क्वांटास - एक मजेदार अनुभव भाग १

Submitted by दिनेश. on 19 January, 2011 - 09:11

(ट्रांझिट पॉईंट म्हणून, क्वांटास वर आलेला एक मजेदार अनुभव. यात इंग्रजी शब्दाना मराठी प्रतिशब्द योजलेले नाहीत.)

माझ्या बर्थडेला तू यायचंस असा अनेक वर्षांचा लेकीचा (म्हणजे माझी मानसकन्या) आग्रह होता,
त्यामूळे ऑकलंड (न्यू झीलंड) ला जायची माझी तारीख नक्की होती.
तारीख नक्की असल्याने, माझी नेटवर शोधाशोध सुरु होती. मागच्या वेळी मला कोरिय़न एअरलाईन्स
वर मस्त डिल मिळाले होते. यावेळी क्वांटासचे दर फ़ार आकर्षक वाटत होते.
पण मला त्यासाठी ऑस्ट्रेलियाचा ट्रांझिट व्हीसा लागणार होता. त्याबाबत चौकशी केल्यावर तो सहज मिळेल असे कळले आणि त्यासाठी काही चार्जेसही नव्हते.

थॉमस कूकमधल्या, मिस पायल देसाई, माझ्यासाठी गेली काही वर्षे तत्परतेने बुकिंग करुन देतात, तसे
यावेळीही मला त्यांनी करुन दिलेच.
माझी आयटनरी अशी होती मुंबई-सिंगापूर (जेट एअरवेज), सिंगापुर-सिडनी (क्वांटास), सिडनी-ऑकलंड (क्वांटास) ऑकलंड-मेलबर्न (जेट कनेक्ट) मेलबर्न-सिंगापूर (जेटस्टार) सिंगापूर-मुंबई ((जेट एअरवेज) सर्व फ्लाईट्स, क्वांटासची कोड शेअर फ़्लाइट्स होती.

नेटवर, सीट बूक करण्यासाठी शोधल्यावर, असे दिसले कि सिंगापूर-सिडनी सेक्टरवर ए ३८० (डबल डेकर) असणार होते. मी हव्या त्या सीट्स आणि व्हेज मील्स बूक करुन टाकले.

सिडनी ला माझा १० तासाचा, म्हणजे एका रात्रीचा हॉल्ट होता. सिडनीला आलो तर नक्की भेटायचे असे माझे आणि चंपकचे ठरले होते, पण माझ्या हातात व्हिसा आल्यावर मी बघितले कि चंपक आणि चंपी, १२ दिवस बाहेर जाणार होते. त्यामुळे त्यांना निरोप मिळणे कठीण होते.

याआधी देखील २ फ़ेर्‍या ऑकलंडला झाल्याने, तिथले क्वारंटाईन चे नियम माहित होतेच. साधारण तसेच नियम ऑस्ट्रेलियाचे पण असणार याची कल्पना होती. रात्री बाहेर जायला सिडनी सेफ़ आहे, असे मिस पायल देसाई, यांनी कळवले होते. साधारण ८ तासाच्या वर हॉल्ट असेल तर एअरलाइन्स हॉटेल बुकिंग देतात असा माझा अनुभव आहे, पण क्वांटास तसे काहि देणार नव्हती, ट्रांझिट व्हिसानुसार मला दोन्ही वेळेला, प्रत्येकी ७२ तासांची मुभा होती.

एवढी सगळी तयारी करुन मी, सहार एअरपोर्टला पोहोचलो.
पहिली मजा म्हणजे, क्वांटासचा कोड, जेट एअरवेजच्या फ्लाईटवर दाखवतच नव्हते. जेट एअरवेजचा, आंतरराष्ट्रिय सफ़रीचा माझा पहिलाच अनुभव होता. आणि अपेक्षेप्रमाणे तो सुखदही ठरला.

लगेज चेक ईन करताना, त्या मुलीचा जरा गोंधळ उडाला. पण मी समजावल्यावर तिने लगेज, ऑकलंड पर्यंत बूक केले. (हे जरा नवलाचे, कारण बुकिंग ओपन केल्यावर तिला हे सगळे दिसायला हवे होते.)

सिंगापूरला बिफ़ोर टाईमच पोहोचलो. तिथे फारसा वेळ नव्हता (तरी मी तिथल्या ऑर्किडसचे फोटो काढलेच.)
गेटवर गेल्यावर अवाढव्य असे ए ३८० दिसले. नूकतीच याची रेग्यूलर सेवा सुरु झाली होती. पण हल्लीच
ती काही काळ स्थगितही झाली होती. इंजिनवरच्या आवरणाचा काही भाग, निखळून इंडोनेशियात पडला होता. (तो प्रकार याच उड्डाणावर झाला होता.)

बॅग ट्रान्सफ़र झाल्याची खात्री करुन मी विमानात शिरलो. खर्‍या अर्थाने ते भव्यदिव्य होते. शिवाय आतल्या सिट्स, वॉशरुम्स सगळेच चकाचक होते. नेहमीप्रमाणे अर्धापाऊण तास उशीर झालाच उडायला पण ८ तासाच्या फ़्लाइटमधे तो भरुन काढता आला असता. क्वांटासची सर्व्हिस पण बरी होती (हो बरीच, सिंगापूर एअरलाईन सारखे लाड नव्हते.)

थोड्याच वेळात जबरदस्त हादरे बसू लागले. दोन तीन वेळा सर्व्हिस थांबवावी लागली.
पुढे तर क्रू ला उभे राहणेही कठीण झाले तसा पायलटने जरा लांबचा वळसा घ्यायचे ठरवले. त्यात जास्त वेळ गेला. सिडनीला उतरायला तसा उशीरच झाला.

सिडनीत रात्र काढायची होती, म्हणून मी इमिग्रेशनवर आलो. काऊंटरवरच्या हिरोला, केनयातून आल्यावर कुठले सर्टीफ़िकेट विचारायचे तेच आठवेना. मीच त्याला येलो फ़िव्हरची आठवण करुन दिली. माझ्या अंदाजाप्रमाणे मला तिथे बॅग बाहेर काढायची नव्हतीच. आणि माझ्या हॅंड बॅगेत, कॅमेरा, मोबाईल, आयपॉड शिवाय काहीच नव्ह्ते. नाही म्हणायला माझ्या किचेनला लाकडाचा एक तूकडा होता, तो मी काढून टाकला.

तिथे बाकिच्या प्रवाश्यांच्या सामानाची उचकापाचक चालली होती, माझ्याकडे काहीच सामान नसल्याने, मीच एका अधिकारी बाईला, मला लवकर बाहेर सोडायची विनंती केली. आणि तिने घोळ घालायला सुरवात केली, तूझ्याकडे काहीच सामान कसे नाही, असे मला विचारू लागली. मी म्हणालॊ, माझी बॅग ऑकलंडपर्यंत बूक झाल्याने, मी ती इथे बाहेर काढणार नाही.

तर ती म्हणाली, पण ती बॅग इथे उतरली आहे ना, मग मला चेक करु दे. त्याही बॅगेत काहीच आक्षेपार्ह नसल्याने माझी काहीच हरकत नव्हती. तिनेच ती बॅग शोधून आणली. नूसतीच एक्स रे स्कॅन केली, आणि माझ्या हातात दिली.

मी म्हणालॊ, मला कशाला देतेस, परत आत ठेव. तर म्हणाली, तूच उद्या चेक ईन करताना दे, आम्ही नाही ठेवत !!!

या घोळात बराच वेळ गेला. करन्सी एक्स्चेंज करायला गेलो, तर सगळे काऊंटर्स बंद झाले होते.

आता मी एअरपोर्टच्या बाहेरच्या हॉलमधे होतो. कसेबसे एकाकडून थोडे डॉलर्स घेतले. तो भाग तसा ओकाबोकाच होता. इनफ़ॉर्मेशन काऊंटरवर गेलो, तर तो म्हणाला, सिटीत जायला ट्रेन सोयीस्कर आहेत. ट्रेनचे तिकिट काढायला गेलो, तर तिथली बाई म्हणाली, तूझ्या फ़्लाइटच्या आधी परत यायला ट्रेन नाही. बॅगेज सर्व्हीस बंद झाली होती.

आता मी बापूडवाणा तिथेच उभा. ती मगासची इमिग्रेशनवाली, मला अगदी हसून टाटा करुन गेली. त्या ठिकाणी मी एकटाच उरलो, तर विचार केला, कि निदान वरच्या मजल्यावर लोक असतील. तिथे गेलो तर तिथेही शुकशुकाट. तरी तिथेच बसलो आणि जरा डोळा लागतोय, तेवढ्यात एक अधिकारी म्हणाला, हा भाग आता बंद होणार आहे. वेंटींग एरिया मधे थांब. त्यानेच तो भाग मला दाखवला.

माझ्या मागे तो भाग बंद झाला. खालचा मुख्य हॉल बंद झाला होता (तरी तिथले मोठे टिव्ही आणि एस्कलेटर्स सुरुच होते. का ???)

वेंटींग एरिया अगदीच छोटा. त्यातही अनेकजण नको त्या अवस्थेत झोपलेले. पाऊल ठेवायला जागा नाही. व्हेंडींग मशीनमधे, मोजकेच काही मिळत होते. पण मला तशी भूक नव्हती. वॉशरुम्स मधे काही ऑसींचा अक्षरश: नंगा नाच चालला होता.

आता काय करावे बरं, असा विचार करत मी थेट बाहेर आलो. बाहेर एक भारतीय (पाकिस्तानी पण असू शकेल) टॅक्सीवाला दिसला. पण त्यानेही तिथेच थांबण्याचा सल्ला दिला.

पुढचे ५ तास मी तिथे फ़ेर्‍या मारण्यात घालवले. आयपॉड होते, म्हणून निदान गाणी तरी ऐकता आली.
परळचा एस्टी स्टॅंड बरा, इतकी अस्वच्छता तिथे होती. सगळीकडे सिगारेटस्ची थोटके पडलेली. बाकावर बसावे तर बाजूच्या सिगारेट्स डिसपोझर युनिटसमधून असह्य दुर्गंधी येत होती.

तितक्यात पाऊस सुरु झाला, आणि माझ्या फ़ेर्‍या मारायच्या क्षेत्रावर आणखी मर्यादा आली.हातात बॅग. माझ्या नेहमीच्यापेक्षा ती वजनाने बरीच हलकी होती म्हणून बरं.

मग दूधवाला आला, पेपरवाला आला असे करत पहाटे ४ वाजता एकेक स्टाफ यायला लागला, आणि साडेचार वाजता माझी यातून सुटका झाली.

मी आतापर्यंत मस्कत, दुबई, अबु धाबी, कोलंबो, सिंगापूर, इंचॉन, अक्रा, बँकॉक, किलिमांजारो, ब्रसेल्स, फ़्रॅकफ़ूर्ट या एअरपोर्ट वर ट्रांझिटमधे बराच काळ घालवला आहे, कुठेही असा अनुभव आला नव्हता. झुरिकपधे तर मी दोन दोन दिवस ट्रांझिटमधे असे पण त्यावेळी स्विसएअर मस्त व्यवस्था करत असे (झुरिकचा एअरपोर्ट पण रात्री बंद होतो.).

इथिओपियातला, अदीस अबाबा एअरपोर्ट, तर याबाबतीत अत्यूत्तम सेवा देतो. अनेक लहानसहान आफ़्रिकन
देशांना जोडण्याचे, काम तो करतो.

आणि एवढ्यात हे संपले असेल असे म्हणता कि काय, छे नाव नको, परतीच्या प्रवासात तर आणखी घोळ. पण तो पुढच्या भागात.

दुसरा भाग इथे आहे...

http://www.maayboli.com/node/22807

गुलमोहर: 

इंजिनवरच्या आवरणाचा काही भाग, निखळून इंडोनेशियात पडला होता.

???????????????????????

त्या फ्लाईटमधे होतात तुम्ही?

आहात ना व्यवस्थित?

“परळचा एस्टी स्टॅंड बरा, इतकी अस्वच्छता तिथे होती. सगळीकडे सिगारेटस्ची थोटके पडलेली.”
>>>

बाप रे !!! म्हणजे तिथेही इथल्यासारखा प्रकार ???
नशीब, पानाच्या पिचकार्‍या नव्हत्या.
(अर्थात् जीवनात असे रंग भरणं त्यांना जमणारच नाही म्हणा !
ती आपल्या भारतीयांची खासियत आहे) Lol

ग्रा मु, तो प्रकार नोव्हेंबरात घडला होता. मी गेल्या आठवड्यातच केला हा प्रवास.
मामी, अकु बाकिची मजा लिहितोच.
उल्हास, सिगारेट्स चे तसे प्रमाण बर्‍याच देशांत आहे आता. पान खाण्यात पाकिस्तान, बांगला देश, इंडोनेशिया आपल्याला प्रतिस्पर्धी आहेत.
श्री, एअर इंडियाची मात्र किव येते. बाकि कुठल्याही देशांत, त्या देशाची विमाने जास्त दिसतात. मुंबईत कुठेतरी एखाद दुसरे दिसते. पुर्वीची ती कॅलेंडर्स, महाराजाची पोष्टर्स इतिहासजमाच झालीत.

दिनेशदा,

तुमच्या लेखामुळे मी अमेरिकेत येतानाचा ८ तासाचा Munich एअरपोर्ट वरचा हॉल्ट आठवला. अर्थात तिथे एवढा गोंधळ नव्हता.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

दिनेश दा.. असा अनुभव तुम्हाला परत येऊ नये ही शुभेच्छा Happy
ट्रांझिट मधे थांबणं हे अतिशय कंटाळवाणं अस्तं त्यातून असं सहन करावं लागणं ..टू मच !!

दिनेशदा,क्वांटासचा कारभार आपल्या एअर ईंडियाच्या तोडीस तोड दिसतोय.
इंजिनवरच्या आवरणाचा काही भाग, निखळून इंडोनेशियात पडला होता.<<<<<<<<<<१-२ वर्षांपूर्वी क्वांटासच्या एका विमानाला मोठे भगदाड पडल्याचेही वाचले होते.

मी तर जेद्दा सारख्या टुकार विमानतळावर १२ तास काढले होते कारण air india ने न सांगता रात्री १२ ची flight सकाळी ८ वाजता reshedule केली होती.
क्वांटास रोल्स राइसची इंजिने वापरते त्यामधे problem होता. emirates GE ची वापरते. ए ३८० मधे काही problem नाही. मी emiratesने दुबई जेद्दा प्रवास केला आहे ए ३८० ने मस्त विमान आहे. मी हसु ला विनंती करुन वरच्या मजल्यावर फिरुन आलो. त्यामधे economy groud floor & first & business first floor असा प्लान होता.

मंदार

Happy

अनुभवविश्व तर संपन्न झालं ना. (बोलीभाषेत म्हणताना : अक्कलखाती जमा.) >>>>अगदी अगदी

(अर्थात् जीवनात असे रंग भरणं त्यांना जमणारच नाही म्हणा !
ती आपल्या भारतीयांची खासियत आहे)>>>>> Happy Happy

बाप्रे. किती त्रास.:(
"यस्तु संचरते देशान्......तस्य विस्तारिता बुद्धी, तैलबिन्दु इवाम्भसा"...:फिदी: ( पूर्ण सुभाषित आठवत नाहीये.पण सांगण्याचा उद्देश हा की तुमचं अनुभवविश्व समृद्ध झालं ना क्वांटासमुळे.)