कुत्र्याविषयी थोडे..

Submitted by अजय भागवत on 21 January, 2011 - 19:41

लहानपणी कुत्रा पाळण्याचा हट्ट पालकांकडे करणारे अनेक असतात. अशा हौशीपायी कुत्र्यांबद्द्ल अनेक गमतीजमती माहीती झाल्यात, त्याच येथे मांडल्या आहेत.

कान आणि नखे

पाळलेल्या पहील्या कुत्रीचे नाव लायका ठेवले होते. लायका हे रशियाने मानवाला अंतराळात पाठवण्याआधी ज्या कुत्रीला पाठवले होते तिचे नाव. जिन्याखालील त्रिकोणी जागेत तिचे घर मस्तपैकी सजवले होते. तिला पिल्ले झाली, त्यात प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्ठ्य समजुन घेता-घेता माहीती साठत गेली.
Laika.jpg

असे लक्षात आले की, सरळ कानाचा कुत्रा जास्त तिखट असतो, तो अंगावर धावुन येतो, भुंकतो, घाण खात नाही. ह्याउलट खाली कान पडलेले कुत्रे तुलनात्मक सौम्य असतात. कुत्रीला ४-५ पिल्ले झाली की, एखाद-दुसरे सरळ उभ्या कानाचे पिल्लू असते.
नखांच्या संखेवरुनही कुत्र्याचा स्वभाव ओळखता येतो. कुत्र्याला पुढच्या पायाला नेहमी ५-५ नखे असतात- ४ पंजाला व एक थोडे वर-मागील बाजुला (आपल्या पायाच्या घोट्याजवळ येइलसे).
DogDewClawJake1_wb.jpg

पण मागच्या पायांची नखसंख्या मात्र वेगवेगळी असते. ढोबळमानाने ८०% कुत्र्यांच्या मागील पायाला ४-४ नखे असतात. उरलेल्या २०% कुत्र्यात ५-४, ५-५, ५-६, ६-६ अशी संख्या असु शकते. मी ह्यातील प्रत्येक प्रकारचे कुत्रे पाळलेले आहे. आम्ही अशा कुत्र्यांना त्यांच्या नखांवरुनच ओळखत असु- १८ नखी, १९, २०, २१, २२ नखी. त्यात एखादे कुत्रे सरळ कानी असेल तर डब्बल धमाल. जितकी जास्त नखे, तितके ते कुत्रे हुशार असते.
800px-HindLegDualDewClaw.jpg

कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावरुन उचलूनच आणावे लागे (किंवा एखादा दयाळू हवे तर एखादे पिल्लू घेऊन जा असे सांगे)- दुकानातून विकत आणणे वगैरे प्रकार अलिकडचे. मित्र-मित्र मिळून कुत्रा-शोध मोहीमेला जात असु. कुणाकडे तरी आधीच माहीती आलेली असे की, अमक्या-तमक्या गल्लीत कुत्र्याची पिल्ले बघितली. मग त्या पिल्लांच्या वर्णन करण्यात तो रमुन जाई. त्यात अनेक बाता पण मारल्या जात. "त्याच्या कपाळावर टिळा आहे / ओम आहे", "काळे-पांढरे ठिपक्यावालं पिल्लू सरळ कानावालं आहे". कधी एकदा जाऊन ती पिल्ले डोळे भरुन पाहतोय असे सगळ्यांना होई. पिल्ले शोधतांना सतत मागील पायाकडे लक्ष ठेवुन जास्तीत जास्त नखांचे कुत्रे मिळवण्यासाठी धडपड असे. असे कुत्रे मिळाले की, इतका आनंद होई की बस!

पाळणे व गमावणे

पिल्लू रस्त्यावरुन आणलेले असल्यामुळे ते अगदी घाणेरडे जरी नसले तरी, असेच धरुन न आणता, पोत्यात घालून आणत असु. म्हणजे कुत्रीपण मागे लागायची शक्यता नसे. घरी आणून धाब्यावर नेले जाई व त्यास आंघोळ घालून त्याच्या अंगावरील / कानातील जळवा-सदृश आळ्या काढल्या की, एकदम शांतपणे झोपी जाई. ह्यानंतर नामकरण केले जाई व भरपूर दुध आणि त्यात चपात्या कुस्करुन त्याच्या दिमतीला ते ठेवले जाई. रात्रभर कुई-कुई करत त्यास आईची आठवण येई, आम्हालाही वाईट वाटे पण स्वत:ला समजावत असु की, अरे, आपण तर ह्याची जास्त काळजी घेतोय, वगैरे. कुई-कुई आवजाने शेजारी वैतागुन जात पण शेजारी समंजस असत.
दुस-या दिवशी शाळेत गेलो की, घरी येई पर्यंत त्यास खाऊ-पिऊ घालायची जबाबदारी अर्थातच घरच्यांची असे. असे दोन-चार दिवस गेले की, ते पिल्लू अचानक गायब होई; रात्रीतून, किंवा, दिवसा. कसे ते आजपर्यंत नाही कळले. मग पुन्हा नवा शोध सुरु.

काही प्रसंग

कुत्र्याइतका लोभस पाळीव प्राणी नाही असे माझे ठाम मत आहे. सध्या ताण घालवण्यासाठी अनेक जण कुत्रे पाळतात. दिवसभरचा थकवा / शीण एका मिनीटात घालवण्याची किमया ह्या कुत्र्यात असते. ते तुमच्याशी खेळू लागते, आढून बाहेर घेऊन जाते, कोप-यातील एखादी त्याची नेहमीची वस्तू तोंडात धरुन घेऊन येते व तुमच्या समोर टाकून लांबवर जाऊन उभे राहते व सांगते, की, टाक ती वस्तू, मी घेऊन येतो. बाहेर जायचे असल्यास, गाडीचे दार उघडले की, आधी आत जाऊन बसते. फार मजा येते.
800px-Puppy_near_Coltani_-_17_apr_2010.jpg

एका स्नेह्यांकडे कुत्रे पाळले होते. ते त्यास कधीच बांधून ठेवत नसत. त्यामुळे ते जितके तास घरी असे त्यापेक्षा जास्त बाहेर असे. कधी-कधी २-३ दिवसांनी परत येई. त्यांच्याकडे घरी दत्ताचे पारायण होत असे व अनेकदा हे कुत्रे त्यावेळेस देवघरासमोर बसलेले असे. ह्या कुत्र्याचा किस्सा असा आहे- ह्याच्या बाहेर जाण्याच्या सवयीमुळे त्याला इतर गल्लीतील कुत्र्यांच्या भांडणास तोंड द्यावे लागे. अशाच एका भांडणातून ह्याला खोल जखमा झाल्या पण हे कुत्रे घरी न येता समोरील इमारतीच्या जिन्याखाली जाऊन बसले. असेच एक-दोन दिवस गेले, येणारे-जाणारे त्यास बाहेर बोलवत पण ते अंगावर येई. मग कुणीतरी त्याच्या मालकाला कळवले. ते तिथे गेले, त्यास बाहेर काढले, व जखमांना उपचार केले. डॉक्टर म्हणाले की, ह्याला आता अजिबात बाहेर जाऊ देऊ नका, नाहीतर.. म्हणून त्यास त्यांनी पहील्यांदा बांधले. ते शांत राहीना; भुंकणे सतत चालू राहील्यामुळे, त्यास त्यांनी नाईलाजाने सोडले. त्याच क्षणी त्याने भिंतीवरुन ऊडी मारली व पसार झाला. जे व्हायचे ते झालेच. परत त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला व पुन्हा त्यास अधिकच जखमी केले. पुन्हा हे महाशय त्याच जिन्याखाली लपले. आता मात्र तो फारच जखमी झाला होता व येणा-या- जाणा-यांवर भुंकतही होता. तेथील लोकांनी ताबडतोब मालकांना सांगितले. ते आले व त्याची अवस्था पाहून म्युनिसीपालटीला फोन केला आणि त्यास घरी घेऊन आले.
थोड्यावेळाने श्वासपथक आले. त्यांच्या पिंजरागाडीत आणखीही काही कुत्रे होती. ह्याला जणू काही पुढचे कळाले. हा अंगणात होता; तो जागचा उठला व घरात गेला. मालकांनी त्यास खास केक आणला होता, जाण्याआधी त्यास खाऊ म्हणून. तो त्याला खाण्यास देऊ लागले पण त्याने तो खाल्ला नाही. देवघरात गेला, काही क्षण तेथे बसला. उठला, घरातील प्रत्येक खोलीत जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जवळ गेला, अंगावरुन हात फिरवुन घेतला व तसाच बाहेर जाऊन स्वतः त्या पिंजरागाडीत बसला. जातांना भुंकलाही नाही. हा प्रसंग त्या गल्लीतील अनेकांनी पाहीला आहे व ते आजही ह्याची आठवण काढतात.

त्यांचे नियम / प्रशिक्षण

YellowLabradorLooking_new.jpg

कुत्र्याला शिक्षण देऊन त्यास आणखीही काही महत्वाच्या कामासाठी निवडायचे असेल तर त्याची पहीली चाचणी असते. शिक्षक एक चेंडू लांबवर फेकतात. जो कुत्रा तो चेंडू परत आणून देतो तो कुत्रा शिक्षण-योग्य आहे असे मानतात. कुत्रा प्रशिक्षक त्या कुत्र्याच्या मालकाच्या मदतीने त्यास शिक्षण देतो. एका प्रकारात त्यांना एखाद्या पासवर्डची ओळख दिली जाते. उदा, जर कुत्र्याला एखाद्याच्या अंगावर धावुन जायला भाग पाडायचे असेल तर त्या कुत्र्याचा मुड अचानक हिंस्र करावा लागतो. ह्यासाठी ते मालकाला एक पासवर्ड म्हणण्यास सांगतात, त्यांनी तो शब्द उच्चारता क्षणी प्रशिक्षक त्या कुत्र्यास काठीने मारतो. तसे केल्याने तो कुत्रा रागावेल असे बघितले जाते. कालांतराने तो पासवर्ड उच्चारला की, कुत्रा एकदम हिंस्र होतो व मालक सांगेल त्याच्या अंगावर धावुन जातो.

एकाने सांगितले की, कुत्रा एखाद्या गल्लीत, मोकळ्या जागेत स्वतःची मालकी स्थापीत करतं. त्यासाठी ते चार दिशांना जाऊन एकेका जागी लघवी करतं; हीच त्याची सीमाआखणी. दुसरा कुत्रा आला की, त्यास तो वास येतो आणि त्यानुसार त्यास कळतं की, हे राज्य कोणाचंतरी आहे. त्यास ते राज्य बळकावायचं असेल तर अर्थातच त्या दोघांची मारामारी ठरलेलीच. ती होते, बलाढ्य कुत्रे जिंकते व त्यावर कब्जा घेते. नियम असा आहे की, एका ठिकाणी दोन कुत्रे नाही! मात्र ह्याउलट जर ती कुत्री असेल आणि जागा कुत्र्याने आखलेली असेल तर एका भांडणानंतर -जे अगदी लुटूपुटू असते- त्यांच्यात समेट होऊ शकतो; पण एकदा तरी भांडण होतेच. आणि तिस-या प्रकारात जर बाहेरुन आलेली कुत्री असेल तर, आणि जागा कुत्रीनेच आखलेली असेल तर ती, आलेल्या पाहुणीला त्याजागेत राहू देते- भांडणाशिवाय!!

कुत्रा पाळण्याचा एकमेव तोटा असा की, तुम्ही त्यास एकटे ठेवुन जाऊ शकत नाही. सध्या त्यांच्यासाठी पाळणाघरं झालेली आहेत पण ती फार महाग वाटतात. त्यामुळे त्यास बरोबर घेऊन जाणे दरवेळी शक्य होतेच असे नाही. म्हणून मग एखाद्याला घरी रहावे लागते. पण कुत्र्यामुळे मिळणा-या अनंत वात्सल्यपुर्ण क्षणांसमोर तो त्रास फिका पडतो.

खात्री आहे की, इतरांकडेही कुत्र्यांबद्दल सांगण्यासारखे अनेक किस्से असतील; म्हणून ते ऐकण्यासाठी येथेच थांबतो.

[लेखातील चित्रे विकीपेडीयावरुन साभार]

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त माहिती. खरं प्रेम असल्यशिवाय इतकी जवळीक अशक्यच.. आवडले. अजून दुसरा भाग व पुढेही लिहा.

खूप छान माहिती दिलीत. मला अगदी लहानपणापासूनच कुत्र्यांबद्दल अतिशय सॉफ्ट कॉर्नर आहे.

कुत्र्यांवर आधारित एक जपानी चित्रपट आहे, जमल्यास व मिळाल्यास नक्की बघा. त्याचं नाव - 10 promises to my dog.

खरंच छान लेख, पण अजून विस्तारता येईल. प्रत्येक कुत्रा हा घरातील एक व्यक्तीच बनून जातो, आणि आठवणीतही राहतोच राहतो.

कालच Beverly hills-chihuahua पाहिला. माझं आणि लेकाचं कुत्राप्रेम दिवसेंदिवस वाढतच चाल्लंय. तुमच्या लेखाने आणखी काही गोष्टी कळल्या.

छान लेख. अजून लिहा म्हणजे आम्हालाही काही माहिती मिळेल.

मी लहान असताना आमच्या इमारतीतील एका कुत्र्याच्या जोडीदारीणीला पिल्ले झाली. ती कुत्री बेवारस होती. आमच्याच इमारतीच्या मागच्या बाजूला तिचे बाळंतपण झाले. चार पिल्ले होती. त्यांना आता सांभाळणार कोण? दोन पिल्ले कोणाकोणाला देऊन टाकली गेली आणि दोन पिल्लांची जबाबदारी जवळच्या गॅरेजच्या मालकाने घेतली. त्या पिल्लांची साफसफाई, डॉक्टरकडे ने-आण, त्यांचे खाणे-पिणे वगैरे गॅरेजमधील मेकॅनिक करत असत. मी फक्त त्या पिल्लांशी खेळायचे काम करे! Happy दिवसभर ती बांधून ठेवलेली असत. रात्री मोकाट. गॅरेजचा मालक त्यांना घरी घेऊन जाऊ शकत नव्हता.

इतर लोकांना सांभाळायला दिलेली दोन पिल्ले काही महिन्यांतच परत आली. दोघेही पार अशक्त झाली होती. मी त्यांना खाऊ-पिऊ घालायचा प्रयत्न केला, पण अन्नाला स्पर्शच करत नव्हती. गॅरेजवाल्याने त्यांना डॉक्टरकडे नेऊन आणले, पण सुधारणा नव्हती. त्यातील कुत्र्याने एके सकाळी आमच्या घराच्या दाराबाहेर राम म्हटला. कुत्री होती ती अशीच एके दुपारी घरात शिरली. एरवी ती घरात येत नसे. तिला तसे बजावले होते. पण त्या दिवशी ऐकेचना. माझ्याजवळ येऊन बसली. मी तिला थोपटत राहिले. तिथेच तिने प्राण सोडले.

एक-दीड वर्षाने उरलेली दोन्ही पिल्ले मोठी झाली, देखणी दिसू लागली. एक कुत्रा होता आणि एक मादी. त्यातील मादीला दिवस गेले, बाळंतपण पुन्हा आमच्या इमारतीच्या मागच्या बोळात. पण मजा अशी की ती नेहमीच्या कोणा मेकॅनिकला, गॅरेज मालकाला जवळ येऊ देईना! शेवटी ते मला बोलवायला आले. मला मात्र तिने काहीही न कुरकुरता जवळ येऊ दिले, प्रेमाने थोपटू दिले. तिलाही चार पिल्ले झाली होती. पुढचा आठवडाभर तिला खाऊ-पिऊ घालायचे काम माझ्याकडे आले, कारण ती पिल्लांच्या जवळपास इतर कोणाला फिरकू द्यायची नाही. मग नंतर हळूहळू इतरांना मुभा मिळाली. काही दिवसांतच तिला ह्या नवमातृत्वाचा कंटाळा आला असावा. आधी ती रात्रभर इकडे तिकडे भटकत असायची, आता तिला पार बांधल्यासारखे झाले होते. पण पिल्लांना एकटे सोडून जायला तिचा जीव राजी नसायचा. मग तिला बाहेर फिरायला जायचे असले की ती आमच्या दारावर पंजाने टोकरायची. माझ्या स्कर्टला आपल्या दातांत पकडून मला त्या बोळात घेऊन जायची. मग मान वाकडी करुन माझ्याकडे जणू ''सांभाळ आता माझ्या लेकरांना,'' असे म्हटल्यागत बघायची आणि नंतर सुसाट छू! दहा-पंधरा मिनिटांनी मीच कंटाळून तिला हाक मारायचे. मग थोड्यावेळाने तीरासारखी धावत यायची, लाडाने मला ढुशी द्यायची आणि आपल्या पिल्लांना पाजायला घ्यायची.
तिची पिल्ले अशक्त होती, फार जगली नाहीत. शिवाय रस्त्यातून रात्री हिंडणार्‍या उंदीर-घुशींनीही त्यांना सतावले असावे.

पुढचे एक-दीड वर्षे ती कुत्री टिकली. पण मग कुत्र्यांची लढाई, जखमी होणे ह्यात आजारी पडली आणि तिचा अंत झाला. तिच्याबरोबरचा कुत्रा मात्र नंतर अनेक वर्षे जगला.

माहितीपूर्ण लेख. आवडला.
कुत्रा हा प्राणी खूप प्रेम लावतो.
आणि जेव्हा पाळलेला कुत्रा जग सोडून जातो तेव्हा,
ते दु:ख पचवणं फार जड जातं. (स्वानुभव)

अरुंधती, सविस्तर प्रतिसादातून आणखी ह्या प्राण्याच्या हुशारीचे पदर उलगडत गेले. कोणताही पाळलेला प्राणी जातो पण चटका लावतो; पण कुत्रा जास्तच.
इतिहास सांगतो की, गेल्या अनेक शतकांपासुन मानवाचा मित्र म्हणूनच त्याचा वावर होता. त्याची जनुकं त्यामुळेही अधिकाधिक मानव-निगडीत होत गेले असावेत.

तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद पाहून मला हा लेख लिहील्याचे समाधान मिळाले.

झुलेलाल, सायो, आऊटडोअर्स, शैलजा, chamaki, दिनेशदा, रुणुझुणू, अश्विनीमामी, UlhasBhide तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद देऊन पोहोच दिल्याबद्द्ल आभारी.

मनोगतावर वाचला हा लेख !!!

मस्त आहे !!!

मलाही एक कुट्र्यांची पेयर पालायची आहे ...ग्रेट डेन च विचार आहे ...

कारवानी, ऑल्सेशियन ही मस्त दिसतात ...रॉट्वायलर घे असे एका मिताने सांगितलय ....

बघुया..

<असे लक्षात आले की, सरळ कानाचा कुत्रा जास्त तिखट असतो, तो अंगावर धावुन येतो, भुंकतो, घाण खात नाही. ह्याउलट खाली कान पडलेले कुत्रे तुलनात्मक सौम्य असतात. > अमान्य. तस असत तर वर्किंग ब्रीडस् सगळीच उभ्या कानाची असती. व्हॉट अबाउट डॉबरमन, रॉटवायलर, मॅस्टीफ ?

सरळ (उभ्या) कानाच्या कुत्र्याला जास्त चांगल्या प्रकारे ऐकू येते, पण धावताना हेच उभे कान तेव्हढे मदतीला येत नाहीत. बहुतांश (साईट / स्मेल) हाउंडस् चे कान पडलेले असतात ते याकरताच. पण उभ्या कानांचा कुत्रा जास्त उंच दिसतो त्यामुळे त्याला जास्त आदर मिळू शकतो (ईतर कुत्र्यांकडून).

<< कुत्रीला ४-५ पिल्ले झाली की, एखाद-दुसरे सरळ उभ्या कानाचे पिल्लू असते. >>

कानाची ठेवण ही पूर्णपणे आनुवंशिक असते.

<<नखांच्या संखेवरुनही कुत्र्याचा स्वभाव ओळखता येतो. कुत्र्याला पुढच्या पायाला नेहमी ५-५ नखे असतात- ४ पंजाला व एक थोडे वर-मागील बाजुला (आपल्या पायाच्या घोट्याजवळ येइलसे). पण मागच्या पायांची नखसंख्या मात्र वेगवेगळी असते. ढोबळमानाने ८०% कुत्र्यांच्या मागील पायाला ४-४ नखे असतात. उरलेल्या २०% कुत्र्यात ५-४, ५-५, ५-६, ६-६ अशी संख्या असु शकते. मी ह्यातील प्रत्येक प्रकारचे कुत्रे पाळलेले आहे. आम्ही अशा कुत्र्यांना त्यांच्या नखांवरुनच ओळखत असु- १८ नखी, १९, २०, २१, २२ नखी. त्यात एखादे कुत्रे सरळ कानी असेल तर डब्बल धमाल. जितकी जास्त नखे, तितके ते कुत्रे हुशार असते. >>

नखांची संख्या वगैरे बरोबर पण नखांच्या संख्येवर हुशारी अवलंबून असणे पटत नाही.

<<कुत्र्याला शिक्षण देऊन त्यास आणखीही काही महत्वाच्या कामासाठी निवडायचे असेल तर त्याची पहीली चाचणी असते. शिक्षक एक चेंडू लांबवर फेकतात. जो कुत्रा तो चेंडू परत आणून देतो तो कुत्रा शिक्षण-योग्य आहे असे मानतात. >>

पटत नाही. एखादी गोष्ट आणून देणे अथवा रिट्रिव्हिंग हे जातिवंत रिट्रीव्हर्स (गोल्डन, लॅब्रॅडॉर, चीजपेक बे) च्या रक्तात असते. तरीही ते त्यांना "शिकवायला" लागते. कुत्र्याचे कुठच्याही प्रकारचे शिक्षण हे बेसिक कमांडस् ओबिडियन्सपासूनच सुरु होते. ते झाल्यावरच पुढील शिक्षणाची सुरुवात.

प्रोफेशनली काम करणार्‍या कुत्र्यांच्या निवडीकरता शक्यतो त्याच प्रकारचं काम करणार्‍या आईवडिलांची पिल्ल निवडली जातात. त्यात कामाची आवड असणं, त्यासाठी लागणारी अंगभूत गुणधर्म असणं, शिकायची तयारी असणं आणि उत्सुकता असणं हे गुणधर्म काळजीपूर्वक तपासले आणि जोपासले जातात.

ह्याशिवाय प्रत्येक कामासाठी वेगवेगळे गुण लागतात. वर्किंग डॉग्ज हे अत्यंत विविध तर्‍हेची काम करतात. गाईड फॉर ब्लाईंडस्, गार्डींग, हर्डींग, पॉईंटींग, रिट्रीव्हिंग, फ्लॅशिंग, रेस्क्यू डॉग्ज, ट्रॅकिंग, ड्रग्ज डिटेक्शन, माईन डिटेक्शन, पोलिस असिस्टन्स (ह्यात वेगवेगळे रोल्स असतात)

<<कुत्रा प्रशिक्षक त्या कुत्र्याच्या मालकाच्या मदतीने त्यास शिक्षण देतो. एका प्रकारात त्यांना एखाद्या पासवर्डची ओळख दिली जाते. उदा, जर कुत्र्याला एखाद्याच्या अंगावर धावुन जायला भाग पाडायचे असेल तर त्या कुत्र्याचा मुड अचानक हिंस्र करावा लागतो. ह्यासाठी ते मालकाला एक पासवर्ड म्हणण्यास सांगतात, त्यांनी तो शब्द उच्चारता क्षणी प्रशिक्षक त्या कुत्र्यास काठीने मारतो. तसे केल्याने तो कुत्रा रागावेल असे बघितले जाते. कालांतराने तो पासवर्ड उच्चारला की, कुत्रा एकदम हिंस्र होतो व मालक सांगेल त्याच्या अंगावर धावुन जातो. >>

ट्रेनिंगमध्ये शक्यतो कुत्र्याला मारले जात नाही. अर्थात प्रत्येक ट्रेनरची पद्धत वेगळी असते, तरीही ट्रेनिंगदरम्यान कुत्र्याला मारणारा प्रशिक्षक आढळल्यास त्याला (परिक्षकाला) त्वरीत बदलावे.

<<एकाने सांगितले की, कुत्रा एखाद्या गल्लीत, मोकळ्या जागेत स्वतःची मालकी स्थापीत करतं. त्यासाठी ते चार दिशांना जाऊन एकेका जागी लघवी करतं; हीच त्याची सीमाआखणी. ....... तिस-या प्रकारात जर बाहेरुन आलेली कुत्री असेल तर, आणि जागा कुत्रीनेच आखलेली असेल तर ती, आलेल्या पाहुणीला त्याजागेत राहू देते- भांडणाशिवाय!! >>

लांडग्यांपासून चालत आलेला प्रकार. शिवाय ही वासाची खूण जेव्हढ्या उंचावर असेल तेव्हढा ती खूण करणारा प्राणी उंच (व बलवान) असल्याचा मेसेजही मिळतो. पण दोन कुत्र्यामधले परस्पर संबंध समजणे एव्हढे सोपे निश्चितच नाही. उदा. : माझ्याकडे सध्या बॉक्सर आणि डॉबरमन अशा दोन फीमेल्स आहेत आणि मी त्या दोघींना एकत्र सुट्या ठेवू शकत नाही. ह्याच्या कारणाला किरु साक्ष आहे. Proud

<<कुत्रा पाळण्याचा एकमेव तोटा असा की,>> अजून एक त्रास असतो हो, कुत्र्यांचा लाईफस्पॅन १३ ते १५ वर्षांचा Sad त्यांचा मृत्यू मात्र खूप चटका लावतो.

ह्या लेखावरुन तुमच श्वानप्रेम मात्र जाणवतं. अजून एक समानधर्मी मिळाल्याचा आनंद वाटला. पुलेशु.

नखांच्या संख्येचा आणि कुत्र्याच्या शहाणपणाचा थेट संबंध असतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.. अर्थात सँपल साइझ फार मोठा नसल्याने ते सर्वसाधारण विधान आहे असे मी म्हणणार नाही. पण इतर श्वानप्रेमींनादेखील हा अनुभव आल्याचे बरेचदा ऐकले आहे..

एकुणात लेख आवडला अजय..

असुदेने लिहिल्याप्रमाणे कुत्रा गेल्यावर जे तीव्र दु:ख होतं त्याची तुलना मी कशाशीच करु शकणार नाही.. मी खूप कुत्री पाळली.. काही पळाली, काही लवकर गेली, काही बाळंतीण होउन, फुलो-फलो स्टाइलने म्हातार्‍या होउन गेल्या.. पण आमचा वान्या गेल्यानंतर तर मी आयुष्यात पुन्हा कुत्रा पाळेन असे वाटत नाही.. असा कुत्रा नशिबाने मिळतो कधीतरी.. नशीबच त्याला हिरावूनही नेतं..

इथे अनुभवी श्वानप्रेमी दिसतायत, म्हणुन विचारतेय्...कुत्र्याला घरी थोडा वेळ तरी एकटं रहाण्याची सवय कशी लावायची ? माझ्याकडे पॉमेरिअन कुत्री आहे, एक वर्षाची, ती घरात अज्जिबात एकटी रहात नाही, एकदा घरात खिडकीला साखळीने बांधुन ठेवली तर खिडकीचे पडदे, आसपासचे कपडे, जवळच्या खुर्चीचे कुशन,इतकंच काय...बेडवरची गादी ओढुन फाडुन ठेवली ! दुसर्‍या वेळी घर बंद करुन पॅसेज मधे मोकळी सोडली तर शी-शू करुन सगळं घाण करुन ठेवलं ! ओरडलं तर कान पाडुन, शेपटी आत घालुन इतका अपराधी चेहरा करुन खुर्ची खाली जाऊन बसते की काही रागावताही येत नाही.

टण्या, एक दिवस बोलायच आहे तूझ्याशी वान्याबद्दल.

नख्यांचा शहाणपणाशी संबध कसा आहे ? फक्त अनुभवावरुन सिद्ध नाही होणार ना. प्रश्न पडायच कारण असं की कुठल्याही पुस्तकात काहीच माहिती दिली नाहीये याबद्दल. Sad

त्रिविक्रमाक्रा, १००० मोदक. जर्मन शेफर्ड अर्थात ऑल्सेशियन हे सर्वात लाडकं ब्रीड माझं. पण ग्रेट डेन, रॉटवायलर, डॉबरमन सारखे ऑप्शनही तसेच तोलामोलाचे Happy

पंत, बोलू या एकदा या विषयावर. तुमची एक्झॅक्ट रीक्वायरमेंट समजली की सल्ला देणं सोप्प जाईल.

चमकी,

तीला एकट का सोडावं लागतय ? दुसरा काही उपाय नाही आहे का ? तस असेल तर तीला थोडा थोडा वेळ एकटेपणाची प्रॅक्टीस करवा.

बरोबर वागल्यास बक्षीस आणि चूकीच वागल्यास शिक्षा हे परीणामकारक ठरु शकतं. तीला खेळण्यासाठी काही तरी देउन बघा.

तूम्ही घरी असताना सतत अटेंशन देता का ? अटेशंन सिकींग हा प्रॉब्लेम असू शकतो.

धन्यवाद असुदे......मी घरुन काम करत असल्याने, दिवसभर आम्ही दोघी सत्तत्तच एकमेकींबरोबर असतो. कधीतरी सगळ्यांना एकत्र जेवायला किंवा फंक्शंनला बाहेर जायचं असलं तर मग प्रॉब्लेम होतो. खेळणं देऊन पाहिलंय आता पुढच्या वेळी chewing bone देऊन बघते...कारण ते संपेपर्यंत तिला दुसरं काहीच सुचत नाही !

मस्त लेख आहे...
मला पण घरी एक कुत्रा पाळायचा आहे.. पण आम्ही पुर्ण शाकाहारी आहोत..असे असेल तर चालु शकते का ? कुत्र्याला बरेचदा नॉनव्हेज लागते असे ऐकले आहे..

मंगेश
लोकसत्ताच्या (बहुदा चतुरंग) पुरवणीत ह्याबद्दल लेखमाला सुरू झाली आहे. आत्ता लोकसत्ताची साइट उघडत नाहीये, नंतर तुम्हाला लिंक देते.

मंगेशा, नो प्रॉब्लेम. आपण जे खातो ते कुत्रा खाउ शकतो.

अगदीच वाईट वगैरे वातत असेल तर रेडी डॉग फूड घालू शकता.

रुनी, खालील दुवे तर नव्हेत?

1. मनुष्य-प्राणी
(लोकरंग/जाणिवा)
... असाच अनुभव पाळीव प्राण्यांच्या सहवासाने येत असावा. कुत्रा, मांजर हे पाळीव प्राणी कुणा पुराणपुरुषाच्या मनाचे सजीव, तरीही आदिबंधात्मक रूप म्हणून भवतीच्या रिकामपणात अर्थपूर्ण वाटणारे सोबती असावेत काय, असा ...

2. पेट’ डॉक्टर
(वृत्तांत/पुणे वृत्तान्त)
... यांच्याकडून प्रात्यक्षिक अनुभव घेत आहेत. डॉ. गोऱ्हे यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक प्राणी रुग्णांची संगणकीय नोंद ठेवली जाते. उदा. एखादा कुत्रा, तो कुठल्या जातीचा (डॉबरमन, जर्मन शेफर्ड, गावठी इ.) त्याचे वय, ...

अजय
लोकसत्ताच्या रविवारच्या लोकरंग पुरवणीत 'सख्खे सोबती' सदरात डॉ. सागर भोंगळे लिहीतात.
ही त्याची लिंक http://loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=bl...

छान माहितीपूर्ण लेख आहे.

कुत्र्यापेक्षाही लोभस पाळीव प्राणी म्हणजे मांजर. मांजरींना नखं नसली तरी त्या हुशारच असतात असा माझा अनुभव आहे Happy

वान्याबद्दल इथे वाचा: http://www.maayboli.com/node/1633 प्रत्येक लेखाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक आहे.

सिंडाक्का, हाच तर प्रॉब्लेम आहे. मांजरं हुशारच असतात. आधी शास्त्रज्ञांना वाटलेलं की मांजर बेअक्कल असतं म्हणून ते शिकत नाही, नंतर त्यांना कळलं की ते खूप हुशार असतं म्हणून ते काही शिकत नाही. Happy तसही मांजर जेवण्याखाण्यासाठी व रहाण्यासाठी माणसावर फारसं अवलंबून रहात नाही, म्हणून ते फारस शिकायच्याही भानगडीत पडत नाही.

आणि मांजरींना नख असतात की, फक्त समस्त मार्जारवर्गीय प्राण्याप्रमाणे त्या ती ईच्छेनुसार आतमध्ये घेउ शकतात

Pages