाळ वाटले. पण शेवट विनोदी आहे. दॉक्तरच्या दवाखन्यातले संवाद मजेशीर आहेत.

मस्त लिहिलय Happy

छान लिहीलंय हो येडे तुम्ही.
पन्चेस अगदी सही आहेत.
नरभक्षक टोळीतली मुलगी, तारेचा ब्रश, अधांतरी बिस्किट
जाम हसले.

लय भारी राव.
ऑफीसमध्ये असताना वाचले, त्यामूळे हसू आवरणे कठीण झाले.

खी खी खी....भन्नाट आहे...:)

Pages