बाई

Submitted by अज्ञात on 7 June, 2008 - 13:31

तो बालवाडीत असतांना त्याला 'त्या' सिनिअर माँटेसरीच्या बाई फार आवडत असत.

केवड्याच्या पानासारखा नितळ तुकतुकीत गोरा रंग, सडपातळ बांधा, मोठ्या पापण्यांमुळे कायम काजळ घातल्यासारखे वाटणारे टपोरे बोलके डोळे, उजव्या खांद्यावरून पुढे रुळणारी काळ्या भोर दाट केसांची लांब सडक वेणी, त्यात नियमितपणे माळलेलं एखादं त्यांच्यासारखंच गोड टवटवीत सुगंधी फूल, उजव्या गालावर चेहर्‍याची शोभा खुलवणारा मोठा मस, कपाळावर रेखीव चंद्रकोर. अशा तलम व्यक्तिमत्वाबरोबर ओघानंच आलेलं त्यांचं लाघवी निखळ स्वच्छ कोरं हसु, बाळ्गोपाळांचं मन क्षणात जिंकून घेत असे. त्यांचं चालणं, बोलणं, वागणं सगळंच कसं डौलदार होतं. मुलांबरोबर खेळतांना; त्यांना खेळवतांना, त्यांचं एक हलकं फुलकं अल्लड फुलपाखरू होत असे. रडणार्‍या मुलांच्या अश्रूंची फुलं करण्याचं कसब खुद्द त्यांच्या अस्तित्वातच होतं.

या वर्षी तो त्यांच्या वर्गात आला होता. आयुष्यातला एक मोठा उत्सव वाटला होता तो त्याला.

अक्षर ओळ्ख, रंगांशी दोस्ती, गाण्यांचा सराव, गोष्टी सांगायची तालीम, चुनचुन खडा, माझ्या मामाचं पत्रं हरवलं, दगड का माती, असे एकाहून एक गमतीदार खेळ्,-चित्रकला, हस्तव्यवसाय,........... बाई सगळंच शिकवीत- काय नाही म्हणून नाहीच. !!

ज्याची त्याची आवड निवड ओळखून, त्याचा मानसिक कल जाणून, तो त्या त्या व्यक्तिमत्वावर ठसवण्याचा नजुक संस्कार त्या अत्यंत संवेदनशील कुशलतेनं करीत असत. त्याला या सर्वांचीच मुळात आवड असल्याने, अर्थातच, त्याच्या लाडक्या बाईंचापण त्याच्यावर विशेष जीव होता.

लहान मुलांमधे जन्मतःच असलेला वांडपणा फक्त रेशमाच्या तंतूंमधेच कसला जाऊ शकतो हे मर्म त्यांना पूर्णपणे उमजलेलं होतं. एखाद्याच्या स्वप्नातलं वर्म ओळखून त्याला आत्मसात करण्याची किमया त्यांना अवगत असवी.

एकदा त्या बाई दोन दिवसांकरता रजेवर गेल्या असतांना त्याची अवस्था पार हरवल्यासारखी होऊन गेली होती. आपल्या आवडत्या बाई, आपल्याला न सांगता रजेवर गेल्याच कशा या भाबड्या प्रश्नानं तो अस्वस्थ झाला होता. अशा अवस्थेत तो बदलीवर आलेल्या नव्या बाईंचं ऐकणं शक्यच नव्हतं. त्या बाईंना; त्याला आवरणं अतिशय अवघड गेलं. त्यांनी सांगितलेले खेळ अथवा अभ्यास न करण्यासाठी त्यानं खूप अकांड तांडव केलं. त्या वैतागून रागावल्या. त्यानं ऐकावं म्हणून, त्यांना महित असलेले सर्व मार्ग संपल्यावर नाईलाजानं त्याला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून पेले-भांडी ठेवण्यच्या खोलीत कोंडून ठेवलं. आगीत तेल पडलं होतं. उपाय उलटला होता.

संतापून चिडून उगारलेल्या चिमुकल्या लाथा-बुक्क्या; खोलीच्या दरावर अलगद जिरून गेल्या. रॅकवरची सर्व भांडी पण आदळून आपटून संपली होती. अखेर तो थकून त्या पसर्‍यात तसाच झोपी गेला. त्यावेळी कदाचित, इतरांना, त्यांचा उपाय सफल झाल्याचा आनंद झाला असावा. त्या चिडण्यामागचं आणि शांत होण्यामागचं, अशी दोन्हीही कारणं शोधायचा कुणी प्रयत्न केला नाही. त्यांची कुवतच नसावी. "मी लहान आहे म्हणून का, मोठा झालो की बघून घेईन"असे बालसुलभ लटके विचारही त्याच्या डोक्यात येऊन गेले.

त्याला जाग आली तेंव्हा तो हेड बाईंसमोर बसलेल्या त्याच्या आईच्या कुशीत होता. त्या दोघींमधे आजच्या घडल्या प्रकाराबद्दल बरीच चर्चा झाली असावीसं दिसत होतं. आई केविलवाणी झाली होती. तिची माया पझरत होती. बाईंच्या चेहर्‍यावर अशा मुलाला जन्म देणार्‍या आणि आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या त्याच्या आईबद्दलची आश्चर्य कुतुहलयुक्त आदर भावना ओसंडत होती. त्याच्या नजरेत मात्र अजूनही सर्वांविशयीचा संताप धुमसत होता. त्याच्या एका तीक्ष्ण कटाक्षाने झालेली हेड बाईंची चल बिचल त्या लपवू शकत नव्हत्या. त्याच्या ते लक्षात आलं होतं. लहान मुलांवर डाफरून दादागिरी करण्यार्‍या त्या (त्याच्या दृष्टीने)डरपोक बाईंकडे तो तुच्छतेने पहात होता.

पुढे दोन दिवस तो शाळेत गेलाच नाही. आईलाही, जबरदस्ती केल्यावर होणार्‍या परिणामांची पूर्ण कल्पना होती. अशा बिथरलेल्या लहानग्याला कारण विचारण्याची सोय नव्हती.

रजेवरून परत आल्यावर त्या बाईंना जेंव्हा हे सारं कळलं तेंव्हा त्या त्याला भेटायला घरी आल्या. त्यांना पाहिल्याबरोबर त्याचा नूर एकदम बदलला, वादळ कुठच्याकुठे पळून गेलं आणि तो ओक्साबोक्सी रडत बाईंना जाऊन बिलगला. "मला वचन द्या पुन्हा असं कधी मला सोडून जाणार नाही म्हणून" या वाक्याने सर्वच अवाक झाले आणि परवाच्या कार्यक्रमाचा उलगडा झाला. बाई त्याला हवं होतं तशा खळखळून हसल्या आणि त्याला जवळ घेऊन हवं ते वचनंही दिलं. तो खुश. प्रकरण संपलं.

त्यानंतर कांही दिवसांनी त्याच्या वडिलांचीच बदली झाली म्हणून ते कल्याण सोडून गेले. तो आजही त्या बाईंना विसरलेला नाही. त्याच्या मनातला एक महत्वाचा कप्पा त्याने त्या बाईंच्या नावाने जपून ठेवला आहे, "त्याला आयुष्यभर त्यांच्यासोबत रहायचं होतं ना" म्हणून ........!!

.................................................अज्ञात

गुलमोहर: 

अज्ञात,
छान.
ही जर तुझी आठवण असेल, तर छानच लिहिलं आहेस.
अनघा

अनघा,
हो ती आठवण आहे आनंदाची साठवलेली.
.................अज्ञात

अज्ञात,

आठवणी मधील फक्त गोडवा टिकुन थेवायचा असतो.

दिपालि

अज्ञात,

आठवणी मधील फक्त गोडवा टिकुन थेवायचा असतो.

दिपालि

अज्ञात,

आठवणी मधील फक्त गोडवा टिकुन थेवायचा असतो.

दिपालि

अज्ञात,

आठवणी मधील फक्त गोडवा टिकुन थेवायचा असतो.

दिपालि