.

Submitted by संदीपसमीप on 27 January, 2011 - 09:31

कथा लिहावी म्हणतोय. मग कथाच लिहू म्हणाले...
तर, जर कथा लिहावी तर, [{(तर, आधीच वापरलाय याच वाक्यात तरी परत) आणि असेही नविन काय लिहायचे?} मुळात लिहायचेच का?] कथेला कथा तर असायला पाहिजे. मग कथेची कथा लिहू म्हणाले.
मग लिहावेच म्हणतोय.

DISCLAIMER:- या कथेत कोणीही मरत नाही. जगत असल्यास तशी शक्यता नाकारता येत नाही. कथेला सुरुवात नाही. शेवटाची शक्यता नाही. कथेची कथा लिहिली तरी त्यात कथा असेलच असे नाही. नायक आणि नायिका प्रेमात पडतात आणि पडल्यावर उठायचा कंटाळा येतो म्हणून पडून राहतात असा खुळचट प्रकार करायचा नाही तरी तो होणारच.

One more before we hit the road...

समोर जे काही आले ते घटाघटा पोटात ओतून दोघेही बाहेर पडले. रस्त्याला लाथा मारत. त्या लाथांचे समर्थन करणा-या गप्पा मारत. गप्पा संपण्यापूर्वीच समर्थनं संपली तर काय करायचे या विचाराने दोघांच्याही कपाळावर हळूहळू घाम जमा होत होता. त्या घामाच्या वासाने रस्ता जागा होत होता. मधुनच गुरगुरत होता. धूर सोडत होता. दोघांना मधूनच जाणवलेले रस्त्याचे अस्तित्व घामाचे उत्सर्जन वाढवत होते. मग पुन्हा तेच चक्र. प्रत्येक वेळेस अधिक विस्तारीत. अधिक तीव्र...
घाम - वास - जाग - रस्ता - अधिक घाम - अधिक वास - अधिक जाग - अधिक रस्ता - अधिकाधिक घाम - अधिकाधिक वास - अधिकाधिक जाग - अधिकाधिक रस्ता - चिंब - कुबट - सताड - वर्दळ.
कोणे एके काळी ते दोघेच निघाले होते याचा त्यांच्यासकट सगळ्यांनाच विसर पडला. सगळे एकमेकात सामावून गेले.
कॅस्ट्रोमियाकस आधी माणूस होता. मग त्याचे वाहन झाले. मग त्याचा रस्ता झाला. मग वाहनं त्याच्यावरून धावू लागली. कॅस्ट्रोमियाकस किंचाळला, नहीं! दोस्त तू मुझे अकेला छोडकर नही जा सकता! तो तसे किंचाळल्याबरोबर सगळी गर्दी थबकली. मग गर्दीतून एक-एक जण पुढे आला आणि त्याचा खांदा थोपटून म्हणू लागला, डर मत मेरे यार मै हूँ ना! तासनतास खांदा थोपटून घेतल्यावर ही दुसरीच वेदना त्याला जाणवली. सोबतच गर्दीची सहानुभूती अशी भरभरून वाहताना पाहून कॅस्ट्रोमियाकस विरघळला. गर्दीतच मिसळला. सगळे कॅस्ट्रोमियाकस एकमेकांच्या आधाराने, एकमेकांना तुडवत, कॅस्ट्रोमियाकस मार्गावरून, कॅस्ट्रोमियाकसच्या शोधात फिरायला लागले.

One more before we start the tale...

कितीही माज दाखवला तरी सुरुवात हा नुसताच reference point असतो. शेवटसुद्धा. म्हणून सुरुवात, कॅस्ट्रोमियाकसच्या खापरपणजोबांना भरदुपारी जी अचानक मोकळीक मिळाली तिचा त्यांनी कॅस्ट्रोमियाकसच्या खापरपणजींच्या नकळत दुस-याच कोणाच्या खापरपणजीसोबत एकांतात उपयोग केला तिथे होऊ शकते. किंवा कॅस्ट्रोमियाकसच्या आजीला आपल्या सुनेचा प्रचंड राग आला आणि ती तिला गावभर शिव्या देत सुटली, त्यातून ज्या भांडणाला तोंड फुटले ते भांडण निस्तरण्यासाठी शंभू महादेवाच्या एका लहानशा ब्रँचच्या प्रोप्रायटरला कॅस्ट्रोमियाकसच्या आईच्या अंगात शिरून कॅस्ट्रोमियाकसच्या आजीच्या कानफटात वाजवावी लागली यालाही आपण सुरुवात म्हणू शकतो. कभी भीड मे तनहा तनहा सहवासाची तहान लागते आणि Jack & Jill went up the hill... असे मोठमोठ्याने गात असताना कॅस्ट्रोबेगमीज खळखळून हसल्याने कॅस्ट्रोमियाकस दचकून ताशी २० मैल वेगाने एका ताटावरून उठून दुस-या ताटावर भिरभिरायला लागला ही सुरुवात मस्तच वाटेल. पण सुरुवात तर झालीय. दाखवायची कुठून इतकाच प्रश्न उरलाय. हा प्रश्न सोडवायला एखाद्या रात्री झोप शेजारच्या खोलीत बसून हवी तेवढी प्रायव्हसी देईलच तेव्हा बघून घेता येइल.
तर, जर कॅस्ट्रोमियाकस आहे तर त्याचा जन्मही झालाच असेल तर त्याचे बारसेही झाले असेल. कॅस्ट्रोमियाकसच्या बारशाप्रसंगी (त्याला माहित नव्हते की तो कॅस्ट्रोमियाकस आहे. माहित झाल्यानंतरही ते कळायला वर्षे जावी लागली. समजल्यानंतर बदलायची वेळ कधीच उलटली होती.) आधी एकही कॅस्ट्रोमियाकस हजर नव्हता. कार्यक्रमाच्या मध्यावर कुठेतरी, तिथे एक कॅस्ट्रोमियाकस होता. तो शाळेची पायरी चढला तेव्हा तेव्हा तिथे ५-६ कॅस्ट्रोमियाकस होते. शाळा संपेपर्यंत ६०-७० आणि त्याला नोकरी वगैरे लागली तेव्हा शेकडो - हजारो - लाखो...
आता कॅस्ट्रोमियाकस मार्ग आहे. महामार्ग व्हायच्या वाटेवर. आणि लवकरच रस्ता कॅस्ट्रोमियाकस. गाड्या कॅस्ट्रोमियाकस. चालक कॅस्ट्रोमियाकस. गर्दी कॅस्ट्रोमियाकस. जीवंत कॅस्ट्रोमियाकस. मृत कॅस्ट्रोमियाकस. आला तो कॅस्ट्रोमियाकस. गेला तो कॅस्ट्रोमियाकस. कॅस्ट्रोमियाकसच्या चामड्याचे बूट कॅस्ट्रोमियाकसच्या पायात. आणि कॅस्ट्रोमियाकस 'The Man' तुडवतोय कॅस्ट्रोमियाकस 'The Road' ला.
अती होतंय साल्या! कॅस्ट्रोमियाकस कानावर हात ठेवत माझ्या कानात ओरडला. मी कथेचे एक पान फाडले. त्याचे व्यवस्थित दोन तुकडे केले. त्या दोन्ही तुकड्यांच्या शक्य होतील तितक्या बारीक घड्या केल्या. त्या दोन्ही घड्या तोंडात चघळून नरम केल्या. तरीही उरलेल्या टोकेरी कडा नखांनी बुजवल्या आणि प्रत्येकी एक अशा दोन्ही कानात त्या फिट्ट बसवल्या. आधी उजव्या आणि मग डाव्या. उजवा हातावरचा थुंकीचा ओलसरपणा डाव्या खिशात ठेवलेल्या रुमालाने स्वच्छ पुसून काढला आणि मगच हात पुढे केला.
Glad to meet you Castromiacus. I am Castromiacus.

One more before the time stops...

त्याची बोटं थरथरत तिच्या केसांचा गुंता सोडवत होती. गुंता सुटत होता तसतसा त्याचा धीर वाढत होता आणि थरथर तिच्या अंगात भिनत होती. त्या थरथरीचे संगीत दोघांच्याही अंगात संचारल्यावर विचार मागे पडले. शब्दही...
I love you Kashtrobegumese. I love you. ढिल दिलेला पतंग कुठेतरी तरंगत खाली उतरतानाच त्याने मांजा लपेटून घेतला. तिने त्याला नुसताच सिगरेटचा धूर दिला. त्याने घाईघाईने त्या धूराला आकार देऊन I love you अशी अक्षरे बनवली. मग दोघेही मोठ्या समाधानाने धूरातल्या भगदाडांमधून एकमेकांना न्याहाळू लागले. धूरच तो. विरला.
नाही... माझे प्रेम इतके तकलादू, क्षणभंगूर नाही. माहित आहे मला. तरीही... ते खरंच इतकं क्षणभंगूर नाही. I know. You know? तिने पुढे केलेल्या हाताला गोंजारत गोंजारत त्याने प्रेमाचे सतराशे साठ पुनुरुच्चार केले. ती आठवण होताच कॅस्ट्रोमियाकस मार्गावर आनंदाच्या लाटा पसरल्या. च्यामायला! कुठेही कसे स्पीडब्रेकर बसवतात साले? कॅस्ट्रोमियाकसने आपली दुखावलेली पाठ स्वतःच थोपटली. चादरीच्या सुरकुत्या सरळ केल्या. झोपून घेतले. कॅस्ट्रोबेगमीजने झोपून घेतले. सुरकुत्यांवरून आठवले की, त्या यायला म्हातरपण यावे लागते. म्हातारपण येण्यासाठी जगावे लागते. चादरीसारखे. गरज असेल (दुस-याला) तेव्हा झाकत नाहितर स्वतःला दुमडून घेऊन एखाद्या कोप-यात पडून रहावे लागते. कॅस्ट्रोमियाकससुद्धा आक्रसला. स्वतःला दुमडून घेत घेत त्याचा झोपलेला गोळा कोप-यात सरकत राहिला.
काळ थबकला वगैरे वगैरे सगळे ठिकच. तसेच. सोयीसाठी थबकलेले.
कॅस्ट्रोमियाकस वाढला साहित्याच्या अंगणात. साहित्य म्हणजे दगड, धोंडे, लाकूड, ओंडके, लोखंड, धातू, प्लॅस्टिक आणि लिटरेचर. वाचल्यावर शब्द कळतात. आधीच कोणीतरी वापरून, चोखून उष्टावलेले. कळल्यावर जर ते मोकाट सुटले तर ते अक्षरश: फरफटत नेतात मन मानेल तिथे आणि रक्तही निघत नाही कुठून. समोर दिसलेली झाडाची सावली आतमध्ये कुठेतरी सुखावत असतानाच एखादी कविता मनात कुजबुजायला लागते आणि ते सगळं दुस-याच कोणाचंतरी. त्या वळकटलेल्या अवस्थेत कॅस्ट्रोबेगमीजला चाचपडणारी स्पर्शाची आठवण कितीही सुखद असली तरी च्यायला ती दुस-या कोणीतरी आधी मांडली होती म्हणून केवळ माहित असल्याने मला सुखावतेय? कि हे नविन काही आहे? माझे काही आहे? देहजाणीवेच्या प्राथमिक आणि उपजत ओढीपलिकडे खरच काही आहे कि नुसतेच शब्दांचे बुडबुडे? असण्या-नसण्याचे कौतूक नाही बे माझ्या कि-बोर्डा. तुला बडवण्यापलिकडे मी लेखक आणि म्हणूनच या विश्वाचा निर्माता असूनही माझ्या हातातल्या नाड्या आयुष्याला नाचवतायत कि फाटक्या चड्डीला अधांतरी डोलवतायत याचे आहे.
कथा लिहितो कि फिलॉसॉफी झाडतो?
कॅस्ट्रोमियाकस झोपलाय. कळत नाही का तुला?
उठव त्याला.
दमलाय.
बडवत रहा मग.
हो.
अनंतकाळ.
हो.
बडवत रहा मग.
दमलाय.
उठव त्याला.
कॅस्ट्रोमियाकस झोपलाय. कळत नाही का तुला?
कथा लिहितो कि फिलॉसॉफी झाडतो?

कॅस्ट्रोमियाकसला झोपून काही वर्षे झाली. झोप संपल्यावर लक्षात आले कि devotion is an art. भक्ती या कलेत पारंगत असणे किंवा त्या कलेचा किमान स्पर्श आपल्या आयुष्याला व्हावा ही सुखी समाधानकरक जगण्याची सर्वात प्राथमिक गरज आहे. कुठेतरी हात जोडले आणि चेह-यावर कुठल्याही कारणाने धन्य भाव उमटले कि त्यासारखे दुसरे आश्वासक व्यसन नाही. देवाची भक्ती, आई-बापांची भक्ती, प्रेमाची भक्ती, दु:खाची भक्ती, एखाद्या विचाराची असो वा विचारवंताची भक्ती. डोळे बंद. कान तृप्त. विचार दोन डोळ्यात आणि दोन कानांच्या खोलीत मृत. तुम्हाला काही वाटण्याची सगळी सूत्रेच कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लपवून केवळ आपल्याला बांधणा-या दो-यांवर नजर खिळवत जगत राहणे ही कलाच. कॅस्ट्रोमियाकसला आपल्या अंगात ही सुद्धा कला नसण्याचे अजब वाईट वाटले. परत झोपावे का? हा विचार करत करत त्याला पुन्हा झोप लागली. मग त्याने आपले केस भरभर वाढवले आणि आपल्याच हाता-पायांना बांधून टाकले. तेवढेही पुरेसे नसल्याचे कळल्यावर त्याने आपल्या चेह-यावर लहान लहान छिद्रे पाडली व त्यातूनही आपले केस गुंफले. आता त्याला उठावेसे वाटले की ते केस त्याच्या पायाना ओढतात, सैल सोडतात आणि तो उभा राहतो. काही दिसले कि पापण्यांमधे ओवलेले केस त्याच्या पापण्या विस्तारतात आणि हात टाळ्या वाजावतात. total devotion to himself! काहितरी चुकतेय. सगळे पूर्ववत झाले आणि त्याला जाग आली.

गुलमोहर: 

.